‘अत्त दीप भव' (स्वत: प्रकाशमान व्हा) हा गौतम बुद्धाचा कालातीत संदेश आहे. हा संदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. ‘दृष्टिहीन उद्योजक' भावेश भाटिया मात्र बुद्धाचा हा संदेश जगत आहेत. विविध प्रकारच्या मेणबत्त्या बनवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. ते स्वत:च्या डोळ्यांनी सूर्यप्रकाश पाहू शकत नसले तरी त्यांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशाने जग उजळून टाकत आहेत. ‘डोळे' असणं आणि ‘दृष्टी' असणं यातला फरक स्वत:च्या कामाने दाखवून देत आहेत. त्यांनी अंध-अपंगांना सन्मानाने जगण्याचा एक नवा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या उद्यमशीलतेमुळे मेणबत्ती व्यवसायाला नवा आयाम प्राप्त झाला आहे. ‘व्हिजनरी उद्योजक' म्हणून त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. इतकंच नाही, तर महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळाला त्यांच्यामुळे नवी ओळख लाभली आहे.
भावेश यांचा जन्म १९७० साली मुंबईत घाटकोपरला झाला. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचं बालपण आणि शिक्षण विदर्भात गोंदियाला झालं. जन्मत:च त्यांची नजर कमजोर होती. ‘रेटिना मॅक्युलर डीजनरेशन'मुळे त्यांना अतिशय अंधुक म्हणजे साधारणपणे पाच टक्के दिसत होतं. पुढे वाढत्या वयाबरोबर दोष बळावला. शाळेत असताना त्यांना फळ्यावर लिहिलेलं किंवा पुस्तकात छापलेलं नीट वाचता यायचं नाही, पण ते कॉमिक्स मात्र पाहू शकत होते आणि टाइप मोठा असल्याने वाचूही शकत होते. त्यामुळे मुंबईहून त्यांचे आजोबा त्यांना सतत कॉमिक्स पाठवायचे. दहावीत जाईपर्यंत त्यांनी हजारभर कॉमिक्स वाचली आणि साठवली होती. त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांना अंध मुलांच्या शाळेत न घालता सर्वसाधारण शाळेतच घातलेलं होतं. मित्रांच्या, आईच्या आणि शिक्षकांच्या मदतीने त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पण पुढे पोटापाण्याचं काय हा प्रश्न होताच.
त्यादरम्यानच त्यांच्या वडिलांची गोंदियामधली नोकरी सुटली. मग त्यांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. वडिलांनी मुंबईत नोकरी धरली. पुढे वडिलांना स्किझोफ्रेनिया झाला आणि त्यांची ती नोकरीही सुटली. त्यांना सांभाळण्याचं एक नवीन आव्हान कुटुंबासमोर उभं राहिलं. भरीत भर म्हणजे भावेश यांच्या आईला कर्करोग झाला. एका ओळखीतून वडिलांना महाबळेश्वरमध्ये एक छोटी नोकरी मिळाली. तिथे ‘रीगल' हॉटेलमध्ये भावेश यांनाही टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम मिळालं. लवकरच त्यांच्या आईचं निधन झालं. वडिलांचा सांभाळ आणि ‘रीगल'मधलं काम अशी दुहेरी जबाबदारी भावेश यांच्यावर येऊन पडली.
त्या सुमाराला हरिद्वारच्या रामदेव बाबांचा गवगवा सुरू झाला होता. तिथे डोळ्यांवरही उपचार होतात असं मित्राकडून समजल्यावर भावेश पैशांची जमवाजमव करून हरिद्वारला पोचले. तिथल्या आयुर्वेदिक डॉक्टर्सच्या टीमने त्यांची तपासणी तर केली, पण त्यांच्याकडे त्या आजारावर कोणताही उपाय नव्हता. एक बारीकसा आशेचा किरण दिसला होता, तोसुद्धा नाहीसा झाला. पण तिथे भावेश यांना एका वेगळ्या अर्थाने आशावाद हात देणार होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा रामदेव यांच्या शिबिरात जाण्याचं ठरवलं. शिबिरात बाबांनी सांगितलं- सर्वांनी डोळे बंद करा आणि स्वत:च्या आतमध्ये पहा. भावेश यांनी डोळे बंद करण्याचा प्रश्नच नव्हता. लोकांना स्वत:च्या आतमध्ये बघण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात; आपण मात्र सतत तेच करत असतो, ते करण्याचा आपल्याला चांगला सराव आहे हे त्यांना जाणवलं. आपल्याला ही देणगी मिळाली आहे तर आयुष्यात काही तरी अर्थपूर्ण करून दाखवलं पाहिजे, असा आशावाद घेऊनच ते हरिद्वारहून परतले.
