आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

काठमांडूपल्याडचा नेपाळ

  • व्यंकटेश उपाध्ये
  • 14.09.25
  • वाचनवेळ 16 मि.
nepal

माझ्या मनातलं नेपाळचं चित्र म्हणजे भूगोलातल्या पुस्तकातला नकाशाच! भारताच्या वरच्या अंगाला पसरलेल्या पर्वतरांगांच्या खुणा. तसं मला नेपाळबद्दल विशेष कुतूहलही नव्हतं. पण माझा एक जवळचा मित्र नेपाळमधल्या पोखरा या गावी स्थायिक झाला आणि त्याच्या आग्रहामुळे अचानकच नेपाळला जायचा योग आला.

आमचं जाणं पक्कं झाल्यावर नेपाळच्या मुक्कामात काय काय पाहायचं याची थोडीशी कल्पना आमच्या मित्राने, शिशिरने आम्हाला दिली. काठमांडू ते पोखरा प्रवास, पोखरामधला निवांत मुक्काम, पोखरा ते जोमसोम विमानप्रवास आणि नेपाळी खेड्यांमध्ये भटकंती, असा एकूण प्रवासाचा आरखडा होता. मी इंटरनेटवर शोधाशोध केली, तर तिथे झुंबड होती ती गिर्यारोहण करणाऱ्यांसाठीच्या माहितीची. माझ्यासारख्या शंभर किलोच्या ऐवजाला त्या माहितीचा फारसा फायदा नव्हता. तरुणपणीही मी कधी ट्रेकिंगच्या वाटेला गेलो नव्हतो, तो आता निवृत्तीनंतर जाईन अशी शक्यताच नव्हती. या कार्यक्रमावरून तरी आपल्याला मुलखावेगळं पाहायला मिळणार आहे असं वाटत नव्हतं. आणि त्याचं फारसं काही वाईटही वाटत नव्हतं. खरं तर मित्रमंडळींची भेट हाच एक आमच्या नेपाळ वारीचा उद्देश होता; पण प्रत्यक्षात मात्र या छोट्याशा प्रवासातही एका वेगळ्या दुनियेची सफर आम्हाला घडली.

या वेगळेपणाची सुरुवात झाली तीच मुळी दिल्ली ते काठमांडू या विमानप्रवासात. काठमांडू जवळ येऊ लागलं तसं हिमशिखरांचं दर्शन होऊ लागलं. केवढी अफाट मोठी पर्वतरांग! या शिखरांच्या पायथ्याशी उभं राहिलं की त्यांच्या उंचीचा आवाका नजेरत मावत नाही म्हणतात. विमानातून त्याचं अथांग पसरलेलं रूप दिसत होतं. त्यातही या उत्तुंग हिमालयाकडे असं वरून पाहणं हा एक वेगळाच अनुभव. या दर्शनासाठी फक्त दिल्ली-काठमांडू विमानप्रवास हीच एक अनुभव समृद्ध करणारी ट्रिप असू शकते, असं मनात आलं.

काठमांडूच्या विमातळावर उतरल्यावर ‘वेलकम टु द लँड ऑफ टॉलेस्ट माउंटन अँड शॉर्टेस्ट मॅन ऑन द अर्थ' अशा पाटीने स्वागत केलं. टॉलेस्ट माऊंटन माहिती होतं, पण शॉर्टेस्ट मॅन हे काही माहिती नव्हतं. पण त्याहीपेक्षा आणखी एक मजेदार पाटी इथे वाचायला मिळाली. ‘इन नेपाळ, थिंग्ज डू हॅपन; बट दे डू ॲट देअर ओन पेस. गेट युज्ड टू इट' असा इशारा देणारी पाटी वाचली आणि हा आपला शेजारी देश म्हणजे आपलं सख्खं भावंडंच आहे याची खात्री पटली.

