आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

अक्कलकोट: गाव स्वामी समर्थांचं

  • युनिक फीचर्स
  • 27.06.26
  • वाचनवेळ 32 मि.
akkalkot

स्वामी समर्थांच्या नगरीत स्वागत असो' 

अक्कलकोट गावात प्रवेश करताच या फलकाने आपलं स्वागत होतं. अक्कलकोट एस.टी. स्थानकावर उतरताच रिक्षाचालक लगबगीने पुढे येतात. 

‘चलो स्वामी मंदिर चलना है क्या?'

हा त्यांचा प्रश्न असतो हे स्वाभाविकच. कारण इथं येणारा बहुतेक प्रत्येकजण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेला असतो. ‌‘जय जय श्री स्वामी समर्थ' हा इथला परवलीचा मंत्र. इथल्या घरा-घरांवर, दुकाना-दुकानांवर हा मंत्र लिहिलेला दिसेल. या साऱ्या गावावर स्वामी समर्थांची दाट सावली पसरली आहे. याची प्रचीती एस.टी.स्थानकापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या वटवृक्ष स्वामी मंदिरापर्यंत जाता जाता सहज येते. ‌‘समर्थकृपा', ‘गुरुकृपा' किंवा ‌‘स्वामींचा आशीर्वाद' अशा उल्लेखाविना एखादी पाटी दिसली तर तो केवळ अपवादच ठरेल. 

वटवृक्ष स्वामी मंदिराच्या परिसरात सर्वसामान्य स्वामी भक्तांची नित्यनियमित गर्दी असते. शिवाय कोणत्याही तीर्थक्षेत्रात दिसतात तसे भगवी कफनी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि कपाळावर गंधाचा भव्य टिळा ल्यालेले दाढी-जटाधारी साधू इथेही नजरेत भरतात. स्वामींचा भक्तसंप्रदाय मोठा आहे. साऱ्या महाराष्ट्रात तो पसरला आहे. इतकंच नव्हे, तर स्वामींच्या प्रभावाने महाराष्ट्राच्या कक्षा ओलांडल्या आहेत. स्वामींचा भक्तवर्ग दिवसे न दिवस वाढतच आहे, त्यामुळे अक्कलकोटमधली गर्दीही वाढत आहे. दिवसाला सरासरी सात-आठ हजार भाविक सहज अक्कलकोटला येत असतील!

अक्कलकोट हे काही पंढरपूर-तुळजापूर सारखं प्राचीन आणि पारंपरिक तीर्थक्षेत्र नाही. भोसले घराण्याच्या एका वंशजाचं संस्थान ही या गावाची जुनी ओळख. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एक अवलिया या गावात आला. स्वामी समर्थ म्हणून त्याचा बोलबाला झाला. या लौकिक पुरुषाच्या पारलौकिक स्पर्शाने या गावाचा महिमा वाढला. या गावाला नवी ओळख मिळाली. धार्मिक-आध्यात्मिक अधिष्ठान असा अक्कलकोटचा आजचा लौकिक आहे आणि हा लौकिक हे गाव कसोशीने जपत आहे. याला कारणही आहे. या गावाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय धागेही या लौकिकाशी घट्टपणे जोडले गेले आहेत.

इतर चार गावांसारख्या असणाऱ्या एका गावात श्रद्धेची एक परंपरा तयार होते. तिचा पद्धतशीर प्रचार-प्रसार होतो. त्यातून एक तीर्थक्षेत्र घडतं. लक्षावधी लोकांचं ते श्रद्धास्थान होतं. लोक आपल्या पावलांनी चालत इथे येतात. देवधर्माबरोबरच दानधर्म करतात. त्यांच्या सोयी-सुविधेसाठी इथे व्यवस्था उभ्या राहतात. या साऱ्या घडामोडीतून गावाचं अर्थकारण बदलतं. समाजकारण बदलतं. अक्कलकोट या संदर्भात लक्षणीय उदाहरण आहे.

संस्थान ते देवस्थान

अक्कलकोट हे गाव सोलापूर जिल्ह्यातलं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं. सोलापूरपासून ३८ किलोमीटर अंतरावर सोलापूर-गुलबर्गा हमरस्त्यावर वसलेलं. सर्व संतांचं माहेरघर मानली गेलेली पंढरी सोलापूर जिल्ह्यातच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान असलेली तुळजापूरची तुळजाभवानी नकाशावर जरी उस्मानाबाद जिल्ह्यात असली, तरी ती सोलापूरच्या निकटच आहे. तीच गोष्ट नृसिंह सरस्वतींच्या जागृत दत्तस्थान म्हणून मानल्या गेलेल्या गाणगापूरची. हे गाणगापूर गुलबर्गा जिल्ह्यात आहे, पण महाराष्ट्रातल्या भाविकांना सोलापूर ओलांडूनच तिथे जाता येतं. तीर्थक्षेत्रांचे हे तीन कोन साधणाऱ्या सोलापूरला अलीकडच्या काळात अक्कलकोटचा चौथा कोन जोडला गेला आहे. वर्षभरात लक्षावधी लोक पंढरीच्या दर्शनासाठी येत असतात. तुळजापूर आणि गाणगापूरचा महिमाही मोठा आहे. या तीर्थक्षेत्रांची यात्रा करणारी भाविक मंडळी आधी सोलापूरला येतात, मग तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर असा प्रवास करून आपल्या घरी परततात. त्यामुळे तुळजापूरचा, पंढरपूरचा आणि गाणगापूरचा भाविकवर्ग सहसा अक्कलकोटचा थांबा चुकवत नाही. या तीर्थक्षेत्रांच्या सान्निध्यामुळेही अक्कलकोटला भाविकांची सतत वर्दळ असते. मात्र गेल्या काही वर्षात अक्कलकोटचा महिमाही स्वतंत्रपणे प्रचंड वाढला आहे. वर्षभरात असंख्य भाविक खास अक्कलकोटच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत.

हेही वाचा - मढी : ताणलेल्या सलोख्याचं पुढे काय होणार?

आज अक्कलकोट हे गाव स्वामी समर्थांसाठी ओळखलं जात असलं तरी स्वामी समर्थ मूळचे अक्कलकोटचे नाहीत. ते इथे आले साधारण दीडशे वर्षांपूर्वी म्हणजे १८५७ मध्ये. तेव्हा ह्या गावाला ओळख होती संस्थानाची. शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा या गावावर अंमल होता. पण १८४८ मध्ये इंग्रजांनी हे संस्थान खालसा केलं. पुढे दहा वर्षांनी स्वामी समर्थ इथे आले तेव्हा मालोजीराजे गादीवर होते. तेव्हा मालोजीराजेंना मोठा मान होता आणि स्वामी समर्थांनाही त्यांचा आश्रय लाभला. आज परिस्थिती पूर्ण पालटली आहे. दीडशे वर्षांनंतर स्वामी समर्थांचा महिमा एवढा वाढला आहे, की या गावाची ओळख संस्थानामुळे नव्हे तर स्वामी समर्थांमुळे तयार झाली आहे. संस्थानिकांचे, त्यांच्या कारभाऱ्यांचे, दरबाऱ्यांचे, मानकऱ्यांचे वारसदार ‌‘स्वामी समर्थ' या नावाच्या वलयाच्या आश्रयाने आपली पत-प्रतिष्ठा सांभाळत आहेत.

१८५७ साली आलेल्या स्वामी समर्थांनी १८७८ मध्ये आपला देह सोडला. या काळातील बराचसा तपशील उपलब्ध आहे, पण ते इथे येण्यापूर्वीचा इतिहास संदिग्ध आहे, विस्कळीत आहे. स्वामींची चरित्र अनेकांनी लिहिली आहेत. मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतूनही लिहिलेली आहेत. पण यापैकी बहुतेक सगळे चरित्रकार स्वामीभक्त आहेत. त्यांनी श्रद्धेच्या अंगाने ही चरित्रं लिहिलेली आहेत. स्वामींचा महिमा सांगणं या उद्देशाने ती लिहिलेली आहेत. साहजिकच त्यामध्ये स्वामींच्या लीला आणि चमत्कारांवर अधिक भर असल्याचं आढळून येतं. स्वामींविषयी वस्तुनिष्ठ माहिती मात्र मिळत नाही. लोकभावना आणि लोकश्रद्धेच्या पलीकडे जाऊन स्वामींच्या चरित्राचा वेध घेण्याचा प्रयत्न कोणी केलेला दिसत नाही. 

स्वत: स्वामींनीही त्यांच्या जीवनकाळात आपल्या शिष्यांना-भक्तांना आपला इतिहास सांगितल्याचं आढळत नाही. स्वामींच्या उपलब्ध चरित्रांवरून जी माहिती समोर येते, त्यानुसार, स्वामींच्या शिष्यांनी त्यांना ‌‘आपण कोण?' असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी ‌‘दत्तनगर, मूळ पुरुष वडाचं झाड, मूळ मूळ' असं उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरावरून भक्तगणांनी ते दत्तात्रेयाचे अवतार असल्याचं मानलं.

