बिहारच्या विधानसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. त्यामुळे तिकडे राजकीय हालचालींनी वेग पकडला आहे. तसंही बिहार हे राजकीयदृष्ट्या बडबडं राज्य आहे. इथले राजकीय नेते कोणतीही गोष्ट मोठमोठ्याने बोलत असतात. उच्चरवात आणि आक्रमकपणे. त्यातच निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदार तपासणीचा घोळ घातल्याने सगळ्यांचे आवाज आणखीच वाढले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तेजस्वी यादव यांनी आवाज चढवला, पाठोपाठ राहुल गांधी दिल्लीतून पटण्यात पोहोचले. बिहार बंद केला गेला. यात गोची भाजपची झाली. आयोगाच्या भूमिकेचं समर्थन करता करता त्यांची पळता भुई थोडी झाली. या भांडाभांडीत नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दलही सामील झाला होता, पण मुख्यमंत्री नितीश कुमार शांत होते. ते मैदानात उतरलेले दिसले नाहीत.
नितीश कुमारांचा पक्ष बोलत होता, पण स्वत: नितीश कुमार बोलत नव्हते यामागचं एक कारण सांगितलं जातं. नितीश कुमार यांची तब्येत गेल्या वर्षभरापासून ठीक नाही आणि मानसिकदृष्ट्याही ते पूर्वीसारखे खंबीर राहिलेले नाहीत, असं म्हटलं जातं. आपण काय बोलत आहोत, काल काय बोललो होतो याबद्दल तर ते गोंधळ घालत आहेतच, शिवाय जाहीर कार्यक्रमात राष्ट्रगीत चालू असताना हातवारे करणं, शेजारच्याशी बोलणं वगैरेही प्रकारही चालू आहेत. त्यांचा पक्ष या सर्व गोष्ट किरकोळीत काढत असता तरी तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी त्याबद्दल जाहीरपणे बोलायला सुरुवात केली आहे.
नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीचे शेवटचे दिवस चालू असून या निवडणुकीनंतर त्यांचा राजकीय अस्त होणार आहे, असं हे दोघेही नेते भाषणांत-मुलाखतींत म्हणत आहेत. नितीश कुमार यांनी गेल्या वीस वर्षांत जे करायचं होतं ते केलं. आता त्यांचा खेळ संपला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या दोघांशिवाय अन्य पक्षांनीही ही बाब मनोमन मान्य आहे. गेली दोन दशकं नितीश कुमार हे बिहारच्या राजकारणातील मुख्य पात्र राहिलेले असले आणि त्यांच्याभोवतीच अन्य पात्रं आणि पक्ष फिरत असले, तरी आज तशी परिस्थिती उरलेली नाही. कदाचित निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत तेच मुख्य पात्र आहेत असा बहाणा त्यांचा पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष करत राहतीलही, पण नंतर ही भूमिका राहणार नाही, असं बिहारमध्ये बोललं जात आहे.
असं का?
आजतारखेला नितीश कुमार यांच्या पक्षात सर्वांत लोकमान्य नेतृत्व त्यांचंच आहे. त्यांच्या नंतर जी नेत्यांची फळी आहे, त्यांना राज्यभर जनमान्यता नाही. त्यामुळे नितीश यांचा चेहरा सर्वांपुढे ठेवणं आणि बाकीच्यांनी आपापल्या जनाधारांतून पक्षाला मतं मिळवून देणं, असं या पक्षाचं मॉडेल राहिलेलं आहे. नितीश स्वत: कुर्मी समाजातील आहेत. हा समाज नेहमीच यादव या राजकीयदृष्ट्या प्रबळ अशा ओबीसी वर्गाच्या विरोधात राजकारण करत आला आहे. या समाजाच्या जोडीला नितीश यांनी बिगर यादव ओबीसी व दलित समाजांना आपल्या पाठीशी उभं केलं आहे. हे वर्ग अजूनही नितीश यांच्या सोबतच आहेत. शिवाय अन्य छोट्या समाजांच्या स्थानिक नेत्यांना नितीश यांनी स्वत:शी जोडून घेतलं आहे आणि पदंही दिली आहेत. परिणामी एक मोठा वर्ग नितीश स्वत:जवळ बाळगून आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने नितीश वजा राजकारण तूर्त अशक्य आहे.
