
तुर्कियेचे प्रेसिडेंट रेचेप एर्डोअन एकदा म्हणाले होते, 'लोकशाही ही एक ट्रॅम आहे. इच्छित स्टॉपवर पोचलं की ट्रॅम सोडून द्यायची असते.'
एर्डोअन २२ वर्षांपूर्वीच त्यांच्या इच्छित स्थळी, प्रेसिडेंटपदावर पोचलेले आहेत, तेव्हांच त्यांनी ट्रॅम सोडली आहे. लोकशाहीची चर्चा आता लोकांनी करायची आहे, एर्डोअन आणि लोकशाही यांचा संबंध आता उरलेला नाही. या गोष्टीची प्रचिती सध्या पुन्हा एकदा येते आहे.
नेमकं काय घडलंय?
इस्तंबूलचे महापौर आणि रिपब्लिकन पीपल्स पार्टी (CHP) चे नेते एकरेम इमामोग्लू यांना एर्डोअननी भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून अटक केलीय. त्या अटकेविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत.
तुर्कियेत जामीन वगैरे मिळत नाही. एकदा माणूस आत गेला की गेला. राजकीय गुन्ह्यासाठी आत गेला असेल तर तो म्हातारा, विकलांग झाल्यावरच तुरुंगाबाहेर येतो. इमामोग्लू यांच्यावर आरोप आहे की, त्यानी लहान मुलांच्या शाळा स्थापन करत असताना भ्रष्टाचार केला आहे. शाळा केव्हां स्थापन झाल्या? पंधरा वर्षांपूर्वी. त्यातला भ्रष्टाचार एर्डोअनना आत्ता दिसला.
ही अटक होत असतानाच आणखी घटना घडलीय. इस्तंबूल विद्यापीठाने इमामोग्लू यांचा डिप्लोमा रद्द केला आहे. १९९० साली एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात ट्रान्सफर करत असताना काही अनियमितता घडल्याने हा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. ही अनियमिततादेखील विद्यापीठाला ३५ वर्षांनी सापडलीय. अनियमितता असेल तर ती दूर करण्याची सोय असायला हवी, सुधारणा करता यायला हव्यात, माणसाला हालचाल करायची संधी द्यायला हवी. एकतर्फी रीतीने विद्यापीठ माणसाला न विचारता त्याचा डिप्लोमा रद्द करतं?
डिप्लोमा रद्द होण्याला तुर्कियेत एक विशेष अर्थ आहे. प्रेसिडेंटपदाची निवडणूक लढवायची असेल तर उमेदवार किमान पदवीधारक/डिप्लोमाधारक असायला हवा. इमामोग्लू डिप्लोमाहीन झाल्याने त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही. हा निर्णय विद्यापीठाने घेतला, त्यावर कोर्टात सुनावणी नाही. बसा बोंबलत! पुढल्या दोन दिवसांत रिपब्लिकन पीपल्स पार्टी (सीएचपी) इमामोग्लू यांची प्रेसिडेंटपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करणार होती. कोर्ट एर्डोअन यांच्या खिशात असतं. न्यायाधीश त्यानी नेमलेले आहेत. त्यामुळं कोर्ट या प्रकरणी डोळ्यावर कातडी ओढून बसेल किंवा विद्यापीठाचा निर्णय मान्य करेल हे नक्की. तांत्रिकदृष्ट्या इमामोग्लू निवडणूक लढवू शकणार नाहीत.
आगामी निवडणुका आणि संभाव्य धोके
२०२८ साली तुर्कियेमध्ये प्रेसिडेंटपदाच्या निवडणुका आहेत. त्याची तयारी एर्डोअननी सुरू केली आहे. इमामोग्लू हे संभाव्य प्रतिस्पर्धी असल्याने त्यांचा पतंग एर्डोअन आधीच काटून टाकायच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठीच तुरुंगवास, डिप्लोमा रद्द करणं, खटले भरणं हे उद्योग सुरू आहेत.