एका पारशी मित्रासोबत एका इंग्रज वकिलाने स्वामींची भेट घेतली असता त्यांनी त्याला काही माहिती दिल्याचा उल्लेख मिळतो. त्यानुसार स्वामी कर्दळीवनातून आले. त्यांनी भारतभर भ्रमण केलं. नंतर मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असे मुक्काम करत ते अक्कलकोटला आले. या इंग्रज वकिलाने आपल्या रोजनिशीत ही माहिती लिहून ठेवली होती, असं म्हणतात. मात्र या रोजनिशीची मूळ प्रत आणि इंग्रज वकिलांचं नेमकं नाव मिळत नाही. पण स्वामी कर्दळीवनातून आले, या माहितीच्या आधारावर भक्तगण त्यांना नृसिंह सरस्वतींचा अवतार मानतात. दत्तात्रेयांचे अवतार मानले जाणारे नृसिंह सरस्वती कर्दळीवनातून गुप्त झाले, अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार, नृसिंह सरस्वती कर्दळीवनातून उत्तरेकडे गेले, छेली नामक एका गावाजवळ रानात त्यांनी समाधी लावली. या समाधी अवस्थेत ते दीर्घकाळ होते. त्यांच्या देहाभोवती वारूळ तयार झालं. एक दिवस एक लाकूडतोड्या त्या भागात लाकडे तोडण्यासाठी आला. त्याने अजाणतेपणी कुऱ्हाडीने या वारुळावर घाव घातला असता, तो समाधिअवस्थेत असलेल्या नृसिंह सरस्वतींच्या मांडीवर बसला. त्यामुळे त्यांच्या मांडीवर व्रण पडला पण त्यातून रक्त आले नाही. या घावामुळे नृसिंह सरस्वती समाधिअवस्थेतून बाहेर आले आणि तेच स्वामी समर्थ म्हणून प्रकटले. स्वामींच्या मांडीवरचा व्रण ही संगती स्पष्ट करतो, असं सांगितलं जातं. 

स्वामी हे नृसिंह सरस्वतींचे अवतार म्हणजेच पर्यायाने दत्तात्रेयाचे अवतार असल्याचं ठासून प्रतिपादन करणारी आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार, अक्कलकोटचे तत्कालिन संस्थानिक मालोजीराजे हे दत्तभक्त होते. ते दरवर्षी नित्यनेमाने गाणगापूरला जाऊन नृसिंह सरस्वतींच्या पादूकांची पूजा करत असता, एकेवर्षी त्यांना नृसिंह सरस्वतींनी दृष्टान्त दिला आणि विचारलं की, ‘मी अक्कलकोटातच असताना तू इथपर्यंत कशाला येतोस?' या दृष्टान्तानंतर स्वामी समर्थ हेच नृसिंह सरस्वतींचे अवतार असल्याची मालोजी राजेंची खात्री पटली, आणि त्यांनी गाणगापूर ऐवजी अक्कलकोटमध्येच नित्य नियमित पूजा-अर्चना सुरू केली.

स्वामींच्या उपलब्ध चरित्रानुसार, स्वामी कर्दळीवनातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण केलं. तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. मंगळवेढ्यातही त्यांचं काही वर्षं वास्तव्य होतं. या सगळ्या काळात अवतारी पुरुष म्हणून त्यांना हळूहळू वलय प्राप्त होत होतं. या काळात स्वामींनी अनेकांना दृष्टांत दिले, त्यांना अध्यात्ममार्गाला लावले. स्वामींच्या चरित्रांमध्ये त्यांच्या चमत्कारांवर प्रामुख्याने भर आढळतो. स्वामींनी अनेकजणांना दुर्धर आजारातून मुक्त केल्याच्या कथा आहेत. आध्यात्ममार्गात स्वत:ला विद्वान समजणाऱ्या अनेकांचं त्यांनी गर्वहरण केल्याची उदाहरणं आढळतात. जगन्नाथ पुरी इथे जगन्नाथाच्या भोळ्या-भाबड्या भक्तांची अडवणूक करणाऱ्या ब्राह्मणांना त्यांनी धडा शिकवल्याच्या कथाही त्यांच्या चरित्रातून आढळतात. थोडक्यात, अक्कलकोटला वास्तव्य करेपर्यंत स्वामींचा महिमा दूर दूर पोहोचला होता असं आढळून येतं.

स्वामी मंगळवेढ्यात असताना मालोजीराजेंचे दिवाण चिंतोपंत टोळ यांनी त्यांना अक्कलकोटला आणण्यासाठी अथक प्रयत्न केले, पण स्वामींनी त्यांना जुमानलं नाही. स्वामी नंतर अक्कलकोटला आले पण त्यांना बगल देऊनच. तिथे चोळाप्पा या कन्नड ब्राह्मणाच्या घरी त्यांनी मुक्काम केला. हे चोळाप्पा त्यांचे शिष्य झाले. अक्कलकोटच्या वास्तव्यात स्वामींचा शिष्य संप्रदाय वाढला. मालोजी राजे यांनी स्वामींच्या देखभालीची व्यवस्था लावून दिली. असं म्हणतात की स्वामींची कीर्ती ऐकून बडोद्याचे तत्कालीन संस्थानिक मल्हारराव यांनीही स्वामींना बडोद्यात आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले, परंतु स्वामींनी त्यांना दाद दिली नाही. अक्कलकोट हेच त्यांनी निवासस्थान म्हणून स्वीकारलं.

स्वामी समर्थांची आज अनेक छायाचित्रं पाहावयास मिळतात. स्वामींची मूळ छायाचित्रं कोडॅक या कॅमेरा आणि छायाचित्रणाच्या साहित्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीने काढलेली आहेत. त्यापैकी काही छायाचित्रे अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान समितीकडे आहेत. या छायाचित्रांविषयीही गंमतीदार कथा सांगितली जाते. ‌‘कोडॅक' कंपनीने मुंबईत कार्यालय स्थापन केल्यानंतर भारतात आपल्या छायाचित्रण साहित्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने त्या काळातील विख्यात व्यक्तींची छायाचित्रं काढण्याची मोहीम हाती घेतली. स्वामी समर्थांचं छायाचित्रं घेण्यासाठी त्यांनी एका युरोपीय छायाचित्रकाराला अक्कलकोटला पाठवलं. त्याने स्वामींची परवानगी न घेताच त्यांचं छायाचित्र घेतलं. हे छायाचित्र त्यांनी स्वामींच्या भक्तांना दाखवलं, तर त्यांना त्यात वेगवेगळ्या देव-देवता दिसू लागल्या. या युरोपीय छायाचित्रकाराने ते छायाचित्र खुद्द स्वामींनाच दाखवलं. तेव्हा त्यांनी विचारलं, ‘मी असा विचित्र दिसतो का?' भक्तांनी हे छायाचित्र पुन्हा पाहिलं, तेव्हा त्यांना तिथे स्वामींऐवजी माकड दिसलं. अखेर या छायाचित्रकाराने शरणागती पत्करली आणि स्वामींना पुन्हा छायाचित्र काढू देण्याची विनंती केली. स्वामींनी ती मान्य केली. या छायाचित्रांमुळे स्वामींची छबी आजही आपल्याला पाहावयास मिळते. 

विष्णू बळवंत थोरात या कोपरली येथील एका शिक्षकाने श्री स्वामीचरित्र सारामृत या नावाने पोथी लिहिली आहे. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्राच्या ठाणे येथील शाखेने ही पोथी प्रसिद्ध केली आहे. या पोथीमधून स्वामी समर्थांच्या हयातीच्या काळातील व्यवस्थेवर काही प्रमाणात प्रकाशझोत पडतो. त्यानुसार, अक्कलकोटातील स्वामी समर्थांच्या वास्तव्याची वार्ता चहुकडे पसरली होती. त्या काळातल्या अनेक राजांना, संस्थानिकांना, धनिकांना अक्कलकोटच्या मालोजीराजेंचा हेवा वाटू लागला होता. स्वामींची कृपा व्हावी, म्हणून ही मंडळी अक्कलकोटची वारी करू लागली होती. स्वामींच्या चरणी धन, द्रव्य, संपत्ती अर्पण करू लागली होती. स्वामींनी आपल्या संस्थानात यावे, असा अनेक संस्थानिकांचा प्रयत्न होता. 

