तीन वर्षांपूर्वी मी 'डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर'तर्फे (मेडिसिन्स सान्स फ्रंटियर्स- 'एमएसएफ') सीरियातल्या भीषण यादवी युद्धात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी सीरिया-जॉर्डन सीमेवर एक महिना राहून आलो होतो. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे डॉक्टरी सेवा पोहोचत नाही अशा ठिकाणी, विशेषतः अस्थिर-अशांत ठिकाणी डॉक्टर्स पोहोचवणारी ही संस्था. संस्थेमार्फत सेवा देण्याची इच्छा असलेल्या डॉक्टरांची आधी प्रदीर्घ मुलाखत घेतली जाते. यादवी युद्धाच्या ठिकाणी काम करायचं असल्याने डॉक्टरांच्या मानसिक कणखरतेचाही व्यवस्थित अंदाज घेतला जातो. अशांत परिस्थितीत काम करण्यासाठी या डॉक्टरांना प्रशिक्षणही दिलं जातं. हे सारं पार करून मी सीरियातल्या युद्धग्रस्तांसाठी एक महिना सेवा बजावून आलो होतो. युद्धरुग्णांना सामोरं जाण्याचा तो माझा पहिलावहिला अनुभव होता. त्या वेदनादायी अनुभवाने माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं होतं. त्या एक महिन्यानंतर भारतातल्या 'आपल्या' आयुष्यात परतताना काय वाटलं होतं हे मी कधीच विसरणार नाही
त्यानंतर गेल्या वर्षी मला 'एमएसएफ'कडून परत एकदा फोन आला. नागरी युद्धात पोळून निघणाऱ्या येमेनमध्ये एका ऑर्थोपेडिक सर्जनची गरज होती. (२०१५ साली येमेनमधून भारत सरकारने 'ऑपरेशन राहत द्वारा साडेचार हजार भारतीय आणि शेकडो आंतरराष्ट्रीय नागरिकांची सुटका केली. तेव्हा भारतीय माध्यमांमध्ये येमेनच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.) येमेनचं नागरी युद्ध हा त्या देशातल्या दोन गटांचा अंतर्गत संघर्ष आहे. येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह आणि हौती बंडखोर विरुद्ध विद्यमान (!) राष्ट्राध्यक्ष अबद्राबुह मन्सूर हादी व त्यांचे निष्ठावंत या दोन गटांत चार-पाच वर्षांपूर्वी कुरबुरी सुरू झाल्या. हौती बंडखोरांनी २१ मार्च २०१५ रोजी राजधानी सानावर कब्जा करत हादी सरकार उलथून पाडलं. राष्ट्राध्यक्ष अबद्राबुह देश सोडून पळून गेले. त्यांचं शासन पुनर्प्रस्थापित व्हावं यासाठी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली एक आघाडी युद्धात सक्रिय झाली. जगभरातल्या प्रत्येक युद्धात आपली हजेरी गरजेची मानणाऱ्या अमेरिकेने सौदीला सक्रिय पाठिंबा दिला. सध्या या युद्धात या सौदीप्रणीत आघाडीसोबतच अरेबियन द्वीपसमूहातले अल कायदा आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक हे गट आणि 'लव्हॅट' राष्ट्रं (भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यालगतचे देश) हे अन्य खेळाडू सक्रिय आहेत. या संघर्षात प्रत्येकालाच कोणता ना कोणता आर्थिक-सामाजिक रस आहे.
