आम्ही कोण?
आमची शिफारस 

हे ‘कामा'चे बोलणे

  • रवि आमले
  • 03.03.25
  • वाचनवेळ 8 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
niranjan ghate book

ज्या परंपरेत काम हा पुरुषार्थ मानण्यात आलेला आहे, जिथे काम हा देव आहे, जिथे वात्सायन नावाचे थोर ऋषी होऊन गेले, जिथे कोकशास्त्र रचलं गेलं आणि ज्या देशातील मंदिरांवर मैथुनशिल्पं झळकतात, त्या देशात लैंगिकता म्हटलं की लोक कावरेबावरे होताना दिसतात हे विचित्रच. यावर कोणी म्हणेल, की आता काही एवढं राहिलेलं नाही. लोक लैंगिकतेची खुलेआम चर्चा करतात. आता तर शाळांतून लैंगिक शिक्षण दिलं जावं अशी मागणीही होताना दिसते. खरंच आहे ते.

आज लैंगिकतेचा उच्चार वा आविष्कार पाहून लगेच कोणी अश्लील अश्लील म्हणत डोकं बडवून घेत नाही. दीपिका पदुकोण त्या कोणत्या चित्रपटात बिकिनी घालून नाचते यास कोणाचाच आक्षेप नसतो. आक्षेप असतो तो त्या बिकिनीच्या रंगावर. तर अशी एकूण परिस्थिती. चित्रपटांतील ती चुंबननिर्देशक फुलं केव्हाच सुकली. आता ‘ओटीटी'ने चुंबनादी तमाम क्रियांना एक साहजिकता दिलेली आहे. एवढी, की आता घाईघाईने चॅनेल बदलण्याचीही गरज पालकांस वाटेनाशी झालेली आहे. एके काळी या महाराष्ट्रात ‘तुझ्या भुरक्या केसांचे वळ माझ्या गालावर, माझ्या ढिल्याशा बोटांचे तळ तुझ्या स्तनांवर' अशा ओळी लिहिणाऱ्या कविवर्य बा. सी.

मर्ढेकरांवर काही अश्लीलमार्तंडांनी खटला भरला होता. चंद्रकांत काकोडकरांच्या ‘श्यामा'ला पुण्यातील श्रीकृष्ण भिडे या कोणा नगरसेवकाने न्यायालयात खेचलं होतं. इथे हुसेनांच्या ‘सरस्वती'वरून वाद तर झाला होताच. त्याच्या किती तरी वर्षं आधी एस. जी. ठाकूरसिंगांच्या ‘ओलेती' आणि प्र. रा. शिरूर यांच्या ‘ओढा ओलांडताना' या चित्रांनी अनेकांच्या शेंड्यांना झिणझिण्या आणल्या होत्या. ‘समाजस्वास्थ्य'कार र. धों. कर्वे यांचाही छळ या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि आज..

आज आपल्याकडे पोर्न प्रेक्षकांची फळीच्या फळी तयार झालेली आहे. पूर्वी ते संभोगपट सहज उपलब्ध नसत. व्हिडिओ कॅसेट्सच्या जमान्यात ती समस्या काही प्रमाणात सुटली. मित्रमंडळीतील एखाद्याच्या घरी कोणी नाही असं पाहून सर्वांनी तिथे जमावं, तालुक्याच्या गावावरून भाड्याने व्हिडिओ आणावा आणि त्यावर पहाटेपर्यंत ते संभोगपट पाहात बसावेत, असे उद्योग तेव्हा ग्रामीण भागातही केले जात असत. अनेकांना ते आठवतही असेल. आज तर तसं काही चोरूनमारून करण्याची गरजही उरलेली नाही. संभोगपट पाहण्याची कळ येताच मोबाइलवरील कळ दाबावी. सारं समोर हजर! शिवाय त्या मोबाइल कॅमेऱ्यांनी तर आता वैयक्तिक संभोगपट निर्मातेही निर्माण केलेले आहेत. हे सर्व चित्र एकीकडे आणि दुसरीकडे ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टीं'ना अश्लील म्हणून धिक्कारणं, हेही सुरू आहे. मध्यंतरी एका अभिनेत्रीने तिच्या मुलाला ‘तू तुझं कौमार्य पहिल्यांदा केव्हा गमावलंस' अशा आशयाचा प्रश्‍न विचारला, तर त्यावरून केवढा गहजब झाला. अहा रे संस्कार! ही तर पाश्चात्त्य संस्कृतीची नक्कल, असं म्हणत येथील समाजमाध्यमी ‘संस्कारी' सभ्य स्त्री-पुरुषांनी त्या अभिनेत्रीस घाणेरड्या शिव्या घातल्या. अशा प्रकारचा ‘असंस्कारी' सवाल करणाऱ्या बाईस असभ्य शिव्या देणाऱ्या लोकांच्या सभ्यतेबद्दल काय म्हणावं!

