आम्ही कोण?
आमची शिफारस 

'मैं वापस आउंगा' – माणसातल्या प्रेम, वेदना आणि संवेदनशीलतेची गोष्ट

  • संकलित
  • 11.07.26
  • वाचनवेळ 19 मि.
main wapas aaunga

इम्तियाझ अली दिग्दर्शित 'मैं वापस औउंगा' या हिंदी सिनेमाची मागील महिनाभरात बरीच चर्चा आहे. फाळणीची वेदना सांगणारा हा सिनेमा बरंच काही देऊन जातो, मनात एक हुरहूर ठेवून जातो,असं प्रेक्षक म्हणताहेत. त्यापैकी काही निवडक रसिकांचं म्हणणं खास युनिक फीचर्स पोर्टलच्या वाचकांसाठी..

माणुसकी शिकवणारा सिनेमा - डॉ प्रज्ञावंत देवळेकर 

आजच्या काळात सिनेमा म्हणजे अनेकांच्या मते दोन-अडीच तासांची करमणूक. मोठाले सेट,वेगवान संपादन,कानठळ्या बसवणारे संवाद आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारी दृश्ये. पण कधी कधी एखादा सिनेमा येतो जो करमणूक करत नाही; तो तुमच्या छातीत एक वेदना ठेवून जातो. पडदा काळा झाल्यानंतरही जो संपत नाही..

इम्तियाझ अली दिग्दर्शित आणि तुलनेनं अल्पचर्चित राहिलेला ‘मैं वापस आऊंगा’हा असाच एक सिनेमा आहे..

हा सिनेमा पाहताना लक्षात येतं, की काही जखमा शरीरावर नसतात. त्या नकाशावर असतात. इतिहासाच्या पुस्तकात असतात. आठवणींमध्ये असतात आणि काही वेळा त्या इतक्या खोलवर असतात की माणूस मरणाच्या दाराशी जाऊन उभा राहतो तरी त्यातून ‘मुक्त’ होऊ शकत नाही.

चित्रपटातील नसिरुद्दीन शाह यांचं वृद्ध,डिमेन्शियाग्रस्त पात्र पाहताना अभिनय म्हणजे नेमकं काय असतं याची पुन्हा जाणीव होते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे मोठमोठे संवाद नाहीत. नाट्यमय हालचाली नाहीत. बहुतेक वेळ ते अंथरुणावर पडलेले आहेत. नाकात नळ्या आहेत. शरीर साथ सोडून बसलेलं आहे पण डोळ्यांत एक प्रतीक्षा आहे. एक अपूर्ण प्रवास आहे आणि एक न संपलेली वाट पाहणं आहे.

अभिनयाचा खरा कस संवादात नसतो;तो शांततेत असतो. नसिरुद्दीन शाह त्या शांततेलाही बोलकं करतात.

चित्रपटात नायक आणि खलनायक कुणी एक नाही. जे आहे ते आहे परिस्थिती; अर्थात देशाची फाळणी..

१९४७ मध्ये सर सिरिल रॅडक्लीफ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या नकाशावर अवघ्या काही दिवसांत मारलेली ती एक रेघ.

नकाशावर ती फक्त शाईची रेघ होती.पण प्रत्यक्षात?

ती लाखो घरांच्या मधून गेली. भावंडांच्या मधून गेली.

प्रेमिकांच्या मधून गेली. आठवणींच्या मधून गेली.

आणि लाखो लोकांच्या जिवंत आयुष्यातून गेली.

सीमारेषा आखणाऱ्यांसाठी तो प्रशासकीय निर्णय होता;पण त्या रेषेच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्यांसाठी तो आयुष्यभर वाहणारा रक्तस्त्राव होता.

चित्रपटातील एक संवाद अक्षरशः काळीज चिरून जातो,"औरतों का मजहब पता नहीं चलता, इसीलिए पहले मर्द बॉर्डर पार जायेंगे..."

main wapas aaunga inside

पहिल्यांदा ऐकताना हा संवाद साधा वाटतो. पण पुढं त्याचा अर्थ उलगडतो. पुरुष आधी गेले. स्त्रिया मागं राहिल्या आणि मग? त्यांचं काय झालं?

इतिहासाच्या पुस्तकांत त्या प्रश्नाचं उत्तर सहसा सापडत नाही पण या चित्रपटात त्याचं उत्तर शब्दांत नाही तर वेदनेत मिळतं..

फाळणीच्या आकडेवारीत लाखो लोक विस्थापित झाले,हजारो मारले गेले. इतकंच लिहिलेलं असतं पण त्या आकड्यांच्या मागे किती स्त्रिया होत्या? किती आयुष्यं अर्धवट राहिली? किती जणींची नावंसुद्धा इतिहासात नोंदली गेली नाहीत. 

हा सिनेमा त्या विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांच्या वेदनेलाही आवाज देतो कदाचित, म्हणूनच अनेकांना हा चित्रपट संथ वाटेल, रटाळ वाटेल- 'काही घडतच नाही'असंही वाटेल.

विशेषतः आपल्यासारख्या सीमेपासून दूर राहणाऱ्यांना.

