आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

सर्जनशील शिक्षणाचा शिलेदार : अमर पोळ

  • प्रशांत कोठडिया
  • 05.09.26
  • वाचनवेळ 11 मि.
amar pol

पुण्याचं एक उपनगर कोंढवा. पुणे महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या संत गाडगेबाबा इंग्रजी शाळेत नववीच्या वर्गात हिंदीचा तास सुरू होता. शिक्षक मुलांना संयुक्ता लुदरा यांची ‌‘नदी' ही कविता शिकवत होते-

उबलती-उछलती, जलप्रपातों से गिरती, झरनों से झरती, पर्वतों से उछलती, नदी हूँ मैं। बस एक नदी हूँ। बहती-बहाती, हँसती-खिलखिलाती...

मुलंही नदीच्या त्या खळाळत्या स्वप्नवत प्रवाहात जणू रंगून गेली होती. स्वच्छ आणि सुंदर नदीची प्रतिमा शब्दांच्या माध्यमातून त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत असावी. त्याला जोडूनच त्यांना नदीबद्दलची गद्य-पद्य स्वरूपातली आनुषंगिक माहिती दिली जात होती- नद्यांचं पावित्र्य, त्यांचं मानवाला वरदान ठरणं, जगभरातल्या नद्यांवर वसलेल्या आणि पोसलेल्या विविध संस्कृती, वगैरे. त्यांना नदीबद्दलचे व्हिडिओही दाखवले जात होते. या सर्व सरमिसळीतून नदीचं माहात्म्य मुलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत होतं. तास संपण्याआधी शिक्षकांनी सर्वांना विचारलं, “आपण खरीखुरी नदी पाहायला जाऊ यात का?” मुलांनी त्यांची ही कल्पना एकसुरात उचलून धरली.

मग एक दिवस सगळे निघाले खऱ्याखुऱ्या नदीच्या दर्शनाला. त्यासाठीचं ठिकाण निवडलं होतं, मुठा नदीच्या काठावरचं ओंकारेश्वर देऊळ. बसने शंभर विद्यार्थी मुठेच्या किनारी पोहोचले. जुलैचा महिना होता, तरी पाण्याची पातळी फार नव्हती. नदीचं पात्र ओकंबोकंच दिसत होतं. नदीच्या पात्रात काळ्या रंगाचं पाणी हळूहळू वाहत होतं. पाण्यासोबत प्लास्टिक, निर्माल्य, कापड, पत्रे आणि इतरही अनेक वस्तू तरंगत होत्या. ती घाण पाहून मुलं हादरून गेली. त्यातली बहुसंख्य मुलं झोपडपट्टी अथवा गरीब वस्त्यांमधून राहणारी होती. त्यांच्या घराभोवतीचं घाणीचं साम्राज्य त्यांच्या नेहमीच्या सवयीचंच होतं; तरी आपण एका नदीच्या काठी आलो आहोत हे कुणालाच खरं वाटेना. रस्त्यावरून येता-जाता ही नदी अनेकदा पाहिलेली मुलंही बावचळून गेली. मग सरांनी मुलांचे दहा-दहा जणांचे गट केले आणि जवळपास असणाऱ्या लोकांकडून नदीबद्दलची अधिक माहिती घ्यायचं सुचवलं. विविध प्रकारची भरपूर माहिती गोळा झाली. मुलांना कवितेतून दिसलेलं नदीचं सुंदर आणि स्वच्छ चित्र पार काळवंडून गेलं होतं. मात्र, सरांनी मुलांच्या विचारांना एक निश्चित अशी वाट दाखवली होती. हे सर म्हणजे छत्तीस वर्षीय, अत्यंत उत्साही आणि तितकाच संवेदनशील, स्मार्ट शिक्षक अमर पोळ.

amar pol

दुसऱ्या दिवशी सरांनी त्याच नववीच्या विद्यार्थ्यांच्या तासाला पुण्यातल्या नदीप्रश्नावर जनजागृती करणाऱ्या विनोद बोधनकर यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. बोधनकरांनी मुलांसमोर एक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन दिलं. त्याद्वारे त्यांनी आपल्या देशातल्या नद्यांची सद्यःस्थिती, प्रदूषणाचा नद्यांवर होणारा परिणाम, हे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिक काय करू शकतात याचा छानसा आढावा घेतला.

