आम्ही कोण?
अनुभव 

फिनलंड: एक आगळा अनुभव

  • डॉ. शमिन् पडळकर
  • 24.12.25
  • वाचनवेळ 13 मि.
finland

'इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ लर्निंग सायन्सेस' ही कॉन्फरन्स २०२५मधे फिनलंडची राजधानी, हेलसिंकी इथे झाली. या कॉन्फरन्सच्या निमित्ताने फिनलंडला भेट देण्याची संधी मला मिळाली. फिनलंड हा देश त्याच्या उत्तम शिक्षण-पद्धतीसाठी आणि जगातल्या सर्वात आनंदी देशांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. पण तरीही आपल्या भारतीयांचा ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी वगैरे देशांमध्ये अधिक वावर आहे, आपल्या वाचनात, सिनेमात त्यांच्याविषयीचे संदर्भ येत असतात. परंतु ज्यांना स्कँडिनेव्हियन किंवा नॉर्डिक देश म्हणून ओळखलं जातं, त्यांच्याबद्दल आपल्याला तुलनेने कमी माहिती असते. अनेकांचा असा समज असतो की फिनलंड हा स्कँडिनेव्हियन देश आहे. पण तसे नाही. नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क हे स्कँडिनेव्हियन देश आहेत. भौगोलिक दृष्ट्या सारख्या असणाऱ्या फिनलंड, आइसलँड, स्वीडन, डेन्मार्क आणि नॉर्वे या पाच देशांना मिळून नॉर्डिक देश म्हणतात. स्कँडिनेव्हियन देशांमध्ये ओल्ड नॉर्स या भाषेपासून तयार झालेल्या नॉर्थ जर्मॅनीक भाषा बोलल्या जातात पण फिनिश भाषा मात्र रशियाच्या उत्तरभागात अगदी कमी बोलल्या जाणाऱ्या उरॅलिक (uralic) भाषांशी संबंधित आहे. त्यामुळे एकंदरच युरोपीय देशांमध्ये फिनलंडची फिनिश ही भाषा शिकायला अवघड मानली जाते.

भारतातून आमचा तीन संशोधकांचा गट ८ जून २०२५ला पहाटेचं विमान घेऊन इस्तम्बूलमार्गे संध्याकाळी हेलसिंकीला पोहोचला. हेलसिंकी आणि त्याच्या आजूबाजूचा भाग पाणथळ आणि अतिशय हिरवागार असल्याचं विमानातून दिसलं. अनेक लहान तळी, काही ठिकाणी गर्द अल्पाइन जंगलं तर काही ठिकाणी कुरणं दिसतात. जून महिना असल्यामुळे पोपटी हिरव्या रंगाला सुरेख तकाकी होती. आम्ही पोचलो त्या संध्याकाळी झकास सोनेरी उन्ह होतं. मधे तीन दिवस पाऊस पडला तेव्हा खूपच थंडी वाजली पण आमच्या मुक्कामाच्या सुरूवातीला आणि शेवटी उन्हाचे दिवस मिळाले तेव्हा आकाश अगदी निळंशार होतं आणि हवाही आल्हाददायक होती.

एयर बीएनबीतर्फे आम्हा तिघांना राहण्यासाठी एक लहानसा फ्लॅट बुक केला होता. तो कॉन्फरन्सच्या ठिकाणापासून थोडा दूर होता. पण हेलसिंकीमधली सार्वजनिक वाहतूक सेवा चांगली होता. विमानतळावरून आधी मेट्रोने आणि मग चालत आमच्या अपार्टमेंटला पोचायला रात्रीचे ८.३० वाजले, पण जून महिना असल्यामुळे रात्रीही लख्ख उजेड होता!

