आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

वाटणी झालेल्या घरातून

  • सारंग दर्शने
  • 11.05.25
  • वाचनवेळ 18 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
pakistan

पाकिस्तान हा सध्या (आणि एकुणातही) सर्वाधिक चर्चेत असलेला विषय. ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवल्याचं समाधान भारतीयांमध्ये आहे. पण पाकिस्तान सरकार,लष्कर आणि आयएसआय हे प्रकरण वेगळं आणि तिथली सामान्य जनता वेगळी, असं पाकिस्तानात जाऊन आलेले भारतीय आवर्जून सांगतात. पत्रकार सारंग दर्शने २०११ मध्ये एका अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने पाकिस्तानला जाऊन आले होते. त्यांना पाकिस्तान कसा दिसला हे सांगणारा त्यावेळेचा हा लेख.

मुंबईतल्या पत्रकारांच्या टीमने कराचीत पाऊल टाकल्यापासून सर्वांच्या मनात एक ओढ होतीच. ती म्हणजे पाकिस्तानचे जनक महंमदअली जीना यांचं स्मारक बघण्याची. त्याला ‘मझर-ए-कैद' असं म्हणतात. जीनांचा गौरव ‘कैद-ए-आझम' असा होतो. म्हणजे असामान्य, धुरंधर नेता. जीनांचं हे मझर कराचीच्या ऐन मध्यस्थानी आहे. त्याचा परिसर विशाल आहे. इथेच लालकृष्ण अडवाणी यांनी जीना यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. जीनांच्या या स्मारकाची देखभाल करण्याची सगळी जबाबदारी अफाफ एंटरप्रायजेस या खासगी कंपनीकडे ठेक्याने दिली आहे. आणि या कंपनीकडून नेमला गेलेला व्यवस्थापक आहे एक माजी लष्करी अधिकारी. त्यांचं नाव मेजर (निवृत्त) एस. अथर मीर. ते या ‘बाग-ए-कैद'चे प्रोजेक्ट मॅनेजरही आहेत. जीनांचं हे स्मारक शुभ्र संगमरवरी आहे. हा मौल्यवान दगड स्वातंत्र्य मिळाल्यावर पाकिस्तानातच सापडला. त्या अर्थानं ते स्मारक देशी आहे. पण जीनांची बहीण फातिमा यांना पाकिस्तानी लष्करशहांनी नेमलेले वास्तुविशारद आणि त्यांचं डिझाइन पसंत पडलं नाही. त्यांनी शेवटी मुंबईतल्या- म्हणजे जीनांच्या मर्मबंधातली ठेव असणाऱ्या शहरातल्या आर्किटेक्टना बोलावून त्याचं डिझाइन करवून घेतलं. या स्मारकाला चोवीस तास लष्कराची खडी ताजीम असते. पायदळ, हवाईदल आणि नौदल यांच्याकडे चार-चार महिन्यांची जबाबदारी आणि जीनांच्या कबरीपासून अवघ्या काही फुटांवर हातांत मशिनगन्स घेऊन उभ्या असणाऱ्या आठ सैनिकांची ड्यूटी. ती दर दोन तासांनी बदलते. ती बदलताना दर वेळी सलामी. मुंबईची टीम होती त्या वेळात आणखी आलं ते एक नेपाळी शिष्टमंडळ. बस्स! हे भारतीय व नेपाळी पाहुणे सोडून तिथे पाकिस्तानी नागरिक कोणी नव्हतंच. इतकंच काय, भारतीय टीमबरोबर आलेले पाकिस्तानी यजमानही आत डोकावायला फारसे उत्सुक नव्हते. उलट, ते लवकर निघण्याची घाईच करत होते. त्यामुळे या राष्ट्रीय स्मारकाच्या एका दालनात जपून ठेवलेली जीनांची कार पाहायची आमची इच्छा राहूनच गेली. तिथला कडेलोट लष्करी पहारा, सामान्य माणसांची वानवा, सैनिकांच्या टापा व सलामीचा घुमणारा आवाज, हे पाहताना सतत ‘राजघाट' आठवत होता. तिथलं गंभीर पण प्रसन्न वातावरण, हजारो पाहुण्यांची शांत लगबग, तिथली ‘रामधून' आणि आपोआप मनात शिरणारा गांधी- प्रत्येकाच्या मनाएवढा. त्या पार्श्वभूमीवर इथलं चित्र अगदीच उलटं होतं. जीना एकदा म्हणाले होते, ‘मी माझ्या टाइपरायटरच्या बळावर पाकिस्तान मिळवला आहे.' मझरमध्ये फिरताना हे वाक्यही आठवत होतं. जीनांना अर्थातच त्याचा अभिमान होता. पण या ‘टाइपरायटर'मधून जन्मलेल्या देशाची आज जी अवस्था आहे त्या अवस्थेचं ‘राष्ट्रपिता' जीनांची मझर हे मूर्तिमंत प्रतीक वाटत राहिलं- किती तरी अर्थांनी!