काठमांडू विमानतळ एका बसक्या इमारतीत वसला आहे. तिथे बराच सावळा गोंधळ होता, पण तो त्रासदायक नव्हता. तरीहीइमिग्रेशन आणि कस्टमचे सोपस्कार उरकेपर्यंत तास गेला. एखाद्या देशात आपण पहिल्यांदाच जातो, तेव्हा विमानतळाबाहेर पडून तो देश पाहण्याची एक वेगळीच उत्सुकता असते. अधीरताच म्हणा ना. त्यामुळे हा ताससुद्धा खूप जास्त वाटतो. बाहेर पडलो तो शिशिरने पाठवलेला अधिकारी आडनावाचा ड्रायव्हर कार घेऊन उभा होता. हा हसमतमुख नेपाळी पाहून आम्हालाही प्रसन्न वाटलं. थोड्याच वेळात आमची गाडी काठमांडू शहरातल्या मुख्य रस्त्यांवरून धावू लागली. पण गाडीच्या खिडकीतून मिळालेली काठमांडूची पहिली झलक तरी फारशी काही चांगली नव्हती. मला तरी ते कोणतीही शिस्त नसलेलं, स्वत:ची ओळख हरवून बसलेलं शहर वाटलं. बेशिस्त रहदारी, जागोजागी खाचखळगे असलेले रस्ते, कचऱ्यांचे ढीग, सिनेमाची आणि नव्या उत्तुंग इमारतींची जाहिरात करणारी भली मोठी होर्डिंग्ज... गाडीतूनही लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे इथे चहाच्या टपरीपासून किराणाच्या दुकानांपर्यंत सगळीकडेदारू विक्रीला ठेवली होती. रस्त्यावरच्या गोंधळातून वाट काढण्यात आमचा ड्रायव्हर वाकबगार दिसत होता. एकाच वेळी तो त्याच्या गाडीसमोर कडमडणाऱ्या इतर वाहनांना, पादचाऱ्यांना सफाईने चुकवत होता, त्यांना शिव्यंची लाखोली वाहत होता आणि त्याच वेळी आम्हाला काठमांडूबद्दल, आजूबाजूला दिसणाऱ्या पर्यटनस्थळांबद्दल माहितीही सांगत होता. त्याचं इंग्रजी आणि हिंदी बरंच चांगलं होतं. हिमालयातली शिखरं चढण्यासाठी नाना देशांमधले गिर्यारोहक काठमांडूत मुक्काम ठोकत असतात त्याचा हा परिणाम असणार.

nepal

पंचवीस एक किलोमीटरचा प्रवास संपवून आम्ही अखेरीस काठमांडू शहराच्या बाहेर पडलो तेव्हा हुश्श झालं. आता आम्ही पोखराच्या दिशेने निघालो. मोकळा रस्ता लागला आणि काही क्षणांतच चित्र पालटलं. निसर्गाने आपला खरा नजारा दाखवायला सुरुवात केली. उजव्या बाजूला खळखळतवाहणाऱ्या नदीची साथ होती. कधी संथपणे झुळझुळणाऱ्या, तर कधी रुद्रावतार धारण करणाऱ्या, खोल पात्र असणाऱ्या त्रिशुळी आणि गंडकी नद्या. त्यांच्या पल्याडदगडांची घरं असलेली पारंपरिक खेडी, डोंगरउतारांवरची पायऱ्या-पायऱ्यांची भातशेती, उंच कातळ आणि त्यातून वाहणारे धबधबे आणि मुख्य म्हणजे नदीच्या दोन किनाऱ्यांना जोडणारे कित्येक झुलते पूल. हे पूल म्हणजे अगदी चित्रातल्यासारखेच दिसत होते. वाटेत छोटी छोटी चहाची दुकानं आणि सर्व पहाडी प्रदेशांत हमखास दिसणारे, उन्हं खात बसलेले खेडूत. काठमांडूपल्याडचा नेपाळ असा आहे तर. राजधानीवरून देश जोखता कामा नये हेच खरं.

