आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

पोलिसाची नोकरी सोडून मुलांसाठी काम करणाऱ्या वैशाली शिंदे-शेंडे

  • शिल्पा दातार
  • 18.12.25
  • वाचनवेळ 4 मि.
vaishali shinde header

नाशिकमधील कामगारनगर वस्तीतल्या मुलांपासून तृतीयपंथीय, समलिंगी लोकांचं समुपदेशन करण्यापर्यंत, गरीब मुलांना मोफत शिक्षण तसंच शिष्यवृत्ती देण्यापासून एनडीएसाठी मुला-मुलींना तयार करण्यापर्यंत अनेक गोष्टी एकच व्यक्ती करते. त्या म्हणजे नाशिकमधील माजी पोलीस अधिकारी वैशाली शिदे-शेंडे. वैशालीताईंचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

मूळच्या पुण्याच्या. शालेय शिक्षण खडतर परिस्थितीत झालं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सेवासदनच्या वसतिगृहात राहत होत्या. तेव्हा एकदा गंमत म्हणून वैशालीताईंनी आपल्या रूममेटच्या नवऱ्याचा पोलिसी गणवेश घालून फोटो काढून घेतला. तेव्हापासूनच म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्या पोलीस क्षेत्राच्या प्रेमात पडल्या. पुढे भरपूर अभ्यास करून त्यांनी इंग्रजी आणि अर्थशास्त्र या विषयात एम.ए. केलं. त्या पुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. एमबीए, एलएलबी पुर्ण केल्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी एमपीएससीचा अभ्यासही सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात त्या शारीरिक शिक्षण आणि मुलाखतीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. १९९९ मध्ये त्यांची नेमणूक झाली.

मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात नार्कोटिक्स विभागात पोलीस अधिकारी म्हणून वैशालीताई काम करत होत्या. तिथल्या केसेस पाहून त्यांचं मन सुन्न होई. लहानपणीपासूनच दारू आणि इतर व्यसनांच्या विळख्यात सापडलेली मुलं बघितली की यावर मुळापासूनच काम करणं आवश्यक आहे, असं त्यांना वाटायचं.

दरम्यानच्या काळात त्या वर्तमानपत्रामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी स्तंभही चालवत होत्या. २०१५ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि भरकटलेल्या, गरीब, वंचित, वाममार्गाला लागू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करायचं ठरवलं. नाशिकच्या एका वस्तीजवळच अध्ययन अकादमी सुरू केली. शाळा, कॉलेजमधील मुलांबरोबरच यूपीएससी, एमपीएससी, पोलिस भरती, एनडीएसाठी तयारी करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करायला सुरूवात केली. शाळांमध्ये जाऊन इतिहास, संविधान अशा विषयांबद्दल जागरूकतेचं काम सुरू केलं.

एखाद्याच्या घरात अभ्यासाचं वातावरण, जागा नसते, एखाद्याला खूप शिकायचं असतं पण पैसेच नसतात. अनेकांमध्ये खूप ऊर्जा असते पण ती अयोग्य मार्गावर खर्ची पडली तर त्यातून सराईत गुन्हेगार तयार होतात. अशा मुलांसाठी शिष्यवृत्तीही द्यायला सुरुवात केली. वैशालीताईंच्याकडे शिकण्याच्या अटी म्हणजे कोणी कुणाचा जात-धर्म विचारायचा नाही, तसंच अधिकारी होऊन मोठ्या हुद्दयावर गेल्यावर भ्रष्टाचार करायचा नाही. वैशालीताईंच्या हाताखालून जवळजवळ साडेचार हजार मुलांनी पोलिसी प्रशिक्षण घेतलं आहे. या कामात आर्थिक हातभाराबरोबरच मनुष्यबळही लागतं. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांचा गट त्यांना या कामात मदत करतो. या कामात त्यांचे माजी विद्यार्थीही मदत करतात.

त्यांचा खरा कस लागला तो कोविडच्या काळात. कोविड अंतर्मुख करणारा होता, असं त्या म्हणतात. त्यानंतर समुपदेशनाच्या गरजा वाढताहेत, हे लक्षात आल्यावर त्यांनी खूप बोलायचं आहे, पण ऐकायला कुणी नाही, अशांशी बोलायला सुरुवात केली. तसंच मुलांना दोन वर्षं ऑनलाईन शिकवत असताना आर्थिक अडचणीत असूनही काम थांबवलं नाही.

