फिलाख (Villach). युरोपला जाणार्या पर्यटकांच्या यादीत ऑस्ट्रियातलं हे ठिकाण असण्याची शक्यता फारशी नसते. पर्यटक कंपन्यांनी सवय लावलेल्या ‘पॉप्युलर युरोप’मध्ये ऑस्ट्रियातली इन्सब्रुक, साल्झबर्ग ही शहरं असतात. कधीतरी चुकूनमाकून व्हिएन्ना असतं. पैकी पहिली दोन शहरं जर्मनीच्या सीमेलगत, त्यामुळे ‘पॉप्युलर युरोप’च्या वाटेवरच आहेत असं म्हणू शकतो. व्हिएन्ना पडली ऑस्ट्रियाची राजधानी. तुलनेने Villach खाली ऑस्ट्रियाच्या दक्षिण सीमेजवळ आहे. तिकडे वाट वाकडी करून कोण कशाला जातंय?
तरीही फिलाखला (परदेशी लोक ‘विलाश’ असा उच्चार करतात) आमचे पाय लागले त्याला पर्यटनापलीकडचं एक वेगळंच कारण ठरलं.
ध्वनीप्रदूषणाविरोधात काम करणार्या एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेची माहिती वाचण्यात आली. ही संघटना शांततेचं महत्त्व पटवून देण्यासाठी आटापिटा करते; जगभरातल्या सर्वाधिक शांत जागा शोधते. त्यांच्या वेबसाइटवर अशा जागांची माहिती दिलेली असते. एकदा सहज ती माहिती वाचताना Vilaach, Austria हे नाव तिथे दिसलं. योगायोगाने तेव्हा आमचं जर्मनी-ऑस्ट्रियाला जायचं चाललं होतं. त्यात साल्झबर्गला जाणार होतोच. तिथून Vilaach ला जावं का, असा किडा डोक्यात वळवळायला लागला. गूगलच्या मदतीने आणखी थोडी माहिती शोधली. साल्झबर्गहून ट्रेन होती; एका दिवसात जाऊन येता होणार होतं. मग तो किडा कुठली पाठ सोडायला! अखेर साल्झबर्गमधल्या साडेतीन दिवसांपैकी एक दिवस Villach ला बहाल करून टाकला. आणि त्या दिवशी दोन तास ट्रेन प्रवास करून ध्यानीमनी नसणार्या त्या गावात जाऊन पोहोचलो.
त्या दिवसाच्या आमच्या फिरस्तीला एकच tag होता- जगातल्या सर्वाधिक शांत जागांपैकी एका ठिकाणी आपण जातोय. तो टॅग सोबत बाळगूनच रेल्वे स्टेशनमधून बाहेर आलो. फोनवरच्या नकाशात city centre दिसलं ती दिशा पकडली आणि चालायला सुरुवात केली. १०-१५ मिनिटांत रमतगमत तिथे पोहोचलो. तर हा एक ब्राँझमधला बिअर-बाबा सामोरा आला. बिअरचा मग उंचावून मजेत उभा होता. डावीकडे एक रस्ता ‘बिअर गार्डन’ला जात होता. तिकडे दुर्लक्ष करून पुढे झालो तर हा एक storyteller दिसला. तुम्हाला वाटलं तर थांबा, पुढे गेलात तरी माझी हरकत नाही, असं जणू सांगत होता तो. युरोपमधलं हे असं street art मला फार भुरळ घालतं. कुणा ग्रेट लोकांचे पुतळे असतात असं नाही. तुमच्या-आमच्यासारखी साधीसुधी माणसं असतात ती. कधी त्यामागच्या कलाकारांची माहिती तिथे दिलेली असते, इंग्रजीत असली तर वाचली जाते. माहिती वाचता आली नाही तरी तो पुतळा/म्युरल न्याहाळण्याची उत्सुकता वाटल्याशिवाय राहत नाही. सर्वाधिक भावतं ते त्यामागचं surprise element. चालताचालता अचानक दिसतात हे public art pieces. त्यात भारी मजा असते. असंच आणखी एक surprise element पुढे वाढून ठेवलं होतं. पण तेव्हा आम्हाला त्याची कल्पना नव्हती.
