काल-परवा अमेरिकाभर एक कोटीहून अधिक नागरिक रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिट्या आणि कॉलेजात मोहीम उघडून आणखी विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणलं.
का?
या निदर्शकांना अमेरिकेत लोकशाही हवीय, ट्रम्प यांची हुकूमशाही नकोय. ते सर्वजण ‘नो किंग्ज’ अशी घोषणा करत होते. लोकप्रिय नट रॉबर्ट डी निरो रस्त्यावर उतरले. म्हणाले, 'आम्हाला हा वेडा नकोय. नको नको ते उद्योग करतोय, उगाच आम्हाला एका हिंसक युद्धात अडकवतोय... आम्ही शांतताप्रिय नागरिक आहोत, सनदशीर मार्गानं जाणारे लोक आहोत. त्याच मार्गानं आम्हाला ट्रम्पला हाकलायचंय...'
विविध राज्यांचे मुख्यमंत्री (गव्हर्नर), आमदार, खासदारही रस्त्यावर उतरले. रस्त्यावर उतरलेल्यांत अर्धी आम जनता आहे आणि अर्धे डेमॉक्रॅट आहेत. डेमॉक्रॅट विरोधक असल्याने त्यांचं रस्त्यावर येणं समजण्यासारखं आहे. त्यात गैर काही नाही. विरोधी पक्षाची ती जबाबदारीच आहे. उद्या डेमॉक्रॅटिक पक्षाचा माणूस अरेराव झाला तर रिपब्लिकन लोकांनी रस्त्यावर यायला हवं.
हेही वाचा - जनतेने ओढवून घेतलेली सत्ताधाऱ्यांची मनमानी
विरोध होणं, खणखणीत विरोध होणं महत्त्वाचं आहे. ट्रम्प भडकलेत. डेमॉक्रॅट देशद्रोही आहेत, वाईट्ट आहेत, समाजहिताला बाधक आहेत, अशी टीका ते करत आहेत. तसं बोलण्याचा त्यांचाही हक्क आहेच. त्यांनी तो हक्क वापरावा. डेमॉक्रॅटनीही ट्रम्प यांची मापं काढावीत. यालाच तर लोकशाही म्हणतात.
ट्रम्प यांनी अनेक विक्रम केले आहेत. दोन वेळा इम्पीचमेंट झालेला हा अमेरिकेच्या इतिहासातला एकमेव प्रेसिडेंट. आपल्या उत्पन्नाचा, कर भरल्याचा दाखला किंवा रेकॉर्ड सादर न करणारा हा अमेरिकेतला पहिला प्रेसिडेंट. फौजदारी गुन्ह्याचे आरोप सिद्ध झालेला आणि अनेक खटले कोर्टात असलेला हा अमेरिकेचा पहिला प्रेसिडेंट. निवडणुकीत मतं कमी पडल्यावर आपल्याच गव्हर्नरला 'काहीही करून कमी पडणारी मतं गोळा करून आण' असा आदेश देणारा हा पहिला प्रेसिडेंट. पराभव झाल्याचा कोर्टाचा निकाल अमान्य करून निवडीवर शिक्का मारण्यासाठी भरलेल्या संसदेच्या अधिवेशनावर हिंसक हल्ला घडवून आणणारा हा पहिला प्रेसिडेंट. ‘मी प्रसिद्ध असल्याने कोणाही स्त्रीला तिचे अवयव धरून खेचलं तरी खपून जाईल, विवाहित स्त्रियांनाही मी झोपवतो कारण मी सेलेब्रिटी आहे,’ असं जाहीरपणे म्हणणारा हा पहिला प्रेसिटडेंट. ‘मी प्रेसिडेंट असल्याने खून केला तरी माझ्यावर खटला होऊ शकत नाही,’ असं सिनेटमध्ये स्वतःच्या वतीने मांडणारा हा पहिला प्रेसिडेंट.
असा माणूस लोकांना नकोसा असणं समजण्यासारखं आहे. तो अती नकोसा होण्याचं ताजं कारण म्हणजे आता ट्रम्प यांची छबी अमेरिकन नाण्यावर येऊ घातलीय. अमेरिकन नोटेवर ट्रम्प यांची सही येऊ घातलीय.
