आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

विठ्ठल विठ्ठल गाऊ रात्रंदिन...

  • इंद्रजीत भालेराव
  • 12.07.26
  • वाचनवेळ 9 मि.
vitthal gita

आषाढीला येते । आभाळ भरून

काळीज कोरून । जाते माझे

दिंड्या पताकांचे । गर्जतात भार

आषाढाची धार । कोसळते

माझ्या मनामध्ये । उठते काहूर 

वाटे हुरहूर । काय करू? 

आषाढीची वारी जवळ आली की दरवर्षी माझ्या मनाची अवस्था अशी होते. बहिणी येतात, आईचा निरोप घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी व्हायला आळंदीला निघून जातात. आत्या-मावशीही येऊन आईला भेटून दिंडीत सहभागी व्हायला निघून जातात. आमचं घराणं महानुभाव- पंथीय. त्यामुळे घरात वारीची परंपरा नाही. पण लग्नानंतर वारकरी कुटुंबात दिलेल्या बहिणी गेल्या कित्येक दिवसांपासून नियमित वारीत सहभागी होतात. मला कधी वारीत सहभागी होता आलं नाही, पण सहभागी व्हावं असं सतत वाटत आलं. उठावं आणि नेसत्या कपड्यांनिशी निघावं असं वाटतं; पण नाही जमलं अजून. 

मग एकच उपाय उरतो, मनाचं पोषण करणारं तसं काही तरी वाचत बसणं. कधी गाथा-ज्ञानेश्वरी, तर कधी गो. नी. दांडेकर-दि. बा. मोकाशी, कधी नेमाडे-चित्रे यांचा तुकाराम काढून वाचत बसलो की मनाला समाधान मिळतं. आपण त्या वातावरणात आहोत असं वाटतं. 

कधी वारी-दिंडीची वर्णनं वाचण्याचा मूड येतो, तर कधी नव्या कवींच्या कवितेतला तुकाराम शोधण्याची लहर येते. आता शोधतोय मी नव्या कवींच्या कवितेतला प्रत्यक्ष विठ्ठल. ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत सगळ्या कवींच्या श्रद्धेचं शेवटचं टोक होतं विठ्ठल. तो त्यांच्या जीवीचा विसावा होता. म्हणून ते क्षणभरही त्याला विसरत नसत. त्यांच्या ध्यानीमनी आणि स्वप्नीही विठ्ठलच होता. तो त्यांच्या जगण्याचा मुख्य आधार होता. पण या नव्या कवींच्या कवितेतला विठ्ठल मात्र असा नाही. हे सगळे नवे कवी प्रामुख्यानं तुकारामाला मध्यस्थ करूनच विठ्ठलाला भेटलेले आहेत. 

याची सुरुवात सापडते दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कवितेत. चित्र्यांनी तुकाराम जागतिक वाङ्मय व्यवहारात प्रस्थापित केला. चित्र्यांच्या दृष्टीनं तुकाराम हा कवींचं आदर्श रूप होता आणि मराठी कवितेचा कुळपुरुषही होता. चारशे वर्षं मागची आणि चारशे वर्षं पुढची कविता तोलून धरणारा तुकाराम हा मराठी कवितेचा कणा होता असं चित्र्यांना वाटायचं. चित्रे म्हणायचे, “मी विठ्ठलाचा प्रकाश कधीच पाहिलेला नव्हता, मी पाहिली ती तुकारामाची ओझरती सावली. तेव्हापासून असा काळवंडलो या जन्मी!”

