आम्ही कोण?
अनुभव 

दिंडी चालली पुढे, अर्ध्यात मी अडे

  • ना.धों. महानोर
  • 18.06.25
  • वाचनवेळ 14 मि.
waari

श्री पांडुरंग प्रसन्न

श्री. ह. भ. प. रा. रा. धोंडूबा महानोर यासी ह. भ. प. विठ्ठल महाराज यांचे अनेक आशीर्वाद. पांडुरंगकृपेकरून मुक्ताबाईची नाथषष्ठीला पैठणला जाणारी दिंडी आपल्याकडे पळसखेड्याला फाल्गुन शु॥ १२ बुधवार रोजी मुक्कामाला येत असून, दिंडी सकाळी ७ वाजता आपणाकडे येईल व वाजत-गाजत आपल्या घरी पोहोचेल. सकाळी न्याहारी व अंघोळपाणी झाल्यावर दुपारी चार वाजता हरिपाठ व प्रवचन होईल. सायंकाळी जेवण-प्रसाद झाल्यावर नित्यनेमाप्रमाणे कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी दिंडी चहापाणी घेऊन सोयगावला जाईल व पुढे दरमुक्काम दरकोस करून पैठणला पोचणार आहे. दिंडीसोबत अंदाजे तीनशे स्त्री-पुरुष वारकरी असून सोबत एक बैलगाडी व घोडा आहे. त्यासाठी चार शेर ढेप व चारा लागेल. पांडुरंगकृपेकरून आपण हे व्यवस्थित करून घ्यावे, ही विनंती.

आपले,

ह. भ. प. विठ्ठल महाराज

आठ-दहा दिवस आधी दिंडीचं पत्र यायचं. बाबा दोघातिघांकडून ते वाचून घेत असत व दिंडीची तयारी करत असत. दिंडी यायची म्हणजे बाबांना, आईला खूप खूप आनंद. आठ-दहा दिवस दररोज तेच ते दिंडीचं असायचं. आई-बाबा खूप गरिबीत, शेतमजूर म्हणून काम करत असतानाची गोष्ट. तेव्हा दिंडी पळसखेडला ज्यांच्याकडे थांबायची, त्यांनी एकाएकी दिंडीचं स्वागत करण्यास नकार दिला. दिंडीतली माणसं दिवसभर इथे थांबणार, भजन-कीर्तन नाही... जेवणखाण नाही. उपाशीच राहणार आणि उपाशीच पुढल्या मुक्कामाला जाणार. बाबांना हे खूप लागलं. पांडुरंगाचे वारकरी उपाशी जाऊ नयेत म्हणून ऐपत नसतानाही बाबांनी दिंडी थांबवली.

ज्यांच्या घरी बाबा सालदारीने खूप वर्षं होते त्यांना आणखी काही रक्कम, धान्य द्यावं म्हणून विनंती केली. त्यांनी धान्य व पैसे नावे टाकले. त्या काळी खूप वारकरी दिंडीत पायी असायचे. जवळपास पाचशे वारकरी होते. बाबांनी दिंडी थांबवून आपल्या लहानशा झोपडीवजा धाबलीजवळ भजन-कीर्तन प्रवचन छान घडवून आणलं. पाचशे वारकऱ्यांना हिरव्या मिरच्यांची उडीदडाळ व भाकरी असं जेवण दिलं. सगळे तृप्त झाले. पुढे पावसाळा चांगला झाला. बाबांना मालकाने त्यांची एक दहा एकर जमीन भाड्याने दिली होती. ती त्या वर्षी इतकी पिकली की गावभर चर्चा झाली.