हळूहळू स्वामींच्या भोवती एक व्यवस्था तयार होत गेली. ही सारी व्यवस्था स्वामींचे प्रमुख शिष्यगण आणि सेवेकरी पाहात असत, संस्थानिकांचं त्यांच्यावर लक्ष असे. स्वामींचं दर्शन व्हावं, त्यांची कृपादृष्टी मिळावी यासाठी येणारी धनिक मंडळी या शिष्यगणांचा आणि सेवेकऱ्यांचा आधार घेत. प्रसंगी धन-द्रव्याची खैरात करत. त्यातून या मंडळींना आर्थिक लाभ होत होता. स्वामी स्वत: विरक्त योगी असल्याने त्यांच्या चरणी अर्पण होत असलेल्या धन संपत्तीचा लाभ शिष्यगण आणि सेवेकरी घेत असत. त्यातून या शिष्यगणांमध्येही हेवेदावे होत असत. एखाद्या शिष्याला स्वामींच्या मर्जीतून उतरवण्याचे प्रयत्नही होत असत. अखेरीस संस्थानिकांनी स्वामींच्या व्यवस्थेसाठी पंचांची नियुक्ती केली आणि सेवेकऱ्यांसाठी संस्थानच्या तिजोरीतून पगाराची व्यवस्था केली. थोडक्यात, एका अवतारी पुरुषाला वलय लाभल्यानंतर त्यातून आर्थिक-सामाजिक हितसंबंध कसे तयार होतात, याचं प्रत्यंतर त्या काळातही येतच होतं.

devachya navana

स्वामींच्या भोवतीचं हे वलय अक्कलकोटपुरतं मर्यादित राहिलं नाही. स्वामींचे शिष्य वाढत गेले तसा त्यांचा महिमाही वाढत गेला. ज्या शिष्यांना वा भक्तांना स्वामींचा अनुग्रह झाला, त्यांच्यापैकी अनेकजणांनी आपापल्या गावात जाऊन स्वामी समर्थांच्या नावाने मठ स्थापन केले आणि शिष्य परंपरा सुरू केली. उदाहरणार्थ, मूळचे कोकणातले पण मुंबईत नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या हरिभाऊ नामक एका व्यक्तीला स्वामींच्या कृपेने व्यापारात लाभ झाला, त्याचा हिस्सा स्वामींच्या चरणी अर्पण करण्यास ते अक्कलकोटला आले असता स्वामींनी त्यांना मुंबईत मठ स्थापन करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुंबईत मठ स्थापन केला. त्याचप्रमाणे कोकणातल्या गोपाळबुवा केरकर यांचा पोटाचा विकार स्वामींच्या स्वप्नदृष्टांताने बरा झाला. त्यांनाही मठ स्थापन करण्याचा आदेश स्वामींकडून मिळाला. चिपळूणजवळ मार्कंडवाडी येथे त्यांनी मठ स्थापन केला. कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती, पुण्याचे रामानंद बीडकर स्वामी, आळंदीचे नृसिंह सरस्वती, बडोद्याचे वामनराव वांबोर्डीकर नाशिकचे यशवंतराव भोसेकर ऊर्फ देव मामलेदार अशा अनेक भक्तांना स्वामींचा अनुग्रह झाला. त्यांच्यापैकी अनेकजणांनी मठ स्थापन केले आणि स्वामी सेवा आरंभली. काळाच्या ओघात या मठांचा विस्तार वाढत गेल्याचं दिसतं. या मठांनी निर्माण केलेल्या परंपरेतून संपूर्ण महाराष्ट्रात स्वामींचा भक्तसंप्रदाय वाढत गेल्याचं दिसतं. 

अलीकडच्या काळात स्वामींचा भक्तसंप्रदाय वाढण्यामध्ये दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्राचा मोठा वाटा दिसून येतो. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे दादासाहेब मोरे यांनी या केंद्रांची स्थापना केली. महाराष्ट्राबरोबरच गुजरात आणि मध्यप्रदेशात मिळून त्यांच्या केंद्रांची संख्या अडीचशेहून अधिक आहे. या मोरेदादांचं मूळ नाव खंडेराव आप्पाजी मोरे . समाजकार्याची त्यांना आवड होती. स्वामी समर्थांचे एक शिष्य पिठले महाराजांचा त्यांना अनुग्रह झाला आणि त्यांनी स्वामी कार्य आरंभले असं सांगतात. १९८८ मध्ये मोरेदादांचं निधन झालं, आता त्यांचा वारसा त्यांचे पुत्र अण्णासाहेब मोरे पुढे चालवत आहेत. 

वास्तविक, दिंंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र हा एका वेगळ्या लेखाचा विषय ठरेल, इतका त्याचा व्याप आणि विस्तार मोठा आहे. तसं पाहिलं तर, स्वामी समर्थांच्या नावापलीकडे या केंद्राचा आणि अक्कलकोटचा काहीच संबंध नाही. या केंद्राने स्वामी समर्थांची चरित्रे, पोथ्या, फोटो असं विपुल साहित्य निर्माण केलं आहे, आणि त्यात दिवसें न्‌‍ दिवस भरच पडत आहे. या केंद्राच्या रूपाने मोरेदादांचं स्वतंत्र पीठच उभं राहिलं आहे. या केंद्राने नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे स्वामी समर्थांचं भव्य ध्यान मंदिर आणि गुरुकुल उभारलं आहे. या पिठाने स्वतंत्र भक्तिसंप्रदाय निर्माण केला आहे. त्याची नाळ स्वामी समर्थांशी जोडलेली असल्याने ती अक्कलकोटपर्यंत पोहोचते, इतकंच! तात्पर्य, अशा प्रकारच्या मठांच्या माध्यमातून स्वामींच्या शिष्यांच्या परंपरा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही घडत गेल्या. स्वामींच्या हयातीत आणि स्वामींच्या नंतरही स्वामी महिमेच्या प्रचार आणि प्रसारात या मठांचा वाटा मोठा आहे. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या लक्षावधी भक्तांचा मूळ स्रोत ठिकठिकाणी उभे राहिलेले हे मठ आहेत. 

तसं पाहिलं तर साधारणत: १९८० नंतरच्या काळात सर्वच देवस्थानांकडे भाविकांचा ओघ वाढलेला दिसतो. याचा अर्थ, देशात अचानक श्रद्धेचा किंवा आस्थेचा पूर आला, असं नाही, तर याच काळात लोकांच्या जीवनातील धकाधक लक्षणीयरीत्या वाढली. जीवनात अनिश्चितता आली. या काळात देश आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या संक्रमणातून जात असल्याने समाजात अस्थिरता निर्माण झाली. त्यातून अस्वस्थता वाढली. अशावेळी लोकांना श्रद्धेचा मार्ग दिलासा देणारा वाटू लागला. नेमक्या याच काळात मठ, मंदिरं, उत्सव यांचं प्रमाण वाढत गेल्याचं आढळतं. तीर्थक्षेत्राचा-अवतारी पुरुषांचा महिमा सांगणारं धार्मिक-आध्यात्मिक साहित्यही विपुल प्रमाणात निर्माण होत असल्याचं दिसतं. असं साहित्य प्रकाशित करण्यामध्ये विविध देवस्थानांचे ट्रस्ट, मठ यांनी पुढाकार घेतल्याचं दिसतं. चरित्रं, पोथ्या, भजनांच्या कॅसेटस्‌‍-सीडीज, पोस्टर्स, स्टीकर्स अशा विविध प्रकारच्या साहित्यातून देवस्थानांचा प्रचार-प्रसार वाढत गेल्याचं आढळतं. इतर अनेक देवस्थानांप्रमाणेच अक्कलकोटही याला अपवाद नाही. स्वामींचा महिमा लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि ते त्यांचे दैवत झाले आहेत.

हेही वाचा - 'हरिनाम सप्ताहा'चं वाढतं गारूड

स्वामींकडे भाविकांचा ओघ वाढण्यास आणखी एक निमित्त ठरलं, ते त्यांच्या स्मृतिशताब्दीचं. स्वामींनी सन १८७८ मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला देहत्याग केला, १९७८ मध्ये याला शंभर वर्षं पूर्ण झाली. या निमित्ताने, अक्कलकोटमध्ये वटवृक्ष स्वामी मंदिराची देखभाल पाहणाऱ्या श्री वटवृक्ष देवस्थान ट्रस्टने हा स्मृतिशताब्दी सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला. या सोहळ्यासाठी स्वामींच्या सर्वदूर पसरलेल्या मठांच्या, मंदिरांच्या, प्रतिष्ठानांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. स्वामींचे हजारो भक्तगण या सोहळ्यासाठी आले. या सोहळ्यात धर्म संकीर्तन झालं. संगीत महोत्सव साजरा झाला. या सोहळ्याचा खूप बोलबाला झाला. या सोहळ्यामुळे अक्कलकोटला सर्वदूर प्रसिद्धी मिळाली आणि स्वामींच्या मठ-मंदिरांपलीकडचा भाविकही तुळजापूर-पंढरपूरच्या सोबत अक्कलकोटची यात्रा करू लागला. अक्कलकोटचा प्रवास संस्थान ते देवस्थान असा झाला. 