९ तारखेला सकाळी माझ्या सहकाऱ्यांची दुसरी कामं होती त्यामुळे मी एकटीच बसने कॉन्फरन्ससाठी गेले. कॉन्फरन्स हेलसिंकी विद्यापीठाच्या मुख्य आवारात होती. बस स्टॉपची स्पेलिंग्स इतकी वेगळी होती की ती नावं आम्हाला उच्चरताही येत नव्हती. सारे गोरे लोक! आपल्यासाखे दिसणारे कोणी नाही. इंग्रजी कोणाला फारसं येत नाही. त्यात लोक अगदी इस्त्री केलेल्या तोंडाने वावरत होते, त्यामुळे कोणाला काही विचारण्याची सोय नाही. बसमधे लावलेल्या यंत्राने तिकीट काढणे आणि योग्य स्टॉपला उतरून कॉन्फरन्सच्या ठिकाणी पोचणे एवढं केल्यावर मला मोठीच बाजी मारल्याचा आनंद झाला.

विद्यापीठाचे मुख्य आवार Senaatintori म्हणजेच सिनेट चौकात आहे. प्रशस्त चौकाच्या तीन बाजूंना भारदस्त इमारती आहेत. विद्यापीठाच्या इमारतीत प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवलेल्या प्राचीन ग्रीक मुर्त्यांच्या प्रतिकृती आहेत. सिनेट चौकातील लक्ष्यवेधी स्थानामुळे आणि या मुर्त्यांमुळे विद्यापीठाच्या इमारतीचा एकदम जबरदस्त प्रभाव पडतो!

finland

दुपारपर्यंत माझे सहकारी कॉन्फरन्सच्या ठिकाणी पोचले. पहिल्या दिवशीचे काम आटपून अपार्टमेंटला परत येताना आम्ही सलाडसाठी लागणाऱ्या भाज्या, अंडी, चीज, ब्रेड, योगर्ट वगैरे घेऊन आलो. येऊन जेवण बनवले आणि त्यावर तुटून पडलो. मजा आली! ही व्यवस्था रेस्टॉरंटमधे खाण्यापेक्षा बरीच स्वस्त पडते म्हणून पुढचे सगळे दिवस नाश्ता तरी आम्ही असाच केला आणि अजून एक-दोन वेळा रात्रीचे जेवणही फ्लॅटवरच केले.

कॉन्फरन्समधे तर आम्हाला शिकायला मिळालेच, पण या प्रवासात आम्हाला बाकी बरीच नवी माहिती मिळाली. वेळ मिळेल तेव्हा संध्याकाळी आम्ही हेलसिंकीमधे फिरत असू. शेवटच्या दिवशी, म्हणजे शनिवारी काही प्रेक्षणीय स्थळंही पाहिली. फक्त चार तासांची रात्र. त्यामुळे आम्ही रात्री १० वाजेपर्यंत बाहेर फिरत असू. तिथे सर्व सार्वजनिक वाहतूकीसाठी म्हणजे मेट्रो, बस, ट्रेन एवढेच काय बोटही, यांच्यासाठी एकत्र पास मिळतो. आम्ही असा ६ दिवसांचा पास काढला होता.

हेलसिंकीमध्ये फिरतांना सगळ्यात आधी आपल्याला दिसतात ते हेल्मेट आणि सायकल चालवण्याचा तंग पोशाख घालून सुई सुई जाणारे सायकलस्वार! सर्वत्र स्वतंत्र बाईकपाथ आहेत. लोक सायकली आणि आपल्याकडे लहान मुलांच्या असतात तशा तीन चाकी स्कूटर मोठ्या प्रमाणात वापरतात आणि त्या भाड्यानेही मिळतात. स्कूटर चालवून बघावी अशी आम्हाला फार इच्छा झाली पण आमच्याकडे हेल्मेट इत्यादी नव्हते आणि हेल्मेट न घालता साधी खेळण्यातल्यासारखी स्कूटर चालवली तरी १०० युरो दंड आहे म्हणल्यावर आम्ही त्या भानगडीत पडलो नाही!

