
अमोल पालेकर, प्रत्येक कलाकाराला सामाजिक भान असलं पाहिजे व त्यासाठी त्याने किंमत मोजण्याची तयारी ठेवली पाहिजे, हे आयुष्यातील कळीचं सूत्र मानून जगलेला मनस्वी अभिनेता, दिग्दर्शक. ‘ऐवज’ हे त्यांचं आत्मचरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं. त्यावरचा हा शिफारसपर लेख.
अमोल पालेकर हे मराठी व हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीतील एक खंदं व्यक्तिमत्व आहे, हे आपण सर्वजण जाणतो. नुकतंच ‘ऐवज’ हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित झालं आहे. आपला ८० वर्षांचा जीवनपट त्यांनी त्यात उलगडला आहे. हे पुस्तक त्यांनी आपले आईवडील किंवा जिवलग स्नेही किंवा आपल्या एखाद्या सहकाऱ्याला अर्पण केलं असतं, तर त्याचं कोणाला नवल वाटलं नसतं. पण नेहमीच चौकटीबाहेर विचार करणाऱ्या अमोल पालेकर यांनी हे पुस्तक ‘विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांना’अर्पण केलं आहे. यामुळे पुस्तक वाचायला सुरुवात करण्याआधीच हे स्पष्ट होतं, की हे एका मनस्वी, बौद्धिक स्वातंत्र्यावर प्रचंड श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीचं पुस्तक आहे.
अर्पणपत्रिकेतला हा ‘विरोध’ हा केवळ राजसत्ता राबवणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात नाही, तर अन्याय करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील प्रस्थापितांच्या विरोधात आहे. पालेकर जसे राज्यसत्तेच्या विरोधात गेले तसे ते चित्रपटक्षेत्रातील प्रस्थापितांच्याही विरोधात गेले. पण हा केवळ विरोधासाठी विरोध नव्हता, तर त्यांच्या दृष्टीने त्यांच्या विरोधाला ‘विवेकी विचार आणि तथ्य’याची जोड होती. अशा विरोधाची अनेक उदाहरणं या पुस्तकात आपल्याला मिळतात. किंबहुना या पुस्तकाची सुरुवातच मुळी मुंबईच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये २०१९ मध्ये त्यांना जे भाषण करू दिलं नव्हतं त्या घटनेपासून आहे.
आईच्या मनाविरुद्ध केलेलं लग्न, ७५ च्या आणीबाणीच्या विरोधात जाऊन ‘जुलूस’या आणीबाणीविरोधी नाटकाचे महाराष्ट्रभर केलेले जवळ जवळ दीडशे प्रयोग, महेश एलकुंचवारलिखित ‘वासनाकांड’या नाटकावरील सेन्सॉरशिपविरुद्ध १९७४ मध्ये न्यायालयात जाऊन मिळवलेला आदेश, आणीबाणीच्या काळात ‘आक्रीत’या चित्रपटावरील बंदी उठवण्यासाठी थेट पंतप्रधानांकडून मिळवलेला आदेश, १९८३ मध्ये सावरकरांवरील चित्रपट ‘एकांगी व प्रचारकी’होऊ नये यासाठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाला दिलेला नकार, फिल्म इंडस्ट्रीशी फटकून न वागण्याचा शशी कपूर यांच्या सल्ल्याचा अव्हेर, प्रसिद्ध निर्माते बी. आर. चोप्रांविरुद्ध न्यायालयात जाऊन मिळवलेली मानधनाची वसूली, अशा या पुस्तकात नोंद झालेल्या सर्व घटना पालेकरांच्या बंडखोर व मनस्वी वृत्तीच्या द्योतक वाटतात.
एक सुजाण नागरिक म्हणून प्रवाहपतीतांच्या लोंढ्याच्या विरोधात अढळपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे, असं ते समजतात. त्यांच्या विचारांची निरीश्वरवादी बैठक व त्याबरोबर आलेला अंधश्रद्धा-विरोध, दयामरण व इच्छामरण या संकल्पनांना असलेला पाठिंबा, प्रतिगामी मूल्यांना खतपाणी घालणाऱ्या कलाकृतींमध्ये अभिनेता वा दिग्दर्शक म्हणून सहभाग नाकारण्याचं धोरण, समांतर नाट्य व चित्रपटसृष्टीबद्दलचं सखोल प्रेम ही त्यांची स्वभाववैशिष्ट्यं देखील याच वृत्तीची दर्शक आहेत.
या त्यांच्या मूल्यांचं प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतींमध्ये पडलं नसतं तर ते नवलच झालं असतं. मानवी वैषयिकता केंद्रीभूत ठेवून केलेले त्यांचे ‘दायरा’, ‘अनाहत’ व ‘थांग’ हे चित्रपट किंवा महाराष्ट्रातील मानवत हत्याकांडावर आधारित ‘आक्रीत’ हा चित्रपट, र. धों . कर्वे यांच्या जीवनावर आधारित ‘ध्यासपर्व’ हा चित्रपट, हे सर्व त्यांच्या अनवट वृत्तीला साजेसे असेच आहेत.
