आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

शेती पाहावी करून...

  • श्रीनिवास पंडित
  • 23.08.26
  • वाचनवेळ 32 मि.
shrinivas pandit farm

मध्यमवर्गीय घरात जन्मलेला आणि वाढलेला मी एक पुणेकर. माझे वडीलही पुण्यातले. कोकणात आमची पिढीजात शेतीवाडी आहे, पण त्यात मी कधी राबलो नाही. पण शाळेत असताना सुटीत गावी जाणं, शेतात हुंदडणं, गुरांमागे हिंडणं, कैऱ्या-करवंदं खाणं असं खूप एन्जॉय केलं. शेतीबद्दल एक आकर्षण तेव्हा तयार झालं असावं. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर आणि मग वडिलांच्या व्यवसायात वयाच्या एकोणिसाव्या वर्षी अनपेक्षितपणे पडल्यानंतर शेती, गावाकडचं घर हे सारं बरंच मागे पडलं. फिरतीच्या व्यवसायामुळे संपूर्ण वेगळ्या विश्वात जाऊन पोहोचलो. मित्र, छंद अशा आवडीच्या गोष्टींपासूनही दुरावलो. पुढची तब्बल वीस वर्षं फिरतीत गेली. धंद्यात जम बसल्यानंतरच्या काळात खिशात पैसा आला आणि हाती मोकळा वेळ राहू लागला. मनाचा एक कोपरा आधीपासूनच शेतीच्या हिरवाईने बहरलेला होता. अचानक चमकून गेलं, की ‘अरे, आपण आता शेती करू शकतो!' या विचाराने मग मी झपाटूनच गेलो. शेतीबद्दल वाचू लागलो. चौकश्या करू लागलो. कुणाकुणाशी चर्चा करू लागलो. कागदावर गणितं मांडू लागलो. शेती किती फायद्याची आहे आणि आपले शेतकरी किती मूर्ख नि आळशी आहेत याबद्दल माझं मत पक्कं होऊ लागलं. आपल्याला सगळं कळतंय असा समज झाल्यामुळे केव्हा एकदा जमीन विकत घेतो आणि केव्हा एकदा शेती करू लागतो, असं मला होऊ लागलं. 

पुण्यापासून जवळ असावं म्हणून मावळात शेतजमीन शोधू लागलो. दोन-चार मित्र पैसे गुंतवायलाही तयार झाले. त्यातून दोन अर्धवट व्यवहार झाले. त्यात बऱ्यापैकी पैसा विसार म्हणून दिला गेला. पण आपल्या व्यवसायाबाहेरचा व्यवहार आपल्याला कळत नाही, हे काही तेव्हा लक्षात आलं नाही. शेती करण्याच्या अनिवार इच्छेपुढे मी काही समजून घ्यायला तयार नव्हतो. पण या अनुभवातून एवढं ठरवलं, की स्वत:ला झेपेल एवढीच शेती करायची. 

मग अचानक तब्येतीचे अनेक त्रास सुरू झाले. त्यात दोन-तीन वर्षं गेली. या काळात मनात आणखी आणखी पक्कं होत गेलं, की शेती करायचीच. धंदा नीट स्थिरावलेला होता. त्यात काही आव्हानही उरलेलं नव्हतं. थोडक्यात, उबलो होतो. सारखं वाटत होतं, की माणसांत राहायलाच नको. दूर खेड्यात कुठे तरी राहू. शेती करू. खूप लिहू. काही तरी समाजसेवा करू. बायकोशी बोललो. तिलाही निसर्गाचं प्रेम आहेच. तिनेही तयारी दाखवली. 

परत शेतीचं वाचन, मित्रांशी- ओळखीतल्या शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केल्या. खूप पर्यायांची माहिती घेतली, विचार केला. ‘फळबाग' हा शेतीमधला सगळ्यात सेफ पर्याय वाटला. किमान जोखीम आणि अनेक वर्षं उत्पन्न, असा हिशेब त्यामागे होता. त्यातही खूप महिने टिकणारा आणि सहज मूल्यवर्धन करता येणारा म्हणून काजू लागवड करावी, असं मनोमन ठरवलं. गंमत म्हणजे तोपर्यंत खूप शेतांवर, संस्थांमध्ये गेलो होतो. अनेक शेतकऱ्यांशी बोललो होतो. बाकी सर्व चौकशी करायचो, माहिती घ्यायचो, पण ‘तुमची शेती फायद्यात आहे का? भांडवलावर तुम्हाला किती परतावा मिळतो?' हा प्रश्न विचारायचं मनातही आलं नाही. पुस्तकातले अपेक्षित उत्पन्नाचे आकडे मला तेव्हा पुरेसे खात्रीशीर वाटत होते. कागदावरचं गणितही भरपूर नफा दाखवणारं होतं. मी एक शहरी माणूस. शिकला-सवरलेला. पुस्तकं, अभ्यास, आकडेमोड, गणित यांवर पूर्ण विश्वास असलेला. त्यामुळेच तसं घडलं असावं. 

शेती करायची ठरवली तेव्हापासून शेतीवरचं ‘बळीराजा' मासिक वाचत होतोच. त्यातच श्री. अ. दाभोळकर यांची ‘विपुलाच सृष्टी' आणि ‘केल्याने होत आहे रे' ही पुस्तकं हाती लागली. फुकुओकांच्या ‘एका काडाची क्रांती'ची पारायणंही झाली. दाभोळकरांचं म्हणणं असं, की भरघोस उत्पादनासाठी दोनच गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे सूर्यप्रकाश अन् दुसरं म्हणजे माती तयार करणं. महाराष्ट्रात भरपूर सूर्यप्रकाश आहेच, वर्ष-दोन वर्षांत मातीही तयार करता येते. हे वाचून पुरता भारावून गेलो. मग प्रयोग परिवाराविषयी माहिती कळली. कुठल्याही बाह्य मदत-मार्गदर्शनाशिवाय सांगली भागातल्या अडाणी समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रयोग गट स्थापून तो दुष्काळी, बरड भाग कसा बदलला, तिथे द्राक्षाचं विक्रमी उत्पादन कसं घेतलं ते समजल्यावर थक्कच झालो. पण हे सगळं समजणं बौद्धिक पातळीवरचं होतं. या प्रयोगवीरांची जिद्द, चिकाटी माझ्यात नव्हती. पण तेव्हा हे कुठे कळत होतं? मला फक्त जमीन मिळायची खोटी होती, की विक्रमी उत्पादन सुरू होणार होतं! 

हेही वाचा - आपल्या शेतीची अन्यायगाथा

मग एक सल्लागार भेटले. त्यांनी सांगितलं - “तुम्ही म्हणताय तेवढं उत्पन्न शक्य आहे, पण ते कोकणात लागवड केली तरच. वाहतूक इत्यादी दृष्टीने पुण्यापासून दापोली भाग जास्त सोयीस्कर आहे. त्यामुळे तिकडे जमीन बघा.” मला कोकणचं प्रेम होतंच. त्यात कोकणची माणसं सरळ आणि सगळ्यात बुद्धिवान, असं आम्हा सर्व कोकणी माणसांचं अनुभवसिद्ध मत असतंच! तिथल्या जमिनींच्या दराचे अंदाज घेतले. परत कागदी प्रोजेक्ट तयार केले अन् आलेलं उत्तर बघून हरखूून गेलो! मित्रांना सोबत घेऊन सामायिक शेती करण्याचा विचार पक्का होत गेला. वाटलं, एवढं उत्पन्न मिळणार असेल तर लोक पैसे घेऊन आपल्या मागे धावतील. दहा-वीसजण नक्की पैसे घालतील. त्यांची शे-दीडशे अन् आपली पंचवीस-तीस अशी एकूण दोनेकशे एकर जमीन होईल. एवढी जमीन हाताशी असेल तर पहिल्या दिवसापासून प्राप्ती सुरू होईल! 