कारण आपण फाळणीचा धूर पाहिलेला नाही. आपल्या घराचे दोन तुकडे झालेले नाहीत. आपल्या अंगणातून सीमा गेलेली नाही. आपल्या आजोबांची जन्मभूमी एका रात्रीत परदेश झालेली नाही त्यामुळे हा सिनेमा समजण्यासाठी इतिहासाचं ज्ञान पुरेसं नाही; गरजेचंय थोडंसं संवेदनशील मन..

चित्रपटातील सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे एक प्रश्न- एखादा माणूस मरत का नाही? स्ट्रोक मागून स्ट्रोक येतात,शरीर थकून जातं,आयुष्याचा प्रवास संपलेला असतो.तरी जीव अडकून राहतो तो का?

वैद्यकीय भाषेत याचं उत्तर देता येईल पण मानवी भाषेत?

कदाचित काही अपूर्ण गोष्टी माणसाला जाऊ देत नाहीत.

काही भेटी बाकी राहतात. काही निरोप बाकी राहतात.

काही घरे बाकी राहतात. काही माणसं बाकी राहतात.

आणि कधी कधी एक संपूर्ण जन्मभूमी बाकी राहते..

हेही वाचा - होमबाउंड : भारतातील जातपात आणि रोजगार वास्तवाचं नेमकं चित्रण

इम्तियाझ अलीचं दिग्दर्शन इथं विलक्षण संवेदनशील ठरतं.तो प्रेक्षकाला रडवण्यासाठी प्रसंग रचत नाही. भावनिक ब्लॅकमेल करत नाहीत.तो फक्त एक माणूस दाखवतो. त्याची प्रतीक्षा दाखवतो. त्याच्या स्मृतींचे तुकडे दाखवतो आणि बाकीचं काम प्रेक्षकाच्या हृदयावर सोपवतो.

चित्रपटाचा शेवट येतो तेव्हा डोळे पाण्याने भरलेले असतात. 

कारण तेव्हा लक्षात येतं हा फक्त एका वृद्ध माणसाचा प्रवास नव्हता. तो लाखो विस्थापित लोकांचा प्रवास होता.

तो त्या लोकांचा होता ज्यांची घरं हरवली. ज्यांची माणसं हरवली. ज्यांचा देश हरवला आणि ज्यांचं संपूर्ण भावविश्व एका अनोळखी अधिकाऱ्यानं नकाशावर ओढलेल्या एका रेषेमुळं उद्ध्वस्त झालं.

आजच्या उथळ मनोरंजनाच्या काळात हा सिनेमा पाहण्याचं कारण त्याची कथा नाही, कारण आहे त्याची माणुसकी.

'कला' म्हणजे काय असते? माणसं नेमकी कशी असतात?

आणि ती अनेकदा आपल्या आकलनाच्या पलीकडं जाऊन का वागतात? हे समजून घ्यायचं असेल तर 'मैं वापस आऊंगा' जरूर पाहावा.

कारण काही चित्रपट पाहून वेळ जातो. काही चित्रपट पाहून विचार सुरू होतात.

आणि काही चित्रपट पाहून आपल्या आत कुठंतरी एक वेदना कायमची घर करून बसते..

'मैं वापस आऊंगा' हा त्या तिसऱ्या प्रकारातला सिनेमा आहे !

निर्वासितांच्या भावनांचा संवेदनशील हुंकार असलेला सिनेमा - मेघना भुस्कुटे 

१ 

'मैं वापस आउंगा'बघताना खूप काय काय डोक्यात येत राहिलं. डोळ्यांवाटे वाहत राहिलं. पहिलं प्रेम.आपल्या गावाबद्दल वाटणारं-शब्दात न मांडता येणारं प्रेम. न मिळालेली क्लोजर्स. फाळणी-निर्वासित-दंगली या शब्दांचे झिजून बोथट-निरर्थक झालेले दगड आणि त्याखाली पुरल्या गेलेल्या असू शकतील अशा भळभळत्या जखमा. 'गर्म हवा','पिंजर', 'खामोश पानी', 'नसीम', '१९४७ अर्थ', 'इक्किस'... असे कितीतरी सिनेमे. 

सिनेमाची गोष्ट साधीशी आहे. फाळणीनंतर पाकिस्तानात राहिलेलं गाव सोडून आलेला एक निर्वासित पोरसवदा तरुण आता मरणाच्या वाटेवर आहे.पण काहीतरी त्याला थांबवून धरतं आहे. ते काय, हे त्याचा नातू शोधू बघतो. बस. पण तो सिनेमा फक्त भारत- पाकिस्तानच्या फाळणीची वेदना सोसणाऱ्या माणसांचा उरत नाही. तो जगभरातल्या सगळ्याच निर्वासितांचा होऊ बघतो.

नसीरच्या भूमिकेत आणि 'रॉकी और रानी की...'तल्या धर्मेंद्रच्या भूमिकेत किंचित साम्य आहे. पण धर्मेंद्रची भूमिका किती कार्टूनिश आणि नसीरनं त्या भूमिकेचं काय सोनं केलंय. मृत्युशय्येवरचा तो वृद्ध एकदाही, सत्य-भासाच्या सीमेवर बरळत असतानाही हास्यास्पद होत नाही. करुण-अगतिक वाटतो. हे नसीरचं श्रेय आहे, तसं इम्तियाज अलीचंही आहे.