गेल्या दोन वर्षांत या यादवीत तब्बल सोळा हजार माणसं मृत्युमुखी पडली आहेत. त्यांतले बहुतांश या युद्धाशी थेट संबंध नसलेले सर्वसामान्य नागरिक आहेत. आज येमेनमधलं नागरी जीवन ठप्प आहे. सर्व दैनंदिन व्यवहार भीतीच्या सावटाखाली गुदमरलेले आहेत. लोकांना खायला पुरेसं अन्नधान्य नाही, कुपोषणावर उपचार उपलब्ध नाहीत, हॉस्पिटलची इमारत उभी असलीच तरी त्यात औषधांचा पत्ता नाही, शासकीय नोकरांना चार-चार महिने पगार नाहीत, अशी सगळी परिस्थिती. युद्धात भरडल्या जाणाऱ्या अशा सर्वसामान्य लोकांसाठी पुन्हा वैद्यकीय सेवा देण्याची वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं; पण 'एमएसएफ'कडून तो फोन आला आणि अकस्मात ती परिस्थिती समोर उभी ठाकली.
मी येमेनला जाण्याचं नक्की केलं. मात्र, माझं तिथे जाणं मला व्हिसा मिळण्यावर अवलंबून होतं. राजधानी सानावर आणि तिथल्या तथाकथित शासकीय यंत्रणेवर बंडखोर हौतींचा ताबा असल्याने व्हिसा त्यांच्याकडून मंजूर होणं गरजेचं होतं. त्याला तब्बल पाच आठवडे लागणार होते. ते धरून प्रवासाच्या तयारीसाठी सहा आठवडे हाताशी होते. मोहिमेची तारीख नक्की झाल्यावर येमेनमधलं युद्धग्रस्त वातावरण एकदम आमच्या कुटुंबात चहाच्या आणि जेवणाच्या टेबलवर आलं. त्या देशात भले फारसं अन्नधान्य पिकत नसेल, पण तिथे लोकसंख्येच्या दुपटीने अत्याधुनिक शस्त्रास्त्रं होती असं वाचलं होतं. कमरेला जंबिया आणि खांद्यावर कलाश्निकोव्ह बंदूक लावून फिरणाऱ्या, हातात येईल ते वाहन तुफान वेगाने हाकणाऱ्या बारा-पंधरा वर्षांच्या येमेनी मुलांबद्दलही कळलं होतं. घरच्यांच्या चेहऱ्यांवर हिम्मत तर दिसत होती, पण प्रत्येकाच्या मनात खोलवर कुठे तरी धास्तीही होती. मित्रमंडळीही काळजीने 'पुन्हा कशाला जातोयस असल्या ठिकाणी?' असं विचारत होती. पण जगातल्या एका अत्यंत दरिद्री देशातली अधिक खडतर, अनिश्चित आणि धोकादायक चेहऱ्याची ही मोहीम मला आता खुणावत होती.
हेही वाचा - तर मी माणूस उरणार नाही...
मला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांतल भय बाजूला सारून मी येमेनला निघालो होतो. जाताना बरोबर अगदी कमीत कमी सामान न्यायचं असल्याने तयारीचा तसा फारसा प्रश्न नव्हता. गरजेचा होता तो गृहपाठ हळूहळू त्यासाठीचा आवश्यक तपशील येऊ लागला येमेनमध्ये पेटलेल्या युद्धाची कारणं आणि संदर्भ, त्यात सहभागी असलेले 'खेळाडू', थेट युद्धाची क्षेत्रं कोणती, 'एमएसएफ'च्या तात्पुरत्या रुग्णालयाच्या नेमक्या जागा कोणत्या, रुग्णांची संख्या आणि त्यांना होणाऱ्या जखमांचे प्रकार... माझा हा अभ्यास सुरू असतानाच उत्तर येमेनच्या 'एमएसएफ' हॉस्पिटल्सवर सौदीच्यां नेतृत्वाखाली बॉम्बहल्ला केला गेला. ई-मेलवर त्या संदर्भातल्या बातम्यांचा महापूर आला. माझ्या कुटुंबाचंच नव्हे, तर माझंही मनोधैर्य खचून जावं अशी ही परिस्थिती या बॉम्बहल्ल्याबद्दल सौदीने जाहीर माफी मागण्याचं सौजन्य वगैरे दाखवलं; पण