व्हिक्टर ओरबेन २०१०पासून हंगेरीचे पंतप्रधान आहेत. हंगेरी हा जेमतेम एक कोटी लोकांचा युरोपीय देश आहे. एके काळी हंगेरी हे साम्राज्य होतं. सुमारे नवव्या शतकापासून तिथली माग्यार ही जमात आकाराला आली. त्यांची माग्यार ही स्वतंत्र भाषाही आहे.
गेली बाराशे वर्षं युरोपात अनेक संस्कृती, जमाती, भाषा, पंथ यांचे गट आकाराला आले. त्या माणसांनी आपापली छोटी व नंतर मोठी राज्यं तयार केली. हे गट राजकीय अर्थाने सार्वभौम देश निर्माण करत. त्यांची राज्यं मोठी होत, मोडत, लहान होत, पुन्हा मोठी होत. प्रत्येक गट दुसऱ्या गटाला आपल्या भौगोलिक राज्यात सामील करत असे. नंतर फाटाफूट होत असे. ही प्रक्रिया युरोपमध्ये आजतागायत चाललेली आहे.
माग्यार मंडळी स्वतःला खासमखास एक्सक्लुझिव्ह मानतात. व्हिक्टर ओरबेन हे गृहस्थ हंगेरियन ओळख पुन्हा एकदा घट्ट आणि वरचढ आहे, हे सांगत सांगत स्वतःची सत्ताही घट्ट करत आहेत. आधी १९९८-२००२ अशी एक टर्म ते पंतप्रधान होते. २००२-२०१० या काळात ते विरोधी पक्षनेते होते. १९८८ साली त्यांनी ‘फिडेस' ही युवा संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेचे ते प्रमुख झाले. १९८९ साली त्यांनी त्याच नावाने राजकीय पक्ष स्थापन केला आणि निवडणुका लढवायला सुरुवात केली. फिडेस हा पक्ष एकहाती आहे. पक्षात आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी राहणार नाही याची काळजी ओरबेन सुरुवातीपासून घेत असतात.
आज हंगेरीच्या राजधानीत (बुडापेस्टमध्ये) कुणी तिऱ्हाईत हिंडला तर वरकरणी ओरबेन यांच्या एकाधिकारशाहीची कोणतीही चिन्हं दिसणार नाहीत. रस्त्यावर मोर्चे, निदर्शनं, गडबड दिसणार नाही. रेस्तराँमध्ये किंवा बारमध्ये कुठेही माणसं तावातावाने ओरबेन यांना विरोध करताना दिसणार नाहीत किंवा ओरबेन यांचं कौतुक करणारी पोस्टर्सही रस्त्यावर दिसणार नाहीत.
ओरबेन कुठेही जाहीरपणे दिसत नाहीत, पण त्यांच्याशिवाय देशाचं पान हलत नाही. ही त्यांची सत्ता हाताळण्याची शैली आहे. ही शैली यानोस कादार यांच्या शैलीशी इतकी मिळतीजुळती आहे की त्यांच्याकडूनच ओरबेननी धडे घेतलेत की काय असं वाटावं. यानोस कादार सुमारे १९५६ ते १९८८ असे ३२ वर्षं हंगेरीचे सर्वेसर्वा होते. इम्रे नागी यांचं बंड मोडून काढत स्टालिनचं सैन्य १९५६ साली हंगेरीत घुसलं. स्टालिनने कादार यांना हंगेरीत पक्ष आणि सरकारप्रमुख म्हणून नेमलं. कादार स्टालिनचीच आवृत्ती असल्यासारखे होते- विरोधकांना संपवून टाकणारे. त्यांना लोक ‘गिलोटिन मॅन' याच नावाने ओळखत, टरकत. गोर्बाचेव यांची कारकीर्द सुरू झाल्यावर हंगेरी निवळलं. कादारही निवळले, एकदम शांततावादी झाले, लोकशाहीवादी झाले. ते इतके बदलले की त्यांना टरकणारी माणसं त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखू लागली. हीसुद्धा हंगेरीची एक गंमतच आहे.
हंगेरीची सत्ता पूर्णपणे कादार यांच्या हाती होती, पण लोकांना त्यांचा सत्तेतला हात दिसत नसे. कुठलंही सरकारी कार्यालय, सरकारी कागदपत्रं, फतवे कुठेही त्यांचा फोटो नसे. सार्वजनिक सभा-समारंभ होत, मिरवणुका निघत, त्यातही कुठे त्यांचा फोटो नसे. ते सर्वत्र असत पण कुठेही नसत.