नसीरची अगतिक नजर लक्षात राहते, तसे वेदांग रैनाचे - अहं, कीनूचे टपोरे, निरागस, उत्कट डोळेही लक्षात राहतात. विसरू म्हणता विसरता येत नाहीत.

२ 

'मैं वापस आउंगा' मनातून जायला तयार नाही. वेगवेगळ्या संदर्भात तो आठवत राहिला आहे. त्या सिनेमातली कीनूची वेदना त्याच्या प्रेमिकेपासून दुरावल्याची आहे वरकरणी. पण खरंतर तो त्याच्या वेदनेला त्याच्या अंतर्मनानं दिलेला चेहरा आहे. त्याची हक्काची जी भूमी आहे, तिथून तो उखडून फेकला गेला आहे. ध्यानीमनी नसताना, अत्यंत हिंसक पद्धतीनं, इतर अनेक दुःखांच्या, असुरक्षिततेच्या आघातांसह. त्या सगळ्या अनुभवाचं एकीकरण त्याच्या मनानं जियावर केलं आहे. त्यामुळेच त्याच्या मनात इतक्या तीव्रतेनं ती अखेरपर्यंत रुतून बसली आहे. त्याला तिच्यापासून सोडवून घेता येत नाही, मरेस्तोवर. नातू तिच्या घरी पोचतो तेव्हा तेव्हा ती मरून गेली आहे, हे त्या दृष्टीनंही काव्यात्म न्याय व्यक्त करणारं. कारण तिच्या शरीराशी कीनूचे बंध नाहीतच. ते त्याच्या अंतर्मनातल्या जियाशी आहेत, त्याच्या मातीशी, त्याच्या घराशी आहेत. 

main wapas aaunga inside

फाळणीची वेदना हा शब्दसमुच्चय कितींदा तरी ऐकला आहे, आता झिजट-बोथट झाला आहे. पण ध्यानीमनी नसताना, आपल्याच देशाच्या स्वातंत्र्याच्या आनंदप्रसंगी आपल्याच मातीतून इतक्या हिंसक प्रकारे निघावं लागण्याचं,प्रियजनांना आणि आपल्या हक्काच्या गावा-घरा-मातीला पारखं व्हावं लागण्याचं दुःख किती असेल,कसं असेल,ते लोकांनी कसं पचवलं असेल, या विचारानं अक्षरशः झोप लागली नाही. शांताबाई गोखल्यांच्या एका मुलाखतीत त्या सांगतात. इंग्लंडात त्यांचा प्रियकर होता,भाषेचं उत्तम शिक्षण, संधी... सगळंच होतं. पण त्यांना मायदेशी परतण्यावाचून चैन पडत नव्हतं, प्रियकराचं प्रेमही त्यांना थांबवू शकलं नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर देशप्रेम हा फारच मोठा शब्द आहे. पण याचं दुसरं वर्णन काय करावं बरं? परत जाण्याला पर्याय नव्हता. गौरी देशपांडेच्या एका कादंबरीतली नायिकाही हे बोलून दाखवते. एलकुंचवारांनी एका लेखात 'मला माझ्या गावातून उपसून फेकून दिलं आणि मी बेशरमाच्या झाडासारखा निष्प्रेम वाढलो, पण रुजलो नाही' अशा आशयाचं लिहिलं आहे. त्यानं चिरफाळून जायला झालं होतं. एम. एफ. हुसैनसारख्या, या मातीतल्या, या सरस्वतीच्या, माधुरी दीक्षितच्या, पंढरपूरच्या, हिंदी सिनेमांच्या पोस्टर्सच्या, मुंबईच्या संस्कृतीत अंतर्बाह्य रुजलेल्या माणसाला आपण निर्वासितासारखं देशोधडीला लावलं, यानं शरमिंद वाटतं. अजूनही.

मी काही वर्षं बेंगलोरला नोकरी केली. उराशी त्या वयातल्या प्रेमभंगाची सल होती.पण तेव्हाही आपण या दुःखातून सुटायला आपल्या गावातून उखडून फेकल्यासारखे बाहेर पडलो, हे सतत दुखत राहिलं. तिथे मन रमलं नाही. निरर्थक वाटत राही. तसा देश तर माझाच होता. मित्र-मैत्रिणी होते, काम होतं, माणसंही जवळच तर होती. पण भाषेत, गावात, माणसांत, माझ्या नाटका-सिनेमा-पुस्तकात परतून आल्यावाचून गोड लागत नव्हतं. हे कुणाला समजावून तरी कसं सांगणार? लोकांना हे उगंच कढ काढू वाटू शकतं याचं भान होतं. म्हणून मनाशी ठेवलं. 

परवा सिनेमा बघताना हे सगळं भळभळून वाहत राहिलं. माणसांना त्यांच्या म्हटलेल्या, त्यांच्या मातीतून असं हुसकू नये कधी कुणी. 

३ 

पहिल्या आठवड्यात फारसा न चाललेला सिनेमा नंतर धोधो चालू लागल्याची उदाहरणं आपल्याकडे चिक्कार आहेत. पण 'मैं वापस आउंगा' त्यात जाऊन बसला यानं फार बरं वाटतंय. 

