आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

रंगमंचावरून शोषितांचे प्रश्न मांडणारा तल्हा

  • शिल्पा दातार
  • 04.03.26
  • वाचनवेळ 5 मि.
talha shaheen gulam theater of oppressed

‘‘चल, तुला पोलिसांतच देते.’’

रागाने लाल झालेल्या प्रेक्षक महिलेने नाटकातल्या महिलेला त्रास देणाऱ्या पुरुष कलाकाराची कॉलरच पकडली. हा प्रसंग होता, एका छोट्या वस्तीत कौटुंबिक हिंसाचारावरचं नाटक सुरू असतानाचा. आपण नाटक पाहतोय हे ती क्षणभरासाठी विसरलीच. आपण वर्षानुवर्षं सहन करतोय, तोही कौटुंबिक हिंसाचाराचाच एक भाग आहे, हे तिला जाणवलं होतं. या नाटकाचं सादरीकरण करणारे समाजातल्या वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक गटातले जेन झी पिढीतले तरुण होते. तल्हा शाहीन गुलाम शेख या तरूणाने त्याच्या सहकाऱ्यांसह चालवलेल्या 'शोषितांचा रंगमंच' या नाटयचळवळीमधलं हे एक नाटक. या रंगमंचावर अभावग्रस्तांचे प्रश्न नाटकाच्या माध्यमातून मांडले जातात. समाजाला विचारप्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो.

तल्हा हा मध्यमवर्गीय कुटुंबातला. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना तो ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनमध्ये काम करू लागला. समाजातल्या शोषितांच्या प्रश्नांवर उत्तरं शोधली पाहिजेत, असं त्याला वाटायचं. नाशिकमधल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेचाही त्याच्यावर प्रभाव पडला. तिथे य़ेणारे विचारवंत वेगवेगळ्या पुस्तकांचे संदर्भ देत. त्यातून आपणही अवांतर पुस्तकं वाचली पाहिजेत, असं त्याला वाटायला लागलं. त्याचं वाचन वाढलं. डेरिक थॉमसचं सेकंड रिव्होल्युशन पुस्तक वाचल्यावर मी बदललोच, असं तो सांगतो. दरम्यानच्या काळात सामूहिक कामं, लोकशाही मूल्यं यांबाबत तो विचार करायला लागला.

हेही वाचा - मिर्झा अब्दुल: छोट्यांचे किताबचाचा

दरम्यान कोरोना लॉकडाऊन लागलं. त्यात नाशिकच्या बाहेर असलेले तल्हाचे मित्र अपूर्व, विराज, अविनाश नाशिकला परतले. अपूर्व मुंबईला थिएटर शिकत होता. त्याच्यामुळे तल्हाला हळूहळू थिएटर समजत गेलं. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असताना ‘आर्ट फॉर द सेक ऑफ आर्ट’ नसून ‘आर्ट शुड बी सेक ऑफ लाईफ’, असायला हवं, या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले.

talha shaheen gulam theater of oppressed

नाटक या माध्यमातून जगणं, संघर्ष दिसायला हवा, वंचित थरांतील व्यक्तींच्या संघर्षाबाबत जाणीव-जागरूकता यायला पाहिजे हा विचार घेऊन सुरुवातीला त्यांनी ‘रीडिंग सर्कल्स’ घेतली. प्रोग्रेसिव्ह नाटकाविषयी वाचन, अभ्यास करत असताना एका वाचनालयावर हल्ला झाल्याची बातमी त्यांना समजली. या मित्रांना त्यांच्या नाटकाचा विषय मिळाला. त्यावर ‘हिंसालय’ नाटक तयार झालं. वाचनालयाच्या शौचालयात अडकलेली मुलगी, एक विद्यार्थी आणि तिथला सफाई कर्मचारी या तिघांच्या संवादातून नाटक घडत जातं आणि प्रश्नचिन्ह निर्माण करतं. त्याचं उत्तर पाहणाऱ्याने ठरवायचं. लॉकडाऊनमुळे काही नाटकांचे सुरुवातीचे प्रयोग नाशिकमध्येच झाले. लॉकडाऊन उठल्यावर तल्हाचे मित्र आपापल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी गेले. तेव्हा ‘थिएटर ऑफ ऑप्रेस्ड’ ही चळवळ सुरूच राहिली पाहिजे, यासाठी त्याचा खटाटोप सुरू होता.

हेही वाचा - पोलिसाची नोकरी सोडून मुलांसाठी काम करणाऱ्या वैशाली शिंदे-शेंडे

नाटक, नाटय प्रशिक्षणाच्या निमित्ताने तरुण मुलांना विचारप्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्याने नाट्य कार्यशाळा, नाट्य प्रशिक्षणं घेतली. त्यात तीन दिवसीय आणि बाकीची सहा दिवसांची निवासी शिबिरंही होती. त्यातला एक भाग असतो, ‘प्रिव्हिलेज वॉक’. यामध्ये सहभागींच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. त्यांना काही प्रश्न विचारले जातात- सात वाजल्यानंतर घराबाहेर बिनधास्त निघू शकता का? मनसोक्त हापूस आंबा खाऊ शकता का? आवडतं ते करता येतंय का? पाहिजे तसे कपडे घालता येताहेत का? कधी तुमचं शारीरिक शोषण झालंय का? -या गोष्टी तिथं जमलेल्या प्रशिक्षणार्थींच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणाऱ्या असतात. वेगवेगळे सामाजिक स्तर त्यातून दिसतात. पुढे संविधानावर चर्चा सुरू होते.

