आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

भेदाभेद भ्रम अमंगळ

  • युनिक फीचर्स
  • 20.06.25
  • वाचनवेळ 9 मि.
waari

सामाजिक विषमता, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी यांपासून मुक्ती मिळवली पाहिजे, अशी शिकवण आपल्याला वारकरी संतांच्या थोर परंपरेने दिली. पण ही शिकवण खुद्द वारकरी तरी आचरणात आणतात का, हे शोधण्याचा प्रयत्न युनिक फीचर्सच्या पत्रकारांनी २५ वर्षांपूर्वी एका वारीदरम्यान केला होता. तो हा लेख. वारकरी संप्रदायाची आजची परिस्थिती काय आहे हे ताडून बघता यावं यासाठी वारीच्याच निमित्ताने तो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

दरवर्षी देहू-आळंदीला लाखो वारकरी येत असतात. आषाढी-कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय असते. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांतून टाळ-मृदंगांचा गजर नि ‘ग्यानबा-तुकाराम' असा जयघोष करत वारकरी येतात. गेली सातशे वर्षं ही परंपरा महाराष्ट्रात आकार घेत आली आहे. गळ्यात तुळशीची माळ, कपाळी चंदनाचा टिळा, धोतर नेसलेलं आणि डोक्यावर टोपी किंवा फेटा हा वारकरी पुरुषांचा नि नऊवारी किंवा पाचवारी साडी हा महिलांचा वेष. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. काळी आई आणि विठाई ही वारकऱ्यांची दोन दैवतं. शेकडो वर्षांनंतर आज आधुनिक काळातही लाखो वारकरी कुठल्याशा अनामिक ओढीने देहू-आळंदी-पंढरपूरला एकत्र येतात, उन्हापावसात मैलोन्‌‍मैल पायी दिंडींत चालतात. या दिंड्यांत विविध जातींचे लोक गुण्यागोविंदाने मिसळून जातात.

वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर-नामदेवांनी रचला. त्याचा कळस केला संत तुकारामांनी. तेराव्या शतकात वारकऱ्यांची ही चळवळ सुरू झाली आणि आजपर्यंत चालू आहे. या संप्रदायाबरोबरचे अनेक पंथ लयाला गेले. वारकरी संप्रदाय मात्र काळाबरोबर चालत राहिला. पंढरीच्या वाळवंटात आणि इंद्रायणीच्या निसर्गरम्य तीरावर ही भक्ती चळवळ फुलली. टाळ-मृदंगांचा गजर जितका मधुर, तितकं माणसाचं जीवन सुंदर व्हावं, एवढंच या परंपरेचं म्हणणं. या परंपरेने विविध जातींत संत निर्माण केले. अज्ञानी, अडाणी माणसांना त्यांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' असा आत्मविश्वास दिला. जुन्या हिंदू परंपरेतील अनिष्ट गोंष्टींना या संतांनी नकार दिला, मात्र योग्य चालीरीतींचा पुरस्कार केला. माणूस हलका-भारी असतो हे देवानेच सांगितलं, हे रूढ असण्याच्या काळात ‘आपण सर्वजण देवाची आवडती लेकरं आहोत' ही संत शिकवण क्रांतिकारी ठरली नसती तर नवल! त्यामुळेच धर्माच्या जाचक बंधनांविरुद्ध झगडणारा वारकरी संप्रदाय सुधारक प्रवाह ठरला.

‘जो जे वांछील तो ते लाहो' यासारख्या पसायदानाने या प्रवाहाला उदार व समन्वयशील बनवलं. हिंदू धर्म एककेंद्री नाही, कर्मठ नाही, या विचाराला या प्रवाहाने बळकटी दिली. दुसऱ्या बाजूला ‘नाठाळाचे माथी हाणू काठी' हा आत्मविश्वासही बहुजन समाजाला याच प्रवाहाने दिला. म्हणून तर विविध जातींनी या प्रवाहाला आपलं मानलं. ‘अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो' असा समस्त महाराष्ट्रीय माणूस वारकरी परंपरेत सामील झाला. एक सुधारणावादी चळवळ, भक्तीच्या क्षेत्रात ऐक्यभाव आणणारी परंपरा आणि मानवतावादाचा पुरस्कार करणारा पंथ, असं वारकरी प्रवाहाचं एक विशिष्ट स्थान मराठी मनात खोल कोरलेलं आहे.