पालेकरांचं व्यक्तिमत्व वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद यावर आधारित आहे. तरीही आपली कारकीर्द चार अपघातांनी रेखित झाल्याचं ते सांगतात. कोणतीही आखणी वा प्रयत्न न करता ज्या घटनांनी आयुष्याला समूळ कलाटणी मिळते त्या घटना म्हणजे आयुष्यातील अपघात. पालेकर यांच्या आयुष्यात घडलेले चारही अपघात सुखद होते. त्यामुळे त्यांचं आयुष्य अधिकाधिक समृद्ध होत गेलं. चित्रकारीत प्रवेश, चित्रकारीतून अभिनयक्षेत्रात, मग दिग्दर्शन आणि पुढे त्यांची सहचारिणी झालेल्या संध्या गोखले यांचा त्यांच्या आयुष्यातील प्रवेश, हे ते चार अपघात. आयुष्यातील या चारही टप्प्यांवर त्यांना भरघोस यश लाभलं.
अर्थात आयुष्यात काही तत्त्वं वा मूल्यं जपायची तर त्याची किंमत द्यावी लागते. तशी किंमत पालेकरांना पण द्यावी लागली. काही प्रतिष्ठित पुरस्कारांपासून ते वंचित राहिले. त्याची सल त्यांच्या मनात खोल रूजली आहे, हे या पुस्तकातील काही उल्लेखांवरून स्पष्ट होतं.
मूल्यांशी थोडीफार तडजोड करून काम पदरात पाडून घ्यायचं, का मूल्यांशी संपूर्णपणे एकनिष्ठ राहून जे काही काम व यश मिळतं ते स्वीकारायचं, ही शृंगापत्ती अनेक तत्वनिष्ठ व्यक्तींच्या आयुष्यात येते. याचा सामना पालेकरांनाही करावा लागला. उमेदीच्या तत्वनिष्ठतेच्या काळात, १९७१ मध्ये बासू चटर्जींनी त्यांना चित्रपटनिर्मात्याशी व्यवहाराची बोलणी करायला सांगितली, त्याला त्यांनी साफ नकार दिला. त्यामुळे हाताशी आलेली चित्रपटातील मुख्य भूमिका त्यांच्या हातून निसटली. १९८७ मध्ये एका अधिकाऱ्याच्या विधानावर संतप्त होऊन त्यांनी ‘चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे लहान मुलांसाठी काही चांगलं काम करण्याची संधी त्यांना गमवावी लागली. या आपल्या वृत्तीला ते ‘सणकीखोर’ असं संबोधतात, याची गंमत वाटते. आज ते पश्चातबुद्धीने म्हणतात, की ‘सामोपचार, चर्चा, युक्तिवाद करून प्रत्येक छोटी लढाई जिंकता आली पाहिजे.’
पालेकरांचं समांतर रंगभूमीवर अपार प्रेम आहे. मराठी रंगभूमीचा इतिहास केवळ ‘धंदेवाईक’ नाटकांपुरता मर्यादित राहीला आहे, याची त्यांना खंत आहे. उद्याचे नाट्यकर्मी, रसिक आणि अभ्यासक या चळवळीशी अपरिचित राहू नयेत, असं त्यांना मनोमन वाटतं. यासाठीच सत्यदेव दुबे यांचं मराठी समांतर रंगभूमीला असणारं योगदान त्यांना अनन्यसाधारण वाटतं.
पालेकरांच्या अभिनय कारकिर्दीत सत्यदेव दुबे, बासु चटर्जी आणि हृषीकेश मुखर्जी यांचा सिंहाचा वाटा आहे. पुस्तकात या तिघांशीही निगडीत असलेल्या हृद्य आठवणी आहेत. अमोल पालेकरांनी बासु चटर्जींच्या ७ चित्रपटांत, तर हृषीकेश मुखर्जींच्या ४ चित्रपटांत काम केलं. हृषीकेश मुखर्जी पालेकरांना आपले मानसपुत्र मानत. बासुदा आणि हृषीदा या दोघांबद्दल त्यांच्या मनात अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे. हे दोघं आपल्या आयुष्यात आल्यामुळे आपली कलेची जाण प्रगल्भ होत गेली असं ते एका ठिकाणी म्हणतात.