बाबा-आईंनी खूप कष्ट घेतले होते व पावसाळाही चांगला झाला होता. मग बाबांना मालकाने ती जमीन विकतच देऊन टाकली. बाबा-आई म्हणायचे, ही पांडुरंगांची कृपा! दिंडीचे, दिंडीतल्या वारकऱ्यांचे आशीर्वाद! बाबांनी त्या वर्षापासून दिंडी आपल्याकडे थांबवण्याचा कायमचा नेम केला. दिंडी म्हणजे सबंध गाव-लहानसं खेडं पांडुरंगमय होऊन जायचं. गावातलं भजनी मंडळ-भक्त-भाविकही दिंडीत सामील होऊन आनंद उत्सव करायचे. पळसखेड नामसंकीर्तनाने दुमदुमून जायचं. त्याचे स्वर थेट मुक्ताई-पैठण-पंढरपूरपर्यंत जायचे.

आम्ही मुलं मोठी झाल्यावर बाबांचा एकच आग्रह : दिंडी-भजन-कीर्तन बंद करू नका. पांडुरंगाने चांगले दिवस आणले. यापेक्षाही चांगले दिवस येतील. हे चालू ठेवा. आजवर साठ-सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ दिंडी चाललेलीच आहे. दिंडीतले वारकरी कमी झाले- पायी फिरणं झेपत नाही-भावभक्ती कमी झाली, तरीही दिंडी नामशेष झालेली नाही. त्या दिवशी दिंडीचे जुने दिवस दुमदुमतात. टाळ-मृदंगांनी भजनाच्या-वाद्यवृंदाच्या नादाने दूर आठवणीत घेऊन जातात. वाकोदकडून दिंडी आल्यावर पळसखेडच्या गावाजवळ झऱ्याच्या किनाऱ्याजवळ थांबून असायची. पिवळे झेंडे घेऊन वारकरी टाळ-मृदंगांनी परिसर व्यापून टाकत. घोडा- बैलगाडीभोवती पन्नास-शंभर मुलं-मुली जमा होत.

गावातल्या वारकरी भजनी मंडळाला घेऊन वाजत-गाजत आम्ही दिंडीच्या स्वागताला जात असू. भेटी, आलिंगन नामस्मरण, महाराजांना नमस्कार.... अर्ध खेडं झऱ्याच्या काठी वेशीवर उभं राहायचं. दिंडी भजन-नामसंकीर्तन करत, पावलं टाकत बुक्का-गुलाल भाळी लावून आमच्या घरापर्यंत यायची. आरती-प्रसाद घेऊन सगळे घरोघरी जात असत. आमच्या गल्लीतल्या कुणाकुणाच्या ओट्यावर, घरात, वाड्यात दिंडीतले स्त्री-पुरुष वळकटी घेऊन विश्रांती घेत. न्याहारी करून, विश्रांती घेऊन पुन्हा दुपारी चार वाजता ह. भ. प. विठ्ठल महाराज ओट्यावर प्रवचनाला बसायचे.

waari

चाळीस वर्षांचे तरुण असलेले महाराज खूप विद्वान, ज्ञानी आळंदीच्या महाद्वारी पाच वर्षं शिक्षण घेऊन आलेले होते. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेले. देखणे, शुद्ध मराठी- संस्कृत बोलणारे महाराज. समोरच्या वारकरी भक्तांमध्ये चिंध्यांचे फाटके कपडे घालून, एक मातीचं गाडगं हाती असलेला, थोडा वेडा वाटणारा वारकरी दरवर्षी असायचा. त्याचा त्याचाच एकट्याशी बोलत असायचा. अभंग म्हणायचा. त्याच्याभोवती पोरांची गर्दी असायची. तो कुठल्या कुठल्या अद्भुत, पुराणातल्या गोष्टी पोरांना सांगायचा. मध्येच एकाएकी खूप खूप रडायचा. पोरं सुन्न होऊन जायची, अबोल व्हायची.