‌‘नदी'चा हिंदी कवितेपासून सुरू झालेला विद्यार्थ्यांचा हा प्रवास व्हिडिओ फिल्म्स, नदीकाठची सहल, त्या विषयावरचं पॉवरपॉइंट सादरीकरण इथपर्यंत येऊन पोहोचला होता. हिंदी भाषेच्या या तासाने पर्यावरण, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र, संवादकौशल्य, अशा अनेकविध विषयांनाही नकळत गवसणी घातली होती.

या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष कृती कार्यक्रम, अर्थात ‌‘कबाड से जुगाड तक' हा आगळावेगळा उपक्रम. त्याअंतर्गत मुलांनी टाकाऊ प्लास्टिक वा पत्र्याच्या वस्तू गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी त्या वस्तू ‌‘अप-सायकल' करणं अपेक्षित होतं; पण त्यातील काहींची सर्जनशीलता इतकी खुलून आली, की त्यांनी त्या टाकाऊ वस्तूंपासून मोबाइल केस, छोटीशी मोटर असलेला व्हॅक्युमक्लीनर, अशा उपयुक्त वस्तूही बनवल्या. एका हरहुन्नरी विद्यार्थ्याने तर नळाखालच्या बादलीतलं पाणी वाहून जाऊ नये म्हणून बादलीत बसवता येणारा ‌‘बझर' तयार केला. बादली भरली रे भरली की तो बझर वाजायचा आणि नळ बंद करण्याची सूचना मिळायची. अमर पोळ यांच्या प्रेरणेनेच मुलांमधल्या सर्जनशीलतेला अशा रीतीने वाट मिळाली होती.

अमर पोळ यांना ही वाट कशी सापडली?

अमर वाढला मार्केट यार्ड परिसरातल्या एका झोपडपट्टीत. घरात दारिद्य्र होतं. त्याचे वडील रिक्षा चालवायचे, तर आई धुणीभांडी करायची. मात्र, वडलांना दारूचं व्यसन होतं. नशेमध्ये ते अमरला, आईला शिवीगाळ, मारहाण करायचे. त्यांची अधूनमधून उपासमारही व्हायची. अमर सहावीत असताना एकदा भर पावसात वडलांनी त्याला आणि आईला मारझोड करून घराबाहेर काढलं. अशा अवस्थेत त्यांनी घरासमोरच्या गल्लीत एका पत्र्याच्या शेडमध्ये काही तासांसाठी आश्रय घेतला होता. वडलांच्या मारहाणीमुळे अमरचे डोळे भेदरलेले होते; मात्र, त्याच्या मनात वडलांना दारूच्या या भयंकर व्यसनातून बाहेर कसं काढता येईल याचं विचारचक्र सुरू होतं. त्या लहान वयातही त्याच्या मनात वडलांविषयी कोणत्याही प्रकारचा राग वा कटुता नव्हती, हे त्याचं स्वभाववैशिष्ट्य निश्चितच कौतुकास्पद होतं.

हेही वाचा - गरजूंना करियरची वाट दाखवणारा तोहीद बक्षु

१९९७ साली अमर के. सी. ठाकरे विद्या निकेतन इंग्रजी माध्यम शाळेतून बारावी झाला. हरहुन्नरी आणि चोखंदळ स्वभावामुळे तो शाळेत सर्वांचा लाडका विद्यार्थी होताच. शिवाय अनेक उपक्रमशील शिक्षकांमुळे त्याच्या आयुष्याला एक नवीन दिशाही मिळाली होती. शिक्षकच मुलांच्या आयुष्याला चांगलं वळण देऊ शकतात यावर त्याचा ठाम विश्वास बसला होता. आपणही शिक्षक होऊनच त्या ऋणातून मुक्त व्हायचं, असा त्याने शाळेत असतानाच निश्चय केला होता.