आणखी थोडा वेळ गेला आणि दूरवर पसरलेली हिमाच्छादित शिखरं आता नजरेच्या टप्प्यात येऊ लागली. ती अन्नपूर्णा आणि मच्छापुच्छारे असल्याचं आमच्या ‘अधिकाऱ्या'ने सांगितलं. आम्ही चाललो होतो ते पोखरा खोरं या दोन शिखरांच्या सर्वांत जवळचं. त्यामुळे या दोन शिखरांचा पॅनोरामिक व्ह्यूया प्रवासात सतत दिसत होता. मच्छपुच्छारे हे नाव फारच मजेशीर. हे नाव कसं पडलं, तर ही शिखरं म्हणे माशांच्या शेपट्यांगत भासतात. इंग्रजीतही ही शिखरं फिशटेल पिक्स म्हणूनच प्रसिद्ध आहेत. खरोखरच, ही शिखरं म्हणजे उलट्या टांगून ठेवलेल्या माशांसारखीच दिसत होती. हळूहळू संध्याकाळ होऊ लागली तशी थंडी वाढू लागली. आपण हिमालयाच्या जवळ आहोत याची जाणीव होत होती. खिडकीच्या काचा वर गेल्या. आजूबाजूचे पहाड गूढ वाटू लागले. वाटेत लहान लहान गावं लागत होती. डोंगराच्या उतरंडीवर असलेल्या घरांत दिवे मिणमिणत होते. रस्त्यांवर तर दिवेच नव्हते, पण घरांमध्येही स्वच्छ प्रकाश दिसत नव्हता. त्यामुळे वातावरण उगीचच उदास वाटत होतं. मग मनात आलं, हा आपल्या शहरी कल्पनांचाच प्रभाव. झगमगाट असेल तरच प्रसन्नता आहे असं आपल्याला वाटणार. पण खरं तर सूर्य मावळला आणि हळूहळू जग अंधारात बुडालं, हेच किती नैसर्गिक आहे! पण आपण याची लज्जत अनुभवूच शकत नाही. मंद प्रकाश, संथ जीवनशैली आणि मुंगीच्या पावलाने पुढे जाणारा वेळ हा एखाद्या बड्या ख्यालासारखा असतो. त्याची सवय व्हावी लागत असणार. तेवढा वेळ आपल्याकडे कुठे? असे विचार मनात सुरू असतानाच एका गावातून बासरीचे सूर ऐकू आले. नेपाळी पारंपरिक धून असणार ती, पण तिने मनावर आलेलं मळभ पूर्ण दूर केलं.

वाटेत एका टपरीवजा हॉटेलात थांबून चहा घेतला. वेगळा, पण उत्तम चहा. बिस्किटं, चिप्स, चॉकलेट याबरोबरच दारूच्या बाटल्याही त्याने दुकानात छान सजवून ठेवलेल्या होत्या. दुकानदार इतका अगत्याने विचारपूस करत होता की बोलायची सोय नाही. पण त्या बोलण्यात कुठेही लाचारी नव्हती. उलट, अगदी बरोबरीच्या भावनेने तो आमच्याशी बोलत होता. पुढेही नेपाळच्या वास्तव्यात मला हे वेगळेपण वारंवार जाणवलं. आपल्या देशात पर्यटनस्थळांपासचे विक्रेते विशेषतः परदेशी मंडळींच्या कसे गळ्यात पडतात हे आपण पाहिलेलं असतं. त्या तुलनेत या मंडळींचं मला विशेष वाटलं. तिथून निघालो आणि थोड्या वेळात पोखरा आलंच. हे गावही तसं अंधारातच होतं, त्यामुळे त्याचं रूप कळलं नाही. त्या अंधारातच शिशिरच्या घरी पोहोचलो.