एकंदर आपल्या समाजातील मोठा वर्ग आजही लैंगिकतेविषयी प्रचंड दांभिक आहे, बंधनात आहे आणि म्हणून मनोविकृत आहे. येथील बहुसंख्यांना लैंगिकतेचं नेमकं आकलनच नाही. परिणामी, या विषयाभोवती विकृत सोवळेपणाचा पडदा निर्माण झालेला आहे. अशा काळात निरंजन घाटे यांच्यासारखे ख्यातनाम लेखक जेव्हा ‘लैंगिकतेवर बोलू काही' असं म्हणतात तेव्हा ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

विज्ञानकथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रामुख्याने ओळखल्या जाणाऱ्या निरंजन घाटे यांनी अवकाश, संगणक, पर्यावरण, इथपासून चित्रपट आणि हेरगिरीपर्यंत विविध विषय हाताळले आहेत. किमान दोनेकशे पुस्तकांची त्यांची इस्टेट आहे. ‘लैंगिकतेवर बोलू काही' हे त्यातील ताजं पुस्तक. यापूर्वी मराठीत या विषयावर पुस्तकं आली नाहीत असं नाही. अनेक तज्ज्ञांनी त्यावर लिहिलेलं आहे आणि उत्तम लिहिलेलं आहे. मात्र, त्यांतील बहुसंख्य पुस्तकं प्रामुख्याने वैद्यकीय अंगाने जाणारी होती, सेक्स या विषयाबद्दलच्या आरोग्यविषयक समस्यांना थेट भिडणारी होती. ती गरजेची होतीच. समाजात लैंगिकतेबाबत एवढ्या विकृत आणि भोंगळ कल्पना आहेत आणि त्यापायी अनेकजण शारीरिक आणि मानसिक रुग्ण बनलेले आहेत. यातून बाबा बंगाली, रस्त्यावरील जडीबूटीवाले असे लोक फोफावलेत. ते व्यक्ती आणि समाजाच्याही आरोग्यासाठी धोकादायक. तेव्हा अशा लैंगिक आरोग्यविषयक पुस्तकांची आवश्यकता होतीच. निरंजन घाटे यांचं हे पुस्तक त्याही पुढे गेलेलं आहे. लैंगिकतेबाबतच्या सामाजिक कल्पना काय आहेत, त्या कोठून येतात याचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. लैंगिकतेच्या इतिहासाचा एक मोठा पट त्यांनी यात मांडला आहे. लैंगिकतेविषयीच्या प्राचीन धर्मग्रंथांतील कथा, प्राचीन विचार, या विषयात झालेली नवनवीन संशोधनं या मार्गाने त्यांनी ही मांडणी केली आहे. यात अनेकदा एक धोका असतो. ढीगभर माहितीच्या भाराने प्रकरण अगदी रूक्ष होऊन जातं. या पुस्तकात तसं कुठेही झालं नाही. त्यास घाटे यांच्यातील कथाकार कारणीभूत असावा.