स्थान स्वामींचं; वाद संस्थांचे 

अक्कलकोटला लाभलेलं स्वामी समर्थांचं वलय आणि भाविकांचा सतत वाढता ओघ यामुळे इथलं देवस्थान अक्कलकोटच्या आजच्या अर्थकारणाचा, समाजकारणाचा आणि राजकारणाचाही केंद्रबिंदू झालंं आहे. देवस्थानचा मूळ संबंध असतो भक्तांच्या श्रद्धेशी. परंतु देवस्थानविषयी आकर्षण जसजसं वाढत जातं तसतसा मानवी गुणावगुणांचा प्रवेश तिथे होतो. स्पर्धा येते, हेवेदावे येतात, आरोपप्रत्यारोप होतात, पाहता पाहता देवस्थानं राजकारणासारखे आखाडे बनतात. भक्तांना याची काही कल्पनाही नसते. ते घडीभर येतात, हात जोडून निघून जातात. मागे उरतात देवस्थानांचे कारभारी. अक्कलकोटमध्ये तर एक नव्हे; दोन ट्रस्ट आहेत. एक ट्रस्ट आहे वटवृक्ष देवस्थान ट्रस्ट. हा ट्रस्ट वटवृक्ष स्वामी मंदिराचं व्यवस्थापन पाहतो. दुसरा ट्रस्ट आहे अन्नछत्र मंडळ ट्रस्ट. हा ट्रस्ट प्रामुख्याने इथे येणाऱ्या भक्त-यात्रेकरूंसाठी अन्नछत्र चालवतो. दोन्ही ट्रस्टनी भाविकांच्या निवासाच्या स्वतंत्र व्यवस्था उभ्या केल्या आहेत. सकृतदर्शनी पाहिलं, तर हे दोन ट्रस्ट परस्परांना पूरक भूमिका बजावताना दिसतात, पण एकेक पदर नीट उलगडून पाहिलं, तर प्रत्यक्षात तसं नसल्याचं जाणवतं. त्यांच्यातली स्पर्धा जाणवते. हे दोन ट्रस्ट म्हणजे दोन प्रभावगट आहेत. हा प्रभाव आर्थिक, सामाजिक आणि राजकीयही आहे. या दोन प्रमुख ट्रस्टस्‌‍च्या अंतरंगात डोकावून पाहिलं की, अक्कलकोटचं चलनवलन समजू शकतं.

अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचं वास्तव्य ज्या वटवृक्षाच्या छायेखाली होतं, तिथंच आज त्यांचं मंदिर उभं आहे. वटवृक्ष स्वामी मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे. स्वामींचे एक शिष्य ज्योतिबा पांडे यांनी स्वामींच्या पादुका वटवृक्षाजवळ ठेवून एक लहानसं मंदिर बांधलं होतं. नंतर त्या काळातल्या संस्थानिकांनी या मंदिरासमोर मंडपाची उभारणी केली. मंदिराच्या शेजारीच स्वामींचं शेजघर उभारलेलं आहे. तिथं त्यांचा पलंग आणि त्यांच्या दैनंदिन वापरातल्या जिनसा ठेवण्यात आल्या आहेत. जवळच गणपतीचं एक मंदिरही बांधलेलं आहे. प्रारंभीच्या काळात स्वामींच्या मंदिराची व्यवस्था संस्थानिकांकडून पाहिली जात होती. अक्कलकोट संस्थानाचं १९४८ मध्ये देशात विलीनीकरण झाल्यानंतर १९५३ मध्ये वटवृक्ष देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. या ट्रस्टवर साहजिकच तत्कालीन संस्थानिकांचा वरदहस्त होता. पण ट्रस्टच्या स्थापनेनंतर मंदिरविस्ताराला वेग आल्याचं दिसतं. सर्वांत प्रथम मंदिराच्या विस्ताराकरता संस्थानिकांनी दिलेल्या जागेवर मुरलीधर मंदिर उभं राहिलं. यात्रेकरूंच्या निवासाकरता त्यानंतर चाळीस खोल्यांची इमारत उभी राहिली. पण वाढत्या गर्दीपुढे ती अपुरी ठरू लागल्याने ट्रस्टने मैंदर्गी-गाणगापूर रस्त्यावर तीन एकर जमिनीवर २२८ खोल्यांचा भव्य भक्तनिवास उभारला आहे. त्याचा खर्च चार कोटी रुपये झाला आहे. ट्रस्टच्या वतीने अक्कलकोटमध्ये मोठं इस्पितळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी भक्तनिवासाच्या समोरच तीन-चार एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. हा प्रकल्प एकूण १७ कोटी रुपयांचा आहे. संपूर्णत: देणग्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.

भक्तांकडून मिळणारी देणगी हा वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचा मुख्य स्रोत आहे आणि याच्या खुणाही मंदिराच्या परिसरात दिसतात. मंदिरात ठिकठिकाणी ‌‘यथाशक्ती देणगी द्या' असे फलक लावण्यात आले आहेत. अन्नछत्र मंडळ ट्रस्टही देणग्या स्वीकारत असल्याने आणि अक्कलकोटच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक केंदाचा प्रसार झालेला असल्याने देणग्या स्वीकारण्याच्या फलकाबरोबरच ‌‘आमची अन्यत्र शाखा नाही' हा फलकही लक्षवेधी ठरतो.

देवस्थान परिसरात चालणारे व्यवहार पाहिले, तर ट्रस्टच्या उत्पन्नाचे अन्य काही स्रोतही समोर येतात. मंदिराच्या लगतच एक उपाहारगृह आहे. ते दरमहा भाड्याच्या करारावर चालवण्यास देण्यात आलं आहे. मंदिरालगतच भाविकांसाठी गरम पाण्याची सोय आहे.शौचालयं बांधली आहेत. या सुविधा वापरण्यासाठी भक्तांना पैसे द्यावे लागतात. भक्तनिवासात राहण्यासाठी प्रतिदिन २०० ते ३५० रुपये असे दर आहेत. भक्तनिवासात उपहारगृहाची सोय आहे. स्वामी चरित्रात वर्णन केलेल्या स्वामींच्या लीला रेखांकित केलेली ‌‘आर्ट गॅलरी' भक्त निवासाशेजारीच आहे. तिचे प्रवेश शुल्क पाच रुपये आहे. देवस्थानच्या प्रवेशद्वाराजवळच पार्किंगची सुविधा आहे, त्याचं शुल्क प्रत्येक वाहनासाठी पाच रुपये आहे. याशिवाय, वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचा ज्योतिबा हॉल धार्मिक-सांस्कृतिक कार्यासाठी भाड्याने दिला जातो. स्वामी मंदिरात अभिषेकासाठी २५ रुपये शुल्क आकारलं जातं, या शुल्कामध्ये अभिषेकाचं साहित्य देवस्थानच्या वतीने पुजारी मंडळी पुरवतात. लघुरुद्र अभिषेकासाठी २०१ रुपये शुल्क आकारलं जातं. २५ रुपयांच्या किंवा २०१ रुपयांच्या पावतीवर एकावेळी एकाच व्यक्तीला अभिषेक करता येतो, तशी स्पष्ट सूचना एका फलकावर लिहिलेली आढळते. एकंदरीत देवस्थान ट्रस्टच्या उत्पन्नाचे हे आणखी काही स्रोत आहेत. देवस्थान ट्रस्टची उलाढाल मोठी आहे. हे ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येवरूनही लक्षात येतं. ट्रस्टचे १००हून अधिक कर्मचारी आहेत. 

अक्कलकोटमधला दुसरा प्रमुख ट्रस्ट-‌‘अन्नछत्र मंडळ' १९८८ साली स्थापन झाला, म्हणजेच वटवृक्ष देवस्थान ट्रस्टच्या स्थापनेनंतर ३५ वर्षांनी! अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची सोय करावी या उद्देशाने ‌‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ' स्थापन करण्यात आलं. वटवृक्ष देवस्थान ट्रस्टमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळत नसल्याने या वेगळ्या ट्रस्टची स्थापना झाल्याचं सांगण्यात येतं. वटवृक्ष ट्रस्टबद्दल असूया असल्यामुळे या मंडळाची स्थापना झाल्याचं ‌‘वटवृक्ष'चे बाळासाहेब इंगळे सांगतात. जन्मेजय भोसले यांच्या पुढाकारातून हा ट्रस्ट स्थापन झाला. तेच आजतागायत या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. जन्मेजय भोसले स्वत:ला संस्थानिकांच्या घराण्याचे वारस मानतात, परंतु संस्थानिकांचे वारसदार हा त्यांचा दावा नाकबूल करतात. हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचल्याचं स्थानिक लोक सांगतात. जन्मेजय भोसले हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेआहेत. भोसले यांच्याव्यतिरिक्त अन्य नऊजण विश्वस्त मंडळात आहेत. अक्कलकोट तालुक्याचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे अन्नछत्र मंडळाचे खजिनदार आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे या ट्रस्टचा गावात मोठा दबदबा आहे. 

