आम्ही कोण?
ले 

यास्मिन शेख : मराठीप्रेमाचा आगळा आविष्कार

  • भानू काळे
  • 24.08.26
  • वाचनवेळ 8 मि.
yasmin sheikh

१७ ऑगस्ट २०१५ ची संध्याकाळ. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचं माधवराव पटवर्धन सभागृह. कधी नव्हे त्या प्राध्यापिका यास्मिन शेख व्यासपीठावर बसलेल्या आहेत. मराठी भाषा आणि साहित्य यांसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेल्या योगदानाबद्दल आज त्यांना साहित्य परिषदेतर्फे अंदमान येथील विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या हस्ते डॉक्टर गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार अर्पण केला जात आहे. साहजिकच शेखबाईंच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतार्थता आहे. पण त्याचबरोबर एक प्रकारचा संकोचदेखील; बहुधा आज त्या स्वतःच उत्सवमूर्ती असल्याने. एखाद्याला आश्चर्य वाटेल, पण पारितोषिकांचा सुळसुळाट झालेल्या आजच्या काळातही अशा स्वरूपाचा गौरव त्यांच्या वाट्याला पहिल्यांदाच येत आहे. ही एकच गोष्ट शेखबाईंच्या प्रसिद्धिपराङ्मुख व्यक्तिमत्त्वाची साक्ष पटवायला पुरेशी आहे. उत्तरादाखल केलेल्या आपल्या छोट्या भाषणात त्या मराठी भाषा-साहित्याची गोडी लावणारे त्यांचे गुरू श्री. म. माटे यांना हा पुरस्कार अर्पण करताहेत हेही त्यांच्या विनम्र व्यक्तिमत्त्वाला साजेसंच. 

यास्मिन शेख जन्माने ज्यू; नाव जेरुशा रुबेन. त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. त्यामुळे या कुटुंबाची सतत फिरती सुरू असायची. तसं त्यांचं नाशिकला घर होतं, पण उच्चशिक्षणासाठी जोरुशा आणि त्यांची बहीण पुण्यात दाखल झाल्या. जेरुशा जात्याच खूप हुशार. प्राध्यापक श्री. म. माटे यांच्या लाडक्या विद्यार्थिनी. १९४६ साली त्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.ए. झाल्या. तेही केवळ मराठीतच नव्हे, तर सर्वच विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून. पुढे एम.ए. झाल्यावर शेखबाईंनी मुंबईला शीव येथील एस.आय.इ.एस. महाविद्यालयात २७ वर्षं मराठीचं अध्यापन केलं. त्याच कॉलेजात विंदा करंदीकर इंग्रजी शिकवत असत. श्री. पु. भागवतही इथेच मराठीचे विभागप्रमुख होते. निवृत्तीपूर्वीची सात वर्षं शेखबाई विभागप्रमुख होत्या. निवृत्तीनंतर दहा वर्षे त्या यु.पी.एस.सी.च्या परीक्षार्थींना मराठी भाषाशास्त्र आणि व्याकरण शिकवत होत्या. एकूण ४४ वर्षं त्यांनी मराठीचं अध्यापन केलं. ‌‘मराठी लेखन मार्गदर्शिका' आणि ‌‘मराठी शब्दलेखनकोश' ही शेखबाईंची दोन्ही पुस्तकं अभ्यासकांसाठी महत्त्वाची मानली जातात. 

शेखबाईंचे भाषाविषयक विचार सुस्पष्ट आणि आग्रही आहेत. सध्या संकुचित अस्मितांना कुरवाळण्याचे दिवस आहेत. प्रमाणभाषेचा उपहास आणि वेगवेगळ्या स्थानिक बोलीभाषांचा पुरस्कार हिरिरीने करण्याचे दिवस आहेत. पण शेखबाई म्हणतात, ''बोलीभाषांचं महत्त्व मला मान्य आहे. संवादामध्ये त्यांचा वापर अवश्य व्हावा. पण वैचारिक लेखनात व एरवीही जिथे निवेदन असेल तिथे प्रमाणभाषेचाच वापर हवा. नाहीतर लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे, ते महाराष्ट्रभर विखुरलेल्या व वेगवेगळ्या बोलीभाषा असणाऱ्या समस्त मराठीजनांना कसं कळणार? प्रमाणभाषा जपली नाही, तर भाषेच्या क्षेत्रात अनागोंदी माजेल.” व्याकरणाचे नियम पाळण्यावरही त्या कटाक्षाने भर देतात. हे देखील आज खूपसं अप्रिय ठरलेलं आहे. शेखबाईंच्या मते, संस्कृतची तोंडओळखदेखील नसलेल्यांसाठी शुद्धलेखनाचे काही नियम बदलायचेच असतील, तर त्यानुसार अधिकृतरीत्या नियमांमध्ये अवश्य बदल करा. पण जोवर ते बदल होत नाहीत तोवर सध्याचे, महामंडळाने बनवलेले व शासनमान्य असे अठरा नियम आपण पाळलेच पाहिजेत.

