आम्ही कोण?
लेखमालिका : उद्योग भरारी

पैठणीचा भरजरी ब्रॅन्ड

  • आनंद अवधानी
  • 30.07.26
  • वाचनवेळ 14 मि.
kapse paithani yeola

एकेका गावाची एकेक ओळख असते. पंढरपूर म्हटलं की आपल्याला पांडुरंग आठवतो आणि महाबळेश्वर म्हटलं की पर्यटनस्थळ नजरेसमोर येतं. त्याचप्रमाणे काही गावं तिथल्या उद्योजकतेमुळे ओळखली जातात. सोलापूरची चादर, लोणावळ्याची चिक्की, सावंतवाडीची खेळणी.. अशीच आणखी एक जोडी येवला आणि पैठणीची. येवल्यामध्ये पूर्वीपासून विणकर आहेत, हातमाग आहेत, पैठणीची किरकोळ दुकानं आहेत, पैठणीचा घाऊक व्यापारही आहे. अशा पारंपरिक उद्योगचित्राला ‌‘कापसे पैठणी'मुळे नवा आयाम मिळाला आहे. 

येवला हे नाशिक जिल्ह्यातलं तालुक्याचं गाव. गावात शिरण्याच्या आधीपासून पैठणीच्या पाट्या दिसू लागतात. त्या पाट्यांवर नाना प्रकारची पैठणीची डिझाइन्स आणि पैठण्या नेसलेली मॉडेल्स लक्ष वेधून घेतात. गावात प्रवेश केल्यावर तर दुतर्फा पैठण्यांची दुकानच दुकानं आहेत. ‌‘कापसे पैठणी' हे त्यांतलंच एक दुकान. मात्र, हे केवळ दुकान नव्हे तर एक ब्रँड आहे. बाळासाहेब कापसे हे त्याचे कर्ते. 

येवला तालुक्यातल्या वडगाव या छोट्या गावात एका गरीब शेतमजूर दांपत्याच्या पोटी जन्माला आलेला बाळकृष्ण नावाचा हा मुलगा पैठणीसारख्या उंची व्यवसायात यशस्वी होईल हे एरवी कोणाला सांगूनही खरं वाटलं नसतं. इतकंच काय, पण स्वत: बाळासाहेबांनाही वयाच्या तिशीपर्यंत आपण उद्योजक वगैरे होऊ असं वाटलेलं नव्हतं.

घरची आर्थिक अडचण लक्षात घेऊन अकराव्या वर्षापासूनच त्यांनी अर्थार्जनाला सुरुवात केली. येवल्यामधील डॉ. अभय पटनी यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी झाडलोट, साफसफाई, संडास धुणं अशी सगळी पडतील ती कामं दीड वर्षं रोज केली. पुढची दोन वर्षं व्यंकटेश ट्रेडिंग कंपनीमध्ये काम केलं. तिथे मालकांचं घर स्वच्छ करणं, त्यांच्या गोठ्यातल्या गाईंच्या धारा काढणं, शेण गोळा करणं, इथपासून त्यांच्या दुकानात उपरण्याच्या गाठी मारेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं कामं केली. त्यानंतर ते ‌‘सोनी पैठणी'मध्ये कामाला लागले. 

‌‘सोनी पैठणी' हे येवल्यामधलं दीडशे वर्षांहून अधिक जुनं दुकान आहे. पाच पिढ्यांपासून सोनी कुटुंबीय या व्यवसायात आहेत. यशस्वी व्यावसायिक, सुसंस्कारी आणि संवेदनशील कुटुंब असा त्यांचा लौकिक. बाळासाहेबांनी तिथे सलग 11 वर्षं नोकरी केली. दुकानातली झाडलोट, साफसफाई, साड्यांच्या घड्या घालणं अशा कामांनी त्यांची सुरुवात झाली. प्रामाणिकपणा आणि अंगभूत हुशारी या दोन गुणांमुळे त्यांनी मालकांचा विश्वास संपादन केला. दुकानात आलेल्या महिलांना त्यांची मर्जी सांभाळत पैठण्या उलगडून दाखवत राहणं, गोड बोलणं, कितीही कंटाळा आला तरी चेहऱ्यावर हसू ठेवणं असं सगळं बाळासाहेब करत होते. पुढे पैठण्यांच्या विक्रीसाठी त्यांना देशभर पाठवलं जाऊ लागलं, आणि त्यांच्यासमोर एक नवंच दालन उघडलं गेलं.

