आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

दयानंद कुबलः कोकणवासीयांच्या मदतीला धावणारा चाकरमानी

  • योगेश जगताप
  • 21.04.26
  • वाचनवेळ 7 मि.
kokan ngo

दयानंद कुबल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळच्या नेतर्डे गावचे. हे गाव गोव्याच्या सीमेवर येतं. त्यांच्या गावाकडे जाताना गोव्यातून दोन वेळा जावं लागतं. मूलभूत सोयी-सुविधांसाठीही पाच-सहा किलोमीटर पायपीट करावी लागेल अशी परिस्थिती. या परिस्थितीवर मात करत दयानंद शिकले. पाच भाऊ, एक बहीण आणि आई-वडील असं त्यांचं मोठं कुटुंब. वडील शेतमजूर आणि खाणकामगार होते. पडेल ती कष्टाची कामं करून त्यांनी कुटुंब सांभाळलं. दयानंद तेरा वर्षांचे असताना त्यांच्या आईचं कॅन्सरने निधन झालं. तिथून पुढे वडिलांनीच सगळ्यांचा सांभाळ केला. वडिलांची कमाई तुटपुंजी असल्यामुळे अनेक वेळा उपाशी राहावं लागल्याची आठवण दयानंदभाऊ सांगतात. त्यांच्या दोन मोठ्या भावांनी या प्रश्नावर उत्तर शोधलं- गोव्यात जाऊन हॉटेलमध्ये काम करायचं, तिथे राहण्याची आणि खाण्याचीही सोय होणार, सोबत पैसेही मिळणार. दयानंद यांनीही बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि ते देखील गोव्यात काम करू लागले. हॉटेलमधली स्वच्छतेची कामं करण्यापासून त्यांनी सुरुवात केली.

गोव्यात दोनेक वर्षं काम केल्यानंतर दयानंद पुण्यात आले. पुणे स्टेशनजवळच्या शेर-ए-पंजाबमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. जवळपास तीन वर्षं त्यांनी तिथे काम केलं. त्यादरम्यान हॉटेलमध्ये आलेल्या एकाने त्यांना लक्ष्मी रोडवरील ज्वेलरीच्या दुकानात काम करण्याची ऑफर दिली. पगार हॉटेलपेक्षा दुप्पट. झालं, ती नोकरी सुरू झाली. मात्र दयानंद यांनी दीड वर्षांत ते काम सोडलं. हॉटेलचं काम सोडून आपलं मन दुसरीकडे लागत नाही हे त्यांच्या लक्षात आलं.

हेही वाचा- पोलिसाची नोकरी सोडून मुलांसाठी काम करणाऱ्या वैशाली शिंदे-शेंडे

पुढे कमला नेहरू उद्यानाजवळच्या खाऊ गल्लीत त्यांनी स्वतःचा पावभाजीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर कोथरूड भागात पार्टनरशिपमध्ये रेस्टॉरंट चालवण्याचा प्रयोग केला. पण तो प्रयोग मात्र यशस्वी झाला नाही.

यानंतर त्यांनी दीपक नावाच्या मित्राच्या मदतीने मॅक्डॉनल्ड्समध्ये पाच वर्षं काम केलं. तिथे अनुभव मिळत गेला, तशा वाढीव जबाबदाऱ्याही मिळाल्या आणि चांगले पैसेसुद्धा. त्यापुढील दोन-तीन वर्षं कॅफे कॉफी डे आणि इतर खाजगी कंपन्यांमध्ये काम करून दयानंद यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मुंबईतही त्यांनी सहा-सात वर्षं काम केलं. या काळात देश-विदेशातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ माणसांशी त्यांची ओळख आणि मैत्री झाली.