दुसरीकडे, नितीश यांच्यासोबत युती केलेल्या भाजपकडेही राज्यभर स्वीकारार्ह असा नेता नाही. गेली कित्येक वर्षं भाजप बिहारमध्ये प्रयत्नशील असला तरी त्यांना मोठा जनाधार मिळवता आलेला नाही. त्यांचं नेतृत्व प्रामुख्याने उच्चजातीयच राहिलेलं आहे. सुशीलकुमार मोदी यांच्यासारखा बहुजन चेहरा त्यांच्याकडे होता, पण त्यांचं अलीकडेच निधन झालं आहे. शिवाय बिहारी आखाड्यात शड्डू ठोकून उतरण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळेही ते फार मोठा जनाधार मिळवू शकले नव्हते. त्यांच्या निधनानंतर भाजपने सम्राट चौधरींसारख्या पक्षांतरं करून पुढे आलेल्या कोयरी समाजातील नेत्याला उपमुख्यमंत्री केलं आहे. पण त्यांच्याबद्दल पक्षातल्या जुन्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. परिणामी भाजप लोकसभेच्या निवडणुकीवेळी जेवढा एकसंध होऊन यश मिळवतो, तसा विधानसभा निवडणुकीत मिळवू शकत नाही. त्यामुळेच तो बिहारमधील स्वतंत्र आणि प्रमुख पक्ष बनू शकलेला नाही. त्याला नितीश कुमारांची साथ मिळवल्याशिवाय पर्याय राहत नाही.
नितीश कुमारांच्या कुबड्या घेऊनच आजवर भाजप बिहारमध्ये सत्तेवर पोहोचत आला आहे आणि आजही पर्याय नसल्यामुळेच भाजपने नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं आहे. पण गेल्या निवडणुकीपासून नितीश यांचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्नही भाजपतर्फे चालले आहेत. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग यांना आतून-बाहेरून बळ देऊन नितीश यांच्या जागा घटवण्याचा खेळ गेल्या निवडणुकीत भाजपने खेळला होता. चिराग यांनीही आपण मोदींचे हनुमान असल्याचं सांगून टाकलं होतं आणि वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर आपण मोदींना पाहतो असं म्हटलं होतं. मोदींनीही भरपूर ढील देऊन त्यांना केंद्रात मंत्रीपद दिलं आणि बिहारच्या राजकारणात त्यांना अवकाश मिळेल अशी सोय केली. मोदींनी चिरागना मोठं करणं नितीश यांना कधीच मान्य नव्हतं, पण भाजपच्या पाठिंब्यावर त्यांचं राज्य तरलेलं असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. या साऱ्या खेळातून नितीश यांची पकड ढिली व्हावी आणि त्यांना मानणारा वर्ग आपल्याकडे वळवावा, असा प्रयत्न भाजपतर्फे चालला आहे, असं बिहारमधले राजकीय निरीक्षक सांगतात.
याचा अर्थ नितीश बाबूंचं खच्चीकरण तर करायचं पण त्यांचा चेहरा वापरून आपलं राजकारण पुढे रेटायचं, असा डबलगेम भाजप खेळत आहे. त्यामुळेच निवडणुका आटोपल्या की नितीश यांना सन्मानाने उपराष्ट्रपती वगैरे करायचं आणि बिहारचं राजकारण ताब्यात घ्यायचं, असा भाजपचा प्लॅन आहे म्हणतात. त्यामुळेच नितीश यांची राजकीय कारकीर्द या निवडणुकीनंतर आटोपेल असं म्हटलं जातंय.
नितीश यांचे एकेकाळचे सहकारी प्रशांत किशोर यांनीही त्यांच्यापासून अलग होऊन जनसुराज्य पक्ष स्थापन केला आहे. गेली दोन वर्षं ते बिहारमध्ये पायी फिरत असून नितीश यांच्याविरोधात बोलत आहेत. ते लालूप्रसाद, भाजप आणि काँग्रेस यांच्या विरोधातही बोलत असले, तरी त्यांचा रोख प्रामुख्याने नितीश यांच्यावरच असतो. त्यांनाही आतून भाजप मदत करत असल्याच्या चर्चा मधल्या काळात होत्या. पण त्या गॉसिपमध्ये जाण्यात अर्थ नाही. मात्र एवढं खरं की बिहारमध्ये नितीशविरोधी वातावरण तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्याचा राजकीय लाभ त्यांना लगेच मिळेलच असं नाही, पण त्यांच्या आक्रमक प्रचारामुळे नितीश यांची उंची कमी होण्याची शक्यता खूपच आहे. त्याचा लाभ एकतर तेजस्वी यादव यांना होईल किंवा भाजपला. लाभ कुणालाही झाला तरी नुकसान मात्र नितीश यांचंच होणार आहे.
हे सर्व हल्ले परतवून लावण्याची शारीरिक-मानसिक ताकद नितीश यांच्यामध्ये उरलेली नसल्याने ते खिंडीत गाठले जातील आणि त्यांचं चेकमेट होईल, असं मानलं जात आहे. त्यांचं चेकमेट होण्यातच सर्व पक्षांचं भलं असल्याने सारेच लोक त्यांच्यावर आतून अथवा बाहेरून वार करू पाहत आहेत.
या साऱ्या हल्ल्यांना नितीश कुमार पुरून उरतात का बघायचं!
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