उर्वरित भारतीय समाज हा जातीपातींमध्ये अडकलेला असताना संतविचारांची भक्कम परंपरा असलेला वारकरी समाज नक्कीच पुढारलेला असणार असं आपण मानून असतो. या वास्तवाचं प्रत्यक्ष दर्शन घ्यावं अशा विचाराने आम्ही देहू आणि आळंदी इथे गेलो आणि तेथे आलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधायचा असं ठरवलं.

संत चळवळीमुळे जातिभेद गेला का? संतांच्या कार्यामुळे सामाजिक विषमता संपली का? अंधश्रद्धा व रूढीदास्य यांचं प्रस्थ कमी झालं का? असे प्रश्न आमच्या मनात होते. त्या अनुषंगाने स्त्री-पुरुष समभाव, जातिभेद, हिंदू-मुस्लिम संबंध या विषयांवर गप्पा मारल्या, त्यांची मतं जाणून घेतली, अनुभव शेअर केले, जिथे वारकऱ्यांनी परवानगी दिली तिथे फॉर्म्स भरून घेतले.

स्त्रियांना विशिष्ट मंदिरांमध्ये प्रवेश मिळत नसल्याची चर्चा वातावरणात असल्याने त्याविषयी विचारलं. ‘स्त्रियांना कार्तिकस्वामी किंवा शनीच्या मंदिरात प्रवेश दिला जात नाही. ही प्रथा योग्य आहे काय?' असा थेट प्रश्न आम्ही विचारला. त्यावर बहुतांश म्हणजे सुमारे ९० टक्के वारकऱ्यांनी ही प्रथा योग्य असल्याचं म्हटलं. ज्या पंथात स्त्री संतांनीही मोठं योगदान दिलं आहे तिथेही प्रस्थापित विचारांच्या बाजूने बहुमत दिसत असल्याने आम्हाला धक्काच बसला. त्यामुळेच ‘योग्य कसं काय म्हणता?' असं विचारलं जाणं स्वाभाविक होतं. त्यावर एक शेलकी प्रतिक्रिया पुढे आली ती अशी : “बायांना परवेश का नस्तु, तर तिला इटाळ-चंडाळ अस्तु नव्हं! कार्तिकस्वामी आन्‌‍ शनीला ते चालत नाय, हे धर्मानंच सांगून ठिवलंय नव्हं!”

याच प्रश्नावर काही तरुणांना विचारल,ं तर मोजक्याच जणांनी ‘ही प्रथा योग्य नाही, पण जुन्या चाली आहेत त्या कोण घालवणार?' असं तटस्थ उत्तर दिलं. मंदिरप्रवेशाच्या प्रश्नावर स्त्रियांशी बोलणं हा मात्र वेगळाच अनुभव होता. वय वर्षं ५० ते ६० च्या दरम्यान असणाऱ्या महिलांनी यावर ‘योग्य नाय, पण लोकास्नी हे पटाय पायजी का नाय? नसंल पटत तर कोण काय करणार?' अशी प्रतिक्रिया दिली. २५ ते ४० वयाच्या दोन-तीन स्त्रियांनी मात्र ‘आम्ही कुणाचं घोडं मारलंय?' अशी चीडयुक्त प्रतिक्रिया दिली. अडाणी महिलांनी ‘आमच्या वाट्याला असंच सारं येतं, त्याला कोण काय करणार? असा सूर लावला. स्त्रियांना इटाळ-चंडाळामुळे मंदिरात प्रवेश देऊ नये असं वारकऱ्यांनी म्हणावं आणि स्त्रियांनी हताश प्रतिक्रिया द्यावी, हे अस्वस्थ करून सोडणारं आहे. वास्तविक सर्वच संतांनी स्त्री-पुरुष समभावाची शिकवण दिली; पण वारकऱ्यांमध्ये हे वारं पुरेसं शिरायला तयार नाही, असं वाटून गेलं.

