आम्ही कोण?
आमची शिफारस 

सारा बेकवेल यांचं 'ह्युमनली पॉसिबल'

  • सई केसकर
  • 30.01.25
  • वाचनवेळ 14 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
humanly-possible-shifaras-header-12-jan-2024

सारा बेकवेल यांच्या ‘ह्युमनली पॉसिबल’ या गाजलेल्या पुस्तकाविषयी. बेकवेल खेळकर शैलीत डिमॉक्रिटसपासून सुरुवात करून बर्ट्रांड रसेलपर्यंत घेऊन येते. ज्या पुस्तकाला शंभर पानी संदर्भ असतात, अशा पुस्तकाचं दडपण येतं. पण साराची शैली प्रवाही आहे. हे लेखन केवळ इतिहासाचं संकलन नसून त्यातून लेखिका ‘माणूस असणं म्हणजे काय?' या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करते

मृत्यूनंतर आपलं काय होतं? पुरातन काळापासून अनेक विचारवंतांनी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

इ.स. पूर्व सहाव्या शतकात अजित केशकंबली नावाचा एक भौतिकवादी होऊन गेला.‘मानवी देह पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या चार मुख्य घटकांपासून तयार झालेला असतो. मृत्यूनंतर पृथ्वी पृथ्वीत विलीन होते; जल पाण्यात; अग्नी अग्नीत; आणि वायू वायूमध्ये. विद्वानांना आणि मूर्खांना मृत्यू सारखाच संपवतो', असं या चार्वाकाच्या अनुयायाचं म्हणणं होतं. केशकंबलीनंतर साधारण १०० वर्षांनी ग्रीसमध्ये डिमॉक्रिटस नावाचा एक भौतिकवादी झाला. त्याच्या मतानुसार ‘सबंध सृष्टीच अगणित अशा अविभाज्य कणांपासून- अणूंपासून- तयार झाली आहे. हे कण एकत्र येऊन या विश्वातले जीव, वस्तू, वातावरण तयार होतं आणि ते जीव, वस्तू नष्ट झाल्यावर हे अणू मुक्त होऊन त्यांपासून इतर गोष्टी तयार होतात. आपला मृत्यू हा आपल्या संवेदनांचा, विचारांचा आणि या सृष्टीतल्या आपल्या अस्तित्वाचाच शेवट असतो.'

मृत्यूनंतर आपलं काय होतं हे इतकं महत्वाचं का असावं, याचं समर्पक वाटावं असं उत्तर एपिक्युरस नावाच्या ग्रीक तत्वज्ञाने दिलं. तोही केशकंबली आणि डेमॉक्रिटससारखाच भौतिकवादी होता. ‘माणसाने जिवंतपणी मैत्रीचा, ज्ञानाचा आश्रय घ्यावा आणि चांगलं अन्न, शरीरसुख यांच्या आस्वाद घ्यावा, पण त्यांच्या आहारी जाऊ नये. आपल्या मृत्यूपश्चात आपण कुठे जाणार, आपल्याला काय शिक्षा होणार याची चिंता करून आयुष्यात अकारण व्याकुळता आणू नये', हा त्याचा मुख्य संदेश होता.

हे विचार त्या काळातल्या धार्मिक सत्तेला अजिबात रुचत नसत. त्यामुळे डिमॉक्रिटस, एपिक्युरससारख्या विचारवंतांचं तत्वज्ञान सामान्य जनतेच्या हातात पडू नये, याची धार्मिक सत्तेद्वारे पुरेपूर काळजी घेतली जात असे. डिमॉक्रिटसच्याच काळातल्या प्रोटॅगोरसनेही ‘माणसाला माणसाच्याच मापदंडाने मोजायला हवं', असं सुचवलं होतं. माणसाला माणसाच्या मापदंडाने मोजण्याच्या या तत्वज्ञानालाच पुढे ‘मानवतावाद' असं नाव रूढ झालं. सारा बेकवेलचं ‘ह्युमनली पॉसिबल' हे पुस्तक याच मानवतावादाच्या ७०० वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतं.

