
डर्बन (Durban). शालेय इतिहासातच या दक्षिण आफ्रिकी शहराचं नाव आपल्या कानांवर पडलेलं असतं. (इतिहासाच्या पुस्तकांत ते ‘दरबान’ असं लिहिलेलं असायचं.) गांधीजी तरुणपणी दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांना रेल्वेतून हुसकावून देण्याचा प्रसंग घडला ते रेल्वे स्टेशन डर्बन-प्रिटोरिया रेल्वेमार्गावर आहे.
...आम्ही दक्षिण आफ्रिकेत फिरायला जायचं ठरवलं तेव्हा आमच्या गाठीशी इतकीच माहिती होती. डर्बनच्या आसपास बघण्यासारखं काय काय आहे, हे शोधताना गूगल-कृपेने ते विशिष्ट रेल्वे स्टेशन समोर आलं- पीटरमारिट्झबर्ग (Pietermaritzburg).
‘पीटरमारिट्झबर्ग’
‘पीटरमारिट्झबर्ग’ हे नाव नीट उच्चारण्याची सवय व्हायलाच आधी एक-दोन दिवस गेले. या शहरात पर्यटनाच्या दृष्टीने करण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत. पण आमच्या हाताशी तितका वेळ नव्हता. त्यामुळे ठरवलं, आपल्या इतिहासाचं त्या शहराशी असणारं कनेक्शन, म्हणजे तिथलं रेल्वे स्टेशन, तेवढं बघून येऊ.
डर्बन ते पीटरमारिट्झबर्ग ७०-८० किमी अंतर आहे. डर्बन शहरातून बाहेर पडल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी, दूरवर हिरव्यागार टेकड्या दिसत होत्या. आम्ही गेलो तो ऑक्टोबर-नोव्हेंबरचा काळ म्हणजे दक्षिण आफ्रिकेतला उन्हाळा. पण स्थानिक हवामान आपल्याला फारच सुखावणारं. त्यात त्या दिवशी पावसाळी हवा होती.
चार पदरी रस्ता. शांतपणे जाणारी, पण भरपूर वाहनं. आमचा ड्रायव्हर-कम-गाइड मूळचा भारतीय, पण गेली ४० वर्षं डर्बनमध्ये राहणारा. रस्त्यातल्या मोठाल्या मालवाहू ट्रक्सवर तो वैतागला होता. ‘बोट्स्वाना, मोझांबिक, झांबियातले ड्रायव्हर वाट्टेल तसे गाड्या चालवतात, त्यांना काही पडलेलीच नसते,’ अशी त्याची मुख्य तक्रार होती. ‘आपण-आणि-ते’ या भेदाला नेहमीपेक्षा जरा वेगळा भूगोल चिकटल्यामुळे ऐकायला गंमत वाटत होती. गाइड तसा गप्पीष्ट होता. त्याची बडबड ऐकत तास-दीड तासात पीटरमारिट्झबर्गला पोहोचलो.
शहरात शिरल्यावर आधी नजरेत भरला तो तिथल्या रस्त्यांवरच्या जॅकरांडाच्या झाडांचा निळा-जांभळा सुंदर बहर. पुढच्या दहा-एक मिनिटांत आमची गाडी पीटरमारिट्झबर्ग रेल्वे स्टेशनच्या आवारात शिरली.
पीटरमारिट्झबर्गचं रेल्वे स्टेशन
स्टेशनचा दर्शनी भाग जुन्या पद्धतीचा होता. लाल विटांचं बांधकाम, कौलारू छप्पर, बाहेर पोर्च, माफक कलाकुसर. आपल्याकडच्या ऊटी किंवा सिमला भागातलं एखादं हिल स्टेशन असावं इतपतच आकार-उकार. शांत-निवांत.
स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी एकजण मोठं रजिस्टर घेऊन बसलेला होता. गाइड पुढे झाला. स्थानिक भाषेत काहीतरी बोलून त्याने रजिस्टरमध्ये आमची नावं लिहिली. आणि मागे वळून म्हणाला- ‘‘इधर गांधीजी का सब देखने को आते हैं उन के नाम लिखने पडते हैं। उस को समझ में आया कि आप उस के लिये ही आये हैं।’’

‘गांधीजी का सब’
आम्ही माना डोलावत त्याच्या मागे स्टेशनमध्ये शिरलो. ‘गांधीजी का सब’ म्हणजे नक्की काय काय, याचा अजून काही अंदाज येत नव्हता. त्यात स्टेशन आणि प्लॅटफॉर्म ही दोन प्रमुख पात्रं होती, इतकं एव्हाना समजलं होतं. पैकी प्लॅटफॉर्म तर समोर दिसतच होता. पण नाही... एक तिसरं पात्रही होतं- वेटिंग रूम. स्टेशनमध्ये शिरताच डाव्या हाताला ती वेटिंग रूम दिसली आणि दिसली आतल्या भिंतीवरची मोठी अक्षरं- THE BIRTHPLACE OF SATYAGRAHA.