सकाळी उठल्यावर खिडकीतून बाहेर पाहिलं तर दूरपर्यंत हिमशिखरांचं दर्शन होत होतं. आज आम्हाला सकाळी सकाळीच इंटरनॅशनल माउंटन म्युझियम बघायला जायचं होतं. माझा गिर्यारोहणाशी दूरान्वयानेही संबंध नसला तरीही हे म्युझियम पाहण्याची उत्सुकता होतीच. हे म्युझियम आहेही खरोखरच उद्बोधक. हिमालयातला गिर्यारोहणाचा आजवरचा सगळा इतिहास इथे आपल्यासमोर उलगडतो. जगभरातील गिर्यारोहकांच्या आशा-निराशेचे क्षण, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत शिखर सर करण्याची जिद्द, त्यांच्या विजयी मुद्रा इथे फोटो आणि शब्दांमधून जिवंत झाल्या आहेत. गिर्यारोहणात वापरण्यात येणारी जुनी-नवी साधनं इथे ठेवलेली आहेत. गिर्यारोहकांचे पोशाख आहेत. गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये ही साधनं आणि पोशाख कसे बदलत गेले हे कळतं आणि त्याबरोबच पूर्वीच्या काळी किती कमी साधनांच्या आधारे गिर्यारोहक हिमालयावर चढाई करत होते हे पाहून थक्क व्हायला होतं. बर्फामुळे गोठून हातापायांची बोटं गळू लागली असतानाही पुढे जात राहण्याची गिर्यारोहकांची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून आपण नतमस्तक होतो. एव्हरेस्टच्या स्वच्छता मोहिमेत जमा झालेला कचरा इथे प्रत्यक्ष ठेवलेला आहे. तो आपल्याला हिमालातल्या गिर्यारोहणाची एक वेगळीच कहाणी सांगून जातो. याच म़्युझियममधलं आणखी एक आकर्षण म्हणजे हिमालयातल्या दंतकथांचा एक भाग असणाऱ्या यती या हिममानवाबद्दलची माहिती इथे आहे. त्याचा एक पुतळाही आहे. हा यती खरोखर आहे का हे शोधण्यासाठी आजवर अनेक मोहिमाही काढण्यात आल्या आहेत. त्यांची माहितीही इथे आहे. म्युझियमच्या एका भागात नेपाळमधल्या आदिवासी जमाती आणि त्यांच्या संस्कृतीबद्दलची माहिती आहे. हा विभागही आवर्जून बघण्यासारखा आहे. या म्युझियमबद्दल आधी आम्हाला काहीच माहिती नव्हती, पण ते पाहून बाहेर पडल्यावर मात्र हे पाहिलं नसतं तर नेपाळवारी फुकट गेली असती असं वाटलं. त्यामुळे पहिल्याच दिवशी तबियत खूष झाली.

nepal

दुपारी पोखरातला झुलता पूल पाहायला गेलो. नेपाळमधले हे झुलते पूल पर्यटकांचे खास आकर्षणबिंदू आहेत. खरं तर ते काही पर्यटकांसाठी बांधलेले नव्हेत. इथल्या भौगोलिक रचनेमुळे ते नेपाळच्या दैनंदिन जीवनाचा एक अत्यावश्यक भाग आहेत. विस्तीर्ण दऱ्या-खोऱ्या आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना वसलेली खेडी भरपूर. प्रत्येक ठिकाणी पक्के पूल बांधणं प्रचंड खर्चिक. त्यामुळे इथे जागोजागी हे झुलते पूल बघायला मिळतात. आपल्यासारख्या पठारी प्रदेशातल्या लोकांना मात्र त्याचं कोण अप्रूप! इथे पोखऱ्यामध्ये परदेशातूनही खास झुलता पूल अनुभवायला लोक येतात म्हणे. आणि खरोखरच आहेच हे प्रकरण अनुभवण्याजोगं. या झुलत्या पुलाच्या मध्यावरून खालच्या दरीत डोकावणं हेही साहसाचंच काम. इथली लोकं भराभर या पुलावरून इकडे-तिकडे ये-जा करतात. आपल्याला मात्र सुरुवातीला जीव मुठीत धरूनच चालावं लागतं. पण तेवढं धाडस करावं आणि इथल्या हिरव्यागार दऱ्यांची खोली अनुभवावीच. खाली दरी आणि समोर उत्तुंग हिमालय. समाधान काठोकाठ भरलेल्या अवस्थेत, वाढत्या थंडीचा अनुभव घेत आम्ही रमत-गमत घरी परतलो.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पोखरा विमानतळावरून जोमसोमला जायचं होतं. तेही फक्त बारा सीटर विमानातून. जोमसोम हे गाव तब्बल नऊ हजार फूट उंचीवर आहे.तिथे प्रचंड वेगाने (ताशी १०० किमी) वारा घोंघावतो. शिवाय हवामानात सतत बदल होत असतात. त्यामुळे जोमसोमची धावपट्टी ही जगातली सर्वाधिक धोकादायक धावपट्टी मानतात. पोखऱ्याहून जोमसोमला जायला दर अर्ध्या तासाने बुद्धा किंवा यती एअरलाइन्सची उड्डाणं असतात, पण त्यांच्या वेळा हवामानानुसार बदलत राहतात. पोखराचा विमानतळ तसं अगदीच लहान आहे, पण अन्नपूर्णा सर्किटसाठी गिर्यारोहकांना इथे यावं लागत असल्याने इथे परदेशी प्रवाशांची भरपूर गर्दी असते. आम्ही गेलो त्या दिवशी हवा ढगाळ होती. त्यामुळे आमचं विमान सातच्याऐवजी पावणेदहाला उडालं. एवढंसं विमान. त्यामुळे त्यात सीट नंबर वगैरे भानगडी नव्हत्याच. बहुतेक प्रवासी विदेशी होते. (म्हणजे आम्हीही!) जोमसोमच्या वातावरणात अचानक होणारे बदल आणि आसपासच्या पर्वतरांगा यामुळे वैमानिकाचं कौशल्यपणाला इथे पुरेपूर लागतं. आम्ही विमानात बसण्याआधी कळलं, की काही महिन्यांपूर्वीच इथल्या विमानाला अपघात होऊन सारे प्रवासी मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे विमानात बसताना पोटात थोडासा गोळा आला खरा; पण नंतर विमानातून दिसणारा नजारा सगळ्या शंका-कुशंका दूर सारणारा होता. निसर्गाच्या सौंदर्याची आणि विक्राळपणाचा जो कॅन्व्हास आपल्याला दिसतो तो बघून आपण किती नगण्य आहोत याची जाणीव होते.

