आम्ही कोण?
आमची शिफारस 

डॉक्युमेंटरी : रॅट मायनिंगचं अंधारं जग आणि प्रकाशाचा एक किरण

  • मृदगंधा दीक्षित
  • 28.02.25
  • वाचनवेळ 2 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
rathole mining

१२ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्तराखंडमधल्या सिल्कयारा बेंड-बारकोट बोगद्यात ४१ मजुर अडकून पडले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरची आपत्ती दलं, लष्कर, खासगी कंपन्या आणि पोलिस दल यांच्या प्रयत्नांतूनही मजुरांची सुटका न होऊ शकल्याने अखेर रॅट मायनर्सची मदत घेण्यात आली आणि त्यांनी सतराव्या दिवशी या मजुरांना सुखरूप बाहेर काढलं. यामुळे देशाचं लक्ष रॅट मायनिंगकडे वळलं. रॅट मायनिंग हा काय प्रकार आहे याची शोधाशोध करताना मला ‘स्क्रोल डॉट इन' या यूट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालेला एका डॉक्युमेंटरीचा संपादित भाग बघायला मिळाला. नुशीन मौला आणि जेसिका गोएल यांनी ही डॉक्युमेंटरी तयार केलीय.

हेही वाचा - रॅट होल मायनर्स आणखी किती काळ किडामुंगीसारखे मरणार?

रॅट मायनिंगचा अर्थ त्याच्या नावातच आहे. उंदीर डोंगर पोखरतो तसं पोखरत जाणं म्हणजे रॅट मायनिंग. हे मायनर्स गुडघे आणि पंजे जमिनीवर टेकवून अक्षरशः रांगत हातातल्या हत्याराने भगदाड खणत आत आत जातात. ईशान्य भारतात, विशेषतः मेघालयात कोळसा खणण्यासाठी ही जीवघेणी पद्धत वापरली जायची. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने २०१४मध्ये रॅट मायनिंगला बंदी घातली आहे. अशाप्रकारे अरुंद जागेतून आत घुसायचं असल्याने लहान मुलांनाही कामावर ठेवलं जायचं. रॅट मायनिंग करताना गुदमरून किंवा आतल्या विषारी वायूमुळे विषबाधा होऊन मृत्यू ओढवायचे.

ही सगळी पार्श्वभूमी या डॉक्युमेंटरीमधून कळते. मेघालयातल्या जयंतिया हिल्स भागातल्या काही कोळसा खाणी या डॉक्युमेंटरीमध्ये आतपर्यंत जाऊन दाखवल्या आहेत. पूर्वी रॅट मायनिंग करणारी एक महिला तिचा अनुभव सांगते आहे. या व्यवसायात किती कामगार होते, त्यांना मिळणारा मोबदला, दरवर्षी मृत्यू पावणाऱ्यांची संख्या, अशी माहिती या डॉक्युमेंटरीमध्ये आहे. पण ही डॉक्युमेंट्री तिथेच थांबत नाही. अपरिहार्यतेतून रॅट मायनिंगकडे वळणाऱ्या मजुरांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ट्रिनिटी साईओ या शिक्षिकेची ओळख ही डॉक्युमेंटरी आपल्याला करून देते. त्यांनी सुरू केलेल्या लाकाडोंग हळदीच्या शेतीमुळे जयंतिया हिल्सच्या परिसरातील पूर्वी केवळ रॅट मायनिंगवर अवलंबून असणाऱ्या साठेक गावांतील हजार महिलांना रोजगार मिळाला आहे.

संपूर्ण डॉक्युमेंटरी https://rb.gy/o9848y

युटयुब https://rb.gy/b38qgu

मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com

मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results