मानवतावाद समजून घेण्यासाठी आधी माणसाची व्याख्या करावी लागेल. आणि माणसाच्या मापदंडाने जगायचं म्हणजे नक्की काय हेदेखील समजून घ्यावं लागेल. आपलं अस्तित्व आपल्या शरीराबरोबरच नष्ट होणार आहे ही जाणीव एकाचवेळी हताश आणि मुक्त करणारी आहे. हताश अशासाठी, की स्वर्गप्राप्तीच्या अपेक्षेने चांगलं वागण्याचा काहीच फायदा नाही. आणि मुक्त करणारी अशासाठी, की आपल्या आयुष्याचा हिशोब आपल्या चितेवरच संपणार आहे. या जाणिवेने माणूस बेबंद, बेछूट वागेल म्हणून त्याला देवाचं भय घातलं गेलं आहे. पण देवाच्या किंवा धर्माच्या काचाविनाही माणूस निस्वार्थीपणाने, प्रेमाने वागू शकतो यातच त्याचं ‘माणूस'पण आहे? की देवाचा आणि धर्माचा काच असूनही, किंबहुना, देवासाठी आणि धर्मासाठी म्हणूनच माणूस अपरिमित हिंसा करू शकतो यात आहे? 'ह्युमनली पॉसिबल' या पुस्तकात असे अनेक प्रश्न उभे राहतात.

बेकवेल नर्मविनोदी, खेळकर शैलीत डिमॉक्रिटसपासून सुरुवात करून आपल्याला बर्ट्रांड रसेलपर्यंत घेऊन येते. सर्वसाधारणपणे ज्या पुस्तकात सतत ‘इ.स.पूर्व सहावे शतक', 'इ.स.तेरावे शतक' अशा नोंदी येतात, आणि ज्या पुस्तकाला शंभर पानी संदर्भ असतात, अशा पुस्तकाचं दडपण येतं. पण साराची शैली प्रवाही आणि विश्लेषणात्मक आहे. हे लेखन केवळ इतिहासाचं संकलन नसून त्यातून लेखिका ‘माणूस असणं म्हणजे काय?' या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करते आणि वाचकही त्या प्रश्नात गुंतून जातात.

2016 साली आलेलं साराचं ‘ॲट द एक्सिस्टेनशियालिस्ट कॅफे' हे पुस्तक दुसऱ्या महायुद्धादरम्यान युरोपात झालेल्या अस्तित्ववादी चळवळीचा इतिहास सांगतं. सार्त्र, काम्यू, सिमोन द बोव्हा या सगळ्या मोठमोठ्या मंडळींमध्ये किती मैत्री होती, त्यांच्या भेटी कुठे व्हायच्या, हे सांगता सांगता ती आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगू लागते आणि आपण आता तत्वज्ञानाबद्दल वाचू लागलो आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही.‘ह्युमनली पॉसिबल'ही अशाच प्रकारे मानवतावादी विचारवंतांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या मैत्रीबद्दल सांगता सांगता मानवतावादाचा इतिहासच उलगडून सांगतं. त्यातल्या रसरशीत वर्णनांमुळे त्या तत्वज्ञांचं मूळ लेखनही वाचावंसं वाटू लागतं. ज्यांना तत्वज्ञानाबद्दल वाचायची इच्छा आहे पण एखाद्या चळवळीबद्दल, शाखेबद्दल अजिबातच माहिती नाही, अशा वाचकांसाठी साराचं लेखन एक उत्तम पहिली पायरी ठरू शकतं.

