आम्ही कोण?
अनुभव 

एक स्वयंघोषित सिने-एडिटर

  • जितेंद्र घाटगे
  • 06.02.25
  • वाचनवेळ 6 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
rahim chacha header

शेवटचा श्वास मोजत असलेल्या सिंगलस्क्रीन टॉकीज आणि त्यासमांतर लुप्त होत चाललेल्या कला, हा रंजक विषय आहे. त्यांना कला मानावं की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण त्या कलाकारांच्या कौशल्याला 'कारागिरी'चा दर्जा मिळाला तरी पुरे! हाताने फिल्मचे पोस्टर रंगवणारे पेंटर्स, छोट्या बोर्ड-बॅनरवर विषयानुरूप कॅलिग्राफी करणारे, व्हिडीओ हॉलसाठी 'खास' फोटोशॉप पोस्टर्स तयार करणारे (ज्यात अनेक रँडम फिल्मच्या ॲक्शन फिगर्स, रक्तबंबाळ नायक आणि तोकड्या कपड्यातील हिरॉईन यांचं अतिरंजित संयोजन असे) हे सगळे त्यात आले. मला गोष्ट सांगायची आहे ती मात्र आहे एका स्वयंघोषित 'एडिटर' ची.

असं म्हणतात, की सिनेमा दोन वेळा तयार होतो. पहिल्यांदा दिग्दर्शकाच्या मनात आणि दुसरा एडिटिंग टेबलवर. या प्रचलित समजुतीच्या पलीकडे फिल्म प्रोजेक्टर चालवणाऱ्याच्या मूडवर नवा सिनेमा तयार होतो. सिंगल स्क्रीन सिनेमावर पारंपरिक प्रोजेक्टरने फिल्म दाखवणं हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे. त्यामुळे अनेकांना ही गंमत आता कदाचित कळणार नाही. हातभर उंचीएवढे फिल्मचे रीळ आणि ते सफाईदारपणे अचूक टायमिंगला बदलणारे हात पाहणं, हा एक सोहळा असायचा. माझ्यासाठी तरी होता. अशाच एकाच्या हातांबद्दल.. सायकलवरून नाशिकच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात वर्षानुवर्षं फिल्मचे रीळ घेऊन तंगडलेल्या पायांबद्दल.. आणि पॉर्न फिल्म चालू असताना नेमक्या वेळी 'गंमत' सरकवणाऱ्या ‘प्रोजेक्टर ऑपरेटर- कम-सेल्फ प्रोक्लेम्ड एडिटर’बद्दल-

थोडं विचित्र वाटेल, पण मला थेटरमधल्या गुटखामिश्रीत मुतारीच्या वासाचं, टॉकीजच्या बाहेर पाम तेलात पाववडे तळून झाल्यानंतर मिरच्या तळतात त्या वासाचं आणि प्रोजेक्टर रूममधल्या बिडी अन फिल्म रीळच्या एकत्र हिरवट कोरड्या खरखरीत वासाचं प्रचंड आकर्षण आहे. पैकी तिसरी इच्छा पूर्ण व्हायला, ती अलिबाबाची गुहा आतून बघायला मिळायला उशीरच झाला.

नकळत्या वयापासून थेटरच्या वाऱ्या चालू असल्याने अर्धवट उघडलेल्या किरकिऱ्या दरवाजातून, फटीतून दिसणारी प्रोजेक्टर रूम ही माझ्यासाठी अलिबाबाची गुहाच होती. आहे. जगभरातले सगळे पिक्चर याच रूममध्ये साठलेले असतात हा समज लहान वयात पक्का झाला. वय वाढत गेलं तसं फिल्मचे रीळ, ती चालवण्याची पद्धत आणि त्यातल्या करामती कळत गेल्या. ते मला कळण्याचं संपूर्ण श्रेय रहीमचाचाला.

नाशिकरोडला रेजिमेंटल टॉकीजच्या प्रोजेक्टर रूममध्ये आयुष्य घालवलेल्या रहीमचाचाचं वर्णन करण्यात काहीही अर्थ नाही. कुठल्याही जुन्या बंद पडलेल्या कंपनीच्या बाहेर एक खुरटं वाढलेला वॉचमन असतो, तो डोळ्यासमोर आणा. त्याला ढगळा शर्ट आणि लुंगी घातली की बिनचेहऱ्याचा रहीमचाचाच!

