दादा गांगुर्डे यांचा गेल्या पंचवीस वर्षांतला उद्योजकीय प्रवास एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटासारखा आहे. इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे त्यांच्या ‘अवी ब्रॉयलर्स'च्या प्रवासात आर्थिक तेजी-मंदी, कर्जाचे डोंगर, व्यावसायिक पेच, असह्य मानसिक ताण आणि जीवघेणी स्पर्धा असा सगळा थरार आहेच. त्याचसोबत बर्ड फ्ल्यू, चिकनगुनिया, सार्स असे साथीचे आजार, कोरोनासारखी महामारी, टाळेबंदी आणि गोध्रा हत्याकांडाच्या धार्मिक दंगलीपर्यंतचे अनपेक्षित धक्केही आहेत. हे सगळे धक्के पचवत दादा गांगुर्डे आज खंबीरपणे उभे आहेत. मागच्या आर्थिक वर्षातली ‘अवी ब्रॉयलर्स'ची उलाढाल पाचशे एकवीस कोटी रुपये इतकी आहे. आता भारताबाहेरही त्यांच्या व्यवसायाचा विस्तार आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यामध्ये सोग्रस नावाचं छोटं गाव आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या गावामध्ये अवघी दीडशे घरं आहेत. त्यातल्याच एका घरामध्ये दादा गांगुर्डे यांचा जन्म झाला. तसं त्यांचं मूळ नाव श्रीकृष्ण आहे, पण ते घरात थोरले असल्यामुळे त्यांना दादा म्हणायला सुरुवात झाली, आणि मग ते सगळ्यांसाठीच दादा झाले. गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दादांचं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं आणि पुढे बारावीपर्यंतचं शिक्षण तालुक्याच्या गावी म्हणजे चांदवडला झालं. घरी थोडी कोरडवाहू शेती होती. शिवाय दादांना शेतीची आवडही होती. त्यामुळे त्यांनी शेतीशिक्षणासाठी दापोलीच्या शेती महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे बी.एससी (हॉर्टिकल्चर) आणि एम.एससी (ॲग्रिकल्चर) केलं.
दादांचे वडील म्हणजे एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी वडिलोपार्जित शेती करत कुटुंबाची प्रगती केली, मुलांना शिकवलं. ज्या कारखान्यात ते शिपाई म्हणून काम करत होते त्याच ठिकाणी व्यवस्थापकीय संचालकापर्यंत पोचले होते. शरद जोशी यांच्या ‘शेतकरी संघटने'त ते सक्रिय होते. त्यांना जन्मत: पोलिओ झाल्याने ते एका पायाने अधू होते; पण या शारीरिक मर्यादेचा परिणाम त्यांच्या धडाडीवर आणि कार्यक्षमतेवर झाला नाही. दादांवर वडिलांच्या या खंबीर व्यक्तिमत्त्वाचा खोल प्रभाव होता.
1993 साली दापोलीला शिक्षण पूर्ण झाल्यावर दादांना बड्या शेतकी कंपनीत उत्तम पगाराची नोकरी आणि जीवनभराची सुरक्षितता मिळाली असती. स्पर्धा परीक्षा देऊन राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये अधिकारपदावर काम करण्याचीही त्यांना संधी होती; पण त्यांनी गावी राहून शेती करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - मासळी व्यापाराची अनोळखी वाट : दीपक गद्रे
सुरुवातीची मदत किंवा भांडवल म्हणून वडिलांनी दादांना दहा लाख रुपये दिले. दादांनी त्यातून ट्रॅक्टर घेतला, इतर अवजारं घेतली. शेतात विहिरी खणल्या. कॉलेजात शिकलेल्या ज्ञानाच्या आधारे पिकाचं नियोजन केलं. मुख्य म्हणजे गडीमाणसांच्या बरोबरीने शेतात स्वत: घाम गाळला. पहाटेच्या काळोखात ते शेतात पोचायचे. दिवसभर उन्हात काम करून रात्री उशिरा थकून घरी परतायचे. त्यांचे कष्ट त्यांच्या पत्नीला पाहवत नसत. पत्नीचा नेहमी आग्रह असे- “इतकं चांगलं शिक्षण झालंय तर मग असे काबाडकष्ट का करता? त्यापेक्षा एखाद्या मोठ्या कंपनीत काम करा. तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल आणि पगारही चांगला मिळेल.” दादा ते म्हणणं कानाआड करत; कारण त्यांना शेतीत काही तरी करून दाखवायचं होतं.