आता त्यांचं लक्ष्य होतं- ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड' (नॅब) ही मुंबईतली संस्था. ‘नॅब'मध्ये अंध व्यक्तींना समाजात वावरण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. पांढऱ्या काठीच्या मदतीने रस्त्याने कसं चालायचं, पेट्रोल पंप किंवा हॉटेल्स केवळ वासावरून कशी ओळखायची, वेगवेगळे आवाज कसे लक्षात ठेवायचे हे सगळं प्रात्यक्षिकासह शिकवलं जातं. मात्र, त्यासाठी संस्थेत वर्षभर राहणं भाग होतं. महाबळेश्वरमधली टेलिफोन ऑपरेटरची नोकरी सोडून वर्षभरासाठी मुंबईला जाणं खूप अवघड होतं. शिवाय वडिलांकडे कोण पाहणार, असाही प्रश्न होता. पण कशी तरी सर्व सोय लावून ते मुंबईला पोचले.
हेही वाचा - पितांबरी : कोटींच्या उड्डाणाची गोष्ट
‘नॅब'मध्ये मेणबत्ती बनवण्याचाही अभ्यासवर्ग चालवला जातो, असं भावेश यांना समजलं. लहानपणी एकदा त्यांच्या एका नातेवाईकाने वेगवेगळ्या आकारांच्या, रंगांच्या आणि सुगंधांच्या मेणबत्त्या आणल्या होत्या. त्या पाहिल्यापासून त्यांच्या मनात मेणबत्त्यांविषयी विशेष आकर्षण निर्माण झालं होतं. त्यामुळे आपण मेणबत्ती बनवण्याचं प्रशिक्षण घ्यायचं असं त्यांनी ठरवलं. पण मेणबत्तीचं प्रशिक्षण अंशत: अंध व्यक्तींनाच दिलं जावं असा संस्थेचा नियम होता. वयाच्या विशीनंतर भावेश यांची दृष्टी पूर्णपणे गेली होती. त्यामुळे त्यांना बॉडी मसाजच्या वर्गात प्रवेश दिला गेला. त्या वर्गात ते मसाज, रिफ्लॅक्सॉलॉजी आणि ॲक्युप्रेशर शिकले, त्यात बराच सराव करून पारंगतही झाले; पण मेणबत्ती प्रशिक्षण काही त्यांच्या डोक्यातून जात नव्हतं. मग मेणबत्ती प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतल्या एका शिक्षकांशी ते बोलले. त्या शिक्षकांना त्यांची तळमळ लक्षात आली. संस्थेतले सगळे वर्ग संपल्यावर संध्याकाळी ते शिक्षक त्यांना खासगीत मेणबत्ती बनवायला शिकवू लागले. बघता बघता भावेश यांनी मेणबत्ती बनवण्याचं तंत्र अवगत केलं.
‘नॅब'मधून परत आल्यावर त्यांनी महाबळेश्वरमधल्याच ‘हॉटेल गौतम' आणि ‘हॉटेल आर्या'मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मसाजिस्ट म्हणून काम सुरू केलं. लवकरच त्या कामात त्यांचं नाव झालं; पण त्यांचा जीव मात्र मेणबत्तीमध्ये अडकला होता. पण ‘नॅब'मध्ये त्यांना मेणबत्ती बनवण्याचं केवळ प्राथमिक ज्ञान मिळालं होतं. त्या काळी इंटरनेट, गुगल यासारखी साधनं नसल्यामुळे महाबळेश्वरसारख्या छोट्या गावात राहून मेणबत्त्या बनवण्याची आणखी माहिती मिळवणं कठीण होतं. दरम्यान, त्यांना समजलं, की अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यामार्फत पार्ले-जुहू इथे मेणबत्त्या बनवण्याचं पुढील प्रशिक्षण दिलं जातं. झालं, पैशांची जमवाजमव करून ते त्या प्रशिक्षण वर्गात पोचले. तिथलं दोन महिन्यांचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं.