आजच्या काळात आपण ‘मानवतावाद' म्हणतो, तेव्हा सर्वसाधारणपणे शोषितांबद्दल अनुकंपा बाळगणं, अहिंसेचा पुरस्कार करणं, आपल्यासाठी जे धर्म, जे आचरण, ज्या शरीर आणि मनःस्थिती ‘परक्या' आहेत त्यांच्याबद्दल भीती न बाळगता सहभाव बाळगणं, असं वर्तन डोळ्यासमोर येतं. पण मानवतावादाची खरी व्याख्या कोणती आहे?

टेरेन्स नावाचा एक प्रसिद्ध नाटककार होता. त्याच्या नाटकातला एक संवाद अजरामर झाला आहे: ‘आय ॲम ह्युमन ॲन्ड कन्सिडर नथिंग ह्युमन एलियन टु मी.' (मी माणूस आहे, आणि माणूस असण्यातलं काहीही माझ्यासाठी परकं नाही.) वास्तविक, नाटकात हा संवाद एका अतिशय भोचक व्यक्तिरेखेच्या तोंडी येतो. सगळ्यांच्या आयुष्यात नाक खुपसणाऱ्या या माणसाला जेव्हा लोक ‘तुला काय करायचं आहे? तू तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे!' असा सल्ला देतात तेव्हा त्याला उत्तर म्हणून तो हे वाक्य म्हणतो. त्या विनोदी प्रसंगातून ते वाक्य उचललं गेलं आणि मानवतावादाची व्याख्या करणारं ठरलं. बेकवेलने पुस्तकात अनेक वेगवेगळ्या संदर्भांत हे वाक्य वारंवार वापरलं आहे.

मूळ नाटकातल्या विनोदातही हे वाक्य माणूस असण्याशी नक्कीच विसंगत नाही. एखाद्या भोचक माणसासमोर हतबल झाल्यावर आपणही सहज ‘व्यक्ती तितक्या प्रकृती' असं म्हणून जातोच. पण या वाक्यातून माणूस असण्यातला एक आदिम विरोधाभास अधोरेखित होतो. लोकांवर प्रेम करणारी, त्यांना एकत्र आणून मोठमोठे सकारात्मक बदल घडवणारी, समाजातली समता वाढवण्यासाठी झटणारी माणसंच आहेत. आणि घृणास्पद गुन्हे करणारे, स्वार्थाने, सत्तेच्या हव्यासाने समाजातली तेढ वाढवणारे युद्धखोर ही सुद्धा माणसंच आहेत. त्यामुळे वाचकांना टेरेन्सचं ते वाक्य मनाच्या कोपऱ्यात रुजवूनच मानवतावाद समजून घेण्याची वाटचाल सुरू करावी लागते.

माणूस, माणुसकी, मानवतावाद, मानव्यविद्या या सगळ्या मानवकेंद्री शब्दांचा उगम मानवकेंद्री विचारांतून झाला. मानवतावादासाठी इंग्रजीत वापरला जाणारा ‘ह्युमॅनिझम' हा शब्द मार्कस तुलियस सिसरो नावाच्या इटालियन तत्वज्ञाने पहिल्यांदा वापरला. सिसरोचं लॅटिन भाषेत प्रचंड योगदान आहे. लॅटिनमधले अनेक शब्द, संज्ञा त्याने तयार केल्या आहेत. ‘ह्युमॅनिझम' या शब्दाला जन्म देणारा ‘ह्युमॅनितास' हा शब्द सिसरोने ग्रीक ‘फिलँत्रोपिया' या शब्दावर बेतला. फिलँत्रोपिया या शब्दाचा अर्थ ‘माणसाला माणुसकी देणाऱ्या गोष्टींवर प्रेम करणं' असा घेतला जातो. तर लॅटिनमधल्या ‘ह्युमॅनितास' या शब्दाचा अर्थ ‘माणसाचा गुणधर्म, संस्कृती आणि चांगुलपणा' असा घेतला जातो. दोन्हींत अर्थांत प्रेम आणि चांगुलपणा अध्याहृत आहे, तसाच मानवतावादी असण्यातही चांगुलपणा अध्याहृत आहे.

