
छत्तीसगडमधील बस्तर-अबुझमाड भागातील अस्पर्श अरण्यात राहणाऱ्या आदिम समाजांच्या जीवनरीती समजून घेण्यासाठी लेखक नरेन्द्र त्या परिसरात जाऊन राहिले होते. ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ या संस्थेच्या संशोधन प्रकल्पासाठी ते त्या भागात गेले होते. ऐंशीच्या दशकातील पहिली पाच वर्षं अबुझमाडमध्ये आणि त्यानंतर २०१३ पर्यंत बस्तरमध्ये असं त्यांचं प्रदीर्घ काळ वास्तव्य होतं. या काळात ते तिथे काळवेळाचा जाच विसरून शांतपणे जगत, अनुभवत, संवेदना टिपत राहिले. त्यांच्या नोंदी, आठवणी नंतर इंग्रजी व हिंदी भाषेत लेखांच्या रूपात प्रकाशित झाल्या. त्यांपैकी काही निवडक लेखांचा संग्रह अनुवादित स्वरूपात या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण ४६ लेख असून पवनार आश्रमावरील एक लेख वगळता इतर सर्व अबुझमाड-बस्तरशी संबंधित आहेत.
यामध्ये वाघ, अस्वल, बिबट्या समोर आल्यावर माणसाचं नेमकं काय होतं, याचं विलक्षण प्रत्ययकारी दर्शन घडतं. यातील मानवी हस्तक्षेप न झालेल्या गूढगंभीर रात्रींची, जीवसृष्टीची, मौन अवकाशाची, ऋतूचक्रांची, पशुपक्ष्यांची वर्णनं वाचताना मनाची बैठक बदलून जाते. आपण आधीचे राहत नाही.
लेखकाला भेटलेले अबुझमाडिया मित्र, वनविभागाचे कर्मचारी, शिक्षक, वैदू, त्यांच्या किस्सेवजा आठवणी, संभाषितं पुस्तकात आहेत. ते संवाद उद्बोधक आहेत. उदाहरणार्थ यातील 'विरक्तीच्या वाटा' या प्रकरणात लेखकाला गुहेत राहणारा एक जोगी भेटतो. लेखक त्याला विचारतो की,”इतकं प्रचंड ज्ञान असूनही मानवी स्थिती वाईटाकडून आणखी वाईट होताना का दिसते?'’
यावर जोगी उत्तरतो की, ‘'ज्ञान आहे पण जागरूकता नाही. ज्ञान विचारांचं असतं. जागरूकता त्यापासून दूर असते.'’
'अबुझमाडिया समाजात स्त्रियांचं स्थान' या प्रकरणातून या संस्कृतीतील स्त्री-पुरुष संबंध निरोगी असल्याचे दिसतात. स्त्रियांविरुद्धचे छेडछाड, बलात्कार यांसारखे आपल्याकडे सर्रास घडणारे गुन्हे तिथे आढळत नाहीत. 'घर: आतलं आणि बाहेरचं' हे प्रकरण अबुझमाडियांच्या घराच्या संकल्पनेबद्दल सांगतं. घराची संकल्पना अशी, की त्यांची साधीसुधी झोपडी म्हणजेच केवळ घर नाही. तर तो फक्त रात्रीपुरता तात्पुरता निवारा. ते लोक असीम अरण्याला आपलं घर समजतात. 'घोटुल' या प्रकरणातून जोडीदार निवडण्याची रीत कळते. ती तथाकथित आधुनिकतेहून चांगली आहे. 'बस्तर आणि आधुनिक व्यापार' या प्रकरणात आर्थिक उदारीकरणानंतरचे बाजारपेठीय परिणाम, तर 'डावं वळण' या प्रकरणात हा प्रदेश माओवाद्यांच्या ताब्यात गेल्यानंतर झालेले परिणाम, यांचा ऊहापोह केला आहे. 'गांधींची प्रस्तुतता' या प्रकरणात समकालीन आदिवासी संवेदनांसंबंधी गांधीविचारांच्या प्रस्तुततेची चर्चा केली आहे. यातील 'नवीन शिव्याशाप' या प्रकरणातून दिसतं, की चारी बाजूंनी होणाऱ्या कोंडीमुळे अबुझमाडिया समाजातील शिव्याशापही बदलत आहेत. पूर्वी आपापसातील भांडणाच्या वेळी दिले जाणारे शिव्याशाप निरूपद्रवी होते. आता भांडण झालं तर 'तुझ्या घराखाली सरकारला खनिज सापडेल' अशा आशयाचा शाप दिला जातो. यातच सगळं आलं!