मेणबत्ती व्यवसायाचा अनुभव असलेले त्यांचे एक नातेवाईक मुलुंडला राहत होते. ते बांबूच्या मेणबत्त्या बनवत असत. त्यांच्याकडून काही माहिती मिळाली तर बघावं असं वाटून भावेश यांनी विचारणा केली; पण ‘आधी 25-30 बांबू घेऊन ये, मग सांगतो' असं म्हणून त्यांनी भावेश यांची बोळवण केली. त्याच पावली भावेश महाबळेश्वरला गेले. तिथे त्यांनी मित्रांच्या मदतीने बांबू गोळा केले आणि पुढची एस.टी.पकडून ते परत मुलुंडला पोचले. याचाही काही उपयोग झाला नाही. त्यांच्या नातेवाईकाने बांबू तर ठेवून घेतले, पण मेणबत्त्यांचा विषय काढल्यावर काही तरी कारण देऊन पुन्हा हात वर केले.
भावेश यांना आता काही प्रमाणात का होईना, मेणबत्त्या बनवण्याचं चांगलं प्रशिक्षण मिळालं होतं; पण मेणबत्त्या तयार करण्यासाठी लागणारं सामान कुठे मिळेल हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी ‘नॅब'मध्ये जाऊन मेणबत्ती प्रशिक्षकांची भेट घेतली. तिथे त्यांना मस्जिद बंदरच्या सॅम्युअल स्ट्रीटवरचा पत्ता मिळाला. ते इसाभाईवली मोहम्मद अँड कंपनी नावाचं दुकान होतं. दुकानाचे मालक अब्दुलभाई कच्छी होते. भावेश यांना कच्छी येत असल्याने त्यांचे आणि अब्दुलभाईंचे लगेचच सूर जुळले. अब्दुलभाई मेणाचे व्यापारी होते. पण भावेश यांना मेणबत्त्यांचे साचेही हवे होते. मग अब्दुलभाईंनी आणखी एका दुकानाचा पत्ता दिला. त्या दुकानात अनेक प्रकारचे साचे होते. भावेश यांच्या खिशात तेव्हा ५००० रुपये होते. त्यांनी ३२०० रुपये किमतीचा एक साचा विकत घेतला. अब्दुलभाईंकडून ५० रुपये दराने २० किलो मेण घेतलं. ही त्यांची पहिली व्यावसायिक खरेदी म्हणायला हवी.
महाबळेश्वरला परतल्यावर घरच्या घरीच त्यांनी मेणबत्ती बनवण्याचं काम सुरू केलं. घर म्हणजे दहा बाय बाराची एक खोली होती. खोलीच्या एका कोपऱ्यात स्वयंपाकाची जागा, एका कोपऱ्यात झोपण्याची जागा, तिसऱ्या कोपऱ्यात मोरी होती. उरलेल्या चौथ्या कोपऱ्यात आता मेणबत्त्या बनवण्याचं काम चालू झालं. एकीकडे मसाजची नोकरी सुरूच होती. मेणबत्ती आणि मसाजच्या कामांत आता एक नवीन अडचण आली. मेणबत्ती साच्यातून बाहेर काढल्यावर ‘कार्व्हिंग' आणि ‘फिनिशिंग' करावं लागायचं. त्यासाठी चाकू पकडताना हाताची बोटं आत वळवावी लागायची. मसाज करताना बरोबर याच्या उलट म्हणजे बोटं बाहेरच्या दिशेला वाकवावी लागायची. बोटांवर सतत असा उलट-सुलट ताण पडल्याने त्यांच्या बोटांमध्ये वेदना सुरू झाल्या; पण त्या सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता.
चिकाटी आणि कल्पकता यांच्या जोरावर भावेश मेणबत्त्या तयार करत गेले खरे, पण त्या विकणार कुठे? महाबळेश्वर हे व्यावसायिक पर्यटनस्थळ असल्यामुळे तिथे जागेला प्रचंड किंमत आहे. अगदी छोट्या टपरीचं भाडंही लाखांमध्ये असतं. त्यामुळे हातगाडीवर मेणबत्त्या विकण्याशिवाय पर्याय नव्हता. मग हातगाडीचा शोध सुरू झाला. भावेश यांचा एक मित्र इरफान रोज सकाळी विल्सन पॉइंटला चहाची गाडी लावायचा. हा पॉइंट सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे तिथे सकाळच्या वेळात पर्यटकांची गर्दी असायची. ती गर्दी ओसरल्यावर इरफान वाईला कॉलेजला जायचा. त्यानंतर त्याची हातगाडी दिवसभर रिकामीच असायची. भावेश यांनी ती भाड्याने मिळवली. दररोज ५० रुपये भाडं ठरलं. रोज दुपारी चारनंतर रात्रीपर्यंत मारुती मंदिरापाशी गाडी लावण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांना मेणबत्त्या आणि गाडीसहित त्या ठिकाणी नेणं आणि रात्री परत घरी आणून सोडणं हे कामही इरफानचं होतं.