सिसरोचा अभ्यास तत्वज्ञान, वक्तृत्व आणि भाषेवर केंद्रित होता. माणसाचं माणूस असण्याचं पहिलं व्यवच्छेदक लक्षण भाषाच आहे. जगभरातल्या अनेक भाषिक समूहांनी कधी कुतूहलापोटी, कधी ज्ञानप्राप्तीच्या ध्यासाने, तर कधी निव्वळ आर्थिक फायद्यासाठी एकमेकांच्या भाषा समजून घेऊन एकमेकांशी संवाद साधला. सुरुवातीची अनेक वर्षं मानवाचा अभ्यास भाषेच्या अभ्यासाभोवती फिरत राहिला. मध्ययुगात कॅथलिक चर्चने लोकस्मृतींतून ज्या तत्वज्ञांना आणि लेखकांना पुसून टाकायचा प्रयत्न केला, त्यांची हस्तलिखितं मिळवून ती पुन्हा प्रकाशात आणण्याचं काम मानवतावाद्यांनी केलं. यात फ्लोरेन्स शहरातले पेत्रार्क आणि बोकाच्यो आघाडीवर होते. सिसरोची वक्तृत्वशैली, त्याची अलंकारिक भाषा साहित्यात पुन्हा वापरली जावी यासाठी या दोन मित्रांनी अथक प्रयत्न केले. सुरुवातीला उल्लेख झालेल्या डिमॉक्रिटस, एपिक्युरससारख्या तत्वज्ञांची हस्तलिखितं दुर्मिळ तर होतीच, शिवाय ती ग्रीकमध्ये होती. तेराव्या शतकातल्या पश्चिम रोमन साम्राज्याला ग्रीक भाषेची भीती होती. त्यामुळे तिचा वापर कमी झाला होता. ग्रीकवर प्रभुत्व असणारे लोकही दुर्मिळ होते. अशा परिस्थितीत पेत्रार्क आणि बोकाच्यो झपाटल्यासारखे ही हस्तलिखितं गोळा करायचे आणि स्वतःच्या हस्ताक्षरांत त्यांच्या प्रति तयार करायचे. छापखाने यायच्या आधीच्या काळात हे काम किती मेहनतीचं असेल याची आज नक्कीच कल्पना करता येईल. जंग जंग पछाडून गोळा केलेल्या या हस्तलिखितांवर पेत्रार्क आणि त्याच्या समकालीन मानवतावाद्यांनी नव्याने टिप्पणी केली. त्या तत्वज्ञानाचा वापर स्वतःच्या लेखनात केला. वेगवेगळ्या वैचारिक भूमिकांची तुलना होऊ लागली, चिकित्साही होऊ लागली.

एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी सबळ पुरावा हवा, हा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे मानवतावादी खरंतर सुरुवातीला हे तत्त्व देवाला आणि चर्चला लावू बघत होते. पुस्तकात याचा एक रोचक दाखला दिलेला आहे. आठव्या शतकात ‘डोनेशन ऑफ कॉन्स्टॅन्टिन' नावाचं एक प्रसिद्ध फर्मान लिहिलं गेलं. त्या फर्मानात असं लिहिलं होतं, की चौथ्या शतकात कॉन्स्टॅन्टिन नावाचा एक रोमन सम्राट होऊन गेला; त्याचा महारोग दैवी चमत्काराने बरा झाला म्हणून त्याने आपल्या साम्राज्याचा पश्चिम भाग पोपला देऊन टाकला. ते फर्मान प्रसिद्ध झाल्यानंतर पुढे तब्बल सातशे वर्षांनी म्हणजे पंधराव्या शतकात लॉरेंझो वाल्ला नावाच्या मानवतावाद्याने फर्मानात वापरलेल्या लॅटिन शब्दांचा शोध घेतला आणि ते शब्द कॉन्स्टॅन्टिनच्या काळात वापरलेच जात नव्हते, म्हणजेच ते फर्मानच बनावट होतं, हे दाखवून दिलं. ही ‘फेक न्यूज' उजेडात आणणं अर्थातच त्याला त्या काळातही महागात पडलं! पण त्याचं व्यक्तिमत्वच असं होतं, की त्याला अशा वादांतच समाधान मिळत असे. स्थळ, काळ, संबंधित व्यक्ती आणि त्यांची त्यावेळची स्थिती या सगळ्याचा विचार करून समोर आलेल्या दस्तावेजाची चिकित्सा करण्याची पद्धत वाल्लानेच रुजवली.