दादा राबत राहिले, पण यशाचा कौल त्यांना मिळालाच नाही. शेतीचा त्यांचा प्रयत्न तोट्यात गेला. दादा आणखी पैसे मागण्यासाठी पुन्हा वडिलांकडे गेले. तेव्हा त्यांचा आणि वडिलांचा झालेला संवाद मोठा गमतीशीर होता.
“अजून जरा पैसे हवे होते.” दादांनी वडिलांकडे मागणी केली.
“याआधी दिलेल्या पैशांचं काय झालं?” वडिलांचा सवाल.
“शेतीत नुकसान झालं. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी पैसे हवेत.” दादाचं स्पष्टीकरण.
“मी देऊन देऊन किती पैसे देणार? तुमचा चित्रपट पुन्हा पडला तर काय करायचं?” वडिलांचा जवळजवळ आरोपच.
“अपयश आलं त्याला मी जबाबदार नाही. मी हौसमौज, विश्रांती वगैरे सगळं बाजूला ठेवून अहोरात्र काम केलं. कष्टामध्ये कुठेही कमी पडलो नाही. माझा पिक्चर पडला असेल तर त्याला तुमची कमजोर कथा कारणीभूत आहे. कथा आणि पटकथा दमदार नसेल तर चित्रपट पडणारच.” दादांचं अनपेक्षित प्रत्युत्तर.
“मी शेती करायला सांगितली हे बरोबर आहे. माझ्या कथेमध्ये दम नसेल तर तुमची कथा वापरा. मी पुन्हा पैसे देतो; पण या वेळी अपयश आलं तर जबाबदारी माझी नाही. कारण कथा माझी नसेल.” एवढं सांगून वडिलांनी आणखी पैसे दिले.
पैसे हातात आल्यावर दादा विचारात पडले. कारण आता त्यांना स्वत:च कथा-पटकथा लिहायची होती. चित्रपट मनाप्रमाणे बनवायचा होता आणि यशस्वीही करायचा होता. शेतीशिवाय काही तरी करावं, पण गावातच राहून करावं असं त्यांना वाटत होतं. गोठा उभा करून दुधाचा व्यवसाय सुरू करावा असा एक विचार सुरू होता. त्यासाठीची प्राथमिक तयारीही झाली होती. त्याच दरम्यान पुण्यातील ‘वेंकीज' या नामवंत कुक्कुटपालन कंपनीच्या एक सुपरवायजरशी त्यांची भेट झाली. गोठ्यापेक्षा कोंबडीपालनाचा व्यवसाय किफायतशीर असल्याचं त्या सुपरवायजरने सुचवलं. नवीन कथा-पटकथा लिहायचीच आहे तर मग डेअरीऐवजी कुक्कुटपालनाची लिहून पाहू, असा विचार करून त्यांनी ‘वेंकीज'कडून अडीच हजार पक्षी (कोंबडीची पिल्लं) विकत घेऊन व्यवसाय सुरू केला. तो दिवस होता 19 जानेवारी 1997. या कथेला उत्तम यश आलं. अवघ्या चाळीस दिवसांत दादांना 65 हजार रुपयांचा फायदा झाला. त्यांचा व्यवसायाचा शोध तिथे संपला. कुक्कुटपालन हाच व्यवसाय करण्याचं पक्कं झालं.
हेही वाचा - सुहासिनी आणि यतिन शहा : सोलापूरचे जागतिक उद्योजक
कोणत्याही विषयाचा आधी सखोल अभ्यास करायचा आणि एकदा का तयारी पूर्ण झाली की धडाकेबाज पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायची असा दादांचा स्वभाव आहे. ‘भान ठेवून नियोजन करा आणि बेभान होऊन अंमलबजावणी करा' असं सांगणाऱ्या बाबा आमटे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. (1984 साली शालेय वयात असताना बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो'मध्ये यात्रेमध्ये काही अंतरासाठी ते सहभागी झाले होते.) तर ‘वेंकीज'कडून कोंबडीची पिल्लं घ्यायची, त्यांची निगराणी करायची आणि त्यांच्या मोठ्या कोंबड्या झाल्या की चांदवडच्या चिकनच्या दुकानात नेऊन त्या विकायच्या, असा दादांचा क्रम चालू झाला होता- ‘वेंकीज'सोबत काम करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांप्रमाणे.
