
समजा मराठीचा गंधही नसलेली बाई महाराष्ट्रातल्या मुलाशी लग्न होतंय म्हणून ‘फाडफाड मराठी शिका’टाईप पुस्तकातून थोडंफार मराठी शिकली आणि तिला फक्त अहिराणी किंवा फक्त झाडीबोली बोलत असलेल्या भागात जाऊन डॉक्टरकीची प्रॅक्टिस करावी लागली तर काय होईल?
अगदी तशीच अवस्था माझी झाली. मी ‘फाडफाड कन्नड शिका’ असली एक लहानशी पुस्तिका वाचून, थोडंफार कानडी शिकून इकडे आले होते. अगदी एका महिन्यात ठरलं होतं, की प्रॅक्टीस मराठवाड्यात नाही तर कर्नाटकात करायचीय. आणि मग इथल्या बोलीभाषेची ओळख होण्यापूर्वीच आम्ही इकडे स्थायिक झालो.
अशा परिस्थितीत जम बसवणं तसं सोपं नव्हतं. पुस्तिकेतून थोडंफार कन्नड लिहायला आणि वाचायला शिकले होते, पण बोलायला काही यायचं नाही. OPD ची सुरुवात तर केली, पण बऱ्याचदा पेशंटच्या नातेवाईकांपैकी कुणाला हिंदी येत असेल तर हिंदीच्या जीवावरच काम भागवत होते.
४०-५० टक्के OPD मुस्लिम लोकांची होती, त्यामुळे तिथे प्रश्न यायचा नाही. त्यांना तर माझी हिंदी इतकी शुद्ध वाटायची, की ‘आप दिल्ली से हो क्या?’ असं ते विचारायचे.
एकीकडे चुकतमाकत कानडी शिकत होते. मी आणि माझा नवरा एकत्रच प्रॅक्टीस करायचो. ॲडमिट पेशंटच्या नातेवाईकांना काऊंसेल करायचं असेल तर मी नवऱ्याला बोलवायचे. मी सांगणार, तेच नवरा पुन्हा एकदा कानडीत सांगणार, असं काऊंसेलिंग चालायचं. पण OPD त मात्र आम्हा दोघांच्या वेळा एकच असल्याने मलाच किल्ला लढवावा लागायचा. मग मी स्टाफला बोलावून दुभाषेगिरी करायला लावायचे.
पूर्वी ‘केसं कापलेली’, कन्नड न येणारी, बारीकशी मुलगी, ती पण मुंबईत शिकून आलीय, म्हटल्यावर ‘बॉम्बे डॉक्टर’ म्हणून ॲडवांटेजही मिळायचा. आजूबाजूचे बरेच RMP वगैरे ‘बॉम्बे डॉक्टर’, ‘बडी मॅडम’ म्हणून पेशन्ट्सना माझ्याकडे पाठवायचे. असे पेशन्ट्स आत यायचे आणि अक्षरशः ‘नी इद्दे डॉक्टर’ म्हणून परत जायचे!
पण हळूहळू जम बसत गेला. माझं आकारमान आणि डोक्यावरचे केसही बरेच वाढले. त्यात कन्नडही सुधारलं असं वाटल्याने मी कॅान्फिडंटली ओपीडी काढू लागले. पण माझं कन्नड गोरगरीब पेशंट्स आणि कामाला येणाऱ्या बायका यांच्याकडून आत्मसात केलेलं आहे. त्यामुळे मी अगदी गावठी कानडी बोलते. सुशिक्षित लोक माझं बोलणं ऐकतात तेव्हा ‘एवढी डॉक्टर झालेली बाई असं काय बोलते..!’ असा चेहरा करतात. मग मी इंग्लिश सुरू करते.
आता कन्नड तसं सुधारलं असलं तरी माझे जुने, पहिले कानडी पेशंट माझ्याशी हिंदीच बोलतात. पराक्रमच तसे केलेत मी..
एकदा गावातल्या एक बाई नवऱ्याबरोबर आल्या. त्यांच्या पोटात अधूनमधून दुखत होतं. त्यांना काही लॅब टेस्टस् आणि सोनोग्राफी करायला सांगितलं. सोनोग्राफीचे रिपोर्ट्स दाखवायला त्या एकट्याच आत आल्या.