‘‘ज्या वस्त्यांत जायलाही माणसं तयार नसतात, तिथली मुलं करतील काय?’’ हा प्रश्न त्या व्यवस्थेला विचारतात. त्या परिसरातील किशोरवयीन मुलांच्या समस्याच वेगळ्या असतात. चुकीच्या समजुती, राजकीय अजेंडे, गुन्हेगारी, बुवाबाबा या सगळ्याच्या हातची खेळणी होतात ही मुलं. व्यसनी होतात. अशांना वैचारिक खाद्य, प्रेम, आपल्यालाही स्वीकारणारं कुणी आहे, हा विश्वास द्यावा लागतो. ते काम वैशालीताई करतात.

त्या सांगतात, ‘‘कष्टाळू रोजंदारी करणारा एक विद्यार्थी होता. बारावी झाला. त्याला मेडिकलला जायचं होतं. पण खर्च कसा करणार? मग त्याला मदत करायचं ठरवलं. अट एकच, मेहनत करावी लागेल. तो पार्किंगमध्ये बसून १८-१८ तास अभ्यास करत असे. इमारतीतले लोक कामं सांगत, तीही करत असे. त्याचा निकाल लागला, तेव्हा सार्थक झाल्यासारखं वाटलं. आज तो मुंबईला सरकारी नोकरीत आहे. त्यानं मला अकादमीसाठी आर्थिक मदत देऊ केली, अर्थात मी ती घेतली नाही. पण त्यानं लक्षात ठेवलं, हे महत्त्वाचं.’’

याबरोबरीने त्या बाकीही बरीच धडपड करत असतात. त्या पुणे विद्यापीठातून पाली भाषाही शिकल्या आहेत. त्यांना राष्ट्रपती पदक मिळालंय. समलैंगिक तसंच तृतीयपंथीयांनाही त्या ऑनलाईन मोफत समुपदेशन करतात. त्या सांगतात. ‘‘एक गे मुलगा मला भेटला. आई-बाबा वैद्यकीय व्यवसायात असूनही त्याला स्वीकारायला तयार नव्हते. त्यांच्याशी तो खोटं बोलायला लागला होता. त्याला म्हटलं, एकदा सांगून टाक. जे वादळ यायचं ते एकदाच येऊदेत. नंतर ते स्वीकारतील.’’ पुढे एकातून एक अशी बरीच मुलं-मुली भेटायला लागली. ‘आपण कसे वेगळे आहोत’ असं या मुलांचं मन कुढत असतं तर घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. दोघांनाही समजावणं गरजेचं असतं. त्यांचं म्हणणं ऐकणारं कुणीतरी हवं असतं. ते वेळेवर मिळालं नाही तर आत्मघातापासून गुन्हेगारीपर्यंत कुठंही त्यांचा प्रवास होऊ शकतो.

या सगळ्याचं मूळ आपल्या शिक्षणपद्धतीत असल्याचं वैशालीताईंचं मत आहे. त्या म्हणतात, ‘‘सगळ्यांनी एकसारखं व्हायला पाहिजे या नादात मुलांना आपण खुजं करतोय.’ प्रत्येकाचं उपजतच एक व्यक्तिमत्त्व असतं, त्याचा आदर करावा, असं त्या म्हणतात.


शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com

शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 42

Sanjay Jadhav 23.01.26
अत्यंत प्रेरणादायी सामाजिक कार्य वैशाली मॅडम यांचे..

दिपाली सुर्यवंशी 09.01.26
माझ्या मुलाला त्यांच्या कामातून वेळ काढून भरपूर मार्गदर्शन करतात. त्यांच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण सोनेरीच असतात ज्या मुलांना हे क्षण जगायला मिळतात त्यांच्या आयुष्याचे सोनेच होते.अशा ह्या वैशाली ताई... हा लेख वाचून खूप आनंद झाला

Suyog09.01.26
ध्येयाने झपाटणारी व्यक्ती कोणताही कठोर निर्णय घेऊन तितक्याच हिमतीने साध्य करून दाखवतातच याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती वैशाली मॅडम... तुमच्या शैक्षणिक कार्याचा आम्हाला अभिमान तर होताच पण तुमच्या या उल्लेखनीय समाजकार्यामुळे आम्हा युवकांसमोर एक नवा आदर्श निर्माण करून आमच्या मनातील तुमचे स्थान अधिक उंचावले आहे.