आमच्या फ्लॅटच्या जवळच एक मोठा जलाशय होता. समुद्राच्या पाण्याचेच हे एक लगून होते. त्याच्या बाजूने मोठा वॉकिंग ट्रॅक होता. दोन्ही बाजूला जंगली गुलाब आणि इतर रानफुलांची झुडुपं होती. माणसं, मुलं पाण्याच्या बाजूने चालत-पळत होती. पाणी स्वच्छ होतं, त्यात मासे, पक्षी वगैरे होते. एक लहानसा झरा या लगूनला येऊन मिळत होता. तिथे छोटीशी पाणचक्की लावून त्यावर वीज तयार केली जात होती. त्या विजेचा वापर करण्यासाठी बाजूला एक छोटासा चार्जिंग पॉईंट केला होता!

finland

बाजूलाच एक टेकडी होती. आम्ही तिथेही गेलो. संध्याकाळचे मऊ ऊन पडले होते. एका बाजूला तळं आणि आजूबाजूला घरं, खेळाची मैदानं वगैरे दिसत होती. टेकडीवर नैसर्गिकपणे आलेला झाड- झाडोरा होता. हेलसिंकी शहरात अशा अनेक लहान टेकड्या आहेत. लोकांवस्तीतही अशा लहान मोठ्या ग्रीन स्पेसेस मुद्दाम राखून ठेवल्या आहेत. फिनलंड आणि इतर नॉर्डिक देश पर्यावरणाच्या संरक्षणाच्या बाबतीत बरेच प्रयत्न करत आहेत हे ऐकून होते. तिथे प्रत्यय आला.

हेलसिंकीमधे सेकंड-हॅंड वस्तू विकणारी मोठी दुकानं आहेत. स्थानिक लोक नेहमीच्या वस्तू आणायला आधी तिथे जातात. संसाधनांचा अपव्यय टाळण्यासाठी या समाजाने ही पद्धत आत्मसात केली आहे. आम्ही अशा एका दुकानात गेलो. तिथे चादरी, कपडे, स्वेटर्स, पुस्तकं, खेळणी, भांडी-कुंडी असं जवळ जवळ सर्व प्रकारचं जीवनावश्यक सामान होतं.

हेलसिंकी महापालिकेने पर्यटकांसाठी दोन तासांच्या पायी टूर्सही ठेवल्या आहेत. त्यासाठी काही फी नसते पण गाईडला काही टीप देणं अपेक्षित असतं. आमचा इंग्लिशमधून माहिती सांगणारा गाईड मूळचा रशियन होता आणि हेलसिंकी विद्यापीठात शिकत होता. ही फेरी सिनेट चौकातून म्हणजे युनिव्हर्सिटीच्या समोरूनच सुरु झाली. चौकाच्या मध्यभागी रशियाचा सम्राट, पहिला अलेक्सान्डर याचा पुतळा आहे. आता रशियाचा सम्राट इथे काय करतो आहे? तर, साधारण बाराव्या शतकापासून १८०९ पर्यंत फिनलंड स्वीडनच्या ताब्यात होता आणि १८०९ ते १९१७ रशियाच्या ताब्यात होता! काही युरोपीय देशही इतक्या अलीकडेपर्यंत पारतंत्र्यात होते हे मला माहीतच नव्हतं! फिनलँडच्या या इतिहासामुळे तो बाकी युरोपशी जरा फटकूनच असतो. इतकंच काय, नाटोचं सदस्यत्वही फिनलँडने २०२३ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर नाईलाजाने घेतलं.

