आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

अनाथांचा बाप : शंकरबाबा पापळकर

  • नरेंद्र लांजेवार
  • 21.06.26
  • वाचनवेळ 9 मि.
shankar baba papalkar

१०० मुलगे आणि एक मुलगी यांचे आई-बाप म्हणून महाभारतात गांधारी आणि धृतराष्ट्राचं नाव घेतलं जातं, पण आजच्या घडीला संपूर्ण भारतात १३५ मुलांचे बाप म्हणून ओळखले जाणारे एक शंकरबाबा पापळकरच असतील. अनाथ मुलांना वाढवणारी, त्यांना मायेचं छत्र देणारी माणसं आपल्याकडे कमी नाहीत. शंकरबाबांचं नाव त्यात अग्रक्रमाने घ्यायला हवं. पण त्यांचं वेगळेपण म्हणजे शंकरबाबांनी वाढवलेली ही सर्व १३५ मुलं स्वत:च्या नावानंतर शंकरबाबांचं नाव बाप म्हणून आणि बाबांचं पापळकर हे आडनाव लावतात. नुसतं तोंडी लावत नाहीत, तर प्रत्येकाच्या आधारकार्डावर, शाळा-महाविद्यालयामध्ये तसंच मतदान कार्डावरही हेच नाव आहे. 

आज समाजाची नीतिमत्ता प्रचंड रसातळाला गेली आहे. पोटच्या अंध-अपंग, बहुविकलांग, मतिमंद, मनोरुग्ण मुलाबाळांना जन्मदातेच धार्मिक स्थळी किंवा गर्दीच्या ठिकाणी सोडून देतात. अनाथ-बेसहारा अशी ही मुलं ठिकठिकाणच्या अनाथगृहांमध्ये दाखल केली जातात. त्यांचं पुढे काय होतं हा मोठा प्रश्न आहे. कारण ही अनाथ मुलं अठरा वर्षांची झाली की मायबाप सरकार त्यांना अशा अनाथगृहातून बाहेर काढतं आणि अक्षरशः रस्त्यावर आणतं. कारण ती कायद्याच्या भाषेत सज्ञान झालेली असतात. 

ज्यांना कोणीही नातेवाईक नाही, रक्ताचं नातं नाही, स्वतःची जात-धर्म-नाव-गाव माहीत नाही अशा या मुलांनी कुठे जावं? अठरा वर्षांवरील अनाथांसाठी आपल्याकडे एकही योजना नाही. जन्मतःच अनाथ झालेल्या मुलांमधले मुलगे बहुतेक वेळा भरकटत गुन्हेगारी जगात ओढले जातात, तर मुली हमखास देहविक्रीच्या व्यवसायात अडकतात. भारतात दरवर्षी एक लाख अनाथ मुली देहविक्रीच्या व्यवसायात विकल्या जातात हे सत्य आहे. हजारो अनाथालयातून दरवर्षी तीन लाखांच्या घरात अशी बेसहारा मुलं बाहेर पडतात. त्यांच्याकडे साधं मतदानाचं कार्ड नसतं, रेशनकार्ड नसतं की कायमस्वरूपी निवासाचा पत्ता. त्यांना नोकरी कोण देणार, त्यांची लग्नं कशी होणार, या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाहीत. 

अमरावती जिल्ह्यातले शंकरबाबा पापळकर मात्र गेली ४० हून अधिक वर्षं या मुलांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करत आले आहेत. अनेकदा असं दिसतं, की अनाथांसाठी चालवल्या जाणाऱ्या स्वयंसेवी संस्था या मुलांच्या नावावर देशा-परदेशांतून पैसे कमावतात; त्यांच्या असहायतेचा, त्यांच्या दुःखाचा बाजार मांडतात. पण एवढा पैसा असूनही त्यांच्या पुनर्वसनाचं मॉडेल या संस्था उभ्या करू शकलेल्या नाहीत. ते काम शंकरबाबांनी करून दाखवलं आहे. 

हेही वाचा - डान्स थेरपीतून हजारो पार्किन्सन्स पेशंट्सना आधार देणारा ऋषिकेश पवार

शंकरबाबा मूळचे परतवाड्याचे. ते स्वतः धुनी. त्यात अगदी तरुण वयातच ते गाडगेबाबांच्या संपर्कात आले. त्यांच्यासोबत त्यांची भजनं ऐकत ते गावोगावी फिरू लागले. गाडगेबाबांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठाच परिणाम झाला. बाबांचं गोपाला नावाचं मासिकही त्यांनी काही काळ चालवलं. पुढे गाडगे मिशनसोबत मतभेद झाल्यामुळे शंकरबाबांनी स्वतःचं मासिक सुरू केलं- देवकीनंदन. ‌‘शंकर, तू या अनाथांचा नाथ झालं पाहिजेस' असं गाडगेबाबांनीच त्यांना सांगितलं. ते त्यांच्या मनात कायमचं रुजून राहिलं.

