आम्ही कोण?
मुलाखत 

झाडा-पिकांना पाणी देण्याची पद्धत बदलावी लागेल. एयर इरिगेशन स्वीकारावं लागेल. - मनोहर खके

  • सोमिनाथ घोळवे
  • 20.08.25
  • वाचनवेळ 4 मि.
air irrigation in maharashtra manohar khake

जागतिक तापमान वाढीमुळे हवेतील आर्द्रतेचं प्रमाण कमी होत आहे. त्याचा झाडं आणि पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. कृषितज्ज्ञ मनोहर खके वेगवेगळे प्रयोग करून या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी शोधलेला एक उपाय म्हणजे एअर इरिगेशन! एअर इरिगेशन म्हणजे काय आणि ते पिकांसाठी का महत्त्वाचं आहे याबद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा..

झाडांना, पिकांना जमिनीतून पाणी देणं ही आपली पारंपरिक पद्धत आहे. पण तुम्ही गेली अनेक वर्षं एअर इरिगेशनचा आग्रह धरत आहात. एअर इरिगेशन म्हणजे नेमकं काय?

एअर इरिगेशन म्हणजे हवेत ओलावा तयार करणं. सध्याच्या सिंचन प्रक्रियांमध्ये एकतर झाडांना जमिनीशी पाणी घातलं जातं किंवा झाडांवर पाण्याची फवारणी केली जाते. त्याऐवजी झाडाच्या भोवती हवेत पाण्याची फवारणी करण्याला एअर इरिगेशन म्हणतात. यामध्ये तुलनेने पाणी कमी लागतं. हवेतील आर्द्रता वाढवणं हा त्यामागचा उद्देश असतो. लक्षात घ्या, हवेत ओलसरपणा नसता तर झाडं जगली नसती आणि वाढलीही नसती. कारण झाडं, वनस्पती हवेतील ओलाव्यावर स्वतःचं पोषण करून घेत असतात.

थोडक्यात सांगायचं तर मातीतलं इरिगेशन हे स्पून फीडिंग आहे. तर एअर इरिगेशन हे मदर फीडिंग आहे. पिकांना, झाडांना स्पून फीडिंग केलं की झाडांची वाढ खुंटते. मदर फीडिंग केलं की त्यांना हवं तेवढं पाणी ते घेतात. त्यांची भरपूर वाढ होते, प्रतिकारशक्ती वाढते.

जमिनीतील पाणी हे निकडीच्या प्रसंगासाठी आवश्यक असतं. उदाहरणार्थ उन्हाळ्यात हवेतला ओलावा कमी पडेल तेव्हा पाणी द्यायचं. पण आपल्याकडे आज पाऊस थांबला की उद्या पाणी द्यायला सुरुवात केली जाते.

एअर इरिगेशन हवेतील आर्द्रता वाढवतं. आर्द्रता इतकी महत्त्वाची का आहे?

हवा, प्रकाश, अंधार, ऊन-वारा, पाऊस हवेतील आर्द्रता हे सगळे नैसर्गिक घटक आहेत. यातील एक जरी घटक संपला वा मर्यादेपेक्षा कमी झाला, तर केवळ मानवच नव्हे तर सर्व जीवसृष्टीचं जीवन धोक्यात येतं. एवढे दिवस हवेतील आर्द्रता सहज मिळत असल्यामुळे तिचं अस्तित्व जाणवत नव्हतं. परंतु आता जागतिक तापमानवाढीमुळे ही आर्द्रता कमी होत चालली आहे. जैव विज्ञानानुसार, बहुतेक सजीवांना योग्य पद्धतीने वाढवण्यासाठी/जगण्यासाठी हवेमध्ये सर्वसाधारणपणे ४० टक्क्यांच्या आसपास आर्द्रता आवश्यक असते. परंतु जागतिक तापमान वाढ आणि कृत्रिम विकासाच्या भ्रामक कल्पना यामुळे पावसाळा सोडला तर इतर काळात हवेमध्ये १०-१५ टक्केच आर्द्रता असते. शिवाय दरवर्षी हे प्रमाण कमी होत चाललं आहे.

याचा परिणाम म्हणून हिवाळ्यात दव पडणं दिवसेंदिवस कमी होत आहे. आधी हवेतील धुलीकण आर्द्रतेमुळे खाली बसत; ते आता हवेत तरंगत राहतात. श्वासोच्छ्वासाद्वारे ते फुप्फुसात जाऊन दम्यासारखे आजारही वाढत आहेत. झाडांच्या पानांवर धूळ साचून प्रकाशसंश्लेषण क्रियेवर परिणाम होतो. फुलांचं फळांमध्ये परिवर्तन होणं लांबतं.