वटवृक्ष स्वामी मंदिराच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे अन्नछत्र मंडळाचं प्रवेशद्वार आहे. मंदिरात स्वामींचं दर्शन घेतलेला भाविक महाप्रसादासाठी अन्नछत्र मंडळाकडे येतो. अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त श्याम मोरे सांगतात, दररोज सरासरी १५ ते २० हजार लोकांच्या भोजनाची सोय इथे केली जाते. मुख्य उत्सवाच्या काळात दररोज ५० ते ६० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. वटवृक्ष स्वामी मंदिरासमोरची जागा अन्नछत्र मंडळाला दान म्हणून मिळाली आहे. त्यावर अन्नछत्र मंडप उभारण्यात आला. अवघ्या सव्वा किलो भातावर अन्नछत्र सुरू झालं. सुरुवातीला दर गुरुवारी व रविवारी माधुकरीच्या स्वरूपात धान्य गोळा करून अन्नदानास प्रारंभ झाला. नंतर हा महाप्रसाद दररोज देण्यात येऊ लागला. अन्नछत्र मंडपात महाप्रसाद गृह, ध्यानधारणा मंदिर, गोशाळा आदींची उभारणी करण्यात आली आहे. अन्नछत्र मंडळात येणारा भाविक महाप्रसाद गृहातील समर्थांच्या प्रतिमेचं आणि दत्तात्रेयाच्या मूर्तीचं दर्शन घेतो, जवळच असलेल्या स्वामींच्या पालखीला दंडवत घालतो आणि मग भोजनास बसतो.

अन्नछत्र मंडळातर्फे मंदिरालगतच दोन आलिशान ‌‘यात्रीनिवास'ही उभे केले गेले आहेत. जवळपास तीन सभागृह आणि २५० खोल्यांची व्यवस्था इथे केली गेली आहे. अन्नछत्र मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात, असं श्याम मोरेंनी अभिमानाने सांगितलं. यामध्ये रक्तदान शिबिरं, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांचं आयोजन केलं जातं. किल्लारीच्या भूकंपाच्यावेळी अन्नछत्र मंडळाने भूकंपग्रस्तांकरिता महिनाभर भोजनाची सोय केली होती. अन्नछत्र मंडळाच्या उत्पन्नातही भाविकांकडून मिळणारी देणगी हाच प्रमुख स्रोत आहे. अन्नछत्र मंडळाच्या उपक्रमांविषयी भरभरून माहिती देणारे श्याम मोरे उत्पन्नाच्या विषयावर मात्र काहीच बोलायला तयार नव्हते. त्याविषयी सांगण्यास त्यांनी सपशेल नकार दिला.

अन्नछत्र मंडळाच्या परिसरातही ठिकठिकाणी ‌‘यथाशक्ती देणगी द्या'चे फलक दिसतात. या फलकांजवळच पावती पुस्तकं घेऊन बसलेल्या व्यक्ती दिसतात. अन्नछत्र मंडळातही देणगी स्वीकारण्यासाठी काऊंटर आहे. महाप्रसादाचा लाभ घेतलेला भाविक ‌‘यथाशक्ती' देणगी देतोच. त्याला थोडासा प्रसाद आणि एका पुडीत अंगारा मिळतो.

अन्नछत्र मंडळाच्या वतीने स्वामी समर्थांची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला नेली जाते. स्वामींच्या पालखीचा हा सोहळा सहा महिने चालतो, हे लक्षणीय आहे. पालखी अक्कलकोटहून थेट पंढरपूरला न जाता पुणे, मुंबई, नाशिक अशा महाराष्ट्रातल्या आर्थिकदृष्ट्या संपन्न भागातून जाते. अन्नछत्र मंडळाला मिळणाऱ्या देणग्यांचा हा पालखी सोहळा एक स्रोत आहे. या पालखीचा थाट मोठा असतो. हत्ती, घोडे, उंट, ट्रक्स, सुमोसारख्या आलिशान गाड्या असा लवाजमा असतो. पालखीच्या मुक्कामांच्या ठिकाणी देणग्या स्वीकारल्या जातात. याशिवाय मंडळाच्यावतीने भक्तमंडळींसाठी उभारण्यात आलेले यात्री निवासही मंडळाच्या उत्पन्नाचं एक साधन आहे. अन्नदानासारखं सत्कार्य करत असल्याने मंडळाला टेम्पो, सुमो, सँट्रोसारख्या गाड्याही दान मिळाल्या आहेत.

वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचं कार्यालय स्वामी मंदिरातच असून, जुन्या पद्धतीचं आहे. अन्नछत्र मंडळाचं कार्यालय मात्र प्रशस्त आहे. आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहे. इथल्या कामकाजाचं संगणकीकरण झालेलं आहे. या ट्रस्टमध्ये एकूण २९० सेवेकरी आहेत, त्यापैकी फक्त २५ टक्के कर्मचारी आणि उर्वरित ७५ टक्के सेवाभावी लोक असल्याचं मंडळाचे विश्वस्त श्याम मोरे सांगतात. अन्नछत्र मंडळाचे लोक जरी उत्पन्नाबद्दल मौन पाळत असले, तरी या मंडळाचा एकूण व्याप, विस्तार, बांधकामं पाहता त्याचा अंदाज येऊ शकतो!

भाविकांकडून मिळणारी देणगी हाच दोन्ही ट्रस्टस्‌‍चा उत्पन्नाच्या मुख्य स्रोत असल्याने या दोन ट्रस्टमध्ये स्पर्धा असणं स्वाभाविकच आहे. भाविक वटवृक्ष मंदिरात दर्शन घेऊन अन्नछत्रात महाप्रसादासाठी जातात व तिथेच देणग्या देतात असं वटवृक्ष देवस्थान ट्रस्टचे सचिव बाळासाहेब इंगळे नाराजीच्या सुरात सांगतात. भाविकांनी वटवृक्ष ट्रस्टलाच देणग्या द्याव्यात यासाठी ‌‘केवळ इथेच देणग्या द्याव्यात' असे फलक मंदिर परिसरात दिसतात. ‌‘आम्ही अन्नछत्र चालवत नाही' असं भाविकांना स्पष्टपणे सांगणारे फलकही दिसतात.

या दोन ट्रस्टमध्ये चढाओढ असल्याचं आणखी काही गोष्टींमधून प्रतीत होतं. उदाहरणार्थ, वटवृक्ष देवस्थान ट्रस्टने ‌‘भक्तनिवास' उभारले आहेत तर अन्नछत्र मंडळाने ‌‘यात्री निवास', तसंच जशी वटवृक्ष ट्रस्टची इस्पितळ उभारण्याची योजना आहे, तशीच योजना अन्नछत्र मंडळानेही आखली आहे. त्यासाठी देणग्या स्वीकारल्या जात आहेत.

अक्कलकोटला येणारा सर्वसाधारण भाविक या स्पर्धेविषयी अनभिज्ञ असतो. मुळात या दोन स्वतंत्र संस्था आहेत, हेही त्याच्या गावी नसतं. कुठेतरी एका ठिकाणी देणगी देऊन तो मोकळा होत असतो.

भक्त जरी या स्पर्धेबाबत अनभिज्ञ असले, तरी या दोन ट्रस्टमधील वाद मात्र वाढतच चालले आहेत. हे दोन ट्रस्ट स्वामी समर्थांच्या कृपाछत्राखाली चालू आहेत, मात्र आता त्यांच्यातील संबंध हे कायदेकानू मार्फतच निश्चित होत असल्याचं दिसतं. एकमेकांविरुद्ध तक्रारी करणं आणि देवस्थानवरील आपला ताबा भक्कम करणं असले प्रकार इथे चालू आहेत. अन्नछत्र मंडळ स्थापन झाल्यानंतर त्यांना महाप्रसादाचा उपक्रम राबवू देण्याबद्दल वटवृक्ष ट्रस्टच्या सभासदांबरोबर करार करण्यात आला, या करारामध्ये वटवृक्ष ट्रस्टने अन्नछत्र किंवा महाप्रसादाचा उपक्रम चालवू नये, अशी तरतूद आहे. २००४ मध्ये वटवृक्ष ट्रस्टने स्वत:च्या अखत्यारीत महाप्रसादाचा उपक्रम सुरू केला होता, त्यावेळी या कराराची आठवण करून देण्यात आली. त्याबद्दल वादही झाले. अखेर वटवृक्ष ट्रस्टला हा उपक्रम बंद करावा लागला. 

या स्पर्धेमुळे आणि त्यापोटी होणाऱ्या वादांमुळे आता अन्नछत्र मंडळाच्या नोंदणीलाच वटवृक्ष ट्रस्टने आक्षेप घेतला असल्याचं इंगळे सांगतात. या दोन ट्रस्टमधला वाद आता धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचला आहे. अन्नछत्र मंडळ स्थापन होण्याआधी अक्कलकोट देवस्थानामध्ये वटवृक्ष ट्रस्टची मक्तेदारी होती. अन्नछत्र मंडळाच्या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे या मक्तेदारीला बऱ्यापैकी शह बसला आहे. त्यामुळे वादाची धार अधिक तीव्र झाल्याचं जाणवतं.

