
हल्ली वाचन कमी झालंय, विशेषतः मराठी पुस्तकं फारशी कोणी घेत नाही, स्क्रीन टाइम वाढलाय.. अशा तक्रारी आपण रोज ऐकतो, वाचतो, स्वतःदेखील करतो. या तक्रारी दूर करण्यासाठी काही व्यक्ती, संस्था काम करत असतात. लोकांनी मराठी पुस्तकं, मासिकं वाचावीत, मराठी भाषा टिकून राहावी, यासाठी त्यांची धडपड सुरू असते.
मुंबईतील अंधेरी उपनगरात राहणारे प्रदीप पाटील हे अशा मोजक्या व्यक्तींपैकी एक. मराठी भाषेत उपलब्ध असलेलं उत्तम, दर्जेदार साहित्य लोकांनी वाचावं यासाठी ते गेली अनेक वर्षं घरपोच वाचनालय चालवत आहेत आणि तेही अगदी अत्यल्प दरात.
घरपोच वाचनालयाची गरज लक्षात आली
प्रदीप पाटील एका बँकेत अधिकारी पदावर काम करत होते. वाचनाची आवड त्यांना आधीपासून होतीच. आजूबाजूला मात्र वाचणाऱ्या लोकांची संख्या म्हणावी तितकी दिसत नव्हती. ज्यांना वाचायची इच्छा होती ते बहुतांशी लोक ज्येष्ठ नागरिक होते. बाहेर वाचनालयात जाऊन पुस्तकं आणणं, बदलणं हे त्यातल्या अनेकांना शक्य होत नव्हतं. पुस्तकं घरपोच मिळाली तर अनेक लोक पुन्हा वाचनाकडे वळतील, हे प्रदीप यांच्या लक्षात आलं. जेवण घरपोच येऊ शकतं तर पुस्तकं का नाही, या विचारातून त्यांना घरपोच पुस्तकं देण्याची कल्पना सुचली आणि लगेचच त्यांनी ती अमलातही आणली.
‘अक्षरयात्रे’ची सुरुवात
७ सभासद आणि १०० पुस्तकं यांच्यासहित ३० एप्रिल २००६ या दिवशी या लायब्ररीची सुरुवात झाली. अक्षरयात्रा असं या लायब्ररीचं नामकरण झालं. दर महिन्याला ५० रूपये इतक्या नाममात्र फीमध्ये सभासदांना दोन पुस्तकं दिली जात असत. त्यासाठी दर रविवारी प्रदीप आपल्या स्कूटरवरून सभासदांच्या घरी स्वतः जात असत. एकट्याने हे काम करणं बऱ्यापैकी वेळखाऊ होतं. मग त्यांनी फी १०० रुपये केली, महिन्याला चार पुस्तकं द्यायला सुरुवात केली. हळूहळू सभासदांची संख्या वाढत १२५ पर्यंत गेली. मग प्रदीप यांनी पुस्तकं घरपोच देण्यासाठी मदतीला एक मुलगा ठेवला.
‘अक्षरयात्रे’तल्या अडचणी
प्रदीप यांच्या मनात असलेली घरपोच पुस्तकांची लायब्ररी सुरळीत सुरू झाली खरी, तेवढ्यात त्यांच्या हातात बदलीची नोटीस पडली. बदली स्वीकारून मुंबईच्या बाहेर जावं लागणार होतं, परतणार कधी ते निश्चित सांगता येत नव्हतं. नाईलाजाने त्यांना लायब्ररी बंद करावी लागली. ते वर्ष होतं २०१०.
२०१४ साली प्रदीप परत मुंबईत आले. पुन्हा नव्या जोमाने त्यांनी घरपोच पुस्तकं द्यायला सुरूवात केली. परत एक मुलगा मदतीला घेतला. पाच-सहा वर्षं सातत्याने हे काम सुरू होतं. आता यात काही अडचण येणार नाही असं वाटत असतानाच २०२० साली एक दिवस प्रदीप यांना पक्षाघाताचा झटका आला. लायब्ररीचं काम पुन्हा एकदा बंद करावं लागलं. तब्येत सुधारायला लागली तेव्हा त्यांनी पुन्हा लायब्ररीचा विचार सुरू केला. पण कोविडच्या रूपात पुन्हा एक मोठी अडचण आली.