हरिपाठ अभंग व प्रवचन कीर्तनापेक्षाही गोड वाटायचं. संपूच नये असं. महाराज एक-दोन ओवींवरच दोन तास घ्यायचे. ओटे, अख्खी गल्ली ज्ञानेश्वर-एकनाथ भागवतात लीन होऊन जायची. महाराज थेट ऐकणाऱ्याच्या अंत:करणात रुतून बसायचे. एकचित्त. शेवटाचे हरिपाठाचे अभंग म्हणायचे तेव्हा भालदार-चोपदार-वीणावादकाशिवाय फक्त ओट्यावर बसलेल्या शेवंताला ओवी म्हणायला सांगायचे. ती एकटीच एक ओवी ज्ञानियाची म्हणणार, मग पसायदान म्हणणार. शेवंता शेवटी ओवी, पसायदान म्हणताना टाचणी वाजली तरी ऐकू येईल एवढी शांतता. वर्षानुवर्षं संगीतशाळेत कमावलेला, निसर्गदत्त प्रतिभेचा स्वर वाटावा असा मंजूळ पण भरदार स्वर. शेवंता ईश्वररूप होऊन प्राणातून ओवी म्हणताना साक्षात ईश्वरच तिथे उभा आहे असा वारकऱ्यांना भास व्हायचा... कुठल्या थोर गायिका आपण घेऊन बसलात!

शेवंता दूर खेड्यातली एकटी, दुर्दैवी, नितांतसुंदर, देखणी तरुणी. पंचवीसेक वर्षांची, टपोऱ्या सुंदर डोळ्यांची, गोरीपान, पाच फूट उंचीची सडसडीत. सगळं दु:ख विसरण्यासाठी दिंडीतल्या वारकऱ्यांससोबत विठ्ठलरूप झालेली. कपाळभर कुंकू-बुक्का, गळ्यात काळी पोत, तुळशीची माळ, भजन-कीर्तनात एकरूप असलेली, छान गळ्यावर गाणारी, चौथी-पाचवी शिकलेली. तापी नदीच्या काठच्या एका लहान खेड्यातली. विवाह होऊन पाच वर्षं संसारात मग्न असलेली. संसार करू न शकलेल्या पुरुषाची बायको. नको ते भोग-वाईट सामोरं आलं. ते ठोकरून बाहेर पडलेली. आई-वडील लहानपणीच गेलेले.... दारुड्या भावाने हिचा साठ वर्षांच्या दुसऱ्या पागल श्रीमंत माणसाशी संबंध करून पाहिला. ती पळून आली. कशावरच तिचा विश्वास राहिलेला नाही. आता फक्त एका विठ्ठलावर, त्याच्या शुद्ध पवित्र नामस्मरणावर, पवित्र-नीतिमान, शुद्धपणाने वागणाऱ्या विद्वान, तरुण ह. भ. प. विठ्ठल महाराजांसारख्या माणसावर, भक्तभाविकांवर विश्वास.

शेवंताच्या पसायदानानंतर अतिशय शांत अशा वातावरणात ‘पुंडलिका वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, एकनाथ महाराज की जय, मुक्ताबाईकी जय... झाल्यावर शेवंताने महाराजांच्या चरणी डोकं टेकवून नमस्कार केला. ज्ञानेश्वरी ग्रंथ, हरिपाठाचे ग्रंथ इ. बांधून ग्रंथांना नमस्कार केला. मोठ्या हरिभक्तांना, स्त्रियांना नमस्कार केला. महाराजांना सगळे वारकरी नमस्कार करते झाले. प्रसाद घेऊन आपापल्या बिछान्याकडे चालते झाले. सायंकाळी खास गोवरीवर भाजलेल्या रोडगा-बट्टीचं वरण-भात-भाजीचं जेवण, गोड पिवळा जर्द गूळ, गावरान तूप असं मनसोक्त जेवण. ‘वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे-सहज हवन होते नाम घेता फुकाचे,' अभंगाला अशी सुरुवात करून, यथेच्छ जेवण करून दिंडीतले सगळे वारकरी, गावातलं भजनी मंडळ, इतर भाविक विठ्ठलरूप होऊन जायचे.