स्टोरीटेलरची स्टोरी थोडावेळ ऐकून पुढे झालो. आता पुढे एक नदी आडवी येत होती. ही Drava नदी. संथ प्रवाह, मध्यम रुंदीचं पात्र. नदीवर एक पूल दिसत होता. पुलाच्या आधी एका ठिकाणी हा एक ब्राँझ विदूषक दिसला. त्याच्या चेहर्यावरचं मंद स्मित आणि निवांतपणा मला फार आवडला. त्याच्या मागच्या कॅफेत काहीजण निवांत बिअर पीत बसले होते.
आम्ही पूल ओलांडून old town मध्ये प्रवेश केला. दुपारची वेळ असूनही हवेतला गारवा, कोवळं ऊन, शांत रस्ते, शुकशुकाट, पानगळीचे लाल-पिवळे-केशरी रंग... Villach चं जग अगदी धीम्या गतीत निघालं होतं. अधल्यामधल्या वाराची अधलीमधली वेळ होती म्हणूनही असेल. तो शांतपणा, निवांतपणा डोक्यात, मनात आत आत उतरत होता. भले ते शहर म्हणजे सर्वाधिक शांत जागांपैकी एक नसेल, त्याच्या आसपासच्या एखाद्या जंगलामुळे त्याला ते बिरुद दिलं गेलं असेल, पण तरी ती शांतता हवेवर स्वार होऊन शहरात येत असणारच. वाटलं, तिथल्या लोकांना कल्पना असेल का अशा काही बिरुदाची? पण ती शांतता त्यांच्या जगण्याचाच एक भाग होती; त्याची वेगळी नोंद ते कशाला घेतील? ते काम आपलं, कारण अशी शांतता दुर्लभ आहे ती आपल्यासाठी. तिथल्या लोकांना थोडी गजबज, वर्दळ हवीशी वाटत असेल का? पिकतं तिथे विकत नाही वगैरे?
सौंदर्य बघणार्याच्या दृष्टीत असतं म्हणतात. तशी त्या दिवशी ती शांतता माझ्या कानांमध्येच होती.
मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहानसहान रस्ते, गल्लीबोळ दिसत होते. वाटलं तर तिथे वळायचं, जरा पुढे जाऊन परतायचं, असं आमचं चाललं होतं. असंच एका गल्लीत एक केक-शॉप दिसलं. आत शिरलो. ते दुकान १८५९ सालापासून त्या जागी उभं आहे म्हणे. त्याची मालकी तेव्हापासून एकाच कुटुंबाकडे आहे. अशा केक शॉपमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये मेनूकार्डातले आंतरराष्ट्रीय ओळखीचे पदार्थ सोडून काहीतरी local शोधण्याची तयारी हवी. मग त्यासारखी दुसरी मजा नाही. असाच एक पेस्ट्रीचा प्रकार आम्ही मागवला. जोडीला कॉफी. शांततेने कॉफीला पोटात सोडलं, की कॉफीसहित शांतता पोटात गेली, सांगता येणार नाही. कॉफी ढवळताना होणारा चमच्याचा आवाजही मोठा वाटत होता. चमचा कपावर आपटू न देता ढवळण्याचा आपसूक प्रयत्न केला गेला. डोळे मिटून शांतपणे कॉफीचे एक-एक घुटके घेतले गेले.
तिथे बसल्या बसल्या पुन्हा एकदा नकाशा पाहिला. साधारण अर्धा-एक किमी अंतरावर एक बाग दिसत होती. वेळेचा अंदाज घेतला. तिथपर्यंत जायचं, बागेत थोडा वेळ काढायचा आणि निघायचं, असं ठरवलं. केक-शॉपवाल्या बाईशी दोन-चार वाक्यं बोलून बाहेर पडलो.