शेवटी मोजक्याच पाहुण्यांना प्रवेश असणाऱ्या तळघरातील जीनांच्या खऱ्याखुऱ्या (वर आहे ती प्रतिकृती) कबरीसमोर डोळे मिटून नतमस्तक होताना स्वत:ला गोपाळ कृष्ण गोखल्यांचे शिष्य म्हणवून घेणारे आणि लोकमान्य टिळकांसाठी न्यायालयात सगळं बुद्धिकौशल्य पणाला लावणारे महंमदअली जीना डोळ्यांसमोर तरळत राहिले...

जीनांना नवजात पाकिस्तान कसा घडवायचा होता माहीत नाही. त्यांना त्यासाठी फारसा वेळही मिळाला नाही. पण आज सामान्यच काय, प्रगल्भ पाकिस्तानी नागरिकांच्या मनात जे ‘इंडियन फिक्सेशन' आहे ते जीनांना नक्कीच आवडलं नसतं. पाकिस्तानात हिंडता-फिरताना हे सतत जाणवतं. आमच्या बाबतीत तर ही सुरुवातच कराची विमानतळावर झाली. तिथे उतरताच झालेलं उत्स्फूर्त, आर्द्र, भव्य स्वागत थक्क करून टाकणारं होतं. आणि त्यात कृत्रिमतेचा, औपचारिकतेचा लवलेशही नव्हता. स्वागत करणाऱ्यांमध्ये पत्रकार होते, कामगारनेते होते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते होते, विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी होते. पुरुष होते तशाच महिलाही होत्या. कॉलेजात जाणाऱ्या तरुण-तरुणीही होत्या. बहुतेकांना चेहऱ्यावरचं कुतूहल आणि स्वाभाविक आनंद लपवता येत नव्हता. स्नेहभराने हात हातात घेताना हे पाकिस्तानी मित्र सर्वांच्या गळ्यात गेंदेदार आणि खुशबूदार गुलाबांच्या माळा घालत होते. त्या गुलाबांची महक इतकी मोहक की सगळा आसमंत त्या गोड गंधाने भारून गेला. अनेकांना स्वत:च्या मोबाइलमध्ये पाहुण्यांची छबी टिपायची होती. कॅमेऱ्यांसमोर पोझ देण्याचा प्रेमळ आग्रह होत होता. अगदी पाहुण्यांचं सामान वाहून नेण्याचीही कित्येकांची इच्छा होती. अनेकांनी तर सक्ती करून पाहुण्यांच्या सामानांच्या ट्रॉल्या हातांत घेतल्याही. पाकिस्तानात आपलं जोमदार स्वागत होणार आहे अशी माहिती आधीच असणाऱ्या आणि डौलदार समारंभांची सवय असणाऱ्या पत्रकारांनाही हे स्वागत थक्क करणारं होतं. त्यातला ओलावा स्पर्शून जाणारा होता. हवेतली स्नेहाची ऊब आपसूक अंगात शिरत होती. मग प्रतिसादही मोकळा झाला. परस्परांना आलिंगनं दिली गेली. पुढच्या सगळ्या मुक्कामाची ही नुसती चुणूक होती. भारतातून आलेल्या काहीजणांनी काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी माणसं पाहिली तेव्हा न राहवून विचारलं,“तुम्हाला हात लावू का?” आणि मग हातात हात घेत ते म्हणाले,“तुम्ही अगदी आमच्यासारखेच आहात. तुमच्या-आमच्यात काहीच फरक दिसत नाही!” हा किस्सा अतिरंजित वाटला, तरी आपल्यासारखेच दिसणारे, जवळजवळ आपलीच भाषा बोलणारे, आपल्याच चणीचे आणि रंगाचे,आपल्यासारखेच कपडे घालणारे आणि ‘नमस्कार'च्या ऐवजी केवळ ‘सलाम' म्हणणारे असे पाकिस्तानी पाहणं,त्यांना भेटणं हा खरोखरच एक आवश्यक संस्कार होता. पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी अनेकांच्या मनात पाकिस्तानचं एक देश म्हणून मोनोलिथिक चित्र असणार. या एकाश्म चित्राला पहिल्याच दिवशी जबरदस्त तडा गेला. पाकिस्तानी सरकार, लष्कर, आयएसआय आणि पाकिस्तानी समाज या स्वतंत्र गोष्टी आहेत आणि त्यांच्या संबंधांमध्ये पुष्कळ गुंतागुंत आहे हे अर्थातच सर्वांना वाचून माहीत असतं. मात्र, प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या गुंतागुंतीची खोली लक्षात येते. पाकिस्तानी सामान्य माणूस हा तिथला सर्वांत दुर्लक्षित घटक आहे. त्याला बिचाऱ्याला भारताचा तिरस्कार तर सोडाच,उलट भारत तसेच भारतीय माणसांविषयी आतड्याचं प्रेम व आकर्षण आहे. तो जगण्याच्या लढाईत गळ्यापर्यंत पुरता रुतला आहे. सरासरी सामान्य भारतीयापेक्षा त्याची स्थिती जास्त खडतर आहे. कदाचित यामुळेच तिथल्या प्रत्येकाला तेव्हा नुकत्याच पार पडलेल्या भारतातील अण्णा हजारे यांच्या आंदोलनाविषयी कमालीची उत्सुकता होती. एक सामान्य माणूस सर्वशक्तिमान अशा केंद्रीय सरकारला आव्हान देऊ शकतो याचा अचंबा गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींच्याही बोलण्यातून उमटत असे.स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानचा निम्म्याहून अधिक कालावधी लष्करशाह्यांमध्ये गेला, त्यामुळे त्यांना अशा देशव्यापी लोकआंदोलनाचं अप्रूप असणं स्वाभाविक होतं. पाकिस्तानात भारतीय न्यूज चॅनेल्सवर बंदी असल्याने त्यांना या आंदोलनाच्या बातम्या पाकिस्तानी चॅनेल्स, वृत्तपत्रं आणि बीबीसीसारख्या वाहिन्या यांच्यामार्फतच कळत होत्या. कराचीत काहीजणांनी आवर्जून सांगितलं, “तिकडे तुमचा आणि आमचा पंजाब लागून आहे ना, तिथे तुमची सारी न्यूज चॅनेल्स नीट दिसतात.” मनात आलं, किती भारतीयांना पाकिस्तानी न्यूज चॅनेल्सची अशी ओढ असेल?

