आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

वंचितांच्या जगण्याला अर्थ देणाऱ्या श्यामला चव्हाण

  • शिल्पा दातार
  • 04.11.25
  • वाचनवेळ 5 मि.
eklavya

नाशिकच्या श्यामला चव्हाण या आदिवासी गावं दत्तक घेऊन तिथलं कुपोषण कमी व्हावं यासाठी, स्थलांतर थांबावं यासाठी काम करतात, वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी धडपडत असतात आणि त्याचवेळी दर महिन्याच्या दाभोलकर व्याख्यानमालेत कोणाला वक्ते म्हणून बोलवायचं, याचाही विचार करत असतात.

श्यामलाताईंचे वडील शांताराम चव्हाण हे सेवादलाचे कार्यकर्ते, समाजवादी विचारवंत असून ते सामाजिक चळवळीत सक्रिय असतात. श्यामलाताईंना समाजसेवेचं बाळकडू घरातूनच मिळालं. लहानपणी त्या वडिलांसोबत कार्यकर्त्यांच्या मीटिंग्जना जात. तिथे होणाऱ्या चर्चा मनापासून ऐकत. घरात कार्यकर्त्यांचा गोतावळा, विज्ञाननिष्ठा तर होतीच.

श्यामलाताई सांगतात, "१९८८च्या सेवादलाच्या शिबिरात समता, संस्कार, राष्ट्रवाद, विज्ञाननिष्ठा, श्रमिक कष्टकऱ्यांचे प्रश्र... यांवर चर्चा झाली. त्यात सहभागी आम्ही शिबिरार्थींनी मिळून एक ग्रुप तयार केला आणि आमचं ‘समता आंदोलना’चं काम सुरू झालं.’’

सुरूवातीच्या टप्प्यात समता आंदोलनाने विद्यार्थी प्रश्नांसाठी काम केलं. त्यावेळी नाशिक शहरात एका विद्यार्थ्याने स्टायपेंड पुरत नाही, म्हणून नैराश्याच्या भरात आत्महत्त्या केली होती. या संदर्भाने गरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समजून घेऊन त्यांना मिळणाऱ्या स्टायपेंडची रक्कम वाढवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्याला यश मिळालं. मग हे काम वाढतच गेलं. शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना मनपाच्या शाळेत प्रवेश देणं, त्यांच्या शिक्षणावर देखरेख करणं अशी कामं सुरू झाली.

eklavya

नाशिकच्या सावित्रीबाई फुले वस्तीत काम करत असताना एक गोष्ट श्यामलाताईंना जाणवली, की बऱ्याचदा कष्टकरी मुलांच्या आई-वडिलांना अक्षरओळखही नसते, वस्तीवर राहणारी, पोटासाठी काम करणारी मुलं, झोपडपट्टीतली मुलं प्रतिकूल परिस्थितीत शिकत असतात. अशा परिस्थितीत ही मुलं नुसती पास झाली तरी या मुलांचं यश कितीतरी वरच्या दर्जाचं आहे. त्यांच्या शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी काही करावं, असं श्यामलाताईंनी ठरवलं. त्यावेळी समाजवादी कार्यकर्ते अरुण ठाकूर यांच्यासह त्या या विषयावर बोलण्यासाठी कुसुमाग्रजांकडे गेल्या. त्यांचं म्हणणं ऐकून कुसुमाग्रज भारावले आणि या उपक्रमाला ‘एकलव्य’ असं नाव त्यांनी सुचवलं. 'एकलव्य'ने शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यापासून ते शिकणाऱ्या गरीब मुलांना अर्थसहाय्य मिळवून देण्यापर्यंत अनेक कामं केली.

पुढे १९९२-९३ मध्ये श्यामलाताई पदवीधर झाल्या. त्यांच्या बरोबरीचे चळवळीतील काही कार्यकर्ते पोटापाण्यासाठी नोकऱ्या करू लागले. संघटनेचं काम काहीसं विस्कळीत झालं. मात्र श्यामलाताईंनी १९९५-९६ मध्ये एमएसडब्लू केल्यावर वेगवेगळ्या प्रश्नांवर पुन्हा काम सुरू केलं. सामाजिक क्षेत्रात नोकऱ्या करत असताना रस्त्यावरची मुलं ते आदिवासी, कर्करोग रुग्णालयापर्यंत... अनेक वेगवेगळी क्षेत्रं त्यांनी पाहिली. पेठ तालुक्यात गेल्यावर तिथल्या आदिवासींची जीवनशैली आणि गरिबी पाहून त्यांच्यासाठी काम करावं असं श्यामलाताईंनी ठरवलं. पण त्यांना आयती 'मदत' न देता तिथली गावं खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण करावीत, असा ध्यास त्यांनी घेतला. त्यासाठी पेठ तालुक्यातलं कायरे गाव निवडलं. पेठ हा निफाडसारखा समृद्ध तालुका नाही. पाण्याबरोबरच शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या बाबतीतही वंचित असा हा तालुका. याचवेळी श्यामलाताईंना त्यांचे पूर्वीचे काही सहकारी कार्यकर्ते पुन्हा येऊन मिळाले.