त्यावर विश्वास ठेवण्यास 'एमएसएफ' बहुधा तयार नसावं. कारण लगेचच येमेनच्या उत्तर भागातली आपली सर्व उपचारकेंद्र बंद करून टाकण्याचा निर्णय संस्थेने घेतला. त्यामुळे आधी ठरलेल्या ठिकाणाऐवजी आता मला तैज शहराजवळ एका अशा भागात जायचं होतं, जिथे युद्धाच्या निव्वळ झळा बसत नव्हत्या, तर प्रत्यक्ष युद्धच सुरू होतं. तिथल्या वातावरणाचा मला एकूण अंदाज यावा आणि अशा परिस्थितीत काम करताना काय अपेक्षित आहे याची मला कल्पना यावी या उद्देशाने तिथल्या सर्जिकल सल्लागारासोबत फोन, मेल्स आणि स्काइपवर सतत चर्चा सुरू झाल्या. चर्चेमध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असायचा तो सुरक्षिततेचा आणि त्याच्याशी निगडित व्यवस्थेचा. त्या महिन्याभराच्या काळात मी जिथे काम करणार होतो त्या हॉस्पिटलच्या बाहेर मला अजिबात पडता येणार नव्हतं, ही गोष्ट मला वारंवार सांगितली जात होती. अर्थात, आणीबाणीची परिस्थिती ओढवल्यास हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याचे मार्ग मला सांगितले गेलेच.
येमेनमध्ये पोहोचण्यापूर्वी तिथली परिस्थिती अधिक तपशीलवार समजून घेण्यासाठी या मोहिमेशी निगडित सर्व प्रश्न हाताळणाऱ्या 'एमएसएफ'च्या जिनिव्हा कार्यालयात मी पूर्ण एक दिवस घालवला. तिथून मग मी आधी जीबोटीत आलो. जीबोटी हा पूर्व आफ्रिकेतला एक छोटासा देश. माझ्यासोबत इटलीमधून आलेला भूलतज्ज्ञ डॉ. स्टेफानो आणि या मिशनचा प्रमुख असे दोघं होते. आम्हाला जीयोटीत एक दिवस मुक्काम करणं भाग होतं. कारण येमेनमध्ये जाण्यासाठी कोणतीही विमान वाहतूकसेवा उपलब्ध नव्हती. सौदीकडून कधी आणि किती हवाई हल्ले होतील याचा अंदाज बांधणं जिये अवघड तिथे कपाळमोक्ष करून घ्यायला जाणार कोण आणि कशाला? मात्र, जीबोटीतून येमेनमध्ये एमएसएफची विशेष हवाई सेवा आहे. त्यासाठी दिवसात चार तासांचा 'विंडो' काळ राखीव असतो. तेवढ्याच काळात राजधानी सानाच्या विमानतळावर उतरता येतं.
दुसऱ्या दिवशी त्या राखीव वेळातच एका आठ सीटर विमानातून दीड तासाच्या विमानप्रवासानंतर आम्ही सानामध्ये उतरलो. समोर दिसलेल्या 'विमानतळ' नावाच्या जागेची दुरवस्था काळजाचा ठोका चुकवणारी होती. सततच्या बॉम्बहल्ल्यांत भग्न झालेल्या इमारती, जळलेल्या विमानांचे आणि हेलिकॉप्टर्सचे भग्नावशेष सगळीकडे विखुरलेले. ते दृश्य पुढच्या परिस्थितीची चाहूल देणारं, सुन्न करणारं होतं.
त्या दिवशी फक्त आमचं एकच विमान सानात उतरलं. येमेनमधला आमचा स्वयंसेवक झुल्फिकार आम्हाला घ्यायला आला होता. आम्ही तिथे वैद्यकीय मदतीसाठी आलो आहोत हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा तो डोळ्यांत येणारं पाणी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत पुनःपुन्हा आमचे आभार मानत होता. बॉम्बहल्ल्यांमध्ये जखमी होत असलेल्या आपल्या देशातल्या लोकांवर उपचार करण्यासाठी येणाऱ्या डॉक्टरांबद्दल कशी कृतज्ञता व्यक्त करावी हे त्याला कळत नव्हतं.
