आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

आई स्वयंपाकघरात राहते

  • कुमार अंबुज
  • 10.05.26
  • वाचनवेळ 9 मि.
mothers day story

रात्री तीनच्या सुमाराला मला जाग आली. कसली तरी खुडबूड ऐकू आली. जाऊन पाहिलं तर आई स्वयंपाकघरात कुठलं तरी भांडं काढत होती. मला पाहून ती चमकली. मग हसून म्हणाली,

"उजाडायला अजून अवकाश आहे. तू झोप जा." तिचे दात खूप सुंदर दिसत होते.

मी आळसावलेल्या अवस्थेत विचारलं, "इतक्या रात्री तू इथे काय करतेयस ? झोपली नाहीस?"

"अरे, झोपले कशी नाही? आत्ताच तर उठलेय."

"तू रात्री अकरापर्यंत तर जागीच होतीस." मी थोड्याशा आश्चर्याने म्हणालो.

“हो, मग काय झालं? माझी झोप एवढीच आहे. तू जाऊन झोप."

काही दिवसांनंतर मी अचानक रात्री दीड वाजता उठून बसलो. बहुधा स्वप्न तुटल्याने किंवा कसल्या तरी आवाजाने. थोड्या वेळाने जाणवलं की स्वयंपाकघरात कोणीतरी आहे. लाइट लागलेला होता. पाहिलं, तर आई स्टुलावर बसून पेपर वाचत होती. मला पाहून थोडी बावरल्यासारखी झाली; पण लगेच सावरून शांत होत तिने विचारलं, "पाणी हवंय?" आणि उत्तराची वाट न पाहता ओगराळं घेऊन ग्लासात पाणी ओतू लागली. पाणी पिऊन आल्यावर मी विचारलं, "अजून झोपली नाहीस आई?"

"अरे, झोपच येत नव्हती, म्हणून मग इथे बसून पेपर वाचायला घेतला. झोपेन आता."

"कमाल आहे तुझी! जेव्हा पाहावं तेव्हा किचनमध्ये बसलेली असतेस."

"का? किचनमध्ये कोणी बसू शकत नाही? मला तर इथेच बसायला आवडतं."

"ठीक आहे." मी हार मानत म्हणालो, "चल, आता झोपायला चल."

"तू जाऊन झोप. मी हे एवढं शेवटचं पान वाचून येते."

असं अनेक वेळा घडलं. रात्री कधीही मला जाग येवो, बारा वाजता, दोन वाजता, चार वाजता किंवा पहाटे पहाटे पाच वाजता, मला आई किचनमध्येच दिसायची. कधी सांगायची, विरजण घालायला विसरले होते. आत्ता पाच मिनिटांत झोपायला जाते. कधी सांगायची, अरे, घरात भाजी नाहीय हे अचानक लक्षात आलं. आता डाळ-चणे भिजत ठेवतेय. किंवा, पिठाचा गोळा फ्रिजमध्ये ठेवायला विसरले होते. एका रात्री पाहिलं, तर बारा वाजता स्वयंपाकघराच्या भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरवर दुधाचा हिशोब लिहून ठेवत होती. विचारलं तर उत्तर आलं, "रोज किती दूध घेतलं ते लिहून ठेवत असते. आज विसरले होते. आठवण आली म्हणून लिहायला आले." कधी रागे भरत म्हणायची, "मी रात्री कुठल्याही कामाला उठले की लगेच उठून मागे मागे काय येतोस?"

हेही वाचा - ईदच्या दिवशी आई कुठे असायची?

आणि असं तर नेहमीच सांगायची, की तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला उठले. इथे छान गार वारा येत होता म्हणून खिडकीजवळ उभी राहिले.

स्वयंपाकघरात दक्षिण दिशेला उघडणारी एक लहानशी खिडकी होती.

एकदा तर मी घाबरूनच गेलो होतो. रात्रीच्या दोन-अडीचचा सुमार असेल, आई तिच्या खोलीत नव्हती. फक्त वडील उताणे पडून घोरत होते. आई बाथरूममध्येही नव्हती. किचनमध्ये आणि हॉलमध्ये अंधार होता. बाहेर जायच्या दरवाजाला आतून कडी घातलेली होती. मी ओरडून विचारलं, "आई, कुठे आहेस तू?"