अमेरिकेच्या चलनी नोटेवर ट्रेझरर आणि ट्रेझरी सेक्रेटरीची सही ठेवण्याची प्रथा आहे. १८६१ साली कागदी चलन सुरू झालं तेव्हा ही प्रथा सुरू झाली. पुढल्या चार-दोन दिवसांत नव्या नोटा छापल्या जातील तेव्हा त्यावर ट्रम्प यांची सही असेल. खजीनदार, अर्थमंत्री गायब.
हेही वाचा - दावोसमध्येही ट्रंपचीच मर्जी
हा निर्णय कोणी घेतला? अमेरिकेत काँग्रेस आणि सेनेट अशी दोन सभागृहं आहेत. तिथे हा विषय चर्चेलाही आलेला नाही. बाहेरही या निर्णयाची वाच्यता नाही. सरकारातल्या लोकांना विचारलं तर ते म्हणतात, 'ट्रम्प यांची देदिप्यमान कारकीर्द आणि त्यांनी अमेरिकेत घडवून आणलेल्या अर्थक्रांतीसाठी त्यांचं नाव नोटेवर येणं, नाण्यावर येणं योग्य आहे.' ही योग्यता कोणी ठरवली? काहीही माहित नाही.
एखाद्या प्रेसिडेंटनी केलेली कामगिरी समजा देशाला फारच आवडली तर संस्थांना त्या प्रेसिडेंटचं नाव दिलं जातं. लिंकन, वॉशिंग्टन, जेफर्सन या प्रेसिडेंटांनी अमेरिका घडवली, त्यांची चित्रं नोटेवर ठेवण्यात आली आहेत. पण तेही त्यांच्या मृत्यूनंतर घडलेलं आहे, ती मृत्यूनंतर त्यांना दिलेली श्रद्धांजली होती. इथे ट्रम्प जिवंतपणीच नोटेवर ठाण मांडू पाहत आहेत. हां, तेही समजण्यासारखं आहे. ट्रम्प यांच्या पश्चात कोणी आदराने त्यांचं नाव घेईल किंवा त्यांचा फोटो नोटेवर छापा असं म्हणेल अशी शक्यता नाही. हे ट्रम्प यांना पक्कं माहीत असल्याने ते आपल्याच जिवंतपणी आपली स्मारकं करून घेत आहेत.
कायद्याचे जाणकार सांगतात, की आजच्या ट्रेझरर सेक्रेटरीनी ट्रम्पच्या नावाला मान्यता दिली असली (जातात कुठं? परवानगी नाही दिली तर ट्रम्प त्यांना हाकलून देतील) तरी नंतर येणारा ट्रेझरी सेक्रेटरी ट्रम्पचं नाव ठेवेलच याची खात्री नाही. ते नाव हटवून तिथे पूर्वीसारख्याच सह्या ठेवण्याचा अधिकार भविष्यात येणाऱ्या ट्रेझरी सेक्रेटरीला असेल.
हेही वाचा - ट्रंप हार्वर्ड विद्यापीठात ढवळाढवळ का करताहेत?
हज्जारो लोकांनी जाहीरपणे सांगितलंय, की ट्रम्प यांचं चित्र असणारी नाणी ते वापरणार नाहीत, त्या नोटाही ते वापरणार नाहीत. लोक गालातल्या गालात हसत म्हणतात, की नाहीतरी हल्ली आभासी चलनाचा जमाना आलाच आहे, आता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पे पाल (किंवा आपल्याकडील जीपे) याच वाटेने आर्थिक व्यवहार होतात, आता कुठं ट्रम्पचं तोंड पाहायला लागणारे.
काही लोक त्याहूनही हुशार आहेत. त्यांचं म्हणणं, की ट्रम्पची सही असलेल्या नोटा फार काळ चलनात राहणार नाहीत, आणि नाण्यांवरही ट्रम्प राहणार नाहीत. दुर्मिळ, विक्षिप्त वस्तू-नाणी-नोटा संग्रह करणारे लोक ती साठवतील आणि त्यावर नंतर पैसे कमावतील.
भाळलेले भक्त ट्रम्पना निवडून देतात. संख्येने जवळपास तेवढेच असलेले विरोधक ट्रम्पना खणखणीत विरोध करतात, रस्त्यावर येतात. हे अमेरिकेत शक्य होतं, कारण अमेरिकेत अजून स्वतःच्या तंत्राने चालणारी माध्यमं आहेत. अमेरिकेत भक्त पत्रकारी हा अजून तरी मुख्य प्रवाह नाही.
हेही वाचा - ग्रीनलँड, तुझं काय होणार?
निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com
निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