हेही वाचा - पितांबरी : कोटींच्या उड्डाणाची गोष्ट

सोनी यांच्या पैठण्यांची डिलिव्हरी देण्यासाठी ते पुणे, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, कोलकाता अशा अनेक शहरांत फिरायला लागले. देशभर पसरलेली पैठण्यांची बाजारपेठ पाहून ते चकित झाले. त्यांचं काम चोख असल्यामुळे ‌‘सोनी'कडून त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जात होत्या. असं करता करता 2000 साल उजाडलं. याच वळणावर त्यांच्या करियरला एक कलाटणी मिळाली. 

बाळासाहेबांच्या कामावर सोनी कुटुंब खूष असलं तरी स्वत: बाळासाहेब मात्र मनोमन अस्वस्थ होते. कारण त्यांच्या कामाच्या मानाने त्यांना अगदी कमी पगार मिळत होता- दर महिना फक्त 2200 रुपये. त्यांच्यापेक्षा कमी शिक्षण झालेला त्यांचा धाकटा भाऊ टेम्पो चालवून दर दिवसाला तेवढी कमाई करत होता. बाळासाहेबांची मात्र प्रचंड आर्थिक ओढाताण होत होती. अनेकदा घरी धान्य आणण्यासाठी आईकडून पैसे मागावे लागायचे. अजून लहान भावंडांची शिक्षणं व्हायची होती. सोनी त्यांच्या कामाचं कौतुक करायचे, पण पगार वाढवायला ते तयार नव्हते.

अखेर बाळासाहेबांनी ती नोकरी सोडली. वडिलोपार्जित शेतीच्या तुकडा होता, तिथे ते शेती करू लागले. नोकरीच्या काळात बाळासाहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जात असत. तिथल्या त्यांच्या मित्रांना बाळासाहेबांनी शेती करणं मंजूर नव्हतं. इतक्या वर्षांत मिळवलेल्या पैठणी व्यवसायाचं ज्ञान वापरून त्यांनी स्वत:चा उद्योग सुरू करावा असं त्या मित्रांनी सुचवलं, नव्हे, मैत्रीचा हक्क वापरून आग्रहच केला. अखेर बाळासाहेबांनाही ते पटलं आणि 2001 साली ‌‘कापसे पैठणी'ची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

जवळच्या शेतीच्या तुकड्यावरच एक हातमाग आला आणि पैठण्या विणण्याचा व्यवसाय सुरू झाला. पण हातमागावर पैठणी विणण्याचा वेग खूप मंद असतो. त्यामुळे एका हातमागावर व्यवसाय चालणं शक्यच नव्हतं. म्हणून बाळासाहेबांनी गावातल्या इतर विणकरांकडून साड्या विकत घ्यायला सुरुवात केली. आता त्या साड्या भारतभरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये पोहोचवायच्या होत्या. पूर्वी या कामासाठी ‌‘सोनी'मार्फत ते जातच होते. फरक इतकाच होता, की तेव्हा ते फक्त डिलिव्हरी करण्याचं काम करायचे, आता मात्र विक्री करायची होती. सेल्समनशिपचे धडेही त्यांनी आधीच्या कामादरम्यान गिरवले होतेच. त्यामुळे त्यांनी बॅगेत पैठण्या भरल्या आणि मुंबईची गाडी पकडली. तिथे अनेक दुकानांत जाऊन पैठण्या दाखवण्याचं काम सुरू केलं. कुठे विक्री व्हायची तर कुठे हात हलवत बाहेर पडावं लागायचं. शिवाय घरांवर जोशी, कुलकर्णी किंवा देशपांडे यांसारख्या पाट्या पाहिल्या की ते हमखास बेल वाजवायचे. पैठण्या वापरण्याचं प्रमाण ब्राह्मण समाजात तुलनेने अधिक आहे, असं त्यांचं निरीक्षण होतं.

