
आधुनिक जैववैज्ञानिक प्रयोगांच्या मदतीने उत्तर अमेरिकेतल्या लांडग्यांच्या एका जमातीचं पुनरुज्जीवन केलं गेलं आहे.
डायर वुल्फ (Dire Wolf) ही पांढर्या लांडग्यांची एक प्रजाती. हे लांडगे केवळ उत्तर अमेरिकेत वास करून होते. १२-१३ हजार वर्षांपूर्वी ही प्रजाती नामशेष झाली होती. आधुनिक विज्ञानाला केवळ या लांडग्यांच्या अवशेषांचीच ओळख होती. उत्तर अमेरिकेत जागोजागी सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास करून, या लांडग्यांचा काळ निश्चित करून, ते अवशेष जतन करून ठेवले गेले होते. प्राणीशास्त्रज्ञांची कामाची ही नेहमीची पद्धत. त्यानंतर आता या लांडग्यांची तीन नवी पिल्लं अस्तित्वात आली आहेत.
अमेरिकेतल्या टेक्सास इथल्या Colossal Biosciences या कंपनीने हे अभूतपूर्व काम केलं आहे. कंपनीतल्या जेनेटिक इंजिनिअरिंगमधल्या तज्ज्ञांनी आणि वैज्ञानिक संशोधकांनी १३ हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमधल्या एका दातातून आणि ७२ हजार वर्षांपूर्वीच्या कवटीच्या अवशेषांतून DNA मिळवले आणि त्यातून या लांडग्यांची दोन नर पिल्लं आणि एक मादी पिल्लू जन्माला घातलं.
अद्ययावत वैज्ञानिक तंत्रज्ञान एखाद्या जादूसारखंच असतं, असं म्हटलं जातं. Colossal Biosciences चा प्रमुख बेन लॅम याच्या म्हणण्यानुसार लांडग्यांच्या पुनरुज्जीवनाचा हा प्रयोग म्हणजे अशीच एक खास ’जादू’ आहे, जिला भक्कम शास्त्रीय प्रयोगशीलतेचा आधार आहे. या कंपनीतर्फे भविष्यात आणखी काही नामशेष प्राणीजमातींना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कुणी सांगावं, भविष्यात ‘जीवो जीवस्य जीवनम्’च्या विरुद्धार्थी एखादा सुविचारही प्रचलित होईल.
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.