
गेल्या तीन महिन्यांपासून आमच्या ‘शांतीवना’तली दहा वर्षांची मुलगी राधिका ( बदललेलं नाव) कर्करोगाशी झुंज देत आहे. पुण्यातील कर्करोग हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला तोंडाच्या कॅन्सरची लागण झाली आहे. तोंडाचा कॅन्सर बीडी, तंबाखू, गुटखा आदी पदार्थांचं सेवन केल्यामुळे होतो, असा सरासरी कयास असतो. पण लहानपणापासून ‘शांतीवना’त वाढलेल्या या चिमुरडीला हे पदार्थ कधी पाहायलाही मिळाले नाहीत. तरीही हे घडलं.
वडिलांचं छत्र हरवल्यानंतर हक्काचं घर म्हणून राधिका ‘शांतिवना’त आणलं गेलं. बडबडी, हुशार आणि चुणचुणीत. एका संकटातून बाहेर निघाली, तर या दुसऱ्या संकटाने तिला गाठलं. तिला कॅन्सरसारख्या आजाराने घेरल्याचं समजल्यावर आम्ही सारे हादरून गेलो. पण फक्त तळमळण्यात काहीही अर्थ नव्हता. लगेचच तिच्यावरती उपचार सुरू केले. पुण्यातील एका कर्करोग रुग्णालयाशी संपर्क करून तिला तिथे दाखल करण्याची व्यवस्था केली.
बालवयात एक बरं असतं. वेदना सहन करण्याची शक्ती असते. मोठी माणसं वेदनेपेक्षा त्याच्या परिणामाचा विचार करून खचून जातात. पण या लहान लेकरांना परिणामांची एवढी तीव्र जाणीव नसते, त्यामुळे त्यांचं मनोबल खचत नाही, असा आपल्या सर्वांचा एक समज असतो. काही अंशी ते खरंही आहे. त्यामुळे त्यांचं शरीर उपचाराला पटकन साथ देतं. डॉक्टरही असंच म्हणतात.
बऱ्याच दिवसांपासून राधिकावर उपचार सुरू आहेत. मी तिला रोज संध्याकाळी फोन करतो. ती छान बोलते. दिवसभरातील सर्व बारीकसारीक तपशील देते. हसते, अगदी आनंदी असते. ती माझीही चौकशी करते. हिला तब्येतीचं काहीच टेन्शन नसेल, असं तिच्याशी बोलताना वाटत राहतं.
परवा पुण्यात गेल्यावर तिला भेटायला गेलो. रूमसमोर बसलो. मी येणार आहे, हे तिला माहीत होतं. पण तरीही ती उठली नाही. खूपदा हाका मारल्या, पण तिने अंगावरचं पांघरुण काढलं नाही. हॉस्पिटलच्या ताईनेही तिला सांगून पाहिलं. त्यावर ती पांघरुणातच रडायला लागली. मग मीच त्या ताईला थांबवलं. तसा तिला होणार्या वेदना, त्रास औषधांमुळे बंद झाला होता. आता केमोथेरेपी सुरू करायची होती. आम्ही बराच वेळ बसलो. पण ती बाहेर यायला तयार नव्हती. तिच्यासाठी खाऊ आणला होता. आमच्यासमोर तिने दोन घास खावेत असं वाटत होतं. पण ती तोंड दाखवायलाही तयार नव्हती.
आमची निघायची वेळ झाली. तिला तसं सांगितलं, तर पांघरुणातूनच तिने आम्हाला टाटा केलं. मी पुन्हा म्हणालो, “मला बाय करायला बाहेर नाही का येणार...?” मग हळूच उठली आणि टॉवेलने तोंड झाकत बाहेर आली. मी टॉवेल बाजूला केला. कर्करोगाची जखम बराच पसारा धरून बसली होती. पाहवत नव्हतं. तिला एकदा जवळ घेतलं आणि तिचा निरोप घेऊन आम्ही निघालो.
वाटेत एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो. तिथून मी हॉस्पिटल ताईला फोन लावला आणि राधिका जेवली का ते विचारलं. पण तिने त्यादिवशी फार काही खाल्लं नाही असं कळलं. मग मी फोन राधिकाकडे द्यायला सांगितला,.
“बाळा, का नाही खाल्लं काही...?” मी विचारलं.
“भूक नाही, काका..” ती म्हणाली.
मी तिला समजावत राहिलो, की औषधं घ्यायची असतात, त्यासाठी पोटभर जेवायला हवं. पण ती ‘भूक नाही’ असंच म्हणत राहिली. मग मी विषय थोडा बदलला. तिला म्हटलं, “मी तुला भेटायला आलो आणि तू माझ्याशी बोललीही नाहीस.. रोज तर फोनवर किती बोलतेस..”
त्यावर तिला गहिवरून आलं. ती म्हणाली, “काका, माझं तोंड पाहिलं का कसं झालंय..? ते पाहून तुम्हाला वाईट वाटलं असतं... म्हणून नाही बोलले.”
तिचे हे शब्द कानावर पडताच मला आणि सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही खूप गहिवरून आलं. वाटलं, इवलंसं लेकरू किती खोलवर विचार करतंय..! काळजाला पिळवटून टाकणार्या तिच्या शब्दांमध्ये आभाळाच्या संवेदना जागृत करण्याची क्षमता होती. मी हळवा झालो. माझ्या डोळ्यांत नकळत पाणी आलं. ते आवरत मी तिला म्हणालो, “बाळा, असा विचार नाही करायचा.. आपल्याला लवकर बरं व्हायचं आहे ना...? मग ते मी पाहिल्याशिवाय कसे कळेल? जे असेल ते बघू दे मला. मला समजलं म्हणजे मला डॉक्टरांशी बोलता येईल..”
आपल्याला वाटतं, की मुलांना काही समजत नाही. पण या लहान लहान मुलांकडून सुद्धा खूप काही शिकायला मिळतं. भावनांची गुंतागुंत यांच्यातही असते. समज कमी-जास्त प्रमाणात असू शकते, पण परिस्थितीनुसार इतरांच्या मनातील भाव त्यांना समजतात. राधिका स्वतः दुःखात असताना, मृत्यूशी लढा देत असताना मला काय वाटेल याचा विचार करत होती... इतकी भावनांनी ओथंबून वाहणारी मनं आणि सुंदर बुद्धी त्या इवलुशा जीवात कुठून येत असेल?
माझ्या या प्रश्नाला अजून तरी उत्तर मिळालेलं नाही...
दीपक नागरगोजे | deepshantiwan99@gmail.com
दीपक नागरगोजे बीड जिल्ह्यातील आर्वी गावात शांतिवन ही संस्था चालवतात. उसतोडणी कामगार, तमासगीर कलावंत, आत्महत्याग्रस्त शेतकरी आदींच्या अनेक मुलांच्या निवासाची आणि शिक्षणाची सोय करून त्यांच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी या संस्थेने उचलली आहे.