हेही वाचा - सुहासिनी आणि यतिन शहा : सोलापूरचे जागतिक उद्योजक

बाळासाहेबांमधला उद्योजक घडण्याचा हा काळ होता. कोणत्याही उद्योजकाजवळ एक गुण असावाच लागतो. तो म्हणजे सेल्समनशिप किंवा विक्रीकौशल्य. अन्य कामांसाठी तो पगारी माणसं मिळवू शकतो, पण व्यवसाय टिकवण्याची आणि वाढवण्याची अंतिम जबाबदारी त्याच्यावरच असते. विक्रेता म्हणून त्याच्याकडे उत्पादनाची माहिती, संभाषणकला आणि त्यासोबतच कमालीची सहनशीलता असावी लागते. प्रसंगी अपमान झेलण्याची आणि पचवण्याची तयारी असावी लागते. याच बाबतींत बाळासाहेबांचा मुंबईत कस लागत होता. अनेक ठिकाणी लोक तोंडावर दार लावून घ्यायचे. कुठे तासन्‌‍तास साड्या पाहायचे पण विकत घेण्याचं नाव नसायचं. काहीजण शेलकी विशेषणं वापरायचे, तर काही टोमणेही मारायचे. बाळासाहेब मात्र आतून-बाहेरून शांत राहायचे.

या शांततेचंच फळ त्यांना हळूहळू मिळायला लागलं. साड्यांची थोडीफार विक्री होऊ लागली. चार पैसे मिळायला लागले. नावलौकिक तयार होऊ लागला. तो कानोकानी पोचू लागला. त्यातूनच पुण्या-मुंबईतील अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये त्यांचा व्यवसाय वाढत गेला. या सगळ्यात तीन-चार वर्षं घालवावी लागली; पण मग विक्रीमध्ये जम बसला.

त्यानंतर बाळासाहेबांना विस्ताराचे वेध लागले. 2004 साली त्यांनी येवल्यामध्ये दहा बाय दहा फुटांचं दुकान थाटलं. दुकानाचं नाव- ‌‘कापसे पैठणी'. शिवाय त्यांनी आपल्या स्वभावाला अनुसरून आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट केली. आपले तीन भाऊ, दोन बहिणी, घरातल्या सुना-जावई, त्यांची मुलं अशा सर्वांना व्यवसायात सामील करून घेतलं. त्यामुळे एकदम मनुष्यबळ वाढलं. दहा डोक्यांनी आणि वीस हातांनी काम सुरू झालं. ‌‘सोनी'च्या दुकानात काम करताना बाळासाहेबांना जे धडे मिळाले होते तेच आता त्यांच्याकडून घरातल्या इतरांना मिळू लागले. बाळासाहेबांमधली सेल्समनशिप इतरांमध्ये पाझरू लागली. जसजसे पैसे येत गेले तसतशी हातमागांची संख्या वाढू लागली. नवनवीन विणकर जोडले जाऊ लागले. ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन नवीन डिझाइन्स आधी कागदावर आणि मग साड्यांवर उतरू लागली.

अवघ्या सात-आठ वर्षांत दुकानाची जागा कमी पडू लागली. नेमक्या त्याच मोक्यावर एक संधी चालून आली. गावातला एक मोठा वाडा विकला जाणार होता. कापसे कुटुंबाने लगेचच तो विकत घेतला. वाड्याची बाहेरची रचना तशीच ठेवून आतमध्ये बदल केले. ग्राहकांना साड्या पाहण्यासाठी वेगवेगळी दालनं तयार झाली. प्रत्येक दालनात गाद्या, त्यावर स्वच्छ पांढऱ्या चादरी पसरण्यात आल्या. भिंतीवरच्या कपाटांमध्ये अनेक रंगांच्या आणि बहुविध डिझाइन्सच्या साड्या विराजमान झाल्या. एसीचा थंड वारा वातावरण प्रसन्न करू लागला. प्रत्येक ग्राहकाच्या स्वागतासाठी हसतमुख सेल्समन सरसावले. बाहेरगावाहून आलेल्या ग्राहकांच्या पार्किंगच्या सोयीपासून ते त्यांच्या मुक्कामापर्यंत सर्व प्रकारची काळजी घेण्यात येऊ लागली. शिवाय तोवर येवल्यात नसलेली जाहिरातींची पद्धत बाळासाहेबांनी विचारपूर्वक आणली. अनेक ठिकाणी आपल्या दुकानाची होर्डिंग्ज लावली. टीव्हीवरच्या महिलाप्रिय कार्यक्रमांना प्रायोजकत्व द्यायला सुरुवात केली. त्या माध्यमातून ‌‘कापसे पैठणी' हे नाव देशभरात पोचलं. पैठणी विकत घेण्यासाठी येवल्याला जायचं ही पद्धत पूर्वीपासून होतीच. पण या जाहिरातींच्या प्रभावामुळे गिऱ्हाईकं येवल्यात प्रवेश केल्यानंतर ‌‘कापसे पैठणी'च्या दुकानाची चौकशी करू लागली. 