तिथे भारतीय बातम्यांची चॅनेल्स दिसत नसली तरी करमणुकीच्या भारतीय चॅनेल्सवर बंदीं नाही. त्यामुळे, आपण ज्यांना नाकं मुरडतो किंवा ‘सांस्कृतिक अध:पतन' मानतो अशा सगळ्या मालिका तिथे मोठ्या आवडीने पाहिल्या जातात. ‘सास भी कभी बहु थी'ची आठवण तर कित्येकांनी काढली. गंमत म्हणजे भीम, हनुमान, गणपती आणि पंचतंत्र यांच्या कार्टून मालिका सगळीकडे दिसतात आणि पाहिल्या जातात. पाकिस्तानची टीव्ही इंडस्ट्री म्हणावी तितकी विकसित झालेली नाही. त्यांना जाहिरातींचंही मजबूत पाठबळ नाही. त्यामुळे भारताइतकी कार्यक्रमांची निर्मितीही होत नाही. जे होतात ते इतके भपकेबाज, रंगतदार आणि आकर्षक नसतात. स्वाभाविकच, सगळा पाकिस्तान आपल्या हिंदी मालिका बघतो. जी गोष्ट मालिकांची तीच हिंदी सिनेमांची. हिंदी सिनेमे तुफान चालतात तिकडे. कराचीतल्या बाजारांमध्ये फेरफटका मारताना किमान चार-पाच तरुणांना आश्वासन द्यावं लागलं, की भारतात गेल्यावर जेव्हा केव्हा सलमान खान आणि शाहरुख खान भेटतील तेव्हा त्यांना तुमचा निरोप जरूर देईन. निरोप काय, तर ‘तुमचे सिनेमे आम्हाला खूप आवडतात. आम्हाला तुम्हाला एकदा तरी भेटायचं आहे,प्रत्यक्ष पाहायचं आहे.' पाकिस्तानातलं सिनेमाचं आगर म्हणजे लाहोर. त्याला आपल्या बॉलिवुडसारखं प्रेमाने ‘लॉलिवुड' म्हटलं जातं. पण बॉलिवुडचा प्रभाव त्याच्यापेक्षा किती तरी अधिक आहे. पाकिस्तानातल्या कपड्यांच्या फॅशन्स पुष्कळदा बॉलिवुडप्रमाणे बदलतात. कपड्यांच्या बाजारात फिरताना याची चुणूक दिसली. एका शहाण्या दुकानदाराने पंजाबी ड्रेसच्या कापडांमध्ये तसंच शर्टांच्या कॉलरमध्ये भारतीय नट-नट्यांच्या छब्या चिकटवल्या होत्या. बॉलिवुडच्या भाषेचा पाकिस्तानी उर्दूवर विपरीत परिणाम होत असल्याची (गोड की खरी?) तक्रार मात्र अनेक बुजुर्ग करत होते. त्यांचं म्हणणं असं, की आमची सगळी भाषाच या बंबईया उर्दूमुळे बिघडत चालली आहे. ही ‘उर्दू' म्हणजे आपली हिंदीच! सगळी तरुण मुलं उर्दूचा लहेजा बिघडवून टाकत आहेत आणि सिनेमा किंवा मालिकांमध्ये असतं तसं ‘तूने खाया क्या', ‘चल, पलटी मार', ‘जरा खचक' असली भाषा बोलतात, अशी तक्रार एका ज्येष्ठ पत्रकाराने उदाहरणं देतच केली. लोक किनखापी उर्दू बोलत नाहीत असं नाही. उलट, अनेकदा कित्येक फार्सी शब्द कळत नसत. उदाहरणार्थ, भाषणांची सुरुवात ‘मोहतरम अमुक किंवा मोहतरमा तमुक' असं स्टेजवरच्या सर्वांना आदबशीर अभिवादन करून होई. नंतर कळलं, की मोहतरम म्हणजे आदरणीय. छान ऐकत राहावं, ते पल्लेदार शब्द मनात घोळवावेत, असं बोलणारे कित्येक भेटले. पण तिथे खरी चिंता आहे ती पुढच्या पिढीच्या भाषेची. ती ‘बंबईया' म्हणजे खरं तर सोपी, साधी व थेट होत चालली आहे. आधुनिक भारतीय लोकसंस्कृतीचा आणि लोकजीवनाचा पाकिस्तानवर हा जो परिणाम होतो आहे त्याला गेल्या दोन दशकांत फोफावलेली माध्यमक्रांती कारणीभूत आहे. भाषा, फॅशन, मनोरंजन हे सारं नव्याने भारतातून येतं आहे. शिवाय भारताशी असणारं जुनं नातं आहेच! ते कुठे जाणार?