हेही वाचा - अस्सल देशी शेफ : विष्णू मनोहर
हळूहळू भावेश यांचा जम बसू लागला, पण आजूबाजूच्या फेरीवाल्यांना त्यांचा व्यवसाय बघवत नव्हता. अनेकदा भांडणं व्हायला लागली. ‘तू आंधळा आहेस. तुझ्याकडे एवढं मोठं हत्यार आहे. तू मंदिराच्या बाहेर भीक मागितलीस तर बरेच पैसे मिळवशील. ही फुकटची मेहनत बंद कर,' असं म्हणत फेरीवाले त्यांना हाकलून लावायला बघायचे. कधी मारामारीही व्हायची. एक-दोनदा भावेश यांची हातगाडी उलटी करण्यात आली. त्यांना गटारात ढकलून दिलं गेलं. भावेश त्रस्त होते, पण त्यांना दुसरा मार्ग दिसत नव्हता.
महाबळेश्वरच्या ‘होली क्रॉस चर्च'चे विश्वस्त रिचर्ड डायस यांच्याशी भावेश यांचा परिचय होता. त्यांनी भावेशना चर्चच्या समोर गाडी लावायला परवानगी दिली. त्यामुळे पुन्हा व्यवसायाकडे लक्ष पुरवणं शक्य झालं. महाबळेश्वरच्या बाजारपेठेत मोठमोठ्या कंपन्यांच्या ब्रँडेड मेणबत्त्या विक्रीसाठी होत्या. भावेश त्याचा अभ्यास करत होते. त्या स्पर्धेत आपल्याही मेणबत्त्या टिकाव्यात म्हणून विचार करत होते. त्यांच्या हातगाडीवर येणारे ‘अरोमा कँडल्स आहेत का' अशी चौकशी करायचे. भावेशना सुरुवातीला याचा अर्थच कळायचा नाही. मग लक्षात आलं, की ग्राहकांना सुगंधी मेणबत्त्या हव्या होत्या. पण त्या बनवायच्या कशा? पुन्हा त्यांनी ‘नॅब'मधल्या प्रशिक्षकांची भेट घेतली. सामान आणण्यासाठी पुन्हा मस्जिद बंदर गाठलं. तिथे प्रिन्सेस स्ट्रीटवर केळकर, श्रीजी अरोमा अशी काही प्रमुख दुकानं होती. त्यांच्याकडे मोगरा, चंदन वगैरे तेलांच्या कुप्या होत्या. भावेशनी त्या खरेदी केल्या. ‘श्रीजी'च्या मालकांनी तर मेणात सुगंधी तेल किती आणि कसं मिसळायचं तेही सांगितलं. शिवाय त्यात रंग घातल्याने मेणबत्ती शोभिवंत दिसते, ही माहितीही पुरवली.
आता भावेश यांच्या कल्पनेला पंख फुटले. त्यांनी सुगंधी मेणबत्त्या बनवायला सुरुवात केली. त्यांच्या पॅकेजिंगचाही विचार सुरू केला. रंगीत जिलेटिन कागदात गुंडाळलेल्या मेणबत्त्या स्टॉलवर सुंदर दिसतात हे त्यांच्या लक्षात आलं. सोबत सहा आणि बारा मेणबत्त्यांचे सुरेख पॅक्स त्यांनी तयार केले. ‘बर्थ-डे गिफ्ट' असं त्यांचं पोझिशनिंग केलं. त्यामुळे मालाचा खप वाढला. त्यांनी स्वतःची व्हिजिटिंग कार्ड्सही छापून घेतली. कार्डावर कंपनीचं नाव टाकलं- ‘सनराइज कॅडल्स'.
