गेला आठवडाभर पुण्यात पुस्तक महोत्सव सुरू आहे. आपापल्या आवडीच्या लेखकांची पुस्तकं मिळवण्यासाठी वाचक या महोत्सवाला गर्दी करताहेत, असं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘गोष्ट खास पुस्तकाची’ या आगळ्यावेगळ्या पुस्तकातील संपादक सुहास कुलकर्णी यांची प्रस्तावना. लेखक आणि त्याचं खास पुस्तक, लेखक आणि त्याचे वाचक यांच्यातल्या नात्याचा वेध घेणारी.
लेखक आणि वाचक यांच्यातलं नातं कसं असतं?
लेखक त्याच्या ऊर्मीतून लिहीत असतो. त्याच्यामध्ये जी खळबळ चाललेली असते ती व्यक्त करण्यासाठी तो लिहीत असतो. वाचक ही खळबळ समजून घेत असतो. स्वत:च्या मनात ती सामावून घेत असतो. स्वत:च्या मनातील खळबळीशी ताडून पाहत असतो. जिथे लेखक आणि वाचक यांचे सूर जुळतात तिथे त्यांच्यात मैत्रही जुळतं. एक नातं तयार होतं. वाचक त्या लेखकाच्या मागे आपोआप चालू लागतो. एवढंच काय, लेखकाने आपलं बोट धरून चालत राहायला हवं असं त्याला वाटू लागतं. त्यातून लेखक हा वाचकाच्या जगण्याचा भाग बनतो. लेखकाचं म्हणणं, त्याची पात्रं, त्याचे विषय हे वाचकांचेही बनतात. क्वचित लेखक बहकला तर वाचक दुखावतो, पण उरी आशाही धरून ठेवतो. हे सारं आपसूक घडत असतं. त्यासाठी लेखक आणि वाचकाने एकमेकांना भेटण्याची गरज नसते, चर्चा करण्याची गरज नसते. उलट, न भेटता, चर्चा न करताच लेखक-वाचक नातं जास्त निर्मळपणाने आकारलं जातं. हे नातं असं असतं. ज्यात लेखक नावाच्या हाडामासाच्या माणसापेक्षा त्याच्या निर्मितीला जास्त महत्त्व असतं. वाचक लेखकापर्यंत आणि लेखकही वाचकापर्यंत त्याच्या निर्मितीमार्फतच भेटतो. ही भेट एका सुंदर नात्याचा भाग असते. त्यामुळेच वाचक नावाचा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेखकाला (किंवा लेखकांना) घेऊनच जगत असतो. आई-वडिलांसोबतच्या जैव नात्याइतकंच हे नातं भक्कम असतं. फरक इतकाच, की लेखकाचा प्रवेश झालेला असतो. कोण कुठला लेखक, पण तो वाचकाच्या जगण्याचा भाग बनतो बुवा!
ज्या वाचकांना आपल्या आवडत्या लेखकाविषयी असा अनुभव नाही त्यांचं काय? ते सुखीच म्हणायचे. आपण बरे आणि आपलं बरं! लेखकाने लिहायचं आणि आपण ते वाचायचं, एवढाच काय तो व्यवहार. एक पुस्तक वाचून झालं की दुसरं, आणि एक लेखक वाचून झाला की दुसरा, अशा नि:स्पृह वृत्तीने वाचत जाणारी माणसं थोरच म्हणायची. कुठे अडकून राहणं नको की कुठे गुंतून राहणं नको. पण चांगला म्हणवला जाणारा वाचक असा नसतो. तो लेखकात, त्याच्या विचारविश्वात गुंततो. त्याचं सारं म्हणणं तो आपल्यातही ओढून घेतो. समृद्ध बनतो. बऱ्याचदा तो लेखकापेक्षाही अधिक समृद्ध बनतो.