आमचे नातेवाईक भारतात राहतात,असं सांगणारे कराचीत पावलोपावली भेटतात. कदाचित, कराची आणि लाहोर या सीमेवरच्या मोठ्या शहरांमध्ये भारतातून फाळणीच्या वेळी गेलेले अधिक लोक राहत असावेत याचा तो परिणाम असेल. कराचीत मराठी कुटुंबंही आहेत. त्यांच्यात अगदी अलीकडे सीमा ओलांडणारे विवाहसंबंध झाले आहेत. एका खासदारांनी दिलेल्या खान्यात एक वयस्कर गृहस्थ पत्रकारांना शोधत आले आणि सांगू लागले, “माझं बालपण सोलापुरात गेलं. तिथे माझ्या आत्याचं घर आहे. मला फार यावंसं वाटतं.” इतकं बोलून ते सोलापुरातल्या एकेक खाणाखुणा सांगू लागले. जुन्या गावातले बहुतेक रस्ते त्यांना पाठ होते, लहानपणी पाहिलेले सिनेमे आठवत होते. फाळणीनंतर परत एकदाही सोलापूर पाहता आलं नाही त्याची उणीव ते महाराष्ट्रातून आलेल्या, मराठी बोलणाऱ्या पाहुण्यांशी संवाद साधून भरून काढू पाहत होते. ही एक कहाणी झाली. अशा असंख्य कहाण्या सर्वांना ऐकायला मिळाल्या. आणखी असंख्य न ऐकलेल्या असणार. भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं अविश्वासाचं वातावरण राजनैतिक पातळीवर इतकं गडद आहे की दोन्ही देशांमधल्या नागरिकांना व्हिसा मिळणं मुळीच सोपं नाही. निदान साठी उलटलेल्या आणि लहान मुलांना व्हिसा देताना फार कटकट होऊ नये यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्या. त्यातून चार पावलं पुढे पडली. पण आजही एका वेळी दोनच शहरांचा व्हिसा मिळतो. त्यामुळे, पाकिस्तानी नागरिक भारतात आपल्या नातेवाइकांकडे येतात तेव्हा गेट-टु-गेदरचं गाव आधीच ठरवून येतात. म्हणजे, सगळ्या गावांमधल्या नातलगांनी दिल्लीत एकत्र यायचं नि तिथे भेटायचं. याहीपेक्षा एक वेगळीच युक्ती दोन्हीकडच्या पैसे असणाऱ्या कुटुंबांनी शोधून काढली आहे. ती म्हणजे भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांतून तिसऱ्याच ठिकाणी, शक्यतो दुबईमध्ये एकत्र यायचं. तिथे भेटायचं आणि आपापल्या मायभूमीत परतायचं. ‘पीपल टु पीपल काँटॅक्ट' या वाक्‌‍प्रचाराचा आमच्या भेटीत अनेकदा उच्चार झाला. प्रत्यक्षात तसं होत नाही. होणं सोपंही नाही. एक मात्र खरं, फाळणीच्या वेळी असणारी दोन्हीकडची पिढी जवळपास अस्तंगत होऊनही दोन्हीकडची कौटुंबिक नाती, त्यांच्यातले संबंध, परस्परांची ओढ हे आज तरी कायम आहे. आणखी पन्नास वर्षांनी ही स्थिती राहीलच असं नाही. पण ज्यांना जावंसं वाटतं, मित्र-नातलगांना भेटावंसं वाटतं, त्यांनाही आज ते तितकंसं सोपं नाही. आणि आधीच्याच अशा प्रतिकूल वातावरणात कसाब व त्याचे साथीदार भरच घालतात.

मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला पाकिस्तानात फिरताना मनात रेंगाळत असतोच. कराचीतल्या मच्छीमारांच्या संघटनेने दोन्ही देशांनी पकडून ठेवलेले मच्छीमार सुटावेत यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांना कधी यश येतं, कधी नाही. काही मच्छीमार तर बिचारे वर्षानुवर्षं तुरुंगात खितपत पडलेले आहेत. त्यांचा गुन्हा काय,तर आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून मासे मारण्यासाठी दुसऱ्या देशाच्या पाण्यात प्रवेश केला. या मच्छीमारांच्या मासेमारी करणाऱ्या बोटी जिथे बांधल्या जातात,त्या गोदीत फिरताना ‘या इथूनच कसाब व इतर नऊजण निघाले असतील का?' हा प्रश्न मनात आलाच. तो विचारल्याशिवाय राहवलं नाही. ज्याला विचारलं तो मच्छीमारांचा म्होरक्या. त्याने हातातला छोटा दगड दूरवर सागरात फेकत कराची बंदराच्या पलीकडे- पूर्वेकडे वीस-तीस मैलांवर असणाऱ्या छोट्या गावाचं नाव सांगितलं आणि तो म्हणाला, “आमच्या बिरादरीत त्यांना कोणी थारा दिला नसता. उलट, त्यांना पकडूनच दिलं असतं. भारतावर झालेला हा हल्ला पाकिस्तानातही कित्येकांच्या जिव्हारी लागला. आम्ही त्या रात्री झोपू शकलो नाही. मुंबईत निष्पाप माणसं मरत असल्याचं कळत होतं. तुमच्याइतकंच त्याचं दु:ख आम्हालाही झालं.” असं सांगताना त्यांच्या पापण्या ओलावत. त्यांची भावना खोटी तरी कशी म्हणायची? कारण खुद्द कराची ही पाकिस्तानची आर्थिक राजधानी ज्वालामुखीच्या तोंडावर बसली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेचा खेळ सुरू झाल्यापासून पाकिस्तानातला दहशतवादी हिंसाचार कमालीचा वाढलाय. त्यात सर्वाधिक लक्ष्य झाली आहे ती कराची. सध्या रोजच्या रोज बॉम्बस्फोट,गोळीबार, हल्ले होत आहेत. आम्हा मुंबईच्या पत्रकारांच्या टीमचा कार्यक्रम कराचीत अचानक बदलला. हैदराबादची भेट एक दिवस आधीच ठरली. मात्र,आमची टीम ज्या दिवशी हैदराबादेत होती त्या दिवशी सायंकाळी पाकिस्तानातल्या विख्यात ‘जंग' वृत्तपत्रसमूहाने भारतीय पाहुण्यांसाठी स्वागत समारंभ ठेवला होता. स्फोट झाला तेव्हा योगायोगाने सारे हैदराबादेत होते. तीन दहशतवादी आणि त्यांना अडवणारे पोलिस मारले गेले. तो हल्ला आणि भारतीय पत्रकारांची भेट यांचा परस्परांशी संबंध असेलच असं नाही. पण या प्रसंगानंतर पत्रकारांच्या टीमचा बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला. कराचीत फिरताना बसच्या पुढे मशिनगन घेतलेल्या पोलिसांची जीप धावू लागली. पोलिस स्टेशनांच्या हद्दीनुसार गाड्या व बंदोबस्ताचे पोलिस बदलू लागले. या कडक बंदोबस्तातूनही काही पत्रकार स्वतंत्रपणे मनसोक्त फिरले. सुदैवाने सारे सुरक्षित राहिले, पण कराची हे मुंबईइतकं सुरक्षित शहर नाही, हा ठसा मनावर उमटलाच. तो खराही होता. कारण ‘द नेशन'सारख्या प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्राला कराचीतल्या हिंसाचारासाठी अख्खं पान द्यावं लागतं. त्यात दहशतवादी हल्ले, खून, अपहरण, चोऱ्या अशी मोठी वर्गवारी करावी लागते. मुंबईवरच्या हल्ल्यांची वेदना यामुळेच कराचीकरांना समजू शकते. सततच्या दहशतवादी हल्ल्यांनी तेही कमालीचे त्रस्त आहेत. देशाची ‘आर्थिक राजधानी'हा लौकिक हा हल्ल्यांमुळे धुळीला मिळतो आहे. तालिबान्यांनी कराचीतल्या मदरशांवर कब्जा करून लहान मुलांना कसं वेठीस धरलं आहे आणि त्यांना कसं सक्तीने दहशतवादी प्रशिक्षण दिलं जातं आहे हे तर नुकतंच उघड झालं आहे.

‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ लेबर एज्युकेशन अँड रिसर्च' (पायलर) या संस्थेने आमच्या या दौऱ्याची जबाबदारी उत्साहाने स्वीकारली होती.‘कराची प्रेस क्लब'ने त्यासाठी मोलाचं सहकार्य केलं होतं. या पायलरच्या गावाबाहेरच्या वसतिगृहात राहण्याची व्यवस्था होती. या वसतिगृहाबाहेर अहोरात्र मशिनगन घेतलेल्या पोलिसांचा पहारा असे. त्या पोलिसांमध्ये अर्थातच ‘आयएसआय'ला माहिती देणाऱ्या खबऱ्यांचाही समावेश असणार. दोन दिवस रात्री उशिरापर्यंत एक खासदार आमच्याशी गप्पा मारण्यासाठी येऊन बसत होते. त्यांच्या पक्षावर भारतप्रेमी असल्याचा ठपका. ते आणि त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर असे दोघंच इन्स्टिट्यूटमध्ये यायचे. गप्पा मारून झाल्या की मुक्काम न करता रात्री उशिराच ते परतही जायचे. पाकिस्तानी राजकारणातले अंत:प्रवाह त्यांच्याकडून समजावून घेण्यात मजा होती. ते येऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी ‘आयएसआय'च्या अधिकाऱ्याचा इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांना फोन आला :‘खासदारसाहेब एकटेच येताहेत की सोबत आहे इतर कोणी?'पदाधिकाऱ्यांनी अर्थातच खरं काय ते सांगितलं. दुसरं कोणी नव्हतंच. पण या भेटींकडे लक्ष ठेवावं, असं ‘आयएसआय'ला वाटत होतं. आमच्या बसचा चालकही इतर सर्वसामान्य चालकांपेक्षा खूप सावध,चतुर आहे,असा काहींचा होरा होता. त्याच्या या वेगळ्या हुशारीची चमक त्याने एकदाच दाखवली. गाडीत आम्ही दोघंच असताना त्याने ‘साब, बीबीसीका हिंदी और उर्दू न्यूज सर्व्हिस सुनते हैं' असं म्हणत रेडिओ लावला. मध्यंतरी बीबीसीची हिंदी सर्व्हिस बंद पडणार होती, पण तिला तात्पुरतं जिवदान मिळालं,हे सगळं त्याला माहीत होतं. आमच्या काही मित्रांचं म्हणणं, आपल्याकडे किती टूरिस्ट बसचे ड्रायव्हर बीबीसी ऐकत असतील? असो. जगात ‘ह्युमन इंटेलिजन्स'मध्ये ‘आयएसआय'चा फार वरचा क्रमांक लागतो,आणि इतकी दक्ष गुप्तचर संस्था इतक्या परदेशी पत्रकारांची भेट दुर्लक्षित तरी कशी ठेवणार? ‘आयएसआय'चं असं नाव असूनही कराचीतील हल्ले तर उणावलेले नाहीतच, पण एकूणच संरक्षणाची स्थिती काळजी करण्यासारखी आहे. आमचा मुक्काम असलेल्या पायलरमधून सकाळी फिरायला बाहेर पडायचं तर पोलिस आधी जाऊ द्यायचे,पण तो हॉटेलच्या बाहेर हल्ला झाल्यापासून एक पोलिस सरळ रस्त्यावर खुर्ची टाकून समोर फेऱ्या मारणाऱ्यांकडे लक्ष देत राहायचा. ‘माझ्या दृष्टीच्या पलीकडे जाऊ नकोस' अशी त्याची सौम्य ताकीदच असायची. ती ऐकायला लागायची. त्या वेळी चालताना, घरांच्या दाराआड तयार होऊन थांबलेली चिमुरडी मुलं दिसायची. ती बाहेर रस्त्यावर यायची नाहीत. त्यांना नेणारी जाळीबंद गाडी समोर आली आणि त्या गाडीची ओळख पटली की पळत पळत जाऊन गाडीत बसायची. ही मुलं घराबाहेर येऊन का उभी राहत नाहीत याचा कानोसा घेतल्यावर समजलं,की कराचीत मुलांची अपहरणं खूप होतात. मुलांना सुखरूप परत करण्यासाठी लाखो पाकिस्तानी रुपयांची खंडणी घेतली जाते. एका धनाढ्य कुटुंबाने त्यासाठी काही लाख रुपये कसे मोजले याची नुकतीच घडलेली कहाणीही एकाने ऐकवली. या असुरक्षित वातावरणामुळे कराचीतील श्रीमंत वस्त्यांमध्ये जे फ्लॅट तयार होतात त्यात एक खास खोली बनविली जाते. अशी खोली असल्याची काही बिल्डरांची जाहिरातही पाहावयास मिळाली. घरातल्या या खोलीला जाड लोखंडी दार असतं. ते इतकं मजबूत असतं, की दारापाशी बॉम्बस्फोट झाला तरी आतली माणसं सुरक्षित राहू शकतात. म्हणजे हल्ला झालाच तर धोक्याची घंटा वाजणार. ती वाजताच घरातल्या सगळ्यांनी त्या खोलीत पळायचं. तिथून मग पोलिसांना फोन. ‘अशी सुरक्षित अपार्टमेंट खरेदी करणं हा कराचीतील एक नवा श्रीमंती फंडा बनला आहे', असं तिथल्या एका उर्दू पत्रकाराचं म्हणणं.