पुढच्या वर्षात सल्लागारांबरोबर दापोलीत जमिनी बघण्यासाठी सहा खेपा झाल्या. सल्लागार अनुभवी होते. माझ्यासारखे शहरी, पुस्तकी, उत्साही अनेक शेतकरी त्यांनी पाहिले होते. त्यांनी सबुरीचा सल्ला दिला. शेतीच्या खऱ्या अर्थकारणाची अनेकदा जाणीव करून दिली. पण मला ते ऐकून घ्यायचंच नव्हतं. मी अगदी उतावळा घोडनवरा झालो होतो! 

वीस-पंचवीस जमिनी पाहिल्या. सल्लागारांना त्या पटल्या नाहीत. तोपर्यंत मार्च महिना आला. आता जमीन मिळाली नाही तर आणखी एक वर्ष जाणार, अशा विचाराने मी अगदी घायकुतीला आलो होतो. दापोलीपासून पंधरा कि.मी.वर जेमतेम पाहिलेली एक जमीन योग्य वाटली. दापोलीतल्या एजंटबरोबर (त्याला आपण दीपक म्हणू या.) फोनवरतीच सौदा ठरवून टाकला. दीपकच्या पत्रिकेत तेव्हा ‘घबाड योग' असावा! पन्नास-साठ एकर जमीन घासाघीस न करता घेणारं गिऱ्हाईक त्याशिवाय कसं भेटलं असतं? 

माझ्या सामायिक शेतीच्या कागदी आकड्यांवर खूष होऊन सुरुवातीला जमीन घेण्याचा उत्साह अनेकांनी दाखवला होता. पण वेगवेगळ्या कारणांनी माणसं गळत गेली. शेवटी दोनच जण उरले. त्यामुळे माझं दोनशे एकर जमिनीचं स्वप्न चाळीस एकरवर येऊन ठेपलं. माझी २५ अन् बाकीच्यांची १५ अशी चाळीस एकर जमीन खरेदी झाली. मी एकदाचा जमीनमालक झालो! अर्धी लढाई जिंकलो असं वाटू लागलं. पण खरी लढाई सुरूही व्हायची होती, हे आता कळतंय. 

चाळीस एकर जमीन सलग घ्यायची असं आमचं ठरलं होतं; पण दीपकने तिथली जी कुठली जमीन स्वस्तात नि सहज मिळाली ती गळ्यात मारली. जमीन महाग पडली असं दापोलीतल्या परिचितांचं म्हणणं पडलं. घासाघीस करून १०-१५ टक्के स्वस्त मिळाली असती. पण डांबरी रस्त्याला लागून आणि कोकणातली असूनही भरपूर पाणी असणारी मिळाली, यावर तेव्हा समाधान मानून घेतलं. 

जमीनखरेदी झाली. आता लागवड करायची. पण त्यापूर्वी विहीर खोदली पाहिजे, कुंपण घातलं पाहिजे. नंतर झाडांची देखभाल केली पाहिजे. मला काजूची कुठली जात लावायची, खड्डा केवढा घ्यायचा, खतं कोणती घालायची हे सगळं ठाऊक होतं. (कारण ते पुस्तकात लिहिलं होतं.) पण हे सगळं कोण करणार आणि मी हे कसं करवून घेणार, याचा मी विचारच केलेला नव्हता. शहरात कुठलीही वस्तू, सेवा आपल्याला सहज उपलब्ध असते. त्याचा दर, दर्जा, विश्वासार्हता या बाबी थोड्याफार चौकशीने समजू शकतात. ज्या गावातल्या एकाही माणसाचं मला नावसुद्धा ठाऊक नाही, तिथे ही कामं मी कशी करून घेणार होतो? दापोलीत चौकशी केली. दीपकने काम करायचं कबूल केलं. पण त्याचे दर ऐकल्यावर त्याच्यातर्फे वॉचमन म्हणून राहणं जास्त फायदेशीर पडेल असं वाटायला लागलं! 

हेही वाचा - साहेब, शेती करून उपयोग काय?

पण दीपकनेच प्रश्न सोडवला. विहीर खणण्यासाठी त्याने एक कंत्राटदार दिला. देखरेख करण्यासाठी गावातल्या एका माणसाचा परिचय करून दिला. यांचं नाव रवींद्र मोरे. वय पस्तीस. बोलणं गोड पण स्वत:चाही मान राखणारं. पोलिसांचा हप्ता परवडत नाही आणि गावात दारू बंदी झाली, त्यामुळे दारूधंदा नुकताच बंद केलेला. शिक्षण सही करण्यापुरतं, पण लाखापर्यंतचे हिशेब चोख करणारा. देखरेखीबद्दल महिना पगार अन् बाकी कामं कंत्राटावर करायची असं ठरलं. 

कोकणात पहिलं काम कुंपण घालण्याचं. देशावर कुठेच शेतांना कुंपण नसतं. कोकणात चोरीची भीती नसते; पण भटकी गुरं, जंगली प्राणी यांच्यापासून फार नुकसान होतं. स्थानिक शेतकरी झुडपं लावून, वाळलेल्या काटेरी फांद्या एकमेकांत अडकवून वई करतात; पण आम्हा पुणे-मुंबईवाल्यांना, बंगले-सोसायटी संस्कृतीवाल्यांना पक्कं, महागडं कुंपण केल्याशिवाय मालकी सिद्ध केल्यासारखी वाटत नाही. कंत्राटदारालाही यात भरपूर काम निघतं नि कमाई होते. दीपकचं मत घेतलं. त्याच्या मते तीन फुटांची दगडी भिंत अन् त्यावर ४ फूट तारा-अंॅगलचं कुंपण आवश्यक होतं. थोडी आकडेमोड केली, तर लक्षात आलं, की कुंपणाचा खर्च जमिनीच्या किमतीपेक्षा थोडा जास्तच येत होता. कुंपणाच्या आत मी काहीशे किलो सोनं ठेवणार आहे, असा त्याचा समज होता की काय? अन् दुसरं, कुंपणात एवढे पैसे घातल्यावर माझ्याकडे झाडं लावायला पैसेच उरले नसते! पण मला कुंपणाविषयी मार्ग सुचवला जवळच्या एका फार्मच्या मॅनेजरने. नवीन लागवड करण्यापूर्वी आधीची झाडं तोडावी लागतात. त्यातल्याच सरळ फांद्याना खाली एक फूट डांबर लावून गाडलं, तर त्या दोन-तीन वर्षं टिकतात. त्याला काटेरी तारा घालायच्या. शिवाय कुंपणाला निरगुडी, टणटणी अशी काटेरी झाडी लावली की दोन वर्षांत त्यांची गच्च झाडी तयार होते. हा मार्ग मला बरा वाटला. या पद्धतीने केलेल्या कुंपणाला मला एकपंचमांश एवढा कमी खर्च आला. माझे शहरी मित्र ते बघून नाक मुरडतात, पण कुंपणाने त्याचं काम चोख केलं. (काही ठिकाणचे खांब नंतर कुजल्यामुळे बदलावे लागले, तेव्हा आणखी एक युक्ती सुचली. तिथे आम्ही सावरी, पांगारा यांचे आठ फुटांचे फाटे लावले. तीन महिन्यांत ते रुजून वाढू लागतात. आता ते कुजत तर नाहीतच, वर मला हवा तो पाचोळा/बायोमास भरपूर देतात.) 

पुस्तकी गणित अन् वास्तव यातला फरक मला थोडासा जाणवला जेव्हा आम्ही जमीनमोजणी केली. फक्त ८ एकर जमीन, तीही कोकणाच्या मानानं मोकळी, बिनअडचणीची. पण तिच्या हद्दी निश्चित करायला आठ तास लागले. चढ-उतार, काटेरी जाळ्या, खाचखळगे यांतून वाट काढून थकून गेलो. तेव्हा ४० एकर जमीन केवढी असेल अन् त्यावर प्रत्यक्ष लागवड करणं केवढं काम असेल हे तेव्हा अस्पष्टपणे जाणवलं. 