मिलिंद पंढरीनाथ आंबवणे, वाडा, पालघर 06.01.26
मा.वैशाली ताईंच्या संपर्कात आम्ही आमच्या मुलांसह बऱ्याच काळापासून आहोत. कुणीही ताईंना जसं जमेल तसं फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटावं आणि मन मोकळं करावं . काही न काही आशेचा किरण त्या दाखवणारच. त्यांच्या कडून खुप सारी ऊर्जा, प्रेरणा व मैत्री मिळते. ताईंना व ताईंच्या व्यक्तिमत्वास सुंदर रित्या उलगडून दाखविल्या साठी तुम्हाला खुप खुप धन्यवाद !

Kalpana sanjay veer03.01.26
खूपच प्रेरणादायी लेख आहे. यावर तू असा प्रतिसाद देऊ शकतोस/देऊ शकतेस — वैयक्तिक, अभिमानाने भरलेला आणि मनापासूनचा: --- हे वाचताना मन अभिमानानं भरून आलं. लहानपणापासून ओळख असलेली वैशाली शिदे-शेंडे आज इतक्या व्यापक सामाजिक कामाची उभी राहिलेली ताकद बनली आहे, हे सांगताना शब्द अपुरे पडतात. कठीण परिस्थितीतून आलेली मुलगी सुवर्णपदक विजेती होते, पोलीस अधिकारी होते आणि सुरक्षित आयुष्य सोडून समाजातील सर्वात दुर्लक्षित घटकांसाठी झोकून देते—हे केवळ यशकथाच नाही, तर मूल्यांची गोष्ट आहे. कामगारवस्तीतील मुलांपासून ते समलिंगी व तृतीयपंथीय व्यक्तींच्या समुपदेशनापर्यंत, “कोणी तरी ऐकणारं हवं” या साध्या पण खोल गरजेची जाणीव ठेवून ती काम करते. पद, पुरस्कार किंवा प्रसिद्धीपेक्षा माणूस घडणं महत्त्वाचं आहे, हे वैशालीताईंच्या प्रत्येक कृतीतून दिसतं. बालपणीची माझी मैत्रीण आज हजारो आयुष्यांना दिशा देत आहे, ही गोष्ट माझ्यासाठी वैयक्तिक अभिमानाची आहे. समाज बदलायचा असेल तर व्यवस्था बदलावी लागते, पण व्यवस्था बदलण्यासाठी आधी माणसं उभी करावी लागतात—हे वैशालीताई जगून दाखवत आहेत. अशा मैत्रीण असणं हेच माझं भाग्य आहे. 🙏

विकास सैंदाणे 01.01.26
कर्तृत्व आणि माणुसकी यांचा सुरेख संगम! मॅम च्या अध्ययन अकादमी'ची आणि त्यांच्या विचारांची माहिती देणारा हा लेख खूपच सकारात्मक ऊर्जा देतो. अशा व्यक्तींमुळेच समाजाप्रती असलेली आशा जिवंत राहते." परंतु विशेष आभार हा लेख लिहिणाऱ्या लेखिकेचे आहे तुमच्या लेखणीत समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य आहे; तुमचे एक-एक वाक्य वाचकाचे आयुष्य बदलू शकते. असे म्हणतात की साहित्यात क्रांती घडवण्याची ताकद असते, आणि अशी क्रांती तुमच्या लेखणीतून नेहमीच घडत राहो हीच शुभेच्छा…🪄🖋️🖌️

मंजिरी 01.01.26
खूप सुंदर लेख आहे... खरोखर वैशाली मॅडम एक परिपूर्ण आणि सर्वोत्तम शिक्षिका आहेत. वैशाली मॅडम आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

किशोर दिलीप पाटील 31.12.25
वैशाली शिदे-शेंडे मॅडम यांचा प्रवास वाचताना माणुसकी, धैर्य आणि समाजभान यांचा खरा अर्थ कळतो. पोलीस अधिकारी म्हणून यशस्वी कारकीर्द असतानाही सुरक्षित चौकटीबाहेर पडून त्यांनी वंचित, गरीब, भरकटलेल्या मुलांसाठी स्वतःचं आयुष्य वाहिलं, हे थक्क करणारं आहे. शिक्षण, समुपदेशन, मूल्यसंस्कार आणि स्वीकार—या सगळ्यांचा सुरेख संगम त्यांच्या कामात दिसतो. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस घडवणं, अधिकार मिळाल्यावर प्रामाणिक राहण्याची शिकवण देणं आणि समाजाने नाकारलेल्या घटकांसाठी आधार बनणं, हे खरं तर व्यवस्थेचं काम आहे; पण ते एकट्या व्यक्तीनं करून दाखवलं आहे. “सगळ्यांनी एकसारखं व्हावं” या शिक्षणपद्धतीवर त्यांनी केलेली टिप्पणी खूप विचार करायला लावणारी आहे. अशा व्यक्ती समाजासाठी दीपस्तंभ असतात. हा लेख प्रेरणा देणारा, अंतर्मुख करणारा आणि आशा निर्माण करणारा आहे.