पण एके दिवशी या व्यवसायाला वेगळंच वळण मिळालं. चांदवडच्या चिकन दुकानदाराकडून 12 हजार रुपये येणं होतं म्हणून रूटिन वसुली करण्यासाठी दादा चांदवडला गेले होते. तिथे त्यांच्यासारखे इतरही काही शेतकरी उधारीची वसुली करण्यासाठी आलेले होते. तो दुकानदार या सगळ्यांकडून उधारीवर माल घेत होता आणि ग्राहकांना रोखीने विकत होता. त्यानंतर यथावकाश शेतकऱ्यांना त्यांचे पैसे देत होता. शिवाय तो उत्तम नफाही मिळवत होता. दादांच्या लक्षात आलं, की कोंबड्यांची पिल्लं पाळण्यापेक्षा चिकन विकण्यात किती तरी जास्त नफा होता. ते झपाटल्यासारखे गावी परत आले. चांदवडला चिकनचं दुकान टाकायचा निर्धार त्यांनी केला.
उद्योजकाची अस्वस्थता काय असते याचा अनुभव पुढचे काही दिवस त्यांनी घेतला. ते रात्र-रात्र जागेच असायचे. ‘तुमचं स्वप्न ते नव्हे जे तुम्ही झोपेत पाहता, तर तुमचं स्वप्न ते जे पूर्ण करण्यासाठी तुमची झोप उडते' हे अब्दुल कलामांचे शब्द दादा जणू जगत होते. कोंबड्यांचं उत्पादनही आपण करायचं आणि पुढे किलोच्या भावाने चिकनही आपणच विकायचं, असं त्यांनी ठरवून टाकलं. आणि अखेर एक दिवस टपरी टाकण्यासाठी आवश्यक सामान त्यांनी टेम्पोत भरलं आणि चांदवडच्या बाजारपेठेत दुकान थाटलं. या दुहेरी व्यवसायामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भरीव वाढ झाली. त्यांचा ‘अवी ब्रॉयलर्स'चा पिक्चर बॉक्स ऑफिसवर उत्तम गल्ला गोळा करायला लागला!
दादांच्या उद्योजकीय हुशारीचा चांदवड बाजारातला एक प्रसंग सांगितलाच पाहिजे. चिकनविक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातून त्यांनी आणखी टपऱ्या टाकण्याचं नियोजन केलं. एक-एक करत त्यांच्या चांदवडमध्ये 13 टपऱ्या झाल्या. ते स्वत:च उत्पादक आणि किरकोळ विक्रेता असल्यामुळे छान आर्थिक गणित बसलं होतं. पण गावातल्या इतर दुकानांनीही आपल्याकडूनच कोंबड्या घ्याव्यात असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी स्वत:च्या तेरा टपऱ्यांमध्ये बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात चिकन विकायला सुरुवात केली. त्यामुळे बाकीच्यांचा बाजार उठायचीच वेळ आली. अपेक्षेप्रमाणे काहीच दिवसांत सगळे त्यांच्याकडे मांडवलीसाठी आले. सगळ्यांनी त्यांच्याकडून कोंबड्या विकत घेतल्या तर दादा कमी भावांत चिकन विकणार नाहीत असं ठरलं. त्यायोगे दादांच्या कोंबड्यांची विक्री अनेक पटींनी वाढली. दररोज एक टन मालाची विक्री होऊ लागली.