त्या वेळी मूळ व्यवसायासाठी महिन्यातले आठ दिवस फिरती चालू होतीच. स्वत:चं पुस्तक प्रकाशनही नुकतंच सुरू केलं होतं. पण डोक्यात विचार असायचे शेतीचेच. दर पंधरा-वीस दिवसांनी दापोलीला बसनं जायचं, तिथे विद्यापीठातले विभागप्रमुख, काही नर्सरीवाले, शेतकरी यांच्याशी चर्चा-गप्पा करायच्या आणि या साऱ्यांपेक्षा आपल्याला किती जास्त कळतं याबद्दल मनातल्या मनात स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची, असे दिवस चालले होते.

दरम्यान, कुंपण करून झालं. विहीर खोदून झाली. पावसाळा जवळ आला होता. पहिल्या वर्षी ८-१० एकर काजू लागवड करायचं ठरलं होतं. विद्यापीठाच्या तज्ज्ञांची शिफारस होती २१ बाय २१ वा २४ बाय २४ फुटांवर कलमी झाड लावण्याची. यामागे तर्क असा, की पूर्ण वाढलेल्या काजू झाडाचा विस्तार तेवढा होतो. एवढं अंतर राखल्याने झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. बाकी खतं वगैरे शिफारशीप्रमाणे घातली नाहीत, तरी हे अंतर मात्र शेतकरी पाळतातच, असं त्यांचं म्हणणं. पण झाडांमध्ये एवढं अंतर राखून कलमं लावणं याचा अर्थ एकूण जमिनीपैकी पंचवीस टक्के जमीनच वापरली जाणं. जमीन विकत घ्यायची एकरावर, खर्च करायचा पूर्ण एकरावर अन् वापरायची फक्त पंचवीस टक्केच. मग हा धंदा फायदेशीर कसा होणार? या अनुषंगाने बऱ्याचजणांशी बोललो, पण ठामपणे कुणी काही सांगेना. मग ‘बळीराजा'चे संपादक प्र. बा. भोसल्यांशी बोललो. भोसले सर म्हणजे आम्हा शहरी-हौशी शेतकऱ्यांसाठी ज्ञानकोशच. त्यांनी सांगितलं, ही अंतराची शिफारस २०-२५ वर्षांपूर्वींची आहे. आता तंत्र बदललं आहे. इस्रायलमध्ये ६बाय६ फूट वा ८ बाय ८ फुटांवर झाड लावलं जातं आणि तेवढंच राखलं जातं. यामुळे लहान झाडाची निगा राखणं, निरीक्षण करणं, फळं काढणं सगळंच खूप सोपं जातं. या इस्रायली तंत्रामुळे उत्पादनात पण खूप फरक पडतो. 

दुसरा मुद्दा होता कलम लागवडीचा. फळझाडांची लागवड एक-दोन वर्षांची कलमं लावूनच केली जाते. हव्या त्या जातीची भरपूर फळं मिळावीत हा त्याचा उद्देश. सरकारी योजनेत यासाठीच कलमांची झाडं पुरवली जातात. त्याबद्दलही माझ्या शंका होत्या. कुठल्याही मोठ्या वृक्षाचं प्रथम सोटमूळ वाढतं. ते पाण्याच्या पातळीला गेल्यावर मग बाकी झाड वाढतं. पण कलम पिशवीत भरताना सोटमूळ छाटतात, ते कधीच वाढत नाही. त्यामुळे ते झाड नाजूक राहातं. त्याला किमान तीन वर्षं फार जपावं लागतं. वसंतराव टाकळकर नावाच्या वनाधिकाऱ्यांनी नगर-सोलापूरच्या दुष्काळी प्रदेशात समतल चरावर बिया लावून निव्वळ पावसावर लाखो झाडं वाढवल्याचं वाचलं होतं. वाटलं, इथे कोकणात, अत्यंत अनुकूल जागी तशीच झाडं का लावू नयेत? त्यावर नंतर कलम भरता येईल, आणि हे सगळं खूप कमी खर्चाचही होईल. परत चर्चा, मतं अन् गोंधळ.

हेही वाचा - व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला 

दापोलीतल्या परिचितांना जेव्हा मी ८ बाय ८ फुटांवर बियांनी लागवड करणार असं सांगितलं तेव्हा कुणीच उघड विरोध केला नाही. पण त्यांच्या नजरेचा अर्थ मला नंतर समजला : हा आणखी एक शहरी शहाणा! दोन वर्षांत नक्की पळ काढणार! 

पण मनाशी नक्की केलं अन् जूनमध्ये ८ बाय ८ फुटांवर छोटासा खड्डा घेऊन त्यात बिया लावल्या. एकूण पंचवीसशे झाडं बसली. मनात धाकधूक होत होतीच; पण महिन्याने परत गेलो, तर प्रत्येक बी रुजून आली होती. सप्टें-ऑक्टोबरपर्यंत फुटभर वाढलेली झाडं बघून मन आनंदानं भरून आलं. 

झाडं पुरेशी वाढल्यावर ती छाटून त्यावर ‘वेंगुर्ला चार' जातीचं कलम भरायचं होतं. पण पुरेशी वाढ म्हणजे किती? त्यावर कलम करायचं केव्हा? ते करणार कोण? परत एकदा दीपकनेच एक माळी दिला. ट्रायल म्हणून ऑक्टोबर महिन्यात अडीचशे झाडांना कलमं केली; पण ती सगळी वाळून गेली. 

नवीन कलमांना ऑक्टोबरपासून आठवड्याला पाणी घालावं लागतं. या झाडांना फेब्रुवारीनंतर महिन्यातून एकदा पाणी घातलं. मार्चमध्ये पुन्हा अडीचशे कलमं केली. त्यापैकी अर्धी जगली. पुढची दोन वर्षं खत-पाणी वापरून ही पद्धत प्रमाणित झाली. आता मी खात्रीने सांगू शकतो, की एका वर्षात (दोन-तीनदा पाणी व २५ ग्रॅ. युरिया वापरून) कलम करता येतं व ते १०० टक्के जगतं. या पद्धतीने झाडांची मुळं वाढतात, खर्च १/१० येतो व मर अजिबात होत नाही. (कलमांमध्ये हे प्रमाण अंदाजे ५० टक्के एवढं आहे.) कोकणात या पद्धतीने एवढी लागवड केल्याचं माझ्या माहितीत नाही. त्याविषयी बऱ्याचजणांना सांगितलं, ‘बळीराजा'मध्ये लिहिलं; पण नवीन करण्याच्या भीतीमुळे व ‘फुकट' मिळणाऱ्या सरकारी कलमांमुळे कुणीच उत्साह दाखवला नाही. 

पण असं वेगळं काही करण्यात धोकेही असतात. पहिल्याच वर्षी काही तरी उत्पन्न सुरू झालं पाहिजे, असं मला फार वाटायचं. योग्य आंतरपीक सुचेना. मग मी रस्त्याजवळच्या सपाट जागेत भोपळा, दुधी, कारली इत्यादींचे सुमारे पाचशे वेल लावले. कोणताही पूर्वानुभव नाही, मार्गदर्शन नाही, अयोग्य जमीन, यामुळे अपेक्षित उत्पन्नाच्या २० टक्के उत्पन्न आलं. शिवाय या भाज्या कोकणात घरोघरी होतात, त्यामुळे त्या विकत कोण घेणार? दापोलीला घेऊन जावं, तर तेवढा तोडा एका वेळी व्हायला पाहिजे. इथे मला पहिला फटका बसला. 