कीर्तनाच्या आधी आठ-नऊ वाजेपर्यंत गावातले स्त्री-पुरुष, आम्ही घरचे सगळे महाराजांशी अनेक विषयांवर बोलत असायचो. दुष्काळ, विहिरी आटलेल्या, संसारातले ताणतणाव, कर्जबाजारीपण महाराजांजवळ गावातले लोक मोकळपणाने सांगत असत. कुटुंबव्यवस्थेची मोडतोड, चांगल्या माणसांना गावात वाढलेला त्रास; गुंडांना, पुढाऱ्यांना, मूर्खांना अकारणी आलेलं बळ, सगळं काही महाराजांजवळ बोलून मोकळे होत असत. महाराज मग अनेक पौराणिक-ऐतिहासिक कथा-घटना सांगून लोकांचं समाधान करत असत. रामायण, महाभारत, एवढंच नव्हे तर महात्मा गांधींना मारलं त्याने काय वाईट केलं, असं सांगून चांगल्यासाठी उभं राहणं, वाईटाला ठेचणं हाच संतांचा उपदेश, असं सांगत बसत.

नऊ वाजता गावातील वारकरी, भजनी संप्रदायाचे वारकरी व दिंडीतले वारकरी टाळ-मृदंग-वीणा घेऊन आपल्या घराजवळच्या चौकात अभंगाला सुरुवात करून पूर्वरंग सुरू करायचे. वीणा घेऊन एकतारी सुरू व्हायची. सतरंजीवर दोन पाठ ठेवून, त्यावर ज्ञानेश्वरी-तुकारामगाथा ठेवून समईच्या ज्योती लावल्या जायच्या. पाच-दहा उदबत्त्यांचा गंध व फिकट धूर बसलेल्या सगळ्या श्रोतृवर्गात पसरायचा. दाटीवाटीने दोन्ही चारी बाजूच्या गल्ल्यांमध्ये ओट्यांवर, रस्त्यांवर गर्दीच गर्दी. मृदंगाला ओली गव्हाची कणीक लावून बुवा थाप मारायचे... टाळकरी उभे असलेले पंचवीस-तीस भक्त पावलं टाकत अभंग सुरू करायचे... टाळ-मृदंगांचा गजर व पंचवीस-चाळीस टाळकऱ्यांच्या अभंगांचे स्वर सगळ्या आसमंताला भारून टाकायचे. उंच उंच गेलेला स्वर...

रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बहुत सुकृताची जोडी म्हणुनि विठ्ठली आवडी...

एकापाठोपाठ झील धरून भरल्या कंठाने देहभान विसरून गाणारे वारकरी थेट उंचावर अभंग घेऊन जाताना, विठ्ठलरूप होताना नाचू लागत...

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठाल... विठ्ठाल... विठ्ठाल
ठाल वि ठाल वि
ठाल वि ठाल वि

जय जय ठोब्बा रखुमाऽई, जय जय ठोब्बा रखुमा आई- जय जय

कमरेला पांढरं उपरणं बांधलेलं, पांढरा शुभ्र सदरा... पांढरं धोतर... पांढरं उपकरण व डोक्यावर छान पांढरा फेटा बांधलेले ह. भ. प. विठ्ठल महाराज कीर्तनात यायचे... वीणेकरी त्यांना साष्टांग नमस्कार करून, त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालून वीणा त्यांच्या हाती सुपूर्त करायचा. पुन्हा एकदा वाद्यवृंद थांबून शांत अशा वातावरणात पुन्हा ईश्वराला, पांडुरंगाला थेट आळवणी. पंढरपुरापर्यंत गेलेला स्वर...‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल'...

महाराज कीर्तनाचा अभंग ओठांवर हळुवार घेतात. पुन्हा सगळे मिळून तोच अभंग तालस्वरात घेतात. शेवटची छाप म्हणताना एक-दोघं अशी आलापी घेतात. प्राणातून शब्द शब्द गाताना- स्वर आळवताना जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी यांची आठवण यावी. तीच तल्लीनता, स्वरालाप. महाराजांनी खुणेचा हात करताच अभंग थांबतो, वाद्यवृंद थांबतात. कीर्तन सुरू होतं.

``जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे
बा अंत:काळीचे कोणीऽ नाही...”