दोन्ही ट्रस्टमध्ये स्पर्धा आणि वाद असले, तरी या दोन्ही संस्थांशी संबधित असलेल्या व्यक्तींनी आपापल्या उत्पन्नाचे स्रोत उभे केले असल्याचं लोक सांगतात. दोन्ही संस्थांचा प्रभाव मोठा असल्याने आणि त्यांच्याशी संबंधित सर्व व्यक्ती व्यावसायिकदृष्ट्या जोडलेले असल्याने गावातले लोक उघड उघड काही बोलत नाहीत. ‌‘गॉसिप'मात्र जोरदार चालू असतं. एक खरं की, या दोन्ही संस्थांशी संबंधित व्यक्तींची सांपत्तिक स्थिती लक्षणीयरीत्या सुदृढ दिसते.

श्रद्धा, व्यवहार आणि हितसंबंध 

दोन ट्रस्टमधील स्पर्धा व वाद दुर्दैवी असले तरी अनपेक्षित आणि अनाकलनीय नाहीत. भक्तांच्या दृष्टीने अक्कलकोट हे पवित्र ठिकाण असलं तरी देवस्थान चालवणं ही व्यावहारिक गोष्ट आहे. दान-देणगी-विधींमधून जमा होणारा निधी, तो वाढवण्याचे प्रयत्न, त्याचं व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचा पगार, सोयी-सुविधांवर होणारा खर्च आणि शिल्लक पैशांतून मोठी विकासकामं ही करायची म्हटलं की, ‘पैसा' नावाच्या गोष्टीला महत्त्व येणारच. त्यामुळे इथे भक्तीचा नि श्रद्धेचा देवस्थानशी असलेला सांधा कमी महत्त्वाचा बनतो व व्यवहारांना महत्त्व प्राप्त होतं. त्यातून स्पर्धा, इर्षा आणि वाद उद्भवतात. अक्कलकोटमध्ये यापेक्षा वेगळं घडताना दिसत नाही.

यापलिकडे इथे आणखीही एक गोष्ट घडताना दिसते. गेल्या दीडशे वर्षांत स्वामी समर्थांच्या महिम्याभोवती, त्यांच्या मंदिराभोवती आणि नंतर देवस्थानाभोवती गावाची जी रचना झालेली आहे, त्या परंपरेशी स्वत:ला जोडून घेण्याचा आणि त्यातून आपलं अस्तित्व टिकवण्याचाही प्रयत्न होताना इथे दिसत आहे. 

अक्कलकोटमध्ये वटवृक्ष स्वामी मंदिर ट्रस्ट आणि अन्नछत्र मंडळाचं प्रस्थ मोठं असलं, तरी स्वामी महात्म्याची परंपरा अक्कलकोटमधल्या इतर काही मठ-मंदिरांशीही जोडलेली आहे. हे मठ-मंदिरंही ही परंपरा जोपासत आहेत. त्यामुळे स्वामींच्या वलयाचा लाभ काही प्रमाणात त्यांनाही मिळत आहे. यामध्ये मुख्य आहे ते स्वामींचं समाधिमंदिर. बरेचसे भाविक वटवृक्ष स्वामी मंदिरालाच स्वामींचं समाधिमंदिर समजतात. वास्तविक, हे मंदिर अक्कलकोटच्या बुधवार पेठेत आहे. चोळप्पा या आपल्या मुख्य शिष्याच्या घरात आपली समाधी बांधावी, अशी स्वामींची इच्छा होती. त्यानुसार, त्यांनी आपल्या हयातीतच इथे समाधिमंदिराचं बांधकाम करून घेतलं होतं, असं चोळप्पांचे वारसदार सांगतात. आज हे मंदिर ‌‘समाधी मठ' म्हणून ओळखलं जातं. वटवृक्ष मंदिरापासून या मठाचं अंतर दोन-अडीच किलोमीटर आहे.

वटवृक्ष मंदिराच्या तुलनेत या मठात विशेष गर्दी नसते. चोळप्पांचे वंशज अण्णु गुरुजी ऊर्फ श्रीपाद प्रभाकर पुजारी हे इथली व्यवस्था पाहतात. स्वामींचा अंघोळीचा हंडा, राजदंड, कफनी, रुद्राक्षाची माळ, चवरी, चामड्याच्या पादुका, रक्तचंदनाच्या पादुका अशा स्वामींनी हाताळलेल्या चीजवस्तू इथे पाहावयास मिळतात. चोळप्पांच्या वारसदारांनी या मठाची ‌‘फॅमिली ट्रस्ट' म्हणून नोंदणी केलेली आहे. चोळप्पांची पाचवी पिढी आज या मठाचं काम पाहात आहे. या मठात १०१ रुपयांमध्ये अभिषेक केला जातो, तसंच देणग्याही स्वीकारल्या जातात. अक्कलकोटमध्ये हा ट्रस्ट सर्वांत जुना असल्याचं अण्णु पुजारी सांगतात. व्यापारीकरणात इतर ट्रस्ट यशस्वी झाल्याने तिकडे जास्त गर्दी असते, असंही त्यांचं म्हणणं होतं. 

चोळप्पांचे एक वंशज वटवृक्ष मंदिरातील पुजारी आहेत, तर दुसरे वंशज अण्णु पुजारी हे अन्नछत्र मंडळात स्वामींची पूजा-अर्चा करतात. 

स्वामींचे दुसरे शिष्य बाळप्पा यांच्या नावाने एक मठ ‌‘गुरुमंदिर' म्हणून प्रसिद्ध आहे. हा मठ भारत गल्लीत आहे. बाळप्पांनी संन्यास घेऊन ब्रह्यानंद स्वामी असं नाव धारण केलं होतं. त्यांनाही अनेक शिष्य लाभले. आज शिष्य परंपरेने त्यांच्या मठाचा वारसा जपला जात आहे. बाळप्पानंतर गंगाधर महाराज यांनी त्यांची इथे समाधी बांधली. गंगाधर महाराजांनंतर गजानन महाराज राजिमवाले आणि त्यांच्यानंतर श्रीकांत राजिमवाले यांच्याकडे या मठाची सूत्रं आहेत.

बाळाप्पांचे शिष्य गंगाधर महाराज यांनी स्थापन केलेला ‌‘शिवपुरी' मठ सर्वपरिचित आहे. वेद व श्रुतींच्या पुनरुज्जीवनाच्या उद्देशाने गंगाधर महाराजांनी हा मठ स्थापन केल्याचं सांगितलं जातं. गंगाधर महाराजांनंतर या मठाची धुरा त्यांचे शिष्य गजानन महाराज राजिमवाले यांच्याकडे आली. गजानन महाराजांनी आयुर्वेद औषधांच्या उत्पादनासाठी ‌‘धर्मात्मा आयुर्वेद रसशाळा' स्थापन केली. तसंच ‌‘अग्निहोत्र' या विधीचा प्रचार आणि प्रसार केला. सध्या त्यांचे चिरंजीव हा वारसा पुढे चालवत आहेत. शिवपुरीच्या मठात तयार होणारी आयुर्वेदिक औषधं पुण्या-मुंबईच्या दुकानांमध्ये दिसतात तशीच ती अक्कलकोटमध्ये सर्वत्र विकली जातात. या औषधांची परदेशातही निर्यात होते, असं सांगण्यात आलं. शिवपुरी मठ हा राजिमवाले परिवाराचा ‌‘फॅमिली ट्रस्ट' आहे. दर गुरुपोर्णिमेला शिवपुरी मठात स्वामी समर्थांचा मोठा उत्सव साजरा होतो. गजानन महाराजांनी ‌‘इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्सेस' ही संस्था स्थापन केली होती, त्याद्वारे आयुर्वेदिक औषधं व अग्निहोत्राचा प्रचार -प्रसार होतो. श्रीकांत राजिमवाले यांनी तर ‌‘शिवक्षेत्र न्यास', ‘शिवदर्शन', ‘शिवपुरी विकास ट्रस्ट', ‘तात्याजी महाराज राजिमवाले मेमोरियल ट्रस्ट', चित्रामाता अन्नपूर्णा समिती' अशा संस्थांचं जाळंच उभं केलं आहे. अग्निहोत्रासाठी पिरॅमिडच्या आकाराच्या तांब्यांच्या भांड्यांचं उत्पादन या मठात होतं. वातावरण प्रदुषणावर अग्निहोत्र विधी उपयुक्त ठरतो, त्यामुळे मनास शांती लाभते, असा प्रचार या मठाद्वारे केला जातो. देश-विदेशात हा अग्निहोत्र विधी पोहोचल्याचा दावा श्रीकांत महाराज राजिमवाले यांचे अनुयायी करतात. दोन्ही ट्रस्टशी जुळवून घेतल्यामुळे त्यांचं एक प्रस्थच तयार झालेलं दिसतं. 