मी सांगितलं- ‘‘एनु दोड्ड प्रॉब्लेम इल्ला, वंद सण्ण स्टोन इदे ई साईडिग किडन्याग.’’ ( फार काही मोठा प्रॅाब्लेम नाही, या साईडला किडनीत एक लहानसा स्टोन झालाय.) ‘उजवा’, ‘डावा’ यांसाठीच्या कानडी शब्दांत माझा अजूनही गोंधळ होतो. मी सरळ ‘राईट’ , ‘लेफ्ट’ म्हणते किंवा हाताने दाखवते.
‘‘स्टोन? स्टोन अंते?’’ त्यांनी विचारलं. (स्टोन? स्टोन म्हणजे काय?)
घ्या आता. स्टोन म्हणजे काय यांना कानडीत काय सांगू? तरी माझं सगळं कानडीचं ज्ञान पणाला लावून सांगितलं, ‘‘स्टोन अंते हळा आग्याद री. सण्ण हळा इदे, औषधी कुडतिनी, ताने होगतूद’’ (स्टोन म्हणजे खडा झालाय, हो. लहानसा खडा आहे, औषध देते, स्वतःच पडून जाईल.)
तरी त्या बाई काहीच न कळल्यासारखं तोंड करून विचारू लागल्या, ‘‘हळा?’’
‘जल्ला, चुकलां का काय? हळा नाय, हुळा म्हणतात की काय?’ असा विचार करून म्हटलं, ‘‘स्टोन अंत हुळा, सण्णू हुळा आग्याद’’
ते ऐकताच त्या बाई ‘ये अव्वा!’ करत टुणकन खुर्चीवरून उठल्या आणि धावत दरवाजा उघडून बाहेर बसलेल्या नवऱ्याला म्हणाल्या, ‘‘री, जल्दी बर्री, नोड री येन हेळताळा अकी’’ (अहो, लवकर या हो, ही बघा काय म्हणते)
नवरा धावत आत आला. ‘काय झालं?’ त्याने घाबरत विचारलं. मी पुन्हा सांगितलं- ‘‘सण्णु स्टोन इदे किडन्याग, अंजद अपले येन इल्ला’’
त्याला स्टोन म्हणजे काय ते माहित होतं. तो बायकोला वैतागत म्हणाला, ‘‘सण्ण हळा इदे हेळताळा, नी याक अंजते?’’ (छोटासा स्टोन आहे म्हणतायत त्या. एवढी काय घाबरतेस?)
तेवढ्यात ‘हळा’ हा शब्द कन्फर्म झाला आणि मग पुढची ट्रीटमेंट लिहून झाली.
औषधं दाखवायला बाई नवऱ्यासह पुन्हा आत आल्या. त्या परत परत विचारत होत्या- “हळा ने अदा अल्ला, होगतूद अल्ला, येनु आगल्ला अल्ला?’’ (खडाच आहे ना नक्की? जाईल ना? काही होणार नाही ना?)
नंतर त्या बाई पूर्ण बऱ्याही झाल्या. त्यांची एवढी घाबरगुंडी का उडाली होती सांगू? कानडीत ‘हळा’ म्हणजे लहान दगड , खडा आणि ‘हुळा’ म्हणजे किडा. ‘तुमच्या किडनीत लहानसा खडा झालाय’ याऐवजी ‘तुमच्या किडनीत एक किडा झालाय’ हे ऐकल्यावर कुणीही घाबरणारच.
त्यामुळे माझे त्या काळातले म्हणजे १०-१२ वर्षांपूर्वीचे पेशंट ओपीडीत आले आणि मी कानडी बोलायला लागले की अजून सांगतात, ‘‘राहू दे, राहू दे, तुम्ही हिंदीतच बोला. नायतर मराठीत बोला, आम्हाला कळतं.’’