हरवले जेथे ज्ञानदेव तुकाराम

तिथेच मला तुम्ही द्यावा पूर्णविराम

सूक्ष्मपणे सर्व परंपरा वसे 

तिथेचि मला स्थान द्या थोडेसे

अशी चित्र्यांची विनवणी होती. तुकाराम तर त्यांच्या आयुष्यभराचा ध्यास होता. कारण तुकारामाच्या अभंगातूनच विठ्ठलाकडे जाता येईल याचा चित्र्यांना शंभर टक्के विश्वास होता. म्हणूनच ते म्हणतात, 

अभंग हे आहे विठ्ठलाचे माप

आम्हा मायबाप दुजा नाही

अभंग हा आहे विठ्ठलाचा सांधा

आम्हा लागाबांधा अन्य नाही

अभंग हा आहे विठ्ठलाचा थाट

आम्हा नाही वाट दुजी कोणी 

हेही वाचा - दिंडी चालली पुढे, अर्ध्यात मी अडे


एकदा पॅरिसच्या ऑपेरा चौकात असताना चित्र्यांना एकदम आठवतं, आता दिंड्या पंढरपूरला पोचल्या असतील. ते म्हणतात,

माझ्या कानात न थांबणारा टाळ वाजतोय

मृदंगाच्या ठेक्यात जय जय रामकृष्ण हरी

ज्ञानदेव तुकोबा पंढरीला पोचले

माझ्या अंगांगाला डसले अक्षांश-रेखांश

पंढरपूरला मी कधी गेलोच नाही

क्षेत्रिचा देव कधी अनुभवला नाही

आपण पंढरपूरला जाऊन कधी विठ्ठल अनुभवला नाही हे चित्रे प्रामाणिकपणे कबूल करतात. पण मुळात पंढरपूरला जाण्याची गरजच नाही. कारण आपल्या अंतरातच एक पंढरपूर वसलेलं असतं याची त्यांना खात्री आहे. 

वीट पुंडलिकाने फेकलीच नव्हती. 

विठ्ठल नव्हताच त्या विटेवर उभा.

काळा सावळा होतो मीच जन्मत:

आणि आंगोपांगी नाना कहाण्या.

वीट रिकामीच होती, अजूनही आहे.

हृदयाच्या ठोक्यामधल्या अंतरात पंढरपूर. 

शेवटी विठ्ठल म्हणजे आपणाला समजलेलं जगण्याचं सार. तुकारामाला समजलेला विठ्ठल हे तुकारामाचं जगण्याचं आकलन होतं आणि चित्र्यांना दिसलेला विठ्ठल हे चित्र्यांच्या जगण्याचं सार होतं. शेवटी ज्याचा त्याचा विठ्ठल वेगळा हेच खरं. 

रूपाचे उठले लोळ

विठ्ठल विस्तव विठ्ठल विस्तव 

विठ्ठल विठ्ठल लठ्ठचपळ

चिपळ्या झाल्या छातीच्या

मस्तक झाले मातीचे

नाचत नाचत नष्ट जाहले

किल्मीष कितिक जल्मांचे

अरुण कोलटकरांच्या कवितेत सुरुवातीला विठ्ठल, पंढरपूर, दिंडी वगैरे गोष्टी नव्हत्या. २००३ साली प्रकाशित झालेल्या ‌‘चिरीमिरी' या संग्रहात या गोष्टी प्रथमच आल्या. पण अरुण कोलटकर स्वत: भजन म्हणत असत. त्यांचं भजनीमंडळही होतं.

म्हणजे या गोष्टी त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासून होत्या, पण त्या कवितेत नंतर आल्या. बळवंतबुवा नावाची एक दीर्घ कविता कोलटकरांना लिहायची होती. त्यातलेच काही तुकडे या संग्रहात आहेत. 

पंढरपुराला जाऊन

विठोबाला कळवा

तो बळवंतबुवा भडवा

येतोय म्हणून

मुंबईहून कालच

निघाला तांडा

एकशे सात रांडा

संगती आहेत 

हेही वाचा - एकतारीवरचा 'एकी'चा सूर


या संग्रहातल्या पंधरा-वीस कविता म्हणजे मुंबईहून निघालेल्या या रांडांच्या दिंडीचा पंढरपूरपर्यंतचा प्रवास चित्रित करणाऱ्या आहेत. प्रत्यक्ष विठ्ठलावर यातल्या दोनच कविता आहेत. पहिली कविता आहे प्राणप्रतिष्ठा (हा शब्द कोलटकरांनी ‌‘ष्ठातिप्रणप्रा' असा लिहिला आहे.) या कवितेचा संदर्भ साने गुरुजींनी अस्पृश्यांसाठी उपोषण करून विठ्ठल मंदिर खुले केले तो असावा. कोलटकरांची सामाजिक जाणीव दलित कवितेच्याही पुढची वाटावी अशी अनुभूती या कवितेतून येते. कोलटकरांची कल्पकता किती अचाट होती याचीही साक्ष या कवितेतून पटते. कविता अशी आहे- 