अनेक शतकं ‘मानवतावाद' हीदेखील गोऱ्या, युरोपीय पुरुषांसाठी असलेली संकल्पना होती. स्त्रिया, गुलामगिरीत असलेले कृष्णवर्णीय लोक आणि समलिंगी व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा किंवा अधिकारांचा फार विचार होत नसे. याबद्दल सांगताना बेकवेल अनेक उदाहरणं देते. पण त्यातलं डोरोथी सेयर्सचं उदाहरण मला विशेष उल्लेखनीय वाटतं. १९३८मध्ये डोरोथी सेयर्स या लेखिकेने ‘आर विमेन ह्युमन?' (बायकांना ‘मानव' म्हणता येईल का?) अशा शीर्षकाचा निबंध लिहिला. त्यात तिने वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. उदाहरणार्थ, बायकांनी तुमानी घालाव्या का? तिने याचं उत्तरही दिलं- ‘त्यांना ज्या कपड्यांमध्ये मोकळं वाटेल आणि सहज हालचाल करता येईल ते कपडे त्यांनी घालावेत.' हे त्या काळात विशेष महत्त्वाचंदेखील होतं, कारण स्त्रियांची वस्त्रं अशी असायची की त्यांना ती अंगावर चढवल्यावर नीट बसताही यायचं नाही. पण हा प्रश्न जरा दुय्यम मानला तरी, 'स्त्रियांनी विद्यापीठात शिकावं का?' या प्रश्नालादेखील ‘स्त्रियांना. ॲरिस्टोटल शिकण्याची इच्छा नसते' असं उत्तर स्त्रियांच्या वतीने पुरूषच द्यायचे. त्या काळी स्त्रिया विद्यापीठात जाऊन शिकू शकायच्या, पण त्यांना पदवी मिळायची नाही. सेयर्सला १९१५ साली पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल १९२० साली अधिकृत पदवी बहाल करण्यात आली. ‘बायकांना नेमकं काय हवं असतं?' या आजही विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला सेयर्सने समर्पक उत्तर दिलं: ‘एक माणूस म्हणून पुरुषाला जे काही हवं आहे तेच स्त्रीला हवं आहे. गुंतवून ठेवणारं काम, सुख उपभोगण्याचं वाजवी स्वातंत्र्य आणि भावनांचा निचरा करण्याचा मार्ग! पुरुषांना जे मोकळं आकाश मिळतं त्याच आकाशाखाली आम्हाला वावरायचं आहे. ‘आमच्यासाठी' म्हणून तयार केलेलं छोटंसं घुमट नको आहे.'