महाराज आपल्या अतिशय शुद्ध मराठीत अभंग गाताना, शब्द-शब्द टाकताना, नानाविध गोष्टी त्यासाठी सांगताना देहरूप हरवून जात. माणसांना शहाणं करायला, समाजाला शहाणपण शिकवायला; दु:खाचा भार हलका करून त्याला आनंदाचा मार्ग, शुद्ध मार्ग दाखवायला; अख्खी संत परंपरा, नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, चोखा, सावता माळी, गोरोबा, जनाई, मुक्ताई, बहिणाई यासोबत अनेक दृष्टान्त सांगत असतांना महाराज प्रसंगी डोळ्यांतून अश्रू ढाळत असत. सगळा जनसमुदाय त्यांच्या डोळ्यांत बुडून जायचा. दु:ख पर्वताएवढं आहे, हे सत्य आहे म्हणून का नामोहरम व्हायचं? महाराज शुद्ध कर्माचा, कष्टाचा मार्ग सांगत असत. तिथेच ईश्वर आहे. उशीर लागेल, पण तोच तुम्हाला साथ देईल, तुमचं भलं करील. एकापाठोपाठ हरिदास कथा सांगून महाराज लोकांच्या अंत:करणात शिरकाव करीत. कधी जांभूळ आख्यान, तर कधी जुगार खेळून द्रौपदीला पणाला लावणारा विचारशील धर्मराजा. कधी शिवाजी महाराजाचं अद्भुत असं आग्य्राहून परत येणं, तर कधी सगळे जवळचे व घरचे शत्रू झालेले महाराजांचे आप्तगण. नंतर थेट ज्ञानेश्वर-तुकारामाचा छळ, तर महात्मा गांधी, सानेगुरुजींपर्यंत महाराज निरूपण करीत. मूळ अभंगाची अजून पहिली ओळही पूर्ण झालेली नसे. दु:खार्त अशा खेड्यापाड्यांतल्या समाजासाठी शेतकरी-कुणब्यांसाठी महाराज अनेक अभंग उंच स्वरात म्हणत. एकदा-दोनतीनदा. तीच ती ओळ म्हणताना बाजूच्या स्त्रियांमध्ये बसलेल्या शेवंताला लक्षात आलं, महाराजांना पुढल्या ओळी आठवत नाहीत. लगेच तिने त्या अभंगाची लकेर श्रोत्यांमधून सुरू केली. थांबली. महाराज म्हणाले, ``शेवंता, तिथूनच तू पूर्ण अभंग म्हण.'' जनसमुदायातल्या सगळ्यांना ते पाहिजेच होतं. शेवंताने पूर्ण अभंग म्हटला. तिच्या खास सुंदर गळ्यातून येणारा आकाशापर्यंत जाणारा, गहिरा, भरगच्च आवाज.

ओस झाल्या दिशा मज भिंगुळवाणे
जिवलग नेणे मज कोणी ॥
भय वाटे देखे श्वापदांचे भार
नव्हे मज धीर पांडुरंगा ॥
अंधकारापुढे न चलवे वाट
लागतील खुंट काटे अंगा ॥
एकला नि:संग फाकती मारग
भितों नव्हे लाग चालावया ॥
तुका म्हणे वाट दावुनि सद्गुरू
राहिला हा दुरू पांडुरंग ॥

