आम्ही कोण?
ले 

झपाटलेले बाबा

  • अनिल अवचट
  • 09.12.25
  • वाचनवेळ 20 मि.
baba adhav

अगदी तरुणपणातच मला बाबा आढाव भेटले. ते भेटले नसते तर समाजातल्या उपेक्षित घटकांबद्दल मी जे लिहिलं ते लिहून झालं नसतं. मला हे समाज कळले नसते, तर त्या समाजांमध्ये प्रवेशही मिळाला नसता. बाबांची भेट होण्याआधी मी बिहारला गेलो होतो. तिथलं भयाण दारिद्य्र पाहिलं होतं. पण ते पाहणं लांबून होतं. त्या समाजाचा मी भाग होऊ शकलो नव्हतो. ते इथे बाबांमुळे घडलं.

मी आणि सुनंदा लग्न करून नाना पेठेत राहायला गेलो होतो. तिथल्या हमालांसाठी, इतर कष्टकऱ्यांसाठी सुनंदाने दवाखाना सुरू केला होता. या दवाखान्यासाठी जागा दिली ती बाबांनी. त्यांच्या राहत्या घरातलीच. त्याच्या समोरच्या चाळीत त्यांनी आमची राहण्याची सोय केली. त्यामुळे आम्ही दोघं अगदी तरुण वयातच बाबांच्या परिवाराचा भाग झालो, आणि त्या वस्तीतल्या कष्टकऱ्यांच्याही. त्यांची सुखं-दुःखं त्यांच्याबरोबर अनुभवली.

सुनंदाच्या दवाखान्याच्या मागची खोली बाबांची. तिथे फोन होता. वस्तीतले अनेक गोरगरीब गाऱ्हाणी घेऊन यायचे. मी अनेकदा बाबांसोबत तिथेच बसलेला असायचो. वस्तीतल्या लोकांच्या एक ना अनेक तक्रारी. पोटमाळ्यावरचा भाडेकरू मालकाने त्याला कारण न देता हुसकावून लावलं असं सांगायचा. त्याचं म्हणणं ऐकून बाबा उसळून उठायचे. थेट त्या मालकाला भेटून यायचे. प्रश्नाचा निचरा केल्याशिवाय ते स्वस्थ बसायचे नाहीत. एकदा वस्तीतला एक माणूस सीरियस झाला. त्याला ससूनला न्यायला ॲम्ब्युलन्स मिळेना. गाड्या तर कुणाकडेच नव्हत्या. तो भाग हमालांचा आणि गोदामांचा. रस्त्याकडेला पोती वाहणारी हातगाडी उभी होती. बाबांनी त्यावर या माणसाला निजवलं आणि ते स्वतः हातगाडी ओढू लागले. ते पाहून बाकीचे धावून आले. त्यांनी बाबांना बाजूला करून त्या माणसाला ससूनला पोचवलं.

बाबांची तब्येत दणकट होती. सणसणीत सहा फूट उंची. नाकेला तरतरीत चेहरा. आमच्या एवढ्या वर्षांच्या सहवासात ते कधी आजारी पडल्याचं आठवत नाही. नेहमी हसतमुख, प्रफुल्ल. त्यांना ८५ वर्षं पूर्ण झाली तेव्हा शुभेच्छा देण्यासाठी मी फोन केला होता. मला म्हणाले, “अनिल, ८५ म्हणजे काम करायला अजून दहा वर्षं मिळतील.” मी थक्क! सत्तरीतच मी थकलेला आणि त्यांची ही घोडदौड. कोरोनाची साथ आली आणि लॉकडाऊन लागला. गरिबांना कामधंद्याविना घरी बसावं लागलं. हातावर पोट असणाऱ्यांची दैना झाली. पुण्यात याविरोधात पहिला आवाज उठवला तो बाबांनी. कुठल्याही कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी बाबाच सगळ्यात पुढे असतात. एवढी एनर्जी ते कुठून आणतात कोण जाणे!

..तर आम्ही त्यांच्यासमोर राहायचो. तेव्हा तर त्यांचा उमेदीचा काळ होता. ते महाराष्ट्रात कुठे कुठे एसटीने फिरायचे. रात्री अपरात्री यायचे-जायचे. त्यांच्या पत्नी शीलाताई नर्स होत्या. त्या सकाळी उठून कामाला जात. त्यानंतर बाबा घराच्या चौकात कपडे धूत बसायचे. धुऊन दोऱ्यांवर वाळत टाकलेले ते शुभ्र कपडे मला अजून आठवताहेत. संध्याकाळी दवाखान्यात आल्यावर पाहावं तर बाबांची वळकटी पुन्हा तयार. आदल्या दिवशी कुठून आले, तर अमरावतीहून. आता कुठे चालले, तर निपाणीला. तिथल्या बायकांचं काही प्रकरण उद्भवलंय, ते जाऊनच समजून घ्यायला हवं, असं म्हणत. सगळ्या रातराण्या यांना प्रसन्न. ते कुठूनही येऊन कुठेही जाऊ शकत. त्या वेळी सगळ्या गावांमध्ये थेट गाड्या तरी होत्या का? कसलं काय! पण या गाडीने चौफुल्यापर्यंत जाऊ, तिथे दुसरी गाडी पकडू, असं सहज म्हणत. एसटी गाड्यांची अवस्था तर अशी की प्रवासात पाठ खिळखिळी होऊन जाई, पण बाबांच्या चेहऱ्यावर त्याचा मागमूसही नसे. जणू पुण्यातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालल्यासारखे ते गावांची नावं घेत. पुढे या प्रवासांमध्ये अनेकदा मीही त्यांच्याबरोबर असायचो. त्यामुळे हे प्रवास किती खडतर असतात याची मला नीटच कल्पना आली.