***
सुरुवातीच्या दिवसात पुस्तिकेतल्या भाषिक ऐवजावर ओपीडीत चालून जायचं. मोठी पंचाईत व्हायची ती ॲडमिट पेशंटसाठी.
त्यावेळी आम्ही दुसऱ्यांच्याच एका लहानशा हॉस्पिटलात पेशंट ॲडमिट करायचो. लहानमोठ्या आजाराचे पेशंट असतील तर नातेवाईकांच्या प्रश्नांना मला उत्तरं देता यायची. पण आजार गंभीर असेल, पेशंट बरा होण्याचा कोणताही भरवसा नसेल तर अशा वेळी नातेवाईकांच्या प्रश्नांचा मला अर्थच कळायचा नाही.
आमच्या काउंसेलिंग-कम-ओपीडी रूममध्ये एका बाजूला मी, एका बाजूला माझा डॉक्टर नवरा आणि समोर त्या पेशंटचे नातेवाईक असायचे. आधीच या लोकांना ‘बाई’ सिरीयस केस बघतायत यातही थोडी भिती वाटतच असायची.
‘‘तुमचा पेशंट खूप सिरीयस आहे, दोन-तीन दिवस काही खात्रीने सांगता येणार नाही. काय करायचं ते ठरवा, नाहीतर हैद्राबादला घेऊन जा.’’ असं काही सांगितल्यावर एकदम इमोशनल होत, रडत त्यातला एखादा म्हणायचा- ‘‘अक्कावरे, नाऊ भाळ बडव इद्देव, मुंद होगलाक हादी ईल्ला. नमकडे यष्ट अदा अष्ट रोक्का हाकतेव, आमेले नाऊ हॅंग नू बदुकतेव. नम्म पेशंट इरतान के साय तान खुल्ला हेळ री, नम यावदू बेळकू तोरस री’’
आधीच कानडी, त्यात बिदरी ॲक्सेंटमधून हे धाडधाड प्रश्न आल्यावर माझी तर बोलतीच बंद व्हायची. कोण बडवे, कोण बदक, कसली साय, कसलं बेडकू, काय काय समजायचं नाही. मी प्रचंड काळजीयुक्त चेहरा करून त्यांच्याकडे बघायचे आणि माझा पल्मोनॅालॅाजिस्ट नवरा अगदी टिपीकल बिदरी टोनमध्ये (खरंतर त्यातल्याही अगदी इंटर्नल खेड्यात आणखीन वेगळाच ॲक्सेंट आहे) त्यांना समजवायचा- ‘‘काही काळजी करू नका, आमच्याकडून सगळे प्रयत्न करू. या जिल्हा पातळीवर होईल तितके सगळे प्रयत्न करू. असे कित्येक पेशंटस मॅडमनी यापूर्वी ट्रीट केलेत. आम्ही दोघं आहोत ना. काही काळजी करू नका.’’
एका फटक्यात भाषिक आपलेपणा, आत्मविश्वास आणि पेशंटच्या नातेवाईकांना पुरूष डॉक्टरही बघतायत याचं बरं वाटावं म्हणून दिलेला ‘केवळ या एकट्या मॅडम नाही, तर मी ही असेन’ हा दिलासा. नातेवाईक ते ऐकून शांत होऊन जायचे.
पेशंटच्या त्या कानडी संवादाचा अर्थ असा-
‘ताईसाहेब, आम्ही फार गरीब (बडिवे) लोक आहोत. पुढे जायला- हैद्राबादला मोठ्या हॅास्पिटलात जायला- मार्ग (हादी) नाही. आमच्याकडे जेवढे आहेत तेवढे सगळे पैसे घालतो. नंतर आम्ही कसेही जगू (जीवन - बदुक, आम्ही जगतो - नाऊ बदुकतेव). पण आम्हाला सरळसरळ सांगा आमचा पेशंट राहिल की मरेल (सायतान), काही प्रकाश (बेळकु) दाखवा.’
‘फाडफाड कानडी शिका’टाईपच्या पुस्तिकांमधून हे भाषिक आपलेपण शिकता येत नाही!
डॉ. स्वाती कामशेट्टे | drswatikam@gmail.com
एम डी, मेडिसिन