हेही वाचा - चॉकलेट जायंट चंद्रकांत मोरडे
मात्र, ऐन भरात आलेल्या या व्यवसायाला 2002 साली भयानक प्रकारे ब्रेक लागला. गुजरातमध्ये धार्मिक दंगली सुरू झाल्या. इतर राज्यांमध्ये त्याचे हिंसक पडसाद उमटले. चांदवडलाही त्याची झळ पोचली. दादांच्या टपऱ्या जाळण्यात आल्या. तिथे काम करणाऱ्या मुलांना बेदम मारण्यात आलं. त्यामुळे काही मुलं गाव सोडून पळून गेली, तर काही जायबंदी झाली. त्यानंतर नुकसानभरपाई म्हणून शासनाने प्रत्येक टपरीमागे 500 रुपये इतकी रक्कम दादांना दिली. कोणत्याही उद्योजकाच्या उमेदीवर पाणी फिरवणारा हा अनुभव. व्यवसायात चढ-उतार असतातच; पण गोध्रा दंगल हा प्रकार त्याहून वेगळा होता. पुढचे काही दिवस दादा चांदवडमध्ये फिरत होते. ‘हे विष कालवू नका. आधी आपण माणूस आहोत. जात-धर्म नंतर आहे' असं ते सर्वांना कळवळून सांगत होते.
त्याच्या आधी दोन वर्षं, म्हणजे 2000 साली ‘अवी ब्रॉयलर्स'च्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला होता. ‘वेंकीज'सोबतच आणखी काही कंपन्यांकडूनही दादा कोंबड्यांची पिल्लं घेत होते, पण मागणीप्रमाणे पुरवठा होत नव्हता. वर्षातल्या काही सणांच्या काळात चिकनला खूप मागणी असते. नेमक्या त्याच काळात या कंपन्यांकडून पिल्लं मिळत नसत. कारण त्या कंपन्या स्वत:च्या मर्जीतल्या लोकांना जास्त पिल्लं देत आणि श्रावणात मागणी घटते तेव्हा इतरांना जास्त पिल्लं घ्यायला भाग पाडत. या प्रकारामुळे दादा पार वैतागले होते. त्यावर उपाय म्हणून त्यांनी स्वत:च पिल्लं तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हॅचरी म्हणजे अंडी उबवणी केंद्र सुरू करण्याची तयारी केली. पण त्यासाठी मोठ्या रकमेची यंत्रसामुग्री लागणार होती. ते एकट्यादुकट्याचं काम नव्हतं. त्यावर उपाय म्हणून त्यांनी आणखी सहाजण गोळा केले. सातजणांनी मिळून हॅचरी सुरू करण्याचं ठरलं. सात शेतकरी एकत्र येऊन कंपनी सुरू करत असल्याचं पाहून दादांच्या वडिलांना विशेष आनंद झाला. शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलनांमधून सुटणार नसून त्यांनी स्वत:चे मार्ग स्वत:च शोधले पाहिजेत असं त्यांचं मत होतं.
सातजणांनी मिळून बँकेचं कर्ज काढलं. दादा वगळता बाकी सगळेजण वयस्कर होते. त्यांच्या त्यांच्या व्यवसायात स्थिरस्थावर होते. दादा एकटेच तरुण होते. नव्याची नवलाई म्हणतात तसं वर्ष-दोन वर्षांत बाकी मंडळींचा उत्साह ओसरला. तोपर्यंत भारी प्लान्ट उभा करण्यात बराच खर्च झाला होता. बँकेचं कर्ज बेचाळीस लाखांवर पोचलं होतं. हातात मालमत्ता मात्र फक्त बावीस लाखांची होती. दिवाळखोरी जाहीर करावी, सगळी मालमत्ता बँकेकडे जमा करून मोकळं व्हावं, असा इतरांचा विचार होता. दादांना हा मोठा धक्का होता. त्यांच्या करियरची नुकतीच सुरुवात झाली होती. अजून खूप काही करायचं होतं. या वयातच बँकेचं कर्ज बुडवल्याचा शिक्का कपाळावर बसला तर नंतर कोणी कर्ज देण्याची शक्यता नव्हती. दादांनी सारासार विचार केला. वाद घालत बसण्यात हशील नव्हता. सगळं कर्ज त्यांनी स्वत:च्या डोक्यावर घेतलं. पुढच्या काही वर्षांत ते पूर्ण फेडलं. व्यवसाय दादांच्या एकट्याच्या मालकीचा झाला. हॅचरी व्यवस्थित चालू लागली. आता सर्व काही सुरळीत होईल असं चित्र दिसू लागलं; पण पुन्हा घात झाला.