हेही वाचा - तंदुरुस्त मराठीसाठी..

सोपे पर्यायी मराठी शब्द उपलब्ध असताना इंग्रजी शब्द वापरण्याला त्यांचा विरोध असतो. त्या म्हणतात, ''आपली मराठी भाषा समृद्ध आहे. तिच्यात नवनव्या संकल्पना व्यक्त करण्याची ताकद आहे. ती अधिकाधिक सुंदर आणि संपन्न करणं आपल्या हाती आहे. लेखकांची तर ती जबाबदारीच आहे. सर्वच परकीय शब्द काढून टाकावेत असं मला सुचवायचं नाही, पण त्यांच्या अतिरिक्त वापराने मराठी लेखनाचं अपरिमित नुकसान होत आहे हे नक्की. इतर भाषांच्या गैरवाजवी मिश्रणाने प्रदूषित झालेली भाषा टाळून प्रयत्नपूर्वक पर्यायी मराठी शब्दांचा वापर केला, तर त्यामुळे आपण आपल्या भाषेचा गौरवच केल्यासारखं होईल. भाषा हा आपला सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी. हा वारसा जपणं, समृद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे.” 

भाषिक वारसा जपण्यासाठी शेखबाई जशा दक्ष आहेत, तशाच परधर्मसहिष्णुता जपण्याबाबतही. हे तत्त्व त्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्यात आचरणातही आणलं आहे. शेखबाई मूळच्या ज्यू; पण त्यांनी लग्न केलं ते मात्र एका मुस्लिम व्यक्तीशी. त्याची कहाणीही रोचक आहे. बीएनंतर त्यांना एमएसाठी फेलोशिप मिळाली होती. पण त्या काळात काही आजारपणामुळे त्या विश्रांतीसाठी नाशिकला घरी गेल्या होत्या. त्यावेळी एमएसाठी पुस्तकं कुठे मिळतील याची चौकशी करण्यासाठी वडिलांबरोबर त्या सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्याकडे गेल्या होत्या. कानेटकरांना त्यांच्या अभ्यासाविषयीच्या कळकळीचं विलक्षण कौतुक वाटलं. त्यांनी आवश्यक ती पुस्तकं तर मिळवून दिली. शिवाय नंतर त्यांनी जेरुशाची व डॅडी शेख या तेथील चित्रमंदिरात काम करणाऱ्या एका देखण्या, उमद्या तरुणाची ओळख करून दिली. तरुण असूनही का कोण जाणे पण सगळे त्यांना डॅडी असंच म्हणत! कानेटकर यांच्याच पुढाकाराने पुढे १९५० साली दोघांचं लग्न झालं व मिस जेरुशा रुबेन या मिसेस यास्मिन शेख बनल्या. 

या शेख आडनावाचा पुढे त्यांना खूपदा त्रास झाला. काही प्रसंग खूप बोलके व आपल्यातील काही अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकणारे आहेत. निवृत्तीनंतर शेख जोडपं कायमचं पुण्यात स्थायिक झालं. एकदा महापालिकेचा एक कर्मचारी जनगणना करण्यासाठी त्यांच्या घरी आला. घरोघर फिरून नागरिकांची माहिती गोळा करणं हा त्याच्या कामाचाच अधिकृत भाग होता. त्यासाठी तो विचारात असलेल्या प्रश्नांमध्ये ‌‘तुमची मातृभाषा कोणती?' हा एक प्रश्न होता. ‌‘मराठी' हे शेखबाईंनी दिलेलं उत्तर त्याला पटत नव्हतं. ‌‘तुमचं आडनाव शेख म्हटल्यावर मातृभाषा उर्दू लिहायला हवी', असं त्याचं म्हणणं होतं. अर्थात शेखबाईंच्या आग्रहाप्रमाणे ‌‘मातृभाषा : मराठी' अशीच नोंद त्याला शेवटी करावी लागली! 