पुस्तकातील नोंदी, निरीक्षणं-स्पंदनं लाजवाब आहेत. वाचण्यापेक्षा जाणण्याची असोशी निर्माण करणाऱ्या आहेत. या नितळ आरशासारख्या नोंदी वाचताना, जीवनाची जाणीव सतत होत राहते. जाणिवेची एक संथ अंतर्धारा आपल्या आत वाहत राहते. त्यामुळे हे काही एका दमात वाचून सुटका करून घेण्यासारखं पुस्तक नाही. ते बराच काळ सोबत करणारं आहे.
यापूर्वी आशुतोष भारद्वाज यांचं 'द डेथ स्क्रिप्ट: ड्रिम्स ॲन्ड डिल्यूजन्स इन नक्सल कन्ट्री', नंदा खरे यांचं 'उद्या', तसंच डॉ. गणेश देवी यांच्या 'वानप्रस्थ' या पुस्तकांच्या माध्यमातून आदिवासी संवेदनांमध्ये डोकावता आलं होतं. ही सगळी पुस्तकं महत्वाची आहेतच; पण नरेन्द्र यांच्या पुस्तकातून एक वेगळेपण असं जाणवतं, की त्यांचं या भागाशी नातं निखळ प्रेमाचं आहे. ते या परिसराशी अगदी संलीन झालेले दिसतात. तिथे दीर्घकाळ वावरल्यामुळे त्यांच्या मनात हे जे समृद्ध अरण्य कायमचं वस्तीला आलंय, त्यात ते आपल्यालाही डुबवून टाकतात. त्यांची भाषा सघन आहे. ते एकेका ओळीत असं प्रचंड काहीतरी सांगून जातात, की वाचता वाचता आपण स्तब्ध होतो. त्यांचा लिखाणाचा प्रवाह शांत, मृदू, अनाक्रमक, अनाग्राही आहे. ते केवळ त्यांनी अनुभवलेलं, त्यांना दिसलेलं सत्य सांगण्यावर भर देतात. तेही नम्रपणे, न दुखावता. शेरेबाजी न करता किंवा जजमेंटल न होता. त्यामुळे हा आशय जास्त भिडतो, अंतर्मुख करतो.
पुस्तकाची बांधणी, आर्किटेक्चर देखणं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला भाषांतरकार अवधूत डोंगरेंचं 'परंपरेचं अरण्य आणि आधुनिकतेचं अभयारण्य' हे ३३ पानांचं टिपण आहे. त्यात त्यांनी पुस्तकाच्या मौलिकतेचा परामर्श घेतला आहे. त्यासंबंधी साधक-बाधक मुद्द्यांची चर्चा केली आहे. डोंगरे स्वतःही चिंतनशील लेखक असल्याने त्यांचं हे टिपण अगदी गोळीबंद उतरलं आहे. या टिपणाचीच स्वतंत्र पुस्तिका व्हायला हवी इतकं ते चिकित्सक आणि वाचनीय आहे. शिवाय हे भाषांतर मन ओतून केलं गेलेलं आहे, हे देखील वाचताना कळत जातं. आपण वाचत असलेला मजकूर भाषांतरित आहे, असं कुठेही जाणवत नाही. एरवी दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेत आलेलं पुस्तक वाचताना बऱ्याचदा नजरेला ओळींची उसवण दिसते, वाचताना त्या ओळी 'खरखरतात', तसा प्रकार यात अजिबातच घडत नाही. ज्याप्रमाणे एखादा निष्णात शल्यविशारद शस्त्रक्रियेनंतरचे टाके लपवतो, त्याच सफाईदारपणे यातील भाषांतरादरम्यानचे टाके लपवले गेले आहेत. यातल्या मराठी प्रतिशब्दांची योजना अगदी चपखल आहे. उदा. ‘चिंताविव्हळता’, ‘आंतरक्रीडा’, ‘भाषाभुरळ’, ‘महाकथन’, ‘रात्रीचा प्रचंडपणा’. अशा शब्दांबद्दल त्यांना दाद दिल्याशिवाय राहवत नाही.
अबुझमाडिया समाज साधा सरळ आहे. आंतरिकदृष्ट्या समृद्ध आहे. त्यांच्या जीवनदृष्टीत कालातीत शहाणीव आहे. ते कमी बोलतात, मोजकं बोलतात. त्यांच्या बोलीमध्ये भारंभार शब्दसाठा नाही. त्यांना वेग आवडत नाही. या पुस्तकातील एका प्रसंगाच्या उल्लेखानुसार, अबुझमाडिया माणूस तीन दिवस रमतगमत चालत जाईल. पण तीन दिवसांचं अंतर दोन तासांत कापणाऱ्या वाहनास प्रांजळपणे नकार देईल.