पुणे, मुंबई, बेंगळुरू, कोलकात्याचे दुकानदारही त्यांची पैठणी आवर्जून मागवू लागले आणि दुकानांमध्ये आलेल्या ग्राहकांना ‌‘कापसे पैठणी' म्हणून दाखवू लागले. भारतभरातली अनेक कुटुंबं लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी येवल्याला त्यांच्या दुकानात येऊ लागली किंवा ऑनलाइन डिझाइन्स पाहून साड्या मागवू लागली. अनेक टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटांमध्येही कापसे यांच्या पैठण्या आवर्जून मागवल्या जाऊ लागल्या. 

हेही वाचा - चॉकलेट जायंट चंद्रकांत मोरडे

‌‘कापसे पैठणी'चा नावलौकिक असा झपाट्याने सर्वदूर पोचण्यामागे कारणंही तशी आहेत. पहिलं म्हणजे पैठण्यांच्या डिझाइनबाबतच्या महिला ग्राहकांच्या अपेक्षांचा इथे नियमितपणे अभ्यास केला जातो. कापसे कुटुंबातील मंडळी दिवसभर ग्राहकांच्या सहवासात असल्यामुळे त्यांच्या बदलत्या आवडींचा अंदाज घेत त्याप्रमाणे डिझाइन्समध्ये बदल केले जातात. पिवळा, काळा, राखाडी, निळा, हिरवा, जांभळा किंवा गुलाबी हे अगदी नियमितपणे मागणी असलेले रंग आहेत. पण एकेका काळात एकेका रंगाची फॅशन येते. मग त्याच रंगांमधली डिझाइन्स वाढवावी लागतात. पैठणीच्या डिझाइन्समध्ये काठ आणि पदराला सर्वाधिक महत्त्व असतं. नारळी काठ, मुनिया काठ, आकृती काठ किंवा आसावली काठ हे कायम मागणी असणारे काठ असतात. प्रत्येक महिलेला ‌‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा'च असतो. पण त्याचसोबत हंस, बदक, कमळ, पंखा, उडते पक्षी किंवा राघू-मैना यासारख्या नक्षीलाही पसंती असते. या सगळ्यापेक्षाही महत्त्वाची असते ती पैठणीशी जोडलेली भावना. तीन-तीन, चार-चार पिढ्या घरात पैठणी सांभाळणारी अनेक कुटुंबं आहेत. आजीने तिच्या लग्नात नेसलेली पैठणी नातीने स्वत:च्या लग्नात नेसण्याचं मोल नातेसंबंधांचा अनोखा पोत विणणारं असतं. या बाबतीत शांताबाई शेळके यांची कविता खूप बोलकी आहे. 

कधी तरी ही पैठणी, मी धरते उरी कवळून

मऊ रेशमी स्पर्शामध्ये, आजी भेटते मला जवळून 

मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा 

पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझ्या कुशल सांगा

तर सांगण्याचा मुद्दा असा, की शांताबाईंनी व्यक्त केलेली तमाम महिलावर्गाची ही भावना लक्षात घेऊन बाळासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी काम करत असतात. पैठण्यांच्या विक्रीमध्ये व्यवहार आहेच. पण त्यासोबतची भावनिकता, महिलांच्या डोळ्यांमधली हौस, पैठणीशी जोडलेली स्वप्नं, त्याचे सामाजिक संदर्भही आहेत. मुख्य म्हणजे इथे पैठणी म्हणजे केवळ साडी नव्हे याचं भान ठेवून महिलांशी संवाद साधला जातो. 