उघडले महाद्वार

आता आत येतील की महार

येणार चोख्यामेळ्याची लेकरे

भरले विठ्ठलाला कापरे

देव झाला घामाघूम

म्हणे मला आधी न्या येथून

चार्सोवीस शास्त्री

देव पळवून नेला रात्री

तांब्यात घातला हरी

पळाले मागी दारी

पतित पावन जाहिरात

शेवटी दाखविलीस जात

आता तांब्यामध्ये लप

देवा तुझे तेच माप

उद्या अस्पृश्य मंदिरात प्रवेश करणार असं निश्चित झालं तेव्हा पुजाऱ्यांनी देवाचं देवत्व मूर्तीतून काढून तांब्यात भरून ते घरी नेलं असं म्हणतात. देवाच्या या लहानपणाची कोलटकर यथेच्छ चेष्टा करतात. तसेच देव कल्पनेची आपली समजूतही ते इथे नेमकेपणानं मांडतात. 

विठ्ठलाविषयीची कोलटकरांची दुसरी कविता आहे ‌‘वामांगी'. वामांगी म्हणजे रुक्मिणी. पहिल्या कवितेतल्यासारखीच इथेही कोलटकरांची सामाजिक जाणीव दिसते. आधीच्या कवितेत ती दलितत्वाच्या अंगानं आली होती, तर इथे ती स्त्रीत्वाच्या अंगानं येते. पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी एका मंदिरात नाहीत हे आपणाला सर्वांनाच माहीत आहे. या सत्यस्थितीवर विलक्षण कल्पकतेचा साज चढवून कोलटकर स्त्री-पुरुष संबंधावर विदारक भाष्य करतात. मंदिरात रुक्मिणी एकटीच पाहून कवितेतला निवेदक तिला विचारतो, विठ्ठल कुठं गेलाय? शेजारी दिसत नाही!

रख्माय म्हणाली

कुठं गेला म्हणजे?

उभा नाही का माझ्या 

उजव्या अंगाला?

मी परत पाह्यलं

खात्री करून घ्यायला

आणि म्हणालो, तिथं 

कोणीही नाही

म्हणते नाकासमोर 

बघण्यात जन्म गेला

बाजूचं मला जरा 

कमीच दिसतं

दगडासारखी झाली

मान अगदी धरली बघ

इकडची तिकडं जरा

होत नाही

कधी येतो कधी जातो

कुठं जातो काय करतो 

मला काही काही

माहिती नाही 

खांद्याला खांदा भिडवून 

नेहमी बाजूला असेल विठू 

म्हणून मी पण बावळट

उभी राहिले

आषाढी कार्तिकीला 

इतके लोक येतात नेहमी

मला कधीच कसं कुणी 

सांगितलं नाही?

आज एकदम मला 

भेटायला धावून आलं

अठ्ठावीस युगांचं 

एकटेपण 

म्हटलं तर ही कविता स्त्रीवादी आहे आणि म्हटलं तर त्याच्या किती तरी पलीकडे जाऊन स्त्रीत्वाच्या आदिमतत्त्वाचा शोध घेणारी आहे. स्त्रीवादाला एक वेगळीच शक्ती प्रदान करण्याची कुवत या कवितेत नक्कीच आहे. कोलटकरांच्या ‌‘चिरिमिरी' या कवितासंग्रहाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोलटकरांची कविता विलक्षण सोपी आणि आकलनीय झालेली आहे. आधीचे अनाकलनीय आणि अवघड कोलटकर इथे एकदम साधे आणि सोपे होऊन येतात. जसा सुरुवातीचा फारशीतला अनाकलनीय गालीब उत्तरार्धात उर्दूतून आकलनीय होत जातो. सावलीही मिळणार नाही आणि फळही हाताला येणार नाही इतकी उंची वाढलेल्या झाडाचा उपयोग तरी काय होणार? म्हणून फळदार फांदीनं झुकलेलंच शोभा देतं. 