Naveed Sayyad 31.12.25
खरं तर प्रकाशाला आपली प्रतिभा अंधारासमोर सिद्ध करायची गरजच नसते परंतु आधुनिक युगात काही गोष्टीची उकल आणि निराकरणासाठी त्याला सामोरे यावेच लागते तसंच मॅम बद्दल बोलण्यासाठी प्रतिक्रिया इथं पुरेशी नक्कीच नाही जे त्यांना जाणता त्यांना तसं माहित परंतु जे लोखंड अजून परीसाच्या सानिध्यात नाही आलं त्यांच्यासाठी ही पर्वणीच...आहे त्याला आहे तसं स्वीकारणं आणि काय होऊ शकतं आणि काय व्हायला हवं याची साध नारूपी शिकवण मॅम कडून नक्कीच भेटते आणि इथे सहवासात आलेला कोणीही स्वतःला नक्कीच भाग्यवान समजतो याचं कसब मॅम ला चांगलंच ठाऊक...बाकी कमी जास्त प्रत्येकाच्या माळेला गुंफलेलं परंतु असायला काय हवं याचं उत्तर मात्र इथे नक्की भेटेल याची पूर्ण शाश्वती...धन्यवाद मॅम तुमचाच विद्यार्थी...✨🖋️

आशिष राव31.12.25
खरच वैशाली ताईवरी लेख हा मोजक्या शब्दात पण त्यांच्या कामाची व्याप्ती व कामाची भव्यता, गरिब व आर्थिक दृष्टीने दुर्बल घटकांसाठी काम करण्याची जिद्द व तळमळ दिसुन येते. ऐखादी व्यक्ती अडचणीत आहे हे कळल्यावर त्या शक्य तितकी मदत करतांना मागेपुढे पहात नाही हा अनुभव माझ्यासारख्या भरपूर लोकांनी घेतला आहे. वैशाली ताईना त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा खुपखुप.

भूषण पाटील31.12.25
हा लेख खूप साध्या पण खोल परिणाम करणाऱ्या कामाची गोष्ट सांगतो. वैशाली शिदे-शेंडे ताई यांनी स्वतःचं सुरक्षित आणि प्रतिष्ठित आयुष्य बाजूला ठेवून समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी काम करायचं ठरवलं, हीच गोष्ट खूप मोठी आहे. गरीब वस्त्यांमधली मुलं, अभ्यासासाठी जागा-पैसे नसलेले विद्यार्थी, भरकटण्याच्या मार्गावर असलेली तरुणाई – या सगळ्यांसाठी त्या आधार बनल्या. फक्त अभ्यास नाही, तर योग्य विचार, आत्मविश्वास आणि “कोणी तरी आपल्यासाठी आहे” हा विश्वास त्या देतात. समलिंगी आणि तृतीयपंथीय लोकांचं समुपदेशन करणं, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, कुटुंबीयांना समजावून सांगणं – हे काम फार कमी लोक करतात. वेळेवर मिळालेला आधार किती आयुष्य वाचवू शकतो, हे त्यांच्या कामातून दिसतं. प्रत्येक मूल वेगळं असतं, सगळ्यांना एकाच चौकटीत बसवू नये, हा त्यांचा विचार खूप महत्त्वाचा आहे. थोडक्यात, वैशालीताई म्हणजे न बोलता काम करणारी माणुसकी. त्यांच्या कामाला मनापासून सलाम.

Kumudini Borhade 30.12.25
अनाथांची माय,,,,खरच पोलिस क्षेत्रातील,,ज्या ठिकाणी भरपूर पैसा कमावता येऊ शकतो,( सगळीकडेच भ्रष्टाचार) अशा क्षेत्राला लाथाडून,केवळ जे जे आपणासी ठावे ते ते वाटावे,,शहाणे करून सोडावे सकळजन या उक्तीप्रमाणे आपण काम करीत आहात,,,जाती धर्माच्या पलीकडे असणारा माणुसकी हा एकच धर्म आपण जाणता,,,,आपल्यामध्ये तेवणाऱ्या मशालीची धगधग सर्वसामान्य मुलांमध्ये आपण पेटविण्याचे काम करीत आहात,,आपली हिच मुले उद्या भ्रष्टाचार मुक्त भारत घडविण्याचे बळ आपल्या पंखात घेऊन उंच भरारी घेवोत ,हिच आपणास सदिच्छा.