पुन्हा काही शतकं मागे जाऊ. मानवाची भाषा, मानवाची नैतिकता, त्याच्या पृथ्वीवरील अस्तित्वातल्या त्याच्या वर्तनावर कुणाचा अंकुश असावा- दैवी शक्तीचा की त्याच्या विवेकाचा - या अशा प्रश्नांची उत्तरं शोधत असतानाच, माणसाला त्याहीपेक्षा भौतिक अशा मानवी देहाबद्दल कुतूहल वाटू लागलं. एखाद्याची शारीरिक वेदना कमी किंवा बरी करण्यापेक्षा अधिक मानवतावादी काय असू शकेल? वैद्यकशास्त्राचा अभ्यास पुरातन काळापासून सुरूच होता. हिपोक्रॅटीज, दियोस्कोरिदेस, गॅलेन, राझेस आणि अविसेना अशा ग्रीक आणि अरबी वैद्यकशास्त्रज्ञांची हस्तलिखितं अनेक भाषांत भाषांतरित झाली होती. पण तिथेही भाषेचा अडसर, प्रत्यक्ष आणि नवीन प्रयोगांचा अभाव अडचणीचा ठरत होता. मध्ययुगातलं वैद्यकशास्त्र अंधश्रद्धा आणि अपुऱ्या अभ्यासावर बेतलं होतं. रोग बरे करण्यासाठी आधी मानवी शरीराचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे असं त्याकाळच्या वैद्यकशास्त्रज्ञांना वाटू लागलं. पण मानवी शरीराचं विच्छेदन करून असा अभ्यास करणं ही अशक्यकोटीतली बाब होती. तसं करण्याला सगळ्याच धर्मांचा आणि राजकीय सत्तांचा विरोध होता. तेराव्या शतकाच्या शेवटाकडे शल्यचिकित्सक बंडखोरी करून मृतदेह मिळवू लागले. फाशी दिलेले गुन्हेगार मिळवून आपल्या विद्यार्थ्यांना ते शरीरशास्त्राची प्रात्यक्षिकं करून दाखवू लागले. मायकल अँजेलो, लिओनार्दो दा विंची यांसारख्या दिग्गजांचाही याला पाठिंबा होता आणि त्यांनी स्वतः अशी शवविच्छेदनं केली होती. कालांतराने याची गरज आहे हे अधिकाऱ्यांनाही पटलं. १५९०च्या आसपास इटलीत, पादुआ विद्यापीठात असं शवविच्छेदनगृह बांधण्यात आलं. मध्यभागी असलेल्या खाटेवर तज्ज्ञ शवविच्छेदन करत असत आणि बाजूने बांधलेल्या गॅलऱ्यांतून विद्यार्थी ते बघत असत. त्या इमारतीच्या भिंतीवर लॅटिनमध्ये कोरून ठेवलं आहे : ‘व्हेअर डेथ डिलाइट्स इन हेल्पिंग लाइफ.' (जिथे मृत्यू जगणं सुसह्य करतो.)

विज्ञानाचा असा अभ्यास सुरू झाल्यावर पंधराव्या आणि सोळाव्या शतकांत रोमन चर्चला पाठोपाठ धक्के बसू लागले. सुरुवातीला भूगर्भशास्त्रज्ञ आले. पृथ्वी सपाट नाही, ती गोल आहे आणि गतिमानही आहे, शिवाय ती बायबलपेक्षा बरीच जुनी आहे, याचे पुरावे ते देऊ लागले. त्यानंतर जीवाश्मशास्त्रज्ञ नामशेष झालेल्या प्राण्यांचे अवशेष दाखवू लागले. माणूस माकडापासून हळूहळू तयार झाला असावा याचा पुराव्यांसहित अभ्यास होऊ लागला. डार्विनने या अभ्यासाला साजेसा असा कळस दिला. हे सगळं ‘देवाने सृष्टी तयार केली आणि मग शेवटी सगळ्यात प्रगत अशी कलाकृती म्हणून माणूस तयार केला' या संकल्पनेच्या विरुद्ध जाणारं असल्याने रोमन चर्चला ते असह्य होऊ लागलं! रेनेसॉन्स काळात चर्चने शास्त्रज्ञांवर केलेल्या अत्याचारांबद्दल अनेकांना माहिती असेल. सुरुवातीला भाषा, नैतिकता, माणुसकी, प्रेम, सहभाव अशा मानवी वर्तनांत घुटमळणारा मानवतावाद आता मानवाच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या आजूबाजूच्या सृष्टीबद्दलही अधिक चिकित्सक झाला.