माझ्या जमिनीत आधीच्या मालकाने फळबाग योजनेत लावलेले १० वर्षांचे दीडशे काजू होते. दुर्लक्षित, वरचं कलम वाळून खालची गावठी फूट वाढलेले, वणव्यात अनेकदा जळून परत आलेले. (असं झाड कधीच जोर घेत नाही, असं मोऱ्यांचं निरीक्षण) झाडं लावल्यावर मालक बहुधा जमीन विकेपर्यंत तिकडे फिरकलाच नसावा. या झाडांवर पहिल्या वर्षी पाच-एक हजार खर्च केला अन् काजू किती येतील, असा विचार करू लागलो. पुस्तकी गणिताप्रमाणे साधारण ३००० किलो काजू बी यायला पाहिजे. विद्यापीठाच्या हिशेबाप्रमाणे प्रति झाड वीस किलो बी मिळायला हवी. (आता विद्यापीठ प्रति झाड १० कि. उत्पन्न येईल असं सांगतं.) जर झाडांची निगा चांगली राखली, जर योग्य खतं घातली, जर निसर्गाने कोणताही बेभरवशीपणा दाखवला नाही आणि पडणाऱ्या सर्व किडींचा फवारणीने बंदोबस्त झाला, तर झाडाला ४-५ किलो काजू बी लागतं. मला २० किलो बिया मिळाल्या... प्रत्येक झाडाला नाही, एकूण दीडशे झाडांना! प्रत्येक झाडावर ३० रुपये खर्च करून मला प्रतिझाड ५ रुपये उत्पन्न मिळालं. या अनुभवाने मी चांगलाच हादरून गेलो. झाडं दुर्लक्षित, कमी वाढलेली होती, पण एवढा फरक? माझी इतक्या वर्षांची कागदी आकडेमोड पत्त्यांच्या किल्ल्यासारखी ढासळली. 

हा अनुभव गाठीला बांधत असतानाच जमीन विकत घेतल्यानंतरच्या काळात काजूची पंधराशे झाडं, वेलवर्गीय भाज्या, कुंपणाला बांबू, साग, सुरू अशी दोनशे झाडं लावून झाली होती. त्यामुळे त्यांची राखण करणं, पाणी घालणं या साऱ्या कामांसाठी राहता गडी आवश्यक बनला होता. तसंही मला शेतात घर हवंच होतं. माझ्या स्वप्नामधल्या शेतात लॉरी बेकरांच्या पद्धतीचं साधं, स्वस्त आणि देखणं घर होतं. त्याभोवती देश-विदेशातल्या झाडांचं उपवन होतं. त्यात वावरणारे भरपूर प्राणी-पक्षी होते. तिथे खूप काम करायचं होतं. मात्र, ते काम, खतं कधी नि कशी द्यायची याचा काथ्याकूट करण्याचं, पाणी अडण्यासाठी जमिनीचा उतार करण्याचं, मोटार किती हॉर्सपॉवरची बसवायची याचा विचार करण्याचं नि पाईप-जाइंट्स-प्रेशर यांच्याबद्दलचे तांत्रिक प्रश्न सोडवण्याचं असेल हे मला अजिबातच माहीत नव्हतं. 

पाहता पाहता टेकडीच्या माथ्यावर घर उभं राहिलं. घर म्हणजे एक खोली, बाहेर पडवी अन् मागे शेड एवढंच. खिशाचं बजेट, तिथल्या कामगारांचं कौशल्य अन् प्रचंड पाऊस-वारा यांपासून संरक्षण अशा गोष्टींचा विचार करून साधं घर तयार झालं, पण ते मनात होतं तसं सुंदर नि देखणं काही झालं नाही. घर बांधून झालं, तशी मोरे व त्यांच्या घरची एक-दोन माणसं गरजेप्रमाणे मुक्कामाला येऊ लागली. मग दिवसभर कामं, संध्याकाळी अंघोळ, चुलीवरचा स्वयंपाक, जेवण, झोप अन् सर्व वेळ गप्पा असा दिनक्रम सुरू झाला. ज्या जीवनशैलीच्या ओढीने शेती करायची होती ते मी उपभोगू लागलो होतो. पण असे रोमँटिक क्षण फार काळ टिकत नसे. दाताखाली खडा येतच असे, पायांत काटा घुसतंच असे. हद्दीवरून कुरबुरी होत असत. लक्षात येणार नाहीत अशा लहानसहान अडवणुकी केल्या जात. 

पण माझा रोमँटिकपणा खरा उचकटून निघाला तो विहिरीसाठी वीज आणताना. जवळचा पोल एक-सव्वा कि.मी. लांब होता. मला वीज मिळण्यासाठी १९-२० पोल घ्यायला लागतील आणि त्यासाठी खूप वेळ, चकरा, पैसा लागणार हे ठाऊक होतं. एमएसईबीत मला एक खूप चांगला ज्युनियर इंजिनियर भेटला. तरीही अर्ज केल्यानंतर आठ महिन्यांनी एमएसईबीची माणसं आली. सर्व्हे करताना वाटेतल्या वाडीतल्या लोकांनीही नाना अडचणी उभ्या केल्या. ‘माझी फणसाची फांदी तुटते', ‘इथे मला गोठा बांधायचाय', ‘वरून वायर जाऊ देणार नाही', ‘मुंबईवाला भाऊ होळीत येईल, तो सांगेल तसं करू' या वाक्यांनी मी हैराण झालो. ‘इथून लाइट गेले की तुमचाच फायदा होईल, तुमचा खर्च कमी होईल' या माझ्या आर्ग्युमेंटना कुणी जुमानायला तयार नव्हतं. स्थानिक वजनदार माणसं (काहींना किरकोळ पैसे देऊनही)मध्ये पडेनात. खूप त्रासून गेलो. खेडेगावात कसं सगळ्यांना सांभाळून ठेवावं लागतं याची नीट जाणीव या प्रकरणात झाली. 

मग भेटले एमएसईबीचे एक काँट्रॅक्टर. एमएसईबीमध्ये पैसे अडकल्यामुळे डबघाईला आलेले, वयस्कर, अनुभवी नि खमक्या स्वभावाचे. त्यांनी दुसऱ्याच दिशेच्या पोलवरून वीज घ्यायला सुचवलं अन् अडवणाऱ्यांना खास कोकणी दम भरला-“हे सरकारी पोल आहेत. हे सरकारी काम आहे. त्यामुळे मी ते करणार. तुम्ही मला अटकाव केलात, तर मी तुमच्याविरुद्ध केस करतो. नाहीतर तुम्ही माझ्याविरुद्ध कंम्लेंट करा.” त्यांनी झपाट्याने अर्ध काम पुरं केलं. नंतरच्या वाडीचे प्रमुख सुजाण होते. देवळाच्या जीर्णोद्धाराला घसघशीत देणगी घेऊन त्यांनी लगेच वाडीची संमती मिळवून दिली. सव्वा कि.मी. लांबीवरून वीज आणायची होती. एकूण एकोणीस पोल लागणार होते. यासाठी एमएसईबीने माझ्याकडून ‘अर्जंट कॅटेगरी'त दहा हजार रुपये कागदोपत्री घेतले. पण आमच्या विभागाचा ‘कनिष्ठ अभियंता' अगदी सभ्य माणूस होता. नवीन सर्व्हे झाल्यावर आठ दिवसांत सामान येऊन पडलं. जिथे नुसतं चालताना आपण थकून जातो, अशा चढावर काटेरी जाळ्या-दगडातून निव्वळ चार गडी व एक छोट्या गाड्याच्या साहाय्याने त्या काँट्रॅक्टरने १००-१२५ किलोचे, ३५ फूट लांबीचे ५-६ सिमेंट पोल चार दिवसांत उभे केले. तेही भर पावसात! 

अशाप्रकारे माझ्या शेतात विहीर, राहता माणूस, वीज असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं. २५०० काजू झाडं, दोन-तीन हजार इतर झाडंही लावून झाली होती. वेलवर्गीय फळभाज्यांची अयशस्वी ट्रायलही होऊन गेली होती. पुढचा मार्च आला. या वर्षी काय करायचं त्याचा विचार करू लागलो. रस्त्यालगतची दोन-अडीच एकर सपाट जमीन (जिथे वेल लावले होते.) पड पडलेली बघवत नव्हती. असंच कुणाच्या तरी सल्ल्याने तिथे लेव्हलिंगसाठी ट्रॅक्टर लावला. अडाणी मालक आणि मोऱ्यांनाही यांत्रिक शेती ठाऊक नाही, हे बघून (देशावरच्या) ट्रॅक्टरवाल्याने डबल काम काढलं. महिन्याभराने वाद घालून, पैसे घेऊन तो पसार झाला. माती हलल्यामुळे मोकळी झाली आहे हे मात्र आमच्या लक्षात आलं नाही.