Swati Shinde 30.12.25
अतिशय उत्कृष्ट काम वैशाली

शुभांगी अशोक महिरे30.12.25
वैशाली मॅडम, तुम्ही या सर्व गोष्टी करताना मी तुम्हाला खूप जवळून पाहिलेल आहे तुमच्या कर्तृत्वाची माहिती काही ओळीत सांगणे एवढी कामगिरी लहान नाही मला शब्द अपुरे पडतील तुमच्या विषयी तुमच्या कामा विषयी जेवढे बोल तेवढे कमी आहे. तरी मी येवढं सांगू शकते की, या नवीन पिढी ला या जगाला तुमच्यासारख्या व्यक्तीची आणि तुमच्या मार्गदर्शनाची खूप खूप गरज आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला माझ्या जीवनातील काही काळ तुमच्या सहवासात मिळाला आहे. युनिव्हर्सला एवढीच सद्भावना व्यक्त करते की, या जगातील जास्तीत जास्त लोकांना तुमचे मार्गदर्शन मिळो, आणि तुमचे नाव तुमचे लेख तुमची कामगिरी जगभर पसरावी ही तुम्हाला शुभेच्छा!" 🌹💐♥️🌍🫂 (आपली प्रिय विद्यार्थिनी)

SAVITA GAVANDE30.12.25
मॅडम चा जीवन प्रवास आम्ही खूप जवळून पाहिलाय,,, एक निस्वार्थ, प्रेरणादायी, आनंददायी चेहरा,,व्यक्ती कसा असावा,, याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे शेंडे मॅडम... इमानदारी/प्रामाणिकपणा याचं दुसरं नाव म्हणजे मॅडम... कोणत्याही बिकट परिस्थितीला कसं तोंड द्यावं,, कोणत्याही संकटात स्थिर कसं राहावं यासाठी कायम मोलाचं मार्गदर्शन त्यांच्याकडून अगदी विनामूल्य आणि आपुलकीने केलं जातं.. कोणत्याही गरजुला मदत करताना मॅडम कधीच मागे पुढे पाहत नाही.. अतिशय प्रेरणादायी प्रवास.. मॅडम च्या कार्याला खूप सलाम आणि शुभेच्छा

Shweta kolhe 30.12.25
पोलीस अधिकारी म्हणून मिळालेला अनुभव, शिक्षणातून आलेली दृष्टी आणि माणूस म्हणून असलेली संवेदनशीलता यांचा सुरेख संगम त्यांच्या कार्यात दिसतो. “सगळ्यांनी एकसारखं व्हायला नको” हा त्यांचा विचार आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजाने दुर्लक्षित केलेल्या घटकांसाठी त्या आशेचा, विश्वासाचा आणि स्वीकाराचा आधार बनल्या आहेत. अशा व्यक्तिमत्त्वावर लेख लिहिणं म्हणजे प्रेरणेला शब्द देणं आहे. हा लेख मनाला स्पर्श करून जातो आणि ‘एक माणूसही बदल घडवू शकतो’ यावर पुन्हा एकदा विश्वास बसतो. 🙏✨

