आम्ही कोण?
ले 

तर मी माणूस उरणार नाही...

  • डॉ. एझिदीन
  • 01.08.25
  • वाचनवेळ 4 मि.
dr ezideens poem on gaza

गाझामध्ये सध्या युद्ध आणि इस्रायलने केलेल्या नाकाबंदीमुळे तीव्र अन्न तुटवडा आहे. तिथं लाखो लोक आणि कोवळी मुलंही उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. गहू, तांदूळ एवढंच काय स्वच्छ पाणी मिळणं सुद्धा कठीण झालंय. या पार्श्वभूमीवर तिथल्या एका नागरिकाने मांडलेला स्वानुभव

मी शपथ घेऊन सांगतो, देवाची, या दयनीय शतकाची...

माझ्यात उरलेली शेवटची मानवतेची ठिणगी विझण्याआधी मी शपथ घेऊन सांगतो,

आज मी जे पाहिलं ते जीवन नव्हतं...

पवित्र मानल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं ते पतन होतं.

एक काळ असा होता, जेव्हा गाझामधले शुक्रवार पवित्र असायचे..

परंपरेमुळे नाही, तर त्यातल्या हळुवारतेमुळे

त्या दिवशी वडील मासे किंवा चिकन घेऊन यायचे,

आणि एका तासासाठी का होईना आम्ही माणसांसारखं जेवायचो.

अलबत आम्ही गरीब होतो, पण पददलित नव्हतो.

आम्ही एकत्र टेबलवर बसून जेवताना हसायचो,

त्या जेवणासाठी देवाचे आभार मानायचो.

तेव्हा आम्हाला जिवंत असल्यासारखं वाटायचं..

आपण श्वास घेण्यास पात्र आहोत असं वाटायचं...

आमच्यातल्या गरीबातल्या गरिबाला देखील या प्रतिष्ठेची जाणीव होती..

हे सगळे आठवडाभर बचत करायचे, भूक सहन करायचे; सवयीने नव्हे, तर आशेने.

त्या एका दिवसासाठी.

त्या एका जेवणासाठी.

सामान्य जीवनाच्या त्या भ्रमासाठी.

पण आता?

आजही शुक्रवार आहे.

आजही मी गाझाच्या रस्त्यांवरून चालत निघालो,

काही साजरं करण्यासाठी नाही, जेवणासाठीही नाही, तर भात शोधण्यासाठी..

सडलेला भात..

बोटांना चिकटणारी राखाडी रंगाची भाताची बेचव शितं,

असं काहीही, असं काहीही जे पोटाला फसवून शांत करू शकेल..

माझ्या भावानं एक बाजार शोधला.. मी दुसरा बाजार शोधला.

आणि मुठभर भात घेऊन आम्ही परतलो.

खिशातली शेवटची काही नाणी आम्ही खर्ची घातली.

राखेच्या बदल्यात ते सोनं मागतात आणि आम्ही ते देतो,

आम्ही ते देतो कारण मुलांना खायला द्यायला हवं

आम्ही ते देतो कारण न्यायाची भाषा करण्याची आता आमच्यात हिंमत राहिलेली नाही.

पण आज मी भाताविषयी बोलायला आलेलो नाही.

मी जे पाहिलं त्याची कबुली देण्यासाठी आलेलो आहे.

मी पाहिलं एक ट्रक रस्त्यावरून चालला होता,

तो रिकामा होता.

त्यात पिठाच्या धुळीचा पातळ थर होता.

फक्त धूळ होती ती.

पिशव्या नाहीत. पाव नाहीत. एखाद्या लहान मुलाला यातल्या अन्नानं वाचवलं असेल याच्या काही खुणा होत्या त्या फक्त..

आणि मग मी त्यांना पाहिलं.

ते बंडखोर नव्हते. गुन्हेगार नव्हते.

ती लहानगी मुलं होती.

ती चिमुरडी धावत सुटली. शिकारीच्या मागं धावावं तशी.. त्या ट्रककडे

हाती कधीच खेळणी न पकडलेल्या त्या हातांनी ट्रकवर चढाई केली.