व्हिक्टर ओरबेन बुडापेस्टपासून साठेक किमी अंतरावरच्या एका खेड्यात १९६३ साली जन्मले. घरची परिस्थिती अगदीच सामान्य होती. घरात बाथरूम नव्हती, नळाला गरम पाणी येत नसे, थंडीत घर उबदार ठेवण्याची सोय नव्हती. अशा सोयी असतात हे त्यांना कॉलेजसाठी बुडापेस्टमध्ये गेल्यावर कळलं.
हेही वाचा - नको राजा, नको ट्रम्प
१९८८ साली ओरबेननी कॉलेजमधल्या मित्रांना सोबत घेऊन ‘फिडेस' (युवक डेमॉक्रॅट्स युती) ही संघटना स्थापन केली. पुरोहितवर्गाला विरोध आणि लिबरल विचारसरणी ही संघटनेची वैशिष्ट्यं होती. हंगेरीच्या सार्वजनिक जीवनातल्या उलथापालथीचा तो काळ होता. हंगेरीवर पहिल्या महायुद्धापासूनच कम्युनिस्ट पक्ष आणि विचारसरणीचा प्रभाव होता. दुसरं महायुद्ध झाल्यानंतर युरोपची रशिया व युरोप-अमेरिका या दोन गटांत वाटणी झाली. हंगेरी कम्युनिस्ट गटात राहिलं. १९५६ साली हंगेरीचे पंतप्रधान आणि कम्युनिस्ट नेते इम्रे नागी यांनी स्टालिनच्या दादागिरीविरोधात बंड पुकारलं.
पोलंड, झेकोस्लोवाकिया, हंगेरी या युरोपीय देशांनी कम्युनिझमविरोधात बंड का पुकारलं त्याचा नीट खुलासा होत नाही. कदाचित स्लाव, हंगेरियन या त्यांच्या ओळखी आंतरराष्ट्रीय कम्युनिझम या ओळखीत सामावल्या गेल्या नसाव्यात.
१९५८ साली रशियाने बंडखोर इम्रे नागी यांचा खून केला, त्यांचं बंड संपवलं. हंगेरीत कम्युनिझमविरोधाचा विचार जन्मला. पुढे १९८९मध्ये गोर्बाचेवनी बहुपक्षीय राज्यव्यवस्था आणि खासगी मालमत्ता या दोन गोष्टींना परवानगी असल्याचं जाहीर केलं तेव्हा अनेक देश सोविएत युनियनमधून फुटले, त्यात हंगेरी हा एक देश होता. सोविएत युनियन फुटण्याच्या काळातच ओरबेन यांची संघटना स्थापन झाली. कम्युनिझमला विरोध, लोकशाही आणि हंगेरियन ओळख हे तीन मुद्दे हंगेरीत प्रभावी ठरत होते. ओरबेन यांनी त्याच तत्त्वांवर आपली संघटना उभारली.
लोकभावना लक्षात घेऊन तिचा वापर लोकप्रियतेसाठी कसा करायचा याचं तंत्र ओरबेन यांच्याकडे उपजतच होतं. युवा संघटना उभारल्यावर एकेदिवशी एक अत्यंत नाट्यमय उपक्रम करण्यात ओरबेन यांनी पुढाकार घेतला. इम्रे नागी यांचं शव कबरीतून बाहेर काढून त्याचं सन्मानपूर्वक, समारंभपूर्वक पुन्हा दफन केलं गेलं. ओरबेन यांनी मानेवर रुळणारे लांब केस कुरवाळत एक घणाघाती भाषण केलं. साऱ्या हंगेरीचे ते एक आयकॉन झाले.
रशियन गटातून मुक्त झाल्याचे परिणाम हंगेरीच्या अर्थव्यवस्थेवर होणं अटळ होतं. समाजवादी अर्थव्यवस्थेतून युरोपीय बाजारवादी अर्थव्यवस्थेत जाण्याच्या संक्रमणकाळात किमती वाढल्या, सार्वजनिक खर्च कमी झाला, वस्तूंचा तुटवडा झाला, देश कर्जबाजारी झाला. देशात एक अस्थिरता होती. अस्थिरतेला तोंड देईल असा राजकीय पक्ष नव्हता. सर्वच पक्ष समाजवादी सावलीत वाढलेले होते. देशात सुमारे ६० राजकीय पक्ष, राजकीय गट तयार झाले होते आणि सत्तेच्या स्पर्धेत उतरले होते. ओरबेन यांची संघटना त्यांपैकीच एक होती.
ओरबेन यांनी परिस्थिती जोखली आणि १९८९ साली युवा संघटनेचं रूपांतर ‘फिडेस' या राजकीय पक्षात केलं. १९९० साली लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. ३८६ जागांच्या लोकसभेत फिडेसला २२ जागा मिळाल्या.