भाषा, कला, वक्तृत्व आणि विज्ञान यांच्या आधाराने जणू मानवता अंधारातून बाहेर पडली. फ्रेंच भाषेत या चळवळीला ‘ल्युमिएर' (प्रकाश) असा शब्द वापरला जाऊ लागला. धर्माच्या, अंधश्रद्धेच्या आणि सरंजामशाहीच्या कचाट्यातून सुटून मुक्त विचार, विवेकवाद आणि विज्ञानवादाच्या आधाराने मानवता एक नवीन जग वसवणार, असा विश्वास वाटावा असा तो काळ होता. धर्म कालबाह्य होईल असं अनेकांना तेव्हा वाटलं असेल.

पण मानवतावाद्यांना नेहमीच बुचकळ्यात टाकणारा एक ‘ब्लाइन्ड स्पॉट' आहे, जो इतिहासात वारंवार येतो आणि पुरोगामी, विवेकवादी लोक त्याबद्दल काहीच करू शकत नाहीत. आधुनिक इतिहासात तसा तो पहिल्यांदा मुसोलिनीच्या रूपात आला. जहाल मुसोलिनी सत्तेत आल्यावर थोडा मवाळ होईल असा विश्वास त्याच्या विरोधकांना वाटत होता. फॅसिस्ट आणि धार्मिक विचारधारांमधलं एक साम्य असं, की या दोन्ही विचारधारांमध्ये स्वार्थत्याग करून आपल्यापेक्षा मोठ्या आणि महत्त्वाच्या संकल्पनेसाठी आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं जातं. देव, देश आणि धर्मासाठी बलिदान करायला माणसं तत्पर असतात. तसं करण्यात त्यांना समूहाची सुरक्षितता मिळते. मुसोलिनीने सुरुवातीला गोळा केलेलं सैन्य वैफल्यग्रस्त तरुणांचं होतं. दिशाहीनतेतल्या भीतीचं रूपांतर सामूहिक असंतोष आणि क्रोधात करण्याचं कसब त्याच्याकडे होतं. त्यानंतर जवळपास १० वर्षांनी सत्तेत आलेल्या हिटलरबद्दलही त्याच्या विरोधकांचे अंदाज चुकले. इरॅसज्मस किंवा डेव्हिड ह्यूमसारख्या मानवतावाद्यांना माणसाचं कलहप्रिय असणं कोड्यात टाकायचं. प्रेम, अनुकंपा, सहवेदना, सहकार्य या तत्वांवर चालणारं जग आनंदी असेल असा विश्वास असणाऱ्या मानवतावाद्यांना माणसाचं हिंसेवर, क्रोधावर असलेलं प्रेम समजू शकायचं नाही. मानवतावाद्यांचं असं खंतावणं बेकवेल प्रभावीपणे मांडते आणि त्यांच्या परिस्थितीचं वाचकांसाठी परखड विश्लेषणदेखील करते.

दुसऱ्या महायुद्धानंतर सबंध युरोपच वैफल्यग्रस्त होता. दोन महायुद्धांदरम्यान झालेली हिंसा, विस्थापितांच्या झुंडी, गरिबी, मूलभूत सुविधांचा अभाव अशा वातावरणातला कमकुवत मानव स्वतःच्या आयुष्याचं कोणत्याही आधाराविना सारथ्य करायला समर्थ नव्हता. व्यक्तिस्वातंत्र्य माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची हमी देत नाही, उलट पूर्णपणे स्वतंत्र असणं व्याकुळता निर्माण करणारं आहे; आपल्या आयुष्याला ठरलेली अशी एक दिशा किंवा अर्थ असत नाही, तो आपल्यालाच निर्माण करावा लागतो; या प्रकारच्या चिंतनाने युरोपातील अस्तित्ववादी चळवळीला जन्म दिला. अविवेकी विज्ञान किती विध्वंस करू शकतं याचं उदाहरण हिरोशिमाने दिलं. ‘मानवजात जिवंत राहील किंवा नाही याचा निर्णय(देखील) आता मानवाच्या हातात आलेला आहे' असं मार्मिक वक्तव्य १९४५ साली जाँ पॉल सार्त्रने केलं. आणि खरंच, आज आपण अशा जगात राहतो जिथे माणूस स्वतःच्याच बुद्धिमत्तेशी स्पर्धा करणारी यंत्रं तयार करू बघतोय.