एकदा मुंबई-पुणे आगगाडीच्या प्रवासात समोरच्या एका अपरिचित लहान मुलाशी त्यांच्या गप्पा-टप्पा सुरू झाल्या. श्रीयुत शेख यांनी स्वतःची खिडकीची जागा मुलाला दिल्यामुळे तो अधिकच खुश होता. शेजारीच बसलेले मुलाचे आई-वडीलही गप्पांमध्ये हसतखेळत सामील झाले होते. पण साधारण निम्मा प्रवास होऊन गेल्यावर गप्पांच्या ओघात बाईंचं आडनाव ‌‘शेख' आहे हे कळलं आणि समोरच्यांची, विशेषतः आईची, देहबोली एकदम बदलली. संभाषण मंदावलं; मग जवळजवळ थंडावलंच. खिडकीत शेखांशेजारी बसलेल्या आपल्या मुलाला त्यांनी जवळजवळ हिसकावूनच आपल्याकडे घेतलं आणि त्या जरा लांब जाऊन बसल्या! उरलेल्या प्रवासात त्यांनी शेखांकडे पाहिलंसुद्धा नाही!

हेही वाचा - बोलींचा आहे कुणी वाली?

असाच आणखी एक प्रसंग शेख दाम्पत्य पुण्यात घर शोधत होतं तेव्हाचा आहे. एक फ्लॅट त्यांनी पसंत केला होता. सगळी प्राथमिक बोलणीही झाली होती. पण प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी जेव्हा दोघं त्या नामांकित बिल्डरच्या कार्यालयात गेले आणि त्यांचं आडनाव शेख आहे हे स्पष्ट झालं तेव्हा ‌‘सध्या फ्लॅट उपलब्धच नाही' असं त्यांना ऐकावं लागलं होतं!  

पण असे काही अनुभव गाठीशी असूनही शेखबाईंच्या मनात जराही कटुता नाही. कारण या संदर्भातली त्यांची मतं अगदी स्पष्ट आणि पक्की आहेत. त्या म्हणतात, ''मला नेहमी वाटतं, धर्माची-जातीपातीची बंधनं माणसाने झुगारून द्यावीत. आपण कोणत्या धर्मात व जातीत जन्माला येणार हे आपल्याला माहित नसतं. ते आपण ठरवूही शकत नाही. आपण माणूस आहोत आणि माणुसकी हा आपला एकमेव धर्म आहे, असं जर आपण मनापासून स्वीकारलं, तर मानवी समाज किती सुखी होईल, नाही?''

श्रीयुत शेख वारले तेव्हा मुस्लिम परंपरेप्रमाणे त्यांचं दफन नव्हे, तर त्यांच्याच अंतिम इच्छेनुसार त्यांच्या शवाचं वैकुंठात दहन केलं गेलं होतं हेही येथे नमूद करायला हरकत नाही. अर्थात त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बराच वाद घालावा लागला होता. 

मराठीप्रेम आणि जातिधर्मनिरपेक्षता यांव्यतिरिक्त आवर्जून उल्लेख करायला हवं असं शेखबाईंचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची असामान्य कर्तव्यनिष्ठा. महाविद्यालयात शिकवत असताना पाठाची पुरेशी पूर्वतयारी केल्याशिवाय, त्यासाठी आवश्यक ती टिपणं काढल्याशिवाय त्या कधीही वर्गावर जात नसत. ‌‘अंतर्नाद' मासिकाच्या प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर ‌‘व्याकरण-सल्लागार' म्हणून शेखबाईंचा उल्लेख असतो. पण आमचा संबंध केवळ असा व्यावसायिक पातळीपुरता मर्यादित नव्हता. ‌‘अंतर्नाद'चं काम म्हणजे त्यांना घरचंच काम वाटतं. मासिकाची मुद्रितं त्या अगदी वेळेत तपासून देतात; काम झालं की लगेच स्वतः फोन करून कळवतात; पाठपुरावा कधीही करावा लागत नाही. एक मोठं नवल म्हणजे मुद्रितं तपासताना त्यांना चष्माही लावावा लागत नाही! त्यांचे यजमान हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात अतिदक्षता कक्षात असतानाही त्यांनी अंतर्नादची मुद्रितं तिथेच बसून व कसलंही अवडंबर न माजवता तपासून दिली होती.