भणंग दारिद्र्य, आधुनिकतेने आलेले आजार, विकृती यांपासून हा समाज दूर आहे. हाताने तयार केलेली मोजकी अवजारं सोडून इतर कुठल्याही उपकरणांच्या गरजेपासूनही ही माणसं दूर आहेत.
अबुझमाडिया लोक जंगलांवर, सृष्टीवर प्रेम करत जगतात. अनावश्यक प्रश्न पाडून घेत नाहीत. भवतालाशी एकतान होऊन जगणं श्रेयस्कर समजतात. जगणं जशा अमूर्त स्वरूपात समोर येतं तसं ते त्याला सामोरं जातात. हे जगणं चाकोरीला बांधलेलं नाही. कठोर नियमांनी करकचून आवळलेलं नाही. हे निर्भार बागडणं आहे. यात कसल्या डेडलाईन्स नाहीत. गुलामी नाही. कसला मालकीहक्क नाही. साठा नाही. जंजाळ नाही. शोषण नाही.
ही दहा हजार वर्षांपूर्वीची, कृषीपूर्व अवस्था आहे. दहा हजार वर्षांपूर्वी आपण ती वाट सोडून दिली आणि इथवर आलो. एवढे बेसुमार वाढलो, की आता पृथ्वी पुरेना. आपल्या वाट्याच्या भूमीची, नैसर्गिक संसाधनांची धूळधाण करून झाल्यावर आता आपण त्यांना म्हणू पाहतोय, की तुम्हीपण मुख्य प्रवाहात सामील व्हा, म्हणजे जी काही थोडीफार पृथ्वी शाबूत उरलीय तिचीही सगळे मिळून धुळधाण उडवू. हे चांगलं नाही.
आपण आपल्या डिस्टॉर्टेड दृष्टीतून त्यांच्याकडे बघणं बरं नाही. आपल्या कुरूप आधुनिकीकरणाचा बुलडोझर त्यांच्यावर फिरवण्याऐवजी खरंतर हजारो गोष्टी त्यांच्याकडूनच शिकण्यासारख्या आहेत. त्यांना आधुनिक करण्याचा हास्यास्पद खटाटोप सोडून दिला पाहिजे. त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जगत राहता यायला हवं. तसं जगण्याचा त्यांचा हक्क, त्यांचा तो अवकाश अबाधित रहावा, ही प्रार्थना!
त्यांच्या जंगलांवर, तिथल्या संसाधनांपायी गंडांतर आणलं जात आहे. तिथला खुला अवकाश दिवसेंदिवस आक्रसत जातो आहे. डाव्या-उजव्या विचारसरण्यांची आक्रमणं होत आहेत. माओवाद, राज्यसंस्था, कार्पोरेट्स या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सारख्याच परक्या आहेत. ही जवळीक त्यांनी काही मागितलेली नाही. आपण त्यांच्यावर ती लादतो आहोत. या लबाड जवळीकीतून त्यांच्या जीवनरीतीचं मूल्य घटतं आहे. आणि यात कुणाला काहीही चुकीचं वाटत नाही. उलट आपण हे त्यांच्या भल्यासाठीच करतो आहोत असा सगळ्यांचा दावा आहे. त्यांच्या भल्याचाच विचार करायचा असेल तर तिथून सगळ्या 'बाहेरच्यांनी' गाशा गुंडाळणं, हा एकच योग्य पर्याय आहे.
आपण ज्या आधुनिक, ग्लोबल, महानगरी, कार्पोरेट समाज संस्कृतीचे घटक म्हणून जगत आलोय किंवा जगतोय त्याबद्दलच्या सगळ्या धारणा हे पुस्तक वाचताना उलट्या-पालट्या होऊन जातात. देश, समाज, राज्यसंस्था, कुटुंब-व्यवस्था, कायदेकानून, इतिहास, वैद्यकशास्त्र, भाषा, धर्म, बाजारवाद, उद्योग, पैसा, काम, वेतन तसंच सगळ्या ज्ञानसंस्था वगैरेंबद्दलची आपली आजवरची समज घुसळून निघते. आणि हा सगळा गैरजरूरी पसारा विसरून हळूहळू पूर्ण निःशब्द, निरक्षर होत जावं, असं वाटायला लागतं.
तर असं एकूण हे महत्वाचं पुस्तक आहे. संक्षिप्त परिचय इथे लिहिला आहे. पण हे काही खऱ्याचं नाही. पुस्तक मुळातून वाचणं/अनुभवणंच काय ते खरं!
अबुझमाडचे अनुनाद
पपायरस प्रकाशन (जानेवारी २०२५)