कितीतरी ठिकाणी सिनेमाचे खेळच नव्हते. आता निव्वळ लोकांनी केलेल्या प्रसिद्धीमुळे गर्दी वाढून खेळही वाढले आहेत. सिनेमाबद्दल एक प्रकारचा 'बझ्' तयार झाला आहे. लोक त्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलतायत, एकमेकांना सांगतायत, इम्तियाझ अली, रहमान, कामिल आणि अभिनेत्यांच्या कामगिरीवर रिळं करतायत, सिनेमा संपल्यावर सुन्न होऊन अनुभवलेला ठेहराव वर्णन करून सांगतायत. आपापल्या प्रेमाच्या, घराच्या, गावाच्या, देशाच्या आठवणींनी व्याकूळ होतायत,दुसऱ्याचं दुःख कल्पनेतून अनुभवतायत,विद्ध होतायत.

सिनेमा बघता बघता कितीतरी मोठा झालाय. किती ते आज कळणारच नाही. दिग्दर्शक-निर्माते-कलाकारांना तर नाहीच, पण थेटरात बघून येणाऱ्या प्रेक्षकांनाही नाही. अजून वीसेक वर्षांनी त्याच्या यशाची परिमाणं लक्षात येऊ लागतील. 

'धुरंधर', 'छावा' नि 'फाइल्स'सारखे छातीपिटूपट, द्वेष पोसणाऱ्या आणि द्वेषावर पोसणाऱ्या गोष्टी कृत्रिमरीत्या गर्द्या उबवू शकतात. पण प्रेमाची, घराच्या ओढीची, विरहाच्या दुःखाची अस्सल भावना जोवर अवतरत नाही तोवरच. ती अवतरली, दिसली, भेटली की माणसं एकाएकी पशुत्व टाकून परत माणसं होतात असा दिलासा या सिनेमानं दिला आहे. त्यात आश्वासन आहे, धीर आहे. 

थॅंक्यू, इम्तियाज अली. 

मी त्याच्या सिनेमाची चाहती नव्हते कधी. अजूनही, याही सिनेमाच्या बाबतीत एक विसविशीतपणा जाणवतो विणीत. क्लिशे असतात. पसरटपणाही. पण या सगळ्या दोषांपल्याड जाणारं काहीतरी असतं, न थोपवता येणारं असतं हे त्याच्या या गोष्टीनं दाखवलं आहे. त्याकरता थॅंक्यू व्हेरी मच. 

युद्धखोर वातावरणात प्रेमाचा संदेश देणारी कलाकृती - जुई कुलकर्णी 

'मै वापस आऊंगा' नव्हे 'इजाजत'

इम्तियाज अली प्रेमाचं भाषांतर जसं चित्रपट माध्यमात करतो ते लोभस आणि दुखवणारं आहे. या माणसामधे काहीतरी Pure आहे. या माणसाला सूफीझम जाणवला आहे.

या देशाची फाळणी भोगली पंजाब आणि बंगाल या प्रांतांनी.

कुठल्या तरी इंग्रजाने नकाशावर एक काल्पनिक रेषा मारून त्याचं काम उरकून टाकलं आणि लाखो शोकांतिकाचा जन्म झाला.

'मै वापस आऊंगा' ही एक शोकांतिका आहे पण ती खरंतर आहे एक वाट पाहण्याची गोष्ट. 

प्रेम नावाचं जहर एकदा भिनलं की जन्मभर उतरत नाही. पुढच्या जन्मातही ते जहर पाठ सोडत नसेल.

हेही वाचा - प्रेमळ नातेसंबंधांची हळवी बाजू दाखवणारा - साबर बोंडं

१९४७ 

किन्नू म्हणजेच ईशर सिंग (वेदांग रैना) आणि जिया म्हणजे अफसाना(शर्वरी वाघ) यांचं असंच आहे. सरगोदा मधे राहणारे हे दोन प्रेमी जीव. फाळणी डोक्यावर आहे तरी यांचं भाबडं, बालिश, गोंडस प्रेम तसंच आहे. जियाला मात्र भयाची चाहूल लागते आहे की किन्नू सोडून जाईल आणि किन्नू म्हणत राहतो मी जाणार नाही. गेलो तरी परत येईन. आपल्याला आपलं गाव सोडून जावं लागणार असं किन्नूला खरोखरच वाटत नाही. प्रत्यक्ष जावं लागतं तेव्हाही तो परत एकदा येतोच आणि फाळणीनंतर सहा वर्षांनीही परत येतो. तेव्हा त्याला जे दिसतं ते पाहून त्याचं जगणं तिथेच संपतं.एका नवीन कठोर पुरूषाचा त्यातून जन्म होतो. तो एक कठोर व्यावसायिक आणि कठोर बाप होतो.