गेली निवडणूक एर्डोअननी ५२ टक्के मतं मिळवून जिंकली होती. पण त्यासाठी त्यांना खूप दंडबैठका काढाव्या लागल्या होत्या. त्यांचं नशीब चांगलं असल्याने त्यांच्या विरोधात एकसंध पक्ष नव्हता. सहा पक्षांचं कडबोळं होतं. तुर्की लोक त्या आघाडीला खेळायला बसलेल्या सहा जणांचं टेबल असं म्हणत असत. या आघाडीत डावे होते, उजवे होते, लिबरल होते, सेक्युलर होते, इत्यादी होते, इत्यादी होते. त्यांचा आपसात ताळमेळ नव्हता. केवळ निवडणुकीसाठी ते एकत्र आले होते. त्यांचा उमेदवारही मुळुमुळू होता.
एर्डोअन यांच्या तोट्याच्या बाजूला अनेक मुद्दे होते. भ्रष्टाचार होता. भूकंपाची दुर्घटना एर्डोअनना सांभाळता आली नव्हती. बेकारी वाढली होती, महागाई वाढली होती. इतक्या वाईट स्थितीतही अब्जावधी रुपयांचा एक राजवाडा त्यांनी प्रेसिडेंटसाठी (म्हणजे अर्थातच स्वतःसाठी) बांधायला घेतला होता. इस्तंबूलच्या अगदी मधोमध एक उद्यान होतं. ते नाहीसं करून तिथे मॉल बांधायचा निर्णय त्यांनी घेतला होता. लाखो लोक त्या विरोधात रस्त्यावर आले होते, त्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्या, अश्रूधुराने डोळ्यांचा त्रास सहन केला होता. पण या सगळ्या गोष्टी लोक विसरले, कारण एर्डोअनना दणका देऊ शकणारा उमेदवार नव्हता.
इमामोग्लू यांच्या रुपाने आता एक बलवान उमेदवार पुढे आला आहे. इमामोग्लू इस्तंबूलचे महापौर आहेत. इस्तंबूल परिसरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. एर्डोअननी जीव ओतून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही दणदणीत बहुमताने ते निवडून आले. इस्तंबूल शहरासाठी त्यांनी अनेक प्रकल्प उभे केले, जनता त्यांच्या कामगिरीवर खूष आहे. इस्तंबूलचा महापौर पुढे तुर्कियेचा प्रेसिडेंट होतो, असा तिथला इतिहास आहे. एर्डोअन यांची कारकीर्दही इस्तंबूलपासूनच सुरू झाली होती. त्यामुळेच एर्डोअन हादरले असण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला घेतलीय.
इमामोग्लू एर्डोअनना हरवतील?
इमामोग्लू यांच्या अटकेमुळे जनतेत उमटलेली प्रतिक्रिया पाहता ते एर्डोआन यांना हरवू शकतील, अशी शक्यता दिसते. आठ दिवस इस्तंबूलमधे दहा दहा लाख लोक एर्डोअनच्या निषेधार्थ आणि इमामोग्लू यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. लाठीमार, अश्रूधर, पाण्याचे फवारे हे सारं झालं. सीएचपी या पार्टीच्या अनेक नेत्यांना उचलून तुरुंगात घातलं गेलं आहे. निदर्शनात भाग घेतल्याबद्दल शेकडो लोक अटकेत आहेत. पोलिसांनी पत्रकारांनाही सोडलेलं नाही. धोपटलं आहे, तुरुंगात घातलं आहे. पत्रकारीची ओळखपत्रं दाखवली तरीही पोलिसांनी त्यांना विचारलं 'तुम्ही इथे काय करताय?' निदर्शनं आणि प्रतिकार थांबण्याची लक्षणं दिसत नाहीत. अधिक तीव्र कारवाईची शक्यता आहे, लष्कर रस्त्यावर येऊ शकतं.
इमामोग्लू लोकप्रिय आहेत. ते कार्यक्षम असल्याचं सिद्ध झालंय. त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे. ते ५६ वर्षाचे आहेत. (एर्डोअननी सत्तरी ओलांडलीय) शक्यता अशी आहे की सीएचपी हा पक्ष ही निवडणूक एकहाती लढवेल, इतरांचा त्यांना पाठिंबा असेल.