“2012च्या सुमाराला मला फार मोठं आर्थिक यश मिळालं. इतकं, की ‌‘कापसे पैठणी'च्या खात्यामध्ये चार-पाच कोटी रुपये शिल्लक होते.” अतिशय शांत स्वरात बाळासाहेब सांगत होते, “अशा वेळी माझ्यासमोर दोन मार्ग होते. दोन्ही मार्ग एकमेकांपेक्षा अगदी भिन्न होते. इंग्रजीतला वाय म्हणा ना. एक मार्ग मोठ्या शहरांकडे घेऊन जाणारा होता. या मार्गाने मी गेलो असतो तर नाशिक, अहमदनगर आणि पुणे अशा शहरांमध्ये पैठण्यांची मोठी शो-रूम उघडता आली असती. कोणत्या तरी मोठ्या शहरात आम्हा भावंडांना बंगले बांधता असते. पण मी विचार केला, असं केल्याने पुढच्या दहा वर्षांत काय होईल? तर सध्या बँकेत जसे पाच कोटी आहेत तसे पंचवीस कोटी होतील. असे पैसे वाढवत नेण्यात मला राम वाटेना. म्हणून मी अगदी विचारपूर्वक तो रस्ता नाकारला आणि दुसरा रस्ता धरला.” 

हा दुसरा रस्ता ग्रामीण महाराष्ट्राचा विचार करणारा होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपण पण आता सुस्थिर झालो आहोत, तर मागे राहिलेल्यांना मदतीचा हात द्यावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यांनी हा विचार आपल्या कुटुंबीयांसमोर मांडला. सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. मदतीचा हात म्हणजे कुणाला उचलून आर्थिक मदत द्यायची नव्हती. बाळासाहेबांनी त्याच्याही पलीकडचा विचार केला होता. त्या विचाराचं मूर्त स्वरूप म्हणजे ‌‘कापसे फाउंडेशन'. 2012-13 च्या सुमाराला त्यांनी या फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यांच्या कल्पनेतलं पैठण्यांचं विश्व साकारू लागलं. 

‌‘कापसे फाउंडेशन'च्या प्रशस्त आवारात एक कलात्मक दगडी इमारत उभी आहे. या इमारतीत अडीचशेहून अधिक हातमाग आहेत. या हातमागांवर ग्रामीण भागातली आणि गरीब कुटुंबांतली मूकबधिर मुलं-मुली काम करतात. अशा मुलांना समाजात तर कोणी वाली नसतो; पण उतारवयात त्यांच्या पालकांनाही ते जड होतात याची जाणीव बाळासाहेबांना होती. म्हणून त्यांनी 18 वर्षांच्या वरची अशी मुलं-मुली आणून त्यांना पैठणी विणण्याचं मोफत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. हे प्रशिक्षण चार ते सहा महिन्यांचं असतं. या काळात सर्वांचा राहण्या-जेवणाचा खर्चही फाउंडेशनमार्फत केला जातो. शिवाय काही रक्कम विद्यावेतन म्हणून दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथेच नोकरी दिली जाते. त्यामुळे पूर्णवेळ काम आणि दर महिन्याचा पगार सुरू होतो. पण एवढं करून त्यांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न सुटत नाही. केवळ नोकरीसाठी येवल्यात आलेल्या या मुला-मुलींना जागा भाड्याने घेऊन गावात राहणं आणि रोज कामासाठी ये-जा करणं सोपं नसतं. त्यामुळे फाउंडेनच्या आवारातच एक इमारत बांधून घेऊन बाळासाहेबांनी त्यांच्या मुक्कामाची सोय केली आहे. ती इमारतही अतिशय सुंदर असून सर्व सेवा-सुविधांनी युक्त आहे. 

बाळासाहेबांच्या या अभिनव कल्पनेमुळे या मुला-मुलींचं आयुष्य मार्गी लागलं आहेच, पण त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या बाबतीत तिथेच हातमागावर काम करणाऱ्या पूजा राऊत या मुलीचं उदाहरण सांगता येईल. पूजाचे आई-वडील शेतमजूर आहेत. तिचं बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. ती 19 वर्षांची असताना तिचे आई-वडिल तिला ‌‘कापसे फाउंडेशन'मध्ये घेऊन आले. मुलीच्या भवितव्याने चिंतित झालेल्या त्या दोघांना तिथल्या वातावरणामुळे थोडा धीर आला. पूजाला फाउंडेशनच्या स्वाधीन करून ते गावी परतले. पुढच्या सहा महिन्यांत पूजा छान विणकाम शिकली. प्रशिक्षण पूर्ण करून नोकरी करू लागली. तिचा पहिला पगार झाल्यावर तिच्या पालकांचा आनंद गगनात मावेना. अशा मुलीशी लग्न कोण करणार, हा पालकांना सतावणारा प्रश्नही लगेचच सुटला. पूजाच्या पलीकडच्याच हातामागावर काम करणाऱ्या मूकबधिर मुलासमवेत तिचं लग्न झालं. त्यांच्या नव्या संसारासाठी ‌‘फाउंडेशन'ने त्याच आवारात स्वतंत्र फ्लॅट दिला. पूजा आणि तिच्या पतीसारखी अनेक आयुष्यं फाउंडेशनच्या आवारात उमलताना आणि दरवळताना दिसतात. 

