
महाकुंभ हा १४४ वर्षानंतर एकदाच येणारा प्रसंग. त्यानिमित्ताने सर्व देशभर समाज माध्यमांमध्ये अनेकांना व्यक्त होण्याची संधी देणारा हा सोहळा गेल्याच आठवड्यात संपला. शासकीय आकडेवारी प्रमाणे ६६ कोटी जणांनी संगमांच्या घाटावर स्नान केले. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने निम्मी शिरगणती पूर्ण केली असंही म्हणता येईल! २०११ मध्ये शेवटची जनगणना झाली. तेव्हापासून भारताची लोकसंख्या मोजायला सरकारला वेळ होत नाहीय. कुंभाच्या निमित्ताने निदान ५० टक्के तरी काम झालं असं म्हणता येईल.
परंतु ६६ कोटींचा हा आकडा कुठून आला त्याची पुरेशी माहिती व स्त्रोत कळलेले नाहीत. तो आकडा खरा असेल तर निम्मा देश प्रयाग संगमावर जाऊन सुखरूप घरी परतला असं म्हणावं लागेल. परंतु तिथल्या चेंगराचेंगरीत नक्की किती जण मृत झाले याचा नेमका आकडा बाहेर आलेला नाही. एरवी आटोकाट स्पर्धा करणाऱ्या, बातम्यांची भांडी फोडण्यासाठी तू-तू मी-मी करणाऱ्या सर्व माध्यमांची जणू या प्रसंगी कोण किती मूग गिळून बसू शकतो अशी उलटीच स्पर्धा सुरू होती. (तीच गोष्ट दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी आणि तिथल्या मृतांच्या आकड्यांबद्दलही)
प्रयागराजचं नियोजन कसं उत्तम होतं, सर्व कसं शिस्तीत पार पडलं, हा कसा अभूतपूर्व अनुभव होता याचे अनेक किस्से व्हॉट्सअप वरून फिरत होते. त्यामुळे तिथली प्रचंड गर्दी, वाहनांच्या २०-२५तास खोळंबलेल्या रांगा आणि हे सर्व आनंदाने सहन करण्याची वेगळी अनुभूती इत्यादीचंही भरपूर समर्थन या निमित्ताने झालं. माझ्याच परिचयातील निदान पाच तरी मित्रांनी सहकुटुंब या यात्रेचा आनंद घेतला आणि कुंभाचं भरभरून कौतुक केलं. त्यातील वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या एका कुटुंबाला मी विनोदाने म्हटलं की, ‘अरे गेली ३५ वर्ष तुम्ही अनेकांची शारीरिक दुःख दूर करण्यासाठी तुमची तज्ज्ञता पणाला लावली आहे. कित्येकांना बरं केलं आहे. त्यातून कितीतरी पुण्य तुम्हाला मिळालं आहे. आता नवीन कोणतं पुण्य मिळवायचं राहिलं आहे?’ यावर त्यांचं उत्तर होतं- ‘आस्था आणि श्रद्धा’.
आणखी एका परिचितांनी तिकडून परत आल्यानंतर मित्रमंडळींमध्ये साखरफुटाणे, चुरमुरे असा प्रसाद वाटला. सर्वसाधारणपणे अशा वेळेस त्या प्रसादाचं भक्तिभावाने सेवन करायचं असतं. कारण त्यामागे समोरच्याची श्रद्धा असते. त्यामुळे प्रश्न न विचारता आम्ही सर्वांनी तो प्रसाद वाटून खाल्ला. निघताना त्या मित्राने विचारलं की तुला रेती हवी आहे का? क्षणभर माझ्या डोक्यात काहीच प्रकाश पडला नाही. मग लक्षात आलं की प्रयागराजच्या संगमावरची रेतीही तो श्रद्धेने घेऊन आला होता आणि तिचंही हितचिंतकांमध्ये वाटप चाललं होतं.