युवा संघटना आणि पक्ष संघटना स्थापन होत असतानाच पक्षाचं नियंत्रण आपल्या हातात राहील याची खटपट ओरबेन करत होते. चळवळ, निवडणुका, पक्षउभारणी यात सक्रिय असलेल्या नेत्यांना त्यांनी या ना त्या प्रकारे बाजूला सारलं, जेणेकरून त्यांच्या सत्तेशी कोणाची स्पर्धा होणार नाही. त्यांच्याइतक्याच लोकप्रिय असलेल्या नेत्यांना पक्षात राहणं अशक्य होईल असे उद्योग त्यांनी केले. पक्षातले ४००पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि नेते पक्ष सोडून गेले. १९९३ साली त्यांनी एका वृत्तपत्राला एक मुलाखत दिली. त्यात ते स्पष्टपणे म्हणाले, की आता सत्ता मिळवणं एवढं एकच पक्षाचं ध्येय आहे, तत्त्व वगैरे गोष्टी आता महत्त्वाच्या नाहीत. लोकमत त्यांना प्रतिकूल झालं आणि १९९४ साली झालेल्या निवडणुकीत फिडेसच्या दोन जागा कमी झाल्या.
१९९३ साली हंगेरीचे लोकप्रिय पंतप्रधान जोझेफ अँतॉल निवडणुकीत हरले. ते का हरले याची ओरबेनकृत मीमांसा अशी- राजकारण म्हणजे बिझनेस असतो हे त्यांना कळलं नाही. परदेशात गेले, तिथे हंगेरीसाठी उपयुक्त करार करून आले, ही त्यांची चूक होती. त्यांनी आपल्याबरोबर बिझनेसमेन न्यायला हवे होते आणि त्या बिझनेसमेनचा व्यवसाय वाढेल याची सोय करायला हवी होती. देशातही कसं वागायला पाहिजे? बँकरना गोळा करा. त्यांना सांगा, की या या बिझनेसमेनना भांडवल पुरवा. बिझनेसमेन श्रीमंत होतील. त्याचा फायदा आपण मिळवायचा. बिझनेस, बँका आणि प्रेस आपल्या ताब्यात ठेवायचं. ते अँतॉलना जमलं नाही. मग जिंकणार कसे?
हेही वाचा - आणीबाणी, हुकुमशाही आणि मध्यमवर्ग
१९९८च्या लोकसभा निवडणुकीत फिडेसला १४८ जागा मिळाल्या. सरकार स्थापनेसाठी १९३ जागांची आवश्यकता होती. इतर दोन पक्षांना बरोबर घेऊन ओरबेन यांनी सरकार स्थापन केलं आणि ते पंतप्रधान झाले. त्यांनी अधिकारांची वाटणी अशाप्रकारे केली की पंतप्रधानाच्या हातात अधिकार केंद्रित झाले. मंत्रिमंडळाचं काम पाहण्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमण्यात आला आणि पंतप्रधानाला सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला. लोकसभेची बैठक दर तीन आठवड्यांनी एकदा घेतली जाईल अशी तरतूद संसदीय कामकाजात केली गेली. विरोधकांनी आक्षेप घेतला. कारण त्यामुळे खासदारांना सरकारवर लक्ष ठेवणं कठीण झालं.
मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी मोजक्या लोकांशी बोलून निर्णय घेतले जात आणि नंतर त्याला मंत्रिमंडळाची चर्चेविना मंजुरी घेतली जाई. कॅबिनेट बैठकीची मिनिट्स नोंदली जात नसत.
१९९८ ते २००२ या ओरबेन यांच्या कार्यकाळात अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचार उघडकीला आले. ओरबेनना त्याची पर्वा नव्हती. ते लोकसभेतल्या प्रश्नोत्तराच्या सत्राला दांडी मारायचे. विरोधी पक्ष एकतर्फी ओरडा करायचे. त्यावर ओरबेन प्रतिक्रिया द्यायचे- विरोधी पक्षाची खरं म्हणजे जरुरीच नसते. सरकार त्यांच्याशिवाय चालू शकतं.
पण तरी २००२मध्ये ओरबेन यांची सत्ता गेली. सोशलिस्ट पार्टी सत्तेत आली. दुसरीकडे पक्षातलं स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यासाठीही त्यांना झगडावं लागलं. पण ते पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्याही विरोधकांना पुरून उरले आणि २०१०मध्ये पुन्हा सत्तेत आले.