मुरलीधर आढाव 30.12.25
ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही, तर समाजाला दिशा देणाऱ्या एका जिवंत चळवळीची ओळख आहे. माजी पोलीस अधिकारी वैशाली शिंदे–शेंडे यांनी स्वतःचं आयुष्य केवळ पद, अधिकार किंवा सन्मानापुरतं मर्यादित न ठेवता समाजातील दुर्लक्षित, वंचित आणि भरकटण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या घटकांसाठी वाहून घेतलं आहे, हे अतिशय प्रेरणादायी आहे. कामगारनगरच्या वस्त्यांमधील मुलांपासून ते तृतीयपंथीय आणि समलिंगी व्यक्तींच्या समुपदेशनापर्यंत त्यांनी केलेलं काम म्हणजे खऱ्या अर्थाने मानवतेचं काम आहे. गरीब मुलांना मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, एनडीएसाठी तयारी, शाळा–महाविद्यालयांमध्ये जाऊन संविधान व इतिहासाबद्दल जागृती — हे सगळं एका व्यक्तीकडून घडणं थक्क करून टाकणारं आहे. पोलीस सेवेत असतानाच समाजातील व्यसन, गुन्हेगारी आणि असहाय्यतेची मुळं ओळखून त्यावर शिक्षणाच्या माध्यमातून काम करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय फार दूरदृष्टीचा आहे. सुरक्षित नोकरी सोडून समाजकार्याचा मार्ग निवडणं हे धैर्य आणि मूल्यनिष्ठेचं प्रतीक आहे. कोविडसारख्या कठीण काळातही त्यांनी काम थांबवलं नाही, उलट समुपदेशनाची गरज ओळखून अनेक तुटलेल्या मनांना आधार दिला. “कोणी ऐकणारं असणं” किती महत्त्वाचं असतं, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. विशेषतः समलिंगी व तृतीयपंथीय व्यक्तींना स्वीकार, समज आणि आत्मविश्वास देण्याचं त्यांचं काम समाजाला अधिक संवेदनशील बनवणारं आहे. “सगळ्यांनी एकसारखं व्हावं या हट्टात आपण मुलांना खुजं करतो” हे त्यांचं वाक्य आपल्या शिक्षणव्यवस्थेवर नेमकं बोट ठेवणारं आहे. प्रत्येक मुलाचं वेगळेपण जपणारी, त्याच्या क्षमतेला दिशा देणारी शिक्षणपद्धती उभी राहावी, ही त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा व्यक्ती समाजात आहेत म्हणूनच अजूनही आशा जिवंत आहे. वैशालीताईंचा प्रवास प्रेरणा देणारा, डोळे उघडणारा आणि अंतर्मुख करणारा आहे. त्यांच्या कार्याला मनापासून सलाम आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

pooja nagre30.12.25
अप्रतिम आणि प्रेरणादायी !

Sagar prakash saudagar 30.12.25
अतिशय शिंदे मॅडम यांनी जनसामान्य पर्यंत त्यांचे नोकरीच्या आधीपासून नोकरी लागल्यावर नोकरी त सोडल्यानंतर जीवनाच्या या चढाओढी मधले खडतळ प्रवास कसा असतो हा आज सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्याचा प्रसार माध्यमातून त्यांनी जो प्रयत्न केला तो प्रयत्न बद्दलच्या सलाम अतिशय गोरगरीब त्यांना नोकरीसाठी शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करणे मार्गदर्शन करणे हे खूप ध्येयाचे काम आज शिंदे मॅडम मी केलेला आहे त्यांचा आदर्श इतर महिलांनी सुद्धा घ्यावा आणि अशाच प्रकारे शुभेच्छाने चांगल्या मनाने जनतेचे गोरगरीब मुला-मुलींचे ध्येय धोरणाचे कामकाज करावे धन्यवाद मॅडम

आशा यशवंते -उके 29.12.25
अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारा लेख आहे हा . आणि का नसणार ??? तो त्यांच्याविषयी लिहिलेला आहे त्या वैशाली मॅडम .किती मोठं काळीज आहे त्यांचं, इतकं संवेदनशील राहून पण तितकच कडक शिस्तीतून इतके विद्यार्थी,पोलिस घडवणं हे आमच्यासाठी एक आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे. खुप खुप शुभेच्छा आणि लेखिकेचे आभार ज्यांनी इतक्या सुंदर शब्दांत हा लेख गुंफला. अशा सुंदर कार्याचा भाग होता आले तर नक्कीच आवडेल मला . धन्यवाद

प्रिती भामरे 29.12.25
शेंडे मॅडम चे काम खूप महत्वाचे आणि प्रेरणा देणारे आहे. खूप शुभेच्छा आणि लेखिकेचे आभार!

अतुल भोसेकर 29.12.25
अतिशय सुंदर लेख. निस्पृह आणि मन जागृत झालेली व्यक्ती किती सुंदर काम करू शकते याचे प्रत्यंतर आले. धन्यवाद

