आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

डान्स थेरपीतून हजारो पार्किन्सन पेशंट्सना आधार देणारा ऋषिकेश पवार

  • योगेश जगताप
  • 11.05.26
  • वाचनवेळ 7 मि.
parkinsons dance

पार्किन्सन आजार झाला की अंग थरथरू लागतं. शरीराच्या हालचाली मंदावतात. शरीरातील स्नायू कडक बनतात. चेहऱ्यावरचे हावभाव कमी होतात. चालताना तोल जाऊन पडण्याची भीती वाटत राहते. एकूणातच हा आजार सहजपणे दिसून येईल असा असतो. वृद्ध मंडळी या आजाराने ग्रस्त असली की सार्वजनिक संपर्क टाळायला बघतात. घरात बसून राहिलं की जास्त हालचाली करायलाही मर्यादा येतात. ही अडचण ओळखून ऋषिकेश पवार या पुण्यातील तरुणाने डान्स थेरपीच्या माध्यमातून रुग्णांना बरं करण्याचं ठरवलं. परदेशात डान्सचं शिक्षण घेतलेल्या ऋषिकेशने २००९ पासून पुण्यातच आवर्तन डान्स फाउंडेशनच्या माध्यमातून पार्किन्सनग्रस्त रुग्णांना मोफत थेरपी द्यायला सुरुवात केली. हजारो ज्येष्ठ नागरिकांना पार्किन्सन आजाराचा विसर पडायला लावून त्यांना सामान्य जगणं जगण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम ऋषिकेश करतोय.

ऋषिकेश हा पुण्यातील रास्ता पेठेत लहानाचा मोठा झालेला तरुण. वडील सैन्यातून निवृत्त झालेले तर आई गृहिणी. शाळेतील अभ्यासात जेमतेम असलेला ऋषिकेश वेगवेगळ्या कला आणि क्रीडा प्रकारांत मात्र लहानपणापासूनच हुशार होता. मराठी कुटुंबातील मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यानंतर सुरुवातीला येणारा बुजरेपणा त्याच्याही अंगी होताच. आपण भलं आणि आपलं काम भलं या कोशातच तो शाळेत वावरत होता. जास्त बोलणं-भाषण नाही. पण डान्स म्हटलं की तो अधिक खुलून जायचा. रेडीओ किंवा टीव्हीवर गाणी लागली की त्याचे पाय अपोआप थिरकू लागायचे. शालेय, आंतरशालेय किंवा जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा असल्या की तो हमखास भाग घ्यायचा आणि बक्षीस मिळवायचा. पुढे एमआयटी कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर तिथल्या चाबूकस्वार मॅडमनी ऋषिकेशमधील कलागुण ओळखले. त्याला थिएटर, कथाकथन, नृत्य अशा विविध कलाप्रकारांकडे वळवलं. त्यांनी ऋषिकेशला शास्त्रीय नृत्य शिकण्याचा सल्लाही दिला. मात्र पुरुष कथक नर्तक म्हणून पुढे करियरला काही स्कोप असेल का हा विचार करून त्याने त्यावेळी कथक शिकण्याचा विचार मनातून काढून टाकला. यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षणही पूर्ण केलं.

हेही वाचा- रंगमंचावरून शोषितांचे प्रश्न मांडणारा तल्हा

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॉडर्न आणि कंटेंपररी डान्समधील उच्चशिक्षण घेण्यासाठी ऋषिकेश जर्मनीला गेला. जर्मनीला जाण्यासाठी कारणीभूत ठरली ग्रेट पालुका या जर्मन डान्सरची ऋषिकेशने पाहिलेली फिल्म. त्या फिल्मने ऋषिकेशला डान्स क्षेत्रात जे हवंय ते जर्मनीत मिळेल असा विश्वास दिला. त्यावेळी महाराष्ट्रात आणि भारतात मॉडर्न आणि कंटेंपररी डान्समधील दर्जेदार उच्चशिक्षण उपलब्ध नव्हतं. शिवाय २०-२२ वर्षांपूर्वी भारतात डान्सकडे करियर म्हणून बघण्याची सवय लोकांना नव्हती. फक्त डान्स करून रोजीरोटी चालणार का असा गंभीर प्रश्नही समोर होताच. या सगळ्याचा सांगोपांग विचार करून ऋषिकेशने जर्मनीला जायचं ठरवलं. डान्समधील आधुनिक शिक्षण घेऊन तो भारतात परतला.