हवेतील आर्द्रता कमी झाल्याने झाडांना पोषणतत्त्वंही कमी मिळू लागली आहेत. अलीकडे पाऊस पडून गेल्यानंतरही हवेत फक्त दोन-तीन दिवसच ओलसरपणा राहतो. चौथ्या दिवशी हवा कोरडी झालेली असते. पूर्वी जमिनीला एप्रिल-मे महिन्यात भेगा पडत. त्या आता नोव्हेंबरमध्येच पडू लागल्या आहेत. पाऊस जमिनीत पाणी भरून ठेवतो. पण आठ दिवस पाऊस झाला नाही, तर कोरडी हवा जमिनीतील पाणी काढून घेते. पूर्वी जमिनीला पाणी कमी पडलं तर जमीन हवेतून पाणी शोषून घ्यायची. आता उलट होऊ लागलं आहे. त्यामुळे जमीन झाकून ठेवण्याची वेळ आली आहे. एअर इरिगेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. फक्त यामध्ये अपटेक इंडेक्सचा विचार करणं गरजेचं आहे.

अपटेक इंडेक्स म्हणजे काय?

प्रत्येक झाडाचा अपटेक इंडेक्स असतो. झाडाच्या पानांचं क्षेत्र किती पाणी बाहेर फेकणार आहे, तेवढं पाणी मुळातून पाठवण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली असते. त्याला अपटेक इंडेक्स म्हणतात. बाकी पाणी हवेच्या आर्द्रतेच्या रूपाने घेतलं जातं. मात्र तापमान वाढीमुळे पानातून जास्त पाणी बाहेर जाऊ लागलं आहे. त्यामुळे झाडांना मुळातून मिळणारं पाणी कमी पडू लागलं आहे. उदा. एक झाडं आहे. ते मुळातून एक एचपी पाणी घेतं आणि पानांतून बाहेर टाकतं. मात्र आता दोन एचपी पाणी बाहेर पडू लागलं आहे. त्या झाडाची दोन एचपी पाणी शोषण्याची क्षमताच नसेल तर हे पाणी कुठून येणार? त्यामुळे जमिनीत पाणी असूनही झाड वाळतं.

एअर इरिगेशनसाठी कोणती साधनं वापरली जातात?

तुषार सिंचन (स्प्रिंक्लर), मायक्रो स्प्रिंक्लर, रेनगन, रेनपाईप अशा साधनांचा यासाठी उपयोग केला जातो. हंगामी पिकांसाठी मायक्रो स्प्रिंक्लर उत्तम आहेत. तर फळपिकांसाठी रेनगन उपयोगी पडते. अलीकडे रेनपाईपही आला आहे. त्याचा परिणाम दिसतो, पण त्यामार्फत पाणी जास्त वाया जातं.

झाडांना एअर इरिगेशन करण्याची योग्य वेळ कोणती?

त्या त्या वनस्पतीच्या वाण, प्रकारानुसार एअर इरिगेशन करावं लागतं. स्थानिक परिस्थिती आणि अभ्यासानुसार ते समजू शकतं. तापमानवाढीचा विचार करता सर्व एअर इरिगेशन सूर्यास्ताच्या नंतरच करायला हवं. कारण सूर्याची भट्टी पेटलेली असताना कितीही एअर इरिगेशन करा, त्याची वाफच होणार. सूर्यास्तानंतर मात्र हवा एकदा ओली केली तर रात्रभर टिकते. शिवाय दिवसा एअर इरिगेशन केल्यास वनस्पतीला शॉक बसण्याची शक्यता असते. आगीपेक्षा वाफेचा शॉक जास्त असतो. त्यामुळे दिवसा एअर इरिगेशन न करणंच श्रेयस्कर.

https://www.youtube.com/@manoharkhake2439

key insights-

This article presents an interview with agricultural expert Manohar Khake, who discusses his innovative concept of air irrigation. He explains how this technique can be a vital solution for water scarcity and the adverse effects of global warming on agriculture.

सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com

सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

G v केंचे 24.08.25
खूप छान लेख आहे.... अडचणी येत आहेत कारण सायंकाळपर्यंत current असते पण नंतरच्या काळात हे सर्व प्रकार शक्यता जमत नाही... काहीतरी नवीन वगले पर्याय उपलब्ध आहेत का.

दिगंबर श्री चरपे 24.08.25
नमस्कार ह्या कल्पनेचा... भौगोलिक परिस्थिती चा विचार करून ह्यातही विशेषत कोरडवाहू भागात पावसाळ्यात पाणी साठवण करत ह्या साठ्याचा वापर करत जर हे हवाई सिंचन व्यवस्था केली गेली तर कितीतरी भागात बागाईत क्षेत्रा पेक्षा ही सरस कामगिरी होऊ शकते... ह्या साठी तालुका स्तरावर प्रात्यक्षिक करून दाखवत हे होऊ शकते हे शेतकर्यां च्या गळी ऊतरवावे लागेल.. (चांगली गोष्ट ही सगळीच ऊतरावी लागते.. चालचलाऊ सहज रुळते) येणार्या काळाची ही गरज आहे. 👍👏🥰

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results