बहुदा एर्डोअन यांच्याबद्दल नाराजीच स्वतंत्रपणे इतकी वाढलीय की तीच स्वतंत्रपणे त्यांना हरवेल, इमामोग्लू हे एक निमित्त ठरतील.
एर्डोअन यांचा धर्माचा तराफा त्यांना आता दगा देण्याची शक्यता आहे. एर्डोअननी धर्माचं गाजर दाखवून आजवर निवडणुका जिंकल्या. तुर्किये हा केमाल पाशांचा सेक्युलर देश होता. बहुसंख्य प्रजा धार्मिक असली तरी सेक्युलर व्यवहार तुर्कांनी स्वीकारला होता. एर्डोअन यांनी तुर्कियेच्या खालावत चाललेल्या आर्थिक परिस्थितीचं खापर सेक्युलरिझमवर फोडलं, धार्मिक जनतेला चिथवलं, धर्माच्या नावावर निवडणुका जिंकल्या. पण गेल्या पाच वर्षांच्या काळात एर्डोअन यांची लबाडी तरुणांच्या लक्षात आली. भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता लपवण्यासाठी एर्डोअन धर्माचा वग लावत आहेत हे त्याना कळलं. वैतागलेले तरुण नोकरीसाठी देश सोडून परदेशात जायला लागले आहेत. इमामोग्लू यांच्या बाजूने निदर्शनात उतरलेल्या लोकांत तरुणांची संख्या मोठी आहे.
अर्थात एर्डोअन हा हार जाणारा माणूस नाही. त्यांची सत्तेची इच्छा प्रबळ आहे. पुढली निवडणूकच नव्हे तर आयुष्यभर प्रेसिडेंटपद मिळावं या खटपटीत ते आहेत. या निवडणुकीत आवश्यक ते बहुमत मिळवून राज्यघटनेत तशी सुधारणा करण्याच्या मागे ते आहेत. त्यासाठी ते हुशारीने पावलं उचलत आहेत. नुकताच त्यांनी कुर्द बंडखोरांशी समझौता घडवून आणला आहे. एकेकाळी कुर्दांचं निर्दालन करायला निघालेल्या एर्डोअन यांना आता त्यांची मतं हवीयत. समझौता करून सगळीच्या सगळी मतं मिळतील असं नाही. पण निदान विरोधकांच्या पारड्यात जाणारी मतं फुटली तरी एर्डोअन यांचा फायदा होईल.
मुद्दा असा की गेल्यावेळी ज्या ५२ टक्क्यांनी त्यांना मतं दिली त्यातले किती टक्के विरोधकांकडे वळतील?
एर्डोआननी नोकरशाही ताब्यात घेतली आहे. पोलिस त्यांच्या आदेशानुसार वागतात, कायद्यानुसार नव्हे. न्यायव्यवस्था त्यांनी खिशात घातली आहे. मुख्य म्हणजे समाजातला एक वर्ग त्यांनी मिंधा करून ठेवला आहे, धास्तावून ठेवला आहे. आज तुर्कियेत नोकरी मिळवायची असेल तर एर्डोअनच्या पक्षातल्या पुढाऱ्याचा वशिला लागतो. एर्डोअन यांच्या एकेपी पार्टीची किंवा एर्डोअन यांची खप्पा मर्जी झाली तर नोकरी जाते. माध्यमं एर्डोअन यांच्या ताब्यात आहेत. विरोधकांना तिथं वाव मिळत नाही. एर्डोअनच्या कह्यातले पेपर आणि चॅनेल भरपूर खोटानाटा प्रचार करत असतात.
बांगला देशाची आठवण येते. तिथे हसीना यांच्या पार्टीने सर्व नोकऱ्या आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. नोकऱ्या गेल्या तरी चालतील पण या बाईला सत्तेतून हाकललं पाहिजे असं लोकांनी ठरवलं. दडपशाहीला लोकांनी कणखर प्रत्युतर दिलं. हसीना हरल्या. त्यांना देश सोडून पळून जावं लागलं.
ट्रंप यांच्यासारखा माणूस अमेरिकेच्या जागृत लोकशाहीत निवडून येतो हा इतिहास पाहिल्यावर निरीक्षक बुचकळ्यात पडलेत.
निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com
निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.