आपल्या मनोगतात ते सांगतात, की लैंगिकता हा कायमच त्यांच्या औत्सुक्याचा विषय होता. तशी ही उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. थोडंसं जाणतेपण आलं, की सर्वांनाच आपल्या देहाविषयी, मग भिन्नलिंगी व्यक्तीच्या देहाविषयी प्रश्‍न पडू लागतात, आकर्षण निर्माण होतं. हे कशामुळे घडतं? प्राण्यांत लैंगिक भावना का निर्माण होतात? वंशसातत्याची धडपड हे त्याचं साधं कारण. निरंजन घाटे सांगतात, ‘दोन पेशी एकत्र आणून तिसरी पेशी निर्माण करायचा मार्ग निसर्गानेच रूढ केला आणि त्या क्षणी पृथ्वीवर सेक्स अवतरलं असं म्हणायला हरकत नाही.' ही सेक्सची जन्मकहाणी. पुनरुत्पादन हा त्याचा मूळ हेतू. पण ते तेवढंच नाही. माणसं केवळ मूल होण्यासाठीच सेक्स करत नाहीत. तसं असतं तर गर्भनिरोधक साधनांची आवश्यकताच भासली नसती. सेक्समध्ये सम-भोग आहे, सुख आहे. ते सुख, तो आनंद, तो पुनरुत्पादन हेतू असं सर्व मिळून जो सेक्स आहे, तो स्त्री आणि पुरुषाच्या मनोधारणा, वासना यांचाही सूत्रधार आहे. एखादी स्त्री विशिष्ट पुरुषाकडेच आकर्षित होते किंवा पुरुषाला विशिष्ट स्त्रीचीच ओढ वाटू लागते. हे सारं कशामुळे घडतं? त्या आकर्षणामागे कोणत्या प्रेरणा असतात? निरंजन घाटे यांनी विविध वैज्ञानिक अभ्यासांचा संदर्भ देऊन जे सांगितलं आहे ते सारं चकित करणारं आहे. अनेकांना तर ते मान्य होणंही कठीण जाईल. पण त्या आकर्षणामागे ४०-५० लाख वर्षांच्या उत्क्रांतिजन्य प्रेरणा आहेत, नैसर्गिक निवडीचं तत्त्व आहे. यात वंशसातत्याची प्रेरणा येते. स्त्रीच्या दृष्टीने यात ती जन्मास घालत असलेल्या अपत्याच्या टिकण्याचा- सर्व्हायव्हलचा प्रश्‍न येतो. हे सारं या पुस्तकात तपशीलाने मांडलेलं आहे.

याचप्रमाणे कौमार्य, लज्जा, वशीकरण, हस्तमैथुन, त्याविषयीच्या अंधश्रद्धा, चुंबन, पहिली रात्र, गर्भधारणा, बहुपत्नीत्व अशा अनेक बाबींवर रोचक आणि मनातील जळमटं दूर करणारी माहिती घाटे यांनी इथे दिलेली आहे. एके ठिकाणी जाता जाता ते सांगतात, की ‘पूर्वी कौमार्यपटलविच्छेद झाल्याशिवाय लग्न करणं योग्य मानलं जात नसे. प्राचीन भारतात लग्नयोग्य मुलीस गणिकेकडे कामशास्त्रीय प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येत असे, तेव्हा अशा मुलीस ‘उपवर' कन्या किंवा ‘उपवधू' असं म्हटलं जात असे.' यातील उप-वर, उप-वधू हे शब्द महत्त्वाचे. त्याची संगती पुढच्या वाक्यातून लागते. ते वाक्य असं : ‘भारतात आणि भारताबाहेरही कौमार्यपटलविच्छेद हा नवऱ्याव्यतिरिक्त इतर पुरुषाने करावा, अशी चाल होती.' आता ज्यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' वाचलेलं असतं त्यांच्यासाठी ही आणि अशा गोष्टी नव्या नाहीत, पण इतरांच्या सांस्कृतिक धारणा उलट्यापालट्या करणारी अशीच ही माहिती आहे. एकूणच, विविध प्राचीन प्रथा, परंपरा, समज-गैरसमज, अंधश्रद्धा, त्याची कारणमीमांसा यांची माहिती देता देता हे पुस्तक समाजातील लैंगिकतेची उत्क्रांती कशी होत गेली हे सांगतं आणि त्या माहितीस अलीकडील शास्त्रीय संशोधनाची जोड देऊन या विषयाबाबतच्या आपल्या जाणीवकक्षा रुंदावण्यास साह्यभूत ठरतं.