फिनलँड हा देश मुळात दुर्गम आणि थंड असल्यामुळे तिथे पूर्वापार आदिवासी जमातींची तुरळक वस्ती होती (आजही या देशाची लोकसंख्या सत्तावन्न लाखापेक्षाही कमीच आहे). त्यांचे काही कधी मोठे साम्राज्य नव्हते. तिथे अजूनही 'सामी' (Saami) या अति-उत्तरेकडच्या जमातीने आपलं स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवलं आहे आणि त्यांना अनेकदा त्यासाठी फिनिश सरकारशी झगडावंही लागलं आहे. शेजारच्या स्वीडनच्या अधिपत्याखाली असल्यामुळे इथले साधारण ५ टक्के लोक आणि मुख्य म्हणजे इथले सरदार कादरदार हे स्वीडिश आहेत. (इथे आता लोकशाही असली आणि जुनी पदं नाममात्र राहिली असली तरी ही जुनी घराणी पैसे आणि प्रभाव राखून आहेत.) त्यामुळे इथल्या मुलांना शाळेत दोन्ही भाषा शिकवतात व जुजबी इंग्रजीही शिकवतात. सर्वत्र फिनिश आणि स्विडिश या दोन्ही भाषांमध्ये पाट्या दिसतात. फिनलंडमध्ये पीएचडीचा प्रबंध फिनिश किंवा स्वीडिश यापैकी कुठल्याही भाषेत लिहीता येतो. फिनिशमध्ये प्रबंध लिहिला तर त्यासोबत सारांशाचा स्विडिशमधला अनुवाद जोडावा लागतो आणि स्विडिशमधे प्रबंध लिहिला तर सारांशाचा फिनिशमधला अनुवाद जोडावा लागतो.

फिनिश लोक इटालियन किंवा फ्रेंच लोकांसारखे खूप व्यक्त होणारे नाहीत. ते जास्त बोलत नाहीत, रस्त्याने जाताना अनोळखी लोकांकडे बघून हसत नाहीत (पण असा अनुभव इतर अनेक पश्चिमी देशांमध्ये येतो!), हातवारे करत नाहीत, स्वतःतच मग्न असतात. आपल्याकडच्या आदिवासी जमातींबद्दलही माझा साधारण असाच अनुभव आहे. त्यांचा आनंद, दुःख, निराशा याबद्दल ते सहसा बोलून दाखवत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरही ते फारसं उमटत नाहीत. पण तुम्ही जर त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या एखाद्या सूचक उद्गाराने किंवा कृतीने त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोचतात. फिनिश लोकांचे प्रथमदर्शनी इस्त्री केल्यासारखे चेहरे हे काही तुसडेपणाचं प्रतीक नाही; त्यांना काही विचारलं तर ते अगदी आपुलकीने उत्तरं देतात आणि पूर्ण मदत करतात, हे ४-५ दिवसातच आमच्या लक्षात आलं.

आता पुन्हा सिनेट चौकात येऊ. चौकात अलेक्सन्डरच्या पुतळ्याच्या पाठीमागे उंच पायऱ्यांवर स्थित मोठे संगमरवरी कॅथीड्रल आहे. कॅथीड्रलच्या उजव्या बाजूला पंतप्रधानांचं कार्यालय आहे, डाव्या बाजूला (म्हणजे पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या समोर) विद्यापीठाची इमारत आहे आणि कॅथीड्रलच्यासमोर जे रस्ते जातात ते बंदरावर जाऊन पोचतात. बंदराच्या समोर आणखीही महत्त्वाच्या इमारती आहेत. हेलसिंकी महापालिकेचा सिटी हॉल, फिनिश आणि स्वीडिश एम्बसीच्या इमारती, राष्ट्रपती-निवास आणि टेकाडावर लाल दगडातलं कॅथेड्रल. पंतप्रधान, राष्ट्रपती यांची निवासस्थानं, कार्यालयं इतर इमारतींबरोबर इतकी सहज मुख्य रस्त्यांवर, फारसा तामझाम किंवा सुरक्षा नसताना उभी असलेली पाहून आश्चर्य वाटलं आणि सामाजिक उतरंड कमी असणं म्हणजे काय याचा दाखला मिळाला.

finland

फिनिश स्थापत्यावर, विशेषतः तिथल्या चर्चच्या बांधणीवर स्विडीश आणि रशियन स्थापत्याचा प्रभाव असला तरी खास फिनिश पद्धतीच्याही इमारती तिथे आहेत. त्यांची दोन वैशिष्ट्य आहेत. पहिलं म्हणजे ते बांधकामासाठी घोटीव दगड न वापरता किंचित ओबडधोबड पिवळट दगडांचा वापर करतात आणि दुसरं, दारांजवळ किंवा वळचणीला खारी, माकडं, फळं इत्यादी नैसर्गिक आकृतीबंध कोरलेले असतात.