सानाच्या राजनैतिक परिसरात काही मोजके दूतावास आता शिल्लक होते. त्याच भागात एमएसएफचं निवासस्थान होतं. तिथे पोहोचल्यावर पुन्हा एकदा सुरक्षाविषयक सूचनांची उजळणी झाली. उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये कोणती संसाधनं उपलब्ध आहेत, हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रकारचे रुग्ण येतात याची पुन्हा माहिती दिली गेली.
हेही वाचा - युद्धांमधल्या माणुसकीचा आठव
नव्या मोहिमेच्या नव्या आव्हानांचा विचार करतच झोपायला गेलो. मला आल्या आल्याच या कार्यक्षेत्राचा 'नीट' परिचय व्हावा अशी योजनाच जणू बंडखोरांनी आखली असावी असं वाटायला लावणारे स्फोट त्या रात्री झाले. एक-दोन नव्हे, तर बॉम्बच्या तीन मोठ्या धमाक्यांनी त्या रात्री दचकून जाग आली. अगदी जवळपासच कुठे तरी मोठा भूकंप व्हावा तसा 'धडाम' आवाज आणि काही क्षण हादरणारा परिसर..! कुठे फुटला असेल हा बॉम्ब, या विचारात झोपण्याचा प्रयत्न करेपर्यंत दुसरा धमाका...! जरा वेळाने तिसरा ! तिथे राहणाऱ्या बाकी लोकांना याची सवय झाली असावी बहुधा. कारण एकाने शांतपणे सांगितलं, "सौदी विमानं राजनैतिक परिसरात बॉम्बिंग करत नाहीत." (तेवढाच दिलासा..?)
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मी आणि डॉ. स्टेफानो एका वाहनातून निघालो. अब्दुल नावाच्या आमच्या येमेनी ड्रायव्हरला इंग्लिश आणि अरेबिक भाषा येत होत्या.
आमच्या पाठीवरच्या सॅकमध्ये सगळी महत्त्वाची कागदपत्रं होती. हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत गाडीतून कुठेही न उतरण्याविषयी पुन्हा पुन्हा सूचना मिळत होत्या. आमच्या मदतीसाठी आमच्या गाडीच्या मागोमाग आणखी एक गाडी येत होती. हौती बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या तब्बल एकोणीस टेहळणी चौक्या आम्ही पार केल्या. प्रत्येक चौकीवर हातात एके-४७ किंवा ग्रेनेड घेतलेले बंडखोर, त्यांच्या मागे 'संरक्षणासाठी' सुसज्ज रणगाडे. ते पाहताना वारंवार मिळणाऱ्या सुरक्षाविषयक सूचनांचं महत्त्व समजलं. काही चौक्यांवर कात चघळणारे, कोणतंही वाहन बेधडक चालवणारे ९-१० वर्षांचे 'बंडखोर'ही होते. त्यांना बघून मन अतिशय खिन्न होत होतं. इथे जवळजवळ प्रत्येक येमेनी काताची पानं चघळताना दिसतो. गुटखा किंवा तंबाखूप्रमाणेच ही पानंही 'किक' देतात. ती चघळली की कित्येक तास भुकेची जाणीव होत नाही. मात्र, ही पानं चघळणाऱ्यांची वेदना सहन करण्याची क्षमता कमालीची कमी होत जाते. पण त्याची चिंता त्यांना कशाला वाटणार? वेळ आलीच तर तो प्रश्न डॉक्टरांनी सोडवायचा! प्रत्येक नाक्यावर आमची कागदपत्रं आणि 'एमएसएफ'चं ओळखपत्र तपासून बघितलं गेलं आमचे चेहरेही निरखून पाहिले गेले. डोळ्यांवर काळा गॉगल न घालण्याच्या सूचना वारंवार का देण्यात आल्या होत्या हे तेव्हा समजलं.