ओरबेन यांनी २०१० साली पंतप्रधान झाल्यावर लगोलग सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा उद्योग सुरू केला. ‘नॅशनल मीडिया अँड कम्युनिकेशन ॲथॉरिटी' तयार करण्यात आली. माध्यमांनी असंतुलित लिहिलं, नैतिकता आणि मानवी प्रतिष्ठा यांना धक्का पोचेल असं लिहिलं, प्रसिद्ध केलं तर दंड केला जाणार. साप्ताहिकं, दैनिकं आणि चॅनेल यांचा चढत्या क्रमाने दंड असेल, ४८ हजार डॉलर ते १० लाख डॉलर. नैतिकता, मानवी प्रतिष्ठा, समतोल या गोष्टी इतक्या धूसर आहेत की कोणीही त्या आरोपातून सुटू शकतं किंवा त्यात सापडू शकतं. मीडिया कमिशनचे सदस्य फिडेसने नेमले. पंतप्रधान (म्हणजे ओरबेन) कमिशनचा अध्यक्ष निवडणार, अशी तरतूद केली गेली.
नॅशनल ज्युडिशियल ऑफिस. एकच व्यक्ती प्रमुखपदी. न्यायमूर्ती निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नवे न्यायमूर्ती नेमण्याचा एकाधिकार या पदावरच्या माणसाच्या हाती. कार्यरत असलेल्या न्यायाधीशांची बदली एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात करणं, एका केसवरून दुसऱ्या केसवर करणं, केसेस कुठल्या न्यायाधीशाकडे सोपवायच्या हे ठरवणं याचा अधिकारही याच पदाकडे.
बुडापेस्टमधली सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी ओरबेननी एक आदेश काढून बंद करून टाकली. ही विश्वशाळा जॉर्ज सोरोस या हंगेरियन-अमेरिकन धनवान माणसाच्या देणगीवर उभी राहिली होती. सोरोस लोकशाहीचे समर्थक आहेत, राजकीय पक्ष इत्यादींना ते सढळ मदत करतात. म्हणूनच या विश्वशाळेवर ओरबेन यांचा डोळा होता. गंमत पहा. सोरोस यांनी दिलेली शिष्यवृत्ती घेऊनच ओरबेन अभ्यास करण्यासाठी ऑक्सफर्डमध्ये गेले होते.
सरकारने एक राष्ट्रीय रोजगार योजना जाहीर केली. या योजनेनुसार नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याला शहराच्या मेयरच्या शिफारशीची आवश्यकता होती. मेयरने शिफारस केली नाही तर नोकरी नाही. असलेली नोकरीही मेयरच्या सूचनेवरून जाऊ शकणार होती. सर्व मेयर फिडेस पक्षाने नेमले.
ओरबेन आणि फिडेस सरकारने माध्यमं ताब्यात ठेवली आहेत. जे पेपर पक्ष आणि सरकारबद्दल टीकात्मक मजकूर प्रसिद्ध करत त्यांच्या सरकारी जाहिराती बंद होतात. काही उद्योगी टीका करणाऱ्या पेपरांना जाहिराती देत. सरकारने त्या उद्योगांना धमक्या दिल्या, न ऐकणाऱ्या उद्योगींना तुरुंगात पाठवलं कधी त्यांची वीज तोडली, तर कधी बँकांचा पतपुरवठा बंद केला. बऱ्या बोलाने जाहिराती देणं बंद करा, नाही तर तुमचं खरं नाही, असा इशारा असे. अशा तऱ्हेने पेपर अशक्त केला जात असे. मग सरकार किंवा सरकारसमर्थक व्यक्ती किंवा संस्था तो पेपर स्वस्तात विकत घेत असे.
सरकारने एक सेंट्रल युरोपीय मीडिया फाउंडेशन स्थापन केलंय. त्यातली माणसं ओरबेनसमर्थक आहेत. देशातले ५०० मीडिया आऊटलेट या फाउंडेशनला दिले गेले आहेत. माध्यमांमध्ये सत्ताधारी पक्षाचा प्रचार होतो, त्याच्याच जाहिराती प्रसिद्ध होतात. विरोधकांना वाव नसतो. त्यामुळे सरकार, सत्ताधारी पक्ष यांच्यापेक्षा वेगळं मत माध्यमांत ऐकायला, पाहायला मिळत नाही.
ओरबेन यांनी नियम धुडकावून, परंपरा धुडकावून हंगेरियन राष्ट्रीय बँक, बुडापेस्ट शहर प्रॉसिक्युटर, हंगेरी रेडिओ आणि इतर सार्वजनिक संस्थांच्या प्रमुखपदावर आपली नाही तर आपल्या पक्षाची माणसं नेमायला सुरुवात केली. विरोधी पक्ष, माध्यमांनी ओरड केली. संसदेत विरोध झाला. या नेमणुका होऊ शकल्या नाहीत; परंतु त्या जागा ओरबेननी मोकळ्या ठेवल्या आणि अप्रत्यक्ष हस्तक्षेप करून आपल्या मनासारखा कारभार केला.