त्यांच्याच वस्तीत जाऊन राहिल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा गोतावळा आमचा झाला. आम्ही राहत होतो ती खोली बाबांची बहीण इंदुताई आणि त्यांचे पती श्यामकांत मोरे यांची. ते त्याच गल्लीत राहायचे. गरीब पण सुसंस्कृत घर. आम्ही अनेकदा त्यांच्याकडे जेवायला जायचो. कोपऱ्यावर झेंडेंचा वाडा होता. हे बाबांचे सख्खे मामा. त्यांचा मुलगा मधुकर मुंबईला पोलिस इन्स्पेक्टर होता. चार्ल्स शोभराजला पकडल्यामुळे त्या वेळी त्याचं नाव झालं होतं. या सगळ्या मंडळींनी आम्हाला आपलं मानलं. लहानपणी गांधीहत्येनंतर आमच्या ओतूरला जाळपोळ झाली होती. त्यामुळे मराठा जातीचं भय वाटत असे- बहुतेक वर्गमित्र मराठा असूनही. पण बाबांच्या या कुटुंबात प्रवेश झाला आणि ते भय पळालं, परकेपणा दूर गेला. बाबांच्या आईने, ‘बाई'ने सुनंदाला मुलगी मानलेलं. त्यामुळे मी जावई झालो. आम्हाला प्रेमाने जेवू घालणारी बाबांची बहीण यमाताई माझी बहीण झाली. अशी सगळी नाती होती.

baba adhav

बाबा घरात फार रमायचे नाहीत. त्यांचे उद्योगच फार. त्यामुळे घरच्यांच्या अपेक्षाही जेमतेमच. सुरुवातीला ते हमाल पंचायतीचं आणि नंतर झोपडी संघाचं काम करत. तेव्हा महानगरपालिकेचे लोक ट्रक घेऊन येत आणि झोपड्या उठवत. त्या वेळी बहुतेक झोपड्या बांबू आणि पत्रे ठोकून उभारलेल्या असायच्या. त्या मोडायला किती वेळ लागणार? आतला ऐवजही मामुलीच. मग बाबा आणि त्यांचे सहकारी कल्याणकर, चिल्लाळ वगैरे मंडळी तिथे धाव घेत असत. त्यात कित्येकदा मीही असे. मग पोलिस आम्हाला अटक करून जवळच्या पोलिस स्टेशनच्या आवारात नेऊन उघड्यावर बसवत. दुपारी कुणी भेळभत्ता आणत असे. त्याचा फडशा. आम्हाला जेवण द्यावं लागू नये म्हणून विशिष्ट वेळेच्या आधीच सोडून देत असत. आम्ही परत वस्तीवर. तिथे लोक पुन्हा झोपडी उभारणीच्या कामाला लागलेले असत. काही तासांपूर्वीचं नांदतं घर उद्ध्वस्त झालेलं असे. घराच्या जागी फक्त चिखल उरलेला असे. त्या लोकांच्या पाठीशी असत ते बाबाच.

कधी कधी मात्र वेगळाच प्रसंग बघायला मिळे. बाबा एकदा परगावाहून आलेले. दुपारची वेळ. जेवल्यावर मी म्हटलं, ‘तुम्ही झोपा आता. मी फोन घेईन. निरोप घेऊन ठेवेन.'

बाबा झोपले असताना एक माणूस आला. विचारलं, ‘बाबा कुठे आहेत? '

मी सांगितलं, ‘जरा झोपलेत.'

तो माणूस उसळून म्हणाला, ‘झोप घेताहेत? अरे वा रे वा! तिकडे आमचा घरमालक येऊन बसलाय उरावर, आणि हे खुशाल झोपलेत? यांना पत्ते खेळायला वेळ आहे! पत्त्यात इस्टेट घालवली यांनी..' असं खूप काय काय.. मी थक्क. ते गावाहून थकून आलेत, वगैरे सांगायचा मी प्रयत्न केला, तरी तो बोलतच राहिला. वाटलं, माणसं आपल्या समस्यांपुढे कशी क्रूर होतात. बाबांसारख्या कार्यकर्त्याला दुपारच्या विश्रांतीचीही परवानगी नसावी? मला खात्री आहे, बाबांनी त्या माणसाचा शब्द ऐकला असता तर ते तसेच त्याच्यासोबत धावत गेले असते.

आणि हा पत्त्यांचा संदर्भ कुठून आला? बाबांच्या घराशेजारी एक सॉ-मिल होती. दिवसभर तिथे काम चालायचं, संध्याकाळी शांतता. त्या वेळेला चार-पाच सीनियर मंडळी त्या आवारात खुर्च्या टाकून पत्ते खेळत बसत. त्यात सॉ-मिलचे मालक परदेशी, बाबांचे थोरले भाऊ अण्णा अशी मंडळी असत. कधी कधी बाबाही जात. कुणी तरी हातातला डाव त्यांना देत असे. एक-दोन उताऱ्या होताहेत तोवर घरून फोन आल्याचा निरोप यायचा, की डाव दुसऱ्याकडे सोपवून चालले बाबा लढाईला. पत्त्याच्या खेळात ते कधीच पैसे लावत नसत. पैसे होतेच कुठे त्यांच्याकडे? चांगली प्रॅक्टिस सोडून हे व्रत हाती घेतलेलं. पैसे कुठून येणार? पण थोडा विरंगुळा म्हणून ते खेळत. त्याचा हा विपर्यास. काय म्हणावं?

