उत्तराखंड राज्याच्या वरच्या टोकाला भारत, नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर लोकसंख्येने अगदी कमी, पण वैशिष्ट्यपूर्ण अशा रंग समाजाची वस्ती आहे. हा समाज पूर्वापार तिबेट आणि भारत यांच्यामधील व्यापाराचा दुवा राहिला आहे. तिन्ही देशांच्या सीमेवर राहत आल्यामुळे आणि व्यापारासाठी सतत प्रवास करत आल्यामुळे त्यांची संस्कृती आणि परंपरा काहीशा वेगळ्या आहेत. हिंदूंसाठी पवित्र असणारा ॐ पर्वत, तसंच आदि कैलास पर्वत हीच याही समाजाची श्रद्धास्थानं आहेत. पण त्यांच्या श्रद्धेचं रूप वेगळं आहे. ते स्वतःला हिंदू मानतात आणि शंकर हा त्यांचाही देव आहे. पण ते निसर्गाच्या, म्हणजेच हिमशिखरं आणि नद्यांच्या रूपातच त्याची पूजा करतात. पूजेसाठी मूर्ती उभ्या करण्याला आणि मंदिरं बांधण्याला या समाजाचा विरोध आहे.
म्हटलं तर हा छटाकभर समाज. उत्तराखंडमधली त्यांची लोकसंख्या अवघी वीसेक हजार. पण सध्या हा समाज आणि त्यांचं हे म्हणणं चर्चेत आहे. त्याचं झालं असं की कुण्या श्री आदि कैलास ग्रुप ट्रस्टच्या लोकांनी ॐ पर्वतावर तीन टनी शिवलिंग उभं करण्याचा घाट घातला. त्यासाठी त्यांनी ना जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतली, ना स्थानिक रंग समाजाशी संवाद साधला. याची माहिती कळल्यावर रंग समाजातील काही ज्येष्ठ मंडळींनी त्याला कडाडून विरोध केला. त्यात रंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सिंग गुंजियाल, रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी जामन सिंग रौतेला, उत्तराखंडचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेले नृप सिंग नापलच्याल अशा रंग समाजातील प्रतिष्ठितांचा समावेश आहे. या विरोधानंतर जिल्हा प्रशासनाने हे शिवलिंग पर्वतावर घेऊन जाणाऱ्या लोकांना अडवलं आणि परत पाठवलं. त्यामुळे शिवलिंग बसवण्यासाठी विरोध करणारा रंग समाज हिंदूविरोधी असल्याची राळ उठवली गेली.
पण या समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. ॐ पर्वत आणि परिसर आहे तसा अबाधित राहणं ही त्याची पूजा आहे, असं हा समाज मानतो. ॐ पर्वत हीच आमचीही देवता आहे, पण त्याच्या पूजेसाठी आम्हाला शिवलिंगाची किंवा मंदिराची गरज नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. एकदा का शिवलिंग किंवा तत्सम काहीही उभारलं गेलं की थोड्या दिवसांत त्याभोवती कुंपण उभं राहील, त्याच्यासमोर दानपेटी येईल, मग छोटं मंदिर उभारलं जाईल, मग जागा ताब्यात घेतली जाईल आणि मोठ्या मंदिराची उभारणी सुरू होईल, लोकांचा लोंढा यायला लागेल, वर्दळ, अस्वच्छता, अव्यवस्था सगळं वाढेल आणि इथल्या परिसराचा निसर्ग-त्याचं पावित्र्य नष्ट होईल, असं या समाजाला वाटतं. हिमालयात अनेक ठिकाणी मंदिर, तीर्थस्थळं आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते बांधले गेल्याने पर्यावरणाची हानी सुरू झाली आहे. तेच इथेही घडेल, अशी भीती या समाजाला वाटते आहे.
हेही वाचा - भारतात धार्मिक शत्रूभावना वाढतेय?
त्यांच्या या वाटण्याला अनुभवाचा आधार आहे. २०२० पर्यंत ॐ पर्वत आणि आदि कैलास पर्वतांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अतिशय खडतर होता. धारचुलापासून ९०-१०० किलोमीटरचा ट्रेक करून जायला तब्बल सात ते दहा दिवस लागायचे. खोल हिमदऱ्या, उभे कडे, कधीही कोसळू शकणाऱ्या दरडी असे अडथळे पार करत या पर्वतांवर पोहोचणं हीच भक्तीची परीक्षा होती. त्यामुळे तिथे येणाऱ्या लोकांचं प्रमाण मर्यादित होतं. पण २०२०मध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशने इथे रस्ता बांधला आणि तेव्हापासून इथलं जनजीवन बदलून गेलं. त्यानंतर गेल्या वर्षी याच श्री आदि कैलास ट्रस्टने भारत-नेपाळ-तिबेटच्या तिठ्यावर असणाऱ्या काला पानी या स्ट्रॅटेजिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणावर हनुमानाची मूर्ती उभी केली. खरंतर हे ठिकाण सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुलं नाही. पण आता अशा प्रयत्नांमुळे इथलं धार्मिक पर्यंटन वाढलं आहे. त्यामुळे रोजगार वाढला आणि पैशाची आवकही वाढली, हे खरं; पण त्याचबरोबर इथलं पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती धोक्यात आली आहे, असं इथल्या लोकांना वाटू लागलं आहे. त्यामुळे ॐ पर्वत आणि आदि कैलास पर्वतांवर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ न देणं हीच त्यांच्याबद्दलची सर्वोच्च श्रद्धा असू शकते, असं आवाहनही हा समाज बाहेरच्या लोकांना करतो आहे.
दुसरीकडे श्री आदि कैलास ट्रस्टच्या लोकांचं म्हणणं आहे, की आम्ही कोणत्याही हिंदुत्ववादी संस्थेशी संबंधित नसून आदि कैलास यात्रेवेळी भेटलेले साधे भाविक आहोत. पण देशाचे नागरिक म्हणून कोणत्याही भागात आम्हाला आमच्या श्रद्धेनुसार पूजा करण्याची, मूर्ती उभारण्याची परवानगी असली पाहिजे. पण रंग समाजाचा विरोध पाहता त्यांना विश्वासात घेऊनच शिवलिंग स्थापनेचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांच्यातील काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय घडतं ते कळेलच.
हिंदू संस्कृती आणि परंपरा म्हणजे एकच एक नाही, तर देशातल्या अनेक भिन्न परंपरांच्या मिश्रणातूनच ही संस्कृती तयार झाली आहे. त्यातला कदाचित सगळ्यात छोटा तुकडा रंग समाज असेल. पण तोच ही मोलाची बाब सांगण्याचं काम करतो आहे.
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