याशिवाय राजेराय मठ, जोशीबुवा मठ प्रसिद्ध आहेत. गावातील खंडोबा मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, हक्क्याचा मारुती, नुरूद्दीन बाबाचा दर्गा या धार्मिक स्थळांनाही स्वामींचं वलय लाभलं आहे. स्वामीभक्तांची तिथे वर्दळ दिसते. या साऱ्या मठांमुळे, मंदिरांमुळे अक्कलकोटचा धार्मिक चेहरा अधिक ठळक झाला आहे. कमी जास्त संख्येने भक्त सर्वच ठिकाणी पोहोचत असल्याने या मठांना व मंदिरांना थोडाफार आर्थिक आधार मिळतो. ज्या मठांचे फॅमिली ट्रस्ट आहेत, त्यातील एखाद-दोघांच्या आर्थिक प्रगतीबद्दल गावकरीही कुजबुजतात, अशी त्यांनी भरारी मारली आहे. हे मठ त्यामुळे एकीकडे स्वामी समर्थांशी असलेल्या धार्मिक बंधाची परंपरा टिकवतात, पण त्याचवेळेस त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा मार्गही स्वीकारतात. त्यामुळेच आपल्यापेक्षा अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या मठांबद्दल त्यांच्या मनात असूयेची झाक असल्याचं जाणवतं. श्रद्धा आणि व्यवहार या दोन्ही बाबी हातात हात घालून चालायला लागल्या की व्यवहाराला महत्व येतं, ही बाब अक्कलकोटमध्ये पदोपदी लक्षात येते.

जी गोष्ट मठांची-मंदिरांची-ट्रस्टची तीच गावाची. एखाद्या गावातील श्रद्धास्थानाचा महिमा सर्वदूर पोहोचल्यानंतर भक्तांचे जे लोंढे गावात येतात, त्यातून आपला लाभ कसा होईल असा विचार प्रत्येक गाव करतंच. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत स्वामी समर्थांच्या महिम्यामुळे गावात येणाऱ्या पैशाचा आपल्याशीच अधिक संबंध कसा येईल असा प्रयत्न इथेही होताना दिसतो. देवस्थानाशी संबंधित असलेल्यांना भेटलं की ही अदृश्य स्पर्धा दिसायला लागते. इथेही दुर्दैवाने श्रद्धा मागे पडते आणि जातीचे हितसंबंध पुढे सरकतात. भक्त ज्यांना देव मानतात, देवरूप मानतात किंवा देवअंश मानतात त्या भावना या हितसंबंधापुढे महत्वाच्या उरत नाहीत. अक्कलकोटमधली ही हितसंबंधाची स्पर्धा दोन गटांमध्ये दिसते. ती गावातले लोक जशी जातीच्या अंगाने पाहतात त्याही पलिकडे ती हितसंबंधांशी अधिक आहे. भारतामध्ये जातिव्यवस्थेवर आधारित समाजरचना असल्यामुळे जाती आणि हितसंबंध यांची घट्ट गाठ बांधली गेलेली असते. त्यामुळे हितसंबंधांना जातींचा चेहरा लाभतो. अक्कलकोटमध्ये ब्राह्मण आणि मराठा समाजातले लोक याच भाषेत बोलतात. स्वामींच्या देवस्थानाभोवतीची वस्ती ही प्रामुख्याने ब्राह्मण समाजातील लोकांची आहे, तर देवस्थानातील ट्रस्टमध्ये व नोकऱ्यांमध्ये मात्र ब्राह्मणांना तसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. पुजारी काय ते ब्राह्मण आहेत. त्यामुळे ब्राह्मणांमधील बोलके लोक त्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. 

स्वामी समर्थांच्या अवतारकार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये ब्राह्मणवर्गाचा मोठा वाटा असल्याचा दावा इथली ब्राह्मणमंडळी करतात. अनेक चरित्रकारांनी स्वामी समर्थ यजुर्वेदी ब्राह्मण असल्याचा निर्वाळा दिला आहे. स्वत: स्वामींनी आपल्या हयातीत आपलं नाव, गाव, जात, कुळ याची ओळख कधीच दिली नाही. नृसिंह सरस्वती ब्राह्मण होते. स्वामी समर्थ त्यांचे अवतार मानले गेल्याने अशी संगती लावली गेली; स्वामींच्या शिष्यांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मणवर्ग अधिक होता. स्वामींनी ज्या चोळप्पांच्या घरात आपलं समधिमंदिर आपल्या हयातीत उभारलं, ते कन्नड ब्राह्मणच होते. बाळप्पा देखील ब्राह्मणच होते. याशिवाय, ठिकठिकाणी स्वामींचे मठ, मंदिरं उभे करून त्यांचा भक्तसंप्रदाय वाढवणारे शिष्यही प्रामुख्याने ब्राह्मणच होते.परंतु आता ब्राह्मणांना तसं स्थान उरलेलं नाही याची खंतही या वर्गाला आहे. या खंतावण्याला दुसरं कारण अधिक कारणीभूत आहे. गावात पूर्वीपासून वटवृक्ष स्वामी मंदिराच्या परिसरात ब्राह्मणांची वस्ती आहे. ब्राह्मणांची दुकानं आहेत. परंतु आता अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाचा आराखडा मंजूर झाला आहे. त्यानुसार स्वामी मंदिराभोवतीचा बराचसा परिसर आरक्षित करण्यात आला आहे. त्यातच अलीकडे मांढरदेवीचं चेंगराचेंगरीचं प्रकरण घडल्यामुळे गर्दीच्या तीर्थक्षेत्रांमध्ये देवस्थानाभोवतीचा परिसर मोकळा करण्याचं धोरण अवलंबलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे मंदिराभोवतीच्या वस्तीवर विस्थापनाची टांगती तलवार आहे. विस्थापनाला सामोरं जावं लागलं तर आपल्यावर कुऱ्हाड कोसळेल असं त्यामुळे सांगितलं जातं. देवस्थानाजवळच घरं असल्यामुळे पूर्वी स्वामींच्या दर्शनासाठी येणारे भक्त ब्राह्मणांकडे उतरत असत. त्यांच्या चरितार्थाचं ते एक साधन होतं. मात्र ‌‘वटवृक्ष' आणि ‌‘अन्नछत्र ' या दोन्ही संस्थानी भव्य भक्तनिवास-यात्री निवास उभारले व तिथे सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध केल्या. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे भक्त तिकडे वळले.  

त्यामुळे एकीकडे सरकारी विकास आराखडा आणि दुसरीकडे दोन्ही ट्रस्टने यात्री निवास चालवण्याचा घेतलेला निर्णय यामुळे आपलं उत्पन्नाचं व चरितार्थाचं साधनच हातातून जात असल्याची भावना व्यक्त होते आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर मंदिराजवळ राहणारी ब्राह्मण मंडळी हे दु:ख दबत दबत सांगतात. देवस्थानचा आपल्याला काहीच लाभ होत नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. समर्थांच्या काळात व नंतरही समर्थांच्या ब्राह्मण भक्तांना व शिष्यांना गावात मान होता, परंतु आता ब्राह्मणांचा कोणी वाली उरलेला नाही असं हे लोक सांगतात. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली हा समाज एकवटताना दिसतो. ब्राह्मण-पुजारी वगैरे लोकांचे प्रश्न संघाच्या दबावामुळे त्यांच्या विरोधात जाणार नाही, असं त्यातून पाहिलं जातं. अक्कलकोट नगरपालिकेत शिवसेना व भाजप यांची युती आहे व भाजपच्या मागे ब्राह्मण वर्ग एकमुखाने उभा आहे, परंतु युती असूनही हे प्रश्न सामंजस्याने सोडवले जात नाहीत. शिवसेनेत मराठा समाजाचा वरचष्मा आहे व त्यामुळे नगरपालिकेत भाजप शिवसेना एकत्र असली तरी ट्रस्ट बाबतच्या वादामध्ये हे दोन पक्ष आमने सामने असतात असं म्हटलं जातं.

मंदिराभोवतीची घरं हटवण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‌‘ट्रस्टमध्ये एकाच समाजाचं वर्चस्व आहे, आम्हांला ट्रस्टमध्ये स्थान देत असाल, तरच शासनाशी सहकार्य करू' अशी भूमिका या गटाने घेतली आहे. या भूमिकेमुळे एकूण वादामध्ये आणखी भरच पडली असून वादातून मार्ग जवळपास दिसेनासा झाला आहे. देवस्थानातील दोन ट्रस्टमध्ये स्पर्धा असल्यामुळे ‌‘वटवृक्ष'ला विरोध करण्यासाठी वटवृक्ष ट्रस्टच्या लगत असलेल्या जमिनी ब्राह्मण मालकांनी ‌‘अन्नछत्रा'ला विकल्या, असं ‌‘वटवृक्ष'ट्रस्टच्या इंगळे यांचं म्हणणं आहे. ब्राह्मण जमीन मालक स्वत:कडील जमिनींच्या मालकीचा उपयोग दोन ट्रस्टना झुंजवण्यासाठी करत आहेत, असंही त्यांचं म्हणणं आहे. ‌‘लिंगायतांकडे गावाची आर्थिक सत्ता आहे. ब्राह्मणांकडे दुकानं आहेत. गावातील या दोन महत्वाच्या समाजघटकांकडे उपजीविकेची साधनं आहेत. मात्र एकेकाळी महत्वाचं स्थान असलेल्या मराठा समाजाला उत्पन्नाचं हक्काचं साधन उरलेलं नाही त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावं लागलं आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असं इंगळे यांचं म्हणणं आहे. थोडक्यात, जातींचे हितसंबंध देवस्थानाच्या व एकूणच त्या गावाच्या व्यवहारामध्ये कसे महत्वाचे ठरतात हे यावरून लक्षात यावं.