...आणि एकदाचे आम्ही तैजजवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्या परिसरात ते एकमेव हॉस्पिटल होतं. हाँगकाँगहून आलेले डॉ. जिमी हॉस्पिटलच्या 'रेड रूम'चे, म्हणजे तातडीच्या सेवा देणाऱ्या व्यवस्थेचे प्रमुख होते. गावातील इतर हॉस्पिटल्स बंद असल्याने गावात काम करणारे काही डॉक्टर्सही इथे मदतीसाठी आले होते. तिथे डॉ. अहमद यांच्याशी परिचय झाला. ते पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्या गावापासून पंधरा किलोमीटरवर ते स्वतःचं हॉस्पिटल चालवत होते. त्यांचे आई-वडीलही डॉक्टर होते; पण त्यांचं हॉस्पिटल बंडखोरांनी ताब्यात घेतल्यामुळे ते इथे आले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते आपल्या आई-वडिलांना भेटूही शकले नव्हते. तरीही मनातल्या सगळ्या कुशंका दूर ठेवून ते आमच्याबरोबर काम करत होते.
युद्धग्रस्त भागात असूनही आमच्या हॉस्पिटलमध्ये एक छोटी एक्स-रे रूम, एक ऑपरेशन थिएटर, अगदी प्राथमिक सोयी असलेली प्रयोगशाळा आणि आश्चर्याची बाब म्हणजे काही बाटल्या रक्तसुद्धा होतं, हॉस्पिटलमधले स्थानिक मदतनीस स्वेच्छेने काम करणारे होते.
हॉस्पिटलमध्ये असलेल्या पस्तीस रुग्णांपैकी एकोणीस रुग्ण माझी वाट बघत होते. त्यांच्या जखमांचे प्रकार यापूर्वीच्या सीरियाच्या मोहिमेत बघितलेलेच... कोणी बंदुकीच्या अस्ताव्यस्त फैरीच्या गोळ्या अंगात ठिकठिकाणी घुसल्यामुळे, तर कोणी बॉम्बच्या धमाक्यामुळे उडालेल्या अणकुचीदार कपच्यांमुळे घायाळ झाले होते. कुणाच्या शरीरावर सुरीसारख्या धारदार शस्त्रांनी झालेले वार दिसत होते, तर कुणी भाजलं होतं किंवा अपघातात सापडल्याने जखमी झालेलं होतं. कोणाच्या अंगावर मुद्दाम केलेल्या छळाच्या किंवा बलात्काराच्यासुद्धा जखमा होत्या. त्यांतल्या काही केसेस अगदी लक्षात राहाव्या अशा. हातात बंदूक घेऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेच्या हातून चुकून त्या गनचा ट्रिगर दाबला गेला, गोळी सुटली आणि तिने आपला पंजा गमावला. दुसऱ्या एका घटनेत एकाच्या मांडीच्या खुब्यातून शिरलेली गोळी वेडीवाकडी थेट पोटापर्यंत जाऊन आतड्याला अनेक जखमा करत बाहेर पडली होती. एकाच गोळीमुळे दोन्ही पाय जायबंदी झाल्याची घटना मी आजवर कधी ऐकली नव्हती, पण इथे तसा एक पेशंट भेटला. त्याच्या डाव्या-उजव्या कोणत्या तरी बाजूने आलेली गोळी आधी त्याच्या एका पायात शिरली, तिथून बाहेर पडून दुसऱ्या पायात घुसली आणि दोन्ही पाय जायबंदी करून बाहेर पडली. एकाला रस्त्यात भला मोठा लोखंडाचा चेंडू दिसला. तो विकून चार पैसे मिळवू म्हणून त्याने तो उचलला आणि तोपर्यंत न फुटलेला तो बॉम्ब त्याच्या हातात फुटला...! तैजच्या धडधडत्या युद्धक्षेत्रात घर असणाऱ्या एका कुटुंबाची कथा तर मन हेलावून टाकणारी होती. बॉम्बस्फोटात जबर जखमी झालेला कुटुंबप्रमुख पहिल्या दिवशी उपचारांसाठी दाखल झाला, पाच दिवसांनी बंदुकीच्या गोळ्या छातीत लागून जखमी झालेली त्याची तरुण मुलगी आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गोळ्यांनी घायाळ झालेली त्या मुलीची आई... पण उपचार घेऊन त्यांना पुन्हा त्याच घरात राहायला जाणं भाग होतं.