२०२६ 

दिल्लीत राहणारे व्यावसायिक ईशर सिंग ग्रेवाल (नसीरूद्दीन शाह) ९५ वर्षाचे आहेत. डिमेन्शियाग्रस्त आहेत. सतत ड्रायव्हरला सांगतात सरगोदाला घेऊन चल. देशाची फाळणी झालीय आणि तिथं भारतीय नागरिकाला जाता येणार नाही हे त्यांना समजतच नाही. त्यांचा नातू निर्वैर(दिलजित दोसांज) ब्रिटिश नागरिक आहे. तो आजोबांना शेवटचं बघायला म्हणून इंग्लंडहून येतो.आजोबांच्या चित्रविचित्र गप्पा, सरगोदा, मंगळावरून आलेले मारेकरी, जियाचे उल्लेख, तिला ऐकवायची कविता या जंगलात गुंतून जातो. म्हाताऱ्याचा प्राण कशात अडकलाय त्याचा हा संथ,अस्वस्थ करणारा शोध म्हणजे हा चित्रपट. 

प्रेम अपूर्ण राहिलं तर कदाचित अतीतीव्र होतं. 

आताच्या पिढीने चतुर होऊन असं प्रेम करायची क्षमताच गमावली आहे हेही या चित्रपटात ठळक केलं आहे.

या सगळ्या प्रेम संघर्षाला फाळणीच्या अत्याचारांचं जळजळीत भयाण अस्तर आहे.

चित्रपटाचा पहिला भाग बराच हलकाफुलका आहे.

दुसऱ्या भागात मात्र प्रेक्षक बधीर,निःशब्द होऊन जाईल इतका चटका बसतो.

नसीरूद्दिनसाहेबांच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी ही भूमिका आहे.

वेदांग आणि शर्वरीने अतिशय समजून काम केलंय.

दिलजित कधीही स्वतःतला गायक वर काढत नाही आणि अप्रतिम संयत अभिनय करतो.

फाळणी काय होती ते आपल्या वाडवडिलांनी अनुभवलं नाही. आपल्या पूर्वजांना असं एका रात्रीत बेघर भिकारी व्हावं लागलं नाही.आपल्या घरातील बायांचा असा भयंकर अंत झाला नाही.

पण आपण माणूस तर आहोत. थोडीफार संवेदनशीलता जिवंत असेल तर हा चित्रपट पाहा.

आताच्या युद्धखोर वातावरणात खरंतर ज्यांनी हा चित्रपट पाहायला हवा ते तर हा चित्रपट पाहणार नाहीतच... 

यांच्या घराण्यातील नातवाचं नाव 'निर्वैर' आहे हे भलतंच सूचक आहे.

प्रेमाच्या नशेतला प्रवास उलगडून दाखवणारा सिनेमा - मानसी होळेहोन्नुर 

'मैं वापस आउंगा' बघून दोन दिवस झालेत पण तरीही अजूनही हा चित्रपट आत झिरपत आहे. चित्रपटातली गाणी तर मी लूप वर ऐकत आहे. केवळ नसीरनेच नाही तर सगळ्यांनीच अभिनय उत्तम केला आहे. खरोखरीच मोठ्या पडद्यावर अनुभवण्याचा चित्रपट आहे हा.

हा चित्रपट निव्वळ एक प्रेमकथा नाही किंवा फाळणीची न भरलेली जखमही नाही.हा त्यापलीकडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न आहे. 

प्रेम अगदी आदिम प्रेरणा आहे, त्यामुळेच त्याच्याबद्दल आकर्षण, गूढ सगळेच अजूनही टिकून आहे. प्रेम काय सांगून होत नसतं किंवा करायचं नाही म्हणून थांबवता येत नसतं. ते मिळालं, नात्यात रूपांतरित झाले तर कमी जास्त होऊ शकते पण नात्यात रूपांतरित झाले नाही म्हणून संपले असे मात्र कधीच होत नाही.

प्रत्येक प्रेमाचे कोडे वेगळे असते, कधी ते उलगडते तर कधी ते कोडे आहे हेच मुळी कळत नाही, तर बऱ्याचदा हे कोडे आता सुटतंय असे वाटत असतानाच ते अजून गुंत्याचे होऊन जाते. हा गुंता असतो म्हणूनच आयुष्य असते. 

प्रेमातला रोमँटिसिझम हा बघणाऱ्याला हे किती भारी आहे, याचा अनुभव आपण घ्यायला हवा असे वाटायला लावणारा असतो. तेवढाच तो त्यात असणाऱ्यासाठी दमवणारा, थकवणारा असतो.कारण एकत्र येणं इतकेच त्याचे अंतिम ध्येय नसते, मुळात 'डेस्टिनेशन'पेक्षा 'जर्नी'ला महत्त्व देणारा हा प्रवास असतो. त्यात किती काळ एकत्र होता याला फार महत्त्व नसते तर किती इंटेंसिटीने सोबत होता याला महत्त्व असते. त्यामुळेच तर चार दिवसांच्या सहवासावर आयुष्य ओवाळून टाकायला शिकवणारा 'ब्रिजेस ऑन मेडिसन काउंटी' बघताना दरवेळी डोळे पाणावतात किंवा गौरी देशपांडेचे कालिंदी-दिमित्री अनेकांच्या मनात सुखाने नांदत असतात. 