काही वेळाने हा नजारा पुन्हा बदलला. बर्फाच्छादित शिखरं अधूनमधून नजरेआड होऊ लागली. करड्या-निळ्या-काळ्या कातळांचे उत्तुंग पर्वत दिसू लागले. खाली डौलदार वळसे घेणारी काळी गंडकी नदी दिसू लागली. भातशेतींचे चौकोन दिसू लागले. पण अजूनही धावपट्टी दिसत नव्हती. समोर दिसत होते ते विमानाच्या वाटेत उभे असलेले दोन पर्वत. वैमानिकाने त्या दोन्ही पर्वतांमधून कौशल्याने विमान बाहेर काढलं तेव्हा आम्हाला धावपट्टी दिसली. विमान उतरवताना अक्षरशः श्वास रोखून धरावा लागला. जोमसोमला उतरलो आणि लक्षात आलं की आपण हिमालयाच्या आणखी जवळ आलो आहोत. मानवर करून त्याकडे पाहताना छाती दडपून जात होती.

जोमसोममधलं आमचं मुक्कामाचं ठिकाण ओम गेस्ट हाऊस विमानतळापासून जवळच होतं. त्यामुळे चालत चालतच तिथे पोहोचलो. मालकीणबाईंनी हसून आमचं स्वागत केलं. गेस्ट होऊस म्हणजे खास नेपाळी पद्धतीचा चौसोपी वाडाच होता म्हणाना! उजवीकडे सुंदर सजवलेली जेवणाची खोली होती. मधोमध ऊठबस करण्याची खोली आणि सभोवताली राहण्यासाठीच्या साध्या, स्वच्छ खोल्या. सामान ठेवतो ना ठेवतो तोच खास नेपाळी नाश्ता समोर आला. बकव्हीटचे घावन आणि बटाट्याची भाजी. जोमसोमहून आम्हाला नेपाळच्या आणखी आतल्या भागात जायचं होतं. जोमसोमपासून आठ किलोमीटरवर गंडकी नदीच्या दुसऱ्या तीरावर वसलेल्या मार्फा या खेड्याला आम्हाला भेट द्यायची होती. हे नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यातलं एक पारंपरिक खेडं होतं. जाताना बसने जायचं आणि येताना पायी यायचं, असा बेत शिशिरने ठरवला होता. इथल्या ग्रामीण भागातल्या बसचा अनुभव तुम्ही घ्यायलाच हवा, असं त्याचं म्हणणं होतं. बसस्टॉपपाशी येऊन थांबलो. थोड्याच वेळात बस आली. बस म्हणजे काय, खटाराच होता तो पूर्ण. पण या खडकाळ, रस्ते नसलेल्या भागात कोणत्याही बसची अवस्था काही दिवसांमध्ये अशीच होत असणार. बसमध्ये बसलो आणि काठमांडूच्या विमानतळावर वाचलेल्या पाटीची सत्यता पटली. इथे कामं होतात पण आपापल्या गतीने! आम्ही चढलो तेव्हाच बसमधला एक प्रवासी एटीएममधून पैसे काढण्यासाठी खाली उतरला तो गायबच झाला. पंधरा मिनिटं झाली तरी त्याचा पत्ताच नव्हता. आणि विशेष म्हणजे आमच्याखेरीज बसमधलं कोणीही अस्वस्थ झालं नव्हतं की कुणाला घाई-गडबड नव्हती. कंडक्टरही छानपैकी नेपाळी गाणी लावून बसला होता. आमची चुळबूळ पाहून शेवटी खाली उतरलेल्या माणसाच्या मित्राने त्याला फोन करून बोलावून घेतलं आणि शेवटी गाडी निघाली.

