
अलीकडेच एक बातमी आली : छत्तीसगडमधील एका गावात स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी पहिल्यांदा वीज पोहोचवली गेली. या राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील छुटवाही नावाच्या गावावर नक्षलवाद्यांचा ताबा असल्यामुळे तिथे सरकारी वीज पोहोचू शकत नव्हती; पण मोठ्या पोलिसी कारवाईत हा भाग नक्षल्यांच्या तावडीतून सोडवला गेला आणि त्यामुळे तिथे वीज पोहोचवण्याचा मार्ग खुला झाला. सरकारी माहितीनुसार आता हे गाव पक्क्या रस्त्यांनीही जोडलं जाणार आहे.
याच बातमीत असंही म्हटलं आहे, की नक्षलप्रभावित बिजापूर जिल्ह्यात आजही शंभर गावं अशी आहेत जिथे अजूनही विजेचे खांब पोहोचलेले नाहीत. ही गावं वर्षानुवर्षं अंधारातच जगत आहेत.
ही गावं अंधारात राहण्यामागे त्यांच्यावर असलेला नक्षली ताबा हे कारण असल्याचं सरकारतर्फे सांगितलं जातं. पण केंद्र सरकारच्याच ताज्या अहवालानुसार आजतारखेला देशात तब्बल ९०० गावं अशी आहेत, जिथपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. त्यात सर्वाधिक १२६ गावं तामिळनाडूतली आहेत, तर १२२ ओडिशातली आणि ११९ छत्तीसगडमधली आहेत. दूरचं कशाला, आपल्या महाराष्ट्रातही २४ गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. त्यातील गडचिरोली जिल्ह्यातली गावं सोडली तर इतर ठिकाणी नक्षली प्रभाव हे कारण लागू असण्याची शक्यता नाही. पण ती इतर कारणं कोणती ते कळायला तूर्त मार्ग नाही.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही अजून गावांपर्यंत वीज पोहोचवण्याचीच मारामार आहे. घरोघरी वीज पोहोचणं, त्यांनी ती वापरणं आणि त्यांना ती परवडणं हे अजून पलीकडचे विषय! शिवाय वीज पोहोचली तरी ती प्रत्यक्षात किती वेळ टिकते हा प्रश्न वेगळाच. देशातल्या निमशहरी आणि ग्रामीण भागात घोषित-अघोषित लोडशेडिंग चालू असतंच. कित्येक ठिकाणी तर किती वेळ वीज नसते असा प्रश्न विचारला, तर लोक ‘किती वेळ वीज असते?' ते विचारा असं म्हणतात!
एकीकडे महाशहरांच्या झगमगाटाला सर्व वेळ प्रचंड वीज दिली जाते, पण जिथल्या अन्नधान्यावर देश जगतो, त्या ग्रामीण आणि कृषीक्षेत्रात मात्र विजेचा कायम तुटवडा असतो, हे आपलं वास्तव आहे. रात्री-अपरात्री-पहाटे जागून शेताला पाणी द्यावं लागण्याची कसरत अजूनही शेतकऱ्यांना करावी लागते. पण त्यांच्या या दु:खाला कुणी वाली नसल्याने यंत्रणा वर्षानुवर्षं जैसे थे राहते.
विजेचे वाढते भाव आणि वीजनिर्मितीचं वाढतं खासगीकरण यामुळे वीज गावोगावी पोहोचण्याचे आणि तिच्या उपलब्धतेचे प्रश्न आणखीनच वेगळं रूप धारण करण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील एका गावात वीज पोहोचवल्याबद्दल तिथल्या सरकारचं, प्रशासनाचं आणि ही बातमी छापणाऱ्या दैनिकांचं कौतुक करायलाच हवं!
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.