भारतात परतल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात रोहिणी भाटे या प्रसिद्ध कथक नृत्यांगना त्याला भेटल्या. त्यांच्या नृत्याने प्रभावित झालेल्या ऋषिकेशने कथक शिकायचं ठरवलं. त्यावेळी कथक शिकण्यासाठी बहुतांश मुलीच यायच्या. ऋषिकेशला आपण मुलगा आहोत, कथक कसं शिकायचं, लोक काय म्हणतील असे प्रश्न पडायचे. मात्र तरीही त्याने स्वतःची आवड जोपासत रोहिणी भाटे यांच्याकडे प्रवेश घेतला. दोन वर्षं तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वंचित समाजासाठी काहीतरी करावं असं त्याला वाटत होतं. रेणू गावस्कर पुण्यातील बुधवार पेठेत एकलव्य संस्थेमार्फत वंचित आणि अनाथ मुलांसाठी काम करत होत्या. संस्थेतल्या मुला-मुलींना टेलरिंग, ब्युटीपार्लर, सुतारकाम, इलेक्ट्रीशियन, प्लंबिंग अशा प्रकारचे रोजच्या जगण्यात उपयोगी पडतील असे व्होकेशनल कोर्सेस याठिकाणी चालायचे. याच मुलांसाठी डान्स कोर्स सुरू करण्याची इच्छा ऋषिकेशने रेणू ताईंकडे बोलून दाखवली. मुलांनी केवळ छंद म्हणून डान्स न करता स्वतःच्या सर्वांगीण विकासाचं साधन म्हणून त्याच्याकडे बघावं अशी ऋषिकेशची भावना होती. पुढे डान्स प्रशिक्षण सुरू झालं. दरवर्षी काही मुलं-मुली प्रवेश घेऊ लागली. आज त्या संस्थेतून डान्स शिकून बाहेर पडलेली अनेक मुलं डान्स क्षेत्रात चांगलं काम करतायत.

parkinsons dance

यानंतर २००८ साली ऋषिकेशला मार्क मॉरिस या अमेरिकेन माणसाची माहिती मिळाली. त्याच्या डान्स सेंटरमध्ये १९९९ पासून पार्किन्सन पेशंटसोबत काम केलं जायचं. एक-दीड वर्षं हे काम नीट समजून घेतल्यानंतर २००९ पासून ऋषिकेशने पुण्यातील प्रभात रस्ता परिसरात स्वतःचा डान्स स्टुडिओ उभा केला. पार्किन्सन पेशंटना उपचार देण्यासाठी आवश्यक असणारं रीतसर प्रशिक्षण त्याने मार्क मॉरिस यांच्याकडून घेतलं. सुरुवातीला कामात जम बसण्यासाठी पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या काही पेशंटसोबत ऋषिकेशने काम सुरू केलं. पेशंटच्या हालचालींमध्ये जसजसा फरक दिसून येऊ लागला तसतसे त्याच्याकडील पेशंट वाढत गेले. थेरपी सेशनमध्ये पेशंटना ५ डान्स स्टेपच्या माध्यमातून शारीरिक हालचाली शिकवल्या जातात. यामध्ये शरीराला चालना देणे, स्मरणशक्ती जागरूक ठेवण्यासाठी काही कृती करणे, एका स्टेपमधून दुसऱ्या स्टेपकडे जाण्याचा प्रयत्न करणे, तोल सांभाळणे आणि शरीर रिलॅक्स करणे हे प्रकार त्यांच्याकडून करून घेतले जातात. एक ते दीड तासाच्या क्लासमध्ये पेशंट उत्साहाने त्यांना शिकवलेल्या स्टेप्स करतात. अनेक जणांना या क्लासला येऊन १५ पेक्षा अधिक वर्षं झाली आहेत. केवळ पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे तर चेन्नई, बंगलोर, हैद्राबाद या ठिकाणचे शेकडो पेशंट याठिकाणी पार्किन्सन आणि डिमेंशिया सारख्या आजारवर डान्स थेरपी घेत आहेत. या थेरपी सोबत न्यूरोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट यांच्याशी चर्चा करून पेशंटला सुदृढ ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी करता येतील हे ऋषिकेश बघतो.

ऋषिकेश सांगतो, "म्हातारपण आणि त्यात उद्भवणारे आजार हे खूप खर्चिक प्रकरण असतं. त्यामुळे या पेशंटकडून मी डान्स थेरपीसाठी फी घेत नाही. शरीराच्या हालचाली मंदावल्यामुळे आपण कुणावर ओझं आहोत अशी भावना या लोकांमध्ये आलेली असते. काही जणांमध्ये मानसिक आरोग्याचेही गंभीर प्रश्न निर्माण झालेले असतात. अशा प्रसंगी डान्स थेरपीमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. हे लोक फक्त डान्स शिकत नाहीत, त्या जोडीने ते आनंदाने जगायला शिकतात. आपलं सुख-दुख इतरांसोबत शेअर करू लागतात, स्वतःच्या आजाराविषयी अधिक जागरूक होतात. काय करायला हवं आणि काय नको याची त्यांची समज दिवसेंदिवस वाढते. जे पेशंट आधी एकटेपणात दिवस काढत होते, त्यांना आता बरेच जोडीदार मिळाले असून क्लासला येऊन मजा-मस्ती करणं आणि बाहेरच्या आयुष्यातही दिलखुलास जगणं हे त्यांनी शिकून घेतलं आहे."