आपल्याकडे गावगाडा आणि त्यातील जातिप्रथा ही शेकडो वर्षं जुनी व्यवस्था आहे. जातिभेदांनी समाज पोखरला म्हणून संतांनी त्याविरुद्ध बंड केलं. त्यातून अस्पृश्यता आणि जातिभेदाची भावना खिळखिळी झाली, पण अस्पृश्यांना वेगळे पाणवठे आणि स्मशानभूमी अशा प्रथा कित्येक वर्षं चालू राहिल्या. खेड्यांत या प्रथा आजही आहेत का, असतील तर त्या वारकऱ्यांना योग्य वाटतात का, याविषयी आम्ही वारकऱ्यांशी बोललो. ‘आता पाणवठे येगळे नाय, स्मशानभूम्या मात्र हाय' अशा प्रतिक्रिया पुढे आल्या. शासनातर्फे गावोगावी नळपाणी योजना राबवल्या गेल्यामुळे पाणवठ्यांचा प्रश्न राहिलेला नाही, असं सुमारे ८० टक्के लोकांचं म्हणणं होतं. पाण्याच्या टंचाईच्या काळात ‘गावात स्वतंत्र टँकर येतो त्या वेळीही गावातले सर्वजण रांगेत हंडे घेऊन उभे राहतात. त्यामुळे ती जुनी रीत मागे पडलीय,' असंही सांगितलं गेलं. स्मशानभूमी मात्र वेगळी असावी, असंच बहुतेक वारकऱ्यांचं म्हणजे सुमारे ९० टक्के लोकांचं मत पडलं. कुणाच्या जातीत पुरायची प्रथा असते, तर कुणात जाळायची. त्यामुळे स्मशानभूमी वेगळीच राहणार, असं मत चर्चेत पुढे आलं.

वारीत वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या दिंड्या निघतात, वेगवेगळ्या जातींच्या धर्मशाळा असतात असं आम्ही ऐकून होतो. या भेदाभेदाविरोधात बाबा आढावांनी आंदोलन केल्याचंही आम्ही ऐकून होतो. संतांची बंडखोरी वारकरी संप्रदाय विसरलाय, असं मत आमच्याशी बोलताना डॉ. आढाव यांनी व्यक्त केलं होतं. या अनुषंगाने आम्ही वारकऱ्यांशी बोलायला सुरुवात केली. एवढ्यात एक दाढी वाढलेले, पँट-शर्ट घातलेले, गळ्यात माळ असणारे आणि सात्त्विक वाटणारे गृहस्थ समोर आले. ते म्हणाले, “‘दिंड्या वेगवेगळ्या जातींच्या असणं योग्य आहे, कारण ती प्रथा आहे. ती आपण कोण मोडणार?” वेगवेगळ्या जातींच्या धर्मशाळा असणं हे योग्यच आहे, असंही त्यांना वाटतं होतं. बहुतांशी वारकरी स्त्री-पुरुषांना दिंड्या आणि धर्मशाळा वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळ्या असणं यात अयोग्य काही वाटत नव्हतं. यात काही गैर आहे, कालबाह्य आहे, संतविचारांच्या विरोधातलं आहे, हे त्यांच्या गावीही नव्हतं. ८० टक्क्यांहून माणसांचा कल असाच होता. बिगर वारकरी आणि वारकरी माणूस यांच्या विचार-व्यवहार-वर्तनात फारसा फरक न जाणवणं धक्कादायक होतं. ‘विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ!' असं तुकाराम महाराज म्हणाले असूनही, ‘नाय जाणार ओ ते” अशी हताश प्रतिक्रियाच वारकऱ्यांतून व्यक्त होत होती. तुकारामांचा वारसा सांगणारा एकही वारकरी भेटला नाही हेही विशेषच.