शेवंताचा अभंग संपला. महाराजांनी डोळे पुसले. ते सावरले. पुन्हा दहा मिनिटं भजन, टाळकऱ्यांना खूण करून वाद्यवृंदात विरून गेले. आरती करून झाली. कीर्तन संपलं, तरीही लोक गल्लीगल्लीत ओट्यावर बसलेले. हळूहळू ते आपापल्या घरी गेले. श्रावणबाळाची गोष्ट सांगताना, विसोबा खेचर व नामदेवाचा अहंकार लोप झाला असं सांगताना, तुकारामाचं ‘तुमची आमची हेचि भेटी येथुनिया जन्मुतुटी' म्हणताना महाराजांना भरून येत असे. खेड्यातल्या शेतकऱ्यांना समजेल असं ते सांगत असत. वाईट चलनाच्या, हनुमंताच्या मंदिरात पारावरच व्यभिचार केलेल्या, या हनुमंताच्या तोंडातलं बोट दरडावून तिच्यामुळेच पुन्हा निघालं म्हणून तिला, व्यभिचारिणीलाच साध्वी म्हणणारे लोक. तसंच, सिंह राजा नव्हे, मीच राजा असं म्हणणाऱ्या व घाणीत अंग-तोंड भरवून येऊन सिंहाला लढतीचं आव्हान देणाऱ्या डुकराची गोष्ट सांगताना महाराज आजच्या बदलत्या जीवनाचं चित्र उभं करत. सत्य कितीही दाबलं तरी सत्यच राहणार. वाईटाला महत्त्व अशा वेळी येतं, पण ते क्षणभंगुर. म्हणून नैराश्य झटकून शांतपणाने उभेच राहा. खेड्यात शिक्षणाची साधनं नव्हती तेव्हा समाजाला शहाणपण देऊन विचाराने आधार देणारी व्यवस्था म्हणजे वाद्यवृंद, भजन, कीर्तन, कथा, कविता सांगून ज्ञानग्रंथ देणारी फक्त कीर्तन हीच मोठी परंपरा होती.

आम्हा खेड्यांतल्या शेतकऱ्यांवर दहा-वीस वर्षं ह. भ. प. विठ्ठल महाराजांचं राज्य होतं. महाराजांसोबत अनेक स्त्रिया, तरुण स्त्रिया होत्या. शेवंतासारखी मुलगी केवळ त्यांच्याच शुद्ध आधारावर, विश्वासावर जगत होती. दिंडीत माणसं जेवणखाण यापेक्षाही त्यांच्या प्रवचन-कीर्तनावरच जगायची, राहायची. महाराजांनी कधी पैसा मागितला नाही. मागे काहीही ठेवलं नाही. तरुणपणी पन्नाशीत अकस्मात ते गेले. कसे ते ठाऊक नाही. दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी दिंडी आली तेव्हा कळलं. नंतरचे ह. भ. प. भानुदास महाराज गादीवर आले. त्यांनीही कीर्तन-भजन-दिंडी सांभाळ चांगला केला. ज्ञानी होते, परंतु विठ्ठल महाराजांइतका वचक व शिस्त ते दिंडीत ठेवू शकले नाहीत.

दोन वर्षांनी ह. भ. प. भानुदास महाराज दिंडी घेऊन आले. शंभर-पन्नास लोक होते. चिंध्या बांधून तीस वर्षं दिंडीत असणारा, थोडा वेडा वाटणारा तो गेला. वारला. महाराज गेल्याच्या दु:खाने. त्याचे अकोल्याजवळ दोन भाऊ आहेत. शंभर एकर शेती आहे. त्याचं सगळं चांगलंच होतं. त्याची बायको बाळंतपणात वारली. तिचे फार हाल झाले होते. मुलगा दहा-बारा वर्षांचा झाला. कशानं कळेना- वेडा झाला. कुठे निघून गेला की वारला कळलं नाही. चिंधडे बाबा पाच वर्षं धुंडत फिरले. उदास झाले. नंतर कायम दिंडीतच राहिले. दिंडी नसतानाही ते विठ्ठल महाराजांसोबतच ते राहत असत.