आई किचनच्या काळोखातून बाहेर आली. "काय झालं?

इतक्या जोरात का हाका मारतोयस? मी घाबरले. जरा हळू बोल. सर्व जागे होतील."

"ओफ् आई! मी घाबरलो, तू कुठे गेलीस म्हणून."

"मी कुठे जाणार? इथे स्वयंपाकघरात तर होते." "मी सर्व ठिकाणी पाहिलं. किचनमध्ये मिट्ट काळोख होता." तुला काळोख वाटत असेल, मला सर्व दिसतं. मी पाणी प्यायला उठले होते, खिडकीतून बाहेर डोकावंसं वाटलं... आज सप्तमी आहे बहुतेक."

मला राग आला. पण मी काय करू शकणार होतो ? गुपचूप आत जाऊन झोपलो.

बाहेरून यावं तर बहुधा आईच दार उघडायला येणार; पण थेट किचनमधून बाहेर आणि पुन्हा किचनमध्ये परत. कधी अचानक आठवल्याप्रमाणे म्हणायची, "बरं झालं आलास. जरा स्टुलावर चढून पापडाचा डबा काढून दे." तिची सर्व कामं स्वयंपाकघराशी जोडलेली असतात आणि तिची स्वतःचीही सर्व कामं स्वयंपाकघरातच उरकली जातात. ब्लाऊजला हुक लावण्यापासून ते गहू पाखडण्यापर्यंतची सर्व कामं. वर्षातून एकदा ती मावशीला किंवा आत्याला पत्र लिहिते तेसुद्धा स्वयंपाकघरात बसूनच - पोटाशी एखादं जाड पुस्तक धरून, वहीच्या पानावर. शेजारच्या काकू किंवा अलका, मधू या मुली नेहमी घरी येतात त्यांनाही ती स्वयंपाकघरातच बसवून घेते- कधीच न फाटणारी एक छोटीशी चटई आहे, तिच्यावर. काकू, अलका, मधू सतत आईला सांगत असतात की तिचं स्वयंपाकघर खूप छान आहे. गल्लीतल्या सर्वांना हे ठाऊक आहे. नीट लावलेलं आणि स्वच्छ, रेखीव.

फुरसतीच्या वेळी ती एकटी बसून असते तेसुद्धा तिथेच, किचनमध्ये, तिच्या आवडत्या फूटभर उंचीच्या स्टुलावर. ते स्टूल माझ्या जन्माच्या आधीपासूनचं आहे. नाहीतर कधी खिडकीशेजारी उभी दिसेल. हरवून गेलेली. खिडकीपलीकडे कोणास ठाऊक काहीतरी पाहत असलेली. मला वाटतं, दक्षिणेकडचं आकाश आता तिला पूर्ण पाठ झालंय. तिथे कुठले तारे आहेत, कुठली नक्षत्रं, किती ग्रह, सूर्य तिथून कुठल्या ऋतूत कसा प्रवास करतो, चंद्र किती कलांमधून दिसतो तिला सर्व ठाऊक आहे. तिथल्या आकाशाचे रंग, ढगांची रूपं ठाऊक आहेत. तिथल्या वाऱ्यावरून, आकाशावरून ती हवामानाचा अंदाज करू शकते. पण कोणी सांगावं, ती हे सर्व पाहतही नसेल. केवळ दूरवर दिसणाऱ्या तीन-चार झाडांच्या पानांकडे पाहत असेल, किंवा निव्वळ मोकळा श्वास घेण्यासाठी उभी राहत असेल. तिच्याबद्दल तिच्याकडून काहीही काढून घेणं नेहमी दुरापास्त असतं. ती छान दिशाभूल करू शकते. आणि तुम्हाला कळणारही नाही की ती तुम्हाला शेंडी लावतेय. तिला स्वयंपाकघरातून बाहेर काढण्यासाठी केलेली कसरत नेहमी वाया जाते. तुम्ही ओरडून विचारा, की बेल्ट, मोजे किंवा घड्याळ कुठे आहे, की या निमित्ताने ती तिथे येईल; तर ती तिथूनच प्रत्येक गोष्ट कुठे आहे हे सांगेल. 'मधल्या खणात मागच्या बाजूला बघ' किंवा सांगेल, 'उशीखाली आहे' किंवा 'दरवाज्यामागच्या खिळ्याला', रेडिओवर तिच्या आवडीचं एखादं गाणं लागलं तर तिथूनच सांगेल, "जरा आवाज मोठा कर इथे ऐकू येत नाहीय."