अनेकदा प्रयत्न करूनही कॉलेजचे दिवस येईस्तोवर मला प्रोजेक्टररूममध्ये एन्ट्री मिळाली नव्हती. नाशिक-मालेगावच्या बऱ्याचशा प्रोजेक्टर ऑपरेटरांनी मला आधीच हाकलून लावलेलं. मी दरवेळी नव्याने चावी फिरवायचो अन्‌ प्रयत्न करायचो. ती गुहा उघडली गेली ती अचानकपणे. तेव्हा मी अकरावीत होतो. रेजिमेंटल टॉकीज. सिनेमा फारच कंटाळवाणा होता. वैतागून व्हरांड्यात आलो अन काचेत लावलेले पोस्टर बघायला लागलो. शेजारीच लुंगी वर करून बसलेल्या चाचाने मला पाहिलं. मला म्हणाला, 'जा अंदर, मैं अंदर जा के एडिट करता हूं पिक्चर को...'

'मला आत येऊन एडिट कसं करतात ते बघायचं आहे,' असं मी म्हणालो. तसा तो माझ्या मानगुटीवर प्रेमाने हात टाकून मला आत घेऊन गेला. छोटे-मोठे रीळ, कैची, सेलोटेप, सरकतं प्रोजेक्टर असा बराच खजिना तिथे अस्ताव्यस्त पडलेला. रूमला झरोके. एकातून प्रोजेक्शन फेकलं जात होतं. तर दुसऱ्यातून पडद्यावरचा पिक्चर बघता येत होता. मी तिथून पिक्चर कसा दिसतो ते बघत होतो. तितक्यात रहीमचाचाने चालू पिक्चरमध्ये एवढ्या सफाईने सेक्ससीनचा रीळ ऍड केला, की तो त्याचाच भाग असावा असा कट पडला. टॉकीजमध्ये मरगळून बसलेले प्रेक्षक खाडकन जागे झाले अन सावरून बसले. तब्बल पाच मिनिटं तो सीन चालला. चाचाने तोंडातली बिडी न काढता परत पहिला पिक्चर सुरू केला. तीन आठवडे थेटरला तळ ठोकून बसला तो पिक्चर. कुठल्या कारणाने, हे फक्त तो पिक्चर तिथे बघितलेल्या प्रेक्षकांनाच माहीत. आणि एडिटर रहीमचाचाला.

त्या प्रसंगानंतर केव्हाही ‘रेजिमेंटल’ला गेलो की चाचाची भेट आणि त्या गुहेत एक चक्कर पक्की. प्रोजेक्टररूममधून मुव्ही बघणं आणि प्रेक्षकांच्या भावभावना आपण कंट्रोल करणं, हा विलक्षण अनुभव असतो. भले ते कंट्रोल लुटुपुटू एडिटिंगचं का असेना. पिक्चर लांबला किंवा पब्लिकला कंटाळवाणा वाटतोय असं लक्षात आलं तर प्रोजेक्शन रूमचे हे एडिटर आर्टिस्ट अगदी ब्लॉकबस्टर पिक्चर सुद्धा अनअपोलोजेटीकपणे काटछाट करून दाखवायचे. अनेक रद्दड सिनेमे यांनी आपल्या या कलेच्या जोरावर चालवलेले आहेत.

थेटरला पॉर्न दाखवायला बंदी असल्याने दुसरा कुठलातरी साऊथ इंडियन पिक्चर लावायचा आणि आतमध्ये नेमक्या वेळी पॉर्न घुसडायचं हा सिंगल स्क्रीनच्या जमान्यात सर्रास चालणारा प्रकार होता. 'हां, मैंने भी प्यार किया है' या सिनेमात अभिषेक बच्चन करिष्मा कपूरच्या लग्नात रडून एक गाणं गातो - 'मुबारक हो तुम को ये शादी तुम्हारी, सदा खुश रहो तुम दुआ है हमारी'. हे गाणं तेव्हा प्रचंड हिट होतं. हा पिक्चर मी मालेगावला पाहिलेला. पिक्चर बोर आहे म्हणून तिथल्या प्रोजेक्टर रूम एडिटरने ते गाणं तब्बल चार वेळा रिपीट केलं. बंडल पिक्चरला सुद्धा पब्लिकचा पैसा वसूल व्हावा म्हणून हे त्याचं डोकं! तो स्वतःला फिल्मचा एडिटरच समजायचा.