पुढचा प्रश्न बाबरी मशिदीच्या विध्वंसावरून हिंदू आणि मुस्लिम यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर होता. सूफी संतांच्या दर्ग्यात जाण्याची परंपरा आपल्याकडे जुनी आहे; पण हिंदू-मुस्लिम संबंध ताणले गेल्यानंतरही ही परंपरा लोक पाळत आहेत का, हे समजून घेण्याची इच्छा होती. तशी चौकशी केली तेव्हा अनेक वारकरी स्वतः कबरीत वा दर्ग्यात जाणारे होते असं लक्षात आलं. सोलापूर जिल्ह्यातले गिड्डेवाडीचे रामचंद्र खोत तर म्हणाले, की स्वत: त्यांच्या अंगात गावातला पीर येतो. एवढंच नव्हे, तर त्यांच्या घरात अठराव्या शतकापासून कुणाच्या ना कुणाच्या अंगात पीर येतो, असंही ते म्हणाले.

जसे वारकरी मुस्लिमांच्या कबरी/दर्ग्यात जातात, तसेच अनेक मुसलमान वारकरी असल्याचं आम्हाला लोकांनी सांगितलं. वारकरी संप्रदायातले एक महत्त्वाचे संत शेख महंमद यांचं एक कवन त्यामुळे आठवून जातं : ‘यति मुसलमान, मऱ्हाष्ट्री वचनें, ऐकती आवडीनें, विप्रशूद्र'। वारकरी संप्रदायात हिंदू-मुसलमानांमध्ये असा सुसंवादच दिसतो. हा सुसंवाद बाबरी मशीद पाडल्यानंतर टिकून आहे हे महत्त्वाचं. अर्थात, ‘परंपरा आहे तर कशाला मोडा' असा सूर असण्याची शक्यताही त्यात आहेच.

वारकऱ्यांशी बोलताना महाराष्ट्रीय शेतकरी समाजाच्या विचारचौकटीची थोडीशी ओळख झाली. ‘आम्ही इथे तुकोबाच्या दर्शनाला आलोय नि तुम्ही कसले जातीपातीवरचे प्रश्न विचारताय' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आमच्यापुढे व्यक्त झाल्या. आपण जातिभेद पाळत नाही असा बहुतेकांचा दावा असल्यामुळे त्याबद्दल विचारणं त्यांना अप्रस्तुत वाटत होतं. वारकऱ्यांमध्ये अनेक जातींचे लोक असले तरी आमच्यात काही भांडणं नाहीत, आम्ही गुण्यागोविंदाने राहतो, असं त्यांचं म्हणणं होतं. ‘जातिप्रथा आहे, जातिभेद आहेत, परंतु आम्ही ते पाळत नाही आणि रूढीमुळे आम्ही आपापल्या जातीत वावरत असलो तरी इतरांबाबत आमच्या मनात कटुता नाही', असं आम्हाला भेटलेले लोक सांगत होते. गप्पांमध्ये आणखी थोडं टोकलं, तर ‘आजवर चालत आलंय ते काय बदलता येतं व्हय?' असं त्यावर म्हटलं जाई. एकुणात, ‘चालतंय तर चालू द्या' असा सूर दिसत होता. काही गोष्टी बरोबर नाहीत, त्या मनाला पटत नाहीत असं अनेकांना वाटत होतं, पण परंपरेसमोर (‘रूढी' हा वारकऱ्यांचा आवडता शब्द) काय करणार, अशी हतबलता त्यांच्या बोलण्यात दिसत होती. खरं तर याच परंपरेशी आपल्या संतमंडळींनी दावा मांडला होता आणि एकत्वाचं नि समतेचं दर्शन मांडलं होतं. वारकरी संप्रदायाने पारंपरिक जुन्या हिंदू धर्मातील कुप्रथा दाखवून देण्याचं काम केलेलं असलं, तरी तो बंडाचा किंवा सुधारणेचा झेंडा आता वारकऱ्यांच्या खांद्यावर नाही की काय, असं वाटून गेलं.