अशा नशीबवान वाचकांचा प्रतिनिधी बनून मी हा मजकूर लिहितोय. हा मजकूर लिहिण्याला आणखीही एक-दोन संदर्भ आहेत. मी वाचक म्हणून तर लिहितो आहेच, परंतु ‘अनुभव' मासिक आणि ‘समकालीन' प्रकाशन यांच्या वतीनेही हे लिहितोय.
म्हणजे काय, सांगतो. ‘युनिक फीचर्स' या संस्थेतर्फे ‘अनुभव' हे मासिक प्रकाशित केलं जातं. या मासिकात मराठीतील महत्त्वाचे लेखक नियमितपणे लिहीत असतात. कधी ते स्वत:हून लिहितात, कधी आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतो. परिणामी, लेखकांचा सहभाग सलग नसतो, नैमित्तिक असतो. त्यामुळे आपण एखादी अशी कल्पना काढावी ज्यात वर्षभर लेखकमंडळी सहभागी होऊ शकतील, असा विचार आम्ही ‘अनुभव'मधील संपादकीय सहकारी करत होतो. विचार करता करता आम्ही एका कल्पनेपाशी घेऊन थांबलो. आपल्याकडे लेखकाने स्वत:च्या लेखनाबद्दल लिहिण्याची पद्धत फारशी रुजलेली नाही. इतरांनी म्हणजे पत्रकारांनी आणि समीक्षकांनी (वगैरे) लेखकाबद्दल लिहिण्याचंच आपल्यकडे वळण आहे. आम्ही असा विचार केला, की खुद्द लेखकालाच त्याने निर्मिलेल्या साहित्यातील एका कलाकृतीवर लिहायला सांगावं. कल्पना चांगली वाटली. वाचकांना ती आवडेल असंही वाटू लागलं. लेखकांनी लिहिलं तर त्याचं पुस्तकही चांगलं होईल, असं जाणवू लागलं. मुळात ही कल्पना माझे सहकारी आनंद अवधानी यांनी बोलून दाखवलेली. आठ-दहा वर्षांपूर्वी. लेखकांच्या मुलाखती घेऊन त्याचं शब्दांकन करून दिवाळी अंकात एखादा परिसंवाद करता येईल असं त्यांना वाटलं होतं; पण ती कल्पना प्रत्यक्षात यायची राहून गेली होती. ती आम्ही आता नव्या रूपात आणि सविस्तरपणे ‘अनुभव'मध्ये आणून पाहणार होतो.
आम्ही मराठीतील महत्त्वाच्या लेखकांची एक समतोल यादी केली. कादंबरी, कथा, कविता, नाटक, आत्मचरित्रपर आणि संकीर्ण अशा लेखनप्रकारांचं प्रतिनिधित्व होईल असा प्रयत्न केला आणि लेखकांशी संपर्क केला. ही मराठीतील ज्येष्ठ-श्रेष्ठ लेखक मंडळी. पण त्यांनी आमची कल्पना उचलून धरली आणि ही लेखमालिका ‘अनुभव'मध्ये वर्षभर प्रसिद्ध झाली. वाचक खूष, आम्हीही खूष! आम्ही ही लेखमालिका योजली ती त्यातून एक छानसं पुस्तक होईल, या अपेक्षेनेच. त्यानुसार अनुभवमध्ये प्रकाशित झालेले सगळे लेख एकत्र करून प्रस्तुत प्रकाशित होत आहे. आम्ही ज्या लेखकांना या मालिकेसाठी आमंत्रित केलं होत, त्यातील काहींनी पूर्वीच स्वत:च्या कलाकृतींवर लिहिलेलं होतं. हे लेख ‘अनुभव'मध्ये पुन:प्रकाशित न करता त्यांच्या अनुमतीने या पुस्तकात समाविष्ट केले आहेत.
‘अनुभव'मधील लेखमालेमागील आणि अर्थातच या पुस्तकामधील विचार काय होता?
