शिवसेनेच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त दोन्ही शिवसेनांमध्ये सध्या जोरदार जुंपलेली आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम ऐन तोंडावर असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल सहा खासदार फुटल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर यापुढे फाटाफूट होणार नाही, असं गृहीत धरलं गेलं होतं. पण फोडाफोडीचा सिलसिला संपायला तयार नाही. सहा खासदार फोडल्यानंतर ‘हा तर ट्रेलर आहे' असं शिंदे सेनेकडून म्हटलं गेलं आहे. याचा अर्थ पुढील फूट मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांबाबत असं मानलं जातं. एका अर्थी ठाकरे सेना संपवण्याचा विडाच उचलला गेला आहे असं दिसत आहे.
एकनाथ शिंदे अनेक आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. तेव्हा एक ना अनेक कारणं सांगितली गेली होती. त्यातील किती खरी, किती खोटी हे सगळ्यांनाच माहीत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय पक्ष सोडणं लोकांना पचणार नाही, हे माहीत असल्यामुळे उद्धव ठाकरे कसे घरात बसून असतात आणि नेत्या-कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत वगैरे व्यक्तिगत आरोप केले गेले.
प्रत्यक्षात उद्धव यांनी भाजपसोबत काडीमोड घेणं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापणं अनेकांना पटलेलं नव्हतं. शिवसेनेची घडण ही हिंदुत्ववादी विचारांच्या मुशीतून झालेली असल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहिलो तर आपले मतदार आपल्याला माफ करणार नाहीत, या जाणिवेपोटी शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा गट स्थापन केला गेला. याचा अर्थ आमदारांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी हे पाऊल उचललं होतं. भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न मिळणं हे उद्धव यांना जितकं बोचलं होतं, तसं या आमदारांना टोचत नव्हतं.
हेही वाचा - पक्षांचा कहर, अराजकाला बहर
त्यामुळे उद्धव यांनी भाजपला शह देण्यासाठी जे पाऊल उचललं, त्याला शिंदे गटातील आमदारांची साथ मिळाली नाही. भाजपसोबत गेलो तर अधिक सत्ताही मिळेल आणि पुढे हिंदुत्ववादी मतदारांची मतं मिळण्यातही अडचण येणार नाही, असा त्यांचा होरा होता. त्यासाठीच बाळासाहेबांनी आणि उद्धव यांनी ज्या शिवसैनिकांना आमदार नि मंत्री बनवलं, त्यांनीच शिवसेनेमध्ये बंड तर केलंच शिवाय आपला पक्ष म्हणजेच खरी शिवसेना आहे असा दावाही केला.
या साऱ्या घडामोडीला उद्धव आणि त्यांच्या शिवसेनेने भाषणातून आणि पत्रकार परिषदांतून जोरदार उत्तर वगैरे दिलं, पण लोकांमध्ये जाऊन त्यांना स्वत:च्या पाठीशी उभं करण्यासाठी जवळपास काहीही प्रयत्न केले नाहीत. शिंदे गटातील लोकांना गद्दार, लखोबा लोखंडे, लांडगे वगैरे म्हणण्यातच समाधान मानलं. मुंबई-ठाणे आणि उर्वरित महाराष्ट्रात जुने-नवे शिवसैनिक आपल्यासोबत राहतील, यासाठीही काही प्रयत्न केले गेले नाहीत. महाराष्ट्रातली सत्ता हातून गेल्यानंतर आणि पुढे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतरही त्यात काही बदल झाला नाही. ना महाराष्ट्रभर फिरून सर्वसामान्यांचे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले गेले, ना आंदोलनं केली गेली, ना अन्य काही प्रयत्न केले गेले. येता-जाता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या भाषेत टीका तेवढी चालू राहिली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि पक्षातून गळती होत राहिली.