आकर्षक मेणबत्त्या आणि मधाळ बोलणं यामुळे भावेशनी खूप पर्यटक जोडले. एक अंध व्यक्ती इतका छान व्यवसाय करते म्हणून महाबळेश्वरबाहेरही त्यांचा लौकिक पसरला. त्यातूनही मालाची विक्री वाढू लागली. घरखर्च भागून पैसे शिल्लक राहू लागले. त्यातून व्यवसायासाठी हॉट गन किंवा व्हॅक्युम पॅकिंगचं मशिन अशी यंत्रसामुग्री घेणं शक्य झालं. हातगाडीवरची ग्राहकांची गर्दी वाढायला लागली.
कधी कधी भावेश यांच्या स्टॉलभोवती काही अंध व्यक्ती घुटमळत असत. ते अंध भिक्षेकरी असल्याचं लक्षात आल्यावर भावेशनी त्यांच्यासोबत संवाद सुरू केला. त्या लोकांना त्या काळी दिवसभरात ८० ते १०० रुपये मिळत होते. ते ऐकून भावेशना काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्यांनी थेट ऑफरच दिली- “मी सांगेन ते काम केलंत तर मी तुम्हाला रोजचे २०० रुपये देतो आणि शिवाय राहण्याची-जेवण्याची सोयही करतो.” बरंच हो-नाही करत करत सगळे तयार झाले. भावेशनी त्यांना मेणबत्त्या बनवण्याचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. ते काम घरात करणं शक्य नव्हतं. मग त्यांनी आणखी जरा मोठी जागा भाड्याने घेतली. त्या सर्वांच्या राहण्याची सोय केली. त्यांना मेणबत्त्या बनवायला शिकवलं. महाबळेश्वरमध्ये कोणी तरी खाऊन-पिऊन रोज दोनशे रुपये देत आहे, ही बातमी बघता बघता पसरली. महाबळेश्वरबाहेरूनही अनेक अंध भिक्षेकरी तिथे येऊ लागले. भावेशनी त्यांनाही सामावून घेतलं. त्यातून मेणबत्त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं. मुंबईतून कच्चा माल आणणं आणि तयार मेणबत्त्यांचं मार्केटिंग करणं ही दोनच मुख्य कामं भावेश यांच्याकडे राहिली.
महाबळेश्वरच्या व्यवसाय जगतात, मेणबत्ती उद्योगात आणि अंध-अपंगांच्या दुनियेत भावेश यांची ओळख निर्माण झाली. परिणामी, स्वत:हून मदत करणारे हजारो हात पुढे आले. प्रसाद नावाचे पुण्याचे एक गृहस्थ एकदा त्यांच्या स्टॉलवर येऊन गेले. त्यांनी भरपूर मेणबत्त्या खरेदी केल्या. भावेशसोबत गप्पा मारल्या. परत गेल्यावर त्यांनी भावेशना एक अचाट ऑफर दिली. प्रसाद इन्फोसिसमध्ये नोकरी करत होते. त्या काळी पुण्यातल्या इन्फोसिसमध्ये वीस हजार कर्मचारी काम करत होते. त्यांचं एक स्नेहसंमेलन होणार होतं. तिथे भावेशना मेणबत्त्यांचा स्टॉल मोफत लावता येणार होता. शिवाय भावेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांची राहण्या-जेवण्याची सोय कंपनीतर्फे केली जाणार होती. प्रसाद ई-मेलद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना आधीच भावेश आणि त्यांच्या मेणबत्त्यांविषयी माहिती देणार होते. भावेशनी फक्त जास्तीत जास्त मेणबत्त्या नेऊन स्टॉल मांडायचा होता. भावेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ऑफरचं चीज केलं. अहोरात्र झटून त्यांनी अनेक प्रकारच्या हजारो मेणबत्त्या तयार केल्या. तीन दिवसांत प्रचंड प्रतिसाद मिळाला. साडेसहा लाख रुपयांच्या मेणबत्त्या विकल्या गेल्या.
हेही वाचा - पैठणीचा भरजरी ब्रॅन्ड
असेच एकदा नीरज चंदन म्हणून एकजण मेणबत्त्या घेण्यासाठी आले होते. त्यांना मेणबत्त्यांचे प्रकार आणि भावेश यांची बोलण्याची पद्धत खूपच आवडली. एवढं सगळं असताना ‘सनराइज कँडल्स'ची वेबसाइट का नाही अशी विचारणा त्यांनी केली. भावेश यांच्याकडे त्यासाठीचं आर्थिक पाठबळ नव्हतं. त्यावर फारसं न बोलता नीरज यांनी स्टॉलचे आणि भावेश यांचे फोटो काढले. सगळी माहिती गोळा केली आणि sunrisecandles.in ही वेबसाइट तयार करून दिली.