अशा प्रेम कथा वाचताना, बघताना ते क्षण आपण ते सगळे जगत असतो. मिळालेल्या न मिळालेल्या प्रेमासाठी झुरत असतो,रडत असतो,लढत असतो,पण जगत असतो. त्यामुळेच मैं वापस आउंगा हा काही फक्त किनु,जियाच्या निरोपाचा प्रवास नसतो तो आपल्या सगळ्यांचा प्रेम अनुभवण्याचा, त्यातली नशा जगण्याचा प्रवास असतो!!!

हेही वाचा - ऐवज: सामाजिक भान असलेल्या कलाकाराचा दस्तावेज

फाळणीतील माणसांच्या प्रेमाचा आणि वेदनेचा पाट - लक्ष्मी यादव 

काही सिनेमे आपण जगत असतो. सिनेमातील पात्रांपैकी एक किंवा अनेक होत असतो. 

असाच एक सिनेमा... 'मैं वापस आऊंगा..'

फाळणीतील माणसांच्या प्रेमाचा, मायेचा, विश्वासाचा घाट आणि वेदनेचा पाट!

फाळणीच्या वेळी नेमकं काय काय घडलं असेल त्यातल्या काही शक्यता. यातील काही सीन तर इतिहासात नोंदले असूनही पाहवत नाहीत.

काही सीन मानवाच्या संवेदना गोठवून टाकणारे आहेत.

आईच्या पोटातील बाळ पोट कापून बाहेर काढणं,होत आलं आहे हे. कधी या समुदायाकडून कधी त्या...

तीन आठवड्यात कसं काय देशाची सीमा ठरवली जाऊ शकते. तीही भारतात पहिल्यांदा आलेल्या एका ब्रिटिश माणसाकडून.

कागदावर एक रेष मारली... कशाच्या आधारावर?

आणि देशांची सीमा ठरवली.

फाळणी झाल्यावर लोकांना सांगितलं की रेषेच्या दोन्ही बाजूकडील लोक वेगवेगळ्या देशातील नागरिक आहेत. अचानक!

काय झालं असेल त्या माणसांच्या मनाचं ज्यांना फाळणी नको होती. खरंच फाळणी लोकांसाठी बंधनकारक नव्हती? की होती? दोन देशात वाटलेल्या लोकांच्या भावनांचं काय झालं असेल? विस्कटलेले लोक कधी भेटले असतील का पुन्हा आणि जागवल्या असतील का जुन्या आठवणी? 

देशांच्या सीमेत अडकलेल्या प्रेमाचं काय झालं असेल?

देश आणि धर्मापलीकडील नाती जपणाऱ्या माणसांच्या तुटलेल्या हृदयांच्या कहाण्या कुणी ऐकल्या, लिहिल्या असतील का?

अशा अनेक विचारांचे मोहोळ हा सिनेमा पाहताना मनात उठते.

हा सिनेमा म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांचा प्रवास आहे... सुंदर आणि तितकाच वेदनादायीसुद्धा! प्रेम किती तरल असू शकतं,प्रेमासाठी काय केलं जाऊ शकतं, पुरुष किती सुंदर प्रेम करू शकतो, आतून केलेलं प्रेम तुम्हाला कितीही मोठी आव्हाने, अडचणी अंगावर घेण्याचं बळ देतं, प्रेम जीव लावायला (जीव घ्यायला नाही) शिकवतं...काय नाही या सिनेमात!

ए. आर. रहमान याचं संगीत असलेला सुमधुर जीवनप्रवास..

नसरुद्दीन शाह रुतून राहतो आपल्यात. त्याचे डोळे, त्यातली नजर, आवाज, अव्यक्त भावना. त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट वाटावा एवढा सुंदर अभिनय त्यानं केला आहे.

आपल्या आवडत्या व्यक्तीला, प्रेमाच्या नात्यात दिलेली वचनं पाळायचीच असतात, नाही पाळली तर मुक्त होत नाहीत दोन्ही जीव..वेदनेत तडफडत, वाट पाहत राहतात. असंच आणि आणखी. बरंच काही!

अशा सिनेमांना प्रेक्षक म्हणून साथ द्यायला हवी.

main wapas aaunga inside

गांधींची शिकवण देणारा सिनेमा आणि त्यानिमित्ताने वाचण्याजोगं काही.. - चिन्मय दामले

'मैं वापस आउंगा’बद्दल अनेकांनी भरभरून लिहिलं आहे. उत्तम चित्रपट आहे. पूर्वार्ध जरा विसविशीत असला, तरी उत्तरार्ध अफाट आहे.

चित्रपट पाहून आल्यावर अनेकदा जाणवलेली बाब पुन्हा डाचली. सिनेमातल्या गोष्टी पुरुषांच्या आहेत. त्या पुरुषच सांगतात. बायकांचं काय? ’मैं वापस आउंगा’मधल्या स्त्रिया या पुरुषांच्या संदर्भात अस्तित्व राखून आहेत. त्यातल्या अनेक स्त्रिया सारख्याच दिसतात. त्यांचे पेहराव एकसारखे, केशभूषाही बरीचशी सारखी. या स्त्रिया उच्चवर्गातल्या आहेत. मोठ्या हवेल्यांमध्ये राहतात. त्यांच्या घरांत पाश्चात्त्य वातावरणानं शिरकाव केला आहे. त्यामुळे तत्कालीन पडदा पद्धत न पाळता त्या घरातल्या पुरुषांसमोर आणि समवेत नाचतात. पुरोगामी साहित्यिकांच्या मंचावर आत्मविश्वासानं आपलं लेखन सादर करतात. सायकल चालवतात. पण दोघींचे अपवाद वगळता इतरांची नावंही चित्रपटात कळत नाहीत.