या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रोचकता, रंजकता. मुळात हा विषयच सुरस. त्यात निरंजन घाटे यांची सहज-सोपी अशी मांडणी, त्यास दिलेली विविध संदर्भांची जोड. या सगळ्यामुळे लैंगिकतवरचं हे काही बोलणं कुठेही रूक्ष होत नाही. उलट, त्यातून एक प्रकारची बौद्धिक उत्तेजनाच लाभते. होतं असं, की आपल्या मनात लैंगितेविषयीचे अनेक प्रश्‍न असतात. असे प्रश्न, की जे कधी आपण विचारलेलेही नसतात, किंबहुना ते मनाच्या सांदीकोपऱ्यात कुठे तरी अडगळीत टाकून दिलेले असतात. अशा प्रश्नांचीही उत्तरं इथे अचानक चमकून जातात आणि ‘अरे, हे असं आहे होय!' असं वाटून जातं. म्हणजे उदाहरणार्थ, पिळदार स्नायू असलेले पुरुष स्त्रियांना भावतात हे खरं. या न्यायाने सगळेच शरीरसौष्ठवपटू हे असंख्य तरुणींच्या दिल की धडकन वगैरे झाले असते; पण तसं होत नसतं. अति पिळदार स्नायू असलेल्या पुरुषांकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात. असं का? याचं उत्तर मानवशास्त्रज्ञ देतात ते असं, की पिळदार स्नायू हे आवश्यक सामर्थ्याचं लक्षण. कामकरी माणसास ते काम केल्यामुळे प्राप्त होतात. मात्र, केवळ स्नायुसंवर्धन करणारा पुरुष शिकार कधी करणार? शेतीची कामं कधी करणार? बायकापोरांचं संरक्षण कधी करणार? तेव्हा ही अशी वैशिष्ट्यपूर्ण कामं करून स्नायू पिळदार झालेले आहेत अशा व्यक्तीकडेच स्त्री आकर्षित होते, केवळ स्नायूच कमावणाऱ्याकडे नव्हे. अशा प्रकारची रंजक माहिती हे पुस्तक वाचनीय तर बनवतंच, पण त्यातून लैंगिकतेविषयीचं शास्त्रीय ज्ञानही वाचकांस देऊन जातं ते महत्त्वाचं.

आजच्या काळात सर्वच प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण तिथे- रामदासस्वामींच्या शब्दांत सांगायचं, तर ‘मिथ्या साचासारिखे देखिलें' अशी अवस्थाच अधिक. त्यातील ग्राह्याग्राह्य कसं पारखावं? अभ्यासून मांडणी केलेले, गांभीर्याने लिहिलेले ग्रंथ/पुस्तकं तिथे उपयुक्त ठरतात. लैंगिकता या विषयाबाबत हे काम करतं निरंजन घाटे यांचं हे पुस्तक. या पुस्तकाचं आणखी एक नोंदवावंच असं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं मुखपृष्ठ. पांढऱ्या शुभ्र कागदावर लाल रंगातील काष्ठशिल्पासम स्त्री-पुरुष आकृती असलेल्या या मुखपृष्ठाची निर्मिती केली आहे अनिल अवचट यांनी. एरवी लैंगिकता या विषयावरील पुस्तक म्हटलं की तिथे एखादं मैथुनशिल्प खजुराहोच्या सौजन्याने दिसतंच दिसतं. ‘लैंगिकतेवर बोलू काही..'चं मुखपृष्ठ मात्र क्लिशेमुक्त आहे. तिथे स्त्री-पुरुष आकृती आहे, पण ते मैथुनमग्न नाहीत. ते छान सैलावून बसलेले आहेत. एकमेकांशी गुंतलेले आहेत. संवाद साधत आहेत. कामक्रीडेस पाशवीपणापासून उंच नेतो तो संवाद. या मुखपृष्ठातून हा संवाद, बोलणं अधोरेखित झालेलं आहे. हे कामाचं बोलणं आहे. ते जाणत्याचं आहे, जाणतं करणारं आहे. तेवढ्यासाठी हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे.

लैंगिकतेवर बोलू काही
निरंजन घाटे
समकालीन प्रकाशन
किंमत : उ २५०
पानं : १७६

रवि आमले | ravi.amale@gmail.com

रवि आमले मुक्त पत्रकार असून, त्यांची ‘रॉ’ व ‘परकीय हात’ ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

सुरेश दीक्षित 03.03.25
सुंदर परिक्षण...पुस्तक वाचायची इच्छा निर्माण करते...
डॉ. मारुती पोतदार 04.03.25
उत्तम सादरीकरण! लैंगिकता या विषयावरील माहिती अतिशय रोमांचक तसेच शास्त्रीय आहे. निरंजन घाटे सरांना मनोमन धन्यवाद! पुस्तक वाचायला आवडेल. त्या नंतर प्रतिक्रिया द्यायला आवडेल. खूपच छान!
See More

Select search criteria first for better results