हेही वाचा - ठसठसता मध्यपूर्व प्रदेश समजून घेण्यासाठी..
२०२२ची निवडणूक ओरबेननी भरपूर मताधिक्य मिळवून जिंकली. तसं होणार हे ठरलेलंच होतं, कारण ओरबेननी फील्डिंग लावून ठेवली होती. २०२२मध्ये निवडणूक यंत्रणा आणि कामाची पद्धत यांत बदल करण्यात आले. पूर्वी निवडणूक आयोगाचे पाच सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे असत, त्यात विरोधी पक्षाचेही सदस्य असत. निर्णय घेताना विरोधी पक्षाशी सल्लामसलत करावी अशीही पद्धत होती. ओरबेन यांनी त्या तरतुदी काढून टाकल्या. पाचही सदस्य सत्ताधारी पक्षाचे असू शकतात. विरोधी पक्षाशी बोलण्याची आवश्यकता नसेल अशी तरतूद केली. पूर्वी निवडणूक आयोग ही संस्था कायमची होती, आता प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आयोगाचे सदस्य बदलतील. त्यामुळे एखादा मामला आयोगासमोर आला असेल आणि तो लांबला तर नव्या निवडणुकीच्या वेळी सदस्य बदललेले असतील आणि जुना मामला निकाली निघेल. मतदारसंघाचा आकार आणि सीमा ठरवण्यासाठी असलेल्या कसोट्या अशा रीतीने ठरवण्यात आल्यात की सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार निवडून दिले जातील. आज फिडेस सत्ताधारी आहे तर फिडेसच कायम निवडून येत राहील याची सोय आहे. आपल्या मुलाला उत्तराधिकारी करून सत्ता निरंतर आपलीच राहील याची सोय ओरबेननी यातून करून घेतलीय.
नव्या राज्यघटनेत ख्रिस्ती धर्म अधिकृतरीत्या गुंफण्यात आला आहे. ‘राष्ट्रीयत्व टिकवण्यात ख्रिश्चॅनिटीची भूमिका राज्यघटनेने मान्य केली आहे. ख्रिश्चॅनिटीच्या तत्त्वानुसार फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातलंच लग्न स्वीकारलं जाईल आणि स्त्रीच्या पोटात जीवाचा जन्म होईल त्या दिवसापासून त्या जीवाला धक्का लावायला परवानगी नसेल.' राज्यघटनेने आता फक्त १४ चर्चेसना मान्यता दिली आहे, ३४८ चर्चेसची मान्यता काढून घेतली आहे.
फिडेस सरकारने तयार केलेली राज्यघटना आणि कायदे भविष्यात कोणाला बदलता येऊ नयेत अशी तरतूद राज्यघटनेत केली आहे. बहुतेक सारे कायदे, कर आणि वित्तविषयक कायदे यांत कोणतेही बदल करायचे असतील तर दोन तृतीयांश बहुमतानेच ते करता येईल अशी तरतूद आहे. थोडक्यात म्हणजे ओरबेन यांनी त्यांच्या आयुष्याला लागेल तेवढी सोय करून ठेवली आहे. एखादा पक्ष राज्यघटनाविरोधी आहे असं ठरवून त्या पक्षावर बंदी घालण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोगाचे सदस्य आणि प्रमुख फिडेसने नेमले आहेत.
बँका ओरबेनसमर्थकांना पैसे देतात, विरोधकांना वाळीत टाकतात. परिणामी, उद्योगी माणसं अस्ताला तरी जातात किंवा ओरबेनी होतात. उद्योगी, धनवानांनी पैसे कोणावर खर्च करायचे हे अप्रत्यक्षपणे ओरबेन ठरवतात. बँका, उद्योग, माध्यमं स्वतःहूनच ओरबेनसमर्थक होतात. वरकरणी कुठेही जबरदस्ती नसते. माणसं आपले गळे आपणच आवळून ठेवतात.
निवडणूक मोहीम सुरू झाली तेव्हा लायोस सिमिच्स्का हा ओरबेनसमर्थक उद्योगी फिरला, टीका करू लागला. त्याला खुनाच्या धमक्या येऊ लागल्या. त्याने आपल्या कंपन्या ओरबेनना सोपवल्या आणि तो देश सोडून पळून गेला.
सामान्य माणसाला काय समजतं, काय हवं असतं? त्याला एका ओळीत दिलेली सोपी उत्तरं समजतात. त्याला त्याचा संसार ठीक चालवता आला की पुरेसं असतं. सोपी उत्तरं प्रत्यक्षात जुमलेबाजी असते हे त्याला कळत नाही, ते कळून घेण्याची आवश्यकता त्याला भासत नाही. संसार ठीक चाललाय असं त्याला वाटत असतं. कधी काळी तो चालणारा संसार संकटात सापडतो, जगणं कठीण होऊन बसतं, ही गोष्ट इतिहासात घडलेली असते याचा विचार तो करत नाही. गेला दिवस आपला, या सुखात तो वावरत असतो.