eklavya

आदिवासी समाजाचा आत्मसन्मान कायम ठेवून त्यांच्या कुपोषण, शिक्षण व इतर प्रश्नांवर काम करायचं, असं त्यांनी ठरवलं. या आदिवासींना शहरी व्यवहार कळत नसल्याने त्यांचा गैरफायदा घेतला जातो, असं त्यांच्या लक्षात आलं. पाड्यावरचं कोणी आजारी पडलं तर, झोळीत घालून मुख्य रस्त्यावर यायचं आणि वाहनानं रुग्णाला आरोग्य केंद्रात घेऊन जायचं, ही तिथली परिस्थिती होती. बालविवाह सर्रास होत. लहान वयातली कुपोषित आई कुपोषित बाळाला जन्म देते हे दुष्टचक्र नित्याचंच. त्यामुळे त्यांना शहरातून आणून ‘आयतं’ पौष्टिक खाद्य पुरवण्याऐवजी त्यांच्या परसबागांमध्ये भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी श्यामलाताई आणि सहकाऱ्यांनी आदिवासींसोबत काम केलं. कायरे गावात बहुतांश लोकांची शेती कोरडवाहू असल्याने पावसाळ्यात भात, नाचणी, वरई, तुरी ही पिकं घेतली जातात. पावसाळ्यानंतर हे लोक रोजंदारीसाठी शहरात येतात.

श्यामलाताई त्यांचा अनुभव सांगतात, ‘‘नाशिक ते पेठ एसटीने जात असताना उलट्या दिशेनं टपावर बोऱ्या टाकलेल्या ट्रॅक्स चाललेल्या दिसायच्या. एकदा उमराणे फाट्यापासून त्या मोजल्या तेव्हा ६५ भरल्या. हे स्थलांतर पाहून वाईट वाटायचं. ते रोखण्यासाठी गावातच रोजगारनिर्मिती करायला हवी. त्यासाठी डॉ. अभय बंग यांचं मार्गदर्शन घ्यायला गेले तेव्हा ते म्हणाले, ‘कितीही तळमळीने काम केलंत तरी तुम्ही त्यांच्यासाठी ‘आऊटसायडर’ आहात याची जाणीव ठेवा. तिथल्याच लोकांना तयार करा. केलेलं काम बाहेर पोहोचेल, याचीही काळजी घ्या.’ डॉ. बंग यांचा सल्ला ऐकल्यावर नवी दिशा मिळाली.’’

त्यानंतर त्यांनी कायरेसह सावरणा, झरी, बोरीची बारी, मोहाचा पाडा, कुंभाळे ही आजूबाजूची सहा गावं दत्तक घेतली. गावांमध्ये काम करताना परंपरा आणि नवीन तंत्रज्ञान याचा मेळ कसा घालता येईल, हा विचार करून आदिवासींना आधुनिक शेतीचं प्रात्यक्षिक दिलं. सुधारित बियाणं, गांडुळ खतासाठी डेमो प्लॉट तयार केले. या गावांमधील ६०० महिलांना एकत्र करून त्यांचे व्यवसायानुसार ४१ गट केले. यात शेळीपालनासह भात उत्पादन, गांडुळखत निर्मिती, जीवामृत, दशपर्णी अर्क असे सध्याच्या बाजारपेठेत मागणी असलेले अनेक व्यवसाय आहेत. त्याची प्रशिक्षणंही दिली गेली. ‘ग्रामसंघ’ या नावाने सहा गावांच्या व्यवसाय संघटना तयार केल्या. इथल्या महिला हळूहळू अर्थकारण, गुणवत्ता, सातत्य, सादरीकरण शिकायला लागल्या. त्यांनी तीन राईसमिल चालू केल्या. इथला तांदूळ प्रसिद्ध असल्याने त्याला मागणी वाढू लागली.

eklavya

या व्यवसायांना बाजारपेठ हवी, तरच त्याला ‘अर्थ’ आहे, हे लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठातील मुग्धा कर्णिक यांनी श्यामलाताईंना गावातली उत्पादनं मुंबईला घेऊन येण्याची कल्पना सुचवली. मग काय या बायांना घेऊन श्यामलाताईंनी मुंबई विद्यापीठात एक सहलच काढली. त्यानंतर डोंबिवलीतील कृषी महोत्सवातही भाग घेतला. त्यातून नाशिकमध्येही ‘आपला बाजार’ हा उपक्रम सुरू केला. या रसायनविरहित भाजीपाला आणि धान्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कोविडच्या लॉकडाऊनच्या काळातही ‘आम्हाला घरपोच शेतमाल, भाजीपाला, हातसडीचा तांदूळ द्याल का,’ अशी विचारणाही झाली. तसंच रसायनविरहित शेतमालाचं शहरी लोकांना महत्त्व समजल्यामुळे नाशिक आणि मुंबईतूनही मागणी वाढली.

हे करत असतानाच श्यामलाताई निसर्गनिर्मित, मानवनिर्मित आपत्तींमध्ये धान्य, कपडे अशा आवश्यक बाबी तिथं पुरवतात. विद्यार्थ्यांना समतेचे धडे देतात. त्यांच्यात रमतात. तरूण पिढीलाही संविधान, नागरिकांचे हक्क याविषयी जागरूक करत असतात. त्यांच्यात संवेदनशील नागरिक होण्याची बीजं पेरत असतात. नाशिकमधील दर महिन्याच्या २० तारखेला होणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेतही श्यामलाताई सक्रिय असतात. ही व्याख्यानमाला लॉकडाऊनमध्येही थांबली नव्हती, ऑनलाईन सुरूच होती.

‘तुम्ही काम करत आहात तर त्याचा परिणाम दिसायला हवा’, हे तत्व घेऊन श्यामलाताई काम करत आहेत, करत राहतील.

शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com

शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results