एखाद्या शहरातलं सर्वात मोठं चर्च म्हणजे कॅथीड्रल. मग इथं दोन कॅथीड्रल कशी असा प्रश्न पडू शकतो. तर सिनेट चौकातलं संगमरवरी कॅथीड्रल हे लुथरन पंथाचं, मार्टिन ल्युथर या जर्मन धर्म सुधारकानं सुरु केलेल्या पंथाचं आहे आणि लाल दगडातलं, सोनेरी घुमटांचं कॅथीड्रल ऑर्थोडॉक्स पंथाचं आहे. ऑर्थोडॉक्स पंथ रशिया आणि इतर पूर्व युरोपियन देशांमध्ये पाळला जातो. फिनलंड मध्ये ६२ टक्के जनता लुथरन पंथाची आहे, १ टक्का जनता ऑर्थोडॉक्स पंथाची आहे आणि १ टक्का जनता ख्रिश्चन धर्माचे इतर पंथ मानते. २ टक्के जनता 'इतर' धर्मांची आहे. मग उरलेली ३५ टक्के जनता कुठल्या धर्माची आहे? तर ही तब्बल ३५ टक्के जनता कोणताही धर्म मानत नाही. हेलसिंकीमधे चर्चला जाणाऱ्या लोकांची संख्या बरीच कमी झाली आहे. त्यामुळे तिथल्या काही ऐतिहासिकदृट्या महत्वाच्या चर्चच्या इमारती आता संग्रहालयं किंवा प्रदर्शनांसाठी वापरल्या जाऊ लागल्या आहेत. धर्म न मानताही एखादा समाज आनंदाने आणि सत्वशीलपणे राहू शकतो, याचंच हे उदाहरण.

बंदरावर लाकडी खोल्यांमधून सौना स्नानाची व्यवस्था आहे. सौना ही एक खास फिनीश प्रथा आहे. हा प्रकार सहसा हिवाळ्यात करतात. पाहुणे, मित्र-मंडळी एकत्र जमली की सौनाला जातात. एका लहानशा लाकडी खोलीत शेगडी पेटवून त्यावर गोटे गरम करतात. त्यावर थोड्या थोड्या वेळाने पाणी टाकून वाफ करतात आणि खोली गरम वाफेने भरून टाकतात आणि त्याच्या भोवताली गप्पा गोष्टी करत बसतात. पुरेशी उब झाली की बाहेर जाऊन थंड पाण्यात डुबकी मारुन किंवा बर्फात लोळून यायचं! मग पुन्हा उबदार खोलीत जाऊन बसायचं. असं साधारण तीन वेळा करायचं. सौनाचे तब्बेतीला बरेच फायदे होतात असं म्हणतात. बंदराजवळच्या सौनाची सोय पर्यटकांसाठी आहे, त्यामुळे तिथे पोहण्याचा पोषाख घातलेला चालतो, पण खरे सौना स्नान फिनिश लोक नागड्यानेच कारतात! थंडीमुळे लोक सार्वजनिक ठिकाणी अंगभर कपडे घालून असतात. पण हे लोक नग्नतेचा बाऊ करत नाहीत, हे ही खरंच!