मात्र, शिक्षक बनण्याची प्रक्रिया काही सोपी नव्हती. त्यासाठी आवश्यक असणारं पूर्वशिक्षण पूर्ण करणं गरजेचं होतं. शिक्षणासाठी घरातून पैसा मिळण्याची ‌‘चैन' परवडणारी नव्हतीच. मग शालेय शिक्षण सुरू राहावं आणि उच्च शिक्षणही घेता यावं म्हणून अमरने मार्केट यार्डात हमालीचं काम करायला सुरुवात केली. जवळपासच्या बंगल्यांमधून बागेची झाडलोट करणं, झाडांना पाणी घालणं अशी कामं किंवा डिलिव्हरी बॉय म्हणूनही त्याने कामं केली. त्या दरम्यान, ठरवलेली कामं करवून घेऊन नंतर मान्य केलेली मजुरी द्यायला हात आखडता घेणाऱ्या ‌‘श्रीमंतां'चंही त्याला दर्शन घडलं. तरीदेखील तो नाउमेद झाला नाही. शिकण्याची ऊर्मी, जिद्द आणि कष्ट उपसण्याची तयारी या जोरावर त्याने शालेय शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण केलंच, पण पुढे उच्च शिक्षणाच्या पायऱ्याही चढायला सुरुवात केली.

२००२ साली त्याने मराठी विषय घेऊन बी.ए. पूर्ण केलं आणि पुढल्या दोन वर्षांतच एमएसडब्ल्यू या पदव्युत्तर पदवीतही प्रथम श्रेणी मिळवली. दरम्यान, ‌‘थरमॅक्स सोशल इनिशिएटिव्ह फाउण्डेशन'च्या साहाय्याने आणि ‌‘आकांक्षा' संस्थेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधला दर्जा सुधारण्यासाठी ‌‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप'च्या तत्त्वावर एक प्रकल्प सुरू झाला होता. त्या प्रकल्पामध्ये ‌‘सोशल वर्कर' आणि ‌‘जनसंपर्क अधिकारी' म्हणून अमरची नेमणूक झाली. दोन वर्षं या कामाचा अनुभव घेतल्यानंतर मनात सातत्याने जपून ठेवलेलं शिक्षक होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होण्याची संधी आपसूकच चालून आली आणि ती संधी त्याच्याच शाळेने त्याला देऊ केली.

शाळेत असताना तो आठवीपासूनच अनेक सवंगड्यांना मराठी व हिंदी भाषा शिकवत असायचा हे त्याच्या शिक्षकांनी हेरलं होतं. २०११ मध्ये या शाळेच्या नववीच्या वर्गाचे मराठी व हिंदी शिकवणारे एक शिक्षक नेमके शाळा सोडून गेले होते. हा वर्ग मोठा होता. आयत्या वेळेस कोण शिक्षक मिळणार? मग मुख्याध्यापकांना अमरची आठवण झाली. त्यांनी त्या नोकरीसाठी त्याच्याकडे विचारणा केली. अमरने तातडीने हो म्हटलं. शिक्षक बनण्याचं स्वप्न असं आकस्मितपणेच पूर्ण झालं आणि अमरच्या जीवनाला जणू एक लय आणि दिशा गवसली.