मागच्या साधारण ३० वर्षांत आपण काही शिकलो असलो तर ते हे, की माणूस कितीही प्रज्ञावान असला तरी त्याने तयार केलेल्या गणिती यंत्रांची भविष्यातली वाटचाल नेहमीच त्याच्या कल्पनेपलीकडची ठरली आहे. आजचं तंत्रज्ञान आपल्याला घरात एकटं राहूनही एखाद्या मोठ्या समूहात असल्याचा आभास मिळवून देतं. ३० वर्षांपूर्वी जे जे गट, कंपू आपल्या खऱ्या आयुष्यात, हाडामासाच्या माणसांनी तयार झाले होते, ते सगळे तसेच, किंबहुना आणखीन विखारी स्वरूपात आपण आंतरजालावर तयार करण्यात यशस्वी झालो आहोत! तंत्रज्ञान जितकं प्रगत तितकं ते चांगलंच, या भाबडेपणातून निदान माणूस आज तरी बाहेर आला असावा. कदाचित, यंत्रांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या माणसाला पुन्हा एकदा मानवी तर्कशक्ती, मानवी नैतिकता, मानवी प्रेम आणि मानवी सर्जनशीलतेसाठी एक नवीन क्रांती घडवून आणावी लागेल.

समूहांत राहणं ही मानवी प्रवृत्ती आहे आणि एखादी अदृश्य शक्ती आपल्याला सुरक्षित ठेवते ही भावना असे समूह तयार करण्यासाठी पूरक आहे, कारण ती मानवाची आदिम प्रेरणा आहे. कोणतेही अस्तित्ववादी प्रश्न पडून न घेता एखाद्या मिथकावर विश्वास ठेवून आयुष्य सुखाने जगता येत असेल, तर त्यात काय चूक आहे? पण सगळ्याची उत्तरं शोधून काढण्याची उर्मी हादेखील मानवाचाच गुणधर्म आहे. प्रेम, समता, बंधुता हे मानवी गुणधर्म असले तरी जे जे काही ‘परकं' आहे त्याबद्दल वाटणाऱ्या मूलभूत, अगदी आपल्या गुणसूत्रांत कोरलेल्या भीतीमुळेच सामूहिक हिंसा (शारीरिक आणि वैचारिक) घडत असते.

सारा बेकवेल हिच्याकडे तत्वज्ञानाबद्दल अतिशय सखोल तरीही ओघवत्या शैलीत लिहिण्याचं एक अद्भुत कौशल्य आहे. तिचं लेखन प्राध्यापकी होत नाही, पण ती अवघड मुद्दे ‘सोपे' करण्याचा अट्टहासही करत नाही. तिच्या लेखनातून मिळालेले संदर्भ वापरून वाचक पुढची १० वर्षं त्याच विषयावर अन्य वाचन करू शकेल इतक्या निगुतीने तिने ते गोळा केलेले असतात. ‘ह्युमनली पॉसिबल' पुस्तकही याला अपवाद नाही. पुस्तक वाचून झाल्यावर शेवटी पुस्तकाच्या प्रस्तावनेतल्या वाक्याचीच पुन्हा एकदा आठवण होते: ‘मी माणूस आहे, आणि माणूस असण्यातलं काहीही माझ्यासाठी परकं नाही.''

ह्युमनली पॉसिबल

(सारा बेकवेल)

पेंग्विन रॅन्डम हाऊस

प्रथमावृत्ती : मार्च 2023

सई केसकर | saeekeskar@gmail.com

सई केसकर यांनी रसायनशास्त्रात पीएचडी केली आहे. त्या हौशी लेखिका आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results