पुढे शंकरबाबांनी पत्रकार म्हणून काम केलं. पण त्यांना पत्रकारितेबरोबरच अनेक विषयांमध्ये रस होता. देशा-परदेशांतील दार्शनिकांचं तत्त्वज्ञान समजून घेण्यात त्यांना रस होता, उर्दू शायरीत रस होता. पुढे ते रजनीशांच्याही संपर्कात आले. साने गुरुजींचाही त्यांच्यावर प्रभाव होता. पत्रकार असल्याने राजकारणातल्या मंडळींमध्येही त्यांची ऊठबस होती. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्याशी त्यांच्या ओळखी होत्या. देवकीनंदन या मासिकाच्या निमित्ताने शंकरबाबांची पुढे राष्ट्रपती झालेल्या प्रतिभाताई पाटलांशी चांगली मैत्री झाली. ताईंच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा सहभाग असे. अशा काही मित्रमंडळींमुळे ते काँग्रेसच्या विचारधारेकडे ओढले गेले; पण पुढे काही दिवसांतच राजकारणातलं सत्ताकारण आणि अर्थकारण बघून त्यांचं मन विटलं. ही गाडगेबाबांच्या आणि साने गुरुजींच्या विचारांशी गद्दारी आहे असं त्यांना वाटू लागलं. ‌‘तू अनाथांचा नाथ हो' हे गाडगेबाबांचे शब्द त्यांना रात्री-बेरात्री अस्वस्थ करत. ‌‘अपने जीने का अर्थ क्या है?' हा रजनीशांचा प्रश्न त्यांना छळत असे, पण उत्तर सापडत नसे. 

या द्वंद्वात असतानाच शंकरबाबांची भेट अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकर वैद्य यांच्याशी झाली. त्यांच्यासमोर शंकरबाबांनी अनाथ मुलांसाठी कार्य उभं करण्याचा प्रस्ताव ठेवला. वैद्य यांनाही तो रुचला आणि ‌‘गोपाला शिक्षण संस्थे'च्या माध्यमातून त्यांनी परतवाडा तालुक्यात वझर फाटा इथे स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृह सुरू केलं. साल होतं १९८५. हे अनाथालय सुरू करताना एक नक्की होतं, त्याचं स्वरूप सरकारी किंवा एनजीओसारखं होऊ द्यायचं नाही, तर हे या मुलांचं हक्काचं घर असेल, ही मुलं तिथे अनाथ असणार नाहीत, असं शंकरबाबांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी सर्व मुलांचं कायदेशीर पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 

हळूहळू पोलिस विभाग, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाकडून अनाथ, बेवारस मुलं संस्थेत दाखल होऊ लागली. अनेकदा अशा संस्थांमध्ये मुलांच्या संगोपनापेक्षा कर्मचाऱ्यांवरच जास्त खर्च होताना दिसतो. शिवाय या मुलांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी काहीही प्रयत्न होत नाहीत. म्हणूनच शंकरबाबांनी त्यांना आपली मुलं मानलं, त्यांना स्वतःचं नाव दिलं, कायदेशीररीत्या सर्वांना दत्तक घेतलं. त्यांच्या राहण्या-खाण्याची, आरोग्याची, शिक्षणाची व्यवस्था केली. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना वडिलांचं प्रेम देऊ केलं. पण हे करताना त्यांनी सरकारचे पगारदार कर्मचारी नाकारले. मतिमंद, अंध, मूकबधिर सज्ञान मुलांना स्वत:च्या पायावर उभं करून देण्यासाठी स्वत:चाच वझर पॅटर्न विकसित केला. त्यांच्या या अनाथालयात भारंभार मुलांची भरती केली जात नाही, पण जी मुलं इथे येतात त्यांना आपल्या पायावर उभं करण्याची जबाबदारी शंकरबाबांनी घेतलेली असते. 