येवला आणि आसपासच्या तालुक्यांमधल्या ग्रामीण भागातही फाउंडेशनने हजाराहून अधिक हातमाग बसवले आहेत. अनेक गरीब शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबं ते हातमाग चालवत आहेत. शेतीमध्ये घराचा खर्च निघत नसल्यामुळे हा जोडधंदा त्यांचा आधार बनला आहे. एकत्र विचार केला तर सुमारे पंधराशे हातमाग ‌‘कापसे पैठणी'साठी काम करत आहेत. त्यातून तेवढ्याच कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. 

हेही वाचा - अस्सल देशी शेफ : विष्णू मनोहर

इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे पैठण्यांच्या निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाने शिरकाव केलेला आहे. यंत्रमाग विरुद्ध हातमाग अशी स्पर्धा आहेच. यंत्रमागावरची पैठणी कमी वेळात विणून होते. त्यामुळे त्या पैठणीची किंमतही कमी असते. पण पैठणीवर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि पैठणीच्या परंपरेला मानणाऱ्या ग्राहकांना मात्र हातमागावरचीच पैठणी हवी असते. असा ग्राहक हाच ‌‘कापसे पैठणी'चा मोठा आधार आहे. हातमागामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो आणि पैठण्या विणण्याची प्राचीन कला जिवंत राहते. त्यामुळेच कापसे कुटुंबाचा संपूर्ण भर हातमागावरच आहे.

हातमागावर पैठणी साकारण्याची प्रक्रिया सोपी अजिबातच नाही. आधी बेंगळुरू-म्हैसूरहून रेशीम विकत आणावं लागतं. मग ते स्वच्छ करून त्याच्या गुंड्या कराव्या लागतात. त्यानंतर मूळ राठ असलेलं रेशीम तलम करण्यासाठी काही प्रक्रिया कराव्या लागतात. त्यानंतर रेशीम रंगवावं लागतं. समांतरपणे सुरत बाजारपेठेतून जर आणून ती रेशमावर चढवावी लागते. अखेरीस ठरलेली नक्षी काढत काढत पैठणी विणावी लागते. ही प्रक्रिया खूप वेळ खाणारी, सहनशक्तीची परीक्षा पाहणारी आणि कलात्मक सौंदर्याची मागणी करणारी आहे. पैठण्यांच्या किमती इतक्या जास्त का असतात, या प्रश्नाचं उत्तरही त्यातच दडलेलं आहे.

कापसे यांच्याकडे दहा हजारांपासून ते चार लाखांपर्यंतच्या पैठण्या आहेत. कोणती पैठणी विणायला किती विणकरांना किती दिवस लागतात यावर पैठणीची किंमत ठरते. एखादी पैठणी विणायला दोन विणकरांना एक वर्ष लागलं तर त्या दोघांचा वर्षाचा पगार आणि रेशीम-जरीचा खर्च एकत्र करून पैठणीची किंमत ठरते. पैठणीच्या पदरावर आणि काठावर किती बारीक कलाकुसर करायची आहे यावर ती विणायला किती काळ लागेल हे ठरतं. 