पाकिस्तानातल्या अशा असुरक्षित वातावरणाला धार्मिक किंवा जातीय रंगही आहे का, असा प्रश्न मनात येत होता. कराचीत केवळ मुस्लिम नाहीत; हिंदू, ख्रिश्चन, शीख,पारशीही आहेत. आवारी या महाराष्ट्रात नातेसंबंध असणाऱ्या धनाढ्य पारशी कुटुंबाचे तर अनेक उद्योग आहेत,मोठं पंचतारांकित हॉटेल आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांचं हित जपण्यासाठी खास आयोग आहे. संपूर्ण दारूबंदीसारखा कठोर कायदा तिथे फक्त मुस्लिमांसाठी आहे, इतरांसाठी नाही. त्यामुळे अल्पसंख्याक दारू पिऊ शकतात तसंच दारूचं उत्पादनही करू शकतात. पाकिस्तानातला एक सर्वोच्च पातळीवरचा राजकीय नेता इतर दारू कंपन्यांच्या हात धुऊन कसा मागे लागला आहे आणि तो स्वत: मुस्लिम असला तरी ख्रिश्चन उद्योगपतींशी साटंलोटं करून कसा दारूच्या धंद्यात उतरला आहे याच्या कहाण्या तिथे सांगितल्या जातात. दारूवरच्या अतिरेकी बंधनामुळे ‘दारू' हे पाकिस्तानात चर्चेचं, गप्पांचं, गाण्यांचं, गॉसिपचं आणि छुप्या पराक्रमांचं एक मोठं ‘सुखनिधान'च बनलं आहे! नेत्यांच्या घरांमध्ये वाहणारी मदिरा म्हणजे पाहुण्यांना कपिलाषष्ठी वाटते. दारूच्या बाबत पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर मेहेरनेजर असली तरी हे लोक खरोखर सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आहे. आमची टीम कराचीत पोहोचली तेव्हा नुकतीच तीन हिंदू डॉक्टरांची खुलेआम हत्या करण्यात आली होती. त्या हत्यांना जातीय रंग असण्याची दाट शक्यता होती. मग हिंदू संघटनांनी मोर्चे काढले. कराचीत सगळे मोर्चे प्रेस क्लबच्या दारात जाऊन संपतात तसा तोही संपला. खुद्द केंद्र सरकारने तपासाचे आदेश दिले. अल्पसंख्याक आयोगाने चौकशी सुरू केली. पण, मंगला शर्मा या तिथल्या हिंदू नगरसेवक भेटल्या,तेव्हा त्या ‘हा जातीय हिंसाचार आहे', असं स्पष्ट म्हणायला तयार नव्हत्या.उलट, पाकिस्तानात हिंदू, शीख कसे सुरक्षित आहेत, असंच त्या आग्रहाने सांगत होत्या. त्यांच्या म्हणण्याला सोबतचा शीख कार्यकर्ताही साथ देत होता. त्यांना भारतीय पत्रकारांना ‘पोलिटिकली इनकरेक्ट' कोट द्यायचा नव्हता. पण पाकिस्तानी जनगणनेतले इतर सर्व धर्मांचे घटत चाललेले आकडे हे काही चांगलं लक्षण नाही.

हिंदूंची देवळं आणि धर्मस्थानं मात्र कराचीत पुष्कळच चांगली जपली आहेत. अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली तेव्हा त्याची तीव्र प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटली होती. कराचीत काही मंदिरांना त्याची झळ पोहोचली होती. निळकंठेश्वर हे शंकराचं भव्य मंदिर, दगडी बांधणीचं. ते दंगलखोरांनी जाळून टाकलं. पण त्यानंतर सिंध तसेच पाकिस्तानच्या केंद्र सरकारने जवळपास पन्नास लाख रुपयांची तरतूद करून मंदिर ट्रस्टकडून ते मंदिर पुन्हा बांधून घेतलं. आज जुन्या दगडी पायावर नवं भव्य मंदिर उभं राहिलं आहे. तिथे गर्दी तर असतेच, पण साधू वासवानी यांचा ‘मीटलेस डे'चा उपक्रमही तिथे चालतो. तिथे वर्षभर सगळे उत्सव होतात. कराचीतल्या बहुतेक मंदिरांची अशी काळजी घेतली जाते. याचं एक कारण म्हणजे कराचीत असणारी मुहाजिरांची मोठी वस्ती. हे सगळे मुहाजिर म्हणजे फाळणी झाल्यानंतर भारतातून आपला देश म्हणून पाकिस्तानात आलेले. त्यांची तिथे अनेक वर्षं गळचेपी झाली. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. मात्र, आता तशी स्थिती राहिलेली नाही.

