आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

..आणि सैलानी बाबा दर्ग्यात दुवा सोबत दवाही मिळू लागली..

  • योगेश जगताप
  • 10.07.25
  • वाचनवेळ 6 मि.
dava duva

बुलडाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव सराई येथे हजरत रहमत शहा उर्फ सैलानी बाबांचा दर्गा आहे. या दर्ग्याला भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, तसंच देश-विदेशातूनही लोक येतात. जात व्यवस्था, अंधश्रद्धा, गरिबीने पिचलेल्या, आर्थिक अडचणी आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या हजारो लोकांना या दर्ग्याचा आधार वाटतो. सैलानी बाबावरील श्रद्धेने आपण बरे होऊ ही भावना या लोकांमध्ये असते. गार्गी सपकाळ ही बुलडाण्यातली तरुण मुलगी अनेक वर्षांपासून सैलानी बाबा दर्ग्यातील रुग्णांची ही परिस्थिती पाहत होती. हे पेशंट मोठमोठ्याने ओरडायचे, रडायचे, चित्रविचित्र हावभाव करायचे. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचं वातावरण भीतीदायक व्हायचं. काही पेशंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना लोखंडी साखळीने बांधून ठेवलं जायचं. पेशंट आणि त्यांचे नातेवाईक वर्षानुवर्षं याच चक्रात अडकल्याचं पाहून गार्गी अस्वस्थ झाली. यातले बहुतेक लोक हे मानसिक आजराने ग्रस्त असल्याने त्यांच्यावर तसे औषधोपचार व्हायला हवेत आणि त्यांना समुपदेशनही मिळायला हवं, असं तिला वाटत होतं.

शाळेत असल्यापासूनच गार्गीने वडील हर्षवर्धन सपकाळ यांच्या मातृभूमी फाउंडेशन संस्थेचं काम जवळून पाहिलं होतं. ही संस्था आदिवासी आणि दुर्गम भागातील वेगवेगळ्या प्रश्नांवर मागील २० वर्षांपासून काम करतेय. हर्षवर्धन यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत काम केलं होतं. गार्गीला या कामाचीही माहिती होती. सैलानी बाबा दर्ग्यात येणाऱ्या पेशंट्ससाठी काम करायचं ठरल्यावर पेशाने डेंटिस्ट असलेल्या गार्गीने मानसिक आरोग्याविषयी आणखी माहिती घ्यायला सुरुवात केली. या कामी तिला मनोविकारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांची मदत झाली. अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या डॉ. हमीद यांनी पेशंट आणि नातेवाईकांचं समुपदेशन कसं करायचं याविषयी गार्गीला मार्गदर्शन केलं. पुढे गार्गीने डॉ. हमीद यांच्या ‘परिवर्तन ट्रस्ट’च्या मदतीने ऑगस्ट २०२२ मध्ये सैलानी बाबा दर्ग्याच्या परिसरातच ‘दवा-दुवा’ या मानसोपचारविषयक मदत केंद्राची सुरुवात केली. ‘परिवर्तन ट्रस्ट’ ही संस्था व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य या प्रश्नावर काम करते. या ट्रस्टमार्फत दर्ग्यात येणाऱ्या पेशंटला वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार मोफत दिले जातात.

सुरुवातीला गार्गीने दर्ग्यातील आणि दर्ग्याच्या आजूबाजूला वस्ती करून राहणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांशी बोलायला सुरुवात केली. पेशंटच्या आजाराचं स्वरूप समजून घ्यायला सुरुवात केली. ही आगंतुक मुलगी आपली चौकशी का करतेय, आपल्याला खाजगी प्रश्न का विचरतेय, असं लोकांना वाटायचं. साहजिकच सुरुवातीला लोक तिच्याशी बोलायला उत्सुक नसायचे. पण गार्गी चिकाटी ठेवून त्यांच्याशी बोलत राहिली. सतत लोकांना भेटत राहिली. आपुलकीने बोलत राहिली. हळूहळू लोकांना तिच्याविषयी आपलेपणा आणि विश्वास वाटू लागला. दोनेक महिन्यानंतर पेशंट्सनी गार्गीला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. ते स्वतःच्या अडचणी सांगू लागले. एखाद्या आजारपणामुळे घरातून बाहेर काढलं जाणं, करणी-भूतबाधेच्या शंकेने गावातून बहिष्कृत केलं जाणं या आणि अशा अनेक अडचणींनी ग्रस्त असलेले पेशंट गार्गीला आपली हकीकत सांगत होते. गार्गीच्या समुपदेशनाचा पेशंटला फायदा होऊ लागला.

गार्गी एक उदाहरण सांगते, ‘‘राणी ही जवळच्याच गावातली माझ्याएवढीच मुलगी होती. २०१० साली तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती एकदम शांत शांत राहू लागली. कधीतरी ती एकदमच आक्रमक व्हायची. कधी घुमायची. गावकऱ्यांनी तिच्यावर कुणीतरी करणी केल्याचं कारण देत तिला गावाबाहेर काढलं. राणीची आई तिला सैलानी बाबा दर्ग्यावर घेऊन आली. इथे त्यांनी तिला एका झोपडीत ठेवलं. दिवसेंदिवस राणीची मानसिक स्थिती बिघडत गेली. तिचं वागणं धोकादायक वाटल्याने लोकांनी तिला झोपडीतल्या खाटेला लोखंडी साखळीने बांधून ठेवलं. थोडे थोडके दिवस नव्हे, तर तब्बल १५ वर्षं राणी साखळीने बांधलेल्या अवस्थेतच जगत होती. मी राणीशी चार महिने सातत्याने बोलत होते. पुढे आवश्यक त्या गोळ्या आणि समुपदेशनच्या मदतीने तिच्यात सुधारणा झाली. १५ वर्षं बांधलेली साखळीही आम्ही सोडवली. त्या साखळीचे व्रण राणीच्या हातापायांवर उठले होते. आता तिच्या तब्येतीत सुधारणा होतेय. ती स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते आहे. मजुरी करून थोडेफार पैसे कमावतेय आणि आईचीही काळजी घेत आहे.’’

