
होळी सरली की वाढत्या उन्हाच्या, पाणीटंचाईच्या बातम्या कानांवर यायला लागतात. गेल्या काही वर्षांत चैत्र महिना देखील भाजून काढू लागला आहे. या दिवसांत मोठ्या शहरांमध्येही पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ लागतो. लहान गावं आणि खेड्यांमधील परिस्थिती खूपच वाईट असते. पाणी भरताना बायका-पोरींना झालेल्या अपघातांच्या बातम्या होत्यात. पण त्यांना रोज पाणी भरण्यासाठी जो त्रास सहन करावा लागतो, त्याचं काय?
गेल्या आठवड्यात गावी निघालो होतो, तेव्हा हाच विषय डोक्यात घोळत होता. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातून रस्ता होता. वाटेत किन्ही गावाजवळ काही महिला पाण्यासाठी घागरी, हांडे घेऊन पायी निघालेल्या दिसल्या. वाटलं, यांच्याशी थोडं बोलावं. म्हणून गाडी थांबवली. त्यांची चौकशी केली. गावापासून थोड्या अंतरावर एका बोअरवेलला थोडं पाणी येतं, तिथून त्या पाणी भरणार असल्याचं कळलं.
गाव-शिवार थोडसं माळरानाचं आणि डोंगराळ दिसत होतं. गावाला पाण्याचा ताप होत असणार याचा अंदाज आला. त्यांना विचारलं, “सार्वजनिक नळाचं पाणी मिळत नाही का?” त्यावर त्यांतली एक, पारुबाई म्हणाली, “नाही येत. आमच्याकडं दुष्काळ हाय. बोअरवेलला थोडं थोडं पाणी येतंय, तेच पिण्यासाठी आणतोय.” बाकीच्यांनी डोक्यावरचे हंडे सावरत माना डोलावल्या.
त्या बायका रोजंदारी-मजुरी करणार्या होत्या. मग इंदुबाई पायाळ बोलू लागल्या- “आमच्याकडं जमीन नाही. जमीनवाले स्वतःची विहीर घेतात. हक्काचं पाणी त्यांना मिळतं. आम्हाला नाही.” भूमीहीन असल्याने या बायका मजुरीकामं करत असणार हे उघड होतं. तिसरी बाई, उषाबाई शिंदे म्हणाली, “खासगी टँकरचं पाणी विकत घ्यावं लागतं. नाहीतर असं आणावं लागतं. दुसरा पर्याय नाही. पण पाणी विकत घेतलं तरी ५००-७०० लीटरपेक्षा जास्त साठवता येत नाही. आणि ते दोन दिवस पण पुरत नाही, त्यामुळे खर्च खूप होतो. मग असं चालत जाऊन आणायचं.”
पारुबाई, इंदूबाईंसोबत कावेरी शिंदे होती. तिचा नवराही मजुरी करतो. घरी सहा माणसं. मजुरीच्या पैशांतून रोजचा खर्च भागवायचा, की सर्वांना पुरेल इतकं पाणी विकत घ्यायचं, असा तिचा प्रश्न होता.
तुटपुंजी कमाई असणार्या या माणसांना पाणी विकत घेणं अशक्य असतं. त्यामुळे दूरदूरवरून पाणी भरण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. त्यात त्यांचा किती वेळ जातो याचीही गणती नाही.
पण या बायकांनी ही परिस्थिती स्वीकारली आहे असं वाटतं. पाण्यापुढे वेळेची काय किंमत! कारण घराच्या दारात नळाचं पाणी मिळण्याची आशा त्यांनी कधीच सोडून दिली आहे.
माझ्याशी बोलायला थांबल्याने सुद्धा त्यांचा पाणी भरण्याचा वेळ वाया चालला होता, याची मला जाणीव झाली. तरी त्या बायका बोलायलाही उत्सुक होत्या असं दिसलं. कदाचित अशा प्रकारे क्वचितच कुणी त्यांची विचारपूस करत असेल.
वेळ हा एक मुद्दा झाला. पाणीटंचाईमुळे शिक्षण, आरोग्य, राहणीमान या बाबतीतही हौसेलाच नव्हे, तर गरजांनाही मुरड घालावी लागते. त्यामुळे वर्षानुवर्षं घरोघरी गरिबी आणि मागासलेपण टिकून आहे.