यानिमित्ताने मग मीही माझे तर्कसंगत विचार आणि सोयी-गैरसोयीच्या श्रद्धा-अंधश्रद्धा याबद्दल विचार करू लागलो. ऐंशीच्या दशकात केरळमध्ये असताना शबरीमाला या अय्यप्पा स्वामीच्या जंगलातील मंदिरात मी माझ्या मल्याळी मित्रांबरोबर गेलो होतो. रात्रभराचा बस प्रवास, पहाटेच्या थंडीत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंबा नदीमध्ये गार पाण्यात अंघोळ, आणि मग अय्यप्पाच्या नावाचा गजर करत दोन तीन तासाची डोंगरातली चढण चढून गेल्यानंतर देवळातलं दर्शन असा तो एक भारावलेला अनुभव होता.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी दिल्लीत असताना नवरात्रीत अतोनात गर्दीत वैष्णव देवीच्या यात्रेतही मी जाऊन आलो आहे. अनायसे शनिवार-रविवारची सुट्टी आल्याने गेलो. १२-१४तास रांगेत थांबून गर्दीचा अनुभव घेत वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर डिसेंबरच्या ऐन कडाक्याच्या थंडीत त्याच वैष्णवदेवीला जेमतेम पन्नास शंभर भाविक असतानाही मी पुन्हा एकदा जाऊन आलो.
कन्याकुमारी ही तर माझी आवडती जागा. तिथली कन्याकुमारी देवीची मूर्ती, गाभाऱ्यातले मंद तेवणारे दिवे आणि त्या प्रकाशात उजळून निघालेलं ते वातावरण मला हवंहवंसं वाटतं. कन्याकुमारीला कामाच्या निमित्ताने जाणं होत असे. गेलो की प्रत्येकवेळी मंदिरात जाऊन दर्शन घेत असे. पण गेल्या वर्षी गेलो तेव्हा वेगळाच अनुभव आला. मला त्या मंदिरात जावंसंच वाटलं नाही. त्यामुळे असोशीने गेलो नाही. उत्तर भारतातील भाषेत या भावनेला 'बुलावा नही आया' असंही म्हणतात. अनेक वर्षं भारत भ्रमण केल्यानंतर आपल्या जवळच्या पंढरपूरलाही दोन वर्षांपूर्वी जाऊन आलो. विठ्ठलाच्या मूर्तीऐवजी रुक्मिणीचं मंदिर आणि मूर्तीचं रूप डोळ्यात साठवून घेतलं.
माझ्या या श्रद्धा-अश्रद्धेच्या अशा दोलायमान स्थितीत प्रयागराजच्या संगमावर अनेक हाल अपेष्टा सहन करून परतलेल्या ६० कोटीहून अधिक भारतवासीयांकडे आणि त्यांच्या प्रेरणांकडे मी अचंबित होऊन पाहत आहे. कुठून येतं हे सारं या प्रश्नाला खरंच उत्तर नाही. गेले महिनाभर दोन भजनांचे स्वर आणि शब्द कानात व मनात गुणगुणत आहेत. त्यातलं एक अनेकांना माहीत असलेलं कुमार गंधर्वांनी गायलेलं गोरखनाथांचं भजन.
ना कोई तीरथ नहाऊँ जी।।
अड़सठ तीरथ हैं घट भीतर।
वाही में मल मल नहाऊँ जी।।
दूजे के संग नहीं जाऊँ जी।। कहे गोरख जी हो सुन हो मच्छन्दर मैं ।
या भजनात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही देवळात जाणार नाही, झाडाची पानं तोडणार नाही, गंगा यमुना संगमावर राहणार नाही, मनामध्येच अनेक घाटांवर माझ्यातील दुर्गुणांचं विसर्जन करीन. दुसरं भजन आपल्याच मातीतलं संत सावतामाळी यांचं. कांदा, मुळा आणि भाजी यातच विठ्ठलाचं रूप पाहणारं आणि शेतातल्या मळ्यामध्ये नामस्मरण करत पंढरपूरला न जाता वारी करणारं.
संत साहित्याने भरण पोषण केलेल्या माझ्या भारतीय मनात उमटणारे श्रद्धा, आस्था आणि तर्क यामध्ये त्रिशंकू झालेले विचार कुठल्याच संगमावर विसर्जित होऊ शकणार नाहीत. तोपर्यंत जाऊन आलेल्या आणि न गेलेल्या अशा दोन्हींच्या अनुभवांकडे आस्थेने बघणं इतकंच कदाचित माझ्या हातात आहे.
अजित कानिटकर | kanitkar.ajit@gmail.com
अजित कानिटकर गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ विविध स्वयंसेवी संस्थांसोबत निगडीत आहेत. ते दिल्लीत १५ आणि गुजरातेत सहा वर्षं ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत होते.