२०११ ते २०१७ हा काळ अमरच्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी खूपच महत्त्वाचा ठरला. २०११ मध्ये त्याने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची ‌‘मास्टर ऑफ जर्नालिझम' ही पदवी पहिल्या श्रेणीत मिळवली, तसंच शैक्षणिक पात्रतेत आपण कुठेही कमी पडू नये यासाठी त्याने २०१३ मध्ये पुणे विद्यापीठातून हिंदी व मराठी या विषयातील ‌‘बी.एड'च्या पदव्याही प्रथम श्रेणीत प्राप्त केल्या.

शिक्षणक्षेत्रात काम करण्यासाठी व टिकून राहण्यासाठी भरपूर मेहनत करण्याची अमरची तयारी होतीच. के. सी. ठाकरे शाळेतला नववीचा वर्ग जवळपास शंभर विद्यार्थ्यांचा होता. इतक्या मोठ्या वर्गात भाषा विषय शिकवणं हे खरं तर खूपच अवघड होतं. त्याचं कारण तसं ‌‘सामाजिक'च होतं. ती इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी तिथे प्रवेश घेणारे बहुसंख्य विद्यार्थी गरीब वस्त्यांमधून आणि अशिक्षित कुटुंबांतून आलेले. बहुतेकांना साधं मराठीतून बोलणंही अवघड वाटायचं. शब्दागणिक शिव्या ही त्यांच्यासाठी अगदी नित्याची बाब असे. त्यांना मराठी व हिंदी या भाषा विषय म्हणून शिकण्यात मुळीच स्वारस्य नव्हतं. विशेषतः मराठी भाषक मुलांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करणं हे अमरला खरंखुरं आव्हान वाटत होतं. मग त्याने विचारपूर्वक विविध उपक्रमांची आखणी केली आणि त्यानुसार कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा धडाका सुरू केला.

amar pol

प्रसिद्ध लेखकांची भेट हा त्यातला पहिला उपक्रम होता. अमरने प्रत्येकी ८ ते १० विद्यार्थ्यांचे काही गट तयार केले. त्यांना तो पुण्यातल्या विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्थळी घेऊन जाऊ लागला; कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांची मान्यवरांशी, लेखकांशी भेटी घडवून देऊ लागला. अर्थात अशा भेटी घडवण्याआधी तो मुलांची व्यवस्थित पूर्वतयारी करून घ्यायचा. संबंधित लेखकांचं साहित्य मुलांना वाचायला द्यायचा. विद्यार्थी आत्मविश्वासाने प्रश्न विचारतात ते पाहून साहित्यिकांनाही कौतुक वाटायचं. डॉ. बाबा आढाव, डॉ. अरुणा ढेरे, आनंद यादव, अशोक कामत, डॉ. रघुनाथ माशेळकर, डॉ. विजय भटकर, कुमार केतकर, डॉ. नरेंद्र जाधव, शैला दातार, आलेषा महाजन, मंगेश पाडगावकर, अनिल अवचट, अतुल पेठे, डॉ. हरी नरके, आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबर गप्पागोष्टी करण्याची संधी या मुलांना मिळाली. त्यांचं विचारांचं, अनुभवाचं क्षितिज हळूहळू विस्तारू लागलं. त्यांच्यात भाषा आणि साहित्याची गोडी निर्माण होऊ लागली. अशा कार्यक्रमांना जाण्यासाठी बसप्रवासाचा खर्च करता यावा म्हणून मुलं खाऊचे पैसेही वाचवू लागली.

याच्या पुढचं पाऊल म्हणून अमर या मुलांना मराठी नाटक व चित्रपट दाखवायला घेऊन जाऊ लागला. ‌‘नटसम्राट', ‌‘कट्यार काळजात घुसली', ‌‘१०वी फ', ‌‘बहात्तर मैल एक प्रवास' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्याने विद्यार्थ्यांना एका अनोख्या विश्वाची सफर घडवली. त्याने मुलांना अनेक उद्बोधक माहितीपटही दाखवले. हा मुलांसाठी वेगळाच अनुभव होता. पुढील काही महिन्यांतच या मुलामुलींमध्ये सकारात्मक बदल दिसू लागले. नाटक वा चित्रपटांवर चर्चा करण्याची जाणीवपूर्वक सवय लावल्यामुळे मुलं स्वयंस्फूर्तीने वाचू लागली, मोकळेपणाने विचार करू लागली, बिनधास्तपणे प्रश्न विचारू लागली, गटचर्चेत स्वतःची मतं रोखठोक पद्धतीने मांडू लागली.

