दिवाळीचे वेध लागले की, सर्वांची उत्सवाची लगबग चालू होते. कुणाला घर आवरायचं असतं, कुणाला खरेदी करायची असते, कुणाला आपापल्या गावी दिवाळीसाठी जायचं असतं, कुणाला सजावट करायची असते, तर कुणाला फराळ करण्याची घाई झालेली असते. दिवाळीत ही सगळी कामं घरातील मंडळी एकत्र मिळून करतात. परंतु कुणाला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याची मुभाच नसेल तर?
लैंगिक अल्पसंख्याक समुदायातील बहुतांश व्यक्तींची लैंगिक ओळख समजल्यानंतर त्यांचं कुटुंब त्यांना दूर सारतं. प्रसंगी प्रत्यक्ष कुटुंबीयांनी स्वीकारलं तरी नातेवाईकांची दृष्टी बदलत नाही. असे दिवाळीला घरी जाऊ न शकलेली ही मंडळी जिथे असतील तिथं आपलं घर, आपली माणसं शोधण्याचा प्रयत्न करतात. समुदायातील एकमेकांसाठी कुटुंब बनतात. शेजारी-पाजारी, कामाच्या ठिकाणची माणसं, मित्रमंडळी, समुदायातील लोक यांच्या सहवासात दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात. पण घरची, कुटुंबाची उणीव जाणवतेच.
वैदेही पुणे महानगरपालिकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करते. ती पारलिंगी महिला आहे. ती तिचं लिंगपरिवर्तन (ट्रान्जिशन) करण्यापूर्वी घरी जायची. तिचं स्वतःचं कुटुंबं आणि मावशीचं कुटुंबं मिळून मामाकडे दिवाळीचा सण साजरा करायचे. पस्तीस ते चाळीस लोक सणासाठी एकत्र यायचे, धमाल करायचे. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असं सगळं मिळून सहा-सात दिवस आनंदात जायचे. आता मात्र ती घरी जाऊ शकत नाही. दिवाळीचा तो उत्सव तिच्या आयुष्यातून कुठेतरी हरवून गेला आहे. आजही घरी जाऊन दिवाळी साजरी करावी, अशी वैदेहीची इच्छा असते. पण ते सध्या तरी शक्य नाही. बरं वैदेही अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे तिला एकच दिवसाची सुट्टी मिळते. तरी त्यातूनही वेळ काढून वैदेही घर सजवते, गोडाधोडाचे चार पदार्थ करते. आपल्या मित्र मैत्रिणींना फराळ करायला बोलावते.
युतक चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था एलजीबीटीक्यू समुदायासाठी काम करते. त्यांच्यातर्फे पुणे शहरात 'निराळी दिवाळी' साजरी केली जाते. घरी न जाऊ शकणारे समुदायातील लोक आणि त्यांच्या पाठिशी उभी असलेली समाजातील काही सहृदयी मंडळ या उपक्रमात सामील होतात. या लोकांना एकटं वाटू नये, त्यांना उत्सवात सहभागी होता यावं हा यामागचा उद्देश असतो. शंभरभर लोक या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र येतात.
सान्वी हीदेखील पुणे महानगरपालिकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी पारलिंगी महिला आहे. ती कुटुंबापासून लांब भाड्याच्या घरात राहते. काही वर्षांपूर्वी सान्वीचे आई-वडील वारले. तेव्हापासून तिच्या घराचे दरवाजे सान्वीसाठी कायमचे बंद झालेत. "गेली तीन-चार वर्षं मी ना घराचं तोंड पाहिलंय, ना घरची दिवाळी." असं सान्वी सांगते. आधी भाऊ थोडंफार बोलायचे आता तेही बंद झालं. शेजारी-पाजारी, कामावरचे मित्र-मैत्रिणी फराळ आणून देतात. सान्वीही ते आनंदाने स्वीकारते. सान्वी सांगते की, लिंगपरिवर्तनापूर्वी ती संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र दिवाळी साजरी करायची. दिवाळीच्या खरेदीपासून, फराळापर्यंत सर्व गोष्टी ते एकत्र करत. परंतू आज तिला प्रत्येक सण एकटीने साजरा करावा लागतो. सर्व कुटुंब एकत्र येऊन दिवाळी साजरी करेल, असा क्षण पुन्हा येऊ शकणार नाही, याचं सान्वीला वाईट वाटतं. दिवाळीच्या दिवशी आई-वडिलांची आणि भावांची खूप आठवण येते, असं सान्वी म्हणते.
विजय (नाव बदललं आहे.) समलिंगी पुरुष असून कुटुंबात त्याचं समलिंगी असणं स्वीकारलं न गेल्यामुळे विजय कुटुंबापासून लांब राहतो. तो त्याची दिवाळी त्याचा पार्टनर आणि मित्रमंडळींसोबत साजरी करतो. कुटुंब आणि पार्टनर यांच्यासोबत कधीतरी आपण एकत्र दिवाळी साजरी करू, अशी विजयची इच्छा आहे. कधीतरी ती पूर्ण होईल, अशी आशा तो बाळगून आहे.
भरलेल्या कुटुंबातून तुटून लांब कुठेतरी जाऊन एकट्याने दिवाळीचा सण साजरा करणं अनेकांच्या जिवावर येतं. परंतु लैंगिक अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींचा कुटुंबातून आणि समाजातून स्वीकार होत नाही तोवर त्यांना अशीच उंबरठ्याबाहेर राहून दिवाळी साजरी करत राहावी लागणार!
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.