पण त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा असा की रोज याप्रकारे पाणी भरून बायकांच्या आरोग्यावर कोणता परिणाम होतो, याची तरी दखल कोण घेतं? त्याबद्दल त्यांना विचारलं. तर सगळ्या म्हणाल्या, “काही नाही, आम्हाला सवय झाली आहे”.
मग जरा वेगळ्या पद्धतीने विचारलं- “तुम्ही कोणी वारंवार आजारी पडता का?” त्यावर मात्र लगेच उत्तरं आली- “हो, अंगदुखी होते, पाय दुखतात, थकवा येतो, ताप येतो.” मग त्यावर उपचार? एक-दोघी म्हणाल्या, “दुखणं छोटं असेल तर अंगावर काढतो. जास्त असेल तर दवाखान्यात जाऊन इंजेक्शन-गोळ्या घेतो.” तरी आपल्या आरोग्याच्या तक्रारी आणि रोज पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट आणि कष्ट यांचा एकमेकांशी काही संबंध असेल हे त्यांच्या गावीही नव्हतं.
या बायकांना फार वेळ थांबवून ठेवणं बरोबर नव्हतं. कारण शेवटी गाठ पाण्याशी (किंवा पाणीटंचाईशी) होती. मी गाडी सुरू केली. त्यांनीही आपली वाट धरली.
●
नेकनूर (ता. जि. बीड) येथील एका ओळखीच्या डॉक्टरांना भेटलो. त्यांना विचारलं, “पाणीटंचाईचा महिलांच्या आरोग्यावर काही परिणाम होताना दिसतो का?” ते म्हणाले, “अलीकडे पाणीटंचाईमुळे घरगुती वापरासाठी पाणी कमी मिळतं. साहजिकच शारीरिक स्वच्छतेवर आणि पुढे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. शिवाय डोक्यावर हंडा, घागर, कळशी घेऊन दूर दूर चालण्यानेही शरीराची हानी होते. मणक्याचे, मानेचे आजार, सांधेदुखी, पायदुखी, पोटाचे विकार वाढतात. शारीरिक व्यंग तयार होतं. गर्भवती महिला असेल तर तिचा गर्भपातही होऊ शकतो.” दुष्काळी भागात हे चित्र अगदी नेहमी दिसणारं आहे.
काही तरुण महिलांना तरुणपणामुळे आजार जाणवत नसतील. तरी ४५ वयानंतर हळूहळू जाणवण्यास सुरुवात होते. त्यावेळी आरोग्याविषयी हळूहळू बोलण्यास सुरुवात करताना दिसून येतात. अलीकडे कष्टाच्या कामांमुळे (पाणी भरणे व इतर) तरुणपणीच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे अनेक उदाहरणे पुढे आले आहेत. रोजंदारी, कष्टकरी, हातावर काम करून पोट भरणाऱ्या महिलांना दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळी-सकाळी पाणी मिळवण्यासाठी वणवण. हा दिनक्रम चालू असतो. जास्त कष्टाची कामे करण्यामुळे महिलांच्या शरीराची किती झीज होते. त्यातून सतत आजारी पडून दवाखाना सुरु राहतो असे अनेक मुद्दे कोरडवाहू परिसरातील डॉक्टरांशी केलेल्या चर्चेतून समोर आले.
ग्रामीण भागातल्या जरा बरी परिस्थिती असलेल्या कुटुंबांना विहीर किंवा बोअरवेल खोदून पाणी मिळवण्याचे पर्याय असतात. पण भूमिहीन, गरीब कुटुंबांना पाणीटंचाईचा काच खूप जास्त असतो. या कुटुंबातील बायकांना मोलमजुरी करून शिवाय पाणी मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. पैशांच्या अभावी त्या आजार अंगावर काढतात. म्हणजे पैसे खर्च व्हायला नकोत म्हणून आधी पाण्यासाठी तंगडतोड करायची आणि त्याचा त्रास झाला तरी तो अंगावर काढायचा अशी दुहेरी ससेहोलपट सुरू असते.
आजही पाणी ‘भरणं’ हे घरच्या बाईचं काम मानलं जात असल्याने पाणीपुरवठा, दुष्काळनिवारण याचबरोबर या स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भातही शाश्वत उपाययोजना होणं आवश्यक आहे.
सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com
सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.