महाबळेश्वरच्या इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा रोहिणी वैद्य यांना भावेशच्या धडपडीबद्दल समजलं. त्यांनी महाबळेश्वरमधल्याच त्यांच्या ‘आनंदभुवन' या रिसॉर्टच्या परिसरात भावेश यांना कायमस्वरूपी स्टॉल लावण्यासाठी जागा दिली, तीही अगदी मोफत. रोहिणीताईंची मदत तिथेच थांबली नाही. त्यांचे चिरंजीव सचिन वैद्य यांनी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात भावेश यांच्या मेणबत्त्यांचं तीन दिवसांचं भव्य प्रदर्शन आयोजित केलं. एवढ्या मोठ्या प्रदर्शनासाठी मेणबत्त्या कशा बनवणार असा सुरुवातीला प्रश्न होता; पण भावेशनी जिद्दीला पेटून अनेक डिझाइन्सच्या हजारो मेणबत्त्या बनवल्या. शिवाय प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारापाशी खास आकर्षण म्हणून चार बाय चार फुटाचे ऐंशी किलो वजनाचे दोन मेणाचे बुद्धिबळपट मांडले. त्यासोबत २०० किलो वजनाचा मेणाचा एक किल्लाही ठेवला. प्रदर्शनाचं उद्घाटन कवी संदीप खरे आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मेणबत्त्यांची तडाखेबंद विक्री झाली. अनेक पुणेकर भावेश यांच्याबरोबर कायमचे जोडले गेले.
मेणबत्तीच्या प्रकाशातला भावेश यांचा हा व्यवसाय आता खूपच विस्तारला आहे. आता मेणबत्त्यांची दहा हजार डिझाइन्स तयार झाली आहेत. फक्त वीस किलो मेणापासून सुरू झालेला उद्योग आता अडीच हजार टन मेणापर्यंत पोचला आहे. आज जगभरात पासष्ट देशांमध्ये सनराइज कॅन्डल्सची विक्री होते.
भारतातली मेणबत्त्यांची बाजारपेठ चाळीस हजार कोटींची आहे. त्यातला जास्तीत जास्त हिस्सा अंध-अपंगांनी बनवलेल्या मेणबत्त्यांचा असावा यासाठी भावेश प्रयत्नशील आहेत. कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या दिवाळी-ख्रिसमस गिफ्टसाठी विविध आकारांच्या, रंगांच्या आणि सुगंधांच्या मेणबत्त्या विकत घेत असतात. त्यासाठी भावेश कंपन्यांमध्ये फिरून मार्केटिंग करतात. नीता अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे त्यांचे प्रमुख ग्राहक आहेत.
भावेश यांच्या व्यवसायाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे ३६०० अंध कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. या कर्मचाऱ्यांना महिना १० हजार ते २५ हजार रुपये इतका पगार दिला जातो. शिवाय दिवाळीच्या काळात तात्पुरते अधिक कर्मचारी घेतले जातात. ठिकठिकाणच्या स्टॉल्ससाठीही वेगळे कर्मचारी घेतले जातात. असे हंगामी कर्मचारी विचारात घेतले तर भावेश यांनी रोजगार दिलेल्या अंध व्यक्तींची संख्या दहा हजारांहून अधिक भरते. या लोकांना सन्मानाचा रोजगार मिळाला नसता तर मंदिरांसमोर किंवा सिग्नलवर भीक मागून नामुष्कीचं जगणं जगावं लागलं असतं. त्या अर्थाने भावेश यांच्या उद्यमशीलतेचं मोल खूपच मोठं आहे.
भावेश यांनी आयुष्यात प्रत्येक गोष्ट संघर्ष करतच मिळवली आहे, पण त्यांच्या आयुष्यात एक भाग्ययोग आला तो त्यांच्या पत्नी नीताच्या रूपात. महाबळेश्वरमध्ये हातगाडीवर मेणबत्त्या विकत असताना नीता त्यांच्या प्रेमात पडली. पुढे दोघांनी लग्न केलं. आज त्यांना कुणाल नावाचा मुलगा आहे. नीता आणि कुणाल हे ‘सनराइज कँडल्स'ची धुरा पुढे नेत आहेत. ते भावेश यांच्या व्यवसायाचे आणि स्वप्नांचेही भागीदार आहेत.
(ऑक्टोबर २०२३च्या अनुभव अंकातून साभार.)
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.