महिम्याभोवती; महिम्यापलिकडे

ब्राह्मण आणि मराठा या दोन समाजांतील मंडळींचा देवस्थानाच्या अनुषंगाने होणाऱ्या व्यवहारांवर ताबा मिळवण्याचा असा प्रयत्न चाललेला असताना गावातील दुसरा मोठा समाज मात्र या वादापासून दूर दिसतो. पन्नास हजारांची लोकवस्ती असलेल्या अक्कलकोटमध्ये गेल्या काही वर्षांत लिंगायत समाजाची लोकसंख्या चांगलीच वाढली आहे. या समाजातील काही मंडळी दोन्ही ट्रस्टमध्ये पूर्वी होती किंवा सध्याही आहेत. परंतु या समाजातील लोकांनी प्रामुख्याने गावात व्यवसाय करण्यावर भर दिलेला दिसतो. वटवृक्ष मंदिर परिसरात लहान मोठी ४०-५० दुकानं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पूजा साहित्य, हार-फुले, अगरबत्त्या, प्रसाद, स्वामींवर रचलेल्या तसंच इतर देव-देवतांच्या भक्तिगीतांच्या कॅसेटस्‌‍, सीडीज, स्वामी समर्थांचे विविध आकारातले फोटो, मूर्ती, स्वामी समर्थांची चरित्र, पोथ्या अशी धार्मिक पुस्तक आदींची उलाढाल होते. या दुकानांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मणांप्रमाणेच लिंगायत समाजातील लोकांची मालकी अधिक आहे. अक्कलकोटमध्ये भाविकांची सतत वर्दळ असल्याने इथल्या मालाला चांगला उठाव आहे. स्वामी समर्थांचं साहित्य खरेदीपेक्षा दुप्पट किमतीला इथे विकलं जातं. त्यामुळे इथे असे छोटे छोटे व्यवसाय करणंही चांगलंच फायदेशीर ठरताना दिसत आहे. त्याचप्रमाणे वटवृक्ष आणि अन्नछत्र यांचे भक्तनिवास आणि यात्रीनिवास असले, तरी गावात लॉजेसची संख्या लक्षणीय आहे. गेल्या काही वर्षांत ती वाढली आहे. याशिवाय हॉटेलं, चहाची दुकानं, पानांच्या टपऱ्या जागोजागी दिसतात. या व्यवसायांतही प्रामुख्याने लिंगायत समाज आहे. 

त्याशिवाय अक्कलकोटमध्ये ठळक नजरेत भरतात त्या फायनान्स कंपन्या. एवढ्याशा गावात पन्नासहून अधिक खाजगी फायनान्स कंपन्या आहेत. या व्यवसायात पारंपरिकरित्या जशी मारवाडी मंडळी आहेत तशीच लिंगायत समाजातील लोकही आहेत. या कंपन्या लोकांना व्याजावर कर्ज देतात. व्याजाचा दर साहजिकच अधिक असतो. लिंगायत समाजाची मक्तेदारी असलेला सावकारीचा धंदाही इथे तेजीत असल्याची माहिती लोकांनी दिली. लोक मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतात म्हणून हा व्यवसाय तेजीत आहे, असं कारण समजलं. पण लोक कर्ज का घेतात या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही. कदाचित, इथले दुकानदार, व्यावसायिक आणि शेतकरी या फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत असावेत. या आर्थिक व्यवहारांच्या जोरावर लिंगायत समाजानं गावात चांगली पत कमावलेली आहे. गावातील एकूण व्यवहारांवर ब्राह्मण आणि मराठा समाजातील लोकांचाही पकड मिळवण्याचा प्रयत्न दिसतो. गावात फायनान्स कंपन्यांच्या बरोबरीने पतसंस्थाही आहेत. ‌‘स्वामी समर्थ पतसंस्था‌‘ ब्राह्मण समाजातील महिला चालवतात, तर ‌‘जिजाऊ पतसंस्था' मराठा समाजातील महिला चालवतात, हे ऐकून आपले आर्थिक व्यवहारही कसे जातिनिहाय बांधलेले असतात हे दिसून येतं. याशिवाय इतर काही पतसंस्थाही आहेत. काही पतसंस्थांच्या संचालकांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याचीही उदाहरणं आहेत. अक्कलकोटमध्ये सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखाही भरपूर आहेत. गावातली एकूण आर्थिक उलाढाल मोठी असल्याचं सांगणाऱ्या या खुणा आहेत. एरवी पाऊस न पडणारा हा दुष्काळी भाग आहे, परंतु स्वामी समर्थांच्या कृपेने दूरदूरवरून भक्त इथे येत असल्याने वेगवेगळ्या मार्गाने गावाला पैसा मिळतो. त्यामुळे पतसंस्था, सावकार, फायनान्स कंपन्या आणि बँका यांची इथली उपस्थिती लक्षणीय आहे. आर्थिकदृष्ट्या जे तीन सक्षम समाज आहेत तेच प्रामुख्याने या व्यवहारांमध्ये अधिक आहेत असं म्हणता येईल. 

गावातील इतर समाज प्रामुख्याने आपापले पारंपरिक व्यवसाय करताना दिसतात. या वर्गाला स्वामी समर्थांच्या महिम्याचा तेवढासा आधार मिळताना दिसत नाही. भक्तांच्या गावात येण्या-जाण्यामुळे काहींना थोडाफार जीवनाधार मिळतो खरा, पण त्यातून त्यांची फार आर्थिक प्रगती होते असं नाही. काही लोक देवस्थानच्या महिम्याच्या आधारे रोजी-रोटी मिळते काय, हे पाहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. बरेचसे लोक इथल्या लॉजेसना आणि हॉटेलांना गिऱ्हाईक मिळवून देण्याचं काम करतात. त्याचं त्यांना कमिशन मिळतं, शिवाय काही मंडळी ‌‘गाईड'चं काम करतात. काही तरुण मुलं रिक्षा वगैरे चालवतात. पण अशी फुटकळ कामं करून पैसे ते काय मिळणार? त्यामुळे कोणत्याही भक्तिस्थानाच्या ठिकाणी जे चित्रं दिसतं ते अक्कलकोटमध्येही दिसतं. स्वामींच्या महिम्याशी आणि परंपरेशी ज्यांनी जोडून घेतलं आहे, त्यांचं बरं चाललं आहे. पण देवस्थानाच्या परिघाबाहेरचा मोठा समाज मात्र रोजीरोटीच्या विवंचनेत आहे. स्वामी समर्थांचं वास्तव्य अक्कलकोटमध्ये असल्याचा लाभ झालेला नाही. अक्कलकोट हा दुष्काळी भाग असल्यामुळे आणि विकासापासून लांबचलांब असल्याने या वर्गाची गोची झालेली आहे. गावापासून जवळ असलेला ‌‘स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना' गेल्या दोन वर्षांपासून उसाअभावी बंद आहे. त्यामुळे शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. संस्थानकाळात इथे काही उद्योग उभे राहिले, पण काळाच्या ओघात ते नाहीसेही झाले. त्यामुळे आज गावात रोजगाराची वानवा आहे. गावात अनेक शिक्षणसंस्था आहेत, फायनान्स कंपन्याचं जाळं आहे, पण उद्योगाचं वातावरण नाही. शिक्षण आहे, पण रोजंदारीशिवाय पर्याय नाही. आधी संस्थानिक होते, ते आता नावापुरते उरलेत. त्यांच्या मालकीहक्काच्या - वारसाहक्काच्या जपवणुकीत गुंतलेत. स्वामींच्या वलयाने देवस्थानची आणि देवस्थानाशी संबंधित असलेल्यांची भरभराट झाली, पण सामान्य माणूस मात्र कोरडाच आहे. जीवनाची लढाई रोजच लढणारी इथली सामान्य माणसं स्वामींच्या एकाच संदेशावर जगत आहेत - ‌‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!

(संकल्पना संयोजन : सुहास कुलकर्णी, लेखन : विजय चव्हाण । मनोहर सोनवणे । मुकुंद ठोंबरे) 

(या लेखातील माहिती मिळवण्यासाठी पुढील व्यक्तींचं सहकार्य लाभलं. - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त सचिव बाळासाहेब इंगळे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे विश्वस्त श्याम मोरे, स्वामी समर्थ समाधी मंदिराचे विश्वस्त श्रीपाद प्रभाकर पुजारी उर्फ अण्णू गुरुजी, इतिहासाचे अभ्यासक तात्यासाहेब घाटगे, गावातील विविध दुकानदार व नागरिक. या साऱ्यांचे आभार.)

(समकालीन प्रकाशनाच्या ‘देवाच्या नावानं..' या पुस्तकातून साभार)


युनिक फीचर्स







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results