2005 झाली बर्ड फ्ल्यूची साथ आली. भारतातल्या कुक्कुटपालन व्यवसायाला या साथीचा मोठा फटका बसला. दादांच्या व्यवसायाची आर्थिक गाडी पुन्हा घसरली. बँकेकडून घेतलेलं खेळतं भांडवल संपलं. देणेकऱ्यांचे तगादे वाढू लागले. शासनाने केलेली मदत पुरेशी नव्हती. पण युनियन बँकेचे अधिकारी मदतीला धावून आले. त्या अधिकाऱ्यांनी दादांना त्वरित टर्म लोन आणि कॅश क्रेडिट उपलब्ध करून दिलं. बर्ड फ्ल्यूप्रमाणेच पुढे चिकनगुनिया आणि सार्सच्या काळातही युनियन बँक त्यांच्या पाठीशी उभी राहिली. दादांच्या आजवरच्या यशामध्ये बँकांच्या सहकार्याचा हात महत्त्वाचा आहे.
हेही वाचा - व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला
2007 साली कुक्कुटपालन व्यवसायामध्ये तेजी आली. दादांनी अर्थातच त्याचा पुरेपूर फायदा उठवला. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलेलं नाही. 2025 पर्यंत अकराशे कोटींचा टप्पा ओलांडण्याचा दादांचा इरादा आहे.
अनेक चटके सहन केलेल्या दादांच्या वाट्याला सध्या ‘यशस्वी उद्योजका'चं सुख आलेलं आहे; पण त्यांच्यातला उद्योजक निवांत व्हायला तयार नाही. कोंबड्यांचं स्वत:चं वाण तयार करण्याचा म्हणजे स्वत:ची प्युअर लाइन तयार करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. ते झपाटून कामाला लागले. त्यांनी अनेक तज्ज्ञांच्या भेटी घेतल्या. भरपूर पुस्तकं गोळा केली. त्याच दरम्यान आलेली कोरोना टाळेबंदी दादांसाठी इष्टापत्ती ठरली. घरात बसून त्यांनी सगळी पुस्तकं वाचली. नोट्स काढल्या. कोरोनानंतर वातावरण पूर्ववत झाल्यावर दादांनी सगळा प्लॅन प्रत्यक्षात आणला. त्यासाठी खर्चही खूप होता आणि कष्टही बरेच होते; पण दादा मागे हटले नाहीत. अर्थात त्याची फळंही त्यांना मिळत आहेत. भारतातल्या फार कमी कंपन्या भारताबाहेर जाऊन माल विकू शकतात. स्वत:चं ओरिजनल ब्रीड तयार केल्यामुळे दादा त्यांपैकी एक ठरले आहेत. नुकतीच त्यांना नायजेरियात मोठी ऑर्डर मिळाली आहे. केनियामध्ये चाळीस एकर जागा घेऊन प्लान्ट उभा करण्याचं काम ते सुरू करत आहेत, जेणेकरून संपूर्ण आफ्रिकेमध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करणं शक्य होणार आहे.
‘अवी ब्रॉयलर्स'मध्ये सध्या दररोज पाचशे टन ब्रॉयलरचं उत्पादन केलं जातं. त्यासाठी सुमारे चौदाशे कर्मचारी आणि कामगार काम करतात. शेतकरी, अल्पभूधारक, भूमिहीन आणि शेतमजुरांच्या मुला-मुलींना घराजवळ कामं मिळाली आहेत. त्यात आदिवासी, बहुजन, दलित आणि अल्पसंख्याक अशा वेगवेगळ्या समाजांतले तरुण-तरुणी आहेत. सगळेजण गरीब कुटुंबांतून आलेले आणि कमी शिक्षण झालेले आहेत. सोग्रससारख्या दीडशे उंबऱ्यांच्या गावात राहून चौदाशे लोकांना रोजगार देणं ही फार मोठी गोष्ट आहे. दादांविषयी आवर्जून सांगण्यासारखी बाब म्हणजे नोकरी मागायला आलेल्या कोणालाही ते विन्मुख पाठवत नाहीत; कोणत्या ना कोणत्या प्रकारचा रोजगार देतातच. ही एक प्रकारची ‘दादा रोजगार हमी योजना' आहे असं म्हणायला हरकत नाही.