मात्र प्रदीप यांनी हार मानली नाही. कोविडची टाळेबंदी संपली आणि २०२२ साली त्यांनी पुन्हा आपली लायब्ररी सुरू केली.
नेटाने काम पुढे सुरू..
वास्तविक पक्षाघात झाल्यापासून प्रदीप यांना स्कूटर चालवणं शक्य होत नाही. मात्र एका मुलाच्या मदतीने ते रिक्षातून पुस्तकं घरोघरी नेतात. महिन्यातल्या एका रविवारी एका डॉक्टरांनी त्यांना आपल्या क्लिनिकमध्ये बसण्याची परवानगी दिली आहे. प्रदीप त्या रविवारी तिथे पुस्तकं घेऊन बसतात. आसपास राहणारी मंडळी त्यांच्याकडून पुस्तकं घेऊन जातात.
आज ‘अक्षरयात्रे’चे १०७ सभासद आहेत. लायब्ररीत १७०० पुस्तकं आहेत.

इतर उपक्रम
लायब्ररीबरोबरच प्रदीप यांनी २०१८ मध्ये ‘अंधेरी वाचन कट्टा’ सुरू केला आहे. महिन्यातल्या एका रविवारी एखादा साहित्यिक या कार्यक्रमासाठी बोलावला जातो. साहित्याची, वाचनाची आवड असणारी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आज वाचन कट्ट्याचे ५६ सभासद आहेत. वाचन कट्ट्याच्या सभासदत्वासाठी वेगळी फी आकारली जाते.
त्याआधी २००६ ते २०११ या दरम्यान प्रदीप यांनी ‘अक्षरांचे देणे’ या नावाने १६ कार्यक्रम आयोजित केले होते. २०१८ पासून ‘नाट्ययात्रा’ हाही एक उपक्रम ते राबवतात. त्यात दर महिन्याला एक याप्रमाणे वर्षभर सवलतीच्या दरात नाटकं बघायला मिळतात.
मराठी शाळा वाचवण्यासाठी, त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘मराठीप्रेमी पालक महासंघ’ या संस्थेतही प्रदीप यांचा सक्रीय सहभाग असतो.
मराठी भाषा हाच ध्यास आणि श्वास
स्वतंत्र जागा घेऊन वाचनालय सुरू करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक बऱ्यापैकी लागते. जागा, पुस्तकं, कर्मचारी, व्यवस्थापन आणि इतर अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात. पण ते शक्य नाही म्हणून हातावर हात ठेऊन बसणं प्रदीप यांना मंजूर नाही.
मराठी भाषा, मराठी वाचनसंस्कृती टिकवायची असेल तर साऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत. जे प्रयत्न करत आहेत त्यांना साथ द्यायला हवी. पण दुर्दैवाने तसं होत नाही.
नाऊमेद करणारे अनेक अनुभव प्रदीप यांना वारंवार येतात. एकाच सोसायटीत राहणारी उत्तम आर्थिक परिस्थिती असणारी दोन कुटुंबं शंभर रुपये आळीपाळीने भरून पुस्तकं घेतात. वाचन कट्ट्यासाठी महिन्यातून फक्त एकदा सुद्धा सहजी जागा मिळू शकत नाही. तब्येतीमुळे पुस्तकांची संख्या वाढवणं, त्यांची नोंद ठेवणं याला मर्यादा येतात. शिवाय राहत्या घरातूनच सगळं काम सुरू असल्यामुळेही मर्यादा येतेच. पण या सगळ्या अडथळ्यांची तक्रार न करता प्रदीप आपलं काम सुरू ठेवतात. मराठी भाषा हा आपला ध्यास आणि श्वास आहे, असंच ते मानतात.
वृषाली जोगळेकर | joglekarvrushali.unique@gmail.com
वृषाली जोगळेकर युनिक फीचर्समध्ये कार्यरत असून समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान आणि धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे.