
‘पुस्तकं कधीच जुनी होत नसतात,’ असा संदेश तुर्कियेची राजधानी अंकारातलं एक ग्रंथालय देतंय. लोकांनी कचऱ्यात टाकून दिलेल्या पुस्तकांतून कचरावेचकांनी हे सार्वजनिक ग्रंथालय उभं केलं आहे. त्यासाठी त्यांनी अनेक महिने लोकांनी कचऱ्यात टाकून दिलेली पुस्तकं गोळा केली. या अनोख्या उपक्रमाची माहिती समजल्यावर लोकांनी मुद्दाम या ग्रंथालयासाठी पुस्तकं द्यायला सुरुवात केली. आज या ग्रंथालयात ६,०००हून अधिक पुस्तकं आहेत. यात कथा, कादंबऱ्या, नॉनफिक्शन, कॉमिक, बालसाहित्य आणि विज्ञान संशोधनासाठी स्वतंत्र विभाग आहेत. यात इंग्रजी आणि फ्रेंच अशा दोन्ही भाषांतली पुस्तकं आहेत.
सुरुवातीला हे ग्रंथालय फक्त स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी चालू केलं होतं. आता ते सर्वांसाठी खुलं आहे. तसंच या ग्रंथालयातली पुस्तकं आता शाळा, शैक्षणिक कार्यक्रम आणि तुरुंगांमध्ये कैद्यांना वाचण्यासाठीही दिली जातात.
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.