पुन्हा सुरू- ही गल्ली, तो रस्ता, इथे थांब, तिथले फोटो काढ. रस्त्यावर पिवळ्या-केशरी पानांचा खच पडला होता, सिमेंटच्या रस्त्यांचा करडा रंग आणि ते रंग- कमाल रंगसंगती! (fall च्या दिवसांमध्ये ही रंगसंगती सगळीकडेच असते, कितीही बघा, समाधान होत नाही.) रस्त्याच्या दोन्ही बाजूंना राहती घरं, मध्येच एखादी १००-२०० वर्षं जुनी इमारत, त्यावर चढलेल्या लालचुटुक पानांच्या वेली. या वेली इमारतींसाठी धोकादायक असतात म्हणे. पण दिसतात फार सुंदर.
...आणि एका छोटुशा स्मारकवजा रचनेने मनातल्या शांततेचा भंग झाला.
रस्त्याच्या कडेला एका इमारतीच्या कम्पाउंडच्या भिंतीला लागून कोपर्यात एक वीतभर चौथरा होता आणि त्यावर नारळाएवढा अगदी गोल एक दगड. त्या चौथर्यावर ‘25.2.1945’ अशी तारीख कोरलेली होती. दुसर्या महायुद्धादरम्यान त्या दिवशी Vilaach वर दोस्तराष्ट्रांनी तुफान बॉम्बहल्ले केले होते. बहुतांश शहर बेचिराख झालं होतं. त्याची आठवण म्हणून ते स्मारक. विध्वंसाच्या तुलनेने अगदीच लहानसं. फार कलापूर्ण काही नव्हतं. जवळ जाऊन उभं राहिलं तर उंची गुडघ्याइतकीही नव्हती. अर्थात इतका इतका विध्वंस म्हणजे इतकं इतकं मोठं स्मारक हवं, असं काही सूत्र नसतंच म्हणा. काळाच्या पट्टीवर ती आठवण आता खूप मागे गेलीय, त्यामुळे स्मारकही लहानसं आहे, असं आपलं उगीच स्वतःला सांगितलं आणि पुढे झाले. मनातली शांतता मला धरून ठेवायची होती.
थोड्या वेळात त्या बागेपाशी पोहोचलो. दर्शनी भागात एक चर्च आणि मागे बाग होती. मध्यम आकार, भरपूर झाडी, मध्यात कारंज्याचा आयताकृती हौद. बागेत बसायला बाकं असल्याचं लांबूनच दिसलं होतं.
आधी जाऊन एक बाक पकडला. अशी जागा ‘पकडण्याची’ आपल्याला एक फार सवय असते. एरवी पर्यायच नसतो दुसरा. तिथे त्याची गरज नव्हती, हे बाकावर टेकल्यावर जाणवलं. जरा पाणी वगैरे पिऊन आसपास पाहिलं तर तिथे जागोजागी पांढर्या रंगाची abstract sculptures दिसली. जमिनीवर केशरी पानांचा सडा आणि तो पांढरा रंग. मी टुणकन उडीच मारली. उठून बागेत एक मोठी फेरी मारून आले. सगळी शिल्पं शांतपणे बघितली. काही समजली. काही नाही समजली. कदाचित एकदा पाहून कळत नसतील, ते घडवणार्यांची तीच योजना असेल, चार-पाचदा पाहिल्यावर काहीतरी लक्षात येईल, असंही असू शकतं. असं थबकून प्रत्येक शिल्पाकडे बघायला, त्यावर विचार करायला अवसर मिळणं, हा सुद्धा शांततेचाच एक प्रकार म्हणावा का? सर्वात आवडलं ते INFINITY चं शिल्पं. कारण विचारू नका. ते पाहिल्या-पाहिल्या त्याला दाद दिली गेली, बस्स!
बागेत तासभर वेळ ‘काढायचा’ ठरवला होता, तो भराभर पळूनच गेला. निघायची वेळ झाली.
आम्ही कशी काय त्या बागेची निवड केली? कल्पना नाही. की Vilaach च्या शांततेनेच आम्हाला निवडलं होतं? त्या शहरात आणखीही काही बघण्यासारखं असेल, जे आम्ही शोधलंच नाही, असंही असू शकतंच.
सगळ्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या नादातच पर्यटनातली शांतता आपण गमावतो का?
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.