ह. भ. प. भानुदास महाराजांचं रात्री छान कीर्तन झालं. सकाळी उठून दिंडीला चहापान झालं... आवराआवर करत दिंडीकरी इकडे-तिकडे फिरत होते. इथलं आवरून दिंडी सोयगावकडे जाणार होती हे नेहमीचंच ठाऊक. घरासमोर गल्लीभर चहापाणी, कपबशा, सगळी धावाधाव चाललेली. दिंडीतला एक गंधटिळा लावलेला वारकरी येऊन माझ्या कानाशी काही बोलला. मी माझ्या घरात मागच्या खोलीत गेलो. आमच्या घरी सोय होती म्हणून मोरीतून गरम पाण्याने अंघोळ करून, केस ओले करून, न्हाऊन शेवंता मोकळ्या केसांनी आडोशाला होती. पातळ नेसून चोळी घालणार होती. दिंडीतलाच एक निष्ठावंत वारकरी तिच्याभोवती घुटमळून छेड काढत होता. शेवंता घाबरीघुबरी होऊन लुगडं नेसत होती. मी खाडकन त्याच्या मुस्कटात हाणली तसा तो पळाला. त्याच्या कानफटात द्यायला नको होती, पण माझ्याने ते झालं. मला वाईट वाटलं. माझी मलाही नंतर कीव आली. माझ्या डोळ्यांवर नकळत सुंदर, देखणं, टपोऱ्या स्तनभाराचं, मोकळ्या केसांचं, शेवंताचं पिवळं जर्द रूप उमलून आलं.

दिंडीला निरोप देताना, महाराजांना नमस्कार करताना मी खूप खूप उदास होतो. झेंडे खांद्यावर घेऊन टाळ-मृदंगांचा गजर करत घोडा पुढे करून महाराज बैलगाडीत बसले. वारकरी स्त्री-पुरुष हरिनामाने भरून गेले. दिंडी गावाच्या बाहेर सोयगावच्या दिशेने निरोप घेऊन गजर करत निघाली. पुढच्या गोगडी नदीवर अंघोळपाणी करून, कपडे धुऊन पुढे जाणार, हा नित्याचा परिपाठ होता. मी दिंडीला निरोप देऊन जड पायांनी तसाच पायवाटेने शेताकडे गेलो. शेतात झोपडीजवळच्या कडुनिंबाच्या वाऱ्याच्या झुळुकीने मला थोडं बरं वाटलं. नकळत जात्यावरच्या ओवीची आठवण मला याच वेळी का यावी? आणि याच ओवीची माझी मलाच खूप चीड आली, लाज वाटली.

पंढरीची वाट बाई ओली कशी झाली
न्हालेली रुक्मिणा केस वाळवीत गेली
पंढरीची वाट कशी दगडाधोंड्याची
देवा इठ्ठलाची दिंडी पिवळ्या झेंड्याची

दूरवर, गोगडी नदीच्या पलीकडे गेलेल्या दिंडीचे, टाळ- मृदंगांचे अभंगाचे स्वर आता लोपले होते. दिंडी दूर निघून गेली होती. झोपडीजवळ मी बाजूला पाहतो तर शेवंता उभी. उदास, मलूल डोळ्यांनी ती न बोलता उभी होती. मी खूप धास्तावलो. सबंध शरीराची थरथर सुरू झाली. लालजर्द कपाळावर कुंकू, बुक्का लावलेली, तुळशीमाळ घातलेली शेवंता. मी उठून उभा राहिलो. खूप वेळ गेला. तिला बसायला सांगितलं, तिच्या डोळ्यांतून घळघळ पाणी. ती शब्दही बोलत नव्हती, ``शेवंता, दिंडी निघून चालली...” असं काही तरी मी भीत भीत बोललो. “दादा, आता दिंडीत राहणं कठीण झालं. अगदीच कठीण. या दुनियेत माझं कोणीही नाही... यापुढे मला नीट जगणं कठीण दिसतं. गेल्या वर्षीच्या दिंडीत एका मुक्कामात खूप खूप त्रास झाला. तुम्हाला मी सांगू शकत नाही... तो नराधम थेट पैठणच्या आमच्या मठापर्यंत पोचला. आता तर निवडून आला, असं कोणी दिंडीकऱ्यांना सांगितलं. मला दिंडीसोबत शक्यच नाही. एवढं आयुष्य काढलं. आता इथेच शेतात मोलमजुरी करीन, पोट भरीन. कै. विठ्ठल महाराजांइतकाच मला तुमच्याकडे विश्वास वाटतो. माझ्यासाठी एवढं करावं... मी इथेच राहायचं म्हणते....”