सामान्य माणसाची ही नाडी ओळखणं ही एकाधिकारशाहीची पहिली गरज असते. व्हिक्टर ओरबेन तर त्या नाडीवर हात ठेवूनच सार्वजनिक जीवनात आले आहेत. पहिल्या महायुद्धानंतर, त्याच्या आधीपासूनच अनेक देशांनी आणि सत्तांनी हंगेरीला लुटलं. आता हंगेरीला स्वतःचं वर्चस्व आणि अस्तित्व जगाला दाखवलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. हंगेरी फर्स्ट! मात्र, हंगेरीची स्थिती ठीक नाही. महागाई. कोविड. जीडीपी कोसळतोय. कर्जं आहेत. युरोपीय समुदायाकडून अनुदान घ्यावं लागतं. हे सारं का घडतंय? तर हंगेरीने आपली ख्रिस्ती संस्कृती सोडली म्हणून. ख्रिस्ती संस्कृती म्हणजे गोरी ख्रिस्ती संस्कृती, जिच्यात कुटुंब केंद्रस्थानी असतं, ख्रिस्ती धर्म केंद्रस्थानी असतो. ख्रिस्ती धर्म म्हणजे काय? ज्यात फक्त पुरुष आणि स्त्री यांच्यातलेच संबंध ईश्वराला मान्य आहेत. समलिंगी संबंध, एलजीबीटी वगैरे सगळं ख्रिस्ती धर्माच्या विरोधात. आणखी काय? तर आपल्या देशात बाहेरचे काळे, आफ्रिकी, आशियाई, मुस्लिम नकोत.
फॉर्म्युला तयार झाला. डोनल्ड ट्रंप यांच्याकडून ओरबेन शिकले, की ओरबेनकडून ट्रंप शिकले ते कळू नये इतकं साम्य दोघांच्या आचारविचारांत आहे. २०१६ साली डोनल्ड ट्रंप राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होते तेव्हा ओरबेन यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. २०२२मध्ये हंगेरीच्या निवडणुका होत्या तेव्हा रिपब्लिकन पक्षाचे पुढारी हंगेरीत गेले आणि त्यांनी ओरबेन यांना पाठिंबा दिला, त्यांचा गौरव केला. इकडे अमेरिकेतल्या अनेक सभांमध्ये खुद्द ट्रंप ओरबेन यांची स्तुती करत असतात. २०२४ साली ट्रंपना पुन्हा निवडणुक लढवायची आहे. ट्रंप यांचा प्रचार आतापासूनच सुरू झाला आहे. ओरबेन अमेरिकेत आले आणि त्यांनी ट्रंप यांच्या गौरवाची भाषणं केली.
आशियाई, काळे, आफ्रिकी, मुसलमान हे अमेरिकन संस्कृती आणि समाजात विसंगत आहेत, ते अमेरिकेत नसलेले बरे, असं ट्रंप यांचं धोरण आहे. अमेरिका ही स्थानिक, गोऱ्या ख्रिस्ती लोकांची आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हंगेरी युरोपीय असावी, फार तर युरोपातल्या इतर देशांतून माणसं हंगेरीत स्थलांतरित झाली तर चालेल; पण आशिया, आफ्रिका, आखाती देशांतून हंगेरीत माणसं येता कामा नयेत, असं ओरबेन यांचं म्हणणं आहे. हंगेरीत मिनार दिसता कामा नयेत असं त्यांना वाटतं.
२०१५ साली सीरियातून निर्वासित माणसं येऊ लागल्यावर ओरबेन यांनी हंगेरीच्या हद्दीवर उंच कुंपणं आणि भिंती उभारल्या. येणाऱ्या उपऱ्यांना हद्दीवर अडवलं. युरोपीय समुदाय बाहेरून येणाऱ्या लोकांचं स्वागत करत होता तसं समुदायाचं धोरण होतं. हद्द पार करून उपरे हंगेरीत आले तर त्यांना कुणीही मदत करत नसे. त्यांना ना अन्न पुरवत, ना औषधं, ना निवारा. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते उपरे नकोत, असे फलक नाचवत हद्दीवर उभे असत. युरोपीय समुदाय आक्षेप घेत असे. ओरबेन युरोपीय समुदायाचं म्हणणं धुडकावून लावत असत.