कोकणात जमीन आहे म्हणजे घरचा भात पाहिजेच, या विचाराने अर्धा एकर भात लावला. विद्यापीठातल्या कुणी तरी भुईमूग लावायला सांगितलं. जमिनीची घडण, काम करणाऱ्या माणसांसाठी नवं पीक या बाबतीत काहीएक विचार न करता अर्धा एकर भुईमूग लावला. 

जुन्या मालकाने लावलेल्या काजूने दिलेला धक्का ताजा होता. तिथेच बाजूला तीन एकर जमीन होती. तिथे काय करावं यावर बराच विचार करून कोकणचा राजा- आंबा लावायचं ठरवलं. आपण पुण्या-मुंबईत दीडशे रुपयांपासून सहाशे रुपये डझनपर्यंत दर असलेला दराचा आंबा खातो. हा भाव फक्त किनारपट्टीजवळच्या, दगडी कातळात लावलेल्या आंब्याला मिळतो हे ठाऊक होतं. आमच्या इथे आंबा उशिरा येतो हेही ठाऊक झालं होतं. पण काजूवरचा विश्वास तेव्हा तरी उडला होता. त्यातल्या त्यात दरवर्षी येणारा, पावसातही भाव मिळणारा म्हणून केशर आंबा (अन् तीही कलमं) लावायचं ठरवलं. दापोलीचे एक कृषी व्यावसायिक आले होते. विहिरीच्या इथली जमीन बघून ते म्हणाले, “अहो, इथे आंबा-काजू कशाला लावताय? सुपारीची बाग करा. ही जमीन त्यासाठी आदर्श आहे. सुपारीसारखं उत्पन्न बाकी कशातच नाही.” त्याचीही चौकशी केली. कोकणात एकरी सगळ्यात जास्त पैसे सुपारीला मिळतात. नारळ-सुपारीला बारमाही आयुष्यभर पाणी घालावं लागतं. कोकणात एक तर पाणी कमी, त्यामुळे या व्यापात फार कुणी पडत नाही. परिणामी, सुपारीला चांगला भाव मिळतो. म्हणून सुपारी लावली.

पहिल्या वर्षी ५-६ हजारांचं शेणखत विकत घेतलं होतं. तेही अनेक ठिकाणी सांगून ठेवल्यावर मिळालं. मोऱ्यांनी सुचवलं, दोन-तीन म्हशी ठेवल्या तर घरचं शेणखत मिळेलच, वर दुधाचं उत्पन्न मिळेल. दूध धंदा करायचा नाही असं पूर्वीच ठरवलं होतं. म्हशीला वर्षाचे ३६५ दिवस खाऊ घालावं लागतं, पण ती दूध २४० दिवस देते, हे कळल्यावरच मी तसं ठरवून टाकलं होतं. पण मला अशी एक माहिती कळली, ज्यामुळे मी माझा निर्णय बदलला. म्हशीचं पारडू वर्षभराचं झालं की म्हैस दूध देणं बंद करते ते परत पिलू होईपर्यंत. गवळी लोकांना अशी म्हैस ठेवणं परवडत नाही. ते अर्ध्या किमतीला म्हैस विकून टाकतात व व्यायल्यावर मूळ किमतीला परत घेतात. एक वर्ष म्हैस बाळगायच्या खर्चापेक्षा हा फरक कमीच असतो. हे कळल्यामुळे पुन्हा एकदा हुरळून गेलो. आपल्याच जमिनीतलं गवत देऊन म्हशी वाढवायच्या. त्यामुळे खर्च नाही. शिवाय त्यांच्यापासून शेणखत मिळणार! पावसाळ्यानंतर गोठा बांधला अन् अशा तीन म्हशी घेऊन टाकल्या. 

म्हणजे काजू, आंबा, सुपारी (तिला दोन वर्षं सावली लागते, म्हणून तेवढ्याच केळी, त्या बागेत अननस, मिरी) ही झाडं, भात-भुईमूग अन् म्हशी एवढा प्रपंच तयार झाला. १० टक्के झाडांचं निरीक्षण करायचं, तरी गवत, दगड, जाळी यांतून ५-६ तास हिंडायला लागायचं. या सगळ्याची देखभाल करायची, हवं- नको पाहायचं, सांगितलेली कामं त्याच पद्धतीने करायची, त्याच्या नोंदी ठेवायच्या, या साऱ्या कामांसाठी माणसाची गरज होती. शेतीची जुजबी माहिती असलेला, वेगवेगळ्या सरकारी योजना, विद्यापीठातील सुधारित जाती यांची माहिती घेईल असा माणूस दोन वर्षं शोधूनही मिळाला नाही. मग एक एमएस्सी ॲग्रि. असणाऱ्याला अर्धवेळ कामावर ठेवलं. दोन महिन्यांनी काहीही काम न करता तो सोडून गेला. हाच प्रकार पुढे दोन वर्षांत आणखी दोनदा घडला. आता लक्षात येतंय, आंबा व काजू व त्यातही त्यांची खतं व रासायनिक फवारण्या सोडून तिघांनाही बाकी काहीही ठाऊक नव्हतं. माहीत करून घ्यायची इच्छाही नव्हती. आपल्या शिक्षणव्यवस्थेने निर्माण केलेले हे कारागीर आहेत. हा कारागीर जेवढा जास्त ‘सुशिक्षित' तेवढं त्याच्या ज्ञानाचं (?) क्षेत्र आक्रसलेलं! असो. 

अनेक वर्षं शेतजमीन पड असल्यामुळे भात बरं आलं, पण कोकणातल्या भारी जमिनीत भुईमूग दहा टक्केही आला नाही. भात बासमतीच्याहून महाग अन् भुईमुग काजूच्या किमतीत पडला. 

हेही वाचा - किडनीला हमीभाव मिळालाच पाहिजे

गांडूळ खत हा सेंद्रिय शेतीमधला परवलीचा शब्द बनला आहे. त्याची माहिती घेतली. शेती खात्याकडून त्यासाठी एक हजार गांडुळं मिळतात. ती मिळाली. गाईचं शेण अन् गोमूत्र यांच्या फायद्याविषयी बोलणारे खूपजण भेटतात. म्हणून दोन गावठी गाई घेतल्या. त्यांच्यापासून संकरित कालवडी मिळतील हा हेतू होताच. गांडूळ खत बनवण्यासाठी जी शेड लागते तिचा खर्च दहा-पंधरा हजार रु. येत होता. एवढा खर्च करणं मनाला पटेना. विचार करायला लागलो. गांडुळं मातीतून खाली जाऊ नयेत म्हणून पक्की जमीन अन् वाढीसाठी सावली, एवढ्या दोन गोष्टी आवश्यक आहेत हे मला कळलं. योग्य मापाचं प्लास्टरिंग करून चार ओटे तयार केले. सावली कसली करावी? वेलीची! पण वेली वाढायला वेळ लागेल. मग जवळच्याच हर्णे मच्छी बाजारातून जुनी वापरलेली जाळी किलोच्या भावात आणली. लाकडी खांब रोवले. त्यावर जाळी बसवली. झाली गांडुळांसाठी शेड! महिना-सव्वा महिन्यात उत्कृष्ट गांडूळखत तयार झालं. गेले तीन वर्षं मी गांडूळ खत वापरतोय; पण ओलावा, सावली, खाद्य असलेल्या माझ्या सुपारीबागेतही गांडुळं वावरताना काही दिसत नाहीत. गांडूळ खताविषयीही भरपूर मतं-मतांतरं आहेत. काहींचं म्हणणं, ही परदेशी प्रजातीची गांडुळं आहेत. ती आपल्या इथे कृत्रिम, सुरक्षित वातावरणातच वाढतात. एक तज्ज्ञ मला म्हणाले. “ही गांडुळं खताबरोबर जमिनीत जातात. तिथे मरतात. त्याचं खत होतं. म्हणून जमिनीची सुपीकता वाढते.” अजून नक्की मत देण्याएवढा अनुभव माझ्याकडे नाही, पण ही जर वस्तुस्थिती असेल, तर हे सामान्य शेतकऱ्याच्या फार फायद्याचं तंत्र नाही. 