हळूहळू बाबांचं कार्यक्षेत्र बदलू लागलं. त्यातलं एक म्हणजे धरणग्रस्तांची चळवळ. त्यात ते, दत्ता देशमुख, एन. डी. पाटील असे एकत्र होते. त्या काळी सरकारने धरणांच्या कामांचा सपाटाच लावला होता. त्या धरणांसाठी गावंच्या गावं विस्थापित होत होती. पाण्याखाली जाणाऱ्या गावांमध्ये नोटिसा लागायच्या. वर्षानुवर्षं त्या गावात राहत आलेली माणसं अचानक बेघर व्हायची. अनेकदा ते डोंगरदऱ्यांत राहणारे आदिवासी असायचे, शहराचा कायदा न कळणारे. निसर्गाशी एकरूप होऊन राहणारे आदिवासी. आडमाप वाढणाऱ्या शहरांच्या पाण्यासाठी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जायचं. मला प्रश्न पडायचा, विस्थापन नेहमी गरिबांचंच का होतं? धरणासाठी कधी दहा-वीस मजली इमारती का भुईसपाट होत नाहीत? गावं उठतात तेव्हा काय होत असेल? मी मोडलेली गावं पाहिलेली होती. पण एखादं गाव असं उठताना पाहिलं नव्हतं. मी बाबांना तसं बोलून दाखवलं. त्यांनी लगेच व्यवस्था केली. पानशेतच्या पुढचं गाव होतं. गावात माणूस गेलेलं असावं अशी रडारड चालली होती. एक माणूस दारातल्या आंब्याच्या झाडावर कुऱ्हाडीचे घाव घालत होता. म्हणाला, “राकूस झालूया. धा वर्सापूर्वी स्वतःच्या हाताने लावलेलं झाड हाय. आज पोटच्या पोरावर घाव घालतोय असं वाटतंया.” एकीकडे राज्याचा विकास सुरू होता. त्या विकासाची दुसरी बाजू मला बाबांमुळे कळत होती.

एका आंदोलनाने तर बाबांच्या जीवनाची दिशा बदलली. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचीच दिशा बदलली असावी. मी दवाखान्यामागच्या खोलीत बसलो होतो. बाबा बाहेरून दमून आले. आधी अंघोळ केली. मग जरा वेळाने म्हणाले, “आज बायांनी पराक्रमच केला.” जुन्नरजवळच्या येडगाव धरणाच्या बांधकामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते होणार होतं. कार्यक्रमाला गर्दी जमली होती. काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. एका बाजूला गावांमधल्या बाया बसल्या होत्या. ज्यांची गावं पाण्याखाली जाणार होती त्या बाया. कार्यक्रम सुरू झाला आणि त्या अचानक उठून भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे धावत सुटल्या. तिथलं सगळं पूजासाहित्य त्यांनी उधळून दिलं. तोंडाने घोषणा सुरू होत्या, ‘आधी पुनर्वसन, मग धरण!' कार्यक्रम उधळला गेला. सर्वांनाच हे अनपेक्षित होतं. राजकारणाला हा धक्का होता. सत्तेतल्या मराठा शक्तीला हे मोठंच आव्हान होतं, आणि तेही गावगाड्यातल्या सर्वसामान्य मराठा जातीकडूनच मिळालेलं. यशवंतरावांनी ते सारं संयमाने घेतलं. ते एवढंच म्हणाले, ‘ज्याच्या पोटात दुखतं तो ओवा मागतो.' पण या प्रकरणानंतर पुढे धरणग्रस्तांचा आवाज बळकट होत गेला आणि सरकारला धरणग्रस्तांसाठी कायदा करावा लागला. आधी पुनर्वसन, मग धरण. पुनर्वसन लाभक्षेत्रातल्या जमिनीवर व्हावं, अशा अनेक तरतुदी त्यात घातल्या गेल्या. सगळ्याची अंमलबजावणी होते असं नाही. ती व्हावी यासाठी कार्यकर्त्यांना लढे द्यावे लागतात हेही खरं. पण बाबांनी पेटवलेल्या ठिणगीमुळे एक पाऊल पुढे पडलं.

पण एक बरं झालं, बाबांच्या बाबतीत राजकारणात प्रवेश हा विषय बाजूला पडला. खरं तर बाबांची जात मराठा. राजकारणाला अनुकूल. जवळचं कोणी आमदारही होतं. समाजवादी पक्षाच्या आदेशामुळे बाबा एकदा लोकसभेला खेड मतदारसंघात लढले आणि पडले. पण काँगेसमध्ये गेले असते तर स्थान मिळण्याची शक्यता होती. पण या प्रकरणाने ती संपली. थेट यशवंतरावांची नामुष्की म्हणजे काय!