हेही वाचा - आईची आई

सुट्टीचा दिवस होता. मी दुपारी दीडच्या सुमारास जेवून झोपायला गेलो होतो. छोटा भाऊ क्रिकेटची मॅच खेळायला गेला होता. साडेतीन वाजता झोपून उठलो, तर पाहिलं, की आई किचनमध्ये बसून तांदूळ निवडतेय. मी तिच्या गळ्याला विळखा घातला आणि लाडात येत म्हणालो, "हे काय आई. दिवसरात्र काम-काम-काम! सतत काही ना काही करतच असतेस. कधी पीठ, कधी पाणी, कधी दूध. कधी अमुक गरम करणं, कधी तमुक थंड करणं. कधी निवडणं, कधी पाखडणं, काही काम नसलं तर खोबरं किसायला घेतेस नाहीतर मसाल्याच्या डब्यांची अदलाबदल करत राहतेस. रांधणं, फोडणी देणं हे तर करतच असतेस. भाज्या कापून ढीग करून ठेवतेस. आता हे तांदूळ घेऊन बसलीयस. पेपर वाचणं, पत्र लिहिणंसुद्धा इथेच बसून करतेस. मला हे सर्व चांगलं वाटत नाही. भांडी घासायला बाई येतात तेव्हाही तू इथे किचनमध्येच असतेस. तू तुझ्या खोलीत जाऊन कधी आराम का करत नाहीस ? ती खोली नावाला तुझी आणि बाबांची आहे. तू कधी तिथे जाऊन बसलीयस असं होत नाही. कधी हॉलमध्ये आराम कर."

"हे बघ, तुला काही समजत नाही. ही सर्व कामं आधी करून ठेवावी लागतात. अचानक उठून भात डाळ-भाजी बनवता येतं का? तुम्हाला भूक तर अचानक लागते. आणि बाईंबरोबर मी थोड्या गप्पा मारते, त्यांना काही उरलं सुरलं देते. कधी त्यांच्यासाठीही चहा करावा लागतो. ही थोडीफार कामं करावीच लागतात. कोण करणार ती? आणि मी झोपायला आमच्याच खोलीत जाते ना? हॉलमध्ये बसायला, पडायला मला नाही आवडत. तिथे इतकी ये-जा असते की मला दोन मिनिटं आराम करता येत नाही. माझं काम स्वयंपाकघरातच असतं. इथेच मला शांती लाभते." तिने माझ्या डोक्यावर थोपटत, केसांमधून प्रेमाने हात फिरवत उत्तर दिलं. ती अशा प्रकारे बोलते की मी जणू चार-पाच वर्षांचं बाळ आहे आणि मला काही समजत नाही. अशा प्रत्येक हुज्जतीनंतर मलाही वाटू लागतं, की खरंच, मला अजून समज आलेली नाही. या वयातही तिचे केस काळेभोर आणि लांबसडक आहेत.

एका संध्याकाळी पाहिलं, तर स्टूल भिंतीला चिकटून आहे. आई स्टुलावर बसलेली आहे. तिच्या मांडीवर एक ताटली आहे, जिच्यात अर्धा दुधी, साल काढून ठेवलाय आणि तिथेच सुरी पडून आहे. आईचं डोकं मागच्या भिंतीला टेकलंय आणि तिला झोप लागलीय. तिच्या चेहऱ्यावर विसावा पसरलाय आणि ती दीर्घ श्वास घेतेय. मी तिला उठवावं की नाही या विचारात थोडा वेळ उभा राहिलो. वळून परत जाणार एवढ्यात आईने डोळे उघडले आणि ती विचारू लागली, "काय झालं? काही हवंय का?"

मी आईकडे रोखून पाहत म्हणालो, "आई, इतकी दमलीयस, तरी इथे, स्वयंपाकघरात बसून राहिलीयस. तिथे बिछान्यावर थोडा वेळ विश्रांती का घेत नाहीस? बघितलंस? इथे आत्ता थकव्याने तुला झोप लागली होती."