हेही वाचा - इथं शिक्षकांच्या कल्पनेची मशागत करून मिळते..!

अमरने आणखीन एक वेगळा प्रयोगही केला होता. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मराठी भाषक विद्यार्थ्यांना नेमक्या काय अडचणी येतात हे पद्धतशीरपणे जाणून घेण्यासाठी त्याने सहकारी शिक्षक आणि मुलांच्या मदतीने एक संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्याने पालक आणि मुलांकडून एक प्रश्नावली भरून घेतली. त्यामधून लक्षात आलं, की मुलांना अनेक शब्द कळतच नसत; त्यांचा नेमका क्रम लावताना ती गोंधळून जात असत. त्या दृष्टीने त्याने अनेक उपाययोजना आखल्या. त्यामध्ये रोजचं वर्तमानपत्र वाचण्याचा उपक्रमही सुरू केला. मराठीच्या तासाला सुरुवातीची दहा ते पंधरा मिनिटं वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा परामर्श घेऊन त्यावर चर्चा करणं सुरू केलं. मुलांना त्यातलं शब्दकोडं सोडवायला सांगितलं. प्रारंभी हे ‌‘शब्द सुचण्याचं कोडं' मुलांना सुटणं फारच अवघड वाटायचं; मात्र त्यामध्ये सातत्य राखल्याने मुलांना त्यातली गंमत कळायला लागली. त्यांचा शब्दसंग्रह हळूहळू वाढू लागला. त्याचबरोबरीने अमरने कथाकथनाच्या संयोजनातून वेगवेगळ्या प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी रेणू गावस्कर, मानसी मराठे आदी मंडळींना पाचारण केलं. कथा, त्यांतले नवे शब्द, परिणामकारक वाक्यं आणि नवनवीन कल्पना विद्यार्थ्यांच्या मनात सतत रुंजी घालू लागल्या.

याच टप्प्यावर अमरने ‌‘अक्षरस्पर्श' लायब्ररीच्या मदतीने ८ वी ते १० वीच्या वर्गांमध्ये प्रत्येकी एक पुस्तकपेटी ठेवण्याचा उपक्रम सुरू केला. त्या निमित्ताने मुलांना विविध विषयांवरची मासिकं, संदर्भपुस्तकं आदी वाचनसाहित्य उपलब्ध झालं. मुलांची बौद्धिक भूक वाढीस लागली. रिकाम्या तासाला काय करावं, हा त्यांच्यापुढचा प्रश्न आपोआपच सुटला होता. वेळ मिळेत तेव्हा मुलं पुस्तकं, मासिकं वाचताना दिसू लागली. वर्षाच्या सुरुवातीला शाळेत पुस्तकं वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण २३ टक्के इतकंच होतं, ते एक वर्षाच्या अवधीतच ८३ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचलं. या सर्व उपक्रमांचा आणखीन एक मोठा फायदा झाला. ८ वी ते १० या इयत्तांचा मराठी व हिंदी विषयांच्या सहामाही व वार्षिक परीक्षेचा निकाल शंभर टक्के मिळू लागला.