आपल्या कामात जम बसल्यानंतर २००८ साली आपल्या गावासाठी काहीतरी करायला हवं असं दयानंद यांना वाटू लागलं. विशेषतः आपल्यासारख्याच परिस्थितीत शिकणाऱ्या मुला-मुलींना मदतीचा हात द्यावा असं त्यांच्या मनात येऊ लागलं. सावंतवाडी-सिंधुदुर्गमधून शिक्षण आणि नोकरीनिमित्त बाहेर पडलेल्या ओळखीतील २०-२५ लोकांचं एक नेटवर्क दयानंद यांनी उभं केलं. दर महिन्याच्या पगारातील ठराविक रक्कम बाजूला काढून त्यातून शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचा पहिला प्रकल्प हाती घेण्यात आला.

kokan ngo

आपापलं काम सांभाळून लोक या प्रकल्पाला मदत करू लागले. शनिवार-रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी वेळ काढून काही लोक सिंधुदुर्गला यायचे. गावांना भेटी द्यायचे. तिथल्या मुलांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार मदत करायचे. त्यात दुर्गम भागातील ज्या मुला-मुलींना शाळेसाठी खूप पायपीट करावी लागते, हे पाहून त्यांना मोफत सायकली देण्यात आल्या. दुरुस्त केलेल्या आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या एक हजारहून अधिक सायकलींचं वाटप केलं गेलं.

अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या गरजा समजून घेण्यावर दयानंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा भर होता. चार वर्षांनी म्हणजे २०१२ साली सिंधुदुर्गमध्येच ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्थे’ची अधिकृत नोंदणी करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये सुरू झालेलं काम नंतर पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही विस्तारलं. एवढंच नाही तर जोडल्या गेलेल्या शेकडो मित्रांच्या माध्यमातून गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतही त्यांचं काम सुरू झालं.

हेही वाचा- खेड्यापाड्यांत सोईसुविधा आणि रोजगार उभारणारा तन्वीर इनामदार

दयानंद यांनी फूड मॅनेजमेंट चेनमधील वेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्याने संस्थेची आर्थिक बाजू भक्कम व्हायला मदत झाली. स्टाईल किचन, मॅक्डॉनल्ड्स आणि कॉफी बाय डी बेला या मल्टीनॅशनल कंपन्यांतील कामामुळे सीएसआर फंडासाठी आवश्यक कंपन्या शोधणं त्यांना सोपं गेलं.

याच्या जोरावरच २०१२ नंतर संस्थेने वेगवेगळ्या प्रकारचे रचनात्मक उपक्रम हाती घ्यायला सुरुवात केली. हे काम प्रामुख्याने वंचितांसाठी, त्यातही मुलं आणि महिलांसाठी होतं. ग्रामीण आणि शहरी भागातील मुली, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई, ब्युटी पार्लर आणि नर्सिंग प्रशिक्षण देण्याचं काम संस्थेमार्फत सुरू करण्यात आलं. माफक दरातील या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन हजारो महिलांनी स्वतःचे छोटेखानी व्यवसाय सुरू केले. शेकडो मुली चांगल्या दवाखान्यात कामाला लागल्या.

kokan ngo

महिलांच्या मासिक पाळी काळातील स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार करून पॅडयात्रा हा उपक्रम सुरू करण्यात आला. ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुली-महिलांना सॅनिटरी पॅडसाठी महिन्याला ७० ते ८० रुपये खर्च करणं परवडत नव्हतं. त्याला पर्याय म्हणून धुवून वापरता येतील असे कापडी, रियुजेबल पॅड त्या महिलांपर्यंत पोहचवण्याचं, त्याच्या वापराविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम संस्था करत आहे. हे पॅड दक्षिण भारतातून मागवले जातात.