हेही वाचा - पोलिसाची नोकरी सोडून मुलांसाठी काम करणाऱ्या वैशाली शिंदे-शेंडे

शंकरबाबांनी १९८५ पासून आतापर्यंत १७ मुलींची लग्नं लावून दिली आहेत. ३२ नातवांचे ते आजोबा आहेत. मुलगा-मुलगी दोन्ही मुके असताना जेव्हा त्यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा बोलू लागतो, तेव्हा त्या जोडप्याला होणारा आनंद शंकरबाबांसाठी सर्वाधिक मोलाचा असतो. अंध जोडप्यांना डोळस मुलं, मुक्या आई-बाबांना बोलकी मुलं, विकलांग जोडप्यांना अव्यंग अपत्य जन्माला आल्याचा आनंद बाबांच्या बोलण्यातून नेहमीच डोकावतो. शंकरबाबांच्या अनाथ मुला-मुलींची लग्नंही मोठ्या धूमधडाक्यात होतात. हे सोहळे लोकसहभागातून होतात. शंकरबाबांची १२ अनाथ मुलं विविध ठिकाणी नोकरी करतात. पण शंकरबाबांनी एक सूत्र पाळलं आहे- एकदा लग्न झाल्यावर ते या मुला-मुलींना पुन्हा आश्रमात येऊ देत नाहीत. बाबाही त्यांच्याशी सहसा संपर्क ठेवत नाहीत. 

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरापासून जवळच वझर फाटा आहे. इथे एका टेकडीच्या पायथ्याशी १५ एकरांत स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृह (अनाथालय) ही संस्था उभी आहे. तिथे गेल्यावर आपण एखाद्या जंगलात प्रवेश करत आहोत असं वाटतं. पाच एकरांत अनाथालयासाठी वापरात येणारी छोटी-मोठी बांधकामं आहेत. अनाथ मुलांची व मुलींची निवासव्यवस्था स्वतंत्र आहे. काही मनोविकलांग मुलांची व्यवस्था स्वतंत्रपणे केलेली आहे. अनाथालयाच्या परिसरात आणि बाजूच्या टेकडीसदृश डोंगराळ जमिनीच्या १० एकरांच्या परिसरात शंकरबाबांनी १५ हजारांपेक्षा जास्त झाडं लावली आहेत. त्यातलं प्रत्येक झाड बालगृहातल्या मुलांनी दत्तक घेतलं आहे. ही गतिमंद, कर्णबधिर, अंध मुलंच झाडांची काळजी घेतात. त्यामुळेच त्यांनी प्रेमाने जोपासलेली झाडं आता मुलांच्या मदतीला आली आहेत असं शंकरबाबा सांगतात. म्हणजे काय, तर या झाडांपासून मिळणारं उत्पन्न या मुलांच्या औषधपाण्यासाठी, शिक्षणासाठी, कपड्यालत्त्यांसाठी वापरलं जातं. बाबांना शेरोशायरीची आवड असल्यामुळे इथल्या अनेक झाडांवर त्यांनी उत्तम शेर लिहिलेल्या पाट्या लावल्या आहेत. मुलं या निसर्गात वावरतात तेव्हा त्यांच्या नकळत त्यांच्यावर शाश्वत मूल्यांचा संस्कार होत असतो. 

शंकरबाबांचं व्यक्तिमत्त्वही अवलिया आहे. त्यांना हजारो शेर मुखोद्गत आहेत. शायरी समजणाऱ्यांशी त्यांची चांगली मैफल जमते. बुद्ध, कबीर, गाडगेबाबा, रजनीश यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव शंकरबाबांच्या जीवनावर आहे. तो त्यांच्या बोलण्यातूनही जाणवतो. त्यांनी स्वतःच्या हयातीतच स्वतःची कबर या परिसरात उभारली आहे. मी गेल्यानंतरही मुलांना माझा आधार राहावा यासाठी जिवंतपणीच तरतूद करून ठेवल्याचं शंकरबाबा सांगतात. 

हल्ली आपल्या घरांमध्ये नातेवाईकसुद्धा सामावून घेतले जात नाहीत. बाहेरचा एखादा पाहुणासुद्धा आपल्याला दोन दिवसांत नकोसा होतो. रक्ताचं नातं असणारी माणसंही एकमेकांशी परकेपणाने वागतात, पैशांपोटी एकमेकांच्या उरावर बसतात. कुटुंबातील प्रेम-जिव्हाळा कमी होत असताना कोण-कुठला याचा विचार न करता शंकरबाबा या १३५ अनाथांची माउली बनले आहेत. मनोविकलांग, अपंग मुलांकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. त्यांना स्वतःच्या शरीराचं-विधींचंही भान नसतं. अशा मुलांना सांभाळणं, त्यांची शुश्रूषा करणं सोपं नाही. हे सर्व काम स्वतः बाबा आणि त्यांनी वाढवलेली मुलंच करतात. बाबांच्या आश्रमात बाहेरील कर्मचारी नाहीत. बाबांनी वाढवलेली सज्ञान परंतु अंध, अपंग, कर्णबधिर मुलंच इथे कर्मचारी आहेत. हे सर्व विकलांग एकमेकांच्या सहकार्याने आपापली दैनंदिन कामं करू शकतात, ही बाबांचीच देणगी आहे. 