गणेश किंद्रे (मुंबई पोलीस)29.12.25
आदरणीय वैशाली शिंदे-शेंडे मॅडम यांचे आभार कितीही मानले तरी कमीच. मी त्यांनीच देऊ केलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला एक विद्यार्थी आहे. लॉकडाऊन काळात काही सुचत न्हवते आणि माझ सुभाग्य की मी मॅडम यांच्या संपर्कात आलो आणि ऑनलाईन क्लास मला मॅडम यांनी कोणतीही फी न घेता करू दिला. त्यांचे सकारात्मक विचार, जगाला पाहण्याचा दृष्टिकोन मला नेहमीच प्रेरणा देतो. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून आता मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. माझी छोटीशी ओळख निर्माण झाली आहे. हे सगळ वैशाली मॅडम यांच्या मार्गदर्शनाने शक्य झालं. लॉकडाउन मध्ये ऑनलाईन मध्ये मिळालेल्या वेळात जीवन जगण्याची कला मी नकळत त्यांच्याकडून शिकलो. त्यांची मुलांना शिकवण्याची ओढ एवढी प्रामाणिक आहे की त्यांच्याबद्दल या लेखात मला वाटत फक्त 2% आलेलं आहे. अजून खूप काही गोष्टी आहेत मॅडम यांच्या बद्दल बोलण्याच्या ज्यावर लेख पुरा पडणार नाही. धन्यवाद मॅडम मला सक्षम बनवल्याबद्दल आणि निर्णय घेण्याचं धाडस निर्माण माझ्यात निर्माण केल्याबद्दल. 🙏🏻

Varsha sandip shinde28.12.25
खुप छान लेख आहे वैशाली मॅडम यांना जेव्हा पण भेटते मी नवीन सकारात्मक गोष्टी शिकायला भेटतात त्यांचे विचार खुप ग्रेट आहेत सगळ्यांना नेहमी चांगल शिकवतात त्या आजूबाजूच्या लोकांवर निस्वार्थ प्रेम करतात त्या सगळ्यांना आपुलकीने जपतात पोलिस सर्व्हिस सोडून त्यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य दिले कोणीच नाही करू शकत ते त्यांनी केलं कुठल्याही शेत्रातला व्यक्ती असो सगळ्यांना खूप छान मार्गदर्शन करतात खरच खूप सुंदर लेख आहे.

Mayuri Sukhdeve 27.12.25
Very inspiring

संदीप शिंदे27.12.25
खूप छान लेख, मॅडमचे कार्य खूप सुंदर आणि आम्हा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच आमचा प्रवास चालू आहे.

मयुर ततार 27.12.25
नमस्कार, अतिशय सुंदर लेख, वैशाली शिंदे या माझ्या गुरु आहेत त्यांचे मार्गदर्शन त्यांनी दिलेला जीवनात जोपासण्याचा मार्ग आणि मूल्य ही अतिशय महत्त्वाची आहे, अतिशय उत्तम आणि शिक्षिका आणि मेंटॉर म्हणून वैशाली मॅडम नेहमीच काम करत असतात, फक्त शैक्षणिक जीवना पुरता नाही तर पुढील जीवनात मार्गक्रमण करत असताना कुठलेही समस्या आली तरी मॅडमांचे मार्गदर्शन योग्य असे , ज्याचे आपण अवलंबून करावा आणि आदर्श धरावा असे असते.

Sandeep Jagdale 27.12.25
खूपच अभिमानास्पद काम आहे 🙏 वैशाली शिंदे, तुमच्या सामाजिक कार्याला मनापासून सलाम. तुमच्या या जिद्दीमुळे खूप मोठे आणि सकारात्मक बदल घडत आहेत. खरंच हॅट्स ऑफ 👏 अशीच प्रेरणा देत राहा. खूप छान, अतिशय उल्लेखनीय कार्य 🌟

Adv. Vaibhav Koshti27.12.25
अप्रतिम लेख. वैशाली शिंदे या माझ्या वर्गमैत्रिण आहेत. जिवनातली जडणघडण खुप समर्पक शब्दात आपण केली आहे. अभिनंदन आणि धन्यवाद

Rutika Girase26.12.25
खूप सुंदर लेख आहे... खरोखर वैशाली मॅडम एक परिपूर्ण आणि सर्वोत्तम शिक्षिका आहेत. त्या जे काही शिकवतात ते प्रथम स्वतः कृतीत आणतात.अशा अत्यंत संवेदनशील, विद्यार्थ्यांमध्ये कुठलाही भेदभाव न करणाऱ्या,अत्यंत तळमळीने प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम देणाऱ्या,इतकेच नव्हे तर अवघड वाटणाऱ्या व न आवडणाऱ्या विषयात सुद्धा आवड निर्माण करून वेगवेगळ्या पद्धतीने हसत खेळत,सकारात्मकतेने प्रेरणा देत शिकवणाऱ्या, मानसिक तसेच आर्थिक अशा सर्व च समस्यांना सामोरे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन व मदत करणाऱ्या गुरु मिळाल्यामुळे मी तसेच त्यांचा प्रत्येक विद्यार्थी नेहमीच निसर्गाचे आभारी आहोत.हा लेख लिहिण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