२०२२ साली ओरबेन चवथ्या वेळा भरपूर बहुमत मिळवून विजयी झाले तेव्हा त्यांचा विजय फ्रान्समध्ये ल पेन, इटलीत साविनी आणि ब्रिटनमध्ये नायजेल फेराज यांनी साजरा केला. हे तीनही पुढारी आणि त्यांचे पक्ष त्यांच्या त्यांच्या देशात बाहेरून येणाऱ्या लोकांचा तीव्र निषेध करणारे आहेत. तिघंही गोरा, ख्रिस्ती युरोप जपावा या मताचे आहेत. तिघांचाही काळ्या, आफ्रो-आशियाई, मुस्लिम व गैरख्रिस्ती जनतेला सामावून घेण्याला विरोध आहे.
निवडून आल्यानंतर ओरबेन शेजारच्या रोमानियात गेले. तिथे भाषणात ते म्हणाले, की युरोपीय माणसांनी हंगेरीत येणं एक वेळ समजू शकतं, पण गैरयुरोपीय माणसं हंगेरीत नकोत. त्यांच्यासोबत काम करणारी फिडेसची एक नेता आणि त्यांची सल्लागार इतकी वैतागली की तिने दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. ओरबेननी राजीनामा स्वीकारला.
२०२२च्या निवडणूक प्रचारमोहिमेत ओरबेन एलजीबीटीना विरोध करत होते. निवडून आल्या आल्या शालेय अभ्यासक्रमात कुठेही एलजीबीटीचा संदर्भ असता कामा नये, असा आदेश त्यांनी काढला. एलजीबीटी माणसांवर त्यांनी अघोषित बहिष्कार घातला. त्यांना नोकऱ्या देऊ नका, त्यांना शिक्षणसंस्थांत घेऊ नका, त्यांना कोणतंही अर्थसाह्य करू नका, असा दबाव त्यांनी संस्थांवर आणला. त्यांचं हे वर्तन युरोपियन युनियनच्या तत्त्वात बसत नसल्याने युनियनने त्यांचा निषेध केला. तरीही ओरबेन ऐकेनात म्हटल्यावर युनियनने हंगेरीला शिक्षा करायचं ठरवलं. हंगेरीतल्या सार्वजनिक प्रकल्पांवरच्या खर्चात ९० टक्के पैसे युरोपियन युनियनचे असतात. ते पैसे युनियन नाकारेल, असं युनियनच्या अध्यक्षांनी ओरबेनना सांगितलं. हंगेरीच्या जीडीपीच्या सुमारे ६ टक्के रक्कम अनुदानाच्या रूपात युरोपीय समुदायाकडून येते. ही रक्कम रोखून धरणार असं समुदायाने जाहीर केलं. यावर ओरबेन यांची प्रतिक्रिया अशी- हंगेरी या देशाचं स्वातंत्र्य समुदाय हिरावून घेत आहे, समुदाय दादागिरी करत आहे.
२०१९साली म्यानमारच्या नेत्या, म्यानमार सरकारच्या सल्लागार, म्यानमारच्या मर्यादित अधिकार असलेल्या प्रतीकात्मक पंतप्रधान आँग सान सू की हंगेरीमध्ये गेल्या, ओरबेनना भेटल्या, अधिकृत सरकारी कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. त्या इतर कुठेही जात नाहीत, फक्त हंगेरीत गेल्या. त्यांचं स्वागत करताना ओरबेननी हंगेरी-म्यानमारच्या समान सार्वजनिक इच्छा व्यक्त केल्या. त्या कोणत्या? तर समाजाचं सांस्कृतिक रूप टिकवणं, समाजाची सांस्कृतिक एकता टिकवणं.
रोहिंग्या मुसलमान धर्माने वेगळे आहेत आणि तसे ते बांगला देश इत्यादी बाहेरच्या देशांतले आहेत; ते म्यानमार समाजाची एकता बिघडवतात. सू की तसं उघड बोलत नाहीत, पण रोहिंग्यांवर होणाऱ्या हल्ल्यांकडे कानाडोळा करतात.
बाहेरचे मुसलमान ही हंगेरी आणि म्यानमारची समान चिंता आहे.