"नाही रे, झोपले नव्हते. मला कधी कधी भिंतीला डोकं टेकवून डोळे मिटून घ्यायला बरं वाटतं. आणि मी बिलकूल थकलेली नाहीय. बोल, तुला काय हवं होतं?"

"आजकालच्या बायका काय काय नाही करत ? तू अधूनमधून बाहेर फिरायला जा ना. का अशी स्वतःला पिंजऱ्यात कोंडून घेतेस?" मी चिडून विचारलं.

"मी फिरायला जाते रे... तुझं लक्ष नसतं. सगळीकडे जाते. तिथे बागेतसुद्धा. तुम्ही सर्व जेव्हा घरी नसता तेव्हा मी खूप फिरून येते. खूपदा गेलेय, दूरदूरपर्यंत गेलेय." तिचा आवाज जणू किचनच्या कोपऱ्यात ठेवलेल्या गव्हाच्या टाकीतून येत होता.

मला तिचं बोलणं थोडं समजलं, थोडं समजलं नाही. मग ती हसून सांगू लागली, "सुरुवाती-सुरुवातीला त्रास व्हायचाः पण आता मला घरातलीच कामं करायला चांगलं वाटतं. घरातच इतकं चालणं-फिरणं होतं की आणखी कुठे जायची गरजच भासत नाही. सर्व म्हणतात, मी आपल्या आईवर गेलेय. तिलाही हेच सर्व छान वाटायचं."

हेही वाचा - ‘उत्तर’ : एआय विरुद्ध आई : संघर्ष की सहअस्तित्व?

"तुला मुलगी असती तर तिलाही तू स्वतःसारखंच बनवलं असतंस?"

"सर्वांना सर्व मिळून बनवत असतात. आपण सर्व. मुलीसुद्धा अशाच बनतात. पण आजच्या जमान्यात कोणी काय सांगू शकतं? ती कदाचित वेगळी झाली असती, काही तरी वेगळी बनली असती."

ती प्रसन्न होती का उदास? किंवा नाराज? काही कळू शकलं नाही.

मी गुपचूप माझ्या खोलीत परत गेलो.

थोड्या वेळाने किचनसमोरून जाताना पाहिलं, की आई किचनच्या प्लॅटफॉर्मवर चढली आहे आणि वरच्या फळीवरून कसला तरी डबा काढण्याचा प्रयत्न करतेय.

"कमाल करतेस तू आई! मी घरातच आहे ना? मला काढायला सांगितलं असतंस तर..." मी ओरडलो.

"दिवसभर किती तरी गोष्टी काढ ठेव करायला लागतात...

तुला कुठे सतत सांगत बसू ?"

मग तिने प्लॅटफॉर्मवरून जमिनीवर जवळजवळ उडीच मारली आणि अचानक डाव्या पायाची टाच हातात पकडून ती वेदनेने कळवळली. मी सांभाळून तिला तिथेच स्टुलावर बसवलं.

म्हणाली, "मुरगळला वाटतं."

"अशी उडी मारल्यावर आणखी काय होणार? मला धरून उतरायचं ना!"

"थोडासा लचकला असेल. पाय फिरला बहुतेक. होतं असं कधी कधी. दे, ती हळदीची बरणी दे."

नंतर तिथेच स्टुलावर बसून ती हळदीचं पोटिस बनवू लागली.

त्या रात्री मला जाग आली तेव्हा दुरूनच दिसलं, की स्वयंपाकघराच्या खिडकीतून चंद्रप्रकाश पाझरतोय आणि त्याच्या दुधी रंगाच्या उजेडात आई खिडकीजवळ उभी आहे. अगदी सरळ, ताठ. तिचा पाय मुरगळल्याच्या, दुखावल्याच्या कसल्याही खुणा दिसत नव्हत्या.

ती खिडकीच्या पार पाहत होती. कदाचित चंद्र, कदाचित झाड. कदाचित काहीच नाही. मग ती सावकाश वळली आणि स्टुलावर बसली. तिने भिंतीला डोकं टेकवलं आणि डोळे मिटून घेतले.

(मराठी अनुवाद - जयप्रकाश सावंत )

(अनुभव ऑक्टोबर, २०१२च्या अंकातून साभार)

कुमार अंबुज







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results