रुग्णांशी संवाद साधायला अरेबिक-इंग्लिश भाषा जाणणारे दुभाषे सतत आमच्यासोबत असायचे. सुरक्षाकवच घातल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये हालचाल करण्यास आम्हा प्रत्येकाला जणू मनाईच होती. सुरक्षेचा असाच विळखा हॉस्पिटलभोवतीही होता. नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांनाही हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अंगावरची सर्व शस्त्रं बाहेरच ठेवावी लागायची.
हेही वाचा - वाटणी झालेल्या घरातून
आम्ही रोज सकाळी स्वतःच स्वतःचा नाश्ता बनवून घ्यायचो. सकाळी काम सुरू करण्यापूर्वी रोज आमची एक मीटिंग व्हायची. ती मीटिंग महत्त्वाची असायची, कारण मीटिंगमध्ये युद्धक्षेत्रातल्या ताज्या परिस्थितीचा नेमका अंदाज मिळायचा रोजची सुरक्षा परिस्थिती, सीमेवर सुरू असलेल्या हालचाली, चेकपोस्टवरची परिस्थिती, रोजच्या नव्याने पेटणाऱ्या संघर्षाच्या नव्या जागा, आमच्याकडे उपलब्ध संसाधनांची परिस्थिती, हॉस्पिटलमधून बरे होऊन गेलेले रुग्ण आणि झालेले मृत्यू, नव्याने येणारे रुग्ण, असा सगळ्या गोष्टींचा त्यात आढावा घेतला जायचा. ही मीटिंग झाली की वॉर्डचा राऊंड घेतला जायचा. आणि मग फक्त ऑपरेशन्स. रोज किमान दहा-बारा शत्रक्रिया ठरलेल्या. त्यातही रोज दाखल होणारे तातडीचे रुग्ण हमखास असायचेच. मग आधी ठरवलेला शत्रक्रियांचा क्रम बदलून नव्याने आलेल्या रुग्णाला टेबलवर घ्यावं लागे. ही निव्वळ माझी नव्हे, तर सगळ्या हॉस्पिटलचीच परिस्थिती होती.
तैज शहर गेली दोन वर्षं सतत होरपळून निघतं आहे. त्यामुळे तिथल्या एकूणच समाजाचं आरोग्य पार ढासळलेलं आहे. विशेषतः गर्भवती स्त्रिया, मुलं आणि वृद्ध माणसं यांचे अतोनात हाल होत आहेत. लोकांपुढे दोनच पर्याय आहेत : घर सोडून जवळपासच्या तात्पुरत्या, प्लास्टिकच्या छपराखाली उभ्या असलेल्या आणि कोणतीही सोय नसलेल्या छावण्यांमध्ये राहायला जायचं. दुसरा पर्याय म्हणजे एखाद्या रिकाम्या शाळेतल्या किंवा इमारतीतल्या गर्दीने ओसंडून वाहत असलेल्या तात्पुरत्या निवासाच्या आश्रयाला जायचं. ज्यांना आरोग्यसेवेची गरज आहे त्यांच्यापुढेही दोनच पर्याय- घरात राहून मृत्यूची वाट बघायची किंवा जिवावरचा धोका पत्करून हॉस्पिटलमध्ये यायचं, त्यामुळे बरे झालेले रुग्णही हॉस्पिटल सोडून जायला तयार नसत. मग आमची नर्स त्यांना समजावून सांगायची. गरजू रुग्णाला आपली जागा देणं किती गरजेचं आहे हे लक्षात आलं की मगच ते हॉस्पिटलमधून जायला तयार होत; पण त्यांच्यापैकी बहुतेकांना तिथून बाहेर पडून जायचं कुठे, या प्रश्नाचं नेमकं उत्तर ठाऊक नसे.