हेलसिंकीचे ऊडी (Oody) वाचनालय ही एक भन्नाट गोष्ट आहे. फिनलँडच्या पार्लमेंटच्या समोरच मोठी मोकळी जागा आहे आणि बरोबर उलट्या दिशेला ऊडी हे सार्वजनिक वाचनालय आहे. वाचनालयात पुस्तकंच नव्हेत, तर सीडी, खेळ, पासून ते प्रोजेक्टर वगैरे यंत्रांपर्यंत सर्व गोष्टी आहेत. वाचनालयात कुठेही जायला सर्वांना विना तिकीट परवानगी आहे आणि हेलसिंकीच्या नागरिकांना तिथल्या सर्व गोष्टी विनामूल्य उसन्या नेता येतात! १२ जूनला हेलसिंकी दिवस असतो त्यामुळे त्या दिवशी आणि त्यानंतरच्या रविवारपर्यंत तिथे सर्वत्र उत्सवाचे वातावरण होतं. ऊडी वाचनालयाच्या समोरही संगीतकार वाद्य वाजवत होते आणि ३०-४० जण जमून नृत्य करत होते. पण त्यात गोंगाट नव्हता.

finland

सी-लाईफ हे एक मोठं ऍक्वेरियमही आम्ही पाहिलं. ते लीनानमाकी अम्युसमेंट पार्कमध्ये आहे (Linnanmäki amusement park). त्यादिवशी हेलसिंकी दिवस असल्यामुळे आम्हाला आकाशपाळण्याची एक राईड फुकटात मिळाली. उंचावरून शहर बघायला छान वाटलं!

१३ तारखेला कॉन्फरन्स संपली. आम्ही आधी हार्बरवर चक्कर मारून आलो. बंदराच्या समोर मोकळ्या जागेत खाण्याचे स्टॉल्स लावलेले असतात आणि ओल्ड मार्केट हॉल, म्हणजे जुन्या बाजारातही लहान दुकानांमधून चांगलं आणि रेस्टोरंटपेक्षा स्वस्त जेवण मिळतं. आम्ही ओल्ड मार्केट हॉलमध्ये साल्मोन सूप, बेक्ड साल्मोन, रेन डियरचे हॉट डॉग वगैरे खाल्ले. तिथला साल्मोन खूपच छान, ताजा ताजा होता. एका स्टॉलवर रसरशीत चेरी, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज होत्या. त्याही खाल्ल्या. सिटी हॉलच्या समोरच्या स्टेजवर फॅन्सी ड्रेस स्पर्धा सुरु होती ती थोडा वेळ पाहून अपार्टमेंटवर गेलो.

१४ तारखेला, शनिवारी सकाळी १० वाजता आम्ही म्युजियम ऑफ नॅचरल हिस्टरी बघायला गेलो. तिथे फिनलँडमधल्या जीवाश्मांच्या (fossils) सहाय्याने उत्क्रांतीचा इतिहास कल्पकतेने मांडलेला आहे. तिकिटाबरोबर ऑडिओ गाईडही (हेडफोन) मिळतो आणि आपली भाषा निवडून त्या भाषेत प्रत्येक दालनात माहिती ऐकता येते. लहान मुलांना हाताळता येतील अशा वस्तू जागजागी ठेवल्या आहेत, आणि मुख्य मांडणीच्या खालच्या ड्रॉवर्समध्ये, पॅनल्सवर अधिक माहिती दिली आहे. वैज्ञानिक प्रदर्शन कसं असावं त्याचा हा उत्तम नमुना वाटला.

दुपारी बोटॅनिकल गार्डनला गेलो. या बागेच्या एका भागाची रचना झाडांची उत्क्रांती कशी झाली त्याप्रमाणे केली आहे. लहान मोठे कप्पे करून त्यात एका प्रकारची झाडं लावली आहेत. वेगळी दिसणारी झाडं एकाच फॅमिलीची कशी असू शकतात, फुलं येणारी झाडं किती अलीकडीची आहेत, त्याआधी कसली झाडं होती वगैरे माहिती त्यातून मिळते. Ginkgoaceae या झाडाच्या फॅमिली मधली गिन्को बिलोबा ही एकच प्रजाती आता शिल्लक आहे. तिचाही एक वृक्ष (जो एरवी चीनमध्ये सापडतो) एका कप्प्यात एकटाच उभा आहे. काही झाडं आपल्या इथल्या एखाद्या झाडासारखी वाटत. त्यांच्या फॅमिलीनेमवरून ती आपल्या इथल्या झाडांची भाऊबंधच आहेत, असं आमचा सहकारी रफ़ीख सांगे. रफ़ीख जीवशास्त्राचा अभ्यासक आहे, त्याने फोल्डस्कोप हा कागदाचा मायक्रोस्कोप सोबत आणला होता. त्यातून त्याने वेगवेगळ्या फुलांचे पराग दाखवले.