शिवसेनेची राजकारणाची मूळची शैली आक्रमक आहे, आक्रस्ताळी आहे. आदेशानुसार नेत्यासाठी वाट्टेल ते करणारी आहे. ही शैली बाळासाहेब ठाकरेंनी विकसित केलेली आहे. त्यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी किती राडे केलेले आहेत याची जंत्री मोठी आहे. शिवसेनेचं यश आणि दरारा हा या शैलीमुळेच टिकून होता. मात्र उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व समंजस आहे, सौम्य आहे. ते राडासंस्कृतीतले नाहीत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वापेक्षा त्यांची वैचारिक चौकट प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांशी अधिक मिळतीजुळती आहे. बाळासाहेबांचीही विचारांची चौकट आधी प्रबोधनकारांशी जुळणारी होती. पण भाजपची सोबत धरल्यानंतर त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेला यश मिळत गेल्यामुळे हिंदुत्वाची भूमिका अधिकाधिक टोकदार बनत गेली.
हेही वाचा - दसरा मेळावे ; पण सीमोल्लंघन किती?
पण बाळासाहेबांनंतर शिवसेनेची सूत्रं उद्धव यांच्याकडे आल्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने बदल होत गेला. त्यांनी हिंदुत्वाची सर्वसमावेशक पुनर्व्याख्या करायला सुरुवात केली. अमराठी लोकांबाबतही तुलनेने उदार भूमिका घेतली गेली. त्यांनी मराठवाड्यात आणि विदर्भात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्नही उचलले. मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली. थोडक्यात महाराष्ट्रातला मध्यममार्गी प्रादेशिक पक्ष बनवण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे भाजपविरोधात जाऊन राजकारण करायचं तर काँग्रेस -राष्ट्रवादीसारख्या पक्षांना सोबत घेणं अपरिहार्य होतं. ही बाब शिवसेनेतील हिंदुत्वाच्या आधारेच राजकारण करणाऱ्यांना पचणारी नव्हती. त्यामुळेच पुढचं फुटीचं राजकारण घडलं. एकाअर्थी, शिवसेनेचं स्वरूप बदलण्याच्या प्रयत्नाचा हा अपरिहार्य साइड इफेक्ट होता.
प्रश्न असा आहे, की आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेऊन नवं राजकारण करायचं असेल, तर त्यासाठी पक्ष संघटनेत जबरदस्त उर्जा निर्माण करावी लागते. त्यासाठी लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, माध्यमांमध्ये जावं लागतं, पदयात्रा कराव्या लागतात, दौरे करावे लागतात, रात्रंदिवस पक्ष जिवंत ठेवावा लागतो, लोकांचे प्रश्न उठवावे लागतात, आंदोलनं करावी लागतात, सत्ताधाऱ्यांच्या चुका हेरून त्यांना धारेवर धरावं लागतं. नवे कार्यकर्ते घडवावे लागतात, नवा मतदार वर्ग उभा करावा लागतो. असं सारं करून पक्ष सत्तेवर आणण्याची किमया आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांनी करून दाखवली होती. तेलंगणमधील के. चंद्रशेखर राव यांनीही ते साध्य करून दाखवलं होतं.
बिहारमध्ये तेजस्वी यादव असेल किंवा प्रशांत किशोर असतील यांनीही तीन-पाच वर्षं अफाट मेहनत घेतली होती. राहुल गांधी यांनीही संपूर्ण देशाची उभी-आडवी यात्रा करून आपल्या पक्षाच्या खासदारांची संख्या दुपटीने वाढवली होती. असा कोणताही प्रयत्न शिवसेनेकडून झालेला नाही. म्हणूनच कदाचित आता आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करावा आणि राज्यभर रान उठवावं अशी अपेक्षा शिवसेनेतून व्यक्त होत आहे. उद्धव यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या किंवा तब्येतीच्या मर्यादांमुळे जे आजवर होऊ शकलं नाही ते आदित्य यांनी करावं अशी त्यामागची भावना आहे. आदित्य आणि त्यांच्या सोबतचे नवे शिवसैनिक हे करू शकतील का, मुळात असं काही करावं लागेल हे त्यांच्या गावी आहे का, माहीत नाही.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