येमेन मोहिमेसाठी आम्हाला ज्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या होत्या त्यांत स्त्रियांशी बोलताना आणि त्यांची तपासणी करताना पाळायच्या नियमांचा समावेश होता. इथे प्रत्येक स्त्रीला बुरखा सक्तीचाच होता. त्यामुळे त्यांचे फक्त डोळे काय ते दिसत असत. बाहेरच्या देशातून आलेल्या नर्सेससुद्धा या नियमाला अपवाद नव्हत्या. पण कौतुक आणि आश्चर्याची बाब म्हणजे दोन येमेनी स्त्री-डॉक्टर्स आमच्याबरोबर केवळ वॉर्डमधेच नव्हे, तर 'रेड रूम'मध्येही काम करत होत्या.
आमच्यासारख्या बाहेरून आलेल्या डॉक्टर्सवर इथे राहताना अनेक मर्यादा होत्या. त्या लक्षात घेता स्थानिक डॉक्टर तयार करणं, त्यांना प्रशिक्षित करणं हाच एक महत्त्वाचा इलाज होता. आम्हा सर्वांचं तेही एक उद्दिष्ट होतंच. त्यामुळे रोज ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या काही घडामोडी होत, शखक्रिया होत, ते सगळं शिकण्यास तिथले स्थानिक डॉक्टर्स, बाकीचा स्टाफ, सारेच उत्सुक असत. सर्व येमेनी दर शुक्रवारी आपल्या प्रार्थनेसाठी सुटी घेत. आम्ही मात्र एकही दिवस सुटी न घेता काम करायचो. दोन-तीन शस्त्रक्रियांच्या दरम्यान येणारा कॉफी ब्रेक हीच आमच्यासाठी चैन असायची.
हेही वाचा - देशांनी अमेरिकी वर्चस्व झुगारण्याची वेळ आलेली आहे
हॉस्पिटलपासून केवळ वीस मीटर अंतरावर आमच्या निवासाची सोय होती. मला आठ बाय दहा फुटांची एक स्वतंत्र खोली मिळाली होती. अर्थात सर्वांना असं स्वतंत्र खोलीचं 'सुख' नव्हतं. माझ्यासोबत त्या इमारतीत मेंगळुरूमधून आलेले डॉ. शान; नॉर्वे, स्लोवाकिया आणि स्वित्झर्लंडहून आलेल्या नर्सेस; हाँगकाँगहून आलेले डॉ. जिमी, स्वीडनमधून आलेले आमचे मिशन प्रमुख आणि इतरही अनेक लोक राहत होते. तिथे राहणाऱ्या सर्वांसाठी मिळून एक स्वयंपाकघर, टीव्ही आणि वायफाय सुविधा असलेलं जेवणघर अशा सोयी होत्या, त्या इमारतीच्या गच्चीवर एक मोठा रेडक्रॉस आणि एमएसएफचा लोगो काढलेला होता बॉम्बिंग करणाऱ्या विमानांनी बॉम्ब टाकण्यापूर्वी विचार करावा म्हणून. आणि तरीही, हॉस्पिटल आणि आमचं निवासस्थान या दोन्ही इमारतींमध्ये 'सेफ रूम्स' आणि तिथे काही दिवस टिकाव धरता यावा यासाठी पुरेशी अन्नधान्याची रसद, अशी तरतूद करून ठेवलेली होती.
येमेनमधला माझा मुक्काम संपण्याच्या दहा दिवस आधी सानामध्ये तुफान बॉम्बिंग होऊन दीडशे माणसांचा बळी गेला होता, पाचशेहून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. परिणामी, साना विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला होता. माझा मुक्काम लांबण्याची शक्यता असल्याचं मी माझ्या घरी कळवून ठेवलं होतं; पण सुदैवाने माझ्या निघण्याच्या एक दिवस आधी विमानतळ पुन्हा खुला झाला. एकीकडे मला घरी जाण्याची ओढ होती, पण दुसरीकडे एक डॉक्टर म्हणून तिथून माझा पाय निघत नव्हता. त्याला कारण एकच होतं- मी गेल्यावर पुढचे दोन महिने तिथे कोणी ऑर्थोपेडिक सर्जन येणार नव्हता. त्यामुळे मी मुक्काम वाढवावा किंवा जाऊन परत यावं असा सगळ्यांचा आग्रह सुरू होता.