राणीला वेळीच योग्य उपचार मिळाले असते तर तिच्या आयुष्यातली १५ वर्षं वाया गेली नसती, असं गार्गी म्हणते. राणीसारखे कित्येक पेशंट अनेक वर्षांपासून सैलानी बाबाच्या दर्ग्याची पायरी चढतायत. इथे आलेल्या पेशंट्सना सैलानी बाबांच्या दुव्यासोबत मानसोपचाराचीही (दवा) गरज आहे, हे गार्गीच्या कामामुळे लोकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसाद तागड, डॉ. जगदीश नाईक आणि डॉ. अमोल देशमुख यांची या कामात मदत होतेय. डॉक्टरांच्या सल्लानुसार पेशंटकडे लक्ष ठेवण्याचं काम मानसमैत्रिणी करतायत. त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानसिक आरोग्यावरील प्रथमोपचाराचं प्रशिक्षण दिलं गेलं आहे. पेशंटच्या भावना समजून घेऊन त्यांना तात्काळ मदत करण्याचं काम हे मित्र-मेत्रिणी करतात. सध्या सोनाली पाटील आणि इतर दोन मानस मैत्रिणी सैलानीबाबा येथील दवा-दुवा केंद्रावर काम करतायत.

दवा-दुवा प्रकल्पातून बरे झालेले आणि काही कारणास्तव आपल्या गावी परत न जाऊ शकणारे अनेक लोक याच ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करू लागलेत. मागील काही वर्षांत दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपण, शोषण, हवामान बदलाचा परिणाम यामुळे अडचणीत आलेले विदर्भ आणि मराठवाड्यातील शेकडो लोक दवा-दुवामध्ये आपली अडचण घेऊन आलेत. शिवाय प्रेमभंग, अभ्यासाचा ताण, कमी वयातील लग्न या अडचणी घेऊन येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्याही मोठी आहे. या सर्वानाच दवा-दुवाची मोलाची मदत होतेय. दवा-दुवाच्या आरोग्य सेवेचा लाभ घेणाऱ्या लोकांमध्ये सर्व जात-धर्मीय आहेत. हिंदू-मुस्लिमांसोबतच वंचित समाजातील पेशंटचं दवा-दुवामध्ये येण्याचं प्रमाण जास्त आहे.

सैलानी बाबा ट्रस्ट व मुजावर परिवार यांनी दवा-दुवा प्रकल्पाला मोलाचं सहकार्य केलं आहे. ट्रस्टच्या जागेतच दवा-दुवाच्या माध्यमातून ओपीडी चालवली जाते. मानसिक आजाराव्यातिरिक्तचे पेशंटही या ठिकाणी उपचार घेतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक मानसिक रुग्ण बरे झालेत. या प्रकल्पाची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनेही घेतली. पेशंटला साखळीने बांधण्याची अमानुष प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. गार्गी म्हणते, ‘‘आपल्याकडे मानसिक आजारांबाबत जागृती नाही. एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे हे कुटुंबातल्या सदस्यांना कळतच नाही, किंवा कळलं तरी ते मान्य करता येत नाही. वर्षानुवर्षं उपचार न घेतल्याने आजार बळावत जातो. उपचार घ्यायला वेळ लावला तर बरं व्हायलाही वेळ लागणार. त्यामुळे वेळेवर निदान होऊन उपचार घ्यायला हवा. त्यासाठी ग्रामीण भागात सरकारी माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील ‘कम्युनिटी मेंटल हेल्थ सेंटर’ निर्माण होण्याची गरज आहे.’’

दवा-दुवा प्रकल्पात रुग्णांना भरती करून समाजापासून दूर केलं जात नाही. किंवा फक्त औषध देऊन घरीही पाठवलं जात नाही. पेशंटवर उपचार करून त्याच्यासोबत त्याच्या परिवारालाही समाजात सन्मानपूर्वक जगण्याचा आत्मविश्वास देणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. इथून बरे झालेले काही पेशंट स्थानिक पातळीवर छोटं-मोठं काम करू लागलेत. कुणी चहा-नाष्ट्याची टपरी टाकलीय, तर कुणी आपल्या गावी परतून भाजीपाल्याचा व्यवसाय करतंय. कुणी फळांचा व्यवसाय करतंय, तर कुणी किराणा मालाचं दुकान टाकलंय. मानसिक रुग्णांना योग्य उपचार देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा दवा दुवा प्रकल्पाचा हेतू अशाप्रकारे साध्य होताय. गार्गी सध्या उच्चशिक्षणासाठी परदेशात आहे. मात्र डॉक्टर आणि मानसमैत्रिणींच्या सहाय्याने दवा-दुवाचं काम सुरू आहे.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

संदीप माटे15.08.25
गार्गीताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

अस्मिता फडके13.07.25
छान लेख. नवीन माहिती मिळाली.

Sirsat Dnyaneshwar Tukaram11.07.25
छान उपक्रम

Ganesh10.07.25
समाजासाठी दिशादर्शक माहिती... आणि गार्गी ताईच्या कामाची दखल...

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results