एकाधिकारशाही सत्ता अलगद सत्ताधीशाच्या कुटुंबात जाते. ओरबेन यांचा मुलगा जास्पर ओरबेन. वय २५. उत्तर कोरियातल्या जाँग घराण्याप्रमाणे हा सत्तेत आपली जागा निर्माण करतोय, पण वेगळ्या रीतीने. तो दर आठवड्याच्या शेवटी जागोजागी पेंटेकोस्टल पंथाचे कार्यक्रम करतो. एखादा हॉल असतो. तिथे भाविक गोळा होतात. जास्पर सामूहिक प्रार्थना घेतो. या प्रार्थना म्हणजे गाणी, ताल, नाच यांचं मिश्रण असतं. सामूहिक गाण्यामुळे माणसं तल्लीन होतात, बेभान होतात. जास्पर न कळणाऱ्या भाषेत गाणी म्हणतो, शब्द निरर्थक असतात. लोकांना ताल आणि सूर फक्त समजतात. नंतर जास्पर भाषण करतो. जमावातल्या एकेकाला बॅप्टाइज करतो. दरम्यान त्याचं प्रवचन होतं. प्रवचन स्थानिक हंगेरियन भाषेत असतं. जमलेले लोक कायम भारलेले असतात. जास्पर मध्येच म्हणतो. “तुमच्यात कोणा तरी एका व्यक्तीला अपघात झालाय. अपघातात त्या व्यक्तीचा उजवा गुडघा जखमी झालाय, दुखतोय.” जमाव हं हं म्हणत डोलत असतो. ताल आणि सुरात जास्पर बोलत असतो. एखाद-दोन मिनिटं जातात. एक स्त्री हात वर करून म्हणते, “मीच ती व्यक्ती आहे. मलाच अपघात झाला होता.” जमाव आश्चर्यचकित होतो, भारावतो. ‘पहा, जास्परला कसं अंतर्ज्ञान आहे!'
पेंटेकोस्टल पंथात ईश्वर प्रवचकाच्या तोंडून बोलत असतो. जास्पर न कळणाऱ्या भाषेत, जिबरीश-ग्लोसालिया भाषेत बोलतो, हातवारे करतो. जमाव एकसुरात, एकतालात डोलत असतो. त्या मुलीचं दुःख नाहीसं होतं. तिची व्याधी नाहीशी होते. देवाची करणी! ती आनंदाने बेभान होते, नाचू लागते. जमाव नाचू लागतो. ईश्वराची ताकद सिद्ध होते. पेंटेकोस्टल पंथात आधीच असलेली माणसं घट्ट पेंटेकोस्टल होतात. पेंटेकोस्टल नसलेली माणसं पेंटेकोस्टल होतात. हा इव्हेंट कुठेही होऊ शकतो. त्यासाठी चर्चमध्ये जायची आवश्यकता नसते. प्रवचकाचं धर्मशिक्षण झालेलं असण्याची आवश्यकता नसते. जास्परचंही धर्मशिक्षण झालेलं नाही, तरी तो इव्हेंट करत फिरतो. खूप माणसं त्यात सहभागी होतात. कारण तो व्हिक्टर ओरबेन यांचा मुलगा आहे. त्याच्यासोबत त्याचे मित्र असतात, एक गोतावळा असतो. हा गोतावळा म्हणजे अर्थातच फिडेस पार्टीचे सदस्य असतात.
जास्पर काय, त्याचे वडील व्हिक्टर काय किंवा समूहात सामील माणसं काय, ही माणसं पेंटेकोस्टल-कॅथलिक असतात, म्हणजे धार्मिक श्रद्धाळू असतील असं नाही. कॅथलिक चर्च याचा अर्थ हंगेरियन परंपरा, कुटुंबव्यवस्था, हंगेरियन संस्कृती. ही माणसं चर्चमध्ये जातील असं सांगता येत नाही. खरं म्हणजे साठेक टक्के हंगेरियन चर्चमध्ये जात नाहीत, तरीही कॅथलिक असतात. कॅथलिक संस्कृती याचा अर्थ राजकीयही असू शकतो. प्रसिद्ध, समाजावर गारूड करणारी व्यक्ती ज्या पार्टीची असेल ती पार्टी आपोआप कॅथलिक किंवा पेंटेकोस्टल होते. संस्कृती केवळ धार्मिक श्रद्धा नसते, संस्कृती म्हणजे सामूहिक राजकीय विचारही असू शकतो. एके काळी ही माणसं कम्युनिस्ट होती, आता ती लिबरल झालीत, फिडेस या सत्ताधारी पक्षाची झालीत. जास्परचे कार्यक्रम समांतर पातळीवर फिडेस पक्षाचे कार्यक्रम होतात, व्हिक्टर ओरबेन यांचे कार्यक्रम होतात.
ओरबेन यांच्या कार्यकाळात हंगेरी हळूहळू लोकशाहीकडून एकाधिकारशाहीकडे प्रवास करत असल्याचं जगभरातले पत्रकार नोंदवताहेत. ओरबन त्याचा इन्कार करत नाहीत. ते जाहीरपणे एकाधिकारशाहीकडे झुकलेल्या नेत्यांना पाठिंबा देतात. आपल्या देशाचं वर्णनही ते अभिमानाने ‘इललिबरल स्टेट' असं करत असतात.
('समकालीन प्रकाशना'च्या 'जगभरातील धटिंगण' या निळू दामले लिखित पुस्तकातून साभार.)
निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com
निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