amar pol

परीक्षेतल्या यशाव्यतिरिक्तही मुलं पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, आदी महत्त्वाचे विषय निवडून स्वतः मोठ्या आत्मविश्वासाने पॉवरपॉइंट प्रेझंटेशन करू लागली, पुण्यातल्या इतर शाळांमधूनही त्याचं सादरीकरण करू लागली. ‌‘गालीबंद' उपक्रमामुळे मुलांच्या तोंडातल्या शिव्या बंद झाल्या. या मुलांनी कोंढव्यातल्याच संत गाडगेबाबा इंग्रजी माध्यमिक शाळेच्या ८ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंधश्रद्धाविरोधी जागृती कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाने भारावलेल्या त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हातात बांधलेले गंडेदोरे काढून टाकले! या प्रकारे अमरच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची एक सजग फळी तयार होत असल्याचं पाहून शाळेच्या व्यवस्थापनाने मोठ्या आनंदाने अमरला सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि मोकळीक दिली.

मागच्या वर्षी पुण्यातल्या काही कंपन्यांनी ‌‘सीएसआर'चा भाग म्हणून ‌‘पुणे सिटी कनेक्ट' हा प्रकल्प सुरू केला आहे. त्याअंतर्गत महानगरपालिकेच्या १३ मराठी आणि २ उर्दू माध्यमाच्या शाळांची निवड केली गेली. त्यांपैकी तीन शाळांची जबाबदारी अमरकडे आहे. अध्यापन-अध्ययन प्रक्रियेची गुणवत्ता वाढावी म्हणून या तीन शाळांमधल्या पंचेचाळीस शिक्षकांसाठी कौशल्यविकासाचं प्रशिक्षण देणं, शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या भेटी आयोजित करून त्यांचे नवनवीन प्रयोग समजावून घेणं, यासारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अमरच्या आजवरच्या कामाला आपोआपच नवीन दिशा आणि बळ मिळालं आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणजे त्या तीन शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा टक्काही वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.

हेही वाचा - कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची

आज अमर विद्यार्थ्यांचा सखा, काउन्सेलर, वेळप्रसंगी पालक म्हणून जबाबदारी तळमळीने पार पाडतो आहेच. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरचं समाजशिक्षण देता यावं म्हणून १५ वर्षांपूर्वीच त्याने ‌‘बालशिक्षण मंच' स्थापन केला आहे. त्यामार्फत दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मार्केट यार्ड परिसरातल्या गोरगरिबांच्या १० ते १८ या वयोगटातल्या सुमारे १०० मुलामुलींसाठी पुण्याजवळच्या एखाद्या खेड्यात दहा दिवसांचं एक शिबिर आयोजित करण्यात येतं. विशेष म्हणजे या शिबिरांचं संपूर्ण नियोजन मुलंच करतात. अमर या मुलामुलींसाठी दररोज संध्याकाळच्या वेळेत मनपाच्याच संत ज्ञानेश्वर शाळेमध्ये अभ्यासिका व मार्गदर्शन वर्गही चालवतो.

अमरसारखे अनेक शिक्षक केवळ पाठांतर आणि परीक्षेतल्या यशावर भर असणाऱ्या सध्याच्या कुंठित शिक्षणपद्धतीमध्ये बदल घडवण्याची धडपड करत आहेत. या सर्व नवोपक्रमशील शिक्षकांमुळे ‌‘समाजभान' ठेवून प्रचलित शिक्षणात आपण सकारात्मक बदल घडवू शकतो, हा विश्वास आपल्याला मिळू लागला आहे. शिक्षण कधीही कप्पेबंद नसतं. ते शाळा, कुटुंब, समाज, राज्य व देशातील सांस्कृतिक व सामाजिक परंपरा, इतिहास, आदी अनेक धाग्यांनी विणलेलं असतं. शाळाशिक्षणाच्या माध्यमातूनच नव्या पिढीवर जात-पंथ-धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, लोकशाही यांसारख्या आधुनिक मूल्यांचे खरेखुरे संस्कार करता येतात, हा अमरसारख्या शिक्षकांनी घालून दिलेला खूप महत्त्वाचा धडा आहे.

(अनुभव, सप्टेंबर २०१७च्या अंकातून साभार.)


प्रशांत कोठडिया







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results