मी निघण्यापूर्वी येमेनी जनरल सर्जन डॉ रओफ यांनी त्या युद्धग्रस्त परिस्थितीतही माझ्यासाठी केक मागवला. कुठून आणि कसा ते ठाऊक नाही. ऑपरेशन थिएटरमधल्या माझ्या सहकाऱ्यांनी खास येमेनी कॉफी मागवली. माझ्यासाठी मागवलेल्या वाहनातून मी निघालो तेव्हा जाणवलं, की मी तब्बल एक महिन्यानंतर त्या इमारतीच्या आवारातून बाहेर पडत होतो ! सानाच्या उद्ध्वस्त विमानतळावरून विमान उडाले तेव्हा मनात आलं, की माणसाच्या जगण्याच्या इच्छेची आणि चिवटपणाची परीक्षा बघणाऱ्या या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य मला आहे; पण या रोजच्या युद्धग्रस्त वातावरणात गुदमरणाऱ्या हजारोंना ते भाग्य नाही. त्यांना जगण्यासाठी कोणती आशा बळ देत असेल? दुर्दैवाने त्या क्षणी माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
सीरिया-जॉर्डननंतर मी परत येमेनला जायचं ठरवलं, तेव्हा 'एकच अनुभव पुन्हा घेण्यात काय मजा आहे?' असा प्रश्न मला कुणी तरी विचारला होता. पण माझ्यासाठी हे दोन्ही अनुभव एकसारखे नव्हते हे मला नक्की ठाऊक होतं. वरवर बघता युद्धग्रस्त भागातील रुग्णांसाठी काम करणं हे साम्य कदाचित असेल, पण ते वगळता दोन्ही कार्यक्षेत्रं किती तरी वेगळी होती. तिथले प्रश्न, माणसं, परिस्थिती, सगळंच वेगळं होतं.
मुळात मी असा 'वेगळा अनुभव' वगैरे घेण्यासाठी या मोहिमेवर गेलो होतो का? की माझ्या स्वतःच्या 'कम्फर्ट झोन'मधून बाहेर पडून, स्वतःला जखडून टाकणाऱ्या मानसिक मर्यादा ओलांडून आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करणं हा माझा हेतू होता? कोणतीही अपेक्षा न करता रुग्णसेवा करण्याचा धडा मला हवा होता का? कारण येमेनमध्ये मी ज्यांच्यावर उपचार करणार होतो किंवा त्यापूर्वी जॉर्डनमध्ये मी ज्यांच्यावर उपचार केले त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू शकणार होतो? भारतातसुद्धा अनेक सामाजिक उपक्रमांत मी सहभागी होतच होतो. तरीही अशा बाहेरच्या धगधगत्या युद्धक्षेत्रात मला का जावंसं वाटत होतं?
माझ्या मित्रांनी आणि परिस्थितीने उपस्थित केलेल्या अशा अनेक प्रश्नांचा शोध घेत स्वतःमध्ये अधिक खोल उतरण्याचा प्रयत्न मी आजही करतो. एवढंच जाणवतं, की बॉम्बस्फोटात किंवा गोळीबारात जखमी झालेल्या त्या असहाय रुग्णांवर उपचार करताना मनाला असीम समाधान लाभलं होत. सध्या एवढं एकच उत्तर मला पुरेसं आहे... कदाचित पुढच्या मोहिमेवर जाईपर्यंत !
(शब्दांकन : वंदना अत्रे)
(अनुभव मे, २०१७च्या अंकातून साभार..)