संस्थेचं पुढचं महत्त्वाचं पाऊल होतं वंचित आणि दुर्लक्षित मुलांना आसरा देण्याचं. मुंबई, पुणे शहरांसह अनेक ठिकाणी रस्त्यावर राहणाऱ्या, शालाबाह्य, भीक मागून दिवस काढणाऱ्या मुलांसाठी सुरक्षित निवारा (शेल्टर होम) उभा करून देण्याचं काम संस्थेने हाती घेतलं. अनाथ आणि गरजू मुलांना या शेल्टर होमचा मोठा आधार आहे. एकल पालकांना आपल्या मुलांचा सांभाळ करताना अडचणी येतात. अशा मुलांनाही शेल्टर होममध्ये आसरा दिला जातो. सध्या देशभरातील आठ राज्यांमध्ये असे निवारे उभे राहिले आहेत. तिथे ८०० ते ९०० मुलं राहत आहेत. या मुलांच्या राहण्या-खाण्याची, शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संस्थेकडे असते.

kokan ngo

कामाचा एकूण वाढता व्याप पाहून दयानंद यांनी २०१७ साली खाजगी कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांनी संस्थेच्या कामाला वाहून घेतलं आहे. त्यांच्या साथीला अनेक खंदे सहकारी आहेत. यामध्ये योगेश भोसले, वाल्मिक कर्डिले, संतोष रेपे, शीतल पाटील, सतीश गवस, महेश बिर्जे, कल्पना राणे, महेश निंबाळकर, विलोकिता सोनावणे, विशाल महांगरे यांचा आवर्जून उल्लेख करता येईल.

२०२०-२१ च्या कोरोना संकटाच्या काळात कोकण संस्थेचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पुण्यातल्या दोन हजारांहून अधिक गरजूंना अन्नाची पाकीटं, किराणा घरपोच देण्यासाठी या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. याच कामाचा सिलसिला कोविडनंतरही सुरू राहिला. २०२२ पासून संस्थेच्या 'फीड वन, फीड ऑल' या उपक्रमांतर्गत रोज २०० हून अधिक गरजू लोकांना मोफत जेवण दिलं जातं. निराधार, असहाय, भिक्षेकरी यांना या जेवणाचा आधार असतो.

हेही वाचा- वंचितांच्या जगण्याला अर्थ देणाऱ्या श्यामला चव्हाण

संस्थेमार्फत दरवर्षी वेगवेगळी आरोग्य शिबिरं घेतली जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्त्री-आरोग्य तपासणी, मधुमेह नियंत्रण शिबिर अशा शिबिरांचा समावेश आहे. पैशाअभावी चांगल्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहणाऱ्या हजारो सामान्य नागरिकांसाठी कोकण संस्थेची शिबिरं लाभदायी ठरताना दिसतायत.

अलीकडच्या दोन-तीन वर्षांत संस्थेने विद्यार्थी आणि शाळांच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. स्वच्छतागृहांची दुरवस्था असणार्या २२ शाळांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून नवीन स्वच्छतागृहं बांधून देण्याचं काम करण्यात आलं. यातील बऱ्याचशा शाळा रायगड आणि पालघर आदिवासी भागांतील आहेत. याशिवाय २०० हून अधिक शाळांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं यासाठी लाखभर रुपये किंमतीचे वॉटर फिल्टर बसवून देण्यात आले. सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे भागातील काही गावांमध्ये मुलांना अभ्यासिका आणि ग्रंथालयांची आवश्यकता होती. ही गरज समजल्यानंतर त्यांची प्रयत्नपूर्वक उभारणी करून दिली गेली.