ही नावं आणि ती नावं धारण करणार्‍या स्त्रिया तत्कालीन समाजव्यवस्थेच्या लेखी नगण्य होतेच. ते तसं होतं हे दिग्दर्शकाला सांगायचं आहे की त्यालाही त्या महत्त्वाच्या वाटत नाहीत?

युद्ध असो, फाळणी असो, किंवा पूर, दुष्काळ, बायका अधिक भरडल्या जातात. युद्धात केवळ जमिनी जिंकल्या जात नाहीत,बायकांवर बलात्कारही करावे लागतात. 'अब्रू' नामक प्रकार मौल्यवान वगैरे ठरवल्यानं शत्रूच्या बायकांवर बळजबरी करणं महत्त्वाचं ठरतं.

फाळणीच्या वेळी पुरुषांची घरं तुटली, सुटली, तशी बायकांचीही मागे राहिली. अनेक नातलग दुरावले. त्यांच्यावर बलात्कार झाले. अनेकींनी जीवही दिला. ज्या जगल्यावाचल्या त्यांच्या कथा जाणून घ्याव्या, असं फार कुणाला वाटलं नसेल.

खामोश पानी, बेगम जान, पिंजर, मम्मो अशी सिनेमांची मोजकी उदाहरण आहेत. ऋत्विक घटक यांना बंगालच्या फाळणीचे चटके बसले होते. ते दु:ख, त्या वेदना मेघे ढाका तारा, कोमल गंधार, आणि सुवर्णरेखा या चित्रपटांतून जिवंत झाले.

पुस्तकं त्या मानानं जरा अधिक आहेत.

शॉना सिंग बाल्डविनचं 'व्हॉट द बॉडी रिमेंबर्स'आठवतं. बाप्सी सिध्वाचं 'आईस कॅण्डी मॅन' आहे. उर्वशी बुटालियांनी 'द अदर साईड ऑफ सायलेन्स'मध्ये उत्कृष्ट दस्तावेजीकरण केलं आहे. बायकांनी फाळणीच्या वेळी काय भोगलं, हे त्यांच्या तोंडून ऐकून ते सगळं त्यांनी लिहून काढलं. निसिद हजारी यांच्या 'मिडनाईट्स फ्यूरीज'मध्येही फाळणीत पोळलेल्या स्त्रियांची घरगुती पत्रं आहेत, डायऱ्या आहेत. सुखवंत कौर मान यांच्या 'पार्टिशन'मध्ये फाळणीच्या काळातल्या शेतकरी स्त्रिया आहेत.

कमला भसीन यांचं 'बॉर्डर्स अँड बाउंडरीज'स्त्रियांच्या नजरेतून फाळणीकडे बघतं. एकीकडे देशभक्ती, धर्म वगैरे शब्द आणि त्यांभोवतीचं पुरुषी, हिंसक राजकारण आणि दुसरीकडे या स्त्रियांचं रोजचं जगणं, यांच्यात नक्की मेळ कसा, हा प्रश्न हे पुस्तक वाचताना पडत राहतो.

फाळणी झाली तेव्हा घरं सोडताना अनेक स्त्रियांनी जमेल त्या चीजवस्तू बरोबर घेतल्या. पण घेऊन घेऊन असं कितीसं बरोबर घेता येणार? एखादा दागिना, माहेरून आलेलं एखादं भांडं, कुणाच्या सासूनं लग्नात दिलेला कपडा... उद्ध्वस्त झालेली आणि पुन्हा उभारलेली घरं आंचल मल्होत्रांच्या 'रेमनंट्स ऑफ अ सेपरेशन अँड इन द लँग्वेज ऑफ रिमेम्बरिंग'मध्ये आहेत. यातल्या आज्या, आया, काकवा आणि मावश्या जे मागे राहिलं त्यांचं दु:ख बाळगून खमकेपणानं आपल्या घरातल्या पुरुषांना पुन्हा उभं करतात.

१९४७ साली पंजाबची फाळणी झाली तशी बंगालचीही झाली. भारतीय साहित्य, स्मृती यांत दुर्दैवानं बंगालच्या फाळणीला फारशी जागा मिळालेली नाही. आपल्याला आठवतं ते इंदिरा गांधींनी केलेली बांगलादेशाची निर्मिती. त्याआधीच्या फाळणीची दु:खं अशीच विरून गेली.

हेही वाचा - अबुझमाडचे अनुनाद - जंगलाशी एकतान झालेल्या साध्या सरळ अबुझमाडियांशी नातं जोडणारं पुस्तक

ज्योतिर्मयी देवी यांच्या कादंबरीचं शीर्षक मला फार आवडतं - ’एपार गंगा, ओपार गंगा’. गंगा इथेही आणि तिथेही. सुतारा नावाच्या एका मुलीची बंगालच्या फाळणीच्या काळातली ही कथा आहे. त्याचं इंग्रजी भाषांतर 'द रिव्हर चर्निंग' या नावानं झालं आहे.