कराची ही पाकिस्तानची आर्थिक राजधानी आता ‘मुत्तहिद कौमी मूव्हमेंट'च्या ताब्यात आहे. पूर्वी या अत्यंत लढाऊ चळवळीचं नाव होतं ‘मुहाजिर कौमी मूव्हमेंट'. आता हा प्रादेशिक पण देशभर फोफावणारा पक्ष झाला आहे. या पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा संस्थापक अल्ताफ हुसेन हा भारतद्वेष्टा नाही. उलट,त्याला भारताविषयी प्रेमच आहे. (तो आपल्या गुप्तचर संस्थांना मदत करतो, असा आरोपही पाकिस्तानात सर्रास होतो.) अल्ताफ हुसेन जिवाच्या भीतीने लंडनमध्ये राहून पक्षाचा कारभार चालवतात, कारण त्यांच्या हत्येचे पाकिस्तानात अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यांचा पक्ष कमालीचा शिस्तीचा, त्यांच्या आज्ञेत असणारा आणि आज कराचीची नाडी हातात असणारा असा आहे. या पक्षाच्या मुख्यालयात आम्ही गेलो. तिथला बंदोबस्त लष्करी छावणीला लाजविणारा होता. सतत तपासणी, वाहनांना अडथळे. अल्ताफ मतदारांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स करून बोलतात, भाषणे देतात. ही सगळी मंडळी फाळणी झाली तेव्हा भारतात घरदार सोडून आलेली. नव्या उमेदीने, नवी स्वप्नं उराशी बाळगून; पण तिथे गेल्यावर त्यांची निराशा झाली. पंजाबी वर्चस्वाने त्यांना दाबून टाकलं. आज ‘एमक्यूएम'चा जो दबदबा आणि वर्चस्व निर्माण झालं आहे ते या इतिहासातून. ‘एमक्यूएम'च्या मुख्यालयात भारतद्वेष तर नाहीच,पण भारतप्रेमच वाहतं. इतकं,की ‘एमक्यूएम'ला कराचीचा सगळा विकास मुंबईच्या धर्तीवर करायचा आहे, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. विशेष म्हणजे हा आरोप ते नाकारतही नाहीत. पण कराचीला मुंबई व्हायला अजून खूप अवकाश आहे. तिथे विजेची टंचाई आहे. उपनगरी रेल्वे हिंसाचाराच्या भीतीने बंद पडली आहे. सततच्या गुन्ह्यांनी, स्फोटांनी शहर रक्ताळलं आहे. जगातले उद्योगपती पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोकळी करूनही गुंतवणूक करण्यास फार उत्सुक नाहीत. लिबरल इकॉनॉमी तोलून धरण्यासाठी शिकलेल्या तरुणांची जी फौज लागते ती पाकिस्तानात नाही. मध्यमवर्गाचा उदय हळूहळू होतो आहे. अशा पाकिस्तानचा प्रवास सोपा नाही. भारताच्या प्रगतीशी तर त्याची तुलनाच होऊ शकत नाही. पण भारत सुखी व्हायचा तर पाकिस्तानसकट भारतीय उपखंड सुखी, समृद्ध होण्यास पर्याय नाही. मात्र, असा अजेंडा करण्याची संधी दोन्ही देशांतील शहाण्या लोकशक्तीला मिळणार आहे का आणि कधी मिळणार, हा खरा प्रश्न आहे. हा उभय पक्षी विकासाचा अजेंडा कधी तरी लिहिला जावा, प्रत्यक्षात यावा यासाठी आधी बांधायला हवेत संवादाचे पूल. तसा संवादाचा एक छोटासा पूल भारतीय पत्रकारांच्या या दौऱ्यात बांधला गेला इतकं मात्र नक्की!

(अनुभव, जानेवारी २०१२मधून साभार)

सारंग दर्शने | darshanesarang@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

आडवा छेद

nicobar project

ग्रेट निकोबार मेगा प्रोजेक्ट की आदिवासींच्या मुळावर घाला?

‘भारताचा हाँगकाँग करायचा आहे’ असं म्हणत केंद्र सरकारने ग्रेट निकोबार बेटावर भल्या थोरल्या विका...

  • मृदगंधा दीक्षित
  • 07.05.25
  • वाचनवेळ 5 मि.
online payment

भारतीय करताहेत रोज २.२ ट्रिलियन रुपयांचे ऑनलाइन व्यवहार

स्मार्ट फोन्सचा सुळसुळाट आणि त्यावर सहजी उपलब्ध इंटरनेट यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये देशात डि...

  • गौरी कानेटकर
  • 05.05.25
  • वाचनवेळ 3 मि.
jnu election

जेएनयू विद्यार्थी निवडणूक : डाव्यांच्या फुटीचा फायदा अभाविपला?

नुकत्याच पार पडलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीमध्ये ...

  • सोमिनाथ घोळवे
  • 02.05.25
  • वाचनवेळ 4 मि.

Select search criteria first for better results