kokan ngo

या कामात बरीच आव्हानं असल्याचं दयानंद कुबल सांगतात. ते म्हणतात, ‘‘लोकांनी सहजपणे आपल्याला काम करण्यासाठी होकार देणं अथवा न देणं इथपासून अडचणी असतात. काहीजण हे काम करण्यामागे आमचा काही स्वार्थ आहे का याचीही चौकशी करतात. मात्र सामाजिक कामात संयम आणि संवाद गरजेचा असतोच. त्यामुळे लोकांचं शंकानिरसन केलं की काम थोडं सोपं होतं. संस्थेसाठी सुरुवातीपासून स्वयंसेवक म्हणून काम करणारे बरेच जण आहेत. पण संस्थेला पूर्णवेळ काम करणाऱ्या अनुभवी माणसांची गरज असतेच. उच्चशिक्षित तरुण-तरुणींना फील्डवर्कचा अनुभव नसला की कामात जम बसायला वेळ लागतो. बऱ्याचदा फील्डवर काम भरपूर आणि चांगलं असलं तरी ते व्यवस्थित प्रेझेंट करता आलं नाही तर निधी मिळण्यात अडचण येते. या सगळ्या अडचणींवर मात करत संस्थेची वाटचाल सुरू आहे. मागील काही वर्षांत अनेक लोकांपर्यंत संस्थेचं काम पोहोचलं असून अपेक्षित मदतही आम्हाला मिळत आहे. गाव सोडून शहरात जाणाऱ्या प्रत्येकाने गावाच्या विकासासाठी छोटंसं योगदान दिलं तरी मोठं काम उभं राहू शकतं हे आमच्या संस्थेने दाखवून दिलंय."

मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या गरजा पूर्ण करणं, वंचित मुलांना जगण्यासाठी आधार देणं, महिलांना स्वावलंबी बनवणं, जिथे कमी तिथे आम्ही या भूमिकेतून गरजेनुसार मदत उभी करणं अशा नाना प्रकारच्या कामांमध्ये कोकण कला व शिक्षण विकास संस्था योगदान देत आहे. तुमच्या आसपास अशा कामांची गरज वाटत असेल तर तुम्ही या संस्थेशी संपर्क करू शकता.

संस्थेची वेबसाईट - www.kokanngo.org

संपर्क - 9324117917

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 7

हेमंत कोळसुलकर23.04.26
बरं वाटलं ,आभारी

Vaishali Chaudhari22.04.26
संस्थेचे संचालक दयानंद सर यांच्याबद्दल वाचताना मनापासून खूप आदर आणि प्रेरणा वाटली. त्यांच्या परिश्रमांची खोली, समाजासाठी केलेलं निस्वार्थ कार्य आणि त्यांनी संघर्षातून उभा केलेला प्रवास खरंच शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. त्यांनी फक्त एक संस्था उभी केली नाही, तर अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचं मोठं कार्य केलं आहे. त्यांच्या विचारांमध्ये आणि कामात जी प्रामाणिकता आणि समर्पण दिसतं, ते प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अशा महान व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कोकण संस्थेचा एक छोटासा भाग असल्याचा मला मनापासून अभिमान आहे, आणि पुढेही त्यांच्या विचारांवर चालत समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळत राहील🙏

अजित दळवी 22.04.26
दया भाऊंना ग्रेट सॅल्युट

Pooja Pradeep kalekar 21.04.26
तर तुमच्या कार्यासाठी शब्दच नाही, असे उत्तम समाजसेवेचा कार्य तुम्ही करत आहात. तुमच्यासारखाच देणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असाव अशी माझी तीव्र इच्छा आहे मी एक शिक्षिका असून शिकवत असताना विद्यार्थ्यांना तुमच्या कार्याचे विवेचन करत असते सर आपण प्रत्यक्ष एकमेकांना ओळखत नाही तरी सुद्धा तुम्ही माझे एक आदर्श आहात तुमचा जीवन प्रवास आणि तुमच्या कार्यासाठी माझा सलाम .

R.C.kubal21.04.26
अहो साहेब तुम्हाला मी एक सांगू शकतो की हे आमचे भाऊ समान आहेत. मी त्यांच्या वडिलांना आणि सर्व भावना सलाम करतो. त्यांनी जे परिश्रम केले आणि ज्या परिस्थितीत त्यांच हे काम केलेले आहे, त्यांची स्तुती करण्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीत. मी त्यांना सलाम करतो.

Rushabh Wankhede21.04.26
A truly heart-touching story. Dayanand Kubal’s journey from a small village in Sindhudurg to building such a massive social organization is proof that a determined heart can change thousands of lives. His dedication to the women and children of Konkan is deeply inspiring

Shital patil21.04.26
Khup chan kaam karta aahat tumchya sarkhya lokanchi khup garj aahe .

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results