पळता पळता त्यांनी गुडघे टेकले असे जणू कुर्बानीच्या पवित्र वेदीवरच टेकले असावेत

आणि त्यांनी ती धूळ खरवडायला सुरुवात केली.

एकाच्या हाताला तुटकं झाकण लागलं.

दुसऱ्याला पुठ्ठ्याचा तुकडा मिळाला.

पण बाकीच्यांचं काय? बाकीच्यांनी त्यांचे हात वापरले.

जिभा वापरल्या

आणि ती धूळ चाटायला सुरुवात केली.

ऐकताय ना?

त्यांनी त्या निघून गेलेल्या ट्रकने मागे सोडलेली ती गंजलेल्या स्टीलवरची, त्या मातीतली ती पिठाची धूळ चाटली....

एक मुलगा हसत सुटला,

आनंदाने नव्हे, तर शरीर भुकेने वेडं झालं होतं म्हणून.

दुसरा रडत होता, शांतपणे, जणू कुणी आपलं ऐकतंय यावर आता त्याचा भरवसा उरला नव्हता.

आणि मी तिथे उभा होतो.

माझ्या संपूर्ण लज्जेसह..

हात खिशात घालून,

जणू मी समोरच्या जगाचा अंत बघत नसून शांतपणे एखाद्या बसची वाट बघतोय..

मला खच्चून ओरडायचं होतं.

पण कुठला आकांत त्या बधीर झालेल्या स्वर्गापर्यंत पोहोचू शकेल?

मी कोणते शब्द वापरू?

पिठाचे कण चाखण्यासाठी चिमुरड्यांनी गंज चढल्या वस्तूंवरून जीभ फिरवण्याचा आवाज मी कोणत्या शब्दांत मांडू?

आता कोणत्याही उपमा शिल्लक नाहीत.

यात कशातही काडीचं सौंदर्य उरलेलं नाही.

उरलंय फक्त पाप.

फक्त गुन्हा.

आणि आपण सगळे दोषी आहोत.

तुम्ही. मी.

ज्यांनी ट्रक पाठवला तेही आणि .

ज्यांनी विमानं पाठवली तेही.

आणि ईश्वर?

ईश्वरा तू हे बघत असशील, तर आमच्यासोबत रड.

आणि तूही शांत असशील, तर याचा अर्थ आम्ही या नरकात एकटे आहोत.

हे एकविसावं शतक आहे.

पण इतिहास पुढे सरकलेला नाही.

स्वतःच्याच अपत्यांना गिळून तो त्याला प्रगती म्हणतो आहे.

मला हे लिहायचं नाहीय.

मला ते दृश्य विसरून जायचंय.

मला त्या मुलाला विसरायचंय ज्याने ती धूळ चाटली.

पण मी विसरू शकत नाही.

कारण मी त्याला पाहिलंय.

कारण तो वास्तव आहे.

माझ्या या सगळ्या शब्दांपेक्षा तो अधिक वास्तव आहे.

आणि मी त्याला विसरलो, तर मी यापुढे माणूस उरणार नाही.

(अनुवाद: मृदगंधा दीक्षित)

(डॉ. एझिदीन यांच्या एक्स हॅण्डल वरून साभार.)

डॉ. एझिदीन







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 3

Anil Khandekar02.08.25
वाचताना विलक्षण त्रास होत होता. खेद , संताप आणि नंतर हतबलता .. शेकडो मैलांवरून केवळ व्यक्त होत आहे . भावना कल्लोळ , शब्द बंबाळ. नपुंसक मानवता.. आधुनिक विचार , भावना ... काही उपयोग नाही. पाशवी शक्तीचे क्रौर्यावर औषध माणुसकी . सर्व धर्म प्राचीन आहेत... त्यावर उपाय मानवता धर्म. तसेच भुकेवर उपाय अन्न. पाणी. युद्ध जनावरांच्या पातळीवर आले आहे.

विजय हिबारे 02.08.25
निशब्द! 😔😔😔

विजय बामणे 02.08.25
अत्यंत मनाला अस्वस्थ करणारे कथन.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results