हेही वाचा - मराठीच्या नावानं वार्षिक रडगाणं...

आज नव्वदी ओलांडल्यावरही स्वीकारलेलं कुठलंही काम त्या कसंतरी उरकून टाकत नाहीत, तर अगदी मन लावून त्या ते पूर्ण करतात. त्यांच्या हाताशी नेहमीच चार-पाच शब्दकोश असतात; एखाद्या शब्दाविषयी जरा जरी शंका आली तरी कंटाळा न करता त्या शब्दकोश काढून तपासतात. लेखनसंस्कार करताना कुठलाही संदर्भ विचारा, त्यांच्याकडून लगेच स्पष्टीकरण येतं; त्यांना ठाऊक नसेल तर मुद्दाम शोध घेऊन त्या ती माहिती पुरवतात. आणि हे सर्व त्या अनेक अपरिचित व्यक्तींच्या बाबतीतही करतात. प्रसिद्धीचा जराही सोस नाही, वेगवेगळ्या उपक्रमांत मिरवणं नाही; फक्त हाती घेतलेलं काम जास्तीत जास्त चांगलं आणि नियत वेळात पार पाडणं यावरच त्यांचा कटाक्ष असतो. साहित्यक्षेत्रात सगळ्याच पातळ्यांवर आज पाट्या टाकायची प्रवृत्ती बोकाळत आहे. अशा परिस्थितीत शेखबाईंची कर्तव्यतत्परता जर लेखकांपासून पुस्तकविक्रेत्यांपर्यंत साहित्यक्षेत्रातील अधिकाधिकांनी अंगी बाणवली, तर अन्य कुठल्याही शासकीय वा बिनशासकीय मदतीशिवायदेखील मराठी साहित्यव्यवहार खूप उंचावर जाईल.  

आता शेखबाई सर्वार्थाने पुणेकर झाल्या आहेत. डॉ. शमा व प्रा. रुकसाना या त्यांच्या दोन्ही मुलीही पुण्यातच कायमस्वरूपी स्थायिक झाल्या आहेत. शेखबाई स्वतः आपल्या औंध येथील घरात एकट्या राहतात, आल्यागेल्याचं आनंदाने स्वागत करतात. वरकामाला तासभर एक मोलकरीण येते, पण एरवी सर्व घरकाम या वयातही त्या स्वहस्ते करतात. दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामात गर्क असतात - अगदी दुपारची वामकुक्षीही घेत नाहीत. आणि विशेष म्हणजे हे सगळं अगदी हसतमुखाने, कधीही कपाळाला आठी पडू न देता. अशा या शेखबाई सर्वार्थाने पुण्याच्या भूषण आहेत.         

२१ जूनला नव्वदीनिमित्त त्यांचा एक अनौपचारिक, कौटुंबिक पातळीवरचा सत्कारसमारंभ योजला होता. त्यात ‌‘अंतर्नाद'च्या वतीने त्यांचा सत्कार करताना डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले होते, ''शेखबाईंकडे बघितल्यावर असं वाटतं, की नाइनटी तो झांकी है, सेन्चुरी अभी बाकी है! त्यांचा उत्साह बघितल्यावर असं खात्रीने म्हणता येईल, की तोही क्षण अजून दहा वर्षांनी नक्की येईल आणि त्या वेळीही आपण सर्व असेच इथे एकत्र येऊ!”

उत्तरादाखल बोलताना शेखबाई म्हणाल्या, ''माझ्या प्रदीर्घ आयुष्यात जवळच्या आप्तेष्टांचे मृत्यू पाहण्याचे, क्लेशाचे अनेक प्रसंग आले. पण त्यामुळे स्वतः हताश न होता, मनात नकारात्मक विचारांना स्थान न देता सतत कार्यमग्न राहायचा मी निश्चय केला. मराठी भाषा व साहित्य यांच्या उपासनेला वाहून घेतलं. भा. रा. तांबे म्हणतात, 'संध्याछाया भिवविती हृदया'. त्यात थोडा बदल करून मी ‌‘संध्याछाया सुखविती हृदया' असं म्हणू शकते ते या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच.” 

बहुधा हेच या वैय्यायोगिनीच्या चिरतारुण्याचं रहस्य असावं. शेखबाई, जीवेत शरदः शतम्‌!

भानू काळे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results