नेमाडे यांचा पहिला कवितासंग्रह ‌‘मेलडी' हा होता. त्यात विठ्ठल नव्हता. पण नंतरच्या काळात नेमाडे यांनाही तुकारामानं आणि विठ्ठलानं झपाटलं. साहित्य अकादमीसाठी ‌‘भारतीय साहित्याचे निर्माते' या मालिकेत नेमाडे यांनी तुकारामावर इंग्रजीतून पुस्तक लिहिलं. पुढे चंद्रकांत पाटील यांनी त्याचा मराठी अनुवाद केला. नव्या मांडणीतला तुकाराम याच पुस्तकातून लोकांसमोर आला. नंतर दिलीप पुरुषोत्तम चित्रे, सदानंद मोरे, आ.ह. साळुंखे, तानाजी पाटील, किशोर सानप आदींची पुस्तकं तुकारामाला नवं परिमाण देणारी ठरली. १९९१ साली ‌‘देखणी' हा नेमाडे यांचा दुसरा संग्रह प्रकाशित झाला. या संग्रहात ‌‘हरी हरी! मेला बिचारा बापुला' नावाची एक कविता आहे. नेमाडे या कवितेत प्रत्यक्ष विठ्ठलाशी संवाद करतात. त्या संवादाचं स्वरूप संत जनाबाई आणि तुकारामाने विठ्ठलाशी केलेल्या विद्रोही संवादासारखं आहे.

हेही वाचा - दिंडी चालली चालली


घराचार पाळण्याच्या निमित्तानं वडिलांच्या निधनानंतर अस्थिविसर्जनासाठी कवी पंढरपुरात आलेला आहे. बाप पक्का वारकरी. बापाच्या विठ्ठलभक्तीची, विठ्ठलाच्या ध्यासाची कवीने चेष्टा आणि उपहासच केलेला आहे. ‌‘विठ्ठला, तुझा-माझा हा शेवटचा संबंध. या विठ्ठलाला माझ्यासमोरून हटवा, माधवाला कटवा आणि हजारो वर्षांचा हा पापपुण्याचा चकवा संपवा. आता मला या कशाचीही गरज नाही. या कशाशीही माझा आता संबंध नाही,' असं कवी म्हणतो. शेवटचा म्हणून एकदाचा दर्शनरांगेत उभा राहतो आणि...

तरी रांगेवाटे सरकलो पुढे

पाहिले काळमुख संशयाने

पाहता पाहता मावळता क्रोध

हरपली बुट्टी मख्ख झालो

वृत्ती झाल्या शांत गोमटे ते रूप

जाता जाता टक पायी ठेले

बनविले तुवा तुकारामापरी 

मज बापड्याची काय सरी?

शिणली मराठी शिणला अभंग

रिणला महाराष्ट्र तुझ्यापायी 

विठ्ठलाशी उभा दावा करणारे नेमाडे विठ्ठलमूर्ती पाहून विरघळून जातात आणि लीन होऊन जातात, ‌‘तुकारामासारख्याला तू बनवलेस, तर मी कोण बापडा' असंही म्हणतात. ‌‘हरी हरी गेला बिचारा बापुला, विठू चिकटला पारंबीला' ही अपरिहार्यता नेमाडे व्यक्त करतात. 

ना. धों. महानोर हे रानावनातला निसर्ग टिपणारे कवी. ‌‘रानातल्या कविता' हा त्यांचा वेड लावणारा पहिला कवितासंग्रह. नंतरच्या संग्रहातून ते शेतकऱ्यांच्या दु:खाकडेही वळले. १९९७ साली प्रकाशित झालेल्या आणि अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या ‌‘पानझड' या संग्रहात महानोरही विठ्ठलाकडे वळले आहेत. या संग्रहातल्या शेवटच्या अकरा कविता म्हणजे पालखीचे अभंग आहेत. त्यातल्या एका कवितेत रानावनातला हा कवी आपली रानातली शेतकऱ्याची गाऱ्हाणी विठ्ठलापुढे मांडतो आहे.