हेही वाचा - दयानंद कुबलः कोकणवासीयांच्या मदतीला धावणारा चाकरमानी

आज शंकरबाबांचं वय ७६ आहे. शरीर थकत चाललं आहे. आपण आज आहोत, उद्या नाही याची जाणीव बाबांना सतत असते. याच जाणिवेतून बाबांनी दत्तक घेतलेला अनाथ अंध मुलगा विदूर शंकर पापळकर याला आपला उत्तराधिकारी नेमलं आहे. विदूर सध्या एम.एस.डब्ल्यू. करत आहे. तो संस्थेच्या कामानिमित्ताने महाराष्ट्रभर फिरतो. तोही बाबांचाच मुलगा असल्याने कसलाही बडेजाव मिरवत नाही. 

शंकरबाबा फकिरी वृत्तीचे. त्यांनी कधीच कपडे विकत घेऊन घातले नाहीत. समाजातील काही विचार जुळलेल्या व्यक्तींकडून ते वापरलेला नेहरू शर्ट आणि पायजमाच मागून घेतात. तेच जुने कपडे वापरतात. गाडगेबाबांनी त्यांच्याजवळची एक घोंगडी शंकरबाबांना शेवटच्या काळात भेट दिली होती. ती जीर्ण घोंगडी सतत त्यांच्या खांद्यावर असते. ते म्हणतात, “या घोंगडीच्या रूपाने गाडगेबाबा मला सतत कार्यमग्न ठेवण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यांचा आशीर्वादच मला बळ देतो.” 

आजच्या पिढीने गाडगेबाबांना पाहिलेलं नाही; परंतु गाडगेबाबांच्या समाजसेवेचा आदर्श घेतलेला, स्वत:च्या ऐषआरामाच्या जीवनावर पाणी सोडून अनाथांसाठी आपलं आयुष्य दान देणारा, मातृहृदयी कृतिशील बाप बघायचा असेल तर तो शंकरबाबांमध्येच बघता येतो. शंकरबाबांचं कार्य धर्मातीत आहे. ते कोणत्याही जातिधर्माच्या सीमांमध्ये बांधता येणार नाही. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी आपली वैचारिक जातकुळी जमते म्हणून मी रोज बुद्धाचं स्मरण करतो, असं ते म्हणतात. “स्मरण करण्यापुरताच माझा अध्यात्माशी संबंध आहे. बाकी दिवसाचे चोवीस तास मी माझ्या मुलांचाच विचार करत असतो. माझ्या काही मुलांचं पुनर्वसन होणार नाही, कारण त्यांच्यात बहुविकलांगता आहे. देशातील प्रत्येक अनाथाचं, मतिमंद-विकलांगाचं पुनर्वसन व्हावं हीच माझी शेवटची इच्छा आहे”, असं ते पोटतिडकीने बोलतात.. 

शंकरबाबांच्या कार्यात अनेकांनी छोटी-मोठी विघ्नं आणली गेली आहेत. बाबांवर काही कोर्ट केसेसही झाल्यात. बाबा म्हणतात, “आपली प्रशासन व्यवस्था प्रचंड किडलेली आहे. ती सुधारत बसण्यापेक्षा आपण आपलं काम मॉडेल म्हणून करत राहावं, हाच त्यावरचा खरा उपाय आहे.” बाबांनी स्वतःसाठी बांधलेल्या कबरीसमोरील एका झाडावर समर्पक शेर लिहिला आहे- 

नर्म सोफों पे बैठे हैं कुंडली मारकर,
आजकल साप पिटारोंमें नहीं रहते। 

यातूनच आजचं वास्तव बाबा व्यक्त करतात. 

समाजसेवेसोबतच सजग पालकत्व कसं असू शकतं, झपाटलेपण काय असू शकतं हे समजून घेण्यासाठी, शक्य झाल्यास काही मदत करण्यासाठी एकदा शंकरबाबांच्या बिनभिंतींच्या उघड्या आश्रमाला जरूर भेट द्यावी. कारण हा नुसता अनाथांचा आश्रम नाही, तर ते सेवा-समर्पण आणि त्यागाचं विद्यापीठ आहे. 

(अनुभव, जुलै २०२१च्या अंकातून साभार.)

नरेंद्र लांजेवार







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results