यांचं कौशल्य सिनेमाची काटछाट करणं किंवा त्यात सेक्स सीन टाकणं, इतकंच मर्यादित नव्हतं. पूर्वी एक पिक्चर एका शहरात दोन वेगवेगळ्या टॉकीजला लावला जायचा. तेव्हा एकच प्रिंट इकडून तिकडे सायकल किंवा रिक्षातून पोचवणं हे मोठंच टास्क असायचं. एका थिएटरात इंटरवल झाला की मधल्या वेळात ते रीळ दुसऱ्या टॉकीजला पोचवावं लागायचं. इंटरवलनंतर पिक्चर पाच मिनिटं उशिरा सुरू झाला तरी आरडाओरडा करणारी पब्लिक कमी नसते. रहीमचाचा तेव्हा सायकलवरून अनुराधा ते रेजिमेंटल किंवा विजय-ममता अशी इंटरवलमध्ये रीळं फिरवण्याची कामं सुद्धा करायचा.

डिजिटल/सॅटेलाइट प्रोजेक्शन आलं तसं पारंपरिक प्रोजेक्टर अन ते रीळ फिरवणं ही संकल्पना मागे पडली. सायकलवर रीळ वाहून नेणं आणि ते चालवणं याशिवाय दुसरं एकही काम येत नसलेले अनेकजण त्यात भरडले गेले. रहीमचाचा काही ढगातून आलेला नव्हता. ती अलिबाबाची गुहा वगैरे होती ती माझ्यासाठी.

अनेक वर्षांपूर्वी रेजिमेंटल टॉकीज पाडली गेली. ती मोक्याची जागा होती. पत्र्याच्या त्या जुनाट थेटरला कोण विचारतं. तिथे मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं गेलं. त्यात सगळ्यात वरच्या मजल्यावर सिनेमॅक्स मल्टिप्लेक्स झालं. आरामदायी खुर्च्या, डिजिटल प्रोजेक्शन. व्हिडिओ हॉलसारख्या छोट्या स्क्रीन. रहीमचाचाचं काम तर गेलंच असणार. तो आता कुठे असेल हा विचार करणं सोडून देऊन सुद्धा बरीच वर्षं झाली. पण दरवेळी कुठल्याही वॉचमन, सेक्युरिटी गार्डचा चेहरा मुद्दाम निरखून पाहतो. तो तिथेच कुठेतरी भेटेल पुन्हा, असं मला वाटत असतं.

आणि ती गुहा पुन्हा उघडली गेली. यावेळी सुद्धा अचानकपणे. मित्राच्या कार्यक्रमाचं बॅनर बनवावं म्हणून एकदा फ्लेक्सप्रिंटिंगच्या दुकानात गेलो. ४-५ गाळ्यांचं प्रशस्त एसी दुकान. मोजमाप-फोटो शेअरिंग झालं तसं पैशांचं बोलायला केबिनमध्ये गेलो. श्रीमंत खुर्चीवर रहीमचाचा बसलेला. आम्ही आत गेलो तरी त्याचं टीव्हीवरून लक्ष हलेना. व्हाइट कुर्ता पायजमा. आपली जुनी ओळख असल्याचं मी बोलून दाखवलं. त्याने मला ओळखलं असावं, नसावं, माहीत नाही. तरी आदराने बसायला लावलं. मी अजूनपण प्रत्येक पिक्चर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहतो हे सांगितल्यावर तो कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, 'साला पिक्चर चलता भी है क्या आजकल. 3 दिन में थेटर से गायब. सब एडिटर लोक का गलती है, घुसाडने का मसाला, कैसा पब्लिक नहीं आएगा. मैं अपने हाथों से कचरा से कचरा पिक्चर 2-2 महीने चलाया है. कायके दमपर? खाली एडिटिंग के!'

मी 'सही है' असं म्हणत मान हलवली.

तर चाचा पुन्हा जोरात म्हणाला, 'उलटा अच्छा हो गया, ये दुकान मेरे बेटे ने खुद के दम पर बनाया. अभी इलेक्शन है तो धंदा रनिंग में है।'

प्रोजेक्टर रूमच्या हिरवट, कोरड्या, खरखरीत वासाची आठवण डोक्यात झिणझिणली. केबिनमधल्या रूम फ्रेशनरचा वास असह्य झाला. निरोप घेऊन लवकर निघालो. 'Humans of late capitalism'चा आणखी एक अर्थ कळला. आपण उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर आहोत, हे बघून गंमत वाटली.

जितेंद्र घाटगे

जितेंद्र घाटगे हे व्यावसायिक, चित्रपट समीक्षक आणि चित्रकार आहेत. त्यांना कला आणि सिनेमा या विषयांत विशेष गती आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

ललिता 07.02.25
छान लिहिलंय. आवडलं. अगदी साधासा विषय, पण रंगवून लिहिलाय.
See More

Select search criteria first for better results