 करपून गेले दुष्काळाचे रान

 तसे माझे मन पांडुरंगा 

 वर्षापाठोपाठ नाही पाणकळा

 सावत्याचा मळा ओस झाला

 शेत माउलीची गेली सारी रया 

 सोयऱ्यांची माया ओसरली

 दुष्काळाने केली संसाराची थट्टा 

 आयुष्याला बट्टा लागलागा 

 कोणत्या गोष्टींची केली ना कसूर 

 तरी जन्मभर दु:ख यावे 

 दिंड्या पताकांनी दुमदुमली पंढरी 

 तरी मी श्रीहरी कासावीस 

 बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा 

 कुणब्यांचा मळा उभा राहो 

‌‘पंढरीच्या वाटेवर' हा विठ्ठल वाघांचा कवितासंग्रह २००१ साली प्रकाशित झाला. त्याआधीच्या वर्षी विठ्ठल वाघ दिंडीत सहभागी झालेले होते. हा संग्रह म्हणजे दिंडीचं प्रवासवर्णन आहे. यात प्रत्यक्ष विठ्ठलावर कविता नाही. श्रीकांत देशमुख यांचा ‌‘आषाढमाती' हा कवितासंग्रह २००३ साली प्रकाशित झाला. त्यात वारी, दिंडी आणि प्रत्यक्ष पंढरपूरची यात्रा याविषयीच्या पुष्कळ कविता आहेत. कवीचा एकूण मूड विठ्ठलाशी भांडण्याचा आणि तक्रारीचा आहे. आम्ही एवढी मेहनत करून शेत पिकवतो तरी आमच्या आयुष्याची दाणादाण का होते? आमच्या गावातला ज्ञानेश्वर भुकेपोटी अजूनही का पाला खातो? मुक्ताईच्या लग्नासाठी शेत का विकावं लागतं? पोटासाठी लेकरू पाठीला बांधून नामदेवाला देशोधडी का जावं लागतं? नामदेवाच्या जनीला अख्खा गावा भोगून अर्ध्या राती का जाळून टाकतो? असे असंख्य प्रश्न कवी विठ्ठलाला विचारतो आणि शेवटी म्हणतो, 

 तुझा संतमेळा । असा कसा झाला । 

 अध्यात्माचा काला । लोकशाही ॥ 

शेवटी विठ्ठल म्हणजे ‌‘विटेवर बांधून ठेवलेलं अर्धमेलं काळंनिळं दु:ख' आहे,' हा एकूण श्रीकांत देशमुख यांचा निष्कर्ष आहे. 

१९९४ साली माझा ‌‘दूर राहिला गाव' या नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यातल्या शेवटच्या चोवीस अभंगांत माझं अध्यात्म आलेलं आहे. त्यात दिंडी, तुकाराम, विठ्ठल आलेलेच आहेत. त्याविषयी सदानंद मोरे यांनी ‌‘तुकारामदर्शन'मध्ये लिहिलेलं आहेच. मीच माझ्या कवितेविषयी लिहिणं योग्य ठरणार नाही. या लेखाच्या सुरुवातीचा अभंग माझाच आहे. त्यातलाच एक अभंग आता इथे देतो आणि थांबतो. 

 खरं सांग तुक्या । तुझा अनुभव 

 तुला कधी देव । भेटला का?

 निश्चयाच्या बळा । मानिलेस फळ

 निश्चयाने तळ । गाठलास 

 पांडुरंग तुझा । झाला का आधार? 

 तुझा त्याने भार । वाहिला का? 

 तुझ्यासाठी होते । पंढरीचे टोक 

 त्याच्यासाठी नेक । राहिलास 

 प्रवासात कधी । मिळाले का सूख?

 तुझी रुखरुख । थांबली का? 

 मला सोबतीला । नाही मागेपुढे

 कुणाभोती येढे । घालू सांग । 

(अनुभव, जुलै २०११ च्या अंकातून साभार..)

इंद्रजीत भालेराव







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results