MILIND SHANKARRAO TELURE26.12.25
माझ्यासाठी मॅडम नेहमीच आदरणीय आहेत. अतिशय प्रेरणादायक काम करत आहेत. पोलीस निरीक्षक पदाचा राजीनामा देऊन समाजकार्य करायला सिंहाचे काळीज लागते ते धाडस आदरणीय मॅडम यांनी केले आहे. आम्ही नाशिक पोलीस आयुक्तालयात सिंहस्थ ब्रँचला सोबत काम केलेले आहे. फारच उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. Vipassana group sitting साठी दर रविवारी त्यांच्या निवासस्थानी जायचो. Great Personality.

Mr. Manoj Namdev Wagh26.12.25
Great... Hats off madam... तुमच्यासाठी 🙏🙏🙏

Dr Pallavi Darade26.12.25
Vaishali ji is doing excellent work . When I read it , it really inspires me to keep on doing good . Amazing efforts over the years has resulted in changing the lives of so many children. We can understand if one person decides then nothing is impossible. Salute to your efforts and dedication.

स्वाती कोतवाल26.12.25
खूपच सुंदर कार्य वैशाली मॅडम…आणि नुसतच प्रचलित पध्दतीवर ताशेरे ओढत, आहे तोच रे ओढण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात वैशाली मॅडम..या स्वार्थी जगात अशी माणसे सापडणे म्हणजे विरळाच उदाहरण..तुमच्या सामाजिक कार्याला आणि बांधिलकीला सलाम मॅडम..लेखन अतिशय सुंदर,प्रभावी आहे,स्पर्शून जाणारं आहे!!

Ranaware Sikandar 26.12.25
हे सगळं वाचून मी थक्क झालो, की माझी विद्यार्थिनी वैशाली शिंदे एवढ मोठ कार्य करत असेल , खरोखर मला वैशाली मॅडम चा सार्थ अभिमान आहे, त्यांचा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, त्यांच्या धाडसाला माझा सलाम, मन भारावून गेलं, प्रसन्न वाटलं, आपण ही तिच्याकडून प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी चांगलं काम करावं असे वाटू लागलं आहे, भरपूर लिहावं वाटत पण शब्द फुटत नाहीत एवढ मोठं काम वैशाली मॅडम करतात, धन्यवाद!!!!!!¡

Sanjay Mali26.12.25
मॅडम आपल्याला मनापासून धन्यवाद आपण कर्तृत्वाने फार महान आहात. पोलिस सेवा सोडून दिन दुबळ्याचे अश्रू पुसण्याचे काम करीत असून आपण खरोखर ग्रेट आहात… विशेषत साहेब ही पोलिस क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत असताना आपणा दोघाच समाज प्रती पाहण्याचा दृष्टिकोन खरोखर प्रेरणादायी आहे.

Anuya Kulkarni26.12.25
खूप छान आणि योग्य निर्णय खूप छान काम करत आहेस तू एक आदर्श व्यक्ती महत्व तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

Shinde S. K.25.12.25
Khup chan kam keep it up and all the best

मनीषा सुनिल शेळके25.12.25
वैशाली शिंदे शेंडे यांची शिक्षणाची भूक खरचं खूप अफाट आहे . सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकच पदवी घेऊन समाधान मानतो परंतु त्यांच्या पदव्या पाहिल्या की मन थक्क होते . तसेच त्यांनी एवढी चांगली पोलिस दलातील नोकरी सोडून समाजातील गोरगरीब , अनाथ , गरजु मुलांसाठी काम करण्याचा जो वसा घेतला आहे त्याला त्रिवार सलाम .

VIDYADHAR THAKUR25.12.25
हे सगळं वाचून अवाक व्हायला होतं. चांगली नोकरी सोडून सामाजिक कामात व्यस्त होणं हे फारच अजब आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाला सलाम ! आजच्या या घाणेरड्या राजकारणात कुठेतरी एक समाजपयोगी नंदादीप तेवत आहे ; हे खूप दिलासा देणारं आहे.

धनश्री चव्हाण 25.12.25
खरंच अतिशय मन सुन्न करणाऱ्या बातम्या रोज कानावर पडतात पण वैशाली ताईसारख्या लोकांबद्दल ऐकल्यावर मनात आशेचा किरण येतो अन अशा माणसांमुळेच जग सुंदर आहे अन समाजात चांगलाच घडेल असा विश्वास मिळतो.......

Advait 25.12.25
अतिशय सुंदर लेख

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results