एकुणातच, वारकरी कशाहीबद्दल आग्रही दिसले नाहीत. कुणी जर स्त्रियांना मंदिरात-गाभाऱ्यात प्रवेश दिला तर त्यांची त्याला हरकत नव्हती. पंढरपुरात जातींच्या धर्मशाळा आहेत, त्याऐवजी सर्वांनी एकत्र राहावं अशी व्यवस्था कुणी केली, तर काही तरी अमंगळ घडतंय असं कदाचित कुणालाही वाटणार नाही. ही माणसं बदलाला-परिवर्तनाला-नव्या जगाच्या नव्या घडणीला तयार नाहीत असं नाही; पण या विचारांचं म्होरकेपण संत परंपरेने केलंय आणि त्यामुळे आपण त्याचे नैसर्गिक वाहक आहोत, हा विचार त्यांच्यात आम्हाला दिसला नाही. भक्तांच्या मेळ्यात कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, कुणी उच्च नाही, कुणी हीन नाही, सर्व माणसं एकाच जगन्माउलीची लेकरं आहेत, एकाच चित्‌‍ तत्त्वाचे अंश आहेत याचं भान वारकरी संतांनी आपल्याला दिलं आहे. हे भान वारकऱ्यांमध्येही आलेलं असणार. पण तरीही जुन्या धर्मातील कुप्रथा समाजात असतील तर त्या झिडकाव्यात, असा आग्रह त्यांच्यातून व्यक्त होताना दिसला नाही.

या अनुषंगाने वारकरी संप्रदायाचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे यांच्याशी आम्ही बोललो. ते म्हणाले, “वारकऱ्यांमधील या मानसिकतेला अनेक कारणं आहेत. त्यातील दोन महत्त्वाची. पहिलं कारण म्हणजे वारकऱ्यांवर अजूनही ब्राह्मणी धर्माचा पगडा आहे. आणि दुसरं कारण म्हणजे संतांच्या विचारांचं म्हणता येईल असं नेतृत्व आज वारकरी संप्रदायाला नाही. एकनाथ-तुकारामांच्या विचारांचा वारसा प्रभावीपणे चालवणारं नेतृत्व नसल्याने असं घडत आहे.”

ज्या डॉ. बाबा आढाव यांनी वारीतील पालख्यांमध्ये होणाऱ्या जातिभेदांबद्दल आंदोलन केलं होतं, त्यांनाही आम्ही भेटलो. त्यांचंही मत प्रा. मोरे यांच्या जवळचं होतं. ते म्हणाले, “भागवत धर्मातील संतांनी तत्कालीन ब्राह्मणी धर्माविरुद्ध बंडखोरी केली होती. विशेषतः एकनाथ आणि तुकाराम यांची भूमिका प्रखर होती. जातिभेद, अस्पृश्यता याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. परंतु आज हा आवाज क्षीण झाला आहे. असं घडतंय कारण आजचा वारकरी समाज संतांची बंडखोरी विसरलाय. वारकऱ्यांचे आजचे नेते ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तत्त्वाचा पुरस्कार करणारे आहेत.”

प्रा. सदानंद मोरे आणि डॉ. बाबा आढाव यांचं म्हणणं सध्या गावोगावी जे हरिनाम सप्ताह होतात आणि तिथे वारकरी कीर्तनकार जी निरूपणं करतात त्याच्या आशयाशी तपासून पाहायला हवं असं वाटून गेलं.

 (अनुभव, जुलै २००१ मधून साभार. लेखन - विलास पाटील, राजा कांदळकर. संपादक - सुहास कुलकर्णी)

युनिक फीचर्स







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results