सुनंदा सिकदरांच्या 'अ लाईफ लॉन्ग अगो' मधल्या दयामयीला गावात अनेक मुसलमान मैत्रिणी आहेत. पुरुष बॉर्डर, फाळणी वगैरे विषयांवर बोलत असताना, तिची मैत्री मात्र तशीच आहे. पण तिलाही गाव सोडावाच लागतो. मैत्रीणीही मागे राहतात.

'द ट्रॉमा अँड द ट्रायम्फ : जेंडर अँड पार्टिशन इन इस्टर्न इंडिया' हे जसोधरा बागची आणि शुभरंजन दासगुप्ता यांचं पुस्तक आहे. फाळणीच्या काळातला मौखिक इतिहास, डायर्‍या असं काय काय त्यात आहे. अतींद्रिय चक्रवर्ती यांच्या 'पार्टिशन स्टोरीज'मध्ये सीमेचं बंधन झुगारून या देशातून त्या देशात जाणार्‍या काकवा आणि आज्या आहेत. ’देश’ ही संकल्पना, तिच्या अस्तित्वाचे विविध पैलू, आणि स्त्रीत्व यांच्या मेळाचे - विसंगतीचे अनेक दाखले या पुस्तकात विखुरले आहेत. फाळणी झाली आणि या स्त्रियांचा ’देश’ पलीकडे राहिला, यात त्यांची काय चूक? त्यांना आपल्या ’देशा’ची माती, आपल्या देशाची फळं प्रिय. तिथल्या भाताचा सुगंध इथल्या भाताला नाही. पण तो ’देश’ या स्त्रियांना आणि त्यांच्या घराला स्वीकारेल का, ही भीतीही आहेच. या स्त्रिया सहज पलीकडच्या देशात जातात, तिथून भाज्या खुडून आणतात. पण आपल्या आपला वाटणारा ’देश’ आता परका आहे, आणि आपण आता ज्या देशात राहतो, तिथल्या बहुसंख्यांना आपण आपल्या देशाची आठवण काढलेलीही चालणार नाही, ही जाणीव विदारक आहे.

 इंदुबाला भाटेर हाटेल ही बंगाली मालिका होइचोइवर आहे. इंदुबाला नावाची एक स्त्री कलकत्त्यात खाणावळ चालवते. तिचं आजचं आणि भूतकाळातलं आयुष्य म्हणजे ही मालिका. इंदुबाला मूळची पूर्व बंगालातली आहे. तिचाही तिथे एक प्रियकर होता. तो मुसलमान. त्याला मागे सोडून, लग्न करून तिला कलकत्त्यात यावं लागलं. बाहेरख्याली, दारुडा नवरा आणि तिच्या पूर्व बंगालातल्या स्वयंपाकावर सतत टीका करणारी सासू. तिच्या खाणावळीत येणारे ग्राहक, तिची मासेवाली मैत्रीण, तिची कृतघ्न मुलं, आणि कधीच साथ न सोडणार्‍या पूर्व बंगालातल्या आठवणी. या आठवणी तिच्या स्वयंपाकात सहज उतरतात.

बाकी मंटो, इंतिझार हुसेन यांच्या कथा आहेतच.

चित्रपटात दिसणारं पार्टिशन म्यूझियम अमृतसरात आहे, आता दिल्लीतही शाखा आहे. डोळे न ओलावता, हृदयात कळ न उठता हे संग्रहालय बघणं कठीण आहे.

'मैं वापस आउंगा' बघताना पडद्यावर प्रेम, हिंसा, संपलेली निरागसता असं काय काय दिसत राहतं. पण वेगळेच प्रश्नही पडतात. कलाकार, कला, आणि खासगी आयुष्य यांच्यातली संगती कशी लावायची?

दिलजीत दोसांज पडद्यावर दिसला, की त्याच्या गाण्यांमधला ट्रान्सफोबिया आठवत राहिला. शर्वरी दिसल्यावर मुंबईच्या दंगली आठवल्या. शेवटी गाझातली दृश्यं होती. आजच्या काळात इस्रायलनं ठार मारलेल्या हजारो लहान मुलांबद्दल कळवळा व्यक्त केला तरी बहुसंख्यांकडून खिल्ली उडवली जाते, किंवा देशद्रोही म्हणून संभावना होते. अशावेळी ही दृश्यं सिनेमात आणणं फार धाडसाचं आहे. पण इस्रायलचे प्रमुख नेत्यानाहू यांच्यासह इम्तियाझ अलीनं काही वर्षांपूर्वी कौतुकानं फोटोही काढले होतेच.

असो.

चित्रपट उत्कृष्ट आहे. बघितला नसल्यास जरूर बघा.

गांधी आणि काँग्रेस यांच्यामुळे फाळणी झाली, या एवढ्या बोटभर खोट्या आणि ऐकीव माहितीपेक्षा वास्तव बरंच वेगळं होतं. हे वास्तव सांगणारी पुस्तकंही आहेत.

द्वेष उपयोगी नाही, द्वेषामुळे कुणाचंही भलं होत नाही हे गांधी सांगत होते. हा सिनेमाही तेच सांगतो.

संकलित







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results