बाबा हळूहळू सामाजिक विषयांकडे वळले. महाराष्ट्रात ते सतत फिरत असायचे. कुठे तरी काही तरी अन्याय पाहून आले की ते पेटून उठायचे. सोबत्यांसोबत चर्चा व्हायच्या आणि बाबा थेट उपक्रमात उडीच घ्यायचे. ‘एक गाव एक पाणवठा'चं आंदोलन असंच सुरू झालं. बाबांनी आम्हाला त्याबद्दल सांगितलं, तेव्हा मला वाटत होतं, अस्पृश्यता-भेदभाव वगैरे प्रश्न आता संपलेत. हे आंदोलन कालबाह्य ठरेल. पण तसं नव्हतं. अनेक गावांमध्ये दलितांसाठी वेगळ्या विहिरी होत्या. त्यांना गावच्या विहिरींवर पाणी भरायला परवानगी नव्हती. ती मिळवण्यासाठी बाबांना, त्या गावच्या दलितांना मोठा संघर्ष करावा लागला. या मोहिमेत बाबांबरोबर काही ठिकाणी मी गेलो. दलितांना विचारलं, “पाणी मिळतं का? काही त्रास आहे का?” तर ते म्हणायचे, “आम्हाला काही तरास नाही.” “गावाच्या विहिरीवरून पाणी घेऊ शकता का?” “घेऊ शकतो की.” “मग चला, आपण बादलीभर पाणी काढू या”, असं म्हटलं की त्यांचा चेहरा बदलायचा. “नको, कशाला उगाच वाकड्यात जायचं?”, असं म्हणत टाळाटाळ सुरू व्हायची आणि मग खरी परिस्थिती पुढे यायची. अन्याय फक्त पाण्यापुरता नसायचा. अनेक ठिकाणी सवर्णांनी दलितांच्या जमिनी बळकावलेल्या असायच्या. कुठेे मारहाण झालेली असायची. नाना प्रकरणं बाहेर निघायची. बाबांमुळे मला महाराष्ट्राचं हे आतलं खरं रूप अनुभवायला मिळालं.

मी त्या वेळी ‘साधना' साप्ताहिकाचा संपादक होतो. बाबा अशा एखाद्या संघर्षाच्या ठिकाणाहून जाऊन आले की मी त्यांना त्याबद्दल लिहिण्याचा आग्रह करायचो. बाबा खरं तर सतत कामात अडकलेले. लिहिण्यासाठी स्वस्थपणा कुठे होता? पण माझ्यासारख्या छोट्या सहकाऱ्याच्या आग्रहाखातर त्यांनी जवळपास दोन वर्षं ‘साधने'त लिहिलं. त्यातून महाराष्ट्र ढवळून निघाला. त्या लेखांचं पुस्तक करायचं ठरवलं. तो आणीबाणीचा काळ. बाबा तुरुंगात होते. त्यांची परवानगी घेतली आणि ‘मौजे'च्या श्री. पु. भागवतांना प्रकाशनासाठी विचारलं. त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं. त्यातल्या बारीक बारीक गावांची नावं, माणसांची नावं मला माहीत असल्यामुळे प्रुफं तपासायचं काम मीच केलं. माझा चित्रकार भाऊ सुभाषने छान कव्हर केलं. पुस्तक आलं तेव्हाही बाबा तुरुंगातच होते. त्यांना तिकडेच ते नेऊन दिलं. ‘एक गाव एक पाणवठा' हे ते पुस्तक. आज मराठीतल्या सामाजिक साहित्यातलं ते महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं.

त्याच सुमारास बाबांनी ‘म. जोतिराव फुले समता प्रतिष्ठान' ही संस्था काढली. हमाल पंचायतीचं काम जोरदार चालू होतंच. ते काम चालवायला बाबांच्या तालमीत माणसं तयार झाली होती. आपली संस्था चालवून हेच हमाल कार्यकर्ते आता प्रतिष्ठानच्या कामातही मदत करू लागले. बाबांनी ‘पुरोगामी सत्यशोधक' हे संस्थेचं त्रैमासिक मुखपत्रही काढलं. ते काढलं आणि त्यांना आणीबाणीत अटक झाली. त्यामुळे ते काम माझ्याकडे आलं. पुढची २० वर्षं मी ते सांभाळलं. या त्रैमासिकाला आर्थिक बेस काहीच नव्हता. फक्त दोन जाहिराती. एक हमाल पंचायतीची आणि दुसरी ताहेर पूनावालांची. पण तरी अंक निघाले. अजून निघतात. आता संपादक वेगळे आहेत. बाबांनी या मुखपत्रात भरपूर लिहिलं. रा. स्व. संघावर टीका करणारा ‘संघाची ढोंगबाजी' हा प्रदीर्घ लेख. ‘मराठा जात खरोखरीच बहुसंख्य आहे का?' असा एक लेखही त्यांनी लिहिला होता. मराठ्यांना राजकारणाशिवाय काही दिसत नाही. विद्वत्ता, चित्रकला, संगीत, सिनेमा अशा क्षेत्रांत ते का दिसत नाहीत, असा प्रश्न त्यांनी त्या लेखात विचारला होता.