‌‘कापसे पैठणी'चं यंदा तेविसावं वर्ष चालू आहे. आणखी दोन वर्षांनी, म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत ‌‘कापसे फाउंडेशन'च्या परिसराचा पूर्ण विकास झालेला असेल. सध्या तिथे हातमागांची इमारत आणि विणकरांचं निवासी संकुल उभं आहे. त्यासोबत गीर जातीच्या तीनशे गाईंचा गोठा आहे. बाळासाहेबांच्या व्हिजनमधलं वस्तुसंग्रहालय तयार होतं आहे. त्या वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून पैठणीचा दोन हजार वर्षांचा इतिहास मांडला जाणार आहे. सोबत अनेक रंगांच्या, छटांच्या आणि नक्षीच्या हजारो पैठण्या विक्रीसाठी उपलब्ध असतीलच, पण रूढार्थाने असतं तसं पैठण्यांचं दुकान नसेल. तिथे वस्तुसंग्रहालयामुळे ‌‘पैठणी'शी नाळ जोडली जाईल. उत्तम रेस्टॉरंटमध्ये पदार्थांचा आस्वाद घेता येईल. लांबून आलेल्या ग्राहकांसाठी मुक्कामाची सोय असेल. सुसज्ज ग्रंथालय असेल. मुलांसाठी ज्ञान-रंजनाची सोय असेल. या सगळ्यांसोबतच हसत-खेळत पैठण्यांची खरेदीही होईल. बाळासाहेबांच्या कल्पनेतलं असं ‌‘पैठणी केंद्र' हे ग्रामीण भारतामधलं वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळही बनेल. 

‌‘कापसे पैठणी'ची चालू वर्षाची आर्थिक उलाढाल 100 कोटी रुपये आहे. बाळासाहेब आज वयाच्या पन्नाशीत आहेत. त्यांचं स्वप्न खूप मोठं आहे. येवला परिसरात त्यांना 10 हजार हातमाग उभारायचे आहेत, 10 हजार तरुणी-तरुणींच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. पुण्या-मुंबईच्या प्रदूषित गर्दीकडे होणारं स्थलांतर त्यांच्या परिने थांबवायचं आहे. हे स्वप्नही ते पूर्ण करतील. कारण उद्योजकीय कौशल्यासोबतच आणखीही काही गुण त्यांच्याकडे आहेत. पस्तीसजणांचं कापसे कुटुंब त्यांनी एका व्यवसायात बांधलं आहे. त्यांच्या मते त्यामागचं कारण अगदी साधं आहे. प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपल्या धाकट्या भावंडांचा आधी विचार करण्याची त्यांची पद्धत आहे. मग फ्लॅट घ्यायचा असो, फर्निचर करायचं असो किंवा गाडी विकत घ्यायची असो. त्यांच्या बहिणीचे पती दिलीप दाजी हेसुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून ‌‘कापसे पैठणी'चा अविभाज्य भाग आहेत. 

बाळासाहेबांचा स्वभाव हेही त्यांचं बलस्थान आहे. कोणत्याही उद्योजकाच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असावीच लागते; अन्यथा, ग्राहक, कर्मचारी, बँकर आणि सहकारीही एक अंतर राखून राहतात. या बाबतीत बाळासाहेबांचा फंडा अगदी सोपा आहे. कितीही राग आला तरी ते पुढचे 48 तास त्यावर व्यक्त होत नाहीत. डोकं पूर्ण शांत होऊ देतात. त्यानंतर विचारांती कृती करतात. वरवर ही गोष्ट साधी वाटते, पण आचरणात आणायला खूप कठीण आहे. मात्र, जमली तर मग त्याचा लाभही खूप मिळतो. 

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बाळासाहेबांच्या मनातली कृतज्ञता. पैठणी व्यवसायातल्या त्यांच्या ज्ञानाचा पाया ‌‘सोनी पैठणी'च्या दुकानात काम करताना घातला गेला. तिथली 11 वर्षं म्हणजे एका अर्थाने त्यांच्या उद्योजकीय प्रशिक्षणाचा काळ होता. त्यामुळे ते जाहीरपणे सोनी कुटुंबाचे आभार मानतात. इतकंच काय, पण मराठी उद्योजकांना मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाकडून खूप शिकण्यासारखं आहे, असं अगदी नम्रतेने ते सांगतात. 

जाता जाता एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. हातमागासंदर्भात ताणेबाणे हा शब्द वारंवार कानांवर पडतो. ताणा म्हणजे उभा धागा आणि बाणा म्हणजे आडवा धागा. या दोन्हींची वीण घालतच तलम वस्त्राची निर्मिती होते. बाळासाहेब आज उद्योजकतेचा ताणा आणि सामाजिकतेचा बाणा यांची वीण घालत ‌‘सामाजिक उद्योजकते'चं वस्त्र विणत आहेत. 


आनंद अवधानी

आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results