त्याच सुमारास व्हॅनिलाबद्दल वाचनात आलं. केरळ-कर्नाटक किनारपट्टीच्या व्हॅनिला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्या वर्षी एकरी पन्नास-पंचावन्न लाख रुपये मिळाले होते. पहिला विचार मनात आला, केरळ- कर्नाटकात जर व्हॅनिला येतं, तर कोकणात नक्की येणार! मग व्हॅनिलाबाबत शोधाशोध सुरू केली. ‘विद्यापीठात व्हॅनिलावर संशोधन चालू आहे आणि त्याचे अधिकृत निष्कर्ष पाच वर्षांनंतर जाहीर होतील' असं उत्तर मिळालं. शेतीमध्ये दर दोन-तीन वर्षांनी नवीन लाट येते अन् त्यात लगेच उतरणारे पैसे मिळवतात; मात्र हे दर पाच वर्षं टिकणारे नाहीत एवढं नक्की समजलं होतं. मग मीच मिळेल तेवढी माहिती गोळा करून दापोलीतल्या दोन मान्यवर बागायतदारांना पाठवली. पाठपुरावा केला. समक्ष भेटीत परत तेच उत्तर : ‘पंडित, कोकणात आंबा-काजू-सुपारीशिवाय कशातही पैसा मिळत नाही. उगाच हात पोळून घेऊ नका.' 

पण मी वेगळ्या अडचणीत होतो. काजूचं उत्पन्न पुन्हा फक्त २०-२५ किलोच मिळालं होतं. मोहराने भरलेली झाडं एक-दोन अवेळी पावसाने काळी पडलेली बघून जीव हळहळला होता. काजूतून मिळेल तेवढं उत्पन्न घेणं किंवा भरमसाट रासायनिक फवारण्या करणं, हे दोनच पर्याय माझ्यासमोर होते. अन दोन्ही मला पटत नव्हते. त्यामुळे व्हॅनिला लावून काही मार्ग निघतो का, असा मी विचार करू लागलो होतो. कितीही कमी दर मिळाला तरी आंबा-काजूपेक्षा त्यात जास्तच उत्पन्न मिळेल, असंही मला वाटत होतं. त्यामुळे माझ्या शेतात व्हॅनिलाची लागवड करून टाकली. व्हॅनिला करण्यामागे हुकमी आणि लवकर उत्पन्नाचा माझा शोध होता.

पण येणाऱ्या अनुभवांमुळे मला असं वाटू लागलं होतं, की झाडांपेक्षा पशुपालनच सेफ आहे! त्यामुळे मी शेळीपालन करायचं ठरवलं. कोकणात गिऱ्हाईक शेळीला शोधत येतं, त्यामुळे हा धंदा बरा ठरेल, असंही स्वत:ला पटवत होतो. एक शेळी दोन वर्षांत तीन पिल्लं देते, सहा महिन्यांत ते पिल्लू विक्रीयोग्य होतं, हे विचारामागचं सूत्र होतं. आधुनिक, शास्त्रीय, खर्चिक, पशुपालनापेक्षा काही खर्च न करता मिळेल ते उत्पन्न घ्यायचं ही पारंपरिक पद्धत मला फायदेशीर वाटत होती. त्याप्रमाणे १३-१४ शेळ्यांचं एक युनिट विकत घेतलं. सहा महिन्यांत त्या धंद्यातले बारकावे-खुब्या लक्षात येऊ लागले. एक हुशार कष्टाळू माणूस अन् किमान पन्नास शेळ्यांचं युनिट असेल तर हा फायदेशीर धंदा होऊ शकतो असं लक्षात आलं. पण तेवढ्यात माझ्या एका (कोकणीच) आजोबांनी कळवलं की, ‘आपण मांसविक्रीचा धंदा करणं योग्य नाही.' मी मांस-मटण खातो, तरीही पहिली शेळी विकताना, आपणच वाढवलेला प्राणी कापण्यासाठी विकायचा, या कल्पनेने मीही अस्वस्थ झालो होतोच. त्यामुळे हळूहळू करून सगळ्या शेळ्या विकून टाकल्या आणि शेळीपालन या कल्पनेतून बाहेर पडलो.

जमीन ज्याच्याकडून घेतली त्या दीपकने सांगितलं होतं, “कोकणात बाग करण्यासाठी चौथं ते सातवं वर्षं अतिशय खडतर असतं. पहिला उत्साह आणि जास्तीचे पैसे संपलेले असतात, नवीन खर्च दिसत असतात अन् उत्पन्न कुठेच दिसत नसतं. या काळात जो टिकला तो जिंकला.” मला याचा चांगलाच प्रत्यय आला. जमिनीचा व्यवहार, मित्रांच्या जमिनीसाठी मी गुंतवलेले पैसे आणि शेती उभी करण्यासाठी केलेली गुंतवणूक यामुळे जवळपास जेरीला आलो होतो. त्याहून वाईट म्हणजे ज्या धंद्याच्या बळावर मी या शेतीच्या उड्या मारत होतो तो मंदावला होता; दोन-तीन वर्षांत बंद पडणार असं वाटू लागलं होतं. इकडे शेतीतही कुठलंही काम अर्धवट केलं तर नंतर दामदुप्पटीने खर्च करावा लागतो हे कळू लागलं होतं. कर्ज काढून शेती करायची नाही, असं का कुणास ठाऊक, मी ठरवलं होतं. मानसिक स्वास्थ्य अन् त्यामुळे शारीरिक ताकद कमी करणाऱ्या काही घटनाही सातत्याने घडत होत्या. त्यातच एक गाय साथीच्या रोगाने मेली, एक म्हैस आजाराने. दुसरी म्हैस गाभण नाही हे तिला आणल्यावर सहा महिन्यांनी लक्षात आलं. तिसरी म्हैस व्यायल्यानंतर अपेक्षित दूध देत नाही, म्हणून मालकाने न्यायची नाकारली. त्यामुळे प्रश्न न सुटता त्यांचा गुंता वाढतच चालला होता. त्यातच मला अनुभवातून हे कळून चुकलं होतं, की हंगामी पिकं (भाजीपाला, भात, कलिंगडं), म्हैसपालन, शेळीपालन या कोणत्याही उपक्रमातला मजुरीचा खर्च जोडला तर यातला कुठलाच व्यवसाय (कोकणात तरी) फायदेशीर होत नाही. या निष्कर्षाला पोचल्यानंतर मग मी अनिच्छेनेच का होईना पण कृषीपर्यटनाकडे वळलो.

आपल्या मित्र-परिचितांनी शेतावर राहावं, तिथल्या जगण्याची मजा घ्यावी, (माझं कौतुकही करावं!) असं पहिल्यापासूनच वाटायचं. काही घरचे, मित्र नियमित येतही. पण तिथे हॉटेल-रिसॉर्ट करावं असं मनातून वाटत नव्हतं. अनोळखी माणसांना ‘एंटरटेन' करण्याचा माझा स्वभावही नाही. पण दुसरा काही इलाज दिसेना. मग चित्रकार मित्रांकडून घराची जागा निवडली, डिझाइन तयार करून घेतलं. चौपाखी, कौलारू घर फारच खर्चिक होत होतं, म्हणून साधंच, (पण या वेळी सुंदर) घर बांधून झालं.