१९६० साली ‘महाराष्ट्र' राज्याची स्थापना झाल्यानंतर, म्हणजेच मराठी बोलणाऱ्या लोकांना स्वत:चं भाषिक राज्य मिळाल्यानंतर ज्या लेखकांनी मराठी भाषिक वाचकांची मनं आंदोलित केली, त्या लेखकांनी स्वत:ला महत्त्वाच्या वाटणाऱ्या कलाकृतीवर लिहावं अशी ही कल्पना होती. असं लिहिलं गेलं तर आजच्या तरुण वाचकांना गेल्या पन्नासेक वर्षांतील महत्त्वाची पुस्तकं कळतील आणि त्यांच्या वाचनाला खोली मिळू शकेल, असं वाटत होतं. ज्या पिढीने ही पुस्तकं पूर्वीच वाचलेली आहेत त्यांना खुद्द लेखकाचा त्या-त्या पुस्तकाबद्दलचा दृष्टिकोन कळेल, असा दुसरा हेतू होता. या लेखमालिकेचं पुढे पुस्तक करण्याचीही कल्पना असल्याने सर्व लेख एका धाग्यामध्ये गुंफलेले असण्याची आवश्यकता होती. त्यासाठी आम्ही एक छोटंसं टिपण तयार केलं आणि लेखकाकडून आमच्या अपेक्षा काय आहेत ते लेखकांना कळवलं. सर्वच लेखक हे आमच्या कमी-अधिक परिचयाचे असल्याने सूर जुळायला वेळ लागला नाही.
ज्या साहित्यकृतींबद्दल लेखक लिहिणार आहे त्याची निवड त्यानेच करावी असं आम्हाला वाटत होतं. तरीही कोणत्या पुस्तकाबद्दल लिहिलेलं आवडेल, याबद्दल आम्ही लेखकांना (आगाऊपणे) सुचवत होतोच. पण निर्णय लेखकांनीच घ्यायचा होता. लेखकांनी केलेल्या या निवडीमागे अनेक कारणं दिसतात. मुळात स्व:ताच्या पुस्तकाबद्दल लिहायला अनेकांना संकोच वाटत असल्याचं त्यांनी लेखात लिहिलं आहे. शिवाय लिहायचं तर एका पुस्तकाची निवड करणं अवघड असल्याचं बहुतेकांचं मत आहे. त्यामुळे कुणी स्वत:चं दुर्लक्षित राहिलेलं पण स्वत:ला आवडलेलं पुस्तक निवडलं आहे, तर कुणी लेखकाला ‘लेखक बनवलेलं' पहिलं पुस्तक निवडलं आहे. प्रत्येकाने पुस्तक निवडण्याविषयी केलेलं निवेदन मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यामुळे त्याविषयी जास्त सांगत नाही.
लेखकाने ज्या पुस्तकाची निवड केली आहे, त्याचा विषय काय आहे, कुठल्या पार्श्वभूमीवर हा विषय लिहावासा वाटला, साहित्यकृती साकारण्यापूर्वी काय तयारी किंवा अभ्यास केला होता, लिखाणाचा फॉर्म निवडताना काय विचार केला होता, साहित्यकृतीतून तो काळ कसा प्रतिबिंबित झाला आहे, त्या पुस्तकाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मराठी समाजावर काही परिणाम झाला का, अशा अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने लेखकाने लिहावं अशी आम्ही विनंती केली होती. (अर्थातच कविता संग्रहांना यातल्या काही अपेक्षा लागू नव्हत्या.) ज्या वाचकांनी ही पुस्तकं वाचली नसतील त्यांच्यासाठी थोडक्यात कथासूत्र किंवा विषयसूत्रही सांगावं, अशी आमची विनंती होती. ती बहुतेकांना मान्य नसूनही आमच्यावरील प्रेमाखातर त्यांनी ती विचारात घेतलेली दिसते.