talha shaheen gulam theater of oppressed

आनंद निकेतन शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत तल्हाने निवासी प्रशिक्षण घेतलं होतं. त्यात विविध आर्थिक, सामाजिक स्तरातील मुली-मुलं होती. आपलं घर, भवताल कसा आहे, पुरुषप्रधान व्यवस्थेला मानणारा आहे का, यावर मुलं मोकळेपणाने बोलली. तल्हा सांगतो, ‘‘त्यावेळी एक मुलगा अक्षरशः रडला. मुलगा म्हणून वेगळी वागणूक देत असताना, घरातल्या मुलींवर काय परिणाम होतो, हे त्याच्या लक्षात आलं.’’

त्याला याच विषयातली एक फेलोशिपही मिळाली. त्याचा विषय होता, 'थिएटर ऑफ द ऑपरेस्ड'.

हेही वाचा - वंचितांच्या जगण्याला अर्थ देणाऱ्या श्यामला चव्हाण

प्रेक्षकांना ‘आपलं’ वाटलं पाहिजे या भूमिकेतून इथे कोणताही बडेजाव, लाऊड मेकअप नसतो. प्रश्न मांडून नाटक थांबतं. नाटक थांबतं तिथून विचार सुरू होतात. या नाट्य चळवळीत कधी संकेत, प्रियपाळ आणि समीर नावाचे सहकारीही प्रशिक्षण देण्यासाठी येतात, मुक्ता, भावेश यांच्यासह त्यानं हिमाचलमध्येही एक प्रशिक्षण घेतलं, अर्थात हिंदीतून! या नाटकांचं सादरीकरण हिमाचल, कोकणातील महाड परिसरातील गावागावांमध्ये, इतरही अनेक ठिकाणी झालं. कौटुंबिक हिंसाचार, साफसफाई, हुंडा, बालविवाह, छेडछाड, बालकामगार यांसह अनेक विषयांवर ऊहापोह केला आहे. एका संस्थेत कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा छळ आणि पॉश कायदा याबाबत सादरीकरण झालं. शोषित महिलेची भूमिका करणाऱ्या स्त्रीकलाकाराला महिला कर्मचारी भेटल्या. त्यांनी आपल्या बाबतीतही असं घडल्याचं सांगितलं. कधी नाटक पाहिल्यावर पुरुषी मानसिकतेचे लोक ढसाढसा रडताना दिसतात.

talha shaheen gulam theater of oppressed

पुढच्या प्रक्रियेत वस्त्यांवर, गृहसंकुलांमध्ये जाऊन लोकांना बोलतं करायचं, त्यांच्याशी निगडित मुद्दे काय शोधून त्यावर चर्चा करायची, हा भाग असतो. जिथं गरज आहे, तिथं जाऊन नाटक करायचं. हे सगळं महाविद्यालये, विद्यापीठ, रस्त्यावर, वस्त्यांमध्ये… चळवळीच्या अधिवेशनांपर्यंत सगळीकडे पोहोचणं महत्त्वाचं असल्याचं तल्हा सांगतो. आयएफएसच्या माध्यमातून घरकाम मदतनीस, आशा सेविका, घंटागाडी कामगार यांच्या मुलांसाठी दीडशे विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जातो. नाशिक शहरात तसंच मुंबई, भंडारा, परभणी, संभाजीनगरमध्येही हे काम सुरू आहे. रविवारी भगतसिंग स्टडी सर्कलमध्ये कळीच्या मुद्दयांवर तज्ज्ञांचं व्याख्यान असो, संविधानावर एकदिवसीय कार्यशाळा असो, सर्व संघटनांना एकत्र करून ड्रग्जविरोधात रॅली काढणं असो, मनपाच्या शाळेचं अस्तित्व वाचवणं असो… अशा अनेक गोष्टींत पुढाकार घेत असतानाच आजच्या जेन झीचे नेमके प्रश्न काय आहेत, ते कुठून निर्माण झाले, याचाही विचार करतो.

इफ्टाच्या माध्यमातून तल्हाच्या टीमने हिंसालय एकांकिका, प्रथम पुरुष, दिल्लीची किल्ली, नेबर, प्लंबर आणि ती अशा चाकोरीबाहेरच्या नाटुकल्यांचे प्रयोग केलेत. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन मेंटॉरिंग, के. के. वाघ महाविद्यालयातील नोकरी सांभाळत तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम करतोय. सुशिक्षित तरूणांनी संवेदनशीलतेने राजकारणात आल्यास भ्रष्टाचारमुक्त, सर्वसमावेशक तडफदार राजकीय फळी उभी राहील, असं त्याला वाटतं.

शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com

शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Pratibha karbhari shinde04.03.26
खूप सुंदर पद्धतीने लेख लिहिलेला आहे मला नव्याने तल्हा दादा बद्दल काही गोष्टी समजल्या तो खूप धाडसी व्यक्ती आहे आताच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे मी खूप गोष्टी शिकले आहे त्याने काम केलेल्या नाटक मी बघितले आहे प्रथम पुरुष खूप छान सादरीकरण केलेले आहे खूप विचार करायला लावणार आहे. Thank you shilpa mam. अजून आमच्या माहितीत तुम्ही भर घातली.. 😊

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results