पुण्यात ‘निसर्ग पर्यटन' करणारे चार-पाच परिचित होते. घर बांधण्यापूर्वी सगळ्यांनी तोंडभरून आश्वासनं दिली होती. येणाऱ्या माणसाची खऱ्या अर्थाने निसर्गाची जवळीक, ग्रामसंस्कृतीशी परिचय होईल असं पॅकेज तयार करून त्यांना भेटलो. दोन-चार मीटिंग्जनंतर त्यांचं (न बोललेलं) म्हणणं लक्षात आलं. ‘निसर्ग, पर्यावरण यांचं रक्षण-संवर्धन कुणी तरी करावं, आम्हाला स्वस्तात स्वस्त पॅकेज द्या, हा निसर्ग विकून आम्ही पैसे-नाव-श्रेय मिळवतो!' त्यांचा हा दृष्टिकोन लक्षात आल्यानंतर हाही नाद सोडून दिला आणि ‘निसर्ग पर्यटन' या कल्पनेतूनही बाहेर पडलो.

आता मागे वळून पाहताना असं वाटतं, की शहरी माणसांना शेतीविषयी जी मर्यादित समज असते तीच माझ्यामध्ये असल्यामुळे मीच माझी गोची करून घेतली. मी एकापाठोपाठ एक अनेक गोष्टी करत गेलो. एक जमली नाही की दुसरी. दुसरी परवडली नाही की तिसरी. खरं पाहता पैशाच्या मागे लागून मी हे करत नव्हतो. अविचारानेही मी असं वागलो असं वाटत नाही. शेतीचं एक यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी मॉडेल तयार करण्याची माझी धडपड होती. निसर्गाच्या जटिल साखळीतले अनुकुल दुवे समजून, वापरून एक नवी प्रणाली तयार करण्यातला आव्हानाचा नि निर्मितीचा आनंद फार मोठा असतो. 

पण काहीही केलं तरी शेती फायदेशीर ठरत नाही हे शरद जोशींचं म्हणणं कळायला मला काही वर्षं जावी लागली. शेती किंवा पशुपालन यांत मजुरी खर्च मिळवला की तुम्ही तोट्यात गेलाच समजा! त्यातच नवीन, वेगळं, फायदेशीर वगैरे करण्याच्या प्रयत्नात मी एकाच वेळेस अनेक गोष्टी करत होतो. शेती उभी करताना आणि प्रत्यक्ष करतानाही खूप खर्च निघत असतात, हे आधी माहीत नव्हतं. त्यामुळे आज काय विहीर वाढवायला पाहिजे; उद्या, म्हैस मेली- तिला पक्का गोठा हवा होता; परवा, सुपारी वाढत नाही, त्याची बांधबंदिस्ती केली पाहिजे... असे रोज नवे खर्च निघत राहतात. या खर्चांमुळे मी तर पार गांगरून नि भांबावून गेलो होतो. 

पण हाडाचा आशावादी असल्यामुळे म्हणा आणि ताकदीबाहेर जाऊन खर्च न करण्याची व्यापारी अक्कल शिकल्यामुळे असेल म्हणा, मोडून पडलो नाही. हळूहळू भानावर आलो. लक्षात आलं, की एक गोष्ट परवडत नाही यावर नवीन काही करणं हा उपाय नाही, तर आहे ती गोष्ट समजून, चांगल्या पद्धतीने करणं हा उपाय आहे. मला दुसरा साक्षात्कार झाला, की माझं शेतीचं पुस्तकी ज्ञान, पोपटपंची यामुळे शेती चांगली होणार नाहीये, तर माझी आर्थिक कुवत, प्रत्यक्ष कृती अन् काम करणाऱ्या माणसांची समज, क्षमता याने शेती घडणार आहे. हा साक्षात्कार झाल्यानंतर ठरवून नवीन शेतीविषयक वाचन आणि बडबड बंद केली. झाडांचं ‘दाभोळकर पद्धतीने' नीट निरीक्षण करू लागलो. त्यांच्या वाढीची पद्धत, ऋतुमान समजून घेऊ लागलो. माझ्या पुढच्या खेपेपर्यंत होतील एवढीच कामं माणसांना देऊ लागलो. वेगळं काही करायचं असेल तर स्वतः उभं राहून करून घेऊ लागलो.

आता आमची काजू-सुपारींची वाढ चांगली आहे. खूप कमी खर्चात आम्ही उत्तम गांडूळखत तयार करतो आहोत. पूर्वी थोड्या प्रमाणात लावलेल्या मिरी, व्हॅनिला, सुगंधी गवत यांतून चांगलं उत्पन्न मिळत असल्याने तेच मोठ्या प्रमाणावर वाढवत आहे. या साऱ्यामुळे येत्या दोन-तीन वर्षांत माझी शेती पैसे देऊ लागेल अशी आशा वाटू लागली आहे.

शेतीच्या आघाडीवर कितीही चढ-उतार पाहिले आणि मार खाल्ला, तरी शेतावर राहण्याचा आनंद मी पुरेपूर मिळवला. वीज नसलेल्या घरात राहणं, उघड्यावर अंघोळ करणं, चुलीवरचं जेवण करणं, कंदिलाच्या प्रकाशात वावरणं, असं स्वप्नातलं साधं जगणं मी माफक भोगून घेतलं. शेतावर असलो की चुलीवरचा भात, आमटी, अंडं, सुकट, फार तर एखादी भाजी असा मेनू असतो. पण माझी जीभ खोड्याळ आहे. मग मी माझ्या ‘स्टाफ'ला पार्टी देतो. म्हणजे पाच-सहा जणांसाठी चिकन, किंवा मोऱ्यांच्या घरून मच्छी, तांदूळ-नाचणीची भाकरी. खाली शेतात आता साधंच पण प्रशस्त घर बांधलं आहे, पण मला माणसांच्या सोयीसाठी, सोबतीसाठी त्यांच्यात राहणं बरं वाटतं. त्यातली मजा काही और असते.

पावसाच्या दिवसांत बोलणं ऐकूच येत नाही. कोसळता पाऊस, वारा अन् बेडकांची गुंगी आणणारी नाना प्रकारची आवर्तनं, पावसाआधीचं काजव्यांचं लखलखणं, हे सारं प्रत्यक्ष अनुभवण्यासारखंच असतं. शिवाय पीक-पाणी, जनावरं, घरगुती सुख-दुःख यांच्या गप्पा मी ऐकत राहतो. या माणसांचं जगणं पाहून लहान मुलांची भातुकली पाहावी असा मुग्ध होतो. ग्रामीण भारतीय माणसाचा शहाणपणा, जाण, त्याची सहनशक्ती, निसर्गचक्राशी जोडलं गेलेलं त्यांचं जगणं आणि त्यांचे सावध व्यवहारज्ञान याविषयी मोठमोठ्या लोकांनी भरभरून लिहिलं आहे ते पहिल्या रांगेत बसून बघतो.

दिवसातला काही वेळ एकटं असणं ही माझी गरज आहे. उन्हाळ्यातल्या कलत्या संध्याकाळी झाडाखाली बसून दूर क्षितिजापर्यंत नुसता बघत बसतो. तास-दोन तास करवंदाच्या जाळ्यांमधून हिंडत पोट भरेपर्यंत मातीच्या सुवासाची, उन्हाने तापलेली टपोरी करवंदं निवडून निवडून खातो. शरदातलं चांदणं कसं बहरत जातं त्याचा अनुभव घेतो. पावसाळ्यात एखादवेळी छत्री-रेनकोट फेकून चिंब भिजून घेतो. अंगावर शिरशिरी उठते. पार्श्वभूमीला आमच्या दोन ओहोळांची खळखळ अन् त्यावर नाना जातीच्या पाखरांच्या स्वरांची नाजूक किलबिल चालू असतेच. या सर्व स्वप्नातीत स्वर्गीय आनंदामुळे हिशोब, राहिलेली कामं, पुढचं प्लॅनिंग, एवढंच काय, घडतंय ते साठवावं, शब्दबद्ध करावं याची आसही संपून जाते. एखाद्या झाडासारखं, पक्षासारखं जे घडतंय ते नि:शब्दपणे भोगत राहावं, एवढाच विचार मनात येत राहतो.