स्वत:बद्दलच कसं लिहायचं, असा संकोच लेखकांना होत असला तरी स्वत:च्या कलाकृतीबद्दल लिहिताना त्यांना झालेला आनंद त्यांच्या लेखांमध्ये जाणवतो. त्यामुळे कुणी लिहिताना हळवे होत आहेत तर कुणी स्वत:विषयी विस्मयचकित. कुणी स्वत:चं कौतुक आठवून सद्गदित होत आहे, तर कुणी पुस्तकामुळे झालेल्या सामाजिक हालचालीने तृप्त. लेखकांच्या मनातील हा कोपरा एरवी आपल्या समोर न येणारा; पण या पुस्तकामुळे हे दालन खुलं होत आहे.
हे पुस्तक आणखी एक गोष्ट करू पाहत आहे. पुस्तक (किंवा त्यातील कथा –कविता वैगेरे) लिहिताना लेखक आपल्या भोवतालाचा काय आणि कसा विचार करतो, तो जेव्हा लिहितो आहे त्या काळाकडे तो कसा पाहतो, हेही या पुस्तकामुळे कळू शकणार आहे. हे कळल्याने वाचक हा अधिक चांगला वाचक तयार होण्याची श्यक्यता वाढते. कारण बहुतेक वाचकांच्या दृष्टीने एखादी कथा, कादंबरी किंवा नाटक याची किंमत केवळ एक ‘गोष्ट' एवढीच असते. परिणामी गोष्टीच्या पलीकडील काळाचा संदर्भ अशा वाचकांपर्यंत पोहोचूच शकत नाही. खरं तर लेखक लिहितो तेव्हा तो समाजाचा एक घटक म्हणूनच लिहीत असतो. त्याच्या लेखनातून समाज व्यवहाराचं प्रतिबिंब पडण स्वाभाविकच असतं. तो जे लिहित असतो त्याला त्या त्या काळाचा संदर्भ असतो. या व अश्या गोष्टी वाचक समजू शकला तर लेखकाचे शब्द त्याच्यापर्यंत जास्त नेमकेपणाने भिडू शकतील. त्यातून वाचकाला 'बिट्वीन द लाईन्स' कळू शकतील. इथे स्वत: लेखकच स्वत:च्या कलाकृतीचा अनुभव सांगत असल्याने ‘या मनीचे त्या मनी' व्हायला मदत होईल असं वाटतं.
आणखी एक गोष्ट. कलाकृती वाचकांपर्यंत पोहोचून काही वर्षं लोटल्यानंतर स्वत: लेखक आपल्या स्वत:च्या लेखनाकडे तटस्थपणे पाहतो तेव्हा त्याच्या मनात काय भावना असतात. किंवा पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरच्या काळात लेखनावर आलेल्या (उलट-सुलट) प्रतिक्रियांकडे तो कसं पाहतो, हेही आपल्याकडे फार अपवादाने शेअर केलं जातं. या पुस्तकामुळे पंधरा लेखकांच्या किमान पंधरा निवडक पुस्तकांपुरतं का होईना, पण लेखनप्रक्रियेबद्दल वाचकांना कळणार आहे. या अर्थाने या लेखनाला आणि पुस्तकाला डॉक्युमेंटेशन म्हणजे दस्तावेजीकरणाचंही महत्त्व आहे. त्यामुळेच आम्ही आणखी लेखकांना अशा प्रकारचं लेखन करण्याची विनंती करण्याच्या विचारात आहोत. स्वत:च्या लेखनाच्या प्रक्रियेबद्दल विस्ताराने लिहून ठेवलं, तर तत्कालीन इतिहासाचं साधन म्हणून हे लेखन पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचा दस्तावेज ठरू शकतं. लेखकाचं विचारविश्व समजून घेण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो.
हे सर्व इथे लिहिलं त्याला आणखी छोटंसं कारण आहे. वाचकाला लेखकाकडून काय मिळत असतं आणि आणखी काय हवं असतं हे वाचकाच्या वतीने लेखकांपर्यंत पोहोचावं, असं वाटत होतं. हे मनोगत वाचून लेखकांना वाचकांची भावना कळली आणि दुसरीकडे, पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना काही नवं गवसलं तर या पुस्तकाचा हेतू सफल झाला असं म्हणता येईल.
-सुहास कुलकर्णी
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