nepal

आमची बस स्वतःच रस्ते बनवत मार्फाच्या दिशेने चाचली होती. या प्रवासात मार्फाला घेऊन जाण्यामागचं कारण शिशिरने सांगितलं. या गावात प्रामुख्याने थक्काली जमातीचे लोक राहतात. त्यांची घरं थाक खोला स्थापत्यशैलीमध्ये बांधलेली असतात. ते बघण्यासाठी आम्ही तिथे चाललो होतो. थोड्याच वेळात मार्फा आलं. हे गाव म्हणजे एक वेगळंच प्रकरण होतं. गावाच्या दोन्ही दिशांच्या प्रवेशद्वारांवर 'कानी' म्हणजे कमानी होत्या. सोसाट्याचा वारा आणि धूळ यापासून रक्षण करण्यासाठी हे गाव प्रचंड मोठ्या पहाडाच्या आडोशाला वसलेलं आहे. गावाच्या चहु बाजूस वेगवेगळ्या छटांचे उंचच उंच अक्राळविक्राळ पर्वत. त्यात काही गुहादेखील आहेत. माणूस मेल्यावर त्या पहाडातील गुहांमध्ये प्रेत नेऊन ठेवलं जातं असंही ऐकलं. घरं खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण होती. छतं पार सपाट. ही सपाट छतं धान्य आणि भाज्या वाळवण्यासाठी सोईची असतात. गावात वाऱ्याचा शिरकाव होऊ नये म्हणून दोन घरांमधलं अंतर अगदी कमी ठेवून चिंचोळ्या गल्ल्या तयार केल्या होत्या. या भागात पाऊसही फार कमी. कारण इथले महाकाय पर्वत ओलांडून ढग गावापर्यंत पोहोचूच शकत नाहीत.

नेपाळमधल्या एकूण गावांच्या मानाने मार्फा बऱ्यापैकी मोठं दिसत होतं. गावाच्या एका टोकाला सफरचंदाच्या बागा होत्या. अवघ्या नेपाळमध्ये इथली सफरचंदं सर्वोत्कृष्ट समजली जातात, पण दळणवळणाची फारशी साधनं नसल्याने काठमांडूपर्यंत ती पोहोचतच नाहीत. आम्ही मात्र भारतातूून या बागांपर्यंत पोहचलो होतो. बागेत फिरता फिरता सफरचंदं तोडून खाण्याची मजा काय वर्णावी! भरपेट सफरचंदं खाल्ली. तिथे सफरचंदांपासून ब्रँडी बनवण्याचं काम सुरू होतं ते पाहिलं आणि एका छोटेखानी हॉटेलमध्ये जेवण घेतलं. गावातून फिरताना तुरळक परदेशी पर्यटक दिसत होते, पण ते आमच्यासारख्ये थोड्या वेळासाठी भेट द्यायला आलेले वाटले नाहीत. मार्फात मुक्काम ठोकून तिथली शांतता अनुभवणं चाललं होतं. पण भारतीय पर्यटक मात्र एकही दिसला नाही. गावात एक प्रेक्षणीय गोंपा म्हणजे मॉनेस्ट्री होती. उजव्या दिशेस पहारा देणारे पिवळे, काळे, करडे आणि रेताळ डोंगर; सफरचंदाच्या बागा, लहान लहान दुकानं, चित्रातली वाटणारी मॉनेस्ट्री- सगळंच लाजवाब.