parkinsons dance

डॉ शोभना तीर्थळी या पुण्यात २००० साली सुरू झालेल्या पार्किन्सन मित्र मंडळाच्या उपाध्यक्ष आहेत. तीर्थळी यांच्या पतीलाही पार्किन्सनचा त्रास होता. ऋषिकेशने या मंडळासोबत २००९ पासून काम करायला सुरुवात केली. ऋषिकेशचं काम जवळून पाहिलेल्या तीर्थळी म्हणतात, "ऋषिकेश हा पार्किन्सन पेशंटसाठी मसीहा किंवा देवमाणूसच आहे. येणाऱ्या प्रत्येक पेशंटची तो घरातल्याप्रमाणे काळजी घेतो. काका, दादा, मावशी, आत्या, आजोबा या नावांनी हाक मारून तो पेशंटला आपलसं करतो. नृत्यावर त्याचं विशेष प्रेम आहे आणि तेच प्रेम तो इतरांमध्ये फुलवतो. डान्स थेरपीमुळे पेशंटच्या हाता-पायांना होणारा कंप कमी झाला. त्याच्या प्रयत्नांमुळे अनेक पार्किन्सन पेशंट डिप्रेशनमधून बाहेर आले. आधी खूप एकटे एकटे राहणारे, आत्मविश्वास नसलेले लोक आता दिलखुलासपणे कुटुंबात आणि मित्रमंडळीमध्ये वावरतात. आमच्या वयापेक्षा निम्म्या वयाचा असणारा ऋषिकेश पार्किन्सन पेशंटच्या आयुष्यात उत्साह आणि सकारात्मकता घेऊन येतोय त्याचं प्रत्येकालाच मोठं समाधान आहे."

शोभना ताईंसारखी भावना असलेले हजारो लोक आणि त्यांचे कुटुंबीय ऋषिकेशशी जोडले गेलेले आहेत. पेशंटला डान्स थेरपी देण्यासाठी तज्ञ डान्सरची टीम काम करते. यातील सर्वांनीच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून डान्स मुव्हमेंट थेरपीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. डान्समधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःची डान्स अकादमी सुरू करून शेकडो डान्सर घडवण्याचं ऋषिकेशचं स्वप्न होतं. मागील १७ वर्षांत हे स्वप्न त्याने पूर्णत्वास नेलं आहे. यापैकी १२ जणांना त्याने त्याच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे.

हेही वाचा- ..आणि सैलानी बाबा दर्ग्यात दुवा सोबत दवाही मिळू लागली..

फक्त डान्स करायला आला म्हणजे झालं असं नाही तर डान्स शिकवता यायला हवा, त्याविषयी बोलता यायला हवं असं ऋषिकेशला वाटतं. त्याच्या क्लासमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील इतर लोकांना मॉडर्न आणि कंटेंपररी डान्समधील नावीन्यपूर्ण प्रकार शिकवले जातात. या डान्स क्लाससाठी मात्र फी आकारली जाते. क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाने शिस्त पाळायला हवी मग ती वेळेची असो किंवा उपस्थित राहण्याची आणि सांगेल त्या गोष्टी करण्याची असा ऋषिकेशचा शिरस्ता असतो. डान्सकडे दुय्यम भावनेने पाहणं ऋषिकेशला मान्य नाही. डान्समुळे आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतात यावर त्याचा विश्वास आहे. डान्स शिकायला येणाऱ्या प्रत्येकामध्ये हा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ऋषिकेश करतोय. समाजातील प्रत्येक घटकाविषयी आस्था असणाऱ्या ऋषिकेशने वस्त्या-झोपडपट्टयांमधील मुलांसाठी, कचरावेचक कष्टकरी महिलांसाठीही डान्स क्लासेस सुरू केले आहेत. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तो यासाठीचा निधी जमवतो. रोजच्या जगण्यातील समस्या विसरून बेभान होऊन लोकांनी नाचावं, स्वतःला व्यक्त करावं ही कल्पना यामागे असल्याचं ऋषिकेश सांगतो.

फोटो क्रेडिट – सेजल मिस्त्री, अमन गुप्ता (आवर्तन डान्स फाउंडेशन)

महत्त्वाच्या व्हिडिओ लिंक्स -

रीदम ऑफ रेजिलीयन्स

https://youtu.be/wPjG0S1EOtY?si=nlIRt7h_NoM33jxo

पार्किन्सन डान्सची १३ वर्षं

https://youtu.be/vhdVMuJ07Mk?si=0GLOE6-Yg_BqXDaT

माझं शरीर जर माझं घर असेल तर

https://youtu.be/M1zJ5GJwKo4?si=lSbKm62U1HFN_ur_

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results