हृषीदांनी एका भेटीत पालेकरांना त्यांच्याकडील व्ह्यूफाइंडर दिला. दिग्दर्शकाला चित्रीकरणासाठी अत्यंत उपयोगी असलेलं हे एक यंत्र. पण पालेकरांसाठी तो मौलिक ऐवज होता. एक अत्यंत समर्पक व हृदयस्पर्शी उपमा देऊन पालेकरांनी या घटनेचं वर्णन केलंय. ते म्हणतात, ‘स्वत:चा अंत जवळ आल्याची चाहूल लागल्यावर कसलेल्या गायकाने घराण्याच्या पिढ्यानपिढ्या जपलेल्या चीजांची नोंदवही जशी एखाद्या पट्टशिष्याकडे सुपूर्द करावी तसा तो विलक्षण क्षण होता.’
पालेकरांच्या भूमिका असलेल्या ७ नाटकांचं दिग्दर्शन सत्यदेव दुबे यांनी केलं. अमराठी असूनही मराठी रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारे सत्यदेव दुबे यांनी पालेकरांना चित्रकारीतून अभिनयात आणलं. पालेकर त्यांना आपले गुरू मानतात. मराठी नाट्यसंमेलनाने दुबेंच्या योगदानाची दखल घेतली नाही, याचं त्यांना अतीव दु:ख आहे.
पालेकरांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं त्यावेळची एक हृद्य आठवण पुस्तकात आहे. रंगभूमीवर पुन्हा एकदा अभिनय करून हा दिवस साजरा करावा व चाहत्यांच्या प्रेमाची परतफेड करावी, असा त्यांच्या पत्नीचा आग्रह होता. त्यातून ‘कुसूर’हे नाटक जन्माला आलं. पालेकरांनी त्या वयातही देशाच्या विविध भागांमध्ये या नाटकाचे २८ हाऊसफुल प्रयोग सादर केले. पहिल्या प्रयोगाच्या अखेरीस रंगमंचावर सर्व सहकलाकार एकत्र आले, त्या क्षणाबद्दल ते लिहितात, ‘मग मला दिसतात ते माझ्या सखीचे तृप्त डोळे. चार महिने छोट्या छोट्या तपशिलांसाठी झटणाऱ्या, मला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अपार कष्ट घेणाऱ्या, माझं कोणतंही स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता असणाऱ्या माझ्या सहचरीची नि:संकोच दाद तिच्या डोळ्यात मला तेवताना दिसते.’ हृद्य आणि सौहार्दपूर्ण संबंध असतील तर पती-पत्नी उतारवयातही एकमेकांचं जीवन किती समृद्ध करू शकतात, याचं हे एक सुंदर उदाहरण.
देशातल्या आजच्या वातावरणाबाबत पालेकर मुळीच समाधानी नाहीत. आजूबाजूला इतक्या लाजिरवाण्या घटना घडत आहेत, की आपल्या संवेदनाच थिजून गेल्या आहेत की काय, अशी त्यांना भीती वाटते. भारतीय एकात्मता आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारा एक सुजाण नागरिक म्हणून त्यांनी काँग्रेसप्रणीत ‘भारत जोडो’यात्रेत भाग घेतला. पण याचा अर्थ ते सर्वार्थाने काँग्रेससमर्थक झाले, असं म्हणणं योग्य होणार नाही.
‘I am a pessimist because of intelligence but an optimist because of will.’ - इटालियन तत्वज्ञ अँटोनियो ग्रामशी यांच्या या वाक्याने पालेकर आपल्या आत्मकथनाची अखेर करतात. सामाजिक बंधाचं भान ठेवणाऱ्या सुजाण नागरिकाची सध्याच्या परिस्थितीबद्दल यापेक्षा काय वेगळी प्रतिक्रिया असू शकते?
पालेकरांच्या कलाकृती दृश्य स्वरूपात पाहता याव्यात म्हणून पुस्तकात अनेक पानांवर QR code दिलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पुस्तकाच्या संदर्भमूल्यात मोठी भर पडली आहे. त्याबद्दल संध्या गोखले यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. पण अनेक व्यक्ती व घटना यांच्या उल्लेखांमुळे समृद्ध झालेल्या या ग्रंथाला अनुक्रमणिका, नामसूची, विषयसूची का नाही याचं कारण कळत नाही. ग्रंथाच्या अखेरीस सूची म्हणून जी माहिती दिली आहे त्याला परीशिष्टं म्हणणं अधिक योग्य होईल असं वाटतं.
प्रत्येक कलाकाराला सामाजिक भान असलं पाहिजे व त्यासाठी त्याने किंमत मोजण्याची तयारी ठेवली पाहिजे, हे आयुष्यातील कळीचं सूत्र मानून जगलेल्या पालेकरांचं हे आत्मकथन नाट्य-चित्रपटप्रेमींना आणि सामाजिक चळवळींशी बांधिलकी मानणार्यांनाही काहीतरी नवीन सांगून जाईल.
हेमंत देवस्थळी | hemantdevasthali36@gmail.com
डॉ हेमंत देवस्थळी नेस वाडिया कॉमर्स कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आहेत. ते 'आनंदयात्रा स्वमदत गटा'चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.