सत्याग्रहाचं जन्मस्थळ.
नकळत पावलं तिकडे वळली. कोणत्याही आडवाटेवरच्या रेल्वेस्टेशनची वेटिंग रूम जेवढी असेल तेवढीच होती ती, पण संपूर्ण गांधीमय झालेली.
दरवाजासमोरच्या भिंतीवर मोठा टीव्ही स्क्रीन होता. त्याच्या दोन्ही बाजूंना, तसंच वरच्या बाजूला आयताकृती पितळी पाट्यांवर गांधीजी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग ज्यु., आर्चबिशप डेस्मंड टुटू यांची वाक्य/कोट्स कोरलेले होते. आणि आइनस्टाइनचं ते प्रसिद्ध वाक्यही. खोलीच्या डाव्या भिंतीवर जुन्या पद्धतीच्या, उंचच्या उंच दोन बंद खिडक्या होत्या. त्यांच्या काचेच्या तावदानांवर गांधीजींचे तरुणपणातले मोठे फोटो लावलेले होते. काचेपलीकडून येणार्या उजेडामुळे ते जुने, कृष्णधवल फोटो मोठ्या भित्तीचित्रांसारखे दिसत होते. उजव्या बाजूच्या भिंतीवर गांधीजींच्या वेगवेगळ्या वयातल्या फोटोंचं कोलाज होतं. त्या भोवती त्यांच्या आयुष्यातल्या प्रमुख टप्प्यांची माहिती लिहिलेली होती. त्यांच्या आत्मचरित्रातले काही संबंधित परिच्छेदही दिलेले होते. खाली आणखी एक छोटा टीव्ही स्क्रीन होता. त्यावर रिचर्ड ॲटनबरोच्या ‘गांधी’ सिनेमातलं ते विशिष्ट दृश्य पुन्हा पुन्हा दाखवलं जात होतं. (सुरुवातीला दिसलेला मोठा टीव्ही स्क्रीन काही कारणांनी बंद पडला होता.)
त्या सिनेदृश्यामुळे म्हणा, किंवा इतर माहितीमुळे म्हणा, ७ जून १८९३ ची रात्र त्या खोलीत भरून राहिल्यासारखी वाटत होती. ब्रिटिश अधिकार्यांनी गांधीजींना ट्रेनमधून ढकलून दिलं, पाठोपाठ त्यांचं सामानही प्लॅटफॉर्मवर भिरकावून दिलं. गांधीजी आपली लहान हॅन्डबॅग घेऊन या वेटिंग रूममध्ये येऊन बसले. रात्रीची वेळ, कडाक्याची थंडी. तिकडे त्यांचं इतर सामान ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं होतं. त्यात त्यांचा मोठा ओव्हरकोट होता. ब्रिटिशांकडे तो ओव्हरकोट मागितला तर ते पुन्हा आपला अपमान करतील असं वाटून ते तिथेच थंडीत कुडकुडत बसून राहिले...
ते सगळं पाहिलं आणि नोव्हेंबर महिन्यातला तो पावसाळी सुखद गारवा अचानक बोचल्यासारखा वाटायला लागला.
याच जागेच्या जवळपास गांधीजींना ट्रेनच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून बाहेर ढकलून दिलं गेलं
आम्ही त्या वेटिंग रूममधून बाहेर आलो आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेला गेलो. प्लॅटफॉर्म आणि वेटिंग रूमचा परिसर यांच्या मधल्या मोकळ्या जागेत गांधीजींचा फक्त चेहरा दर्शवणारा द्विपुतळा होता- एक पुतळा, दोन चेहरे. एका बाजूला तरुण मोहनदास गांधी आणि दुसर्या बाजूला भारतीय स्वातंत्रलढ्यातले गांधीजी. त्या दोन चेहर्यांकडे बघत पुतळ्याला आपसूक एक फेरी मारली गेली. एका चेहर्यातून दुसर्या चेहर्यात, एका व्यक्तिमत्वातून दुसर्या व्यक्तिमत्वात होणारं संक्रमण बघणार्याने लक्षात घ्यावं असं उद्दीष्ट असेल तर ते साध्य होत होतं. अर्थात हे व्यक्तिसापेक्ष आहे. कुणी हे संक्रमण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतील, कुणी त्या दोन्ही चेहर्यांसहित एक-एक सेल्फी घेतील.
तिथून पुढे गेलो. प्लॅटफॉर्मवर एका ठिकाणी एक कोनशिला बसवलेली दिसली. ‘याच जागेच्या जवळपास गांधीजींना ट्रेनच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून बाहेर ढकलून दिलं गेलं,’ असं त्यावर लिहिलेलं होतं. ते वाचलं आणि मी स्टेशनभर एक नजर फिरवली. स्टेशनचे तीन चिमुकले प्लॅटफॉर्म, सगळीकडे सामसूम होती. समोरच्या प्लॅटफॉर्मवर एका रिकाम्या गाडीची साफसफाई सुरू होती. गाइडकडून समजलं, या स्टेशनवर दिवसभरात एखादी गाडी येत असेल, नसेल. तरी स्टेशन अगदी स्वच्छ राखलेलं होतं. त्यामागे ‘गांधीजी का सब’ हेच कारण असावं का?

‘गांधीजी का सब’ पुढे भारताच्या स्वातंत्रलढ्याशी जोडलं गेलं, त्याची ठिणगी पडली ते हे ठिकाण- सत्याग्रहाचं जन्मस्थळ. ध्यानीमनी नसताना तिथे जाणं झालं. इतिहासातली एखादी घटना वाचून माहिती असणं वेगळं आणि ती जिथे घडली त्या जागेची म्हणून आणखी एक मिती त्यात जोडली जाणं वेगळं. हे वेगळेपण त्यादिवशी तिथे जाणवलं, हे नक्की.
जाता जाता: गांधीजींच्या त्या पुतळ्याच्या गळ्यात भगव्या रंगाचं उपरणं होतं!
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.