कंपनी चालवण्यासाठी दादांनी स्वत:ची टीम उभी केली आहे. अर्थात त्यांच्या कामामध्ये त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा आहे. त्या कंपनीचा संपूर्ण अर्थव्यवहार आणि मनुष्यबळ विकास विभाग एकहाती सांभाळतात. त्यामुळे दादांना त्या आघाडीवर काळजी नसते. अस्सल उद्योजकाप्रमाणे ते फक्त धोरणात्मक बाबी आणि व्यवसायविस्तार या दोनच गोष्टींमध्ये लक्ष घालतात. आजवरच्या वाटचालीविषयी दादा समाधानी जरूर आहेत, पण अल्पसंतुष्ट अजिबात नाहीत. कारण व्यवसायविस्तारासाठी अवघं जग त्यांना खुणावतं आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचं, तर पिक्चर अभी बाकी है दोस्त!
कोंबड्यांची विशुद्ध प्रजाती (प्युअर लाइन)
1990 सालानंतर तीव्र व्यापारी स्पर्धात्मक मानकांवर टिकू शकतील अशा पक्षीप्रजनन कार्यक्रमांद्वारे कुक्कुटपालन क्षेत्रात मोठीच सुधारणा झाली. मांसाकरता आणि अंड्यांकरता कोंबड्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींचं संगोपन मोठ्या प्रमाणावर केलं जाऊ लागलं. तोपर्यंत मांस आणि अंडी अशा दुहेरी उपयोगाच्या जातींचीच चलती होती.
कुक्कुटप्रजननामध्ये अंत:प्रजनन आणि संकरित प्रजनन या दोन महत्त्वाच्या प्रजनन पद्धती आहेत. विशिष्ट गुणवत्ताधारी जातीच्या पक्ष्यांचं अनेक पिढ्या अंत:प्रजनन करून तो गुणधर्म संकराकरता वापरल्यास पुढील पिढ्यांकडे तो प्राधान्याने संक्रमित होतो. त्यातून विशुद्ध प्रजाती तयार होते.
दादा गांगुर्डे यांनी स्थानिक वातावरणात टिकून राहू शकेल अशा भारतीय मूळ असलेल्या कुक्कुटप्रजातीची निर्मिती केली आहे. कुक्कुटव्यवसायात कोंबडीचं वजन, कुक्कुटखाद्याचं मांसात होणारं परिवर्तन, अंड्याचा आकार आणि वजन, एका कोंबडीतर्फे दिली जाणारी अंडी, अंड्यांचा रंग इ. गुणधर्म महत्त्वाचे मानले जातात. इच्छित गुणधर्मांचं योग्य प्रमाणात मिश्रण करून मांसासाठीच्या व अंड्यांसाठीच्या कोंबड्यांचं पद्धतशीर प्रजनन करण्याचं तंत्र ‘अवी ब्रॉयलर्स'मध्ये यशस्वीरीत्या राबवलं जात आहे. विशेष म्हणजे मक्याच्या विविध जातींतील गुणधर्म निवडपद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर कुक्कुटप्रजनन प्रक्रियेत करण्यात येतो. या सर्व प्रक्रियेमध्ये जनुकशास्त्र, संख्याशास्त्रीय विश्लेषण व संगणकाधारित प्रारूपबांधणी यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो.
भारतात अन्य मोठ्या कुक्कुटउद्योगात परदेशी मूळ असलेल्या कुक्कुट प्रजाती वापरल्या जातात. अशा प्रजातींच्या निर्यातीवर निर्बंध आहेत, परंतु अवी ब्रॉयलर्सच्या विशुद्ध प्रजातींवर असे कोणतेही प्रतिबंध नाहीत. अवी ब्रॉयलर्सने या दिशेने उत्तम प्रगती केली असून, आता आफ्रिकेतील काही देशांत निर्यात सुरू केली आहे.
(अनुभव, जून २०२३ च्या अंकातून साभार)
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.