``अगदीच अशक्य! बाई, तू इथे राहू शकत नाही. मी तुला इथे राहू देणार नाही. मला तुझ्याविषयी खूप खूप वाटतं, माझ्या बहिणीइतकंच. परंतु शक्य नाही. तू इथून निघून जा. दिंडी दूर चाललेली आहे.”

शेवंता एक शब्द न बोलता जड पावलांनी निघून गेली. माझ्या शेतापासून दूर दूर गेली. पलीकडल्या हिव्वर बनातल्या बाभळीच्या पडीक शेतांमधून जाताना ती दिसली. पुढे दिसली नाही. घनदाट, ओसाड, पन्नास वर्षांच्या पडीक जंगलातून काट्याकुट्यांतून ती सुंदर नाजूक शेवंता कुठे तरी निघून गेली. पुढे काहीच पत्ता लागला नाही की मीही कधी कुणाला विचारलं नाही.

पाच-सहा वर्षांपूर्वी पन्नास वर्षांची एका मोठ्या जमीनदाराची पडीक असलेली ती जमीन, त्यातला काही भाग मी विकत घेतला. विषारी काट्यांची हिब्बराची शेकडो झाडं, बाभळी, गच्च कुंधा अशी भेसूर घाणीने भरलेली ती जमीन तयार करायला मला फार फार कष्ट करावे लागले. कोणीही मजूर काम करायला त्या जमिनीत उभा राहत नव्हता. थोड्याशा शेवाळी पाण्याने भरलेली, झाडा-झुडुपात सुगरणी-चिमण्यांच्या घरट्यांनी वेढलेली किर्रर्र अशी जुनी ओसाड विहीर खोदताना, साफ करताना खूप खूप त्रास झाला. ती विहीर मी खोदली. तिला चांगलं पाणी मिळालं, भरपूर चांगलं गोड पाणी मिळालं. तिथे आता मोसंबी, सीताफळांच्या भरगच्च सुंदर बागा उभ्या राहिल्या. फळांनी भरगच्च लदबदलेल्या. सुंदर देखण्या बागा. निर्मळ पाण्याची न आटणारी विहीर. मी एकदा खुबीत माझ्या झोपडतांड्यावरच्या बंजारा गड्याला म्हणालो, ``ही विहीर, ही सुंदर देखणी बाग अशी उभी राहिली... साक्षात पांडुरंगच इथे उभा राहिला!”

``दादा, पांडुरंग असेल नसेल- पण ती शेवंता, त्या शेवंताचंच हे रूप आहे. तिने या ओसाड विहिरीत जीव दिलेला आहे. हे मला व आणखी एकाला पक्कं ठाऊक आहे. इकडे कोणीही फिरकत नव्हतं त्या काळात. तिला सर्प-श्वापदांनी फाडून फाडून खाल्लं.”

दिंडी दरवर्षी येते... भजन-कीर्तन-प्रवचन करून दिंडी निघून जाते.

(ना. धों. महानोर यांच्या ‘समकालीन प्रकाशनाने' प्रकाशित केलेल्या ‘आठवणींचा झोका' या पुस्तकातून साभार) 

ना.धों. महानोर







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 3

राजेश 19.06.25
केवळ विलक्षण. आयुष्य कोणाला कसं कसं जगायचं असतं, हे कोणी काही सांगू शकत नाही. अचानक अशी वळण येतात आणि दिशा बदलून जातात.

Ravindra Godbole 19.06.25
खूप छान लिहिले आहे महानोर साहेबांनी.वाचताना टल्ली न होऊन जातो आपण.धन्यवाद!

सचिन मेघनाथ नेलेकर 18.06.25
वारकरी संप्रदायाने नेहमीच कर्मकांड, अंधश्रद्धा यांना विरोध करून जनमानसामध्ये साधा भोळा भक्ती भाव निर्माण करण्याचा प्रयत्न कायमच केलेला आहे. भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी फक्त दोन हात आणि मस्तक इतकीच काय ती भक्ताची शिदोरी.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results