हा सारा आनंद, समाधान उपभोगत असतानाच शेती करण्याच्या माझ्या प्रयोगात मी ‘शिकलो'ही बरंच काही. शेती किफायतशीर कशी करता येईल, ही गोष्ट तर अनुभवातून मी शिकलोच, परंतु आपल्या प्रयोगातून लहान का होईना पण शेतीचं एक चांगलं किफायतशीर रोल मॉडेल उभं राहील, इतपत विश्वास माझ्यात तयार झाला. निसर्गाची ओढ मला पूर्वीपासूनच होती. शेती करायला लागल्यावर कळलं, की मी पूर्वी तिकडे फक्त पार्श्वभूमी म्हणून बघत होतो. आता मला त्यातले गुंतागुंतीचे परस्परसंबंध कळू लागले आहेत. ते कल्पकतेने जास्त सुयोग्य प्रकारे जोडून जास्त समृद्ध निसर्ग उभा निर्माण करू शकतो हे जाणवू लागलंय. या निर्मितीचा आनंद फार मोठा आहे. शहरी भागात गेल्या एक-दोन वर्षांत जागेच्या किमती प्रचंड वाढल्या. त्या पार्श्वभूमीवर ‘हॅ! मग तुझ्या इथे काहीच ॲप्रिसिएशन नाही झालं,' अशा वाक्यावर आता मी वाईट वाटून घेत नाही. दुसऱ्यांच्या गैरलागू मोजमापांनी स्वतःला मोजायची गरज आता मला वाटेनाशी झाली आहे.

‘वा! दोन-तीन हजार झाडं लावलीस तू!' असं म्हणणारेही भेटतात. कुणीही एक माणूस निव्वळ पैशांच्या बळावर एवढी झाडं ना जगवू शकत, ना वाढवू शकत. निसर्ग अन् तिथे प्रत्यक्ष काम करणारी माणसं यांच्या साथीशिवाय ते अशक्य आहे, हे मला आता पक्कं उमगलंय.

‘अच्छा! म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेती करत असणार!' असं अनेकजण सहज म्हणून जातात. हाही खरा फार मोठा विषय आहे, पण थोडक्यात सांगतो. सेंद्रिय शेती करणं अतिशय सोपं आहे, (खत घ्यायला परवडत नाही, असे कोट्यवधी शेतकरी सेंद्रिय शेतीच करत असतात.) पण फायदेशीर सेंद्रिय शेती करणं तेवढंच अवघड आहे. कारण ती प्रमाणित पद्धतीने (एवढं खत द्या, असं पाणी द्या, इ.) करताच येत नाही. त्यासाठी जमिनीचा प्रत्येक तुकडा, प्रत्येक पीक, प्रत्येक ऋतू यासाठी गणितं बनवावी, बसवावी लागतात. त्यासाठी त्या पिकाचा सखोल अभ्यास, कुशाग्र निरीक्षण, कल्पक प्रयोग, काही वर्षं थांबायची तयारी अन् मुख्य म्हणजे स्वतःला पूर्णतः झोकून देणं एवढ्या गोष्टी किमान आवश्यक असतात. कधी तरी ते करायचं आहे, पण आज तरी खतांचा आवश्यक, योग्य वापर अन् विषारी रसायनांचा कमीत कमी वापर करणं हे सूत्र मी पाळतो.

अजून काय करायचंय त्याची यादी अर्थात खूप मोठी आहे. कोकणातल्या वनस्पती, पशुपक्षी, कीटक यांची चांगली माहिती करून घ्यायची आहे. (पण हे आयुष्यभराच्या अभ्यासाचे विषय आहेत हे आता उमगलंय. त्यामुळे मिळेल तेवढी माहिती घेतो, समजून घेतो आणि मला ठाऊक आहे तेवढं इतरांना सांगतो.)

आमची माणसं रात्री खेकडे, मासे पकडायला जातात. बारा तास उन्हातान्हात कष्ट केल्यावर रात्री परत पाच-सहा तास ‘चेंज' म्हणून शिकारीला जातात. मला त्यांच्याबरोबर रात्री भटकायचं आहे. कातकऱ्यांना बोलतं करायचंय. त्यांचं जगणं, त्यांची जंगलविद्या समजून घ्यायची आहे.

गेली दोन वर्षं ‘बचतगट' सुरू करायचा प्रयत्न करतो आहे; पण मी सोडून इतर कुणालाच त्याची गरज वाटत नाहीये. तरीही असे ‘बचतगट', ‘शेतकरी चर्चागट' तयार करायचेत. शाळेतल्या मुलांसाठी, त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी करायच्या आहेत.

काय करायचंय याची यादी अशी बरीच मोठी आहे. पण शेती करण्याच्या मागच्या पाच वर्षांत मला जे शोध लागले ते सांगायलाच हवेत. पहिला शोध म्हणजे मी किती कोषात, एकांगी नि सुरक्षित जगत होतो हा अन् दुसरा शोध म्हणजे आजची आपली अर्थव्यवस्था किती दुटप्पी, असंघटितांच्या शोषणावर आधारलेली आहे हा.

फार खोलात जात नाही, पण कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं, शेतकऱ्यांनी शेतातला उभा ऊस जाळून टाकणं, दूध उत्पादकांना आंदोलनासाठी दूध रस्त्यावर टाकून द्यावं लागणं, ही दृश्यं केवळ हिमनगाचा भाग आहेत हे माझ्या पक्कं लक्षात आलं आहे. अजून किती काळ चालेल ते मला माहीत नाही. मी काही क्रांती वा सर्वनाशाची भाकितं करण्याएवढा मोठा माणूस नाही. मीही तुमच्यासारख्याच या व्यवस्थेची फळं चाखणारा, स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपणारा माणूस आहे. तरीही मला वाटत राहतं, की या परिस्थितीत आपण काय करू शकतो? सर्वांत पहिलं मी असं म्हणेन, की आपल्या धावपळीच्या जगण्यातून थोडी सवड काढून लेबलं-हेडलाइन्स, ‘ब्रेकिंग न्यूज'च्या थोडं बाहेर पडून या माणसांचं जगणं आपण समजून घेऊ शकतो. आपण तेवढंही करणार नसू, तर शहरी विकासाचे लाभ घेणाऱ्या आपल्याला गुन्हेगारी, प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, बकाली याविषयी बोलायचासुद्धा अधिकार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसाच्या उद्योजकतेचा नि आर्थिक यशाचा झेंडा आज अर्ध्या जगात फडकत असताना समाजसेवा म्हणून नाही, तर व्यवसाय म्हणून, आव्हान म्हणून १० लाख रुपये अन् पाच वर्षं घालणारी शंभर माणसं असतील, तर फळ-अन्नप्रक्रिया, शेतीआधारित उद्योग, जीवनोपयोगी शिक्षण, पशुपालन, वनाधारित उद्योग अशा माध्यमांतून कोकणचा कायापालट होणं काही अवघड नाही. कायापालट म्हणजे कोकणाचा कॅलिफोर्निया करणं नव्हे. ते मॉडेल कधीच आऊटडेटेड झालंय. काही कंपन्यांच्या मालकीची लाखो एकर शेती, वेठबिगारीच्या पातळीवर जगणारे मेक्सिकन मजूर अन् रसायनं-विषारी औषधांनी जोपासलेली फोफशी दिखाऊ फळं-भाज्या हे काही चांगलं नाही. परंतु तशाच धर्तीवरच्या हजार-हजार एकरांच्या आंबा बागांच्या योजना कोकणात येऊ घातल्या आहेत. कोकणचं जैववैविध्य नष्ट करून, यांत्रिक-रासायनिक आंबा बागांनी काहीशेजण गब्बर होण्याची शक्यता आहे. अन् तेव्हाच शक्यता आहे काही हजार कुटुंबं बेरोजगार आणि भूमिहीन होण्याची. या घडामोडीला मी विकास मानत नाही. जास्तीत जास्त जणांचं, जास्तीत जास्त प्रकारे (फक्त आर्थिक नाही) भलं घडवेल तो विकास, असं मी आता मानू लागलो आहे.

हा बदल माझ्यात कशामुळे झाला?... अर्थात शेतीचा अनुभव घेतल्यामुळेच!

(अनुभव दिवाळी, २००७ च्या अंकातून साभार.)

श्रीनिवास पंडित







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results