गावाच्या पलीकडील डोंगरातून एक धबधबा खाली कोसळत होता. पण गंमत म्हणजे वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे ते चारी दिशांना विखरत होतं. निसर्गाचं ते रौद्र रूपही पाहत राहण्याजोगंच होतं. फेरफटका मारून पुन्हा गावाच्या शिवेवर पोहोचलो तेव्हा संध्याकाळ होऊ लागली होती. त्यामुळे चालत जाण्याचा बेत रद्दकेला आणि तिथल्या एका खोपटीवजा दुकानातून बसची तिकिटं खरेदी केली. काही वेळातच असा काही सोसाट्याचा वारा सुरू झाला की उभं राहवेना, म्हणून खोपटात शिरलो, तर तिथल्या टीव्हीवर नेपाळीत डब केलेला दक्षिण भारतीय चित्रपट चालू होता. दक्षिणेकडच्या मंडळींच्या तोंडात ती नेपाळी भाषा ऐकून हसू आवरेना. थोड्याच वेळात बस आली आणि आम्ही जोमसोमला पोहोचलो. गेस्ट हाऊसच्या आतही प्रचंड थंडी वाजत होती. तिथल्या जेवायच्या खोलीत गेस्ट हाऊसमध्ये उतरलेले सगळे पर्यटक जमा झाले होते. त्यांच्याशी ओळखीपाळखी झाल्या. एक होता आयरिश शाळेतील मुख्याध्यापक. त्याचा मुलगा सायकलवरून ट्रेकला गेला होता. एक फ्रेंच कृषिशास्त्रज्ञ होता. तो आमच्या नाशिकलाही येऊन गेला होता. त्याच्याशी कोणत्या विषयावर गप्पा झाल्या असतील? विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर. महाराष्ट्रातल्या शेतीबद्दल त्याचा बराच अभ्यास दिसत होता. वेगवेगळ्या देशांतली मंडळी, पण सगळ्यांच्या मस्त गप्पा रंगल्या. बाहेर चिडीचूपझाल्यावर आम्हीही उबदार रजईत घुसलो. काचेतून हिमालयाच्या सावल्या दिसत होत्या त्या पाहत आम्ही झोपी गेलो.

जागे झालो तेव्हाही समोर हिमालयच दिसत होता. पहाटेचे पाच वाजले होते. आश्चर्य म्हणजे सगळं गाव जागं झालेलं होतं. त्या जीवघेण्या थंडीत सगळी दुकानं उघडी होती. आज आम्ही मुक्तिनाथ या बारा हजार फूट उंचीवरील वैष्णवांच्या तीर्थस्थानाला जाणार होतो. मार्फाच्या पुढेच मुक्तिनाथचा ट्रेक सुरू होतो. इथून चीनची सीमा जवळच असल्याने हा सगळा भाग नेपाळ सैन्याच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे तिकडे जाताना नेपाळी सैनिकांनी आम्हा सगळ्यांच्या नोंदी करून घेतल्या. मार्फा ते मुक्तिनाथ हा पायी प्रवास अवर्णनीय असा होता. अतिशय खडतर पण निसर्गाचं अनाहत रूप दाखवणारा. मध्यभागी नद्यांची विस्तीर्ण पात्रं, त्यांच्या कडेला खेटून उभे असणारे हिरवे-करडे डोंगर आणि त्यांच्या पाठीमागे हिमशिखरांच्या रांगा. असं दृश्य मी आजवर कधी पाहिलं नव्हतं. जितकं सुंदर तितकंच भीतिदायक. काही वेळानंतर मात्र आम्हाला उंचीचा त्रास सुरू झाला. तीनएक तासांच्या प्रवासानंतर मुक्तिनाथच्या बसथांब्यावर पोहोचलो. फार तर पाचशे लोकांचं गाव असेल. देऊळ आणखी पाचकिलोमीटरवर होतं. त्यातल्या सात-आठशे फुटांची उभी चढण होती. मला तर श्वास घेताना त्रास होऊ लागलेला. काय करावं कळेना. तेवढ्यात दोन बाइक्सवरून वर चाललेले दोन तरुण भेटले. त्या दोघांना आम्हा नवरा-बायकोला वर सोडण्याची विनंती केली. प्रत्येकी चारशे रुपये घेऊन त्यांनी आम्हाला लिफ्ट देण्याचं कबूल केलं. आम्ही मोटारसायकलवर बसून वळणावळणाच्या रस्त्याने वर पोहोचलो. बाकीची मंडळी साधारण तासाभराने पोहोचली.