finland

या संस्था बघतांना एक गोष्ट कळली. विद्यापीठातले त्या त्या शाखांचे त्याचप्रमाणे विज्ञान-शिक्षणाचेही प्राध्यापक या संस्थांबरोबर जवळून काम करतात. काहींच्या जॉईंट अँपॉन्टमेंट्स आहेत तर काहींचे पीएचडीचे विद्यार्थी या संस्थांमध्ये संशोधन करत आहेत. त्यामुळे संशोधन लोकाभिमुख आणि वास्तववादी होतं आणि फक्त छापील न राहता लगेच उपयोगात आणता येतं. विद्यापीठांमधील लोक शाळांबरोबरही असेच जोडलेले आहेत, असं ऐकलं.

शनिवारी संध्याकाळी हेलसिंकी दिनाच्या निमित्त अलेक्सान्डर रस्त्यावरुन जाणारी मिरवणूक बघितला. नटून थटून नाचत नाचत लहान-मोठे सर्वजण रस्त्यावरून जात होते. परेड बघून झाल्यावर आम्ही सौमेनलींना (Suomenlinna) बेटावर जाणारी फेरी पकडली. पोचायला जेमतेम २० मिनिटं लागतात. हा एक समुद्री किल्ला आहे आणि आजही तो फिनलँडच्या सैन्यदलाकडेच आहे. अजूनही त्याची तटबंदी मजबूत आहे. सध्या तो पर्यटनासाठीच वापरला जातोय. बेटाच्या तटावरून एक मोठी चक्कर मारून १० वाजता अपार्टमेन्टवर परत आलो.

दुसऱ्या दिवशा परतीच्या विमानात बसलो. फिनलंड आपल्या फक्त ३० वर्ष आधी स्वतंत्र झालाय, हे कळल्यावर एक वेगळीच आपुलकी वाटली. त्यांनी एवढ्या कमी काळात इतकी प्रगती केली. प्रगती म्हणजे फक्त रस्ते, गाड्या, मोठाल्या इमारती नाही; तर पायाभूत सुविधा, उत्तम शिक्षण व्यवस्था, आपला निसर्ग जपायची बुद्धी, आणि प्रत्येक नागरिकाने आनंदी राहावं यासाठी केलेले प्रयत्न. आपल्याला कधी बरं हे जमणार असा प्रश्न पुनःपुन्हा पडत राहिला.

श्रीमती लीलाताई बापूसाहेब पाटील ट्रस्टच्या आर्थिक साहाय्यामुळे मला ही संधी मिळाली. त्यांचे मनापासून आभार!

डॉ. शमिन् पडळकर

डॉ. शमिन् पडळकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER), पुणे येथे व्हिसिटिंग फॅकल्टी आहेत. गेली वीस वर्ष त्या विज्ञान शिक्षणात काम करत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 3

Preeta nagnath 25.12.25
तुझ्या बरोबर फिरून आले मी पण.. ☺️

प्राची25.12.25
लेख उत्तम आहे. बर्याच दिवसांनी मराठी वाचायला मिळाले.

रसिया 24.12.25
धर्माशिवाय समाज आनंदाने राहू शकतो, गोंगाटाशिवाय उत्सव साजरा करता येतो आणि नग्नतेचा बाऊ करायचा नसतो एव्हडं आपल्या समाजाला कळलं तरी बरेच पुढे सरकू आपण...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results