या अंकाचं ऐतिहासिकदृष्ट्याही एक महत्त्व होतं. बाबांनी महात्मा फुले यांच्या छायाचित्राची एक अस्सल निगेटिव्ह मिळवली होती. काचेची होती ती. ती आम्ही ‘सत्यशोधक'च्या कव्हरवर छापली. पुढे त्या निगेटिव्हला बुरशी लागून त्याचा खालचा भाग खराब झाला. वरचा राहिला. तोच महाराष्ट्र शासनाने ‘समग्र फुले' ग्रंथावर छापला. बाबा असं कुठून कुठून काय काय मिळवायचे. कागदपत्रं, फुलेंच्या वेळच्या पुस्तिका, पत्रं, वर्तमानपत्रांची कात्रणं असं बरंच काही. फारच दुर्मिळ होतं ते. मी पु. ल. देशपांडेंना हे सांगताच त्यांनी अरुण आठल्ये या मित्राला सांगून सगळ्याच्या झेरॉक्स करून त्या बाइंड करून दिल्या. या सामग्रीचा आधार पुढे अनेक अभ्यासकांनी घेतला.

य. दि. फडके यांनी त्यावरूनच ‘दिनकरराव जवळकर समग्र ग्रंथ' संपादित केला. सीताराम रायकर यांनी ‘कृष्णराव भालेकर समग्र ग्रंथ' काढला. सदानंद मोरे यांनी भगवंतराव पालेकर ग्रंथ संपादित केला. ही सर्व सत्यशोधक चळवळीतली कर्ती माणसं होती. असे आणखीही काही. नंतर त्या साहित्याचा अनेक देशी-विदेशी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. शिवाय जोतिरावांचं

‘तृतीय रत्न' हे नाटक आणि ‘आम्ही पाहिलेले फुले' या समकालीनांनी लिहिलेल्या आठवणी ही दोन पुस्तकंही बाबांनी उत्खनन करून जगापुढे आणली. महाराष्ट्राच्या इतिहासाला त्यांचं केवढं तरी योगदान आहे!

आपल्याकडे ब्राह्मणांसंबंधित इतिहास लिहिला गेला आहे. कारण ब्राह्मणांमध्ये कागदपत्रं जतन करण्याची वृत्ती होती. त्यामुळे इतिहासाची साधनं उपलब्ध व्हायची. पण बहुजन समाजाचा इतिहास मात्र दुर्लक्षित राहिला होता. महात्मा फुले, सत्यशोधक चळवळ यांची कागदपत्रं मिळायची वानवा. त्यांचे वंशज म्हातारे झालेले. कागदपत्रांबद्दल विचारलं, की म्हणायचे. ‘माळ्यावर पडली होती रद्दी, दिली फेकून.' पण बाबांनी एकेक माणूस शोधून शक्य तितकी कागदपत्रं मिळवली. शिवाय मराठा बुजुर्गांकडे असणारी कागदपत्रं ते ब्राह्मण संशोधकांकडे द्यायला उत्सुक नसायचे. तोही तिढा बाबांनी सोडवला. जोतिरावांनी लिहिलेलं ‘तृतीय रत्न' नाटक आम्ही ‘सत्यशोधक'च्या अंकात छापलं. पुढे शासनाने ते समग्र वाङ्मयात समाविष्ट केलं. ‘आम्ही पाहिलेले फुले' हा तर अस्सल दस्तावेज होता. तोही आधी सत्यशोधकमध्ये छापून आला, नंतर त्याची पुस्तिका झाली. त्याचं संपादन बहुतेक सीताराम रायकरांनी केलं होतं. महात्मा फुलेंचं एवढं अस्सल वर्णन मिळालं की बस्स. पुढे खूप वर्षांनी मी महात्मा फुलेंवर लेख लिहिला तो या लेखांच्या आधारेच. जोतिबांचा उमदेपणा त्यातून समोर येत होता. इतकी वर्षं झाली तरी वाचक त्या लेखाची आठवण काढतात.

जातील तिथे बाबांना विषय दिसायचे. गावांमध्ये पाणवठे एक नाहीत, हे बाबांनी सांगण्याआधी कुणाला माहीत होतं? तसाच देवदासींचा विषय. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात देवाला मुली वाहिल्या जात. ती प्रथा आता संपली असंच सारे मानून होते. पण बाबांनी या प्रथा सुरू असल्याचं समोर आणलं. कधी तरी ते एसटीतून प्रवास करताना त्यांच्या बसमध्ये जोगतिणी बसल्या होत्या. त्यांचा माग घेत, तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलत बाबा या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोहोचले. त्याविरुद्ध आंदोलन केलं. बायका देवीच्या कोपाला घाबरत. पण बाबा आणि कार्यकर्ते गावोगाव फिरले, बायकांशी बोलले आणि गडहिंग्लजला पहिली परिषद झाली. देवदासी येतील की नाही याबाबत शंका होती. पण चक्क ४८ देवदासी आल्या. त्यातूनच आम्हाला गौराबाई सलवादे या कार्यकर्त्या मिळाल्या. मग असा जोर, की विचारू नका. पुढच्या वर्षी निपाणीला परिषद. त्याला १०० देवदासी हजर होत्या. पुढच्या पिढीतल्या मुलींना देवाला सोडायचं नाही, असा ठराव झाला. वाढलेली जट हे देवीचं लक्षण असं मानलं जात होतं. ती जट कापली-सोडवली तर कोप होतो अशी अंधश्रद्धा होती. बाबांनी एका मुलीची जट भर सभेत सोडवली आणि भीती घालवली. पुढे गडहिंग्लजला डॉ. रासकर यांनी ‘जटा निर्मूलन' हा कार्यक्रम घेऊन हजारो देवदासींची जट उतरवली. त्या आधी कार्यकर्ते देवदासींना समजवायला जायचे, तर त्या कान झाकून घ्यायच्या. म्हणायच्या, “तुम्ही सांगू नका. तुमची जीभ झडंल. आम्ही ऐकत नाही. आमचे कान झडतील. जट कापली तर तिथून रगत वाहायला लागंल.” बाबांच्या आंदोलनानंतर त्याच देवदासी जटा काढून घेण्यासाठी गर्दी करू लागल्या. मी या आंदोलनात बाबांबरोबर होतो. त्यामुळे सगळं समोरासमोर अनुभवलं आणि पुढे त्यावर लिहिलंही. देवदासींचा प्रश्न समाजापुढे आणण्याचं केवढं मोठं काम बाबांनी केलं!