इथे देवळातही प्रचंड थंडी होती. तरीही बाहेरच्या कुंडात भक्त मंडळी उघड्याने शंभोऽ करत डुबक्या मारत होती. त्यांना पाहूनच आम्हाला हुडहुडी भरली. मी तर वर गेल्यावर मौनव्रतच सुरू केलं. कारण एवढ्या उंचीवर साधं बोलतानाहीश्वास लागत होता. कुंडाभोवतालच्या पाइपवर बर्फाच्या तारा लटकत होत्या. हे वैष्णव पंथीयांचं देऊळ आहे. देवळामागील पर्वतातून एकशे आठ जलधारा मूर्तीच्या पायथ्याशी येतात. तिबेटी परंपरेनुसार त्यांचे गुरू रिंपोंचे यांनी (ज्यांचंएक नाव पद्मसंभवही आहे.) तिबेटला जाताना इथेच तपश्चर्या केली होती. इथला शाळिग्राम अतिशय प्रसिद्ध असून त्याची अतिशय भाविकतेने पूजा केली जाते. हिंदू आणि बौद्धधर्मातील सर्व देवळांमध्ये ही एकच अशी जागा आहे जिथे पंचमहाभूतं नैसर्गिक स्वरूपात अस्तित्वात आहेत. हे स्थान दक्षिण भारतीयांच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचं आहे असं कळलं. आम्हीही मुक्तिनाथाचं दर्शन घेतलं आणि परत निघालो. कडाक्याची थंडी आणि ऑक्सिजनची कमतरता यामुळे कधी एकदा खाली पोहोचतो असं आम्हाला झालं होतं. बसथांब्यावर येऊन बघतो तर तिथे साधा आडोसाही नव्हता. आणि तिथे तिकिटं देणारा माणूस चक्क तीर-कमान घेऊन नेमबाजी करण्यात गुंग होता. बाण सोडायचा, मग लक्ष्यावर न लागलेला बाण दोनशे मीटर अंतरावरून धावत जाऊन आणायचा, असा त्याचा खेळ सुरू होता. त्याला बस न आल्याचं काहीही सोयरसुतक असायचं कारण नव्हतं. आमच्या गेस्ट हाऊसमधला आयरिश गडी त्याच्या खेळाचं व्हिडिओ शूटिंग करण्यात रमला होता. मी अक्षरश: श्वास रोखून बसची वाट पाहत होतो. शेवटी एका जीपवाल्याशी घासाघीस करून सौदा केला आणि परतीची यात्रा सुरू झाली.

पुन्हा जोमसोमला आलो. गावात फेरफटका मारला. आता आमचा नेपाळच्या अंतर्भागातला मुक्काम आटोपता घेण्याची वेळ आली होती. या परिसरात दोनच दिवस काढले, पण खूप दिवसांची विश्रांती मिळाल्यासारखं ताजंतवानं वाटत होतं. नेपाळमध्ये जाऊन आपण काय पाहणार, हा सुरुवातीचा प्रश्न तर कधीच निकाली निघाला होता. पुन्हा एकदा थरारक विमान प्रवास अनुभवत जोमसोमहून पोखराला उतरलो ते नेपाळच्या जादुई कांडीने मंतरलेलं गाठोडं घेऊन. त्या गाठोड्यात पुष्कळ दिवस टिकणारा अद्भुत आनंद होता.

(मुशाफिरी, ऑगस्ट २०१३च्या अंकातून साभार)

व्यंकटेश उपाध्ये







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

अस्मिता फडके15.09.25
छान लेख

गीता अरविंद कोठावळे14.09.25
प्रत्यक्ष नेपाळला गेल्यासारखं वाटलं.वर्णन ऐकून एकदा जाऊन आलं पाहिजे असंही वाटलं

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results