गावाखेड्यांतले असे विषय बाबांपर्यंत पोहोचायचे याला अनेक कारणं होती, पण त्यातलं एक मुख्य कारण होतं त्यांचा लाल डब्याचा प्रवास आणि शेजाऱ्याची चौकशी करण्याचा स्वभाव. जो भेटेल त्याच्याशी गप्पा मारण्याच्या स्वभावामुळे त्यांच्याकडे कायम किस्से असत. ते सांगतही गंमतशीर, त्या माणसाचा बरोबर हेल काढून. बाबा डॉक्टर. खूप वर्षांपूर्वी हडपसरला त्यांचा दवाखाना होता. तिथे आसपासच्या खेड्यापाड्यांतल्या बायाबापड्या औषधाला यायच्या. बाबा त्यांच्या इतक्या गमती सांगायचे की आम्ही हसून लोळायचो. एकदा बोटा या गावी आमचं शिबिर होतं. आम्ही आग्रह करून बाबांना बोलतं केलं. त्या रात्री त्यांनी इतक्या नकला केल्या, इतकं हसवलं की बस्स. सासू-सुनेतला छुपा दुस्वास, सासूबाईंचं ठसकेदार बोलणं, बाप्यांची मुजोर भांडणं, असं खूप काही. ग्रामीण लोकसाहित्यच होतं ते. पण खूप आग्रह करूनही त्यांनी ते कधी लिहिलं नाही. भाषणातही ते असेच मजेदार संवाद पेरत. फेट्यातली, टोपीतली माणसं, लुगड्यातल्या बायका खदाखदा हसत. बाबा एरवीही मैफल छान रंगवत. आणीबाणीत तुरुंगामध्ये संध्याकाळी सातला जेवणं झाली की गप्पांना मोकळं रान.

बाबांचं त्या काळातलं गाजलेलं आणखी एक आंदोलन म्हणजे नामांतर आंदोलन. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, या मागणीसाठी आम्ही लॉँग मार्च काढून चालत गेलो. मी शिक्रापूरपर्यंत होतो. बाबांना नगर जिल्ह्याच्या सीमेवर सुपे इथे अटक झाली. त्याआधी की नंतर मुंबईला मोर्चा काढला. तिथेही आम्हा सगळ्यांना अटक झाली. आठ-दहा दिवसांचा तुरुंगवास मिळाला. नंतर नागपूरला मोर्चा. आणखी कुठे. बाबांनी कायमच दलितांच्या प्रश्नांसाठी जमेल त्या पद्धतीने लढा दिला. राजकीय पक्षांचा फक्त दलितांच्या मतांवर डोळा होता. पण बाबांची गोष्टच वेगळी. अपरात्री प्रवास, संघर्ष, तुरुंगवास.

माझं ‘कोंडमारा' हे पुस्तक प्रामुख्याने दलित अत्याचारांच्या कहाण्या सांगतं. ते पुस्तक मी लिहू शकलो याचं कारण बाबाच. त्यांच्या संघर्षात सोबत असल्यामुळेच हे वास्तव मला कळलं. बाबांना कुठून कुठून एक साधं पोस्टकार्ड यायचं. त्यावर वेड्यावाकड्या अक्षरांत लिहिलेलं असायचं- असा असा अत्याचार झालाय किंवा ‘लई जुलूम' झालाय; आमचं कुणी नाही, मदत करा. बाबा कार्ड हातात पडल्या पडल्या निघायचे. मग ते गाव मराठवाड्यातलं असो किंवा विदर्भातलं. कोण होते ते? अत्याचार झालेली माणसं बाबांची कोण लागत? ओळखीची? नातेवाईक? मतदार? कोणीही नाही. पण अन्याय झाल्याचं कळल्यावर त्यांना राहवायचं नाही. गाड्या बदलत ते त्या अनोळखी गावात पोचत. पहिल्यांदा दलित वस्तीत. तिथे लोक घाबरत घाबरत जमायचे. आधी तोंड बंद. हळूहळू धीर येणार. त्यांचं ऐकून घेतलं की सवर्ण वस्तीत. तिकडेही लोक वाट पाहत असायचेच. खडाजंगी होणार असं वाटायचं; पण बाबा आवाज चढवून असं काही बोलायचे की बाकीच्यांची बोलती बंद. एका गावी एका दलित कार्यकर्त्याचा खून झाला. दलितांनी दुसऱ्या पार्टीला मतं टाकली ती याच्या सांगण्यावरून, याचा राग मनात होता. ही बातमी कळताच आम्ही लगोलग तिथे पोचलो. पण आदल्या दिवशी नवऱ्याचा खून होऊनही बायको मजुरीने गवत कापायला गेली होती. कुठे, तर ज्यांनी खून केला त्यांच्याच शेतात. इतकं दारिद्य्र, इतकी असहायता.

बाबा त्यातला हुशार हिंमतवाला तरुण शोधायचे. त्याला बरोबर घेऊन, समजावून त्याला जवळच्या शहरात पोलिसांपुढे उभं करायचे. मोफत काम चालवणाऱ्या वकिलाकडे काम सोपवायचं. मगच परतायचं.

एकदा आम्ही तालुक्याच्या गावी आला होतेो. आम्हाला मुख्यमंत्री भेटले. ते दलित. बाबांनी त्यांना असं सुनावलं की बस्स. “तुमच्या कार्यकर्त्याचा खून होतो. तुम्ही त्याच्या मयतीलासुद्धा जात नाही. आधार देणं दूरच. कशाला राजकारण करता?- वगैरे” मुख्यमंत्री गप्प राहून ऐकून घेत होते. बाबांची पोटतिडीक तेव्हा पाहायला मिळाली.

अशी किती तरी प्रकरणं. बाबांनी एकदा मला पारधी समाजाच्या अधिवेशनाला पाठवलं. त्यांच्यातली भांडणं पाहून मी गांगरून गेलो. आता खूनच पडतायत असं वाटायला लागलं. संध्याकाळी बाबा आले, त्या दोन्ही माणसांशी बोलले आणि पाच-दहा मिनिटांत भांडण मिटलं की. बाबाचं हे कौशल्य पाहून मी चकित झालो. बाबा कुणासाठी भांडत होते? गरिबातल्या गरिबांसाठी. जिथे यश दुर्मिळ, दुष्प्राप्यच. सगळ्या घटनांमध्ये आरोपी निर्दोष सुटायचे. साक्षीदार फुटायचे. पण तरी बाबा लढतच राहायचे.

पण बाबांचं यशस्वी काम विचाराल, तर ‘हमाल पंचायती'चं. बाबांनी हमालांची संघटना बांधायच्या आधी तीन-चार जणांनी प्रयत्न केले होते; पण ते फसले. बाबांचा प्रयत्न टिकला. हे सगळे हमाल अशिक्षित. यांना एका सूत्रात गोवायचं काम अवघड. ते बाबांनी केलं. पुण्यात कामगार युनियन होत्या. ते संघटित होते, शिकलेले होते. त्यांना सरकारचे कायदे लागू होते. इथे कायदाही नाही आणि शिक्षणही नाही. पण बाबांच्या हमालांच्या लढाईने ‘असंघटित कामगार कायदा' पास झाला. अशा अनेक असंघटित समूहांना संरक्षण मिळालं.

बाबांनी बांधलेली संघटना अभ्यासण्यासारखी होती. हमालांमधली शिस्त तर अशी की पाहून घ्यावी. मोर्च्यात कुठेही अर्वाच्य घोषणा नाही, जाळपोळ नाही, दगडफेक नाही. पाच हजारांचा जमाव, पण तो शांततेत चालायचा. बाबांनी त्यांच्यासाठी किती उपक्रम सुरू केले! हमालांना इथे घरं नसतं. ते गावाहून आलेले. पाव-सॅम्पल हेच रोजचं जेवण. बाबांनी त्यांच्यासाठी ‘कष्टाची भाकर' हे केंद्र चालवलं, ‘ना नफा ना तोटा' तत्त्वावर. एका रुपयात पौष्टिक अन्न. आधी नाना पेठेत. मग पुढे शहरात किती तरी शाखा निघाल्या. पैशाचा व्यवहार करणारे सगळे अशिक्षित हमाल. पण अफरातफर नाही की अनागोंदी कारभार नाही.

मार्केट यार्डात ‘हमाल भवन' उभं आहे. तीन मजली. मजबूत. ते कसं उभं राहिलं माहितीय? बाबा तुरुंगात असताना हमालांनी हे बांधून घेतलं. प्रत्येकी २५० रुपये वर्गणी काढली. व्यापारी देणग्या द्यायला तयार होते, पण हमालांनी घेतल्या नाहीत. त्यांना कुणाचं मिंधेपण नको होतं. आणि हे सगळं बाबा तुरुंगात असताना, याचं विशेष कौतुक. हे हमाल भवन म्हणजे त्यांच्या अस्मितेचं प्रतीक. पुढे हमालनगर झालं. तिथे हमालांची स्वतःची घरं झाली. तिथे छोटं-मोठं कुणी नाही. उपाध्यक्ष असलेले मानकर रोज १०० किलोचं पोतं उचलून हमाली करतात. तसेच सगळे पदाधिकारी. तुम्ही मीटिंगमध्ये पदाधिकारी, एरवी काय त्याचं? इतर ठिकाणच्या युनियन आपण बघतो. इतरांमधला माणूस सेक्रेटरी झाला की तो स्वतःला राव समजू लागतो, इतरांपेक्षा वेगळा समजू लागतो, तसं इथे नाही.

समाजातल्या अन्यायांवर, अन्यायग्रस्त समूहांवर मी पुष्कळ लिहिलं. भ्रष्ट राजकारण्यांवर लिहिलं, जातीय अत्याचारावर लिहिलं. बुवाबाजी करणाऱ्यांवर लिहिलं. पण असं लिहिताना मला कधीही कुणाची भीती वाटली नाही. छापून आल्यावर कोणी त्रासही दिला नाही. कारण माझ्या पाठीशी बाबा आणि हमाल पंचायतीची शक्ती होती.

बाबा रसिक. कधी भेटले कीसोनचाफ्याचं एखादं फूल नजाकतीने हातात ठेवणार. भेटणाऱ्या प्रत्येक मित्राला. त्यांच्या घरी ते झाड असावं. चंद्र पाहण्यात असं विशेष ते काय? पण नाना पेठेतल्या दाट बकाल वस्तीत कधी तरी त्यांच्या घरासमोरच चंद्र उगवायचा. अचानक ते दृश्य समोर आलं की बाबा खूष होऊन जायचे. शीलाताईंना हाक मारायचे, “अगं शीला, ये. चंद्र बघ.' मी आसपास असलो की हाक मारायचे, ‘अनिल..' आणि हसून चंद्राकडे नुसते बोट दाखवायचे. तेव्हाही त्यांची पन्नाशी उलटून गेलेली होती. पण चंद्र पाहण्याचा, फुललेली फुलं पाहण्याचा केवढा निरागस उत्साह!

बाबांना दोन मुलं. असीम आणि अंबर. दोघांचाही आम्हा सगळ्यांना लळा. आमच्या मुली मुक्ता-यशोची त्यांच्याबरोबर खूप दोस्ती. असीम-अंबर या दोघींबरोबर महिना-महिना आमच्या गावी ओतूरला यायचे. खूप खेळायचे. आजही तिथल्या आठवणी काढतात. दोघंही आता अमेरिकेत असतात. बाबा, शीलाताई तिकडे जाऊन येतात, पण आले की पुन्हा काम सुरू.

बाबांनी आम्हाला भरभरून दिलं. मला आणि सुनंदाला, दोघांनाही. गरिबांना मदत करण्याची तडफ दिली. खेड्यापाड्यांतून वेड्यावाकड्या अक्षरांत लिहिलेली पोस्टकार्डं त्यांनी कधी बाजूला ठेवून दिली नाहीत. यात लक्ष घालावंस असं म्हणत तिकडच्या एखाद्या कार्यकर्त्याला फॉरवर्ड केली नाहीत, की कार्ड पाहिल्यावर याचा आपल्याला काय उपयोग, हे आपल्यातले आहेत का असा विचार केला नाही. ते पिशवी उचलून रात्री-अपरात्री धावत सुटले, आणि त्यांच्यासोबत माझ्यासारखे त्यांचे वेडे शिष्यही.

बाबांच्या संघटनांमधले सगळे पदाधिकारी त्यांच्यातलेच. अडाणी, खेडूत. पण त्यांनी संस्था सांभाळल्या, वाढवल्या. ‘मुक्तांगण' सुरू करताना आम्ही नकळत हेच उचललं. आमच्या इथे बरे झालेले व्यसनमुक्त मित्रच मदतीला घेऊन संस्था वाढवली. बाबांकडून आम्ही शिकलो, की डिग्ऱ्या आणि पदव्यांवर काहीही नसतं. ते आत्मीयतेवर असतं. बाबांनी दिलेल्या अशा किती गोष्टी सांगू? एक माणूस आयुष्यात येतो काय आणि सद्गुणांची, चारित्र्याची अंघोळ घालतो काय, सगळं आश्चर्यच.

.. आणि त्यांच्या काम करत राहण्याच्या उत्साहाबद्दल तर काय बोलावं? मला खात्री आहे, नव्वदी पार केल्यानंतरही ते म्हणतील, “अनिल, अजून दहा वर्षं आहेत कामाची.”

(समकालीन प्रकाशनाच्या 'जवळचे' या पुस्तकातून साभार)

अनिल अवचट







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 6

जवाहर नागोरी20.12.25
बाबा आढावांबद्दलचं अनिल अवचट लिहिलेलं हे वास्तव माहीत आहे , तरीही अवचटांच्या शैलीत वाचायला खूप छान वाटलं. त्यातील काही लढ्यांमधे अल्पसा का होईना मी ही सहभाग दिला होता हे आठवलं . आणि बरं वाटलं. आठवणींना उजाळा मिळाला. ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद!

दीपक कुंभार 18.12.25
खूपच छान लेख. बाबांसारखी निस्वार्थीपणे काम करणारी माणसे आता कमीच आहेत.

सद्गुरु कुळकर्णी14.12.25
भावपूर्ण! अशी माणसं आजकाल बनत नाहीत!

Yogesh Pawar12.12.25
खुप प्रेरणा दायी लेख

उल्हास पाटील 11.12.25
अतिशय सुंदर, यथातथ्य वर्णन .. अशी माणसं हळू हळू काळाआड चालली.. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण बाबांनी केली. जातीपलिकडे पहाण्याची दृष्टी दिली. आम्ही गांधी पाहिले नाहीत, पण बाबा पाहिले. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर, धन्य म्हणावं इहलोकी येवून l भाग्य आम्ही बाबा देखियेला ll

मोहन कुरुंभटे 10.12.25
डॉ बाबा खरे खुरे कार्य तपस्वी , महात्मा फुले सत्यशोधक चळवळी तील शेवटचा मणी बाबांच्या कार्याला मनोभावे सलाम , अभिवादन